लॉज बुकिंगचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव

Submitted by Parichit on 22 October, 2018 - 05:21

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.

एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.

"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.

"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले

"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला

"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम

"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"

"मी आणि माझी बायको"

"कुठे आहेत त्या?"

"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"

"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.

मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.

"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.

कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.

"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.

"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.

"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"

"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.

"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.

मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.

"काय झाले?" त्याने विचारले.

"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.

"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.

त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"

"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.

"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.

"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो

"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.

"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.

मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?

संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.

मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.

४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.

बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.

ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिपिन, प्रतिसाद पटले/ आवडले. हॉटेलचे नियमही योग्यच आहेत.
हा प्रसंग तुमच्याबाबत घडलाय त्यामुळे तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे पण त्या माणसाच्या दृष्टिने विचार करा.
प्रत्येक हॉटेलमधे सगळ्यांची ओळखपत्र द्यावीच लागतात.

मे महिन्यात सोलापुरात आम्हाला फक्त ४ तास झोपण्यासाठी रूम हवी होती, त्या हॉटेलमधे खोली अवेलेबल नव्हती पण मॅनेजर म्हणाला इथे उद्या ७ वाजता फॅमेली येणार आहे. तुम्ही त्या आधी रूम सोडणार असाल तर देतो..
मग त्याने आमची ओळखपत्रं ठेवुन घेअली, त्याची कॉपी स्वतःजवळ ठेवली (बाबांनी कारण लिहुन त्यावर सही केली) फक्त आम्हाला पैसे भरल्याची रिसिट मिळाली नाही, एवढंच!

चांगले मुद्दे आहेत या चर्चेत
माझं पेटीएम बंद झालं.केवायसी पृफ म्हणून वोटर आयडी अपलोड केलं होतं.नंतर प्रत्यक्ष खात्री करायला येणारा बॉय म्हणाला की आधार द्या, माझ्या अनुभवावरून सांगतो वोटर आयडी रिजेक्ट होईल.त्याला म्हटलं पे टी एम कोर्ट पेक्षा मोठं आहे का,कोर्ट ने आधार सक्तीचे नाही सांगीतले आहे.तो म्हणाला की हे माझ्या हातात नाही पण हे नक्की रिजेक्ट होईल.मग म्हटलं जाऊदे.पे टी एम फार लागत नाही.ऍप उडवून टाकले.

भारतात एकटे हिंडताना सुद्धा असे अनुभव येतात विशेषतः एकट्याने टुरिस्ट म्हणून टिपिकल टुरिस्ट ठिकाणी. मुंबईत एकट्याने हॉटेलात राहिलात तर काही फरक पडत नाही. मात्र हंपी असो वा तवांग अश्या ठिकाणी एकट्याने खोली मागणार्‍या प्रवाशाकडे अधिक चौकशी केलीच जाते असा माझा अनुभव आहे. पण साधारण काम काय करतो, कुठे करतो अशा चौकशातून अंदाज घेतात हॉटेल मॅनेजर असा माझा अनुभव आहे. पण जर मॅनेजरला लक्षात आले की काही गौडगंबाल नाहिये की ते आनंदाने देतात खोली.
तवांग, सांगला-कल्पा, अश्या सीमाभागात बरेचदा आर्मी/सीमादलांकडून पण चौकशी होते - इन्फॉर्मलच असते पण सहज बोलता बोलता माहिती काढतात.

एकट्याने हिंडताना येणारा अजून एक अनुभव म्हणजे खोली घेतली की वेटर लोकं येउन 'नको' त्या गोष्टी हव्या आहेत का ते कधी आडून तर कधी प्रत्यक्ष विचारतात Proud

टवणेसर मला तरी तुम्ही म्हणता तसा अनुभव क्वचितच कधी आलाय.

छोटे हॉटेल असेल तर लोक रूमबॉयला बाटली, सीगरेटा आणायला पिटाळतात. तेव्हा ते चकरा कमी व्हाव्यात म्हणून चौकशी करतात, एका रूम मधून कोणी सांगितले की बाकी रूम्स मध्ये पण विचारतात. या लोकांकडून त्यांना चांगली टिप मिळते.

तसेच अशा छोट्या हॉटेल्स मध्ये सकाळ पासून एक एक सुरू होतो, बेड टी वाला, पॉलिश वाला, धोबी, टॅक्सी वाला सगळे न बोलावता हजेरी लावून जातात व उशिरापर्यंत झोपण्याचे सुख हिरावून घेतात.

