कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूजिता,त्या मुलीला आणि तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
मेंदूत काही केमिकल लोचा नाहीना हे न्युरॅालॅाजिस्ट कडून एकदा तपासून घ्या.>> ++1

तिच्या आईची काळजी योग्य आहे आपल्या मुलीचे आपल्या डोळ्या समोर वाईट झालेले कोणाला बघवेल.

ह्या मुलीचे मुलाने चांगलेच brainwash केलेले दिसते. की तिला मुलातील कोणते वाईट गुण दिसत नाही आहेत.

Its not love, its lust....from both sides..
When the girl will realise this.. it will be too late. I hope parents will be wise enough to lend support when she will need it the most...

वाचून वाईट वाटले. त्या मुलीचे आणि बाळाचे सगळे चांगले होऊ दे! जर ती मुलगी खूप हट्ट करत असेल तर तिच्या कलाने घेत बाळ झाल्यावर, तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मग ३ किंवा ५ वर्षांनी लग्न लावून देऊ असे काही ठरवून घेता येईल का? कदाचित मुलीला बाळ हातात आल्यावर परिस्थितीची नीट जाणीव होईल. शिवाय मुलगाही लग्नाचा विचार बदलू शकतो प्रत्यक्ष वेळ आल्यावर.
सध्या मुलीची आणि बाळाची तब्येत हा फोकस ठेवा. या सगळ्यात "लोक काय म्हणतील?" याचा विचार सुद्धा करू नका. तिने कोणताही गुन्हा केलेला नाहीये. Mistakes happen. Not owning up a mistake is a bigger mistake. तिला हा विश्वास द्या की तुम्ही तिच्या सोबत आहात. तिला त्या मुलाकडे पळून जाण्याची गरज नाही.
अर्थात हे सगळे बोलायला जितके सोपे आहे तितके वागायला नाही याची जाणीव आहे. त्यामुळे शुभेच्छा तुम्हाला आणि तिच्या पालकांना!

जिज्ञासाचा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे. मुल तर होणारच आहे दिसत असेल तर लग्न पुढे ढकला. >> तिला हा विश्वास द्या की तुम्ही तिच्या सोबत आहात. तिला त्या मुलाकडे पळून जाण्याची गरज नाही.>> +१

विषन्न वाटलं हे वाचून...यातून काहीतरी योग्य मार्ग निघो हीच इच्छा...

(तुम्ही दिलेल्या माहितीवरून) अशा पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या, कौटुंबिक स्थिती चांगली असणाऱ्या मुलीला चौथी पास, सामाजिक, आर्थिक, मानसिक परिस्थिती पुर्णतः अस्थिर असणाऱ्या मुलाविषयी एवढा रिस्की निर्णय घेण्याऐवढे आकर्षण कशामुळे निर्माण झाले? आणि आपल्या निर्णयावर ठाम राहावे असे का वाटते आहे?

तू चिरफाड करत वाचत आहेस. मी सजहगत्या ते पण लावलेत. >> नाही मी चिरफाड करत नाहीये तर किती सहजतेने आपण 'सावळी पण' असे म्हणत रंगावरुन टिपण्णी करतो त्याकडे लक्ष वेधण्याचा तो एक छोटासा प्रयत्न आहे.

मला या मुलीच्या पालकांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. मात्र मुलीला मी फसवली गेलेली, शोषीत म्हणू शकत नाही. सध्या मुलीच्या दृष्टीने बाळ होणार तेव्हा लाजेकाजेस्तव आपले लग्न लावून देतील, नातवंडाकडे बघून विरघळतील, मी आणि माझा प्रियकर यांच्या पैशावर चैन करत राहू असा सरधोपट हिशोब आहे. ही मुलगी लग्नाशिवाय होणारे मूल हे चलनी नाणे म्हणून वापरत असेल, आई वडीलांच्या भावना, आपली मुलगी कुमारीमाता होणे याच्याशी निगडित त्यांच्या अब्रू-प्रतिष्ठेच्या कल्पना वगैरे बाबी लक्षात घेवून प्लॅनिंग करुन वेठीला धरत असेल तर पालकांनीही हे वर्तन समजून घेवून ठाम राहून असे करता येणार नाही हे सांगायला हवे.
'हे मूल सर्वार्थाने तुझी जबाबदारी असेल. तू सज्ञान असल्याने आम्ही तुझे हे राजीखुषीचे संबंध/ लग्न करणे वगैरे थांबवू शकत नाही तसेच तुझे घाईघाईने लग्न लावून द्यायलाही बांधील नाही. तुम्ही तुमचे लग्न करु शकता. तू तुझे आयुष्य तुला हवे तसे जगू शकतेस मात्र त्यातून होणार्‍या परीणामांची जबाबदारीही तुझीच असेल. बाळ होईपर्यंत तुला आवश्यक तो आधार, आरोग्य सेवा वगैरे पुरवू मात्र त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहून बाळाची आई म्हणून तुला सर्व जबाबदारी घ्यावी लागेल. तुला हे सगळे झेपणार आहे का याचा शांतपणे विचार कर. यात तुझा प्रियकर तुला कितपत साथ द्यायला तयार आहे ते बघ. उद्या त्याची साथ नसेल काय करणार याचाही विचार कर. प्रियकराने हात झटकले तर आम्ही तात्पुरते सुरक्षित छप्पर, अन्न-वस्त्र-आरोग्य या गरजा पुरवू मात्र त्यात आमच्या जीवावर चैन हे नसेल, पॉकेटमनी मिळणार नाही , तुझ्या अपत्याच्या गरजा पुर्ण करण्यासाठी तुला एकटीला झटावे लागेल, आमच्याकडून तुला मानसिक आधार मिळेल, नोकरी शोधायला वगैरे मदत करु मात्र त्या पलिकडे आर्थिक बाबींसाठी गृहित धरता येणार नाही. ' असे शांतपणे सांगावे.
आपल्याला लग्नाशिवाय मूल होणार आहे म्हणून पालक तोंड लपवून जगणार नाहीयेत, आपले घाईघाईने लग्नही लावून देणार नाहीयेत, बाळ दत्तक दिले नाही तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल आणि सोबत पालकांचे एटीएम कार्ड, चैनीचे आयुष्य नसणार ही रिअ‍ॅलिटी समोर आल्याने मुलीच्या डोक्यात काही प्रकाश पडावा. बाळ झाल्यावर एकंदरीत वास्तवाचे भान येवूनही मुलगी दत्तक द्यायला तयार होईल.

