लॉज बुकिंगचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव

Submitted by Parichit on 22 October, 2018 - 05:21

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.

एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.

"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.

"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले

"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला

"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम

"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"

"मी आणि माझी बायको"

"कुठे आहेत त्या?"

"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"

"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.

मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.

"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.

कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.

"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.

"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.

"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"

"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.

"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.

मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.

"काय झाले?" त्याने विचारले.

"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.

"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.

त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"

"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.

"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.

"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो

"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.

"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.

मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?

संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.

मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.

४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.

बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.

ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भोजनालयात जाऊन एखादी थाळी मागवा. ती आल्यावर रद्द करून पैसे न देता बाहेर जाऊन दाखवा बरं. त्याने नक्कीच आधी पैसे घेतलेले नसतात. तुमचा नियम इथे लागू झाला पाहीजे. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.

नवीन Submitted by मेरीच गिनो on 4 November, 2018 - 23:35

==> पूर्ण चुकीचे उदाहरण आहे. या उदाहरणात थाळी बनलेली आहे. तुमच्यापाई हॉटेलचा खर्च झालेला आहे. तो देणे तुमची नैतिक जबाबदारी आहे. पण माझ्या केस मध्ये मी त्यांना कोणत्याही खर्चात पाडलेले नाही.

माझा पण हा शेवटचा प्रयत्न. अशी कल्पना करून पहा:
भोजनालयात जाऊन "टेक अवे" घ्यायचे आहे म्हणून सांगा. समजा त्याने तुमच्याकडून पैसे घ्यायच्या आधीच तसेच वेटरला ऑर्डर बनवायला सांगायच्या आधीच "पेड"ची पावती तुम्हाला दिली आणि जर लगेचच तुम्ही म्हणालात कि नको आहे हि ऑर्डर. तेंव्हा जर तो तुम्हाला म्हणाला कि आता नाही नाकारता येत. आता पैसे भरावेच लागतील. तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? पैसे भराल का?

परिचित, तुम्हाला काही सांगणे व्यर्थ आहे. >> +1111

ह्यात कुठेही आयडी प्रुफ स्कॅन करून ठेवावे किंवा आयडी नसेल तर फोटो काढून घ्यावा असे लिहिलेले नाही. >>> अहो ते विंग्रजी मधलं वाचा की मी पेस्ट केलेलं. अजून एक हाटेल असोसिएशन ऑफ इंडिया अशी एक साईट पण चाळा जरा.

अरे कुठं नेऊन ठेवलाय धागा ! टिपापा ला घाबरायला लागतील लोक अशाने, असे नका करू .
एका गप्पाच्या पानाला इतके महत्व- इंट्रान्स एक्साम अजून अवघड करायला हवी.
पार्ल्याच्या फ्लॅट्स चे रेटस वाढायला लागलेत आता पब्लिसिटी मुळे.

अहो ते विंग्रजी मधलं वाचा की मी पेस्ट केलेलं. अजून एक हाटेल असोसिएशन ऑफ इंडिया अशी एक साईट पण चाळा जरा.
Submitted by लंपन on 5 November, 2018 - 00:04

==> पूर्ण वाचून आणि आकलन करून मगच प्रतिक्रिया लिहिली आहे. इथे तुमचेच विंग्रजी मधले पेस्ट करत आहे.
• Tourism service providers shall verify and maintain a record of details pertaining to tourists, personnel and service providers like address, contact details etc and also commit themselves to maintaining confidentiality.

तुम्ही याचा संदर्भ देत असाल तर इथे कुठेसुद्धा त्यांनी आयडी प्रुफ ची कॉपी घेऊन ठेवावी लिहिले आहे का? पत्ता, संपर्क घेऊन ठेवा इतकेच म्हटले आहे (हायजेनबर्ग यांनी अमेरिकेतील प्रोसिजर सांगितली आहे. तिथे इतकेच करतात). आयडी प्रुफ म्हणजे या व्यतिरिक्त त्यात अजून बऱ्याच गोष्टी असतात. मुख्य म्हणजे तुमच्या आयडीचा क्रमांक आणि फोटो वगैरे. कॉपी केल्याने त्याचा गैरवापर होऊ शकतो. आयडी प्रुफ फक्त तिथल्यातिथे पाहून ओळख कन्फर्म करण्याकरता वापरणे अपेक्षित आहे.