तसेच अशा छोट्या हॉटेल्स मध्ये सकाळ पासून एक एक सुरू होतो, बेड टी वाला, पॉलिश वाला, धोबी, टॅक्सी वाला सगळे न बोलावता हजेरी लावून जातात व उशिरापर्यंत झोपण्याचे सुख हिरावून घेतात.
>>>
डू नॉट डिस्टर्बची पाटी लावली की असं काही होत नाही

बरं आता गंमत अशी आहे की तुम्ही टुरिस्ट कंपने सोबत गेलात तर तिथे कोणाला तुम्ही विवाहित आहात, अविवाहित अहात, सोबत रूम हवीये, वेगळी हवीये वगैरे विचारत बसत नाहीत फक्त तुमचा आयडी प्रूफ मागतात कारण तुमच्या कृत्यांची जबाबदारी त्या कंपनीची असते

हो काय? जाउ देत. तुम्ही तुमचा कागद आणि पेन घेउन जात जा आणि ' हम सो रहे है, उठाओ मत' असं लिहुन बाहेर लटकवत जा म्हणजे झालं Proud

यू नो व्हॉट?
उत्तरेत, रात्रीची बस ढाब्याला थांबली, आणि आपल्याला झोपायचंय, नाही प्यायचा चहा, म्हणून झोपलोय. तर ढाब्याची पोरं येऊन खिडकी खाली धाड धाड वाजवतात, कर्कश्श ओरडतात "अरे उठो ना कुछ चाय नाश्ता लो ना!' शेवटी बहुतेक लोकांची झोप उघडते आणि उतरताही मग चहा तरी प्यायला.
हे लोक काय जुमानणार त्या डू नॉट डिस्टर्ब पाट्यांना! Proud

डू नॉट डिस्टर्बची पाटी लावली की असं काही होत नाही...
पण 'Do Not Disturb' चा वेगळाच अर्थ त्यांनी काढला तर Proud Proud :P!!!

उत्तरेत, रात्रीची बस ढाब्याला थांबली, .....
उत्तरेतल्या लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायलाच आवडते का? मी https://www.maayboli.com/node/64119 या धाग्यात वर्णन केलेल्या त्रास देणाऱ्या व्यक्तीही दिल्लीच्याच आहेत!
(अवांतराबद्दल क्षमस्व!)

मानव तुम्ही म्हणता ते खरे आहे शहरात किंवा टुरिझम नसलेल्या ठिकाणी. तसेच नेहेमी कामासाठी हिंडणार्‍या लोकांची एक ठराविक प्रकारची हॉटेल असतात - एम.आर., सेल्समध्ये हिंडणारे वगैरे.

मी दिलेला अनुभव हा पर्यटनासाठी फक्त जिथे लोकं येतात अश्या ठिकाणचे आहेत. किमान मला तरी हमखास आले आहेत.

"खोली देता का खोली" / हॅाटेल रुम हवी आहे? इथे माहिती मिळेल

हॅाटेल रुम मिळण्यातल्या अडचणींची चर्चा.
हा धागा काढा कुणी

"कपल्सना एंट्री देताना ते मॅरीड आहेत की नाहीत याची शहानिशा करणे ही त्या त्या आस्थापनेची "हाऊस पॉलिसी" असू शकते. व ते संपूर्णपणे त्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे; कायदेशीरही आहे' - असं married status based discrimination, कायदेशीर आहे? नक्की माहीत नाही, पण unconstitutional वाटतं.

unconstitutional >>> ??
Marital status (वैवाहिक स्थिती) Protected class कधीपासून झाला?
होय, marital status based discrimination कायदेशीर आहे.

"होय, marital status based discrimination कायदेशीर आहे." - मला माहीत नव्हतं. धन्यवाद. म्हणजे marital status वरून नोकरी
च्या संधी सुद्धा नाकारता येत असतील.

म्हणजे marital status वरून नोकरी
च्या संधी सुद्धा नाकारता येत असतील.
<<
अगदी रीसेंटली आठवतंय तोपर्यंत हवाई सुंदरी लोकांना लग्न केल्यास जॉब सोडावा लागत असे. आजकाल बहुतेक ग्राउंड जॉब देऊन डाउनग्रेड करतात इतपत बदल झाला आहे.

हॉटेल ही त्यांची प्रॉपर्टी(स्वतःच्या घरासारखी) असून तिथे (पेइंग) गेस्ट म्हणून कुणाला ठेवावे, ते मालकाच्या मर्जीवर अवलंबून असणे व तिथे नोकरी देण्यासाठी वैवाहिक स्थितीची शाहनिशा करणे यात तुलना योग्य वाटत नाही. लॉफुल, लॉजिकल व एथिकल यांत फरक आहे.

