कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सल्ला हवाय म्हणुन धागा काढलेला आहे, आणि मी मला योग्य वाटताहेत त्या लिंक्स देत आहे.
तुमचा ज्योतिषावर/स्तोत्रांवर विश्वास नसला तरीही ज्यांचा आहे त्यांना त्या लिंक्स फायद्याच्या ठरतील ना?

नको. आणि तुम्ही का देताय ते तुमच्या अगोदरच्या प्रतिसादातून दिसलंच. तुम्हाला खरोखर सुचत नसेल मदत करायला, तर जाऊ द्या सोडून द्या धागा.

हा धागा खरा की खोटा जे काही असेल पण डोक्यात रुतून बसलाय हे नक्की. खूपच अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे त्यामूळे सतत इथे येऊन अपडेट बघितले जात आहेत.
लोकांची गम्मत करायला हा धागा बनवला असेल तर खरंतर बरं वाटेल मनाला.. कारण अशा परिस्थितीत कोणीही सापडू नये अशी मनापासून इच्छा.
काल टिव्ही वर "टाइमपास" चित्रपटातले गाणे लागले होते तेव्हा हाच धागा परत एकदा आठवला. असले मूर्ख चित्रपट बघून स्वतः च्या आयुष्याचं वाटोळं करणारे बरेच असतील असं आलं मनात.
असो. आता इथे येणं थांबवलं पाहिजे.

हा धागा खरा की खोटा जे काही असेल पण डोक्यात रुतून बसलाय हे नक्की>>>>अगदी अगदी,
एका मुलीचे पालक या नात्याने कदाचित भविष्यात अशा कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यावे लागू शकते असा जमिनीवर आणणारा शॉक बसलाय हा धागा आणि प्रतिसाद वाचून,
वेळ येऊ नये यासाठी सतर्कता आणि आलीच तर नक्की काय मार्ग काढता येईल याचं प्लॅनिंग पण येऊ घातलंय डोक्यात.
सगळ्यात महत्त्वाचे--मूल परस्पर दत्तक देणे बेकायदेशीर आहे, नवजात मुलाच्या बाबतीत जे काही करायचे असेल(या किंवा इतर कोणत्याही केस मध्ये) ते सर्व पूर्णपणे कायदेशीर रित्या च करावे अन्यथा अटक सुद्धा होऊ शकते आणि ते मूल चाईल्ड ट्रॅफिक किंवा इतर चुकीच्या ठिकाणी जाण्याचा सुद्धा धोका आहेच

हा धागा खरा की खोटा हे माहिती नाही (आणि ते माहित करण्याची मला गरजही वाटत नाही). पण एक जवळचा मित्र यातून प्रत्यक्षात गेलेला मला माहिती आहे. त्या वेळेस एका डॉक्टरांशी चर्चा झाली होती आणि हा प्रश्न त्या वेळेस (१५ वर्षांपूर्वी) त्यांनी आपल्या समाजात. अनेकदा पाहिला होता. हे असे होणे नवीन नाही. आज ती मुलगी एकटी पालक म्हणून मुलाला वाढवत आहे. तिने तिचे शिक्षण पूर्ण केले, नोकरी मिळवली आणि तिच्या आईवडीलांनी तिला आणि तिच्या मुलाला स्वीकारले आहे. इथे ऑनलाईन वेबसाईटवर मुलीचे पालक/ मुलगी यांना जज करणे आणि टिंगल करणे खूप सोपे आहे पण हा आपल्या समाजातला खरा प्रश्न आहे.

मला पण धागा खरा का खोटा कळत नाही.
पण 13 वर्षे जुना id उगीच खोटे का लिहिलं. आणी अशी अशक्य वाटणारी गोष्ट हजारा मध्ये एकच्या घरात घडू शकते.
लग्नाआधी मुलीला बाळ होणे किंवा ती गरोदर राहणे हे काही नविन नाही आहे. अशा परिस्थीत काही मुली abortion करतात, काही आत्महत्या करतात, काही बाळ झल्यावर अनाथ आश्रमला देतात, क्वचित मुलगा मुलगी लग्न करतात., खुपच खंबीर असलेल्या मुली सिंगल मदर बनतात.
पण या प्रकरणामध्ये मुलगा वाया गेलेला आहे आणी ते मुलीला माहिती असुन तिला त्याच्या कडे जायचे आहे. आणी त्यामूळे तिने स्वतला गरोदर राहू दिले हे मुद्दे वेगळे आणी गंभीर आहेत.