(मी हाब यांना ओळखत नाही. ते अमेरिकेत राहतात असे त्यांच्या लिखाणावरून कळते. मी भारतात आहे. हाब यांनी यासंदर्भात अमेरिकेत काय प्रोसिजर आहे इतकेच सांगितले आहे)

तुमची स्वतःची बाजू अगदी बरोब्बर आहे नि त्याची चुकली यावर तुमचा इतका विश्वास आहे की तुम्ही त्याचे काही चुकले असेल, मुद्दाम केले नसेल, पैसे कुठे पळून जातात का असे त्याला वाटले असेल, इ. कारणांमुळे हा प्रकार घडला असेल असे तुम्हाला वाटतच नाही.
काही का असेना, झाले ते झाले. तो आणि इतर जग सुधारायला पाहिजे यात शंकाच नाही. पण तोपर्यंत, जेंव्हा तुमच्या लक्षात येईल की जगातले सगळे शहाणे नाहीयेत, तुम्हीच एकटे शहाणे, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे.
नवीन Submitted by नन्द्या४३ on 4 November, 2018 - 23:31

परिचित, तुम्हाला काही सांगणे व्यर्थ आहे.
नवीन Submitted by मेरीच गिनो on 4 November, 2018 - 23:35

^^^ वरील दोन्हि प्रतिसाद उत्तमोत्तम आहेत.

@परिचित, 5 व्या पानावरचा माझा प्रतिसाद वाचा. परत एकदा लिहितो तुमच्यासाठी.

समजा, मी हॉटेलमालक आहे.
१. मी सज्ञान लोकांकडून ओळखपत्र मागतो कारण मला नंतर झंझट नको. => हे कायद्यानुसार आहे.

<< हॉटेल /लॉज मालकाने दोन सज्ञान व्यक्तींना एक खोली देताना ते एकमेकांचे नवराबायकोच आहेत, हे तपासणे is none of his business. >>
२. मान्य आहे की It is none of my business. तुम्ही नकार देऊ शकता. मग मी पण खोली द्यायला नकार देऊ शकतो. => हे कायद्यानुसार आहे.

प्रश्न मिटला.

<<<एका गप्पाच्या पानाला इतके महत्व- >>>
मग? ते काय साधे सुधे पान आहे का? तिथले लोक लिहितात त्यावरून काही जण ते पान, इतकेच काय मायबोली पण सोडून निघून गेले आहेत. आजकाल तर विषय काही असो, त्या पानाला शिव्या दिल्याशिवाय "चर्चा " पूर्ण होतच नाही!!
जसे जगात काही झाले तरी यात अमेरिकेचाच काहीतरी हात असावा असा संशय येतो, तसे अगदी जगाच्या कुठल्याहि कोपर्‍यातली बातमी इथे आली तरी या पानावरच्या लोकांचे मत काय हे विचारून त्यावरून भांडणे होतातच.

आजकाल भाजप वि. काँग्रेस किंवा गांधी वि सावरकर किंवा ब्राह्मण वि इतर या ऐवजी हे पान व इतर हे वाद जास्त होतात.

<<पण माझ्या केस मध्ये मी त्यांना कोणत्याही खर्चात पाडलेले नाही.>>
अहो खर्चात पाडण्याचा प्रश्न नाहीये. तुम्हाला वाटते तुमचे म्हणणे बरोबर आहे, त्यांना वाटते त्यांचे! वाट्टेल तेव्हढे भांडा, शेवटी बळी तो कानपिळी. वाईट आहे, पण जग तसेच आहे हो.
तोपर्यंत हे असेच चालायचे!! जे तुमच्या सारखे फसत नाहीत त्यांनी लिहीले आहे वर काय करावे, कसे करावे, तसे पुढल्या वेळी करा.
नाहीतर मग तुम्ही आता निवडून या नि मंत्री बना, मग तुम्ही म्हणाल ते कायद्या विरुद्ध असले तरी कुणाची हिंमत नाही तुमच्या विरोधात जायची.

