लॉज बुकिंगचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव

Submitted by Parichit on 22 October, 2018 - 05:21

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.

एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.

"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.

"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले

"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला

"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम

"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"

"मी आणि माझी बायको"

"कुठे आहेत त्या?"

"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"

"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.

मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.

"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.

कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.

"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.

"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.

"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"

"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.

"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.

मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.

"काय झाले?" त्याने विचारले.

"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.

"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.

त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"

"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.

"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.

"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो

"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.

"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.

मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?

संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.

मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.

४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.

बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.

ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेरिच गिनो: मी एअरपोर्टच्या दिलेल्या उदाहरणात.
हँड बॅगेजमध्ये आता अनेक गोष्टींना बंदी आहे, नेलकटर सुद्धा. या गोष्टींचा जाच होउ शकतो. कधी अनवधानाने अशा वस्तू हँड बॅगेज मध्ये राहिल्याच तर सिक्युरिटी चेक वेळी तिथे सोडून याव्या लागते, अथवा बोर्डिंग पस कॅन्सल करून परत चेक इन काउंटरला जाऊन ते रजिस्टर्ड बॅगेज मध्ये टाकाव्या लागतात, तेवढे ते वर्थ असेल तर.

पण म्हणून हा नियम चुकीचा आहे असे कधी वाटले नाही.
नियम योग्य असतो किंवा नसतो, जाचक वाटतो की नाही हा वेगळा मुद्दा आहे.

नियम आहे तर पाळला पाहीजे. सामाजिक भान असो किंवा नसो, अयोग्य असो किंवा नसो. ब-याच देशांमधे मुलाचा सांभाळ नीट होत नाही असा संशय आला तर मूल उचलून नेऊन ते दुस-या फॅमिलीत देण्याचा नियम आहे. ही पायमल्ली नाहीये का ? पण तिथे निमूटपणे गप्प बसतात लोक. अगदी मुलाला रागावले आणि त्याने चाईल्ड हेल्पलाईनला नंबर दिला की पोलीस दारात हजर होतात. हे पण अती होतेय तरीही निमूट पाळणारे लोक असतात. मग भारतात लॉजवाल्यांनी आयकार्डची झेरॉक्स घ्यावी असा नियम पोलिसांनी त्यांच्या हद्दीत लागू केला तर बिघडले कुठे ?

आधीच्या पोस्टमध्ये लिहिल्या प्रमाणे, नियम केलाय तेव्हा पाळतो आहोतच, व इतरांनाही सगळ्यांचे आय कार्ड जवळ बाळगा, वेळ कशी येईल सांगता येत नाही असाही (आगाऊ) सल्ला दिलाय आधीच्या पोस्टमध्ये.
विषय या नियमात कितपत तथ्य आहे या कडे वळला त्यावर मत मांडले आहे.

आधारकार्डचे नियम बघा आता कसे बदलले आहेत. का बदलले असतील?

नियम तेच पाळतात ज्यांच्या G मध्ये दम नसतो, 'तुम जान्ते नही हो मै कोन हुं/मेरा बाप कोण है' वाले नियम फाट्यावर मारतात..(अर्थात त्यांच्या एरियाम्ध्ये, अम्रिका किंवा दुसरिकडे गेले की तिथे चड्डी काढली तरी हु की चु करत नाहीत)

मानव,
'आगाऊ' म्हणजे उद्धट सल्ला वगैरे म्हणायचंय का?सल्ला मीच दिला होता.कारण मला हॉटेल चेक इन, एअरपोर्ट एन्ट्री सगळीकडे चाईल्ड आयडी मागितला आहे.
चाईल्ड आयडी मागणारे:
ग्रॅनव्हिले बोरीवली
ताज जयपूर

चाईल्ड आयडी न मागणारे:
लोणावळा येथील बरीच हॉटेल्स.

आता या अनुभवावरून 'चाईल्ड आयडी सॉफ्ट कॉपी असुद्या, गरज लागू शकते' म्हटलं तर त्यात आगाऊपणा कुठे आला? ☺️☺️☺️☺️☺️

बरं ठीक आहे.
पायजमामल्लीफाईटम वाल्यांनी आयडी ठेवू नये. ज्यांना ठेवायचे त्यांनी ठेवावे. हॉटेल वाल्याने जर अडवायला सुरूवात केली तर तिथल्या तिथेच त्याच्यासमोर....

