लॉज बुकिंगचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव

Submitted by Parichit on 22 October, 2018 - 05:21

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.

एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.

"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.

"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले

"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला

"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम

"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"

"मी आणि माझी बायको"

"कुठे आहेत त्या?"

"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"

"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.

मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.

"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.

कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.

"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.

"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.

"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"

"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.

"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.

मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.

"काय झाले?" त्याने विचारले.

"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.

"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.

त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"

"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.

"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.

"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो

"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.

"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.

मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?

संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.

मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.

४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.

बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.

ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>यावर वरचीच मी_अनु यांची पोस्ट वाचा.<<
माझ्या कामेंटमधला "किंवा" च्या पुढचा भाग तुम्ही सोयिस्कररीत्या गाळलेला आहे...

बाकि त्या वरच्या उदाहरणातलं बाबा/साबु शिवाय आई/साबा असणं, अथवा त्या दोघांशिवाय तुमचं या जगात असणं हे इल्लॉजिकल आहे (यावर दुमत नसावं). ते हयात असणे/नसणे हा पुढचा प्रश्न. आणि त्यांची एंट्रि मँडेटोरी का आहे हा बिझनेस रुलचा भाग असु शकतो (ते हयात नसले तरीहि)...

ह्या उदाहरणात दिलेल्या केसेस खरच त्रासदायक आहेत. कोंबडं आधी की अंडं असा प्रश्न आहे. सिस्टीम्स किचकट आणी अविश्वास दाखवणार्या म्हणून लोकं लूप-होल्स शोधतात, की लोकं फाटे फोडतात म्हणून सिस्टीम्स इतक्या किचकट आणी कस्टमर वर अविश्वास दाखवणार्या. Uhoh

त्यांनी लिहिलंय परेंट आणि इन लॉ दोन्ही अलाउड म्हणून.
फादर आणि फादरलॉ टाकून डिलीट चा मार्ग डोक्यात आला होता.अजून केला नाही.
सॉफ्टवेअर टेस्टिंग, स्पेक्स हे कंपनी टू कंपनी वेगळे पडते.एका फॉर्म वर प्रायमरी अप्लिकंट जबरदस्ती नॉन एडिटेबल मेलच होता.(म्हणजे मी नोकरी करून त्या फॉर्म मध्ये मी प्रायमरी असेन तर माझं जेंडर मेल आणि नॉमिनी नवऱ्याचं फिमेल.) या थर्ड पार्टी कंपनी असतात.सॉफ्टवेअर खूप जुनं असतं.त्याचे स्पेक प्राचीन काळी बनलेले असतात.त्यानंतर अनेक डेव्हलपर सोडून गेल्याने वर्किंग कोड मध्ये मोठी उलथापालथ कोणी करायला जात नाही.
अजून एक धडा म्हणजे क्रोम मध्ये फॉर्म्स उघडा.डेव्हलपर ने मूळ प्रोग्रामिंग क्रोम वर मुख्यतः केलेले असते आणि जावा स्क्रिप्ट प्लगीन इंटरनेट एक्सप्लोरर वर चालत नाहीत.म्हणजे फॉर्म असेल पण ओके बटन नाही, ड्रॉप डाऊन उघडणार नाहीत असे.
सेव्ह करत राहा, क्रोम सर्वात आधी उघडा, वेळ प्रसंगी काहीच चालले नाही तर फॉर्म ऑपेरा ब्राऊजर वर चालवा.बॅक बटन दाबण्यापूर्वी 100 अंक मोजून विचार करा ☺️☺️☺️

बऱ्याच त्रुटी असतात, आणि सॉफ्टवेअर नीट टेस्ट केलं नाहीय हे जाणवते सुद्धा. Support ला contact केल्यावर it is known issue we are working on it असा रिस्पॉन्सही येतो.

Submitted by mi_anu on 25 October, 2018 - 19:17 >>>>>. अनु, ही छान पोस्ट आहे. नॉन टेक्निकल एवढा विचार करत नाही. आम्ही फॉर्म भरताना चिडचिड करून इन्शुरन्स कंपनीला चार शिव्या घालून मोकळे होतो

.बॅक बटन दाबण्यापूर्वी 100 अंक मोजून विचार करा
<<
लोल
पूर्वी माबोवर काही गडबड झाली तर ctrl+z किंवा बॅकस्पेस मारून पूर्वीच्या पानावरचे सगळे लिहिलेले अगदी प्रतिसाद विंडोतलेही मिळून जाई.