>>रजिस्टरमध्ये सही करणे म्हणजे लॉज बुक झाला (ते हि पैसे देण्याच्या आधीच?) असा कोणता कायदा आहे हे सांगू शकाल का? >>

अरे बापरे! मूलभूत प्रश्न!!

तुम्ही काउंटरसमोर उभे राहता, किती जण? एक खोली असं म्हणताच रजिस्टरमध्ये लिहिता सही करता असं होत नाही.
--
असं होतं -
"खोली आहे?"
" एसी/नान एसी, किती बेडची?"
" नान एसी दोन बेड."
मग खोली बघून येतो.

"किती रुपये? "
"९००."


नाही म्हणत नाही म्हणजे चालेल.
"आइडी आहे?"
"आहे."

मालक/म्यानेजर रजिस्टर पुढे करतो.
( ती खोली आणि ९०० रुपयांना मान्य असते म्हणूनच आपण वहीत नाव लिहितो.)
= बुक करतो.

वरच्या संवादात "आइडी आहे?" ऐवजी "दोघांचे आइडी आहेत?" विचारले असणार. जिथे सर्वांचे हवे असतात तिथे ते स्पष्ट विचारतात हा माझा अनुभव आहे.

रजिस्टरमद्ये नाव लिहायला तेव्हाच सांगतात जेव्हा आयडी तपासला “गेला असतो.”
तोवर रजिस्टर मध्ये एन्ट्री द्यायची आणि घ्यायची नसते.
हा कायदा आहे हे वाचलेलं.
इथे जर हॉटेलचालकाला दुसरी आयडी मिळाली नाही तर सरळ नाही सांगायचे ना..
आणि जर नुसते बोलणेच चालु होते तर इतका हंगामा करायची आवश्यकता न्हवती हॉटेल मॅनेजरला. त्याचा बिजनेस बुडला न्हवता त्या मिनिटात.
मालकाशी बोलुन सोडायला हरकत न्हवती. पण एकदमच हॉटेल वाल्यांनी गुंदागर्दी केली.

इथे परीचितांना भाषण देणारे वा झोडपणारे उगवलेत पण त्यांनी फुकट भाषण देणार्‍यांनी काय केले असते व किती कायदे पाळके असते त्यांनाच माहित.

झंपीणतै,
रागावू नै. तुम्हाला कोणी बोल लावले का ?
कायद्याची लिंक. सकरीनशॉट द्या

अहो साहेब त्या गाईडलाईन्स आहेत. आणि सर्व मुद्दे वाचा की. समजा तुम्ही एक हाटेलवाले आहात आणि तुम्हाला सरकारने सांगितले आहे बाबारे हा घे कागद गाईडलाईन्सचा आणि ध्यानात ठेव ह्याचे पालन झाले पाहिजे. त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही नियम काढाल ना ? हाटेलवाले ठरवणार कसे ईंप्लिमेंट करायचे ते.

तर असोच उगाच वेळ घालवला ईथे. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा.

<<<<समजा त्याने तुमच्याकडून पैसे घ्यायच्या आधीच तसेच वेटरला ऑर्डर बनवायला सांगायच्या आधीच "पेड"ची पावती तुम्हाला दिली आणि जर लगेचच तुम्ही म्हणालात कि नको आहे हि ऑर्डर. तेंव्हा जर तो तुम्हाला म्हणाला कि आता नाही नाकारता येत. आता पैसे भरावेच लागतील. तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? पैसे भराल का?>>>

आयला, कमाल आहे, पैसे देण्यापूर्वीच पेड अशी पावती दिली? मग झाले की, आता त्याला सांगा मी पैसे भरले, ही बघा पावती!!
काय करणार आहे तो? कोर्टात गेला तरी तुमच्याजवळ पेड ची पावती आहे. ती जपून ठेवा नि मुकाट्याने घरी जा.

