मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बिलवा Lol अगदी अगदी. तरीही आत्ताच्या पेक्षा सिरियल्स आणि साऊथचे बरेच चित्रपट खूप उत्तम होते.

पानात पडेल ते खाणे आणि दूरदर्शन दाखवेल ते पाहणे असं लहान पण गेलं असल्या मुळे >>> Lol

पानात पडेल ते खाणे आणि दूरदर्शन दाखवेल ते पाहणे----
ह्यात जीवनाचे सार, आमटी, वरण, भाजी सर्व काही आहे

>>>> रंजना आणि अशोक सराफ यांचा बिनकामाचा नवरा पाहिलंय का कोणी?

मी किमान शंभर (१० / २० जास्तच) वेळा पाहिलाय. घरात अजूनही कुणी लावला तर एकाग्रतेने पहील्यांदा पाहील्यासारखा पाहू आणि हसु शकतो
त्यात "गंगी" हे पात्र नसून म्हैस आहे

रंजना आणि अशोक सराफ यांचा बिनकामाचा नवरा पाहिलंय का कोणी?>>> ज्याची बायको झाली सरपंच, त्याचा वाऱ्यावर गेला परपंच! Lol

पानात पडेल ते खाणे या बाबत आपले पालक जागरूक होते पण दूरदर्शन दाखवेल ते पाहणे बाबत जागरूक नव्हते. आपण आपल्या मुलांना खूप कंट्रोल करतो वकाय पाहावं आणि पाहू नये यासाठी. पण आपल्या पालकांचा दूरदर्शन च्या सेन्सॉर शिप वर वर गाढ विश्वास असावा म्हणून सगळं पाहू द्यायचे आपल्याला

>>> पानात पडेल ते खाणे आणि दूरदर्शन दाखवेल ते पाहणे
Lol

>>> आपल्या पालकांचा दूरदर्शन च्या सेन्सॉर शिप वर वर गाढ विश्वास असावा
मला वाटतं दूरदर्शन बर्‍यापैकी जागरूक होतंही कन्टेन्टच्या बाबतीत. खाजगी चॅनल्स सुरू झाल्यावर 'जो जे वांछील तो ते पाहो' प्रकार बोकाळला.

भुजंग सिनेमा त नीळू फुलेला भस्म्या रोग असतो आणि त्याला भुजंग दिसत असतो त्याचा अतिशय परिणाम माझ्या बाल मनावर झालेला.
आजी कधी चिडून म्हणाली कि सारखं काय भूक भूक करता भस्म्या झालाय का, कि माझ्या पोटात भीतीने गोळा यायचा. भस्म्या झाल्याच्या भीतीने नाही तर भुजंग दिसेल आपल्याला पण या भीतीने. डोक्यात भस्म्या =भुजंग असं समीकरण बसलं होत

पानात पडेल ते खाणे आणि दूरदर्शन दाखवेल ते पाहणे
ज्याची बायको झाली सरपंच, त्याचा वाऱ्यावर गेला परपंच
>>>> Lol
भुजंगसाठी +१
त्या भस्म्या प्रकाराचा माझ्याही मनावर परिणाम झाला पण दुसऱ्यांवर पाळत ठेवून डायग्नोस करायला. नंतर बरेच दिवस मुरमुऱ्याचा चिवडाही खाऊ दिला नाही सुखानी कुणाला. Lol

शाळेत असताना दूरदर्शनने इतक्या पौराणिक मालिका आणि रडके मराठी पिक्चर दाखवले, फारच धार्मिक-भोळसट काळ होता. मग सरकार बदललं, कॉलेजमध्ये गेलो आणि गोरी नाल इश्क मिटा, तुनक तुनक तुन वगैरे आल्याने एकदाचे मुक्त झालो. आत्मपॅम्फ्लेटचे सगळे माईलस्टोन थोडे पलिकडे केले की जुळतात अगदी.

बरेच न झेपलेलं काय काय पाहिलं आहे. सवडी सवडीने आठवून लिहीन.
आत्ता चानी या सिनेमा बद्दल, यात रंजना ही फॉरेनर ऑफिसर च्या गैरकृत्या मुळे झालेली मुलगी असतें. तिला फॉरेनर च रंग रूप आलेलं दाखवण्या साठी तिला मक्याच्या कणसाच्या केसाचा विग दिलाय. त्यामुळे ती इतकी भेसूर दिसते. तों मूवी पाहून सोनेरी केसाच्या राजकन्या सुंदरच दिसतात असा माझा समज मोडकळून पडला.