उद्या हाच प्रियकर तुझ्या आईवडिलांकडून पैसे आण, राहण्याची , इतर सोयी सुविधांची व्यवस्था कर म्हणून मुलीला वेठीस धरू शकतो.
तो ज्याप्रकारे तिला आता मूल जन्माला घालण्याचा व ते वाढवण्याच्या निर्णयास भरीस पाडतो आहे, ते पाहता व तुम्ही त्याचे सध्याचे सांगितलेले वर्तन पाहता तिला पैशासाठी अयोग्य वर्तन करण्यास भाग पाडू शकतो. अशावेळेस कदाचित परतीचे मार्ग बंद होऊन तिच्या अडचणीत भर पडू शकते.
(अर्थात ह्या दोघांनीही आता आपली जबाबदारी ओळखून घेतलेले निर्णय सक्षमपणे निभावण्यासाठी प्रयत्न, कष्ट केले तर फारच उत्तम! परंतु तुम्ही मुलाचे जे वर्णन केले आहे त्यावरून ही शक्यता फारच कमी वाटते )

जिज्ञासाचा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे. मुल तर होणारच आहे दिसत असेल तर लग्न पुढे ढकला. >> तिला हा विश्वास द्या की तुम्ही तिच्या सोबत आहात. तिला त्या मुलाकडे पळून जाण्याची गरज नाही===++++
काही वर्षापुर्वी अमेरिकेत असताना आमच्या गावात एका भारतीय मुली बद्दल असाच प्रकार घडला होता. मुलगा ड्रग अ‍ॅडिक्ट होता. अमेरिकेत असल्याने त्याना घर बदलावे लागले नाही. मुलीच्या आई-वडलानी त्या मुलीला मुलाकाडे न जाण्याचा सल्ला दिला आणि तिने तो ऐकला. काही दिवस ती उदास होती पण नंतर सावरली.

स्वाती२ पुन्हा एकदा चांगला प्रतिसाद. आपल्या कडे जेव्हा जेव्हा मुला मुलीच्या (खास करुन मुलीच्या) रंगावरुन लिहतात, टोमणे मारतात त्याचे वाईट वाटते. कधी कधी त्यामुळे मुलाना आपल्यात काही कमी असल्याचे वाटत राहाते.

@ धागाकर्ता शुजिता,
तुमच्या केसमधील वीस वर्षांची मुलगी किती अल्लड वा भोळी आहे वा चाप्टर वा समजूतदार आहे? तिच्या घरचे पापभीरू आणि सरळमार्गी आहेत की पोहोचलेले वा स्वत:ची प्रतिष्ठा जपणारे आहेत? तो मुलगा खरेच मवाली म्हणायच्या लायकीचा आहे की निव्वळ मुलीचा प्रियकर म्हणून बदनाम आहे? वगैरे डिटेल्सबाबत काय खरे आणि काय खोटे हे तुम्हालाच ठाऊक आहे. ईथे सल्ला देणारा यातले काही कॉम्बिनेशन्स अज्यूम करून या प्रकरणाकडे बघणार आणि तो टोन त्यांच्या सल्यात, प्रतिसादात झळकणार. त्यामुळे ईथे तुम्हाला चांगले-वाईट, तुमच्या सोयीचे गैरसोयीचे सर्व प्रकारचे सल्ले मिळतील. तुम्हाला तुमच्या केसला काय लागू होईल तितके वेचायचे आहे. ईतरांनी दिलेले प्रतिसादही चांगल्या भावनेनेच दिले असणार, पण जर कोणी म्हणत असेल मुलगा मवालीच कश्यावरून तर त्यांना ते पटवून देत बसू नका. यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे सोल्युशन मिळणार नाही. उलट विषय भरकटेलच.

