लॉज बुकिंगचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव

Submitted by Parichit on 22 October, 2018 - 05:21

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.

एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.

"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.

"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले

"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला

"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम

"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"

"मी आणि माझी बायको"

"कुठे आहेत त्या?"

"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"

"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.

मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.

"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.

कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.

"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.

"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.

"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"

"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.

"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.

मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.

"काय झाले?" त्याने विचारले.

"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.

"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.

त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"

"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.

"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.

"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो

"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.

"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.

मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?

संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.

मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.

४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.

बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.

ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह ओके.
इंटरनेट कॉलिंग अ‍ॅप्स सगळ्यात स्वस्त पडतील बहुतेक. स्काईप $३ मध्ये अमेरिकेतील नंबरांना अनलिमिटेड मिनिट्स म्हणतोय.

>>भारतातून अमेरिकेत फोन करण्यासाठी कोणते कॉलिंग कार्ड वापरावे?<<

वॉट्सॅप आणि विओआयपीच्या जमान्यात कॉलिंग कार्ड अजुन तग धरुन आहे? आय्फोनचं हि फुटप्रिंट भारतात विस्तारत आहे तेंव्हा फेसटाइम ऑडियो कॉलची क्लॅरिटी वॉट्सअ‍ॅप/कॉलिग कार्ड पेक्षा चांगली आहे...

माझा अनुभव बर्‍याच वर्षापूर्वीचा आहे, पण वाचकांच्या लक्षात यावयास हवा म्हणून येथे देत आहे. मी मोटरसायकलीवर ,सौभाग्यवतीसह पुणे येथुन निघून, नाशिककडे जाण्यासाठी निघालो होतो. सायंकाळची सहा सव्वासहा ची वेळ होती. आम्ही त्यावेळी सिन्नर गावात प्रवेश केला. नाशिकला तीन तासांनी पोहोचण्याची शक्यता होती.पण सायंकाळी सहा वाजेनंतर प्रवास करावयाचा नाही असे धोरण ठरविले होते, म्हणून सिन्नर येथे लॉज वर थांबावे व सकाळी लवकर निघावे असा विचार आम्ही दोघांनी केला. चौकात पोलिसदादा उभे होते. मी बाइक रस्त्याच्या कडेला लावली आणि दोघांनी पोलिसदादाजवळ जावून विचारले, " रात्री येथे मुक्काम करावयाचा आहे, एखादे चांगले लॉज आहे काय ? " पोलिसदादाने आमच्याकडे पाहिले व विचारले," तुम्ही निघाला कोठे ? " मी सांगितले,' तसं तर जायचं आहे नाशिकला, पण रात्रीचा प्रवास नको, म्हणून मुक्काम करण्याचा विचार आहे. '. पोलिसदादाने अतिशय प्रामाणिकपणे ( त्याकाळी सर्वच पोलिस, आजकालच्या पोलिसांसारखे नव्हते.! ! ) सल्ला दिला, " हे बघा,तुम्ही येथे थांबण्याचा विचार सोडा.बाईकमध्ये पेट्रोल नसेल तर समोर पेट्रोल पंप आहे, पेट्रोल भरून घ्या आणि नाशिकसाठी निघा. येथील लॉजेस फॅमिलीकरीता रहाण्यास अजिबात चांगल्या नाहीत," आता एव्हढ्या अनुभवी पोलिसाने सल्ला दिल्यावर आम्ही तेथे कशाला थांबतो ? बाइक जी काढली ती नाशकात रात्री आठ वाजेला नातेवाईकांकडे थांबवली.

दुसऱ्या बाजूने एक विचार मांडत आहे:

धागा शीर्षकात ४९७ चा उल्लेख आहे. विबसं किंवा विवाहपूर्व संबंध ठेऊ इच्छिणाऱ्यांनी लॉज/हॉटेलचा वापर केला, तिथे आपापली खरी ओळखपत्र, पत्ता वगैरे दिला तर त्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री काय? ती माहिती वापरून ब्लॅकमेल केले जाऊ शकते किंवा मसानसारखे काहीतरी. पूर्वी झाले आहे आणि त्यावर सोमित बरीच चर्चा झालेली.