पण 13 वर्षे जुना id उगीच खोटे का लिहिलं. > या धाग्यात खरेतर बरेच अंगावर येणारे डिटेल्स असल्याने बहुतेकांना शंका वाटते आहे . तेरा वर्षानंतर कोणी गम्मत करायला असा धागा का काढेल हा विचार करून माझाही ही गुंतागुंतीच्या समस्या खरी असावी असा कयास आहे. बाकी खखोदेजा

ड्यू आयडी किंवा जन्मवेळ काही तासांची असणारा आय डी धागा काढतो तर ते पूर्णपणे खरे मानून इकडे खुप चांगले सल्ले दिले जातात आणि धागा शंभरीसुद्धा गाठतो मग ह्याच धाग्यात अश्या नाजुक प्रश्न / समस्ये बाबत घटना खरी का काल्पनिक ही चिकित्सा केली जाते ते पाहुन वाईट वाटले

प्रतिसाद वाचले.
धन्यवाद अजयजी तुमचा प्रतिसाद मोलाचा वाटला.

काल संध्याकाळी मी गायनॅक ह्यांना भेटले. त्या म्हणाल्यात कुमारी मुली गर्भपात करायला वेळीचं येतात आणि हे काहीही नविन नाही. काही मुली खोटं मंगळसुत्र घालून येतात. काही नवर्‍याने टाकली म्हणून येतात. काही कबुलही करतात की हे असं असं आहे. शिवाय लग्न झालेल्या माताही येतात गर्भपात करायला. गर्भही एक जीवचं असतो. त्याला आपण कायदेशीररित्या संपवतो ते आपण लगेचं विसरतोही. पण जन्माला आलेल्या मुलाकडे बघून आपण ह्ळवे होतो. तुमच्या केसेसमधे मुलीचे समोर आयुष्य आहे. तिच्या आईवडीलांची स्वप्ने आहे. आपल्या समाजात मुले नशीबवाण असतात. करुन सवरुन नामानिराळे होऊन जातात. आता त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना काहीही झळ बसली नाही. ते आहेत तिथेचं आहेत. मुलगा ही मुलगी गेली तर नवीन शोधेल. मुलीने आणि तिच्या आईवडीलांने येणार्‍या बाळाविषयी खूप कळकळीची भावना ठेवू नये. तुम्ही त्या मुलाची हत्या करत नाही अहात आणि सोफोश ही एक नामांकित संस्था आहे. एकदा त्यांच्याकडे जाऊन या त्यांचे कार्य थोर आहे. कारण ते अशा घटनेत जन्माला आलेल्या बाळाला एक नवीन आयुष्य देतात आणि सोबत मुलगी आणि तिच्या आईवडीलांना पुढील आयुष्य जगू देतात. हे मुल ठेवणे असा सल्ला कुणीही देईल पण आयुष्यभर तुम्हाला एकटे पालकत्व असं नात निभवाव लागेल. शिवाय समाज अशा मुलांना ती मोठी झाली की तुझे आईबाबा कोण असा जाब विचारतात ना?! तेंव्हा त्याला किती त्रास होईल. अगदी शाळेत असल्या पासून आपण आईबाबा ह्यांचे बोट धरुन चालतो. आई नसली किंवा बाबा नसले की मुल इतर मुलांप्रमाणे वागत, बोलत, मिसळत नाही समाजात. मुल दत्तक देण्याचा निर्णय कठोर जरी असला तरी तो तुम्हा सर्वांसाठी योग्य निर्णय आहे. मुलगी काही दिवस/महिने ह्यातून जाईल पण येईल भानावर. ज्या आयांची मुले दगावतात प्रसूतीमधे त्या आयाही काही काळ दु:खी असतात. फक्त वीस वर्षाची मुलगी जिचे अजून शिक्षण पुर्ण झाले नाही ती सक्षम नाही एकटी आई व्ह्यायला. मुलीचे आईवडील पन्नाशीच्या पुढे पोचले आहेत. त्यांना त्यांचं पुढचं आयुष्य सुखाने जगता येईल का? अगदी एक दोन महिन्याच्या काळात घर दार शहर सोडून तुम्ही इथे आलात. अजून काय काय त्याग कराल? तेंव्हा मुल कायदेशीररित्या सोफोशद्वारे आपण दत्तक देऊया. इथे बेकायदेशीररित्या मुल देण्याचा प्रश्न येतचं नाही.