बाकी काही लोकं हा धागाच खोटा आहे समजून प्रतिसाद टाकतील ते वेगळेच. ते जमल्यास ईग्नोरच करा. भले त्या लोकांचाही हेतू उदात्त का असेना अश्या प्रतिसादांचा फायदा कोणालाच होत नाही.

असो,

@ धागा,
तुम्ही दिलेले डिटेल खरे मानता त्या आईबापांची परीस्थिती समजू शकतो. कोणी कितीही म्हटले की झोपडपट्टीतील आणि चौथी नापास तर मग मवालीच कसा झाला, चांगलाही असेल. पण कोणीही आईबाप आपल्या मुलीचे अरेंज मॅरेज ठरवताना चौथी नापास वा झोपडपट्टीतीलही चालेल असे निकष शिथिल करणार नाही. मग मुलीने प्रियकर म्हणून असा मुलगा दाखवला तर कुठल्याही आईबापाचे नाराज होणे स्वाभाविकच आहे. आणि त्यातही मुलीला लग्नाआधी दिवस गेलेल्या आहेत या केसमध्ये त्या झोपडपट्टीतील मुलाबद्दल चांगले मत होणे कठीणच. अश्यात नक्कीच त्या आईबाबांचे कोलमडून पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मी तरी एका मुलीचा बाप म्हणून त्यांच्या भावना समजू शकतो.

आता या परीस्थितीत मला वाटते मुलीपासून लपून छपून त्याला दत्तक देऊ नये. त्या मुलाला जन्म देऊन मग परीस्थितीचा अंदाज घ्यावा. मुलीमध्ये मातृत्वाचा झरा येऊन ती त्याला सांभाळायची जबाबदारी घेतेय का, मुलीचे आईबाबा नातवंडाला स्विकारताहेत का, ते सर्व तिच्या नवऱ्यालाही स्विकारताहेत का, किंवा मुलीला तो तुझ्या योग्य नाहीये हे पटवून देता येतेय का, मधल्या काळात तो मुलगा काही रंग दाखवून मुलीच्या नजरेतून ऊतरतोय का, वा मूल दत्तक द्यायचा निर्णय सर्वसंमतीने घेता येतोय का, वगैरे सारे पर्याय खुले ठेऊनच पुढे जावे. घाई करू नये.

कारण तुम्ही तडकाफडकी टोकाचे पाऊल उचलाल तर उद्या मुलगीही टोकाचे पाऊल ऊचलू शकते. ती कोलमडून जाईल, आत्महत्या करेल, त्या मुलासोबत पळून जाईल, एकटीच कुठेतरी निघून जाईल, आईवडीलांशी कायमचे नाते तोडेल.. काहीही होऊ शकते. जर तुम्ही तिच्या मनाविरुद्ध जात काही केले आणि तिला तुम्ही आपले शत्रू वाटू लागलात तर..
त्यामुळे तुम्ही तिच्या हिताचाच विचार करत आहात हा विश्वास अखेरपर्यंत गमावू नका.
आणि फायनली सर्वात महत्वाचे म्हणजे जर अखेरीस तिने त्या मुलासोबतच जायचा निर्णय घेतला तरी तिच्यासाठी परतीचे दरवाजे कायम खुले ठेवा.

माझ्या मैत्रिणीबरोबर असं होता होता राहिलं सुदैवाने.ती १८ वर्षाची असताना तिच्या घरात काम करणार्या फरशीवाल्या बरोबर पळून चालली होती.तिच्या आई-बाबा,आजी यांनी तेव्हा अक्षरश: मारून,कोंडून तिला थांबवलं.तिला एकंदरीतच पुरूषांचे आकर्षण वयात आल्यापासून होते.नंतर आई-वडिलांनी तिच्या मित्र-मैत्रिणींबद्गल मोकळा द्रष्टीकोन ठेवला. आणि २१ व्या वर्षी (त्यामानाने लवकर) लग्न लावून दिले. त्यानंतर मात्र ती एकदम निवळली आणि खूप छान संसार करतेय.

ते मूल जितके त्या मुलीचे आहे तितकेच तिच्या प्रियकराचे आहे.. बाळ जन्माला घालायचे की नाही, घातले तर दत्तक द्यायचे वा स्वतः सांभाळायचे याबद्धल त्याचेही मत विचारात घ्या...शेवटी बाप आहे तो... त्यालाही हक्क आहे...

आणि पोलीस केसमुळे त्याचा हक्क documented देखील झाला आहे.

