भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे घालतो त्याला इंग्रजीत Clue म्हणतात. त्यासाठी शोधसुत्र हा शब्द चपखल आहे.
या शोधसुत्राने कोडे सुटत नसेल तर दिशा मिळण्यास काही हवे, त्यासाठी शब्द हवाय ना तुम्हाला?

धन्यवाद मानव, कुमार.

शोधसुत्राने कोडे सुटत नसेल तर दिशा मिळण्यास >> त्यासाठीही काही असेल तर सुचवा.

युट्युबवर जिऑग्राफी नाउच्या 'सूदान'वरील भागात लक्षात आलं, सुदानी भाषेत चंदनाला 'संदन' म्हणतात. इंग्रजी सँडल हा शब्द संस्कृत चंदनावरूनच आलेला आहे असं विकीपिडियाचं म्हणणं आहे आणि त्याचं मूळ (चंद्र/चँदिअर - चमकण्याच्या संबंधित) प्रोटो-इंडो-युरोपियन असावं. सूदानी 'संदन' हा उच्चार चंदन आणि सँडलच्या मधला उच्चार वाटतो; कदाचित अरब प्रदेशातून तिथे गेला असावा (तिकडे अरबी शब्द बरेच आहेत).

उर्दू मध्ये संदल म्हणतात. मजहर वर ते संदल चा लेप चढवतात.
sandalwood, red sanders वगैरे शब्दसाम्य लक्षणीय आहे.
अरबीमध्येसुद्धा असेलच.

झाफ्रान शब्दाची तर गूगल भाषांतरात फारच धक्कादायक मजा केली आहे. इंग्लिश मध्ये it is obtained from golden stigma and style from a plant असे साधारण वाक्य. त्याचे भाषांतर आपण सर्वांनी गूगल वर जाऊन पाहण्यासारखे आहे. सोने के कलंक से निकाला गया असे भाषांतर आहे चक्क. stigma म्हणजे फक्त कलंकच. फुलाच्या स्त्री केसराला style म्हणतात आणि त्यावरच्या सपाट नाजूक थाळीला stigma म्हणतात हे कोणाला ठाऊकच नाही!

stigma & style
>> , झकास !
किती वर्षांनी उजळणी झाली या शब्दांची..

उर्दू मध्ये संदल म्हणतात >> अच्छा. ते गाण्यातलं 'संदली संदली मरमरी मरमरी' म्हणजे हे संदल आहे होय!

काय सुरेख धागा आहे! मायबोलीवर अ‍ॅक्टीव झाल्याचं सार्थक झालं.. माझ्या खूपच आवडीचा विषय आहे हा. नक्की वाचत राहीन..

खूप पूर्वी एके ठिकाणी संस्कृतातून mother/father/brother हे शब्द इंग्लिशमध्ये गेले असं वाचलं होतं.
माता = मादा = मदर, पिता = फिता = फादर आणि भ्राता = ब्रादा = ब्रदर असं काहीसं रुपांतर झालं आहे..
तसंच संस्कृतात स्वसृ असा शब्द आहे ज्याचा अर्थ भगीनी/बहीण असा होतो. इंग्लिश मधील sister हा शब्द त्यावरून आला आहे.

अजून एक quora वर वाचलेलं आठवतंय.
"रिकामा न्हावी आणि भिंतीला तुंबड्या लावी" ही खरंतर 'कुडाला तुंबड्या लावी' अशी म्हण आहे.
तुंबडी म्हणजे धातूचे भोंग्यासारखे नळकांडे. जखमेतील अशुद्ध रक्त बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग केला जाई. तुंबडीचे एक टोक जखमेवर ठेऊन दुसऱ्या बाजूने तोंडानी हवा खेचून घेऊन न्हावी लोक अशुद्ध रक्त काढीत असत. ही तुंबडी खेडेगावातल्या कुडाच्या भिंतीला टेकवून आतमध्ये चाललेले संभाषण ऐकण्यासाठी सुद्धा वापरता येत असे. जर कोणी न्हावी काही काम नसल्यामुळे रिकामा बसून असला तर तो कुडाला तुंबडी लावून गावातली माहिती गोळा करू शकत असे. त्याच्यावरून ही म्हण पडली.

"हाणले त्याला पार रेंदगूड काढले" असे एकेजागी वाचले.

शब्द डोक्यात अटकून राहिला. आज कोशात बघितला तेंव्हा अर्थ समजला - रेंदगूड काढणे म्हणजे झोडपून काढणे, रक्त निघेपर्यंत मारणे !