लिव ईन रिलेशनशिपला कायद्याने मान्यता आहे की कसे?
अशा रिलेशन्शिपमधल्या लोकांना त्याचे रजिस्ट्रेशन करता येते का?
त्यांंना हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूम्स घेणे बंधनकारक आहे का?
रूम वेगवेगळ्य घ्यायला लावल्या तरी ज्या कारणासाठी त्या वेगवेगळ्य घ्यायला लावल्या त्याचे निराकरण होते का?

हाब,
लिव्ह इन ला कायद्याने बंदी नाही.

संपूर्ण विवाहसंस्था ही 'प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूशन' अर्थात, बापाची/आईची स्थावर्/जंगम मालमत्ता कोणत्या मुला/मुलीकडे जाईल याच्या विवादांना अंत मिळावा यासाठी मूलतः अस्तित्वात आलेली आहे. जोडीदार 'पटवण्यात' कमी सक्षम नरांना जेनेटिक ट्रान्समिशन करता यावे अशी सोय होणे, हा या संस्थेचा मायनर साईड इफेक्ट आहे, पण तो अशा नरांची संख्या जास्त असल्याने अल्टिमेटली एकपत्नीव्रत वगैरे हंबग तयार करून अमलात आणण्याचे प्रकरण गेल्या काही शतकांपासून घडवून आणले गेले आहे. गाथासप्तशतीतही विवाहित स्त्रियांनी हव्या त्या परक्याला अंतःपुरात आमंत्रित केल्याचे वगैरे वर्णन आहे. हार्डली ६-७ शतकांपूर्वीची बाब. पण हा या धाग्याचा विषय नाही.

विषय ही कोटीही नाही.

अ‍ॅट द सेम टाईम, मी माझ्या घरात पाहुणा म्हणून कुणास प्रवेश द्यावा वा न द्यावा, यावर माझे संपूर्ण नियंत्रण असते. अमेरिकेत रिसेंटली रेस्टॉरंटमधून एका मान्यवर कॉन्झर्वेटिव्ह व्यक्तीस हाकलून दिल्याची घटना मला आठवते. त्यात वैवाहिक स्थितीचा संबंध नसला, तरी त्या एस्टॅब्लिशमेंटमधे या डिस्क्रिमिनेशनला परवानगी आहे.

रेशियल /जात्/धर्म इ. कारणांसाठी डीस्क्रिमिनेट करता येणार नाही असा *कायदा* आहे.

असो.

बर्‍याचशा आस्थापनांत हॉटेले, सिनेमागृहे , लॉजेस मध्ये प्रवेश हा काही मूलभूत अधिकार नाही. कोणीतरी कॉन्स्टिट्युशनचा विषयच काढला आहे म्हणून . फक्त आरारा(इब्ल्या नाव बदल आता. इब्लू २ घेतले तरी चालेल सिनेमातल्या वेषांतरासारखे शेंबड्या पोरानाही माहीत आहे आरारा कोण ते Happy ) यानी म्हटल्या प्रमाणे जेंडर /रेस्/कास्ट या मुद्द्यावर प्रवेश नाकारता येणार नाही. बर्‍याच ठिकाणी प्रवेश देण्या चा हक्क व्यवस्थापन राखून ठेवते व तसे डिस्क्लेमरही काही ठिकाणी असते. कायदा नसला तरी बर्‍याचदा पोलीसांकडून सर्क्युलर्स , नोटिफिकेशन्स हॉटेल्सना इशू केली जातात. आता घर भाड्याने दिल्यास त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी लागते . आता हे कुठे घटनेत आहे. प्र्त्येक गोष्ट घटनेत कशी येइल. लॉजेस हॉटेले हे गुन्हेगारांचेही राहण्याची ठिकाणे आहेत. संशयास्पद व्यक्तीना रूम न देणे हा हॉटेल व्यवस्थापनाचा अधिकार आहे आणि तो असलाच पाहिजे. आपण संशयस्पद नाही आहोत हे आता ठिकठिकाणी सिद्ध करावेच लागणार आहे. नाइलाज आहे. आपन कधीतरी हॉटेलात जातो . त्याना दिवसभर शेकडो तर्हेतर्हेच्या लोकाना तोंड द्यावे लागते. त्यामुळे डॉ़युमेंट्स चा आग्रह्/नियम वाढत आहेत. सदर प्रकरणात त्या नोकराच्या वागणुकीमुळे प्रश्न निर्माण झाले आहेत.अन्यथा पत्नीच्या ओळख पुराव्यात काही चूक नाही.
काही गोष्टी आता अंगी बाणवून घ्याव्या लागतील. अधी कधी गैर्समजातून तक्रारी होतात. मी बर्‍याचा ट्रिप अडवायजर वर्रचे हॉटेल रिव्यू (कारण नसताना ) वाचत असतो.जगात ल्या १ नम्बर रेटिण्ग असलेल्या इन्डोनेशियन रिसॉर्ट बाबतही निगेटिव रिव्यू आहेत. त्यात एकः एका हनीमून कपलला कोणीतरी रूम गिफ्ट म्हणून क्रेडिट कार्ड वरून बुक करून दिली. त्या क्रेडिट कार्डवर्रोन पैसे काढून घेण्यासाठी हॉटेलला ऑथरायझेशन देणे आवश्यक होते ते त्या बुक करणार्‍या व्यक्तीने केले नव्हते. म्हणून रिसॉर्टचा स्टाफ या जोडप्याला सारखा फोन वरून सांगत होते. त्याचा त्याना "डिस्टर्ब" झाला . म्हणून रिसॉर्ट ची त्यानी रिव्यूत खरडपटी काढली.तेव्हा उत्तरात रिसॉर्ट्ने स्पष्ट केले की क्रेडिट कार्ड ऑथराझेशन करणे जगभराची प्रॅक्टिस आहे. नॉर्मली ती चेक इन करताना केले जाते . या केसमध्य थर्ड पार्टीने गिफ्ट म्हणून बुक केल्याने बुक करणारी व्यक्ती तिथे नव्हती. त्यामुळे हॉतेलला आड्वान्स अथवा इतर पेमेन्ट काढता येत नव्हते.
दुसरे , बहुधा लंकावी की कुठल्या निसर्गात असलेल्या आयलंड रिसॉर्ट मध्ये किडे,डास, कोळी दिसल्याची तक्रार होती. हॉतेल ने स्प्ष्ट केलेकी हे शहरातले बिझिनेस हॉटेल नाही.झाडाझुडपातला रिसॉर्ट आहे त्यामुळे पूर्ण पणे सनिटाइज करणे शक्य नाहे हे समजून घ्यावे. तात्पर्यः काही गोष्टी बाबत गैरसमज होउ शकतात.