व्यायाम करायला सुरूवात करावी. बॉडी बनली की पुढचे संभाषण करावे. पोलीस आले तरी हटू नये. आणखी व्यायाम करावा. घाम फोडावा.

च्रप्स,
एक लहान मुल त्याच्या मामा, काका, मावशी, आत्या, आजोबां बरोबर कुठल्याही हॉटेल रूममध्ये राहू शकत नाही... हे अतिशय दुर्दैवी आहे.
>>> ओळखपत्र देऊन राहा ना. रूम बंद असते, बंद दारामागे काय होईल कोण जबाबदारी घेणार?

>>> मामा, काका, मावशी, आत्या, आजोबांबरोबर लहान मूल असतांना काय होते बंद दारामागे? Care to explain?

तुम्ही ईथे जे ईंप्लाय केले आहे ते विकृत विचार डोक्यात भरल्याचे लक्षण आहे (ज्याचा प्रत्यय तुम्ही वारंवार दिला आहे) जे वाचून कोणाचीही चिडचिड होईल. बाकीच्यांनी तुम्हाला ईग्नोर केले मी कॉल-आऊट केले एवढेच.

लहान मूल पळवलेले असेल तर ?
ओ हाब तुमचेच खरे असे आहे का ? लहान मुलांच्या बाबतीत अमेरिकेत अत्यंत कडक कायदे आहेत. ते बदला की आधी.

हॉटेल बुकिंग एकाच माणसाने केले असेल तरी खोलीत जेवढे जण राहणार त्या सगळ्यांचे ओळखपत्र घेणे हॉटेल्सना बंधनकारक आहे. त्यात काहीही चुकीचे नाही.
तश्या पाट्याही असतात की हाटेलांमधे.
मग तुम्ही स्वतः बुकींग केलेले असो नाहीतर आमंत्रित म्हणून तुमच्यासाठी कुठल्या कार्यक्रमाच्या टीमने बुकींग केलेले असो.
हॉटेल्सच नाही तर युनिव्हर्सिटी गेस्टहाऊसेस, कॉलेजेसची गेस्टहाऊसेस अश्या ठिकाणी जिथे तुमच्यासाठी त्या त्या शैक्षणिक संस्थेने रूम बुक केलेली असते. तिथेही सगळीकडे ओळखपत्र लागतेच.

लग्न न झालेले जोडपे असेल तर रूम देऊ नये वगैरे असा काही नियम नाहीये. पण अशी हॉटेल बुकींग्ज हे काही लोकांचे चरण्याचे कुरण आहे.
हॉटेलमधील आणि पोलिसवाले सुद्धा.

वेगळे आडनाव असलेले स्त्री आणि पुरूष असतील तर कटकट करू शकतात रूम द्यायला असे ऐकलेले असल्याने मॅरेज सर्टिफिकेटची स्कॅन कॉपी असते फोनवर बरोबर. पण आजवर ओळखपत्रापलिकडे कधी काही विचारले नाही. वेगळे आडनाव बघून एकदाच लग्न झालंय ना? असं
विचारलं होतं. "हो, आडनाव बदललेलं नाही." एवढ्या उत्तराने त्या माणसाचे समाधान झाले. एरवी "लफडं दिसतंय!" अश्या डिस्कवरीमधे काही स्टाफ लोक खुश होतही असतील. माहिती नाही. पण होऊदेत की त्यांना खुश. आपलं काय जातंय?

अहो हाब, तुम्ही भारतीय बातम्या वाचत नाही बहुतेक. लहान मुलांवर अत्याचार करणारे कित्येक वेळा नातेवाईकच असतात. काय खात्री की लहान मूल आणि काका खरेच नातेवाईक आहेत, ओळखपत्र दिले तर कमीत कमी भीती तरी असेल काही वाईट न करण्याची. म्हणून ओळखपत्र जरुरीचं आहे.
आता पण तुम्ही चिडून विकृत विचार माझ्या डोक्यात भरले असे मुद्दाम लिहिले, करण असे लिहिले की समोरच्याला वाईट वाटेल वगैरे वगैरे. तुम्ही शांत चर्चा करू शकत नाही, राग असतो तो बाहेर काढायला बघता☺️

शाळेत पण मुलाला आणायला गेलात कि पॅरेण्ट्स आयडी कार्ड मागतात. या शाळा पण ना, हाब ना कन्स्ल्ट करतच नाहीत..