खासकर लॅपीवर. चुकून त्या टचपॅडवर बोटं हलून अख्खा प्रतिसाद उडतो अन मग तो काळाच्या उदरात गडप होतो...

***

@ रॉहू,

त्या इब्लिस नंतर कित्येक अवतार झाले, पण मी कोण ते कधीच लपून राहिलेले नाही, ठेवलेले वा ठेवण्याचा प्रयत्नही केलेला नाही. अन तरीही मी कोण ते गुपित आहे. Wink आहे की नाय गम्मत? Lol

अन हो. गेले ऑल्मोस्ट पानभर प्रतिसाद 'सॉफ्टवेर ग्लिचेस' अन एरर टेस्टिंग वगैरे बद्दल आहेत. मूळ धागाविषयाशी कायपण संबंध नाय बर्का.

अन हो. गेले ऑल्मोस्ट पानभर प्रतिसाद 'सॉफ्टवेर ग्लिचेस' अन एरर टेस्टिंग वगैरे बद्दल आहेत. मूळ धागाविषयाशी कायपण संबंध नाय बर्का.
Submitted by आ.रा.रा. on 25 October, 2018 - 21:49

मला वाटतं हे माझ्या प्रतिसादानंतर सुरु झालं असावं.

असो.

तसंही धाग्याच्या शीर्षकातील

रद्द झालेले ४९७ वे कलम आणि लॉज बुकिंगचा अत्यंत धक्कादायक अनुभव

ठळक केलेल्या शब्दांशी धाग्यातील मजकुराचा फारसा काही संबंध नाही. आता

रद्द झालेले ४९७ वे कलम आणि सुखद अनुभव

या विषयावरचे प्रतिसाद वाचायला आवडतील.

>>रद्द झालेले ४९७ वे कलम आणि लॉज बुकिंगचा अत्यंत धक्कादायक अनुभव
ठळक केलेल्या शब्दांशी धाग्यातील मजकुराचा फारसा काही संबंध नाही. >> अगदी अगदी. कलम अ‍ॅडल्ट्रीवर होते, लेखक महोदयांनी त्याचा बुकिंगशी जोडलेला संबंध, पत्नी खरेदीला गेल्येय तर ४९७ चा काय संबंध असं वाटून गेलेलं.

काल मी पण लांडगेपुरात होतो,
कर्ण पत्नी च्या नावाच्या हॉटेल रजिस्टर मध्ये एन्ट्री केल्यावर त्याने माझ्या कडे id प्रूफ मागीतलाच नाही,

अशा रीतीने त्याच गावात एक सुखद अनुभव येऊन वर्तुळ पूर्ण झाले,
असो.....

कर्णपत्नीच्या नावाचे हॉटेल म्हणजे वृषाली का सुप्रिया?
कर्णाच्या याच दोन स्त्रिया होत्या का आणखीन कोणी तिसरीपण होती?

तुम्ही आधी declaration कुठे दिलं होतं की काही झालं तरी हॉटेलच नांव सांगणार नाही Happy

४९७ धाग्यातून आणि शिर्षकातून गायब झाले आहे पण मला वाटते मूळ मुद्दा तोच होता:
एकमेकांसोबत लग्न न झालेल्याना (मग ते विवाहपूर्व असतील किंवा विवाहबाह्य असतील) सेक्स करण्यासाठी जागेची अनुपलब्धता.

काही वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन दिनाच्या दिवशी काही संस्कृतीरक्षकांनी एका लॉजमधे घुसून जोडप्याना मारहाण करत बाहेर काढलं होतं. तेव्हा माबोवर चर्चा झाली होती का? जोडपी x संस्कृतीरक्षक या दोघांखेरीज जी तिसरी पार्टी आहे लॉज/हॉटेल मालक त्यांचा दृष्टिकोन तेव्हा विचारात घेतला गेला होता का?