लांडगापुरात जायच्या आधी लां.पुरात राहण्याची सोय काय? असा धागा काढला असतात तर इतका मनस्ताप झाला नसता.
पुन्हा जर लां.पुरात आलात तर मंदिर परिसरात ट्राय करुन पहा.

ब्लॅकमेल करणाऱ्याचे एकमेव हत्यार म्हणजे सिक्रेट उघड होण्याबद्दल ची व्हीकटीम ची भीती.या भीतीवर वार केल्यास (सिक्रेट न ठेवल्यास) कोणी गैरवापर करू शकणार नाही.
बरेचदा एखादी सिक्रेट गोष्ट उजळ माथ्याने उघडपणे करणे जास्त सोपे पडत असेल(बिझनेस ट्रिप वर येणे/2 वेगळ्या खोल्या घेणे).अर्थात महागही.(हे खूप प्रिची झालं, पण हा एकच उपाय दिसतो.)
बाकी आयडी प्रूफ चा गैरवापर सर्वांचा होऊ शकतोच.आपली आधार कार्ड, पॅन डिटेल , फोन नंबर, क्रेडिट कार्ड नंबर भारतात अलरेडी अनेक फेक स्कीम वाल्यांकडे आहेत.
सोमी काय आहे?

सर्वांच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

> Submitted by बिपीन चन्द्र हर... on 22 October, 2018 - 17:28

@बिपीन चन्द्र: आपल्या प्रतिसादातील अनेक मुद्दे योग्य असले तरी दोन तीन मुद्दे चुकीचे आहेत.

> ओळखपत्र नसल्यास रेकॉर्डकरिता त्याने फोटो मागणे गैर नाही.

ओळखपत्र नसेल तर इथे राहता येणार नाही असे सांगायला हवे होते. प्रश्न मिटला असता. फोटो काढून पाठवा तो सुद्धा माझ्या व्यक्तिगत इमेल आयडी वर (हॉटेलच्या नव्हे) यात नक्कीच त्याचा चांगला हेतू नव्हता.

> रजिस्टरमध्ये एकदा नोंद केल्यावर खाडाखोड केल्यास कॅन्सलेशन चार्जेस मागणे गैर नाही पण त्याची पावती दिली पाहिजे.

रजिस्टरमध्ये एकदा नोंद केल्यावर कॅन्सलेशन चार्जेस मागायचे असतील असा हॉटेलचा नियम असेल तर नोंद करण्याआधी पैसे भरून घेणे आयडी प्रुफसच्या कोपिज घेणे हे सगळे सोपस्कार होऊन बुकिंग कन्फर्म करावे लागते. इथे अजून कशाचाच पत्ता नाही आणि थेट रजिस्टरमध्ये नोंद करायला लावली ह्यात माझी काय चूक? केवळ रूम बघण्याचे पाचशे रुपये भरावेत का?

> तुमच्या अंगाला हात लावणे हे तुम्हाला त्रासदायक वाटत असले तरीही त्यातदेखील मला फारसे चूकीचे वाटत नाही.

अनोळखी व्यक्तीच्या अंगाला हात लावणे (ते सुद्धा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने) हा गुन्हा आहे. आपण गुन्ह्याचे समर्थन करत आहात.

> तुम्ही जर ऑनलाइन रूम बूक केली असती तर काय केले असते अश्या परिस्थितीत?
> Submitted by टवणे सर on 22 October, 2018 - 19:27

