मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण छळायला रंजना?
ती अश्या स्किलसेट मध्ये नसायची ना कधी? Happy

काही चित्रपटात तिने निगेटीव्ह वाटतील असे रोल केले आहेत. उदा. कुलस्वामिनी अंबाबाई आणि हीच खरी दौलत... (हीच नावे आत्ता आठवत आहेत).

आणि तो अजून एक पिक्चर होता ना,
कुलदीप पवार बायकोचा खून करायला निघालेला असतो आणि ती शेवटच्या क्षणी तो ढकलणार असताना काहीतरी फण्डा डायलॉग देते आणि त्याचे हृदय बदलते (म्हणजे हार्ट ट्रान्स्प्लांट नव्हे, त्यातले विचार बदलतात)

सुभद्रा स्वयंवर नावाचा जयश्री गडकर,सूर्यकांत,अरुण सरनाईक आणि शाहू मोडक यांचा सिनेमा. त्यातील डॉयलॉग अगदी भारी आहेत.

बलराम अर्जुनाला म्हणतो 'काय अर्जुना घरी कुंती आत्या, युधिष्ठीर,भीम वगैरे मंडळी कुशल आहेत ना'

बलराम कृष्णाला म्हणतो 'कृष्णा तू डोके कधी कधी चांगलेच चालवतोस :-)'

आणि तो अजून एक पिक्चर होता ना,
कुलदीप पवार बायकोचा खून करायला निघालेला असतो आणि ती शेवटच्या क्षणी तो ढकलणार असताना काहीतरी फण्डा डायलॉग देते आणि त्याचे हृदय बदलते (म्हणजे हार्ट ट्रान्स्प्लांट नव्हे, त्यातले विचार बदलतात)>>
स्त्रीधन. अलका कुबल होती त्याच्यात. भयानक चित्रपट आहे.

आता अलका कुबल सिनेमांचा उल्लेख होतोच आहे तर, जखमी कुंकू कसं सुटलं या धाग्यातून? अलकाबाईंनी घोड्यावर सेतूआसन करून घातलेली अचूक गोळी! https://youtu.be/CzRiQGXQ3qQ?t=2715

भैरू पैलवान की जय हो मधे लक्ष्मीकांत आणि अलका यांचा अरबी पेहेरावा तला डान्स गमतीदार आहे... अलका अशा वेशात अनपेक्षित.... पण छान वाटते..

भैरू पैलवान मी यशवंत दत्तचा बघितलाय, प्रसिद्ध पैलवानाचा बावळट भित्रा मुलगा. विनोदी चित्रपट. उषा चव्हाण आहे सोबत. तेव्हा अलका कूबल शाळेत असावी...

यशवंत दत्तचेही कॉमेडी टायमिंग जबरदस्त होते. गंभीर भूमिका केल्यात पण मला त्याच्या विनोदी भूमिका जास्त आवडायच्या. कुठल्यातरी चित्रपटात त्याची डावी पापणी सतत पडायची...

अलका कुबल माहेरची साडी पासुन अशा रडुबाई सोशिक बाईच्या भुमिका करायला लागली का? कारण आधी काही पिच्चरमधे मस्त स्टेप कट केस असलेली चुडीदार ड्रेस घातलेली अलका कुबल पाहिलेय. ती छान वाटायची तशी.

एक मराठी सिरीयल होती त्यात ती एकदम मॉडर्न, स्टेप कट वाली करियर वूमन होती.

माहेरची साडी नंतर टाइपकास्ट झाली असावी.

"नवी नवी नवरी मी नको लाडीगोडी..." असे एक गाणे पूर्वी बरेच प्रसिद्ध झाले होते. गल्लीबोळात, लग्नांत, मांडवात वाजायचे.
तो सिनेमा अर्थातच कधी बघायला मिळाला नाही. पण गाणे ऐकून वाटायचे छान छान गोड गोड काहीतरी शुटींग असेल, लागणारी नवरी वगैरे वगैरे.

प्रत्यक्षात ते गाणे मात्र अलीकडच्या काळात युट्युबवर बघायला मिळाले आणि हि लाजणारी नवरी आणि तिचा नवरा हे दोघे कोण आहेत ते पाहून मानसिक धक्का बसला Lol

https://www.youtube.com/watch?v=sSjITirqmRE

Lol हे गाणे कधी ऐकले नाही. खाटल्यावर नेउ नका, पिंजर्‍यात पोपट वगैरे गल्लीबोळांत, लग्नांत वाजवायचे? दादा कोंडक्यांच्या नंतरच्या चित्रपटात डबल मिनिंग जाउन नुसते एकच मिनींग असलेले संवाद व गाणी उरली होती तसल्या प्रकारचे गाणे दिसते.

नवी नवी नवरी... कोण तर अशोक सराफ विथ ऑल भडक मेकअप .. Lol आणि तिला बघुन अरुण सरनाईक उत्तेजित होतोय... Lol

लाजणारी नवरी आणि तिचा नवरा हे दोघे कोण आहेत ते पाहून मानसिक धक्का बसला >>> बाप रे ! अशक्य आहे. या गेट अप मधल्या नवरीला पाहुन उत्तेजित होणारा पुरुष फारच उतावळा म्हणायला हवा.