===
जर धागालेखकाने ४९७, लफडी वगैरे न लिहिता "मी माझ्या प्रेयसीसोबत/ला भेटायला कोल्हापूरला गेलो होतो. आम्हाला लॉजमधे रूम मिळाली नाही कारण तिथले लोक मॅरेज सर्टिफिकेट मागत होते" असे लिहिले असते तर आपला काय स्टँड असता? (PS दोघांची वैवाहिक स्थिती मेन्शन केली नाहीय)

===
हॉटेल ही खाजगी मालमत्ता आहे आणि 'कोणाला प्रवेश द्यायचा याचे हक्क व्यवस्थापक ठरवणार' हे मान्य आहेच पण मग मॅक्डीच्या बाहेर घुटमळणाऱ्या भिकारी मुलीला एक चांगल्या घरातली मुलगी आतमधे नेऊन खाऊ घालू इच्छित असेल आणि सिक्युरिटीने दोघांना प्रवेश नाकारला तर आपला स्टँड काय असतो?

{हॉटेल ही खाजगी मालमत्ता आहे आणि 'कोणाला प्रवेश द्यायचा याचे हक्क व्यवस्थापक ठरवणार'}
माझ्या वाचनात जेवढं आलंय त्यावरून हॉटेलांना प्रवेश नाकारण्यात वगैरे रस नसावा.
अटी लागू ..ओळखपत्र हवं, इ. ..
एकमेकांंचे नवराबायको नसलेले दोन स्त्रीपुरुष आपली ओळख पटवून एक खोली बुक करत असतील, तर त्यांनी आक्षेप घेतलग असताच का?

फक्त स्वतःची बाजू सेफ ठेवणं एवढाच उद्देश असावा.
काही वर्षांपूर्वु 'सातच्यख आत घरात' नावाचा एक लेख वाचलेला. त्यात लहान नगरांत शाळकरी मुलंमुली दिवसा लॉजच्या खोल्या बुक करीत असल्याचे चित्र रंगवले होते.

मूळ लेखातल्या आणि काही प्रतिसादांतल्या या प्रवेश नाकारण्याच्या मुद्द्याला धरून आता कलम ३७७ रद्द झाले असले तरी दो पुरुषांनाही एका खोलीत एका वेळी थांबू द्यायला नको.
मुळात कलम ४९७ रद्द झाल्याने हॉटेल / लॉज यांनी क्रिमिनल act ला वाव देण्याचा मुद्दा निकालात निघालाय.

कोल्हापूर मध्ये एक कार्यक्रम होता.त्यात एक प्रसिद्ध कवी बोलावले होते.ते आणि त्यांची मुलीच्या वयाची सेक्रेटरी(का लेखनिक) एका डबल रूम मध्ये राहिले होते. (हे आपल्या ओळखीच्या पैकी कोणीही नाहीत.भलते समज करून घेऊ नका.)आम्ही बोलावले होते.त्यांना भेटायला गेल्यावर थोडा मेंटल कल्चरल शॉक लागला.पण नंतर नन ऑफ अवर बिझनेस म्हणून सोडून दिले.(कदाचित काही आर्थिक गणितंही असतील.एक रूम बुक करून टोटल प्रवास खर्च वाचवून जास्त पैसे मिळवणे असे काही.लॉज चे पैसे आम्ही दिले होते का वगैरे व्यवहार मी डायरेक्ट इंव्हॉल्व नसल्याने माहीत झाले नाहीत.

> एकमेकांंचे नवराबायको नसलेले दोन स्त्रीपुरुष आपली ओळख पटवून एक खोली बुक करत असतील, तर त्यांनी आक्षेप घेतलग असताच का? > पान क्र २ वरचा अर्पण यांचा प्रतिसाद:
मागच्या महिन्यात मी आणि माझी बायको औरंगाबादला गेलो होतो असाच अनुभव आला आमच्या दोघांचे ID प्रूफ मागीतले ते होतेच पण तिचे ID प्रूफ लग्ना आधीच्या नावाचे असल्याने हॉटेल मॅनेजर ने अडवणूक केली हॉटेल MMT वरून बुक केले होते त्यामुळे option नव्हता . शेवटी घरी फोन करून marriage सर्टिफिकेट मेल वर मागवले तेंव्हाच रूम दिली.