मी हा मुद्दा त्याच्याबरोबर बोलताना सूद्धा मांडला होता. कि ऑनलाइन बुकिंग केले असते पैसे दिले असते बुकिंग कन्फर्म असते तर ऑनलाईन बुकिंगच्या नियमानुसार जे काय असतील ते कॅन्सलेशन चार्जेस मी भरले असते (आणि पूर्वी भरले आहेत सुद्धा). इथे मी अजून पैसे भरलेलेच नाहीत, तर बुकिंग झाले कसे म्हणता येईल? बुकिंगच नाही तर कॅन्सलेशनचा काय संबंध? इथे नियम वगैरे काही नाहीत. त्याच्या मनाला आले म्हणून पाचशे आकडा. त्याला कसलाही नियमांचा आधार नाही. सॉफ्ट टार्गेट पाहून दहशतीच्या जोरावर पैसे उकळण्याची वृत्ती या शहरात अनेक व्यावसायिकांच्या (अगदी रिक्षाचालक पासून) बाबत अनुभवली आहे. काहीतरी थातूरमातूर करून शेवटी "तुमचे इतके पैसे झाले" म्हणायचे आणि दिले नाहीत तर वैयक्तिक हल्ले करायचे हातघाईवर येऊन भांडत बसायचे. हे खूप कॉमन आहे इथे. अनेकजण "कशाला वादात पडायचे" असा विचार करून पैसे देऊन रिकामे होतात. त्याचाच गैरफायदा घेऊन असे प्रकार चालतात.

> Submitted by अमितव on 22 October, 2018 - 23:53

त्याने माझ्याशी वाद घालताना "लफडी करतात" असा शब्द वापरला. हि इथे Urban Slang आहे. मुखत्वे विवाहबाह्य संबंधांकरिता वापरली जाते. उदाहरणार्थ "त्या दोघांचे लफडे आहे" इत्यादी. त्यामुळे ते जे करत होते ते मॉरल पोलिसिंगचाच प्रकार होता. बर मॉरल पोलिसिंग मागचा हेतू सुद्धा चांगला नसतो. लफडे आहे असा संशय असेल तर आयडी वरून त्या स्त्रीला/पुरुषाला नंतर ब्लॅकमेल केले जाते. पैसे द्या नाहीतर फोटोचा गैरवापर करू बदनाम करू अशा धमक्या सुरु होतात.

> मग दोघांची नावं आणि आयडेंटिटी लिहायला काय हरकत आहे?

तिची आयडी प्रुफ नव्हतेच माझ्याकडे तर काय दाखवणार आणि काय लिहणार? आणि तिचा फोटो काढून त्याला पाठवणे मला सेफ वाटत नव्हते (ती माझी पत्नी असो अगर नसो. दोन्ही केस मध्ये). त्या फोटोचा गैरवापर झाला असता. त्यांचे जे काय नियम असतील ते असोत. नियमात बसत नाही म्हटल्यावर त्यांनी "इथे बुकिंग मिळणार नाही" म्हणून सांगून विषय संपवायला हवा होता ना?

> तुम्हाला नाव द्यायचं न्हवतं का? का आयडेंटिटी वर घोडं अडलेलं? नाव आणि कागदावरचं नाव सेम होतं का फेक नाव दिलेलं?

माझी आयडी पुरेशी होती. त्याबाबत फेक काहीही नव्हते. जसे मी धाग्यात लिहिले आहे मागच्या वेळी मित्राबरोबर आलो होतो तेंव्हा हॉटेल चालकाने फक्त एकाचे आयडीप्रुफ घेतले होते, त्यामुळे यावेळी तिचे आयडीप्रुफ लगेल असे वाटले नव्हते. ते मागणे आणि ते कम्पल्सरी आहे असे सांगणे हे मला अनपेक्षित होते.

> ती माहिती वापरून ब्लॅकमेल केले जाऊ शकते किंवा मसानसारखे काहीतरी. पूर्वी झाले आहे आणि त्यावर सोमित बरीच चर्चा झालेली.
> Submitted by अॅमी on 23 October, 2018 - 07:16

याच भागात एक दोन वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. एक विवाहिता ऑफिसच्या कामानिमित्त आपल्या सहकाऱ्यासोबत हॉटेलवर काही काळासाठी थांबली होती. तिने आयडी सुद्धा नाही केवळ आपला फोन नबर दिला होता. आणि पुरुषाने मात्र आयडी दिले होते. केवळ तेवढ्या आधारे तिथल्या एका वेटरने ती महिला त्याची बायको नव्हती हि माहिती काढली. आणि नंतर तिला फोन करून त्रास द्यायला सुरवात केली. मी सांगितल्याप्रमाणे वाग नाहीतर सीसीटीव्ही फुटेज आहे ते सोशल मिडीयावर पब्लिश करू, तुझ्या नवऱ्याला व इतरांना सांगू. अशा धमक्या देऊन तिच्यावर अनेकदा त्याने बलात्कार केला. इतके करून सुद्धा तो थांबला नाही. प्रकरण हाताबाहेर गेल्यावर तिने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. पुढे हे प्रकरण खूप मोठे झाले. वृत्तपत्रातून येत होते.