तुम्ही कायम कोण काय म्हणाले, ते बरोबर का चूक वगैरे विचार करत बसता का? भांडत बसणार का? इतर उद्योग नाहीत?
अहो हे जग असेच असते, जमेल तसा त्यातून मार्ग काढून, काही ध्येय ठरवले असेल त्याच्या मागे धावायचे, फुटकळ गोष्टींकडे लक्ष देऊ नये.

मुख्य म्हणजे अत्यंत धक्कादायक अनुभव अजून बरेच येणार आहेत आयुष्यात, त्यासाठी तयारी करा मनाची. काय महत्वाचे नि काय नाही, याचा विचार करा.

अहो पति पत्नी पैकी कुणि बाहेर अनैतिक संबंध जोडले तरी "आणि काही गोष्टींवर फार विचार करू नका. आयुष्य सुंदर आहे." असा उपदेश कालच दुसर्‍या एका व्यक्तीला कुणितरी केला आहे त्याचा विचार करा.
मला माहित आहे हे सगळे समजायला नि त्याप्रमाणे वागायला बरीच वर्षे जावी लागतात, पण सतत प्रयत्न करीत रहाणे हे तर शक्य आहे ना?

काय करणार आहे तो? कोर्टात गेला तरी तुमच्याजवळ पेड ची पावती आहे. ती जपून ठेवा नि मुकाट्याने घरी जा.
Submitted by नन्द्या४३ on 5 November, 2018 - 18:50

==> अहो ते उदाहरण मी "मेरीच गिनो" यांच्या "4 November, 2018 - 23:35" या प्रतिसादासाठी दिलेले आहे. असो. पण तुमचा मुद्दा अगदी बरोबर. माझ्या बाबत मी तेच केलेय असे मी घाग्यात लिहिले आहे. पण जेंव्हा असे आपण करतो तेंव्हा नाईलाज होऊन हे लोक हातघाईवर येतात (कारण कोर्टात जाऊ शकत नाहीत. चूक त्यांची असते). आपली काहीही चुकी नसताना आपल्याला मात्र नाहक त्रास होतो. आय होप तुम्हाला आता माझा मुद्दा पोहोचला असेल.
--x--

अहो पति पत्नी पैकी कुणि बाहेर अनैतिक संबंध जोडले तरी "आणि काही गोष्टींवर फार विचार करू नका. आयुष्य सुंदर आहे." असा उपदेश कालच दुसर्‍या एका व्यक्तीला कुणितरी केला आहे त्याचा विचार करा.
Submitted by नन्द्या४३ on 5 November, 2018 - 18:50

==> मी माझ्या धाग्याखालीच एक Note कधीचीच लिहून ठेवली आहे. कृपया ती वाचावी Happy
--x--

ते बरोबर का चूक वगैरे विचार करत बसता का? भांडत बसणार का? इतर उद्योग नाहीत?
Submitted by नन्द्या४३ on 5 November, 2018 - 18:50

==> असे काही नाही. भांडत बसायचे नाही म्हणून तर निघून आलो न लगेच तिथून. आणि इतर उद्योग आहेत म्हणून तर या धाग्यावर मध्यंतरी कित्येक दिवस आलो नव्हतो. सध्या दिवाळी सुट्टी सुरु आहे ना म्हणून यायला जमत आहे. तुमचे मात्र अधूनमधून प्रतिसाद दिसत आहेत त्यबद्दल धन्यवाद. असो. Happy Diwali.

माझे राहू द्या हो, मी आपला उगीचच काहीतरीच लिहीत असतो. मला ओळखणारे लक्ष देत नाहीत त्याकडे.
कुणिहि जास्त लक्ष देऊच नये दुसरा काय करतो त्याकडे.
तुम्ही भारतात राहिला असतात ६०-६५ वर्षांपूर्वी, किंवा लोकलने प्रवास केला असता मुंबईत तर आजूबाजूला किती घाण आहे, लोक उगीचच कसे भांडायला उठतात ते सर्व अनुभवले असते.
विशेषतः मायबोलीवर कोण काय लिहीतो याकडे मुळीच लक्ष देऊ नये - इथून बाहेर कुठ्ठे जात नाही इथले लिखाण. बरंच आहे की नाही ते.