===
मला वाटतं इथे बरेच पुरुष असतील जे एकट्याने भरपूर प्रवास करतात, लॉज/हॉटेलमध्ये राहतात. त्यांना शक्य असेल तर एक प्रयोग करून बघावा. डबल रूम बुक करायची, आयडी मागितला नाही तर "थोड्या वेळाने माझी एक मैत्रिण येईल तिला वर रूममध्ये घेऊन गेलो तर चालेल का?" विचारायच. हे अगदीच अनावश्यक आहे माहित आहे पण दुसरा कोणता मार्ग मलातरी सुचत नाहीय 'हॉटेलवाल्यांच नक्की काय चालू आहे' जाणून घ्यायला.

आयडिया छाने.हॉटेल मालक या एकट्या बिझनेसट्रॅव्हलयाच्या बायकोच्या माहेर चा नातेवाईक किंवा मित्र निघाल्यास इथे अजून एक कोतबो धागा निर्माण होईल.
अविवाहित ट्रॅव्हलखोरांनी नक्की करून पाहावे. ☺️☺️☺️

थोड्या बर्या हॉटेल मध्ये राहत असाल तर नो वन बोदर्स,

आल्या गेल्या माणसाला कोणी कुठे जाणार वगैरे विचारत नाही,
अगदी लॉज असेल तर असे होते

मला वाटतं इथे बरेच पुरुष असतील जे एकट्याने भरपूर प्रवास करतात, लॉज/हॉटेलमध्ये राहतात. त्यांना शक्य असेल तर एक प्रयोग करून बघावा. डबल रूम बुक करायची, आयडी मागितला नाही तर "थोड्या वेळाने माझी एक मैत्रिण येईल तिला वर रूममध्ये घेऊन गेलो तर चालेल का?" विचारायच. हे अगदीच अनावश्यक आहे माहित आहे पण दुसरा कोणता मार्ग मलातरी सुचत नाहीय 'हॉटेलवाल्यांच नक्की काय चालू आहे' जाणून घ्यायला.
नवीन Submitted by अॅमी on 26 October, 2018 - 15:24

त्यापेक्षा असं केलंत तर -

समजा आपण एकाचा आयडी देऊन एक रुम एकट्यानेच बुक केली. नंतर तासा दोन तासाने आपल्याला भेटायला कोणी गेस्ट आला. तासा दोन तासात थांबून मग निघून गेला तर त्या व्यक्तिला हॉटेलवाले आयडीप्रूफ थोडीच मागतात. तसेही टायमिंग जुळून आले असेल तर तासा दोन तासात हे 'काम' उरकून घेता येतेच. त्याकरिता पूर्ण रात्र सोबत झोपण्याची गरज असतेच असे नाही.

हाही प्रयोग करुन पाह्यला हरकत नाही.

हा धागा आता विनोदी व्हायला लागला आहे. उगीच सगळे पेटून शेवटी धाग्याला आग लागण्यापेक्षा बरंच आहे म्हणा. Proud

थोड्या बर्या हॉटेल मध्ये राहत असाल तर नो वन बोदर्स >>> सिम्ब, बरोबर.

बिपीनचंद्रांच्या सगळ्या पोस्ट्स लॉजिकल आणि प्रॅक्टिकल होत्या. अगदी शेवटची पोस्ट सुद्धा Wink

तसेही टायमिंग जुळून आले असेल तर तासा दोन तासात हे 'काम' उरकून घेता येतेच. >>>
उरकायची गोष्ट नाहिये राव ती. वाइन तुम्ही पाण्यासारखी गटकता का Wink
हघ्या

> हॉटेल मालक या एकट्या बिझनेसट्रॅव्हलयाच्या बायकोच्या माहेर चा नातेवाईक किंवा मित्र निघाल्यास इथे अजून एक कोतबो धागा निर्माण होईल. > हा हा Lol

===
> त्यापेक्षा असं केलंत तर -
समजा आपण एकाचा आयडी देऊन एक रुम एकट्यानेच बुक केली. नंतर तासा दोन तासाने आपल्याला भेटायला कोणी गेस्ट आला. तासा दोन तासात थांबून मग निघून गेला तर त्या व्यक्तिला हॉटेलवाले आयडीप्रूफ थोडीच मागतात. तसेही टायमिंग जुळून आले असेल तर तासा दोन तासात हे 'काम' उरकून घेता येतेच. त्याकरिता पूर्ण रात्र सोबत झोपण्याची गरज असतेच असे नाही.
हाही प्रयोग करुन पाह्यला हरकत नाही. > धाग्यात सॉर्टऑफ हेच झालं आहे ना?

