लॉज बुकिंगचा एक अत्यंत धक्कादायक अनुभव

Submitted by Parichit on 22 October, 2018 - 05:21

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध शहरात आलेला अनुभव लिहित आहे. जसा घडला तसाच लिहित आहे.

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.

एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.

"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.

"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले

"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला

"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम

"कोण कोण आणि कितीजण आहात तुम्ही?"

"मी आणि माझी बायको"

"कुठे आहेत त्या?"

"शॉपिंगसाठी गेलीय नातेवाईकांबरोबर. येईलच इतक्यात इथे. कदाचित आम्हाला रूम लागणार पण नाही. लंच साठी रेस्टॉरंट मात्र लागेल. पण जर विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्याची गरज वाटलीच तर असावी म्हणून रूम बुक करून ठेवत आहे"

"ठीक आहे. मग त्या आल्यावर तुमच्या फोनवर त्यांचा फोटो काढून मला पाठवा" असे म्हणून आपल्या मदतनीसाला त्याने माझे क्रेडीट कार्ड स्वाईप करायला सांगितले.

मी पट्कन हो बोलून गेलो. पण पुढच्याच क्षणी मला वाटले हा जरा जास्तीच आगाऊपणा सुरु आहे. तिचा फोटो काढून मी ह्याला कशाला पाठवायचा? भलतेच काहीतरी वाटू लागले.

"एक मिनिट थांबा. मला इथे रूम बुक करायची नाही" मी चढ्या आवाजात बोललो आणि त्या मदतनीसाच्या हातून क्रेडीट कार्ड जवळजवळ हिसकावूनच घेतले. सुदैवाने ते अद्याप त्याने स्वाईप केले नव्हते.

कार्ड घेऊन मी निघून जाऊ लागलो. तसा काउंटरवरचा मनुष्य बाहेर आला.

"ओ साहेब. तुम्ही रूम बुक केली आहे. आता तुम्ही असे जाऊ शकत नाही. कॅन्सल करायचे पाचशे रुपये भरा" असे म्हणून तो मला आडवा आला. त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला. मी अवाक् झालो. कारण काहीही कारण नसताना तो सरळसरळ गुंडगिरीवर उतरला होता.

"हातघाई वर येण्याची काही गरज नाही. मी पैसे दिले नाहीत. मी रूम बुक केलेली नाही. कॅन्सल करायचे पैसे भरण्याचा प्रश्न येत नाही" मी बाहेर येत बोललो.

"अहो तुम्ही रूम बघून आलात. रजिस्टरमध्ये बुक केल्याची नोंद पण केलीय तुम्ही. आता मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय?"

"तो तुमचा प्रश्न आहे. मी पैसे दिलेले नाहीत. माझ्या दृष्टीने रूम बुक झालेली नाही. रजिस्टरमधली एन्ट्री खोडून टाका. प्रश्न मिटला" असे बोलून मी बाहेर रेस्टॉरंट जवळच्या काउंटरपाशी आलो. इथे ग्राहकांची बरीच गर्दी होती.

"अहो तुम्ही आधी आत येऊन रजिस्टरमध्ये बुकिंग कॅन्सल करायची सही करा आणि फोनवर मालकांशी बोला. मगच जा" तो गुंड आतून ओरडू लागला.

मला लक्षात आले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. एव्हाना बाहेरच्या काउंटरवरचा मनुष्य (हा सुद्धा पोरसवदाच पण गुंड छापच होता) आतल्या गोंधळाने सावध झाला होता. याच्याबरोबर अजून एकदोघे होते.

"काय झाले?" त्याने विचारले.

"हे बघा मी रूम बुक केलेली नाही. मला करायचीही नाही. तरीही हा तुमचा माणूस जबरदस्तीने पैसे मागत आहे" मी सांगितले.

"अहो ह्यांनी रूम बघितली. रजिस्टरमध्ये एन्ट्री पण केली. बरोबर बायको आहे म्हणून सांगतात. पण त्यांचा आयडी मागितला तर थातूरमातूर कारणे सांगू लागलेत. निदान त्या आल्या कि त्यांचा फोटो तरी काढून पाठवा म्हणून सांगितले तर आता घाबरून पळून जात आहेत. हे लफडी करतात पण नंतर आमच्या डोक्याला त्रास होतो. आता रजिस्टरमध्ये एन्ट्री बघून मालक माझ्याकडून पैसे घेतील त्याचे काय? त्यांना मालकाशी तरी बोलायला सांगा" आतला गुंड आरडाओरडा करत बोलू लागला.