मुलीला मुलगी झाली तर त्या नवजात मुलीकडे कुणी बघणार नाही, पण मुलगा झाला तर मात्र त्याला demand येईल, आई आणि बाप दोघेही आपला हक्क सांगायला धडपडतील

लग्न हाच एक उपाय आहे, नाही झाले व्यवस्थित तर पुन्हा घटस्फोट घ्या

मला स्वाती यांचे सर्व प्रतिसाद योग्य वाटले म्हणून जास्त काही लिहिणार नाही, DJ यांच्या आत्ता दिलेल्या प्रतिसादाशी तर पूर्ण सहमत. एकच गोष्ट खटकते, आपली मुलीची बाजू म्हणून शारीरिक शोषण म्हणणे योग्य नाही. २० वर्षाची मुलगी घरातले पैसे वेळप्रसंगी चोरून त्याला देते, अगदी वेश्येच्या झोपडीत जाऊन त्याच्या बरोबर राहते, ती मुलगी समुपदेशनासारख्या गोष्टींना किती बधेल ते पालकांनी ठरवावे. उद्या ही मुलगी तिच्या प्रियकाराबरोबर मिळून पालकांच्या विरुद्ध गेली नाही म्हणजे झालं.
माझ्या मते ज्या मुलीला गर्भवती होण्याची आणि गर्भावस्था लपवून ठेवण्याची समज आहे तिला तिचा निर्णय घेऊ द्यावा, जो निर्णय घेतला त्यात पालकांनी किती सहभाग घ्यायचा हे त्यांनी ठरवायचे. बाकी कोणी आपली मतं मांडली, कळवळा दाखवला किंवा टिका केली, त्याने मुख्य पात्रांना काही फरक पडणार नाही.

परिस्थिती गंभीर आहे. योग्य निर्णय घेण्यास आणि तो निभावून नेण्यासाठी शुभेच्छा.

अजून एक मुद्दा लिहून ठेवते. तुम्हाला कल्पना असेलच की प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी या काळात खूप मानसिक आंदोलने होतात. कोणाला नक्की काय होते ते सांगता येत नाही, कधी रडारड, कधी संताप तर कधी कोणाला फारसा त्रास होत नाही. पण हार्मोन्स जबरदस्त अस. या एक दोन वर्षांत तिने घेतलेले निर्णय हे विचारपूर्वक आणि भान ठेवून घेतले असतील असे नाही. बाळ तीन चार महिन्याचे झाल्यावर, डोक्यातला कोलाहल शांत झाल्यावर परिस्थितीचे भान अजून नीट येऊ शकते. ही एक शक्यता डोक्यात ठेवा.

वर स्वाती2 यांनी लिहिलेले पटते. मुलीने काही कॅलक्यूलेशन्स केली आहेत. कितीही त्रास होत असला तरी आता तिला वाचवावे लागणार असा स्टँड घेण्यात घेण्यात अर्थ दिसत नाही. तिला हवं ते करायची, हवं ते मिळवायची सवय असावी किंवा नकळत तशी पर्सनॅलिटी बनली असावी, त्यातून हे घडलेले दिसते.
(बाळ दत्तक देऊन टाकून) यातून सोडवायचे किंवा तिला मुलाकडे पाठवून संबंध तोडायचे असे कुठलेही टोकाचे निर्णय घेऊ नका.

सगळं काही सुरळीत होवो अशी प्रार्थना करेन.

सांगितलेले सगळेच खरे आहे असे गृहीत धरून:

इतरवेळी कचऱ्यात, गटारात, देवळा सामोर, अनाथालया समोर मूल सापडलं तर आपण किती चिडून उठतो, कोण ते तिचे आई बाप, किंवा आई यांना नावं ठेवू लागतो, कुणा बिचारीवर अत्याचार, बलात्कार झाल्याने असे पाऊल उचलावे लागले असेल का वगैरे तर्क कुतर्क करतो.

आणि आपली वेळ आली की आपण "नाहीतरी नाही का मुलं कचऱ्यात, गटारात सापडत! आपण एवढे क्रूर थोडीच आहोत, एक डॉक्टर म्हणालाय ना, एका NGO ते देऊन टाकू परस्पर, कुणाला काही कळणार नाही. वरुन मुलीच्या सहमतीचीही गरज नाही! केवढा देव माणूस! रुलायेगा क्या पगले!"

हेच इतर वेळी कुठुन बातमी आली की एक डॉक्टर असं काही करतो, बाळाची परस्पर विल्हेवाट लावतो एका NGO ला देतो तर आपण त्या डॉक्टरला अटक करायला पाहिजे, असली कसली NGO आहे ही कसलेही कागदपत्रे न करता मूल घेते? बंदी आणली पाहिजे त्यांच्यावर म्हणुन आपला सात्विक संताप व्यक्त करतो.

पण आता पोलीस, नातेवाईक सगळेच हेच सांगत आहेत असे आपण ठोकून देतो.

असे करून आपण समाजाला काय शिकवण देतो आहोत? असा काही विचार आपण करत नाही. पण मुलीचे त्या मुलाशी लग्न लावून दिले तर "अशी हार" पत्करून आपण समाजाला काय शिकवण देऊ अशी अचानक समाजाबद्दल चाड उत्पन्न होते.

गंमतच असते, जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा.

मुलीच्या सहमतीची म्हणजे कसल्याही कागदपत्रांची गरज नाही, मी करतो व्यवस्था एका NGO कडुन असे सांगणाऱ्या डॉक्टरवर खरंच विश्वास बसतो? आणि अशा NGO वर?