इथे अनेकांना ही घटना काल्पनिक वाटली. पण मी इथे प्रामाणिकपणे लिहिते मी कुणि लेखिका नाही. मी कुणि नाटककार नाही. मी कुणि फिल्ममेकर नाही. मालिकाही करत नाही. मी एक सामान्य व्यक्ती आहे. वर जसे कुणीतरी लिहिले अशा घटना हजारोंमधे एक घडतात. पण आपल्या आजूबाजूला आपण त्या पाहिल्या अनुभवल्या नसल्या म्हणजे त्या आपल्याला काल्पनिक वाटतात. मग आपण त्यांचा संबंध क्राईम पॅ. आणि सावधान ईन्डिया सारख्या मालिकांशी लावतो. पण वास्तविक आयुष्य हे ह्याहीपेक्षा भयानक असते. आयुष्यात सुखांपेक्षा दु:खचं जास्त भरलेली असतात. ज्यांना इतरांचे दु:ख दिसते त्यांना ते न सांगता सवरता ओळखता आणि जाणता येते. काहींना सांगूनही पटत नाही. खरे वाटत नाही.

मी जे इथे लिहिले त्या मागे मला माझा उद्देश माझ्या मैत्रिणीला मदत करायची आहे. आमचे निर्णय जोखायचे आहे. इथे येऊन थोडे ब्रेन-स्टॉर्मिंग झाले. अनेकांची मते कळली. नवीन काय करता येईल हे कळले. असे केले तर काय होईल किंव तसे केले तर काय होईल ह्यावरची चर्चा झाली. काहींचा ह्यावर विश्वास नाही बसला. कारण, प्रत्येकाच्या अनुभवाच्या मर्यादा असतात. प्रत्येकाची जगण्याची एक शैली असते. एक चाकोरी असते. त्यानुसार आपण अनुभव घेत असतो. मी वर्चुअल लाईफ पेक्षा माझ्या आजूबाजूचे जग जगते. ते पाहते. माझी तिथे कुठे काही मदत होत असेल तर अवश्य मदत करते. मदत नाही करता आली तर मला त्याचे वैषम्य वाटते. पण मी निदान प्रयत्न करते. आणि खरे तर सर्वांनी एकमेकांना मदत करायला हवी. मानव जातिचे दु:ख ओळखायला हवे. आपण कमावलेले आपण वर नेणार नाही. पण कुणाच्या तरी दुवा आपण सोबत नेत असतो. संकटात आणि दु:खात सापडलेल्या माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या कुटुंबियाना ह्या धाग्याची मदत झाली तर नक्कीचं त्यात तुमच्या चांगुलपणाचा वाटा असेल. धन्यवाद.

इथे अनेकांना ही घटना काल्पनिक वाटली. पण मी इथे प्रामाणिकपणे लिहिते मी कुणि लेखिका नाही. मी कुणि नाटककार नाही. मी कुणि फिल्ममेकर नाही. मालिकाही करत नाही.. >>+++१११११

शूजिता, तुमचा/ मुलीच्या आईवडिलांचा निर्णय योग्यच आहे. तो यशस्वीपणे निभावण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. विशेषतः होणाऱ्या बाळासाठी, ज्याची बिचाऱ्याची यात काहीच चूक नाही. Sad त्या बाळाला चांगलं घर, स्थैर्य, प्रेम करणारे आईवडील मिळोत.

शूजिता, तुमचा/ मुलीच्या आईवडिलांचा निर्णय योग्यच आहे. तो यशस्वीपणे निभावण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. विशेषतः होणाऱ्या बाळासाठी, ज्याची बिचाऱ्याची यात काहीच चूक नाही. Sad त्या बाळाला चांगलं घर, स्थैर्य, प्रेम करणारे आईवडील मिळोत.

