मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता काय कमी अश्लील अस्तात की काय? पोरी जरा जपून दांडा धर.....अवधूत गुप्ते निर्लज्ज आहे.>> ते गाणे नवीन होते तेव्हा जिथे-तिथे सगळीकडे आपण काहीतरी भारी गाणे केले आहे या आविर्भावात गाणे गायचा. वैताग नुसता!

अशोक सराफ यांची अजून काही बघणीय गाणी

अगं नाच नाच नाच राधे , उडवुया रंग - मला विडिओ नाही सापडला , पण यात कृष्ण म्हणून अशोक सराफ आहे हा मला तरी खूपच उशिरा लागलेला शोध होता

वाजवा रे वाजवा मध्ये - https://www.youtube.com/watch?app=desktop&v=0-x4shOrelM आफ्रिकन बाई च्या वेशात

रती अग्निहोत्रीचे दुधकेन्द्राचे गाणे म्हणजे हाईट आहे. सुरवातीला दुधकेन्द्र म्हणताना कॅमेरा पण नेमक्या जागी मारला आहे. सेन्सार कसे काय पास करायची असली गाणी?

त्या मानाने गोष्ट धमाल नाम्याची मधले कल्पना अय्यर ची लावणी किती तरी पटीने छान आहे. https://www.youtube.com/watch?v=ictBnhcobus या लिंक वर ४८ व्या मिनीटाला लावणी सुरू होते. आशा भोसलेंच्या आवा़जातली ही लावणी फार मस्त वाटते. (कडव्याची चाल पण मस्त आहे).

बाकी कुठे कुठे जायाचे हनिमुनला हे गाणे फारच धमाल होते. लहानपणी कोल्हापुरला आम्ही थोडे विचित्र पद्धतीने म्हणायचो. "कुठे कुठे जायाचे हनिमुनला" नंतर आम्ही "रां*" किंवा "भ***" असे म्हणायचो.

थोडया वेळापूर्वी माहेरची माणसं चित्रपट चालू होता आणि त्यातलं नांदे शंभु कैलासाचा पती हे आशा काळेवर चित्रित गाणं लागलं होतं. गाणं संपल्यावर आशा काळे घरी येतात तेव्हा त्यांच्या हातात नवा कोरा कमांडलू आणि भाजीची कापडी पिशवी असते ज्यात जास्तीत जास्त एखादा छोटा कपडा ठेवला असेल, एखादी नऊवारी ठेवलेली असेल एव्हडी ती पिशवी बिलकुल फुगलेली नव्हती. गाण्यात मात्र आशाताई वेगवेगळ्या नऊवारी नेसून दाखवल्या आहेत. बाकीचे कपडे यूज आणि थ्रो केले की काय Uhoh

सेन्सार कसे काय पास करायची असली गाणी?>>>>

सेन्सॉरकट नंतरचे गाणे आपल्याला पाहायला मिळते. काही भाग अगदीच अश्लील असेल तर तेवढा भाग परत करावा लागतो. किती किती कट करत बसणार? दादा कोंडकेची सेन्सॉरसोबतची भांडणे आणि त्यांची उत्तरे त्यांच्या आत्मचरित्रात आहेत.

चित्रपट चालावा म्हणून निर्माता दिग्दर्शक काहीही करू शकतात आणि कलाकारांना हो म्हणावे लागते. करारावर आधीच सह्या केलेल्या असतात.

स्मिताच्या एका मुलाखतीत तिने म्हटले होते की आज रपट जाये च्या चित्रीकरणानंतर घरी जाऊन ती रडली होती. अजून एका गाण्यात तर फ्रेममध्ये येणार नाही याची काळजी घेत एकाला बसवले होते व त्याचे काम हिरॉईनचा स्कर्ट वर उडवणे हे होते.

एका हिंदी चित्रपटाची या निमित्ताने आठवण झाली. चित्रपट चित्रपटसृष्टीवर होता, फिल्म शूटिंगसाठी युनिट बाहेरगावी गेलेले असते. वयाने खूप लहान असलेल्या हिरोईनवर जबरदस्ती केल्याचे दृश्य चित्रित करायच्या निमित्ताने ती ज्याला प्रत्यक्ष आयुष्यात अंकल म्हणत असते तो तिच्यावर खरी जबरदस्ती करतो. त्या दिवशी असे होणार हे उपस्थित सगळ्यांना माहीत असते तरीही जबरदस्ती करणाऱ्याला न थांबवता त्या दृश्याचे चित्रीकरण होत राहते. आपल्या ओळखीचे लोक असे वागले या धक्क्याने ती हिरोईन आत्महत्या करते अशी काहीशी कथा होती.