त्यावर चेहऱ्यावर छद्मी हास्य आणून बाहेरच्या काउंटरवरचा गुंड मला 'शहाणपणाचा' सल्ला देऊ लागला, "अहो घाबरू नका. मारणार नाही तुम्हाला तो. त्याच्याकडून मालक पैसे घेतील म्हणून तो बोलत आहे बाकी काही नाही. तुम्ही आत जा आणि मालकांशी फोनवर बोला. नाहीतर सरळ पाचशे रुपये देऊन जा"

"मारायचा काय संबंध? त्याच्या बापाचे खाल्लेले नाही. आणि आत जाण्याची काय गरज आहे? रजिस्टर इथे आणून द्या. मी एन्ट्री खोडून सही करतो. फोन सुद्धा इथे आणून द्या मी मालकांशी बोलतो" मी निग्रहाने पण आवाज चढवूनच बोललो.

"अहो हे हॉटेल आहे. इथे सगळे कस्टमर येत आहेत त्यांच्यासमोर आरडाओरडा कशाला करता? तुम्ही आत जा आणि काय ते सेटल करा. तो काय तुम्हाला मारत नाही. काळजी करू नका" इति बाहेरच्या काउंटरवरचा गुंड.

"हे बघा मी अनेक शहरे फिरलो आहे. पण इतकी अव्यावसायिक वृत्ती बघितली नव्हती. तुमच्या माणसाने माझ्या अंगाला हात लावला आहे मघाशी. तुमचे हॉटेल माझ्या कुटुंबासाठी सुरक्षित असेल असे वाटत नाही म्हणून मी निघून जात आहे" मी म्हणालो

"अहो हे भानगड करणारे वाटत आहेत. तुम्ही सरळ पोलिसांना बोलवा" आतल्या गुंडाने बाहेरच्या गुंडाला इशारा केला. त्याला वाटले पोलिसांना घाबरून मी आत यायला तयार होऊन 'सेटलमेंट' करेन.

"ठीक आहे. बोलवा पोलिसांना. बघूयाच माझा काय गुन्हा आहे" आता मी सुद्धा इरेला पडलो.

मला प्रकार लक्षात आला. मी कोणत्यातरी बाईला लॉजवर बोलवून घेत आहे जिचे माझ्याशी लग्न झालेले नाही, अशी त्या सर्वांनी आपली ठाम समजूत करून घेतली होती. आणि त्यावरून ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी सगळे नाटक सुरु होते. मी स्थानिक नाही. बाहेरगावाहून आलोय याचा सुद्धा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळे आत बोलवून मी मुकाट्याने पैसे दिले नसते तर मला पोलिसांची धमकी देऊन वा प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत सुद्धा यांची मजल गेली असती. अन्यथा मालकाशी फोनवर बोलण्यासाठी मला आत बोलवण्याची काय गरज?

संस्कृती रक्षणचा ठेका घेतलेल्या एखाद्या सेनेचे हे पाळीव गुंड असावेत अशी माझी ठाम समजूत झाली होती. वेळ पडली असती तर फोन करून अजून चार जणांना त्यांनी बोलवून घेतले असते. या शहरात कामधंदे नसलेल्या तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. वयात आलेल्या पोरांना तिकडे हेच उद्योग असतात. कोणाचे अफेअर आहे असा संशय जरी आला तरी यांचे नाक खुपसणे सुरु होते. माझ्या बरोबर येणाऱ्या महिलेच्या (मग ती माझी बायको असो अगर नसो) आयडी प्रुफशी त्यांना काही देणेघेणे असण्याचे नाही कारण नव्हते. माझे आयडी प्रुफ पुरेसे होते. माझा गुन्हा काय तर डबलबेड रूम बुक करू पाहत होतो आणि बरोबर जी स्त्री 'येणार होती' तिचा कोणताही आयडी पुरावा देण्याची माझी तयारी नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी मी 'सावज' होतो.