वावे, धन्यवाद गं. बाळासाठी माझ्याही शुभेच्छा.

(((पण मी इथे प्रामाणिकपणे लिहिते)))....+ 1

शुजिता, तुम्ही इथे केवळ तुमच्या मैत्रिणालाच मदत करत आहात असे नाही तर आमच्या सारख्या वाचकांनाही अशा घटनांतील गुंतागुंतीच्या गांभीर्याची आणि सतर्क भूमिकेची जाणीव करून देत आहात. तुमच्या प्रयत्नांना यश येवो.

तुम्ही सोफोश किंवा अशा अन्य NGO शी दत्तक कार्यवाही संदर्भात संपर्क करणारच आहात तर ह्या दत्तक प्रक्रिये नंतर मुलीच्या भावी शाश्वत, स्थिर जीवनासाठी व relapse स्टेज उद्भवू नये म्हणून काय treatment / therapies आहेत याचीही माहिती करून घ्या. कारण कुमारी गर्भवती आणि कुमारी माता (जिचे मूल सोबत नाही) यांच्या मानसिकतेत व वर्तनात फरक आढळू शकतो.

त्याचप्रमाणे तिच्या पालकांसाठीही काही समुपदेशन अथवा मदतगट कार्यरत असतील तर त्याचीही माहिती ह्या NGO कडून करून घेता येईल. पालकांसाठी ही परिस्थिती "भय इथले संपत नाही" अशा प्रकारची आहे. तिला जास्त दिवस घरात फोन , सोशल मीडिया, मित्र मैत्रिणी आणि विशेष करून तिचा प्रियकर यांच्याशी संपर्क तोडून ठेवणे कठीण आहे. तिचे आईवडील त्यांचे मूळ घर, आप्तस्वकीय, मित्रपरिवार थोडक्यात त्यांचा comfort झोन सोडून दूरवर आले आहेत. त्यात ही मुलगी पुन्हा ह्या गुंत्यात आपला पाय अडकवून घेईल ही भीतीची टांगती तलवार आहेच. त्यामुळे पालकांना दिलासा देणारा मदतगट लाभला तर त्यांच्या अडचणी दूर होण्यास / योग्य काळजी आणि निर्णय घेण्यास मदत होईल.

बाळाला चांगले पालक, मुलीला स्थिर भवितव्य आणि मुलीच्या आई वडिलांना मनःशांती लाभो.

>> मुल कायदेशीररित्या सोफोशद्वारे आपण दत्तक देऊया. इथे बेकायदेशीररित्या मुल देण्याचा प्रश्न येतचं नाही.>>
त्यासाठीच मुलीची - बाळाच्या आईची परवानगी लागेल ना. ती तसे करायला तयार नाही म्हणूनच हा धागा आला. कितीही शॉकिंग वाटले तरी मुलीने अतिशय थंड डोक्याने ही प्रेग्नंसी प्लॅन केली आहे त्यामुळे मुलीची परवानगी मिळवणे हेच मोठे आव्हान असणार आहे. मुलीने बाळ दत्तक दिले तरीही त्या बॉयफ्रेंड पासून तिला दूर ठेवण्यासाठी बराच काळ सावध रहावे लागेल. सर्व काही योग्य मार्गावर आहे असे भासवून आईवडील थोडे निर्धास्त झाल्यावर पुन्हा त्या मुलाकडे पळून जाणे वगैरे होवू शकते.
एखादी मुलगी अशी कशी वागू शकते असे वाटत असल्यास, डेड बीट बॉयफ्रेंड पासून एक मूल झाले, त्याची कुठलीच जबाबदारी तो बॉयफ्रेंड घेत नाही तरी त्याच्यापासूनच पुन्हा सहा महिन्यांनी दिवस राहाणे वगैरे प्रकार बघण्यात आहेत. त्या बॉयफ्रेंडचे जसे काही व्यसनच लागले आहे असे चालते. अशा मुलींपायी हतबल झालेले अमेरिकन आईबाप बघितले आहेत.
असो. या मुलीला सुबुद्धी मिळो, तिचे आणि निष्पाप बाळाचे आयुष्य सावरो.