> ब्लॅकमेल करणाऱ्याचे एकमेव हत्यार म्हणजे सिक्रेट उघड होण्याबद्दल ची व्हीकटीम ची भीती
> Submitted by mi_anu on 23 October, 2018 - 08:55

नेहमीच असे असते असे नाही. वरील प्रतिक्रियेत दिलेली घटना वाचा. ऑफिसच्या कामासाठी म्हणून अनेकदा एकत्र प्रवास करावा लागतो. थांबावे लागते. त्यात सिक्रीट काही नसते. पण प्रत्येक वेळी ते त्या पुरुषाच्या/स्त्रीच्या जोडीदाराच्या संमतीनेच हे होईल असे नाही. विशेषकरून पजेसिव्ह नवरा/बायको असेल तर अनेकदा नाईलाजाने घरी सांगितले जात नाही. आणि जरी थांबणारे जोडपे नवरा बायको असले तरीही स्त्रीच्या फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतोच. फोटो मागणे चूकच आहे.

तुमच्या केस मध्ये तुमच्या बरोबर चुकीचे झाले यात दुमत नाही.पण पार्टनर कंसेंट नसताना एखाद्या विरुद्ध लिंगी व्यक्ती बरोबर लपून बिझनेस ट्रिप का करावी लागावी?सोशल नेटवर्क, एकमेकांना भेटणारे कलीग, अनेक कंपनी मधले कॉमन मित्र यात हे सर्व आयुष्यभर सिक्रेट राहील याची खात्री आहे का?
(नैतिकतेचे डोस पाजत नाहीये.पण मॅरेज/लिव्ह इन/एंगेजड पार्टनर पासून लपवून
ओव्हर नाईट बिझनेस ट्रिप्स कराव्याच लागत असतील असा बिझनेस डिल पैश्याचा/ग्रोथ चा थोडा तोटा सहन करून नाकारावा असे काहीसे वाटले.लग्नाच्या व्होवस(सॉरी हा शब्द कसा लिहावा मला माहित नाही) ही दोन्ही बाजूनी मोठी आणि विश्वासाची कमिटमेंट आहे.))

> Submitted by mi_anu on 23 October, 2018 - 09:38

> पण पार्टनर कंसेंट नसताना एखाद्या विरुद्ध लिंगी व्यक्ती बरोबर लपून बिझनेस ट्रिप का करावी लागावी?

हे नक्की कुणाला विचारलेय? कारण माझ्या बाबत तरी माझ्याबरोबरची व्यक्ती माझी पत्नी होती कि नव्हती तसेच असल्यास/नसल्यास लपून/उघडचा स्कोप या विषयी मी काहीही लिहिलेले नाही. किंबहुना तो विषयच नाही. "आयडी नसेल तर फोटो द्या. आणि तो हि नसेल तर पैसे द्या. नाहीतर तुमचे लफडे आहे असे आम्ही समजतो" ह्या वृत्तीचा जो त्रास सहन करावा लागला त्याबाबत मी लिहिले आहे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशी वृत्ती. माझी पत्नी असेल पण ते मी त्यांना त्या ठिकाणी कागदोपत्री सिद्ध करू शकत नसेल तर मी मार खायचा का त्यांचा?

ओके. तुमच्या प्रश्नापुरता तात्पुरता माझ्या केस बाहेर विचार केला तरी, जनरली सुद्धा अनेकदा अनेकांना अशा ट्रीप कराव्या लागतात. जसे मी वर उल्लेख केला आहेच कि ट्रीप करणाऱ्या दोघांना आपल्या व्यवसायिक नात्यावर विश्वास असतो. आपल्याकडून काही गैर होणार नाही याची खात्री असलेले इतके चांगले नाते असते. पण त्याचवेळी मॅरेज/लिव्ह इन/एंगेजड पार्टनर पजेसिव्ह असतात. त्यांना हे कळून आयुष्यात विनाकारण गैरसमज आणि कोमप्लेक्सीटीज नकोत म्हणून त्यांना कळू न देणे हाच एक मार्ग असतो. माझ्याशी अनेकजण/जणी सहमत असतील.