"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"

मी आधी आयडी न मागणारे नंतर काय करतात ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतेय. मला वाटते 'नंतर' त्यांचं वागणं बदलेल.

===
> उरकायची गोष्ट नाहिये राव ती. वाइन तुम्ही पाण्यासारखी गटकता का Wink > जब वी मेट आठवला. तासांवर भाड्याने रूम घ्यायची :D:D

धन्यवाद मीरा.

अग्निपंख,

उरकण्यावरुन आठवलं

(अ‍ॅडल्ट कंटेंट - फक्त १८+ वाल्यांनीच वाचावे)

एकदा मित्राने मला विचारलं, "घरी कित्येकदा पत्नीसोबत असताना संपूर्ण रात्र प्रयत्न करुनही होत नाही. कधी कधी तर आठवडाभरही होत नाही. पण त्या तिकडे अमूक पेठेतल्या तमूक अळीत गेल्यावर पाच मिनीटांतच होतं. ते कसं काय?"
त्याला म्हंटलं, "मी कधी गेलो नाही तिकडे पण तरी तुझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकतो. सिमिलर उदाहरण देऊन. चालेल का?"
तो म्हंटला, "वेगळं उदाहरण दिलं तरी चालेल पण लॉजिक पटलं पाहिजे."
"तर मग ऐक." मी पुढे बोलू लागलो - "घरी सकाळी सात वाजता फ्रेश व्हायला जातो. कित्येकदा पाच सात मिनीटे लागतात. कधी कधी दहा पंधरा मिनीटेही लागतात. आणि कधीतर वीस मिनीटे बसूनही काहीच होत नाही शेवटी ड्यूटी गाठायला उशीर होईल म्हणून नाद सोडून द्यावा लागतो. पण तेच कधी बाहेरगावी जावं लागलं प्रवासात पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या ढाब्यावर जायची वेळ आलीच तर दोन मिनीटांत मोकळा होतो. असं का होतं माहितीय? रोज जातो कारण रुटीननुसार जायचं म्हणून जातो. शरीराकडून तशी हाक आलेली असेलच असे नाही. बाहेर अगदीच नाईलाज झाला म्हणजे शरीर अगदी पेटून उठलं तरच जातो त्यामुळे वाट पाहावी लागतच नाही सगळं कसं झट की पट होतं. तुम्ही जेव्हा अधिकृत बायको सोडून इतर बाईसोबत हे करता तेव्हाही ते का करता? सगळे संस्कार संयम लाथाडता कारण अगदीच राहवत नसतं, शरीराकडून फारच तातडीची निकड आलेली असते. अशा वेळी मग टाईमपास होतच नाही. सगळं कसं झटपट उरकलं जातं."

सर्व सज्ञानांचं ओळखपत्र मागतात. यात विबासं हाच मुद्दा नसतो, तर अतिरेकी कारवाया वगैरे मुद्दे असतात.
मलाही यातला हात धरण्याचा प्रकार सोडला तर बाकी धक्कादायक नाही वाटलं खरं तर. फोटो मागणं हेही ऑडच आहे म्हणा.

नवीन Submitted by वावे on 22 October, 2018 - 10:59 >>> बरोबर अतिरेकी कारवाया वगैरे मुद्दे असतात.

<शेवटी घरी फोन करून marriage सर्टिफिकेट मेल वर मागवले तेंव्हाच रूम दिली.>
अगदी असाच अनुभव काही वर्षांपूर्वी मायबोलीवर लिहिला गेला आहे. फक्त तिथे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र (इथे बाबा-महाराज इत्यादींमुळे पावन झालेली जागा ) होतं आणि हॉटेल/लॉज ऐवजी भक्तनिवासाच्या खोल्या होत्या.

पण हॉटेल /लॉज मालकाने दोन सज्ञान व्यक्तींना एक खोली देताना ते एकमेकांचे नवराबायकोच आहेत, हे तपासणे is none of his business.

Pages