आपण कमावलेले आपण वर नेणार नाही. पण कुणाच्या तरी दुवा आपण सोबत नेत असतो. >> हे मात्र अगदी खरं. मला स्वतःला काल्पनिक धागा आहे असा संशय आला. पण वर्जिन शरीर इ तपशील सोडले तर अशा परिस्थितीत इतर मुली-पालक ही सापडतात, त्यांना मदत होईल.

कुणाला धीर येईल, किंवा त्यातून मार्ग सुचेल अशा पोस्टी लिहाव्यात. प्रत्येक वेळी तसे जमते असे नाही. ह्या धाग्याच्या निमित्ताने तपासून बघता आले की - कुठल्याही नात्याचे शेवटचे टोक काय. हे तापदायक विचार असतात पण परिस्थितीनुसार करावे लागतात. (उदा: प्रियकराने प्रेग्नंट प्रेयसीला वेश्येच्या घरी ठेवणे हे माझ्या दृष्टीने 'डीलब्रेकर' आहे! आई-वडिलाने मुलीचा फोन जप्त करणे 'बिग नो नो'. तुरूंगातही आठवड्याचे फोन्/व्हीजिट्स असतात. मुलीने कुठलेही संसाधन हाताशी नसताना आई होण्याचा निर्णय घेणे म्हणजे स्वतःचा स्वतःशी काय संवाद नाही काय.... )

कुणी ह्या घटनेचे लेख्/कादंबरी इ लेखन करणार असेल तर शुभेच्छाच. चांगले नाट्य आहे.

एक बाळाला खूप मदत होईल अशा हेतूने विनंती करते. मूल संस्थेला सोपावल्यानंतर दत्तक प्रक्रियेला उपलब्ध व्हायला(वैद्यकीय/कायदेशीर) सुमारे ३-६ महिने लागतात. या कालावधीत जर त्या मुलीने निदान पहिले २ महिने मुलाला स्तनपान केले तर त्या बाळाच्या शारिरिक/मानसिक विकासाला खूप मदत होईल.

पण 13 वर्षे जुना id उगीच खोटे का लिहिलं.
>>> समस्या खरी असावी.. असे वाटते आहे...

माझा प्रश्न परत विचारतो कारण उत्तर आले नाही...
गर्भपात करायचा की नाही किंवा मूल दत्तक द्यायचे की नाही यात बापाचा कंसेंट महत्वाचा नाही का की फक्त आईच ठरवू शकते...

ही घटना वाचली, प्रतिसाद वाचले, मुलांना अर्थात त्या दोघांना अशी वडील आणि समाजाचे काही पडले नाही मग उगाचच काठ्यकुट कशासाठी, त्यांना नशिबावर सोडून द्या, आणि मुलीच्या आई व वडिलांची मात्र कमाल वाटते, खूप पैसा देत असावेत मागेल तेव्हा आणि त्याचा हिशोब घेत नसावेत मुलीला महागडा आयफोन देतात पण जबाबदार वर्तन ठेव संगत नाहीत अंध विश्वास ठेवतात, मुलगी तो फोन विकते अनि पालकांना खोटे सांगते, मुलाचा साठी पैसे देते, दिघे सेक्स करतात पणं जबाबदारी मात्र घेत नाहीत, हा टीवी मालिका राईट्स, फ्रीडम, पर्सनल स्पेस, स्त्रीमुक्ती असे उच्च विचारांचा परिणाम असावा, सध्या लोक डाऊन आहे, लोकल प्रवास करता येत नाही, पणं पूर्वी तो सर्वांसाठी खुला असताना ठाणे पनवेल हार्बर लाईन लोकल प्रवासात बावी मुंबई मध्ये कॉलेज ल जाणारी अनेक मुळे मुली उघडपणे जेंट्स डब्ब्यात लाडीज रिकामा असताना अनेक चले सर्वांसमोर करताना बघितले आहेत, कुणी शाळेतील किंवा लहान मुले जर प्रवास करीत असतील तर त्यांना छ्यागित, अंगचातीस जाण्याचे, किसींग अश्या प्रकारांचे विविध प्रकारचे प्रत्यशिक अगदी लिव्ह नवीन नवीन पद्धतीने बघायला अनुभवायला मिळते त्यात काही विशेष वाटत नाही... पूर्वी मुलाला शाळेत दोड्रणाचावेक प्रसंग आठवतो, तो मी पत्नीला सुद्धा दाखवला, एक.मुलगी रिक्षातून शाळेच्या दरात उतरली, रिक्षा गेली मग एक टपोरी मुलगा बाईक वर आला आणि 8 वितील मुलगी आनंदाने हसत त्या बाईक वरून दोघे वेगात निघून गेले, अश्या काही शातिर मुली शाळेत असताना आहेत, आता प्रश्न असा मायबोलीकरांनी सांगावे हा स्त्री स्वातंत्र्याचा गैरफायदा आणि आईवडिलांचा विश्वासघात नाही का, मग असे अनुभव. येऊन काही जन असली मुलींचे थेर बघून शिक्षणं थांबवता व लग्न लावून देतात, तर काही अश्या .उलिंचे उधरण बघून शिक्षण बंद पडतात, हे सुद्धा आजूबाजूला अगदीं श हृत बघितले आहे, मग मनात विचार येतो की जा सेक्स एज्युकेशन एक विषय म्हणून शाळेत शिकवत नाहीत, निदान जबाबदार पाने तरी वागतील...