मी सुद्धा पोलिसांना बोलवायची भाषा केल्यावर मग मात्र ते थोडे नरमले. मग काही न बोलता थोड्या वेळाने अत्यंत उद्विग्न मनाने मी तिथून बाहेर पडलो. काहीही कारण नसताना अत्यंत मनस्ताप झाला होता. या सगळ्यात माझी काय चूक होती तेच कळत नव्हते. बायकांना हॉटेलमध्ये आणून गुन्हे करण्याचे प्रकार घडतात हे मलाही माहित होते. पण माझे आयडी प्रुफ मी त्यांना दिलेच होते. 'तिच्या' फोटोची काय गरज? आमच्यात काय संबंध आहेत यांना कशाला हवे? आमचा विवाह झाला असेल अगर नसेल. यांना काय करायचे? तसेही विवाहबाह्य संबंध हा आता गुन्हा नाही. त्यामुळे अशा केसमध्ये जरी नंतर काही पोलीस चौकशी वगैरे झालीच तरी यांच्यावर काहीही बालंट येण्याचे कारण नाही. पण या शहरातले लोक अव्यावसायिक वृत्तीकरिता आणि दुसऱ्यांच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक खूपसण्याकरता पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. अन्यथा "आमच्या हॉटेलच्या नियमात तुम्ही बसत नाही. तुम्हाला इथे बुकिंग मिळणार नाही" एवढ्यावरच हा विषय संपला असता.

४९७ वे कलम कोर्टाने रद्द केलेय खरे. पण "विबासं असल्याचा संशयित" सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने (तिऱ्हाईत असला तरी) गुन्हेगार ठरतो आणि ते त्याला त्रास देतात. या विचाराने दिवसभर डोके भणभणत राहिले.

बाकी, मायबोलीकर आपापली मते मांडायला मुक्त आहेत.

ता.क. : विषयाशी संबंधित जितके घडले आणि जसे घडले तितके सगळे सांगितले आहे. कोणाशीतरी बोलून मन मोकळे करणे हा सुद्धा एक उद्देश यामागे आहे. बाकी "ती स्त्री खरंच तुमची पत्नी होती का? तुम्हाला दुसरीकडे रूम मिळाली का? शहराचे नाव बदलून सांगायची काय गरज होती?" ह्या व अशासारख्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोलिसांसाठी नवीन नियम सुचला आहे. ( त्यांनी लॉज वाल्यांसाठी फतवा काढावा).

अ) स्त्री आणि पुरूष यांनी आपले विवाह प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे आहे
विवाह प्रप मधे जी नावे नोंदवली आहेत त्या नावाचे ओळखपत्र देणे गरजेचे आहे.

ब) विवाह प्रमाणपत्र नसल्यास (स्त्री पुरूष एकमेकांशी विवहबद्ध नसल्यास ) त्यांनी सदर स्त्री पुरूष एकमेकांसोबत हॉटेलव र राहण्यास हरकत नाही या अर्थाचे आपल्या जोडीदाराचे / पालकांचे प्रप आणणे अत्यंत आवश्यक आहए.

हे सर्व लॉज संबधी झाले, पण टुरिझमच्या नावाने अनेक घरगुती निवास असतात त्याबद्दल काही कोणाचा असा अनुभव आहे का ? तिथेही एवढे सगळे कड़क नियम राबवले जात असतील का ?

  1. बिपीनचंद्रांच्या सगळ्या पोस्ट्स लॉजिकल आणि प्रॅक्टिकल होत्या. अगदी शेवटची पोस्ट सुद्धा Wink
  2. (अ‍ॅडल्ट कंटेंट - फक्त १८+ वाल्यांनीच वाचावे)

<<

शेवटी माती खाणे म्हणतात ते हेच.

समजा, मी हॉटेलमालक आहे.
१. मी सज्ञान लोकांकडून ओळखपत्र मागतो कारण मला नंतर झंझट नको. => हे कायद्यानुसार आहे.

<< हॉटेल /लॉज मालकाने दोन सज्ञान व्यक्तींना एक खोली देताना ते एकमेकांचे नवराबायकोच आहेत, हे तपासणे is none of his business. >>
२. मान्य आहे की It is none of my business. तुम्ही नकार देऊ शकता. मग मी पण खोली द्यायला नकार देऊ शकतो. => हे कायद्यानुसार आहे.

प्रश्न मिटला.

(अ‍ॅडल्ट कंटेंट - फक्त १८+ वाल्यांनीच वाचावे)

<<

शेवटी माती खाणे म्हणतात ते हेच.
Submitted by आ.रा.रा. on 26 October, 2018 - 21:39

आपण <१८ आहात तर डिस्क्लेमर वाचूनही माझ्या प्रतिसादाची झटी घेतलीच कशाला? कोणी फार आग्रहाचे निमंत्रण दिले होते का?

२. मान्य आहे की It is none of my business. तुम्ही नकार देऊ शकता. मग मी पण खोली द्यायला नकार देऊ शकतो. => हे कायद्यानुसार आहे.

प्रश्न मिटला.
Submitted by उपाशी बोका on 26 October, 2018 - 21:43

सहमत.