> ओव्हर नाईट बिझनेस ट्रिप्स कराव्याच लागत असतील

नाही हो. दिवसभरासाठी होती हि ट्रीप.

तुमच्या केस बद्दल म्हटलेले नाहीय हो.जनरल स्वतःशी म्हणतेय.की सोशल मीडिया च्या जमान्यात काहीही सिक्रेट नाहै.त्यापेक्षा सिक्रेट उघड करा आणि मजेत राहा ☺️☺️☺️

माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. >>> इथून चुकांना सुरूवात झाली असे वाटत नाही का ? आपल्याला ठामपणे माहीत नसताना समोरच्या बद्दल ग्रह करून घेणे हा आरोप तुम्ही त्याच्यावर लावत आहात. मात्र तुम्हालाही तो लागू होत नाही का ? तुम्हाला रद्द झालेले कलम माहीत होते मात्र या नियमाची ठाम माहिती नव्हती असे दिसते.

जर तसा नियम असेल तर आयडी का देत नाही असा त्याचा ग्रह झाला असेल. शिवाय हॉटेल वर सर्रास चालणा-या धंद्यांमुळे त्याला शंका आली असेल. पुढे तुमच्या मी का स्पष्टीकरण द्यायचे या अ‍ॅटीट्यूड मुळे ती बळावत गेली.

बाहेरगावी कुठेही गेल्यावर अ‍ॅटीट्यूड दाखवून चालत नाही. प्रसंगावधान बाळगावे लागते. संयमाने , सबुरीने घ्यावे लागते. अनेकदा आपलीच चूक असल्याचे अंतिमतः ध्यानात येते. प्रकरण हातघाईवर आले असते तर केव्हढ्यात पडले असते ?

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते >>
कोल्हापुर सारख्या शहरात तुम्हाला एक चांगले हॉटेल मिळाले नाही असं कसं शक्य आहे...अहो कितीतरी चांगली फॅमिली सोबत राहता येतील अशी अनेक हॉटेल्स आहेत तिथे ..
असो..
पण हा अनुभव भयानक होता हे मात्र नक्की.

माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. >>> इथून चुकांना सुरूवात झाली असे वाटत नाही का ? आपल्याला ठामपणे माहीत नसताना समोरच्या बद्दल ग्रह करून घेणे हा आरोप तुम्ही त्याच्यावर लावत आहात. मात्र तुम्हालाही तो लागू होत नाही का ? तुम्हाला रद्द झालेले कलम माहीत होते मात्र या नियमाची ठाम माहिती नव्हती असे दिसते.

जर तसा नियम असेल तर आयडी का देत नाही असा त्याचा ग्रह झाला असेल. शिवाय हॉटेल वर सर्रास चालणा-या धंद्यांमुळे त्याला शंका आली असेल. पुढे तुमच्या मी का स्पष्टीकरण द्यायचे या अ‍ॅटीट्यूड मुळे ती बळावत गेली.

बाहेरगावी कुठेही गेल्यावर अ‍ॅटीट्यूड दाखवून चालत नाही. प्रसंगावधान बाळगावे लागते. संयमाने , सबुरीने घ्यावे लागते. अनेकदा आपलीच चूक असल्याचे अंतिमतः ध्यानात येते. प्रकरण हातघाईवर आले असते तर केव्हढ्यात पडले असते ?

नवीन Submitted by किरणुद्दीन on 23 October, 2018 - 10:37 >>> + १११ प्रतिसाद आवडला

"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.

कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.>>>>>>>

आततायी पणा करायला कोणी सुरुवात केली?
चढा आवाज, कार्ड हिसकावून घेणे
यातले काही न करता शांतपणे नकोय मला रूम असे म्हणता आले असते.