मानव,
'आगाऊ' म्हणजे उद्धट सल्ला वगैरे म्हणायचंय का?
>>
मी_अनु, त्या पोस्टमध्ये मी स्वतः बद्दल बोलत आहे ना.
मी स्वतःच दिलेल्या सल्ल्या बद्दल म्हटले आहे ते.

तुमच्या " मायनरचे पण आय कार्ड विचारतात " त्या पोस्टच्या उत्तरात मी ओके म्हणून पुढे हा सल्ला दिला आहे. त्यात चुकीचे नाही पण जर कोणाला वाटत असेल तर म्हणून (आगाऊ: न मगितलेला ) म्हणालो.

ओहो. ओके.
(आधार कंपल्सरी नाही वाल्या कोर्ट व्हर्डीक्ट पूर्वी लहान मुलांना शाळेत ऍडमिशन ला आधार कार्ड मागितली आहेत.एप्रिलमध्ये ऍडमिशन घ्यावी लागते.15 जून पर्यंत आधार कॉपी न दिल्यास बालकाचे आयडी कार्ड बनत नाही.
यावर्षी नव्या ऍडमिशन ला हा नियम काढला असेल असे वाटते.)
भारतात आधार कार्ड हे प्रवासात न्यायच्या पाण्या सारखे आहे.नसले तर पर्याय निघू शकतात, पण असलेले केव्हाही बरे.

हाब हे त्यांनी ज्यांचा आय डी धारण केला आहे त्यांच्याप्रमाणे रॅशनल विचार करीत असावेत असं वाटलं होतं......>>
ह्या न्यायाने आपण काय विचार करत असाल? >> हे भारी होते रे अग्नीपंख. हुडा हे वाचून तरी आयडी बदल रे.

राखीने बर्गाचे म्हणणे मस्त स्पष्ट केले आहे, एकदमच पटले.

आधार कॅापीवरची नावे वेगळी दिसली म्हणून हॅाटेल मालक इतर चौकशा करणार नाही. पोलीस राउंडला येतात तेव्हा त्यांना काही संशयास्पद वाटले तर ते गेस्टला भेटतात.
आपण आपला वेळ वाचवायचा असेल तर सर्व डॅकक्युमेंटस जवळ ठेवायला हवीत॥
--
पर्यटन ठिकाणी आपण सर्व सामान रुमवर ठेवून एक छोटी पिशवी,पर्स घेऊन शहर फिरायला जातो. पुरातन इमारत ,देवळे इथे तिकिट घ्यावे लागते. त्या तिकिटावर आता " रहिवास पुरावा अपेक्षित लिहिलं आहे." म्हणजे विचारला तर दाखवावा लागेल.
परदेशींसाठी डॅालरमधले तिकिट घ्यावे लागते.

निरनिराळ्या आस्थापनांसाठी नियम,अटी असतात. प्रत्येक वेळी विचारणा होत नाही म्हणून आपला समज होतो की ते नाहीत. परंतू ते लागू असतातच.

पोलीसांच्या बाबतीत, किंवा रखवालदार, बस कंडक्टर हे लोक बऱ्याचदा तक्रार आली तरच अॅक्शन घेतात.

बातमी जुनी आहे. लिंक सापडत नाही . महाराष्ट्रातील आहे हे नक्की.
एक स्त्री आणि एक पुरुष नवरा बायको नाते सांगत लॉज वर राहिले. रात्री दोघे ही आत्महत्या करत आहोत अशी चिठ्ठी लिहीली. पुरूषाने विष घेतले बाईने कच खाल्ली. तो मेला. ती पळून गेली.
फक्त त्याचे नाव खरे होते. पोलीस पत्ता शोधत घरी गेले. बायको ला अटक केली. लॉज वाला म्हणाला ही बाई नव्हती..
पुढचे लक्षात नाही.

अमित सोनवणे या लहान मुलाला किडन्ँप करून मारून टाकले होते . सातारा भागातील घटना आहे. किडनँपर मुलाला घेऊन लॉज बदलत राहीला.

<<<अमेरिकेत सुद्धा जॉर्ज फर्नांडीस, अब्दुल कलाम, शाहरूख खान यांना तपासणी साठी कपडे उतरवावे लागले होते. हक्कांची पायमल्ली आणि सुरक्षा यात गल्लत होतेय का ?>>>
शाहरुख खान च्या बाबतीत असे की त्याच नावाचा एक अमेरिकेच्या आतंकवादी डेटा बेस मधे होता. आता अमेरिकेतल्या लोकांना सुद्धा शाहरुख खान माहित असायचे कारण काय? खुद्द अमेरिकेत रहाणार्‍या लोकांना जेव्हढे माहित नसते, तेव्हढे भारतातल्या लोकांना अमेरिकेबद्दल माहित असते. पण सर्वसामान्य अमेरिकन लोकांना भारताबद्दल फार कमी माहिती आहे, नि करून घ्यायची फारशी इच्छाहि नाहीये.