समजा नवराबायको नसलेल्या दोन सज्ञान व्यक्तींनी आपली ओळख दाखवून एकच खोली मागितली, तर हॉटेलवाल्याने ती नाकारणे बरोबर असेल का?
हे थिऑतेटिकल आणि हायपोथेटिकल समजा. मोरल पोलिसिंग आपल्याला मान्य आहे का?
वास्तवात दोन्ही चित्रे असतील - ओळख न मागता तासांसाठी खोल्या देणारे हॉटेल्/लॉजमालक आणि अगदी सार्वजनिक ठिकाणी जोडप्यांना हटकणारे फटकवणारे संस्कृतिरक्षक.

यात पुन्हा प्रॉस्टिट्युशनचाही अँगल आहे. त्यामुळे उत्तर सरळसोट हो किंवा नाही, असं येऊ शकत नाही, याची कल्पना आहे. आणखी एक पैलू समोर आणायचा हेतू आहे.

बिपीनचंद्रांच्या सगळ्या पोस्ट्स लॉजिकल आणि प्रॅक्टिकल होत्या. अगदी शेवटची पोस्ट सुद्धा Wink >>>>> माझ्या या पोस्टमध्ये उल्लेख केलेली बीपीनचंद्रांची शेवटची पोस्ट म्हणजे 26th ऑक्टोबरची 15:48 ची पोस्ट.

अत्यंत धक्कादायक???
लेख वाचून असे वाटले की लेखक आपल्या घरातल्या सुरक्षित वातावरणातून, ओळखीच्या लोकांच्या वर्तुळातुन बाहेरच्या जगात पहिल्यांदाच पडले.

असे असेल तर लेखकाला आलेल्या अनुभवामुळे त्यांच्या मनःस्थितीवर झालेल्या परिणामांबद्दल काही अश्चर्य वाटत नाही.

'ह्यात काय धक्कादायक' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आधी पण आल्या आहेत. मी आधी सुद्धा सांगितले आहे. पुन्हा एकदा सांगतो:

लॉजचे जे काही नियम असतील ते असोत. त्यानुसार गोष्टींची तुमच्याकडून पूर्तता होत नसेल तर सामान्यत: "तुम्ही आमच्या नियमात बसत नाही तुम्हाला इथे राहता येणार नाही" इतके बोलून विषय संपवला जातो. इतके साधे सरळ गणित आहे. पण तसे न करता तुमच्या वैयक्तिक गोष्टींत लक्ष घालून त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला ब्लॅकमेल करून प्रसंगी धमकी देऊन तुमच्याकडून खंडणी वसूल करण्याचा जेंव्हा प्रयत्न होतो तेंव्हा ते तुम्हाला धक्कादायक वाटणार नाही का? पैसे/आयडी वगैरे न घेता आधी त्याने मला थेट रजिस्टरमध्येच रूम बुक केल्याची नोंद करायला लावली. त्यामागचा हेतू काय असेल?

ज्यांना हा प्रसंग धक्कादायक वाटत नाही तेच मुळात स्वत:च्या कोषातून बाहेर पडलेले नाहीत. कसलाही अनुभव नसताना एसी ऑफिसात बसून कीबोर्ड बडवत "ह्यात काय धक्कादायक" लिहिण्यापेक्षा एकदा त्या शहरात जा आणि मी वर्णन केल्याप्रमाणे वागून बघा आणि मग लिहा. अरे पोलीस सुद्धा ह्या लोकांना सामील असतात हे माहिती आहे का तुम्हाला? "पैसे दे नाहीतर एक केस ओपन आहे, गुन्हेगार सापडत नाही, त्यात तुला अडकवू" अशी धमकी देतात. काय करणार तुम्ही अशावेळी? काहीच करू शकत नाही.

तेंव्हा आधी जगाचे अनुभव घेऊन या आणि मग मला सांगा.

आताचा प्रतिसाद वाचला.

माझ्या मते लॉजवरच्या मनुष्याला माझी बायको खरेदीला गेली आहे. आम्हाला खरे तर लॉजची काहीच गरज नव्हती. पण फ्रेश होण्यासाठी रूम असावी म्हणून बुक केली ही अनावश्यक माहीती पुरवण्याची आवश्यकता नव्हती. तुम्हाला माणसांशी डील करण्याचा अनुभव नाही हेच यातून सिद्ध होते. धंदेवाईक लोक, त्यातून ज्यांचा अनेक लफड्यांशी संबंध येतो त्यांचे विचारचक्र चालू होईल असे खुलासे तुम्ही केले आहेत.