खरं आहे. गाण्याची चित्रपटातील पार्श्वभूमी माहित नाही पण बघवत नाही हे शुटींग. 'गुलछडी' बराच गाजला होता. मराठीतले त्यावेळचे मोठे कलाकार होते यात. सरनाईक यांची नकारात्मक भूमिका आहे बहुतेक. त्यांच्या अखेरच्या चित्रपटांपैकी एक असावा. "काय वाटतंय" म्हणणाऱ्या "मिशावाला" म्हणजे सुषमा शिरोमणी यांनी मात्र छान काम केलंय. ओळखू येत नाहीत.

लहानपणी निळू फुलेंच्या काही (म्हणजे बहुतेक सगळ्याच) नकारात्मक भुमिका बघून या माणसाविषयी एक भितीच मनात बसली होती. अशातच एकदा एक चित्रपट (बहुतेक "हीच खरी दौलत") पहायला थेटरात गेलो होतो. त्यात निळू फुलेंचा चांगला संत टाईप माणसाचा रोल आहे. अर्धा चित्रपट होईपर्यंत वाटत होते की अचानक निळू भाऊंचा हा रोल म्हणजे संत असल्याचे नाटक आहे वगैरे वगैरे आणि एकदम ते मेन व्हीलन सारखे पुढे येतील. पण तसे काही झाले नाही. त्यात एक गाणे होते "तोची खरा साधू, तोची खरा संत" ज्याचे चित्रीकरण निळू भाऊंवर होते. त्यात ते लहान मुलांना गोर- गरिबांना मदत करत आहेत असे दाखवले होते. असे वाटत होते की गाणे संपता संपता एकदम हातात सुरा घेतील आणि कुणाच्या मानेवरून फिरवतील.

आता मात्र आपण पुर्वी असा विचार करायचो ह्याचे हसू येतं.

असे वाटत होते की गाणे संपता संपता एकदम हातात सुरा घेतील आणि कुणाच्या मानेवरून फिरवतील. >>> Happy हो त्यांची प्रतिमा तशी झाली होती. खरे म्हणजे त्यांचे प्रचंड गाजलेले किमान दोन चित्रपट आत्ता आठवत आहेत, ज्यात त्यांचा रोल निगेटिव्ह नव्हता: सिंहासन, पिंजरा. इव्हन सामना मधेही रूढ अर्थाने व्हिलन नव्हे.

वरच्या गाण्यात सुषमा शिरोमणी ओळखू आल्या होत्या. एनीवे पिक्चर मधे कोणीही मिशा लावल्या की त्या कलाकाराला ओळखायचे प्रेक्षकांचे % हे १००% असते व चित्रपटातील इतर पात्रांचे ०% Happy

निळू फुले चांगला
रंजना वाईट

रंजल्या जीवाची

हीच खरी दौलत सिनेमा

सुषमा शिरोमणी यांनी रेखा व रति अग्निहोत्री यांनाही एक गाण्यापुरते आपल्या एकेका सिनेमात घेतले होते. यू ट्यूब वर तिथेच रति अग्निहोत्रीचे "दूध केंद्राचं ओपनिंग करा" ही लावणी आहे. डबल मीनिंग शब्द, ते अधोरेखित करणार्‍या नृत्याच्या स्टेप्स वगैरे Par for the course. पण तिथे असलेली "महाराष्ट्र शासन" ही पाटी व गाण्यात एनर्जी या नवीन निघालेल्या पेयाची जाहीरात पाहून मजा वाटली. शासनाकडून अनुदान मिळाले असावे.

विकु, ते रेखाचे हे गाणे Happy
https://www.youtube.com/watch?v=YTtd6aYw_ek

जबरी गाणे आहे ते. रेखा व आशाने धमाल उडवली आहे.

त्याचे एक रीमिक्स सनी लीओन चे आले आहे. ते महाभिकार आहे.

नवी नवी नवरी... कोण तर अशोक सराफ विथ ऑल भडक मेकअप ..>>> चमकी लाऊन अगदी चमकोच करून टाकले आहे Lol
अशोक सराफांनाच ते शूट करताना किती हसू आले असेल.

>> रति अग्निहोत्रीचे "दूध केंद्राचं ओपनिंग करा" ही लावणी आहे.

रति अग्निहोत्री यांनी मराठीत काम केलय हे माहित नव्हते. इथे आहे ते गाणे:
https://www.youtube.com/watch?v=RY_wZRyj9lU
(वारणा डेअरी आणि अजून बऱ्याच डेअऱ्या, एनर्जी ड्रिंक अशी एकंदर घाऊक जाहिरात दिसते हे गाणे म्हणजे)

>> पिंजर्‍यात पोपट वगैरे गल्लीबोळांत, लग्नांत वाजवायचे?

आता थोडे विचित्र वाटते खरे पण तो काळ होता तसा. गावांत आधी दादा कोंडकेंची आणि त्यानंतर जी काही त्या पठडीतली गाणी आली ती गाणी मांडवात दणक्यात लावली जात.

Pages