जेंव्हा भारतातले प्रसिद्ध लोक अमेरिकेतहि प्रसिद्ध आहेत म्हणतात ते अमेरिकेत रहाणार्‍या भारतीय लोकांमधेच प्रसिद्ध असतात, बाकी अमेरिकन लोकांना माहितहि नसते.

तसे पाहिले तर खुद्द टेडी केनेडीला सुद्धा अगदी बॉस्टन एअर पोर्टवर झडती द्यावी लागे. पण इथे कुणाला हक्काची पायमल्ली वगैरे वाटले नाही.
टेड केनेडी, बॉस्टन वगैरेबद्दल भारतातल्या लोकांना इथल्या लोकांपेक्षा जास्त माहिती असेलच, तेंव्हा या गोष्टीचे गांभीर्य, आश्चर्य त्यांना वाटावे!

शाळेत पण मुलाला आणायला गेलात कि पॅरेण्ट्स आयडी कार्ड मागतात. या शाळा पण ना, हाब ना कन्स्ल्ट करतच नाहीत..
>>>अमेरिकेत डे केयर मध्ये पण आयडी कार्ड मागतात.

जोर का धक्का धीरेसे लगा. अरे आवरा काई दिवाळीची तयारी वगैरे नाही Happy उठा उठा पहाट होईल मोती स्ना नाची वेळ होईल.

उठा.. उठा.. निवडणूक आली,
....
इंदूमिल स्मारक, ....
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ....
आणि राम मंदिर बांधायची वेळ झाली...!!.

बाबा कामदेव,
तुम्हाला माझ्या शेजार्‍याचा मोती (कुत्रा) आंघोळ करण्यासाठी बक्षिस!

परिचित परिचित
मेरे लॉज आना, आना परिचित
मेरे लॉज आना
मेरे लॉज का इतना सीधा पता है
ये लॉज जो है चारों तरफ से खुला है
ना एण्ट्री जरूरी ना आय कार्ड देना
मेरे लॉज का रजिस्टर कोई नही है
है टेरीफ गुम और चार्जेस नही है
बडी छूट है दोस्त, खडी छूट है दोस्त
तेरे टायटल का धक्का मिटाके आना है आना, आना परिचित

अमेरिकेत डे केयर मध्ये , शाळेत प्रत्येकवेळेस आयडी कार्ड मागत नाहीत. सुरुवातीला फॉर्म वगैरे भरुन सर्व माहिती घेतात व तेव्हाच कोण मुलाला घेऊ शकते ती नावे व अन्य जरूरी माहिती ठेऊन घेतात.

बरं, भारतात आता मुलांचा वगैरे मुळ आयडी दाखवावा लाग्तो की कॉपी?
खरं तर मलापण बर्गचे म्हणणे पटले. लेखात लिहिलेले, फोटो मागणे वगैरे पण नाही पटले. पण जर भारतात गुन्ह्यांची इतकी वाढ होते आहे त्याकरता जर काही घडलेच तर तपास सोपा जावा म्हणुन हे आवश्यक केले असेल तर इलाज नाही. Sad कॉपी चालत असेल तर बरं, नाहीतर सगळीकडे घरादाराचे पासपोर्ट घेऊन हिंडणे धोक्याचे वाटते.

अमेरिकेत डे केयर मध्ये , शाळेत प्रत्येकवेळेस आयडी कार्ड मागत नाहीत. सुरुवातीला फॉर्म वगैरे भरुन सर्व माहिती घेतात व तेव्हाच कोण मुलाला घेऊ शकते ती नावे व अन्य जरूरी माहिती ठेऊन घेतात.
>>> हो मग हॉटेल मध्येही दर वेळी बाहेर जाताना परत येताना मागत नाहीत, रजिस्ट्रेशन ( बुकिंग) लाच मागतात ओळखपत्र.

बर्ग चे म्हणणे आहे की लहान मूल आत्या ,मामा ,काका ( खरे आहेत की नाही कोणाला माहीत) यांच्यासोबत कोणत्याही हॉटेलात बिना ओळखपत्र राहू शकते, हे म्हणणे कसे काय पटू शकते?

Pages