तुम्ही आधी रूम पाहिली. ती पसंत केली. मग त्याने रजिस्टर तुमच्या पुढे सारले. रूम पसंत केली नसती तर झालेच नसते. रज्जिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधे त्याने आयडी प्रूफ मागितल्यावर तुम्ही वरील खुलासे केले. रूम बघायच्या आधी तुम्ही स्वतःहून ही माहिती दिलेली नव्हती. त्याने आयडी प्रूफ मागितल्यावरही तुमचा दृष्टीकोण अत्यंत कॅज्युअल होता. तुम्हाला स्वतःला नियम माहीत असते तर तुम्ही ठणकावून सांगितले असते.

मी वर लिंक दिलेली आहे. त्यात काय म्हटलेय ते वाचा. हॉटेल असोसिएशन ने नवरा बायकोला रूम द्यायचा अर्थ काढलेला आहे. मात्र नवरा बायको नसलेल्यांना रूम नाकारणे हा घटनेचा भंग आहे असे वकील म्हणतात. आता हे घटनात्मक युद्ध हॉटेलचा मॅनेजर का करेल ? त्याला पोलिसांनी काय सूचना दिल्या असतील तेच तो बघणार.

तुम्ही दोघे एकत्र गेला असतात तर कदाचित त्याला संशय देखील नसता आला. मी संपूर्ण भारता फिरलो. माझी मुलं , बायको सगळेच एकत्र असतात. कुणीही आजवर अडवलेले नाही. अडवणूक तेव्हांच होईल जेव्हां त्यांना संशय येईल.

माफ करा परिचीत वरील अनुभवात धक्कादायक असे काही वाटले नाही. आधीच याबद्दल अनेक प्रतिसाद आले आहेत तेव्हा द्विरुक्ती करण्यात अर्थ नाही.

मात्र या लेखातून खालील दोन मुद्दे पुढे आले.

हॉटेलमध्ये खोली घेण्यास कुटूंबातील प्रत्येक सज्ञान व्यक्तीचे ओळखपत्र हवे, जवळ बाळगावे.

जोडप्याने आपण विवाहित आहोत हे सिद्ध करावे लागते अन्यथा खोली मिळणे कठीण होऊ शकते. हे चुकीचे आहे, पण हे असे आहे.

काही ठिकाणी वरील नियम शिथिल करणारे भेटतीलही, पण तीच अपेक्षा सगळ्यांकडून ठेवू नका.

मी संपूर्ण भारता फिरलो. माझी मुलं , बायको सगळेच एकत्र असतात. कुणीही आजवर अडवलेले नाही. >>
+१. अडचणी आल्या पण त्या बोलून , वेळप्रसंगी भांडूनही सोडवल्या.

मानव, नुसत्या सज्ञानच नव्हे तर मायनर चेही प्रूफ मागितले जाते.म्हणजे नेहमी जाईल असे नाही पण हॉटेल्स मध्ये आम्हाला आतापर्यंत मागितले आहे.

अडवणूक तेव्हांच होईल जेव्हां त्यांना संशय येईल.
Submitted by किरणुद्दीन on 28 October, 2018 - 10:41

संशय आला असेल तर "इथे प्रवेश मिळणार नाही" इतके म्हणून विषय संपवता आला असता ना? पैसे मागून धमकी देऊन अडवणूक करणे योग्य आहे का?

मी_अनु ओके.
प्रवासात आयडी प्रूफ सगळ्यांचे बाळगावेच.
विविध प्रसंग ओढवू शकतात.

धमकी दिलेली आहे असे वाटत नाही. तुम्ही कांगावा करताय असा त्यांचा समज झालेला दिसतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॅन्सलेशनचे पैसे मागणे हे अडवणूक करणे या प्रकारात मोडत नाही. हॉटेल चालवायचेय त्यांना. पोलीसात तक्रार होऊ शकते, बदनामी होऊ शकते याचे टेण्शन तुमच्यापेक्षा त्यांना जास्त आहे. तुम्ही तुम्हाला हवे तसे सोयीस्कर अर्थ काढून लेख लिहीला आहे आणि त्याच्याशी सहमत व्हावे ही अपेक्षा ठेवत आहात. पण माफ करा तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत असंख्य दोष आहेत.