काय करतील बाळाचं? अवयव विकतील, ह्युमन ट्राफिक रॅकेट वगैरे असेल. की त्याच्याशी आपल्याला काही देणे घेणे नाही?

असा परस्पर विल्हेवाट लावायचा विचार सोडून द्या.
बाळ नीट जन्माला येऊ द्या, घरी घेऊन या. वर कुणी आधीच लिहिल्या प्रमाणे दोघांची लग्नाची तयारी असेल तर लावुन द्या लग्न, पुढे घटस्फोट घेता येईल मुलीला हा मुलगा आपल्या लायक नाही हे कळले तर. स्त्रीला घटस्फोट मिळवणं सोपं आहे भारतात. पुढे घटस्फोटीत म्हणुन तिला दुसरे लग्न करता येईल. मूल दत्तक द्यायचे असल्यास कायदेशीररित्या देता येईल, योग्य ठिकाणी जात आहे याची खात्री राहील.

या उलट बाळाची परस्पर विल्हेवाट लावली तर ते केवळ क्रूर आणि चुकीचे नव्हे तर या पेक्षा क्लेशदायक असणार आहे.
बाळाची अशी वाट लावलीय, काय झाले त्याचे याची खंत, आपल्या बाळाची अशी वाट लावली याचा मुलीचा आयुष्यभराचा तिरस्कार/राग, मग हे सगळे लपवून ठेवून दुसरीकडे तिचे लग्न करणे, ते मग नंतर कुठूनतरी नवऱ्याला, सासरच्यांना कळले की होणारा हाहाकार, वगैरे.

मुलीचा ह्याच मुलासोबत राहण्याचा व हे मूल जन्माला घालून वाढवण्याचा निर्णय हा भावनिक गुंतवणूकीचा भाग आहे, असमांजस्य आणि दाहक वास्तव जाण नसल्यामुळे आहे की तिला अजून कशाची तरी फार भीती वाटते आहे आणि "ते अजून काहीतरी" fate worse than death" असल्यामुळे त्यापेक्षा लग्न करून परिस्थितीवर ताबा मिळवता येईल असे तिला वाटते आहे याची खात्री करा. ( तुम्ही हे केलेही असेल. समुपदेशक तिच्या या निर्णयामागची कारणमीमांसा नीट सांगू शकतील.)

तुम्ही त्या प्रियकराच्या सोशल मीडिया अकाऊंट व फोन वरील आक्षेपार्ह content विषयी नमूद केले आहे. त्यामुळे ह्या मुलीचे असे काही फोटो , विडिओ viral करण्याच्या धमक्या देऊन तिला ह्या निर्णयासाठी भाग पाडले जात नाही आहे ना याची तिला विश्वासात घेऊन खात्री करा.

यातून काहीतरी दिशा त्या मुलीला मिळो असे मनापासून वाटते. तिच्या आईवडिलांची खरच कठीण परिस्थिती आहे . त्यांना यातून सावरण्याचे बळ मिळो.

मुलं जन्मत मृत असेल किंवा तसा डिक्लेयर केला आणि
झोपडपट्टी मुलाचा अपघात झाला तर सगळे प्रॉब्लेम सोल्व्ह होतील.

इथे सगळ्यांनीच आपली मतं मंडळी आहेत. तुम्हाला योग्य ती
मदत लवकर मिळो आणि सगळं शक्य तितकं सुरळीत पार पडो हि प्रार्थना.
भारताबद्दल फार काही माहिती नाही पण सिंगापुर मध्ये सेफ प्लेस नावाची संस्था आहे. https://honeykidsasia.com/teenage-pregnancy-in-singapore-support/ हि लिंक पण एकदा बघून घ्या. अश्या काही संस्था भारतात असल्या तर त्यांची समुपदेशनासाठी मदत घेता येते का ते बघा. जनरली ह्या विषयातील तज्ञ समुपदेशक असतील तर जास्त फायदा होईल. आणि जमलंच तर ओळखीचा समुपदेशक नको. न्युट्रल समुपदेशक हा अश्या केस मध्ये जास्त चांगले काम करू शकेल. मुलीला समुपदेशनाची नक्कीच गरज आहे.
बाळ झाल्यावर काही दिवसांनी दत्तक देण्याचा विचार करणे जास्त सोयीचे असेल. कदाचित नवीन पालक स्वतःहून हि जबाबदारी टाळतील.
स्वाती2, अमितव आणि जिज्ञासा ह्याचे प्रतिसाद पटले. ह्या परिस्थितीत आई वडिलांनी ठाम राहण्याची खुप गरज आहे.

जिज्ञासा यांचं म्हणणं नाही पटलं की आम्ही तुझ्याबरोबर आहोत असा दिलासा मुलीला द्या. किंवा लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नका.

उलट आमचे जगण्याचे काही नियम आहेत आणि ते नियम न पटणार्या माणसांना आमचा मनस्ताप होऊ नये म्हणून आम्ही दूर ठेवतो. तू स्वतंत्र व्यक्ती असल्याने तुझ्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकतेस. परंतु आमच्याकडून आर्थिक किंवा इतर मदतीची अपेक्षा ठेवू नकोस असे सांगणे व त्यावर दोन्ही पालकांनी ठाम राहणे गरजेचे असेल.