माझा प्रश्न परत विचारतो कारण उत्तर आले नाही...
गर्भपात करायचा की नाही किंवा मूल दत्तक द्यायचे की नाही यात बापाचा कंसेंट महत्वाचा नाही का की फक्त आईच ठरवू शकते...

>> इतका थोर विचार धन्य!! बापाला सोनोग्राफी रिपोर्टवर स्वतः आपण बाप आहोत हे सांगायची लाज आणि भिती वाटली म्हणून मुलीच्या शेजारी राहणार्‍या मुलाचे नाव टाकले जेणेकरुन उद्याला काही झालेचं तर बापाला काही होणार नाही. बाप ह्या नात्याला कलंकित असतात अशी मुले. किंबहुना सगळ्याच नात्याला.

आणि तरीही मुलगी (चांगल्या घरातील) अशा मुलामागे अजूनही वाहवत जात आहे... कुठल्या जन्मीचे पाप फेडवून घेत आहे आई बापाचे अन् मावशीचे काय माहित..!! Uhoh

स्त्री स्वातंत्र्याचा गैरफायदा? I mean really?
एवढे बलात्कार, घरगुती हिंसाचार होतात तेव्हा पुरूष स्वातंत्र्याचा गैरफायदा नाही वाटत का? की ते दैवदत्त आहे कर्णाच्या कवचकुंडलांसारखे? धन्यवाद विचारसरणी आहे एकूण!

मुलीचे आईवडील त्यांचे स्थिरस्थावर आयुष्य सोडून इथे आलेत त्यामुळे यापुढे त्यांच्या उत्पन्नाचे साधन काय असेल ? नवीन ठिकाणी स्थायिक होत असताना , मुलीचे हे गर्भारपण, बाळंतपण, मुलीला व बाळाला लागणारी वैद्यकीय व आरोग्य सेवा, पुढील कायदेशीर प्रक्रिया यामुळे त्यांचा खर्च वाढेल. त्याचीही तरतूद त्यांना करावी लागेल.

मुलीचे आईवडील त्यांचे स्थिरस्थावर आयुष्य सोडून इथे आलेत त्यामुळे यापुढे त्यांच्या उत्पन्नाचे साधन काय असेल ? नवीन ठिकाणी स्थायिक होत असताना , मुलीचे हे गर्भारपण, बाळंतपण, मुलीला व बाळाला लागणारी वैद्यकीय व आरोग्य सेवा, पुढील कायदेशीर प्रक्रिया यामुळे त्यांचा खर्च वाढेल. त्याचीही तरतूद त्यांना करावी लागेल.

मुलीचे वडील परत जातील. त्यांची नोकरी ते करतील. सध्या दोन महिने रजेवर आहेत. आई गृहीणी आहे. खूप दुरचा सध्या विचार केला नाही. आधी ह्या फेजमधून निघून जाऊ दे. दुसरी फेज मग सुरु होईल.