धागाकर्ता बॅशिंग करू नये असे वाटते.असे प्रसंग परक्या गावात एकटं असताना जेव्हा येतात तेव्हा भीतीदायक असतील.
बाकी हातघाई/हात पकडणे/भांडण: भारतातल्या बऱ्याच फाईट अश्याच लढल्या जातात.बरेचदा आपण आवाज चढवला नाही तर आपण सगळीकडे हरू या ईनसिक्युरीटीत दोन्ही आवाज काय म्हणतायत, दोन्ही आवाज एकाच मुद्दा वेगवेगळ्या स्टाईल मध्ये सांगतात आणि त्यांना हे कळत नाहीये,मार्ग निघू शकतो का हेच विसरले जाते.माझ्या डोळ्यासमोर 'काय बघतो रे वर डोळे करून' म्हणून हाणामारी झालेली पाहिली आहे.रस्त्यावरील जनता आणि सकाळ मुक्तपीठ दोन्ही समान आहे.तुमच्या बोलण्यात जरा ऍटीट्यूड आहे अशी समोरच्याला खरी किंवा खोटी शंका आली तरी सरळ हातपाय वापरण्याच्या सिच्युएशन वर येऊ शकते.त्यात 'महाराष्ट्र विरुद्ध बाहेरचा' 'माझं गाव विरुद्ध बाहेरचा' 'श्रीमंत विरुद्ध गरीब' असे तट सोयीनुसार पडतात.ज्या गटाची मेजोरीटी आहे तो जिंकतो.
(मुद्दा हा, माझा मुद्दा सत्याचा आहे ही मी जिंकण्याची खात्री नाही.त्यासाठी योग्य ठिकाणी तलवार, योग्य ठिकाणी तह याचा सेन्स आणावा लागतो.(माझ्याकडे नाहीये ☺️☺️))

मी सुरूवातीच्या पोस्ट मधेच म्हटले होते प्रसंगावधान, सबुरी बाळगावी लागते. आपण स्वतः संशयग्रस्त असेल तर आपल्याला जग पिवळेच दिसणार. मग हे असे वळण लागते. धागाकर्त्याला समोरच्याला काय संशय आला असावा याचे भान असल्याशिवाय त्याने सुरूवातीला कलम लिहीले नसते. शिवाय कीवर्डस मधे विबासं असेही लिहीलेले आहे. म्हणजेच आपल्या वागण्यातून असा संशय येऊ शकतो हे त्यांना कळालेले आहे पण अ‍ॅटीट्यूड मुळे वळालेले नाही. त्यांचा असा समज होऊ शकतो हे जाणून कमी पणा घेऊन खुलासे केले असते तर काही घडले नसते असे वाटते.

अहो साहेब मी प्रोसेस विषयी बोलतोय अगदी सुरवातीपासूनच. माझे वागणे संशयास्पद असेल. किंवा त्याला तसे वाटले असेल म्हणून माझ्यावर तो संशय घेऊ दे अगर न घेऊ दे. तो त्याचा प्रश्न आहे. ते माझ्या हातात नाही. आणि त्याविषयी माझे ऑब्जेक्शन नाही. पण...

रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॅन्सलेशनचे पैसे मागणे हे अडवणूक करणे या प्रकारात मोडत नाही.
Submitted by किरणुद्दीन on 28 October, 2018 - 11:44

इथेच माझे ऑब्जेक्शन आहे. येणाऱ्या लोकांकडून आधी आयडी घेऊन त्यांची शहानिशा केल्याशिवाय आणि त्यांच्याकडून पैसे घेतल्याशिवाय रजिस्ट्रेशन केलेच कसे? चेक इनची प्रोसेस नीट फॉलो केली नाही हि त्याची चूक नाही का? हाच तर मुद्दा आहे त्याच्याशी वाद होण्याचा. संशयाचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवू. समजा माझे कार्ड चालले नसते. किंवा माझ्याकडे पैसेच नसते. किंवा अचानक माझे मन बदलले. किंवा अचानक कुणाचातरी फोन आला. काहीही होऊ शकते आणि मी पैसे भरण्यास असमर्थ ठरलो असतो, तर काय? प्रोसेस न फॉलो करता बथ्थड डोक्याने आधी रजिस्टरमध्ये नोंद केली त्याचा भुर्दंड कस्टमरला?

तुम्ही नाव का लिहीले त्यात ?
शक्यतो अवतारावरून व्यक्ती पैसे देईल की नाही हे ताडून व्यवहार पूर्ण केला जातो. रजिस्ट्रेशन आधी का केले या प्रश्नाला काही एक अर्थ नाही. तुमचे आक्षेप बिनबुडाचे वाटतात त्याबद्दल क्षमस्व !
आधी पैसे विचारले असते तरीही आक्षेप घेतलाच असता. रजिस्ट्रेशन न करताच पैसे कसे मागताय ?