अर्थात हे करणं फार कठीण आहे. कदाचित मुलीकडे मुद्दामहून थोडं दुर्लक्ष करणं किंवा तसं दर्शवणं आणि तिला हळूहळू परिस्थितीची जाणिव होईल असं वागणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने स्वाती२ यांचे प्रतिसाद पटतात.

माणूस सामाजिक प्राणी आहे व त्याला इतरांकडून व्हॅलिडीटी हवी असते. तिचं प्रमाण व कुठल्या सर्कलमधून ती हवीय हे प्रत्येकावर अवलंबून असतं. आईवडीलही माणूस आहेत आणि आपल्या जवळच्या माणसाच्या कृत्याचा संताप, घृणा, शरम इ. त्यांना वाटू शकतं. त्यादृष्टीने आई-वडीलांचं मानसिक स्वास्थ्य ठीक रहावं म्हणून त्यांचं वेगळं कौन्सिलींग होणं गरजेचं आहे.

मुलाला अनडॉक्युमेंटेड दत्तक मात्र देऊ नका. तो निष्पाप जीव शक्य तितक्या चांगल्या परिस्थितीत राहिल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. सरकारमान्य संस्थेतून दत्तक गेल्यास मुलासाठी आसुसलेल्या घरात जाण्याची शक्यता वाढते. अर्थात मुलीची सहमती आवश्यक आहे.

या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी शुभेच्छा.

स्वाती, माझे मन ,अमित्व चे प्रतिसाद बहुतांश पटले.

मुलीला लग्न करायची घाई न करता परत त्या मुलाकडे पाठवावी. आई वडिलांनी "जान का खतरा "संभवत नाहीये ना इतपत बाहेरून लक्ष ठेवावे. पुढचे 2 महिने, बाळंतपण मुलगी आणि तो मुलगा यांना निभावू दे. जितके दिवस निभावत राहतील ते चांगलेच आहे. Either मुलगा सुधारेल किंवा मुलगी आणि त्यातुन बाहेर पडेल.
जर शारीरिक/लैगिक शोषण होतंय/होईल असा संशय आला तर मध्ये पडावे, तो पर्यंत बहुदा मुलीला अक्कल आली असेल

लग्न या साठी लावून देऊ नये की त्यामुळे मुलाकडे थोडी बहुत बार्गेनिंग पॉवर येते. लग्न झालेले नसेल तर मुलगी कधीही यातून बाहेर पडू शकेल.

उलट लग्न केले असेल तर घटस्फोट होईल आणि प्रकरण कायद्याने निकाली लागेल

अन्यथा, तो कोण , मुलाचा बाप कोण , हे प्रश्न तसेच रहातील

भविष्यात प्रॉब्लेम येतील

कालपासून हाच विचार येतोय की ही मुलगी वेश्येच्या घरी राहिली आहे.ही मुलगी पण त्यातलीच म्हणून येणार्‍या गिर्‍हाईकांनी पाहिली असेलच.देव न करो ती त्यातून गेली असेल. जी मुलगी अशा घरात रहाते,आईवडलांना विश्वासात घेण्याऐवजी परत नवर्‍याकडे जायचे म्हणते तिला कोणीही समजावू शकत नाही.
तिच्या नवर्‍याच्या मोबाईलमधे आक्षेपार्ह फोटोंत ह्या मुलीचा फोटो नसावा की ज्याच्या आधारे पुढल्या आयुष्यात तिचे धिंडवडे निघतील.
मूल मात्र अशा बेजबाबदार पालकांपेक्षा अनाथाश्रमात राहिलेले बरे.

देवकी +१
इथल्या मंडळींच्या असल्या छपरी भावी पालकांकडून अवास्तव अपेक्षा आहेत. परमेश्वर त्या बाळाचे रक्षण करो.

माझी मैत्रिण आणि मी दोघींनी इथली मते वाचली आणि त्यावर विचारही केला. तुमच्या मतांचा नक्कीचं लाभ होतो आहे. पण ,एक नक्की की माझ्या लिखाणाच्या मर्यादेतून परिस्थिती किती गंभीर आहे हे मला इथे पोहचवता नाही आले. कारण, काही वाचकांनी फारचं आदर्श मते मांडली. जसे की - मुलालाही घरी ठेवा. त्याच्या होणार्‍या मुलालाही सांभाळा. मुलीला तिच्या कलाकलाने घेऊ द्या. मुलगा आणि मुलगी सज्ञान आहे. दोघे २० पुर्ण आहे. ही मते आम्हाला खटकली.