इल्डा
स्वागत आहे, येत चला.
**रिकामा न्हावी >> यासारखाच एक दुसरा वाक्प्रचार म्हणजे रिकामा सुतार कुल्ले तासी
.........
**रेंदगूड काढणे>>>
लय भारी.! आवडलेच

सोने के कलंक से निकाला गया Happy

मी stainless steel साठी ‘कलंकहीन फौलाद’ असं वाचलेला माणूस आहे. आता मी कुठल्याच भाषांतराला घाबरत नाही

मी stainless steel साठी ‘कलंकहीन फौलाद’ असं वाचलेला माणूस आहे. आता मी कुठल्याच भाषांतराला घाबरत नाही >>> हाहाहा.

भाषांतरभयहीन अनिंद्य! >>> हाहाहा.

इल्डा मस्त माहिती.

एक लडकी को देखा तो मधली संदल की रात म्हणजे उरुसाची रात्र पण त्यात संदल चं काय काम? पिराला संदल लावतात काय?

इल्डा, तुम्ही उल्लेखलेले शब्द संस्कृतमधून इंग्लिशमधे गेले असे नसून लॅटिन, वेदिक संस्कृत, पहलवी इत्यादि भाषांची आई किंवा आजी अशी जी P I E म्हणजे प्रोटो इंडो यूरोपीय भाषा तज्ज्ञानी reconstruct केली आहे त्यातून पिढी दर पिढी आजच्या भाषांपर्यंत पोचले आहेत.

हो. उरुसातला दुसरा दिवस हा चंदनाचा लेप लावायचा आणि फुलांची चादर चढवायचा असतो. तिसर्‍या दिवशी भंडारा.
दर्ग्याच्या सेवेकर्‍याचा मान वंशपरंपरेने चालतो. त्या लोकांना मुजावर म्हणतात. हे आधल्या रात्रभर चंदन उगाळतात. लेप जाड असावा लागतो.

संदर्भ - इंग्रजी माध्यमाच्या दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला आशा अपराद यांचा उरुसाचे दिवस हा लेख. त्यात पन्हाळ्यावरच्या उरुसाचे वर्णन . हे आठवणीतून लिहिले आहे. पुस्तक जवळ नाही आणि सध्याच्या अभ्यासक्रमात नाही. त्यामुळे चूभूद्याघ्या.

दोनतीन पिढ्यांपूर्वीचे चित्रकार डी डी रेगे ह्यांनी जंगली महाराजांचे चरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी जंगली महाराजांच्या बायालॉजिकल वारसांकडून महाराजांना संदल आणि चादर कशी मिरवणुकीने येते ह्याचे वर्णन केले आहे.
चंदन लिंपण्याचे वर्णन अनेक ठिकाणी वाचले होते.
आशा अपराद ह्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक आवडले होते. त्यात त्यांचे वडील भाईजी ह्यांचे चित्रण मनावर ठसले होते.

शंकराला भंडारी का म्हणत असतील? >> २५ व्या पानावर ही चर्चा आहे ती आता वाचली.

शंकराला बेलभंडारा वाहतात. म्हणजे बेलाची (अनेक) पाने असा अर्थ असावा. असा (बेल) भंडारा आवडणारा तो भंडारी अशी उकल होऊ शकते (का?)

बदनामी हा शब्द सर्रास वापरातला. परंतु तो ज्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, तो नामी हा शब्द तुलनेने कमी वेळा वापरला जातो.

हे दोन्ही शब्द एकाच वाक्यात घेतल्यावर रंजक वाटते :

" असं म्हणतात, की राजकारणात बदनामी सुद्धा नामी असते !"

नामी हे विशेषण आहे. -उत्कृष्ट; चांगला; प्रसिद्ध
बदनामी हे विशेषणापासून बनलेले भाववाचक नाम - दुर्लौकिक , कुप्रसिद्धी

'बद' हा मराठीत हिंदी/उर्दूतून आला असावा. याच अर्थाची हिंदी म्हण - बद अच्छा बदनाम बुरा.

मराठीत वापरले जाणारे 'बद' असलेले अन्य शब्द ;-

बदफैली

बदमाश

बदल

बदला

बदनशीबी

'बद' हा मराठीत हिंदी/उर्दूतून आला असावा

नाही.

बद हा शब्द (आणि इतर असे अनेक शब्द) थेट पर्शियन भाषेतून मराठीत आणि हिंदूस्थानीत आले.

हिन्दूस्थानीतून ते आजच्या हिंदी/उर्दूत गेले.

Pages