मी देशांत अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये राहिलो आहे. आधी रूम दाखवणे, पसंत असल्यास आयडी कार्ड घेऊन शहानिशा करणे, मग पैसे घेणे, आणि सर्वात शेवटी रजिस्टरमध्ये नोंद अशी प्रोसेस असते. हे म्यानेजरच्या दृष्टीने सेफ असते. यात पहिल्या तीन मध्ये कोणत्याही स्टेजला बुकिंग रद्द झाले तरी अद्याप रजिस्टर मध्ये नोंद न झल्याने तो सेफ राहतो. आणि रजिस्टर मध्ये नोंद केल्यानंतर जर कस्टमरने बुकिंग रद्द केले तर अर्थातच पैसे आधी घेतलेले असल्याने नियमानुसार जे काय असेल ते कट करून बाकीचे पैसे कस्टमरला रिफंड. सगळे कसे रीतसर आहे.

वरती मी_अनु यांनी लिहिलेल्या प्रसंगांत लहान मुलाच्या आयडी कार्ड अभावी बुकिंग होत नाही म्हणून समजा ते त्या हॉटेल मधून बाहेर यायला निघाले असते तरी म्यानेजरला काही फरक पडला नसता. मुर्खासारखे आडवे येऊन पाचशे रुपये भर म्हणून सर्वांसमोर सीन उभा करावा लागला नसता. कारण बुकिंगची एन्ट्री अजून केलेलीच नाही. इथे मात्र त्याने आधी बुकिंगची एन्ट्री करायला लावली. मी (किंवा अन्य कोणी असते तरी) नाव लिहिताना कशाला त्याचा विचार करावा. कस्टमरला थोडेच माहित असते मालक याच्याकडून पैसे घेणार वगैरे भानगडी. रादर हि शुड बी द वन टू वरीड अबाउट इट. इजंट इट?

परिचित साहेब, आम्ही फोन, इमेल वरून हॉटेल बूक करतो,
त्यावेळी आय कार्ड द्यावे लागत नाही. आगाऊ पैसे दिलेले नसतात. तेवढा अनुभव, understanding असते त्या लोकांचे.
चेक इन वेळी हॉटेल दर्जा नुसार चेक इन फॉर्म वर नाव, कितीजण लिहून, सही करून व्हिजिटिंग कार्ड देतो, बाकी माहिती रिसेप्शन भरते. जिथे चेक इन फॉर्म नसतो तिथे रजिस्टर मध्ये सेम प्रोसिजर. दरम्यान/नंतर ते आयडी प्रूफ मागतात, आपल्या रूमवर घेऊन जाण्यास माणूस सज्ज असतो. आम्ही रूमवर जातो. आय कार्डची फोटो कॉपी काढून झाल्यावर रिसेप्शन ओरिजनल आपल्या रूमवर पाठवते.
त्यात मी आयकार्डच्या (ड्रायव्हर्स लायसन्स) फोटो कॉपीज जवळ ठेवतो, व रीसेप्शनला देतो, तेही ते कॉपी काढून माझी फोटोकॉपी रूमवर आणून देतात. ( क्वचितच कधी ओरिजिनल व्हेरिफाय केल्या जाते.)
हे सगळे अशा विश्वासावर चालत असते. काही ठिकाणी थोडेफार वेगळे अनुभव येतात. कुठे एन्ट्री करण्यापूर्वी "आय डी प्रूफ आहे ना? हो ड्रायवर्स लायसन्स आहे" एवढा संवाद पुरेसा असतो.

फोनबुकिंग आणि वॉक-इन केस मध्येसुद्धा, आधी सगळ्यांचे आय कार्ड्स व्हेरिफाय केलेल आहेत, पूरेसे ऍडव्हान्स पेमेंट घेतलेले आहे, मगच रजिस्टर मध्ये नोंद केली असा एकही अनुभव स्मरणात नाही.

परिचित, पुढे काय करणार आहात?
एवढ्या प्रतिसादांत कोणीच हॅाटेल मालकाला चूक म्हटले नाही.
मी एकदा एका माणसास बसमधून उतरवयास भाग पाडले. कंडक्टरने लगेच माझी ( प्रवाशाची तक्रार आहे, )तिकिट काढून गप्प बस नैतर इथेच उतर असा पवित्रा घेतला. मग तो गपगुमान बसून राहिला.