मी एक सांगायची विसरले. मुलीकडे दोन सोनोग्राफी रिपोर्ट होते तिचे. त्यावर मुलाने मुलीच्या शेजारी जो मुलगा राहतो त्याचे नाव आडनाव बाप म्हणून दिले. ह्यावरुन तो किती सतर्क पाऊले उचलत होता हे लक्षात येते. ह्याशिवाय पोलिसांनी जेंव्हा त्याला परत एकदा बोलावले त्यावेळी त्याने मुलीचे ऑडीयो मेसेज ऐकवले की मुलगी त्याच्या किती मागे आहे आणि तो किती सालस आहे. मुलीला जेंव्हा विचारले बाळंतपण कोण करणार होत तुझ आणि कुठे? तर ती म्हणाली ती वैश्या करणार होती घरीचं. तिला येत. पोलिसांनी मुलाचा फोन जप्त केला कारण त्यात त्यांना अनेक मुलींचे नग्न फोटो आणि खूप काही सापडले. आम्हाला त्यानी स्वतःहून त्रिवार सांगितले की मुलगा तळागाळातील आहे आणि वासनेनी पछाडलेला आहे. मुलीचे वाटोळे करु नका. निदान लग्न करु नका असा सल्ला त्यानी दिला. मुल होऊ द्या आणि जमल्यास दत्तक द्या हा सल्ला पोलिसांनीचं दिला कारण तो कायद्यात बसतो. सोफोज कि सोफोस नावाची नामांकित एन जी ओ आहे. सोमवारी मी जाऊन येते आहे सोफोसला भेटून येते. माहिती काढते आणि चाड घेते.

परवा मुलीचे फायनल यिअर चे प्रवेश घेऊन झाले. सध्या सर्व कारभार ऑनलाईन सुरु आहे ते एक बरे आहे. घरुन मुलगी वर्ग करते. पण लक्ष अजिबात नसते तिचे. तिला फक्त तो मुलगा दिसतो. ती लग्न करुन दिले तर त्याला वळण लावीन. त्याला माणसात आणेल. स्वतः नोकरी करुन त्याचे घर चालवीन. बाळाची काळजी घेईन असे सर्व म्हणते. मान्य आहे असे ती म्हणते पण असे म्हणणे आणि त्यातून जाणे.. ते करुन दाखवणे हे खूप निराळे असते. मुलाकडे सर्व ओंगळ कारभार आहे. संस्कार, शिक्षण, विचार कशाशी खातात हे त्याला माहिती नाही. मुलाची आई मुलीला ह्या रांडीचे मुले माझे नातवंड कसे असतील असे म्हणते. तिच्या नातेवाईकाना ती काय उत्तर देईन असे प्रश्न तिला पडले. पण इथे मुलगी आणि तिचे आईवडील कशातून जात आहेत ह्याचे काहीचं वाटत नाही. मुलाची भाषा अरे तुरे आणि शिव्यांनी भरलेली.

अशा घरात अशा मुलाशी लग्न करायला, त्याच्या घरी जाऊ द्यायला सांगा कोण आईवडील पुढे जातील. मुलगा थोडा तरी बरा असता तर हे प्रकरण मिटले असते. पण मुलगा होपलेस आहे. मुलीचे वय इतके लहान आहे आणि तिचे प्रेम इतके कमालिचे आंधळे आहे की ती त्याची बाजू पडू देत नाही. तिचा कैफ त्याच्याकडे जाऊन उतरणार आहे. पण, त्याच्याकडे पाठवून त्याला शरिरसुख उपभोगू देणे हे आईवडीलाना जमेल का? कितीही मनाचा हिय्या केला तरी मन नाही तयार होत मुलीच्या कलाकलाने वागायला.

आम्ही समुपदेशकांचे कितीतरी सेशन घेतले. मुलीचे वय आणि तिचे आंधळे प्रेम ह्यातून तिला बाहेर काढणे हे वेळेवर अवलंबून आहे. अजून दहा वर्षानी तिला तिचे कळेल. आत्ता तरी एका वेगळ्या विश्वास ती वावरत आहे. आईला वडीलांना तिने वाकवले झुकवले आहे. ती खूप खूप आनंदी आहे की तिने मुल ठेवून आईवडीलाना प्रश्नात पाडले. ती स्वत: हे मान्य करते की तिचे हे सर्व प्लान यशस्वी होतं आहे. वर कुणीतरी म्हंटले ही मुले हे तिच्यासाठी एक चलनी नाणे आहे. त्याचा वापर ती करते आहे. मुलीच्या वडीलांनी आत्तापर्यंत तीन लाख खर्च केले. मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी राखून ठेवलेले पैसे असे खर्च करताना त्यांना खूप वाईट वाटत आहे.

असो परत एकदा धन्यवाद.

मुलगी पार पोचलेली दिसतेय... तिच्या पालकांना शुभेच्छा!!!
बाकी मुलाच्या फोनमध्ये पॉर्न सापडले म्हणून तो वाया गेलेला आहे वगैरे ऐकून धन्य वाटले...
मुलीला आणि मुलाला एकत्र बसवा, लग्न लावून देतो म्हणावं पण काहीही आर्थिक मदत करणार नाही असे सांगा.. हवे तर कायदेशीर रित्या स्टॅम्प पेपर वर लिहून द्या... बघा काय करतात दोघे ते...
आणि वीस वर्षाच्या मुलीला तुम्ही तसेही थांबवु शकणार नाही...
आज ना उद्या ती त्याच्याकडे जाईलच...