वरचे ढाब्याचे उदाहरण वाचून गम्मत वाटली. साधारण पणे खेड्यापाड्यात औपचारिक्पणा , किण्वा प्रायवसीच्या कल्पना ,स्वतःची 'स्पेस" अशी काही भानगड नसते. खेड्यातल्या घरांचे दरवाजे सताड उघडे असतात आणि कोणीही बिनदिक्कतपणे घरात शिरते. कॉलबेल वगैरे अनावश्यक खर्च तिथे नसतात.आणि कॉलबेलचे बिलही तिथे पुणे ३० प्रमाणे येत नाही ! आमच्या गावतले हॉटेल्वाले गिर्हाईकांचा गल्ल्यावर बसून जो उद्धार करतात तो ऐकणीय असतो. झोपलेल्या मित्रांचे पांघरून ओढून उठवणे ई.एकूण टॉलरन्स प्रचंड सगळ्यांचाच . त्यामुळे ढाब्यावर तुम्हाला ' हक्काने ' चहा पाजणे हे फार ऑब्व्हिअस आहे Happy
माझ्या लहानपणी गोसावी समाजाचे पण गृहस्थी असलेले एक काका आमच्या घरी नेहमी येत . कुटुंब स्नेही होते. ते तर सरळ आले की स्वतःच स्टोव पेटवून चहा करून घेत. कधी कधी आम्हालाहे देत , मागितला तर !! Happy Happy

विबासं हा कायद्याने गुन्हा नसला तरी अजूनही या देशात नैतिकदृष्ट्या गुन्हाच समजला जातो.
त्यामुळे असे संबंध ठेवणारा ते लपूनछपूनच ठेवणार.
आणि त्यामुळे हे ब्लॅकमेलिंगचे धंदे चालणारच ..

माझ्या प्रश्नाचं उत्तर आरारांनी दिलंय.

"आता हे कुठे घटनेत आहे. प्र्त्येक गोष्ट घटनेत कशी येइल." - घटनेत असणं आणी unconstitutional असणं ह्यात फरक आहे बाबा. घटनेनं दिलेल्या मुलभूत अधिकाराची पायमल्ली होतील असे नियम बेकायदेशीर ठरतात. मला नक्की माहीत नाही, पण तुम्ही म्हणता तशा काही घटनाबाह्य कृत्य असतील, तर ती न्यायालयात बेकायदेशीर ठरतील. असो. तो ह्या धाग्याचा विषय नाही.