फोनबुकिंग आणि वॉक-इन केस मध्येसुद्धा, आधी सगळ्यांचे आय कार्ड्स व्हेरिफाय केलेल आहेत, पूरेसे ऍडव्हान्स पेमेंट घेतलेले आहे, मगच रजिस्टर मध्ये नोंद केली असा एकही अनुभव स्मरणात नाही.
Submitted by मानव पृथ्वीकर on 28 October, 2018 - 13:32

>>> पण वॉक-इन केस मध्ये चेकइन फॉर्मवर/रजिस्टरमध्ये नाव लिहून झाल्यावर अचानक बुकिंग रद्द करण्याचा प्रसंग कधी तुमच्यावर आला आहे का? अशा वेळी हॉटेलचे लोक आडवे येऊन चार-पाचशे रुपये (किंवा जे काय चार्जेस असतील ते) भरल्याशिवाय तुम्हाला बाहेर सोडत नाहीत वगैरे कधी झालेय का? मी उपरोधाने नाही जाणून घेण्याच्या दृष्टीने विचारत आहे. माझ्या बाबत असे प्रथमच घडले आहे. पण मला नाही वाटत कि असे पैसे घेणे हा सर्वच हॉटेल्समध्ये नॉर्म असेल. (बाकी फोन/इमेल वर बुकिंग म्हणता ते ओळख किंवा रेप्युटेशन असेल तरच होते. अन्यथा अडव्हांस पैसे ट्रान्स्फर केल्याशिवाय कोणीही हॉटेलवाला केवळ फोन/इमेलवर तुमच्यासाठी रूम बुक करत नाही)

परिचित, पुढे काय करणार आहात?
एवढ्या प्रतिसादांत कोणीच हॅाटेल मालकाला चूक म्हटले नाही.
Submitted by Srd on 28 October, 2018 - 13:56

>>> पुढे काही नाही. माझ्या दृष्टीने प्रकरण संपले तिथेच. नशिबाने थोडक्यात निभावले म्हणायचे. पण तिथे नाव पत्ता वगैरे लिहून आलोय. बहुतेक त्यांनी आयडी कार्डची पण कॉपी घेऊन ठेवली आहे. त्याचा गैरवापर होऊ नये म्हणजे मिळवली. इतरांनी सावध व्हावे आणि मलाही मन मोकळे करायचे होते म्हणून इथे लिहिले इतकेच. बाकी तुमचा बसमधल्या व्यक्तीचा किस्सा नीट कळला नाही.

पण वॉक-इन केस मध्ये चेकइन फॉर्मवर/रजिस्टरमध्ये नाव लिहून झाल्यावर अचानक बुकिंग रद्द करण्याचा प्रसंग कधी तुमच्यावर आला आहे का?>>>
झाले आहे असे कधी, पण ते हॉटेलच्या चुकीमुळे, छोट्या शहारात. भर उन्हाळ्यात रूमचा एसी काम करत नव्हता आणि दुसरी रूम अव्हेलेबल नव्हती. एकदा रात्री चेक इन केले आणि नेमकी बाहेर लॉनवर पार्टी डीजे सकट सुरू होती त्याच बाजूला रूम्स अव्हेलेबल होत्या. तेव्हा कसलाही भुर्दंड न भरता हॉटेल बदलले.
स्वतःहून सुद्धा अचानक रद्द करावे लागले आहे, पण ते चेक इन नंतर किमान तास दोन तासांनंतर, जेव्हा अचानक दुसऱ्यागावी जावे लागले. अशा वेळेस हाफ डे चार्ज भरावा लागतो (हे दिवसा झाले तर), किंवा पूर्णही.

खूप हॉटेल्स आहेत जे फोन / इमेल्स वरून बुकिंग घेतात, ओळखीची गरज नाही. जिथे फक्त टुरिझम असते तिथे मात्र हे सहजी शक्य नाही. हॉटेल कितपत occupied आहे यावरून तिथेही कधी मॅनेज करता येते. पंचतारांकित हॉटेल्समध्ये मात्र क्रेडिट कार्ड डिटेल्स दिल्याशिवाय (आणि त्यांनी ते व्हेरिफाय केल्याशिवाय) बुकिंगची गॅरंटी नसते.

अर्थात आमची नेहमीची ठरलेली हॉटेल्सही आहेत बऱ्याच ठिकाणी, जिथे व्यक्तिशः ओळख आहे, त्याबद्दल बोलत नाहीय.

आमचे बिझिनेस टूर्सचे प्रोग्रॅम अचानक बदलू शकतात तेव्हा ऍडव्हान्स पे करून हॉटेल बूक करणे आम्ही शक्यतो टाळतो.

Pages