शूजिता,
अजून विचार करू जाता... लवकरात लवकर बाळाला योग्य ठिकाणी दत्तक देणे हा तुमचा विचार योग्य आहे असे वाटते. भलेही तुम्ही दत्तक विचारामागे तान्ह्या बाळांबरोबर होत असलेल्या ईतर दुर्दैवी घटनांचा ऊहापोह करून त्या लिहिण्याची चूक केली असली तरी, तुमची आणि तुमच्या मैत्रिणीची त्या मागची भावना सहृदयी आहे असे गृहीत धरते.
मुलगी तिच्या प्रेमापुढे आई वडील ह्या जिव्हाळ्याच्या नातेसंबंधाचा अनादर करत आली आहे आणि एकंदर गरोदरपणातही तिचे बेजबाबदार वर्तन चालू असेल तर जन्मानंतर भलेही ती तिच्या आईवडिलांच्याच घरी राहिली तरी बाळाची आईकडून आबाळ होण्याचीच शक्यता अधिक आहे.
'आई झाल्यावर परिस्थिती/वागणे सुधारेल' ह्या आशेवर बाळाचे आणि तुमचे आयुष्य टांगणीला लावायचे की सद्य परिस्थितीवरून धडा घेऊन लगोलग दत्तक देण्याची निर्णायक कृती करायची हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. मुलगी बाळाप्रती बेजबाबदार राहिली आणि बाळ तुमच्या मैत्रिणीच्या घरी राहिले तर बाळाचे जबरदस्तीचे मात्रुत्व तुमच्या मैत्रिणीला आयुष्यभर निभावून न्यावे लागेल. ह्याची मानसिक तयारी आहे का ह्याचेही ऊत्तर तुम्हाला शोधावे लागणार आहे. मुलगी बाळाला मुलाच्या घरी घेऊन गेली तरी त्याठिकाणी बाळाची आबाळ होण्याची शक्यता आहे हे बघवणार आहे का ह्याचाही विचार करा.

मुलगी आई वडिलांच्या घरी राहिली तर, मुलीचे मात्रुत्व जबरदस्तीने मुलीच्या आईवर लादणे त्या आईप्रती अन्यायकारक ठरू शकते ह्यात मुलीच्या आईवर अनवॉरंटेड मानसिक ताण येऊ शकतो. एक लक्शात घ्या मुलीचे वागणे, तिचे मात्रुत्व आणि बाळाची नैतिक जबाबदारी ही मुलीच्या आई वडिलांची नाही, प्रेमापोटी ते कितीही स्वतःला जबाबदार समजत असले तरी.
ह्या घडीला मुलीच्या नॉर्मल आयुष्यासाठी झगडण्यापेक्षा बाळाचे वेल-बीईंग हा फोकस असावा असे वाटते आणि त्यासाठी दत्तक योजना हा चांगला पर्याय आहे पण मुलीच्या संमतीनेच.
मुलगी जर बाळाचा बार्गेनिंग चीप म्हणून वापर करत असेल तर लवकरात लवकर तिला ह्यातली फॅलसी पटवून दिली पाहिजे. त्यासाठी तिच्या नावे अकाअंट ऊघडून तिच्या भविष्याची तजवीज करून तिचे स्वातंत्र्य तिच्या हातात ठेवणे, ती कायद्याने सज्ञान आहे आणि लग्नाचा वगैरे निर्णय ती स्वतः घेऊ शकते हे सांगणे, आणि तिच्या निर्णयांना विरोध करण्याचा तुमचा कोणताही मानस नाही हे तिला पटवणे हे सगळे करणे आले. बाळाला ह्या सगळ्यातून सोडवणे हा तुमचा मुख्य ऊद्देश असावा असे वाटते.
मुलीला तिचे स्वातंत्र्य हवे आहे, जे मी तुम्हाला आधी म्हणाले होते तसे तिला स्पष्ट विचारा 'तुला काय हवे आहे' तर ह्या घडीला तुम्हाला ते तिला देणे भाग आहे असे दिसते. तुम्ही कौटुंबिक वकीलाचा सुद्धा सल्ला घ्यावा असे वाटते.

तुम्ही म्हणजे मैत्रिणीच्या परिवाराने कुठलाही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने स्वतः कन्विन्स असाल तर तो निर्णय ईतरांकडून सर्टीफाय करून घेण्याच्या फंदात पडू नका.

बाकी मुलाच्या फोनमध्ये पॉर्न सापडले म्हणून तो वाया गेलेला आहे वगैरे ऐकून धन्य वाटले...>> पॉर्न वेगळे. इथे त्यांनी ज्या ज्या मुलींसोबत मेक आउट केले त्या मुलींचे चित्रण त्याने केले. पॉर्न हे ठिक आहे त्याबद्दल आक्षेप नाही. पण तो ज्या मुलीसोबत मेक आउट करतो त्यांचे चित्रण करण्यामागे त्याचा उद्देश मुलीला फसवण्याचा आहे.

Pages