भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, आमच्या भागात (श्रीवर्धन) खोचेरा म्हणतात. श्री. ना. पेंडसे यांच्या लिखाणात कामेरू असा शब्द येतो. मला वाटतं कामेरू नावाचं त्यांचं एक पुस्तकच आहे. पण 'तुंबाडचे खोत'मध्येही कामेरू की कांबेरू शब्द आहे.
तीन टोकं असतात या हत्याराला. त्याने सापाला अडकवून मग काठीने सापाला मारतात. हे लिहिताना मलाही खूप क्रूर वाटतंय पण मी हे बघितलेलं आहे. त्यावेळी सर्पमित्र वगैरे प्रकारचे लोक नसायचे आजूबाजूला.

** कामेरू नावाचं त्यांचं एक पुस्तकच>>>
हे मी वाचलेले नाही पण इथे (https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4784075941859608188)दिलेल्या माहितीनुसार असं दिसतंय:

"कामेरू' या कादंबरीचा विषय कामभावना असला तरी वैविध्यपूर्ण विषय यात येतात. ग्रामजीवनापासून सुरू होणारी ही कथा शहरी जीवनात स्थिरावते. कामवासनांचे, सुखदु:खांचे चित्रण विलक्षणतेने येते. आदिम कामेच्छांचे चित्रण अस्वस्थ करते".

5W आवडले !
धन्स
त्यांना पंच -कस म्हणायचे का Happy

४ कस.= चौकस हे कधी लक्षात नव्हते आले आणि शब्द संस्कृत मूळचा असेल हे तर त्याहून नाही.

चौकसचा समकक्ष नागर शब्द 'भोचक'. दोघांमधली सीमारेषा तशी पुसट आहे Happy

अजून एक.....
चौकस आणि चौकशा करणारा यांच्यातील सीमारेषा देखील सुस्पष्ट आहे !

... आपला तो चौकस आणि दुसर्‍याचा तो भोचक... Happy

दोन्ही स्वल्परूपच ठीक आहेत. माईल्ड डिग्री ओन्ली. हा हा

https://www.maayboli.com/node/17727
इथे जुन्या वजन मापांवर लेख आहे.

दुसऱ्या एका धाग्यावर मी जुन्या वजन मापांचा फोटो पण चढवला आहे.
तो शोधावा लागेल

समजले. आभार, @ कुमार.

@ भरत, कोवळे नाही, कोळवेच होते ते.
रेसिपी लय भारी कॅटेगिरी - केवड्याच्या नाजूक कणसांची भाजी !!! खाली दिलेले वर्ष होते १९१४ Happy

1914>>>
अरे वा ! तुमच्याकडे अगदी पणजीबाईंचा मस्त पाकखजिना दिसतोय !

काल हैद्राबाद आउटर रिंग रोडला एके ठिकाणी मार्गदर्शक फलकावर विमानतळाला हिंदीत "विमानाश्रय" असे लिहिलेले पाहिले.

विमानाश्रय
शब्द आवडला !
....
आपल्या ट्रेन्सवर हिंदीत लिहिलेला शयनयान पण मला खूप आवडतो

हरभरा / हरबरा
हे दोन्ही शब्द प्रचलित आहेत.
शब्दकोशात हरभरा असा मूळ शब्द दिला आहे. त्याची फोड :
हर + भरा
अशी आहे.

हर हे शंकराचे नाव.
Supposed to be full of the deity.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%B0%...

या झाडाला देवपण देण्याचे कारण समजले नाही.

'विमानाश्रय' सारखेच -

'डिस्क्रीशनरी पॉवर्स' साठी मी नुकतेच 'विवेकाधीन अधिकार' असे वाचले.

विवेकाधीन >>> छान.
...
खुष्की हा शब्द फारसीमधून आला आहे.

खुषकी, दर्याई व हवाई
हे तीनही फारसीच.!

खुश्की, खुश्क ह्या शब्दांचे संस्कृत शुष्क शी नाते आहे. दोन्हींचा अर्थ कोरडा, ओलावारहित असा आहे.
मध्ययुगात ( १४५३) constantonople बायझंटाईन सत्तेचा पाडाव होऊन ऑटोमन तुर्कांची सत्ता आल्यावर Constantinople हे महत्त्वाचे बंदर रोमनांच्या हातातून निसटले. त्यामुळे रेशीम मार्ग (जमिनीवरचा /खुश्कीचा) मार्ग जवळ जवळ बंद पडला. मग यूरप आशियाशी जोडणाऱ्या जलमार्गाची शोधाशोध सुरू झाली. त्यासाठी मोहिमा निघाल्या. आणि भारत नावाचे रत्न त्यांना सापडले.

,

त्यावरून आठवलं. हा जो खुष्कीचा मार्ग आणि त्यातून व्यापार चालायचा, त्यात आपल्याकडून मसाल्याचे पदार्थ जायचे. त्यातून चिंच जेव्हा अरबस्तानात पोहोचली, तेव्हा त्यांना तो प्रकार नवीन होता. दिसतो तर खजुरासारखा (त्यांच्या भाषेत तमार), पण चव वेगळी - असं वाटून त्यांनी त्याला तमार - ए - हिंदी म्हणजे हिंदुस्थानचा खजूर असं नाव दिलं. ह्या तमारेहिंदची पुढे युरोपात tamerind झाली.

वा वे, हो. बरोबर. अमेरिका खंड अज्ञात होते ते युरोपीयांना सापडले. भारतीय द्वीपकल्प त्यांना पूर्वीपासून माहीत होते. इथे पोचण्याचा जलमार्ग माहीत नव्हता तो सापडला.
ह पा, हो. ही व्युत्पत्ती खूप लोकप्रिय आहे. प्रचलित आहे, अधिकृत आहे. पण विकिपीडिया नसतानाच्या काळात एकदा तिचा पर्याय (आणि प्रतिवादही) वाचला होता. आता आठवत नाही. पण तेव्हा तो विश्वासार्ह वाटला होता.

Pages