बाकी रती खूप गोड दिसते त्या गाण्यात. या चित्रपटाची निर्माती दिग्दर्शक सबकुछ सुषमा शिरोमणी. ती स्त्री असूनही निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यावर इतरांसारखेच वागली. बाकी जिथे व्ही शांतरामांनाही स्वपत्नीला पडद्यावर एक्सपोज करताना काही वाटले नाही तिथे बाकीच्यांचे काय?

आज पिंजरा चित्रपटातले "दे रे कान्हा चोळी लुगडी" हे गाणे युट्युबवर पाहिले. संध्याने ओवरअ‍ॅक्टींग कशी करावी याचा एक उत्तम नमुना सादर केलाय. पहिल्या कडव्याच्या शेवटी "अरे कान्हा" असे गाताना जे काही हातवारे व चेहर्‍यावर भाव दाखवलेत की बास. श्रीराम लागूंसारख्या अभिनेत्याला पुर्णगाण्यात गप गार केलंय. लता मंगेशकर व राम कदम यांच्या आवाजामुळे हे गाणे सुसह्य होते. बरे झाले की अजून हा चित्रपट मी पाहिला नाही ते...

संध्या डेंजर होती .. मान्य !!

पण पिंजरात ते सगळं बरोबर वाटलं. तमासगीर असलेली ती बाई असते. तिचं वागणं लाऊड असायला हवं अशीच कल्पना असणार.

बादवे. चित्रपटात कधीतरी शेवटच्या अर्ध्या तासात ही सगळी पालावरची माणसं कुठेतरी चहापाण्यासाठी थांबतात. तेव्हा संध्याला काय खाणार असं विचारल्यावर ती ठसक्यात "शिर्र्रा आनि भज्ज्जी" असं सांगते. लहानपणी आम्ही भावंडं तिच्या ह्या डायलाॅगची साॅलिड नक्कल करायचो.

पिंजरा खूप वेळा पाहिला. त्यात निळू फुले दोन तीन वेळा ठसक्यात संवाद म्हणतात ते लाजवाब आहे.

माझ्या डोळ्यांना स्वप्नील जोशी हिरो म्हणुन कधी पटला नाही, त्यामुळे incl पुणे मुंबई पुणे, कोणताही सिनेमा पाहिला नव्हता. तुकडे तुकडे, एखादा सीन असे बरेच पाहिले पण माझ्या हिरोच्या व्याख्येत ऋन्मेषचा मराठी शाहरुख खान फिट झाला नाही. परवा प्राईमवर काही तरी शोधताना अचानक 'तू ही रे' नावाचा रोमँटिक मुव्ही दिसला आणि सई आवडते म्हणून पाहिला. असह्य अशक्य सिनेमा आहे. Especially या सिनेमात स्वप्नील जोशी एवढा स्थूल आणि गुळगुळीत मुळमुळीत बुळबुळीत दिसतो की एवढ्या घरच्या दारच्या आणि अगदी रस्त्यावरच्या (हो असा एक सीन आहे) बायका त्याच्यावर फिदा होतात हे बघुन हसु आलं. एका बेडसीनमध्ये त्याचे उघडे थलथलीत आर्म्स अक्षरशः मैदा मळुन ठेवल्यासारखे दिसतात. वाईट सिनेमा.
गोड सई आणि काम पण छान करते. ढोलु स्वप्नील, सुंदर पण उग्र आणि बधिर एक्सप्रेशन्स असलेली तेजस्विनी, एक अत्यन्त आगाऊ बालकलाकार, मिश्किल चेहऱ्याचे गिरीश ओक चक्क निगेटिव्ह रोलमधे असा एकुणच कास्टिंग गंडलेला सिनेमा आहे.

मग तर एम एक्स प्लेयर वर समांतर बघच मीरा Happy
तुला अजून विनोदी आउटलुक मिळेल.
मला तो नोकॉमेंट आहे. फार आवडत नाही आणि फार नकोसाही होत नाही.
मला हल्ली सगळीकडे सु.भा. पाहणे जास्त डोक्यात जाते.तसा तो चांगला आहे पण त्याचा ओव्हरडोस होतो.

बापरे पिंजरा चे हिंदी वर्जन पण आहे??? डोळे दिपले.

मराठीतच "दे रे कान्हा" गाणे छान वाटते. पण हिंदी वर्जन मध्ये संध्याची अ‍ॅक्टींग बरी वाटतेय. ओव्हर केले नाही काही...

मराठीत निळू फुले होते तर तोच रोल हिंदी वर्जन साठी राजा गोसावींना दिलाय हा एक बदल जाणवला.

चित्रपटाची कथा जरी जर्मन असली तरी तिचे भारतीयीकरण जबरदस्त जमले आहे. दो अंखे बारह हाथची खुल्या तुरुंगाची कल्पना पण बाहेरून आणलीय पण तिचे भारतीयीकरण अतिशय उत्तम जमले आहे.