यातले काही न करता शांतपणे नकोय मला रूम असे म्हणता आले असते.
नवीन Submitted by आशुचँप on 23 October, 2018 - 14:55

धागालेखकाची चूक दाखविली किंवा हॉटेलचालकांची बाजू घेतली तर आपल्यावर गुन्हेगाराचे समर्थन केल्याचे लेबल लागते. त्यामुळे प्रामाणिकपणे इथे धागा लेखकाला काही समजावणे व्यर्थ असल्याचे जाणवते.

मागच्या महिन्यात मी आणि माझी बायको औरंगाबादला गेलो होतो असाच अनुभव आला आमच्या दोघांचे ID प्रूफ मागीतले ते होतेच पण तिचे ID प्रूफ लग्ना आधीच्या नावाचे असल्याने हॉटेल मॅनेजर ने अडवणूक केली हॉटेल MMT वरून बुक केले होते त्यामुळे option नव्हता . शेवटी घरी फोन करून marriage सर्टिफिकेट मेल वर मागवले तेंव्हाच रूम दिली

कायद्याने सज्ञान कोणत्याही 2 व्यक्तीना व्हॅलीड आयडी प्रूफ दाखवून एकमेकांसोबत खोली मिळायला हवी.पण भारतात यात अनेक पॅरामीटर्स असतील.हॉनर किलिंग करायला आलेल्या लोकांनी हॉटेल स्टाफ ला रूम का दिली म्हणून त्रास देणे, लोकांनी कॉलगर्ल आणणे आणि पोलिसांच्या धाडीत हॉटेल चे नाव खराब होणे, वन नाईट स्टँड म्हणून येऊन नंतर भांडण होऊन पुरुष/स्त्री ने आत्महत्या करणे वगैरे.हेच सर्व लग्न वाल्या नवरा बायकोचेही होऊ शकते.पण स्वतः भरपूर पैसे खर्चून मेहनत करून हॉटेल आणि नाव कमावले असल्यास ताक पण फुंकून प्यावेसे वाटणे साहजिक असावे.
(एखाद्याचा हात धरून दमदाटी करणे, डोमीनेट करणे हे मात्र चूक.यात कुठेतरी 'आलाय ना, आता पैसे खर्च करूनच गेला पाहिजे' असा भाव दिसतो.)

वर उल्लेख केलेल्या उदाहरणात सज्ञान व्यक्तींचे ओळखपत्र नव्हते म्हणून नाकारले आहे. ते विवाहीत आहेत की नाहीत हा मुद्दा दिसत नाहिये.

लग्नाआधीच्या नावाने असल्याने अडवणूक >> रूमवर बायकोचं लग्नाआधीचं नाव लिहून चाललं असतं का हा प्रश्न आहे. उत्तर नाही असेल तर फुकट पोलिसिंग आहे.

चंद्रूभौ-२ यांनी दिलेला प्रतिसाद उत्तम व योग्य आहे.

अनेकदा वेगवेगळ्या हॉटेल्समधे राहण्याचा प्रसंग येतो, [विबासं नाही, पण पक्षकार्य, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, बाहेरगावी शिकणार्‍या कन्यारत्नाच्या भेटीसाटी इ.] त्यामुळे हे नियम ठाऊक झालेले आहेत.

आपण रजिस्टरमधे नोंद केलीत याचा अर्थ रूम स्वीकारलीत. नॉन स्टार व काही स्टार हॉटेलातही ही नोंद स्वहस्ताक्षरातच करायला लावतात. जेणेकरून अक्षरावरून ओळख पटू शकते. मुद्दा हा, की रजिस्टरमधे लिहिल्या नंतर ते खोडून टाकले व गिर्‍हाईकाने रूम कॅन्सल केली असे सांगून म्यानेजरने पैसे खिशात घातले, अशी शंका आली की त्या म्यांजरची नोकरी जाण्यापासून त्याला ४ कानाखाली खाव्या लागण्यापर्यंत अनेक बाबींना त्याला सामोरे जावे लागू शकते.