बिल्वा, काय एकसे एक आठवणी काढल्या आहेत! चानी मला पण आठवला. त्या वेळी चांगलं वाईट कळत नव्हतं ,(स्टोरी असेलही चांगली), तरी त्या लूक मुळे तो चित्रपट बघवत नव्हता मला इतकं आठवत आहे. व्ही शांताराम यांना (त्यांच्या नात्यातल्या) नायिकेच्या लूकची वाट लावायची फार खोड आहे. आधी संध्येला करून झालं आणि मग रंजना. अगागागा!

आत्ता पाहिलं तर चानीत सिद्धार्थ (सुशांत) राय होता. तोच तो, छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता फेम, किंवा बनवाबनवीतला शंतूनु. सगळे घरचेच लोक आहेत म्हणजे शांताराम बापूंच्या.

त्या चानी त एक गाणं होत म्हणजे ना धड पद्य ना गद्य type. ते ऐकलं तेव्हा मला मराठीचा तास आठवला होता, जेव्हा बाई मुलांना एखादी कविता वाचून दाखवा म्हणायच्या आणि पोर पोटातून जमेल तितका संगीतकार बाहेर काढून कविता वाचन करायची वर्गात Lol
तुम्ही र दोन दोनच मानस असं काहीतरी गाणं होत, आत्ता नीट आठवत नाही.

रंजना ही फॉरेनर ऑफिसर च्या गैरकृत्या मुळे झालेली मुलगी असतें. तिला फॉरेनर च रंग रूप आलेलं दाखवण्या साठी तिला मक्याच्या कणसाच्या केसाचा विग दिलाय. त्यामुळे ती इतकी भेसूर दिसते.
>>> हो भेसूर यापलीकडे शब्द नाही त्या रुपाला. आणि मला वाटते तो रंजना यांचा पहिला चित्रपट होता.

त्या चानी त एक गाणं होत म्हणजे ना धड पद्य ना गद्य type >>> हो हो. एकदा युट्यूबने सजेस्ट केले म्हणून ते गाणे संपूर्ण पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. नाहीच जमले.

चांदणे शिंपीत जाशी हा सिनेमा यात लागू न ची मुलगी १०वी चा result लागायाच्या आधीच कमी मार्क्स च्या भीतीने suicide करते Sad तों सिनेमा बघितल्यावर मला वाटलेल१० वी हा फार भयानक प्रकार असावा. त्यानंतर आमच्या आस पास चे कोणी ताई दादा दहावीत गेले कि मला त्यांच्या मानसिक अवस्थेची आणि जीवाची फार काळजी वाटायची. मी दहावीत गेल्यावर कळलं इतकं काही टेन्शन घेण्यासारखं नसतं दहावीत. अशाप्रकारे लोकांच्या दहाविच टेन्शन त्या सिनेमाने मला माझ्या बालवाडी /पाहिलीतच दिल, जे मी माझ्या दहावीत सुद्धा घेतलं नव्हतं

दोन च दोन
दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावात....
चालीत वाजत आहे हे गाणं माझ्या डोक्यात.
खडू घेऊन काहीतरी करत असते चानीअसं काहीस आठवत आहे

पानात पडेल ते खाणे ))))))
Lol

आमचे हे life, पुण्यात batchler असताना देखील (केबल वाल्यासोबत तात्विक वादविवाद झाल्याने) रूम मेट ने तावातावाने केबल काढून टाकल्याने आणि खायला मेस प्रकार नामक भोग असल्याने कन्टीन्यू झाले Lol
त्यातल्या त्यात समाधान म्हणजे रंगोली कार्यक्रमाला anchor म्हणून श्वेता तिवारी.

सिनेमा आठवत नाही पण अविनाश खर्शीकर च एक गाणं आठवत आहे, ज्यात तों पायजमा घालून बागेत फ़िरत असतो. "येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील, तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील ". हे गाणं एकदा मी लहानपणी खूप मोठ्या आवाजात गात होते, तेवढ्यात आई ने ऐकलं ते आणि त्याहून मोठया आवाजात मला खूप ओरडली आई.:( मला इतका राग आलेला आईचा, वाटलं आई उगाचच ओरडते आपल्याला. पण तेव्हा मी इतकी लहान होते कि मला चुंबन चा अर्थ माहित नव्हता. आत्ता कळतंय, आईच बरोबर होती Happy

रंगोली सारखा अजून एक प्रकार असायचं ज्यात शंकर महादेवन आणि अजून एक female anchor होती त्यात नवीन गाणी दाख वयाचे.
१०पासून उलट मोजत एक न. पर्यंत, मला फार आवडायची ती anchor आणि तों प्रोग्राम

Pages