अमेरिकेत हॉटेलने सगळीच्या सगळी गेस्ट लिस्ट ऑथॉरिटींबरोबर (या केस मध्ये आईस) शेअर केल्याने काय होते ते बघा!
https://www.npr.org/2018/11/06/664737581/motel-6-agrees-to-pay-millions-...

ते सगळे अमेरिकेत हो, इथले कायदे निराळे नि भारतात कायदा असला काय नसला काय, कोण एव्हढे लक्ष देतो, जो तो आपला मनमानी करतो.
धाग्याचा विषयच बघा - कुणि म्हणतात कायद्याप्रमाणे बरोबर आहे, कुणि म्हणतात नाही. त्यांना कायद्याच्या खाचाखोचा माहित नसल्या तरी त्यांना जसे वाटेल तसे व्हायला पाहिजे. शेवटी काय होते त्याचा कायद्याशी संबंध नाही. जो दादागिरी करेल तो बरोबर!

मालक "तुमचे काही संबंध आहेत का?" विचारेल अशी उगाच भीती पडली का?
तसं काही विचारत नाहीत॥
खोल्या भरल्या पाहिजेत,इन्कम झाला पाहिजे एवढेच ते बघतात. पोलीस येऊन तपासतात ,त्यांनी सांगितलेली कागदं तेवढी घेतात.
आधारवगैरे झेरॅाक्स देताना मी त्यावर अमुक हॅाटेलसाठी असं लिहिलं तर मालक म्हणाला जरूर नाही, आम्ही त्यावर हॅाटेलचा स्टँप मारतो. दाखवले त्याने .तरी आपण लिहायचंच.
जेव्हा आधार नव्हतं, इतर आइडी चालायचे तेव्हा कोटा'मध्ये मालकाने फोनबिलच घेतले. तो म्हणाला हेच कामाचं आहे. तुम्ही लिहिलेला पत्ता, नाव, फोन तिन्ही त्यावर असतं. सॅाल्लीड पुरावा.

अमेरिकेतले रुल्स तशेच्या तशे भारतात कसे लागु होतील?
आपण म्हणतो का की भारतात रस्त्यात फटाके वाजवलेले चालतात म्हणून मी अमेरिकेत पण वाजवणार? Uhoh उगाच काय !

मला हे फार पुर्वीच लिहायचं होतं पण मधेच विषयांतर झाल्याने गप्प बसले. तर :-
१) भारतात असाल आणि कोणी ओळखपत्र न मागता हॉटेल मधे रूम देत असेल तर घेऊ नका, कोणास ठाऊक तिथे काय काय धंदे होत असतील.नविन लग्न झालेल्या जोडप्यांच्या नको त्या क्लिप बनवल्याची उदाहरणं ऐकली असतीलच आपण, बाकी ते अपहरण करुन खुन करणं वगैरे सध्या पुर्तं बाजुला ठेवुयात कारण त्याचा आपल्याशी डायरेक्ट संबंध नसतो, पण ते ही प्रकार आहेच विचार करण्याजोगे.
२) तुमच्यात हॉटेल मालकाशी नियम दाखवुन हुज्ज्त घालण्याची धम्मक आणि तयारी असेल तर खुषाल घाला आणि त्याला कोर्टात खेचुन तुम्हाला काय म्हणायचं आहे ते सिद्ध करा
३) क्रमांक २ प्रमाणे करण्या इतका वेळ आणि ताकद नसेल तर गपचुप तो मागतोय त्या डॉक्युमेंट्स ची कॉपी त्यावर सही करुन , नोट टाकून (केवळ हॉटेल बूकिंग करता सबमिट करत आहे वगैरे आशयाची) देऊन टाका

वडापावच्या तीव्र अपयशानंतर मी साखळी हॉटेल्स च्या धंद्यात लाखाचे बारा हजार करणार होतो. पण हा अनुभव वाचून बेत रहीत केला. बारा हजार पण वाचले.

आमचे आवडते लेखक परिचित सर बऱ्याच दिवसात दिसले नाहीत. सर्वांच्या सोयीसाठी त्यांचा १ धागा वर काढत आहे.

Pages