ऑनलाईन बुकिंग करतानाही काही हॉटेल्स 'कपल फ्रेंडली' अशी जाहिरात करतात, याचा अर्थ, दोन लोकांच्या आयडीवरील आडनांवे सारखी नसतील, तरी कपलला राहू देण्यास त्यांची हरकत नसते. इतर कित्येक हॉटेल अ‍ॅज अ पॉलिसी अविवाहित कपल्सना राहू देत नाहीत. कारणे अनेक असतात. पैकी पळून आलेली प्रेमी युगुले, यातून "पळवून नेवून बलात्कार केला" पासून प्रेमाला घरून होणार्‍या प्रचंड विरोधामुळे हॉटेलरूममधे जाऊन आत्महत्या करणारे नमूने पर्यंत अनेक बाबी असतात. या सर्वांमुळे त्या हॉटेलवाल्यांना भरपूर त्रास होतो. - रच्याकने : महाराष्ट्राबाहेरच्या कपल्सची आडनांवे एकमेकांसारखी नसणे शक्य असते, त्यांचे काय करतात ते मला ठाऊक नाही. - पण मुद्दा हा, की कपल्सना एंट्री देताना ते मॅरीड आहेत की नाहीत याची शहानिशा करणे ही त्या त्या आस्थापनेची "हाऊस पॉलिसी" असू शकते. व ते संपूर्णपणे त्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे; कायदेशीरही आहे.

आता टिप्स :

ड्रायव्हिंग लायसन्स हे अत्यंत चांगले आयडीप्रूफ आहे. पासपोर्ट, पॅन वा आधार मी सहसा देत नाही.

ड्रायव्हिंग लायसन्सचा प्रॉब्लेम फक्त इतकाच येतो, की काकू लग्नाआधी ड्रायव्हिंग शिकल्या. त्यामुळे आडनांव म्याच होत नसे. Lol तो प्रॉब्लेम ५०शीत ड्रायविंग लायसन्स रिन्यू केले तेव्हा सॉल्व्ह करून घेतला.

आजकाल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आधार मागत नाहीत, / मागू शकत नाहीत, पण द्यायचेच असेल, तर UIDAIच्या साईटवर जाऊन आधार नंबर मास्क करा व मास्क्ड कार्डची सॉफ्ट कॉपी -अधिकृत पीडीएफ- डालो करा. यावर तुमचा मूळ आधार नंबर न येता व्हीआयडी उर्फ व्हर्च्युअल आयडी येते. ही सॉफ्ट कॉपी कायद्यानुसार स्वीकारावी लागते. याचे नोटिफिकेशन त्याच साईटवर आहे. समोरचा अगदीच माठ असेल तर त्याच्यासाठी एक प्रिंटाउट काढून लॅमिनेट करून ठेवा. मी गेलेल्या ९९% ठिकाणी फोनमधील आधार/ड्रायविंग लायसन्सची इमेज चक्क फोन स्कॅनरवर ठेऊन झेरॉक्स करून घेतलेली त्यांना चालली.

हा स्कॅन होताना, तो कोर्‍या कागदावर केला, तर अमुक हॉटेलला अमुक रोजी आयडी प्रूफ म्हणून दिला, असे त्यावर मोठ्या अक्षरात लिहून सेल्फ अटेस्ट करा. जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही. सहसा स्कॅन एका 'अ‍ॅडमिशन' फॉर्मच्या पाठीमागल्या बाजूवर करतात. मुंबई सेंट्रलचा आमचा एक नेहेमीचा बोहोरी हॉटेलवाला आहे. त्याच्याकडे एक भ ऽ ली मोठी फाइल आहे. लास्ट टाईम कधी आलो ते सांगितले तर त्याला जुना कागद सापडतो, त्यावर तो फक्त नवी तारीख अ‍ॅड करतो. पुन्हापुन्हा आयडी प्रूफ झेरॉक्स करत नाही.

ओनलाइन बुकिंग केलेली एक फॅम्ली आबूला ( हॅटेल न्यु सुधीर)हॅाटेलात आली. सून मुलगा असे चौघे. त्यांची बॅग प्रवासात हरवली होती. म्यानिजरने त्यापैकी एकास पोलीस स्टेशनला नेऊन कंप्लेट नोंदवून त्यावर ती खोली दिली.

Pages