माझा प्रश्न परत विचारतो कारण उत्तर आले नाही...
गर्भपात करायचा की नाही किंवा मूल दत्तक द्यायचे की नाही यात बापाचा कंसेंट महत्वाचा नाही का की फक्त आईच ठरवू शकते...

>> इतका थोर विचार धन्य!! बापाला सोनोग्राफी रिपोर्टवर स्वतः आपण बाप आहोत हे सांगायची लाज आणि भिती वाटली म्हणून मुलीच्या शेजारी राहणार्‍या मुलाचे नाव टाकले जेणेकरुन उद्याला काही झालेचं तर बापाला काही होणार नाही. बाप ह्या नात्याला कलंकित असतात अशी मुले. किंबहुना सगळ्याच नात्याला.

>>>> माझा प्रश्न जेनेरिक आहे, तुमच्या केस बद्धल नाही... गर्लफ्रेंड प्रेग्नन्ट आहे तर बॉयफ्रेंड ला हक्क आहे का मुल ठेवायचे की अबोर्ट करायचे याबाबत? की फक्त आई दिसाईड करू शकते...

माझा प्रश्न परत विचारतो कारण उत्तर आले नाही...
गर्भपात करायचा की नाही किंवा मूल दत्तक द्यायचे की नाही यात बापाचा कंसेंट महत्वाचा नाही का की फक्त आईच ठरवू शकते..>>
लग्न झाले नसेल तर पित्याच्या अधिकारा बाबतचे कायदे हे देशानुसार, अमेरीकेसारख्या देशात तर राज्यानुसार बदलतात. त्यामुळे तुम्ही कुठे रहाता त्यावर बरेच काही अवलंबून असते. इथे अमेरीकेत तरी पालकांचा विवाह झाला नसेल आणि बर्थ सर्टीफिकेटवर वडीलांचे नाव लावायचे असेल तर बाळाच्या वडिलांना सही करुन पितृत्व मान्य आहे असे लिहून द्यावे लागते, अन्यथा पॅटर्निटी टेस्ट आहेच.

सोनोग्राफी रिपोर्टवर बाप म्हणून मुलीच्या शेजारच्या मुलाचे नाव हे फारच गंभीर आहे आणि यात ही मुलगी आणि तिचा प्रियकर दोघेही सामील आहेत, तिच्या सहकार्याशिवाय हे असे शक्य नाही. मुलगी इतकी बनेल , सर्व काही थंड डोक्याने करणारी असेल तर मी पालकांना चांगला लॉयर शोधून स्वतःला सुरक्षित करायचा सल्ला देईन.

गर्भपात करायचा की नाही किंवा मूल दत्तक द्यायचे की नाही यात बापाचा कंसेंट महत्वाचा नाही का की फक्त आईच ठरवू शकते...
@च्रप्स
भारतातले माहीत नाही, पण अमेरिकेत तरी फक्त आईच ठरवू शकते, बापाचा कंसेंट महत्वाचा/आवश्यक नाही.

मूल दत्तक द्यायचे नसेल तर अमेरिकेत Safe haven law उपलब्ध आहे.

@ शूजिता,
लेख वाचून वाईट वाटले. दुर्दैवाने तुमच्या मैत्रिणीच्या समस्येचे उत्तर माझ्याकडे नाही, पण त्यांच्या दुःखात सहभागी आहे, इतकेच म्हणू शकतो.

डॉक सांगताहेत आईच्याही परवानगीची गरज नाही, तिच्या सही शिवाय दत्तक देता येते आणि अशी दत्तक घेणारी एक संस्थाही आहे. म्हणजे असे त्यांनी आधी केलेले आहे. त्यात बाळाची आई पोलिसात तक्रार करू शकते, वकील करू शकते हे त्यांना अर्थात माहीत असेल, आणि ते कसे मॅनेज करायचे हे सुद्धा.

असे मानू की हे डॉक आणि ती संस्था हे सगळे उदात्त हेतूने, फक्त अशा genuine केस मध्येच अशी मदत करतात.

अशा उदात्त हेतू असणाऱ्या लोकांना हे सहज शक्य आहे, तर क्रिमिनल माइंडेड लोक काय करू शकत असतील विचार करा. ह्युमन ट्राफिकिंग, खास करून बाळांची किती सहजतेने शक्य असेल.

Pages