बापरे पिंजरा चे हिंदी वर्जन पण आहे??? डोळे दिपले.>>>

त्यांचे बहुतेक सगळे चित्रपट दोन्ही भाषेत बनवलेले आहेत, डब न करता.

सीमंतिनी यांचा प्रतिसाद 'असंबद्ध गप्पा' वाहत्या धाग्यावरून इथे चिकटवत आहे.

---
हे गाणे म्हणजे कहर आहे - 'माझ्यावीण ही तुझी चारूता, मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो" .... चारूता काय चारोळी आहे काय की पेढ्यावर पडलीच पाहिजे.... प्रश्न तिच्या चारूतेचा नसून त्याच्या चालूते चा जास्त वाटला हं Wink

https://www.youtube.com/watch?v=PP7XEtn4ljQ

Submitted by सीमंतिनी on 12 May, 2021 - 03:04

हे गाणे अनेकदा ऐकले होते पूर्वी आणि ते अजूनही बरेच लोकप्रिय आहे खेडेगावात:
तुज्या माज्या संसाराला आनि काय हवं

पण त्यातली हि ओळ! कदाचित त्या काळात कळते वय नसल्याने मला अर्थ लक्षात आला नसावा. पण परवा चुकून का काय नीट ऐकली गेली माझ्याकडून:

तरारलं बीज तुज माज्या कुशीतूनी

इथे थेट? बापरे! Are you sure?
गायक, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता या सर्वच पातळीवर इतके थेट कसे काय स्वीकारले गेले आश्चर्यच वाटले.

ते गाणं नायिका गर्भवती असतानाचे आहे.
इथे १ तास १० मिनिटांनी ते गाणं सुरू होतं. त्याच्या आधीची काही मिनिटं पाहिलं तर कळेल.
तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं असं ध्रुवपदातच म्हटलंय.
चित्रपटातल्या प्रसंगाला अगदी अनुरूप असे शब्द आहेत. आका शवाणीवर हे गाणं कंटाळा येईपर्यंत वाजत असे.

हो मान्य आहे. पार्श्वभूमी माहिती आहे गाण्याची चित्रपटातील. गाणे प्रसंगानुसार तरल भावनाप्रधान आहे. बाकी सर्व गाणे सुरेख आणि सुरेल आहे. पण हि ओळ जरा अती च वाटली.

>>>>>>पिंजरा जर्मन चित्रपटावरून बनवला आहे.
बहुतेक ब्ल्यू एंजल

पिंजरा, माझा आवडता सिनेमा आहे. आसक्ती-विरक्तीचा संघर्ष.
ब्लू एंजल पाहीन.

हो सुनांना चक्कर येण्याचे दोन मार्गः
- नवर्‍याचे आपला पराक्रम पाहून मतपरिवर्तन झालेले बघितले की चक्कर येऊन, किंवा
- मतपरिवर्तन झाल्यावर नवर्‍याने केलेल्या पराक्रमामुळे Wink >>>>>>सो फनी .......

एवढ्या पीळ पाडणाऱ्या नव्या जुन्या मराठी चित्रपटांची चर्चा २२ पाने करूनही त्यात नीना कुलकर्णी - दिलीप कुलकर्णी वाल्या ' आई ' सिनेमाचा उल्लेख आला नाही याबद्दल निषेध.

दोन मुलांना खस्ता खाऊन वाढवल्यावर मग ते आई बापाला विसरतात मग दिलीप कुलकर्णी बेगोन पितात आणि अपंग होतात. नीना कुलकर्णी बिझनेस करतात. इथे दोन्ही मुले हलाखीत जातात. मग नीना कुळकर्णी त्यांना सिक्रेटली मदत करते. मग मुलांना उपरती होऊन ते परत येतात तोवर या मेलेल्या असतात.

आम्हाला शाळेत असताना आई वडिलांचं महत्व सांगण्यासाठी पुन्हा पुन्हा दाखवला होता. अरेरे !!

मुलांना उपरती होऊन ते परत येतात तोवर या मेलेल्या असतात.>> नाही शेवटी मुलांचा नवर्याचा आक्रोश पाहून (की माराने)परत जिवंत होतात त्या (सुखाने मरूही देत नाहीत)

दोन मुलांना खस्ता खाऊन वाढवल्यावर मग ते आई बापाला विसरतात मग दिलीप कुलकर्णी बेगोन पितात आणि अपंग होतात. नीना कुलकर्णी बिझनेस करतात.>>

राजेश खन्ना, शबाना च्या अवतार सिनेमाचा रीमेक

पानात पडेल ते खाणे आणि दूरदर्शन दाखवेल ते पाहणे असं लहान पण गेलं असल्या मुळे झेपेल न झेपेल ते सगळं पाहिलं आहे लहानपणी,शनिवारी आणि रविवारी दुपारी टीव्ही वर.

Pages