अजुन बर्‍याच गमतीजमती आपल्या देशात चालतात. स्वतःच्याच घरात शुटींग करायला पोलिस परवानगी देत नाहीत.

https://www.quora.com/Why-was-Shahrukh-Khan-denied-permission-to-shoot-i...

अनेक कंपन्या ऑनलाईन इंन्शुरअन्स देतात. आमच्या एका आदिवासी नोकराचा असाच एका कंपनीतून इन्शुअरन्स काढायचा प्रयत्न केला. नॉमिनी म्हणून वडिलांचे वय आणि जन्मतारीख टाकली तर रिजेक्ट करण्यात आले. त्या पोराचा बाप त्याच्यापेक्षा फक्त चौदा वर्षांनी मोठा आहे आणि इन्शुअरन्स कंपनीच्या मते "Father should be 18 years older than self and spouse". म्हणजे एखाद्याने स्वतःच्या मुलाला अठराव्या वर्षाच्या आधी जन्म दिला तर तो त्याच्या मुलाचा नॉमिनी होऊ शकत नाही किंवा त्याच्या मुलाने स्वतःच्या वयापेक्षा फार मोठी बायको केली (जसे सैफ अली खान + १३ = अमृता किंवा फ्रान्सचे अध्यक्ष +२५ = अध्यक्षीणबाई) तर तो त्या जोडप्याचा इन्शुअरन्स नॉमिनी होऊ शकत नाही.

तसेच इन्शुअरन्समध्ये तुम्ही स्वतःचे जेंडर मेल टाकले आणि स्पॉऊजचे जेंडरही मेल टाकले तर इंन्शुअरन्स कंपनी सेम जेन्डर स्पऑउज नॉट अलावूड म्हणून तेही रिजेक्ट करते. म्हणजे कलम ३७७ रद्द होऊनही त्याचा इन्शुअरन्स घेताना फायदा होणार नाहीच.

कितीतरी गोष्टींवर रिस्ट्रीक्शन्स आहेत. प्रत्येक वेळी घटनेत कुठे लिहिलंय म्हणून विचारता येत नाही.

बिपीनजी तुम्ही दिलेली उदाहरणे ते सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांनी लोकांच्या त्रुटी टाळता याव्यात म्हणून केलेल्या योजना आहेत, ज्या काही केसेस मध्ये समस्या निर्माण करीत आहेत. निदर्शनास आणून दिल्यास ते दुरुस्ती करतील.

प्रत्येक वेळी घटनेत कुठे लिहिलंय म्हणून विचारता येत नाही. हे मात्र खरे.

आताच एका अतरंगी कंपनी चा फॉर्म भरला.त्यात इन्श्युरन्स डिपेंडंट म्हणून बाबा ऍड केल्याशिवाय आई आणि पाहिले सासरा ऍड केल्याशिवाय सासू ऍड करता येत नाही ☺️☺️☺️
आई आणि सासू ऍड केली तर 'मदर इन लॉ फादर इन लॉ किंवा मदर आणि फादर अशीच एन्ट्री पाहिजे, मदर इन लॉ कॅनॉट बी अडेड विथ मदर' असा मेसेज आला.म्हणजे आता स्वर्गवासी बाबा आणि स्वर्गवासी सासरे यांनाही डिपेंडंट बनावं लागेल.

बाबा ऍड करून मग आई ऍड केल्यावर बाबा डिलीट केल्यावर काय होतं बघा. काही ठिकाणी अशा ट्रिका चालून जातात.

>> तुम्ही दिलेली उदाहरणे ते सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांनी लोकांच्या त्रुटी टाळता याव्यात म्हणून केलेल्या योजना आहेत, <<
बिझ्नेस रुल्/रिक्वायरमेंट असल्याशिवाय सॉफ्टवेर वाले वॅलिडेशन चेक्स एन्फोर्स करतात काय? किंवा अशा कंपन्यांमध्ये सॉफ्टवेर टेस्टिंग हा प्रकार असतो कि नाहि?..

म्हणजे तुम्हाला दोघींपैकी एकीलाच ऍड करता येईल असं बहुतेक. वडील आणि सासरे अश्या दोघांना ऍड करायचं तरी बहुतेक करता येणार नाही.

बिझ्नेस रुल्/रिक्वायरमेंट असल्याशिवाय सॉफ्टवेर वाले वॅलिडेशन चेक्स एन्फोर्स करतात काय? किंवा अशा कंपन्यांमध्ये सॉफ्टवेर टेस्टिंग हा प्रकार असतो कि नाहि?..>>>
यावर वरचीच मी_अनु यांची पोस्ट वाचा.

Pages