व्यक्तिचित्रणः कॅटफिश - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 September, 2018 - 22:03

टीप : प्रस्तुत ललितातील सर्व पात्रे खरी आहेत. कोणत्याही काल्पनिक व्यक्तीशी त्यांचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.
---

"So you all got catfished?! And I thought you were a bunch of smarties!" - लेक डोळे फिरवत उद्गारला आणि पुन्हा टीव्हीकडे वळला.

मी हळूच टेबलाखाली फोन धरून आम्ही Catfished म्हणजे काय झालो ते गूगल केलं. अर्बन डिक्शनरीने तत्परतेने सांगितलं: 'Catfish : Someone who pretends to be someone else, especially on the internet.'
---

तिची माझी ओळख जवळपास एका तपापूर्वीपासूनची. इन्टरनेटला घरीदारी सहज अ‍ॅक्सेस उपलब्ध झाला आणि जगभरातील मराठी पाउलखुणा जपणार्‍या संकेतस्थळांवर संचार करता येऊ लागला त्या काळातली. आता मुलांना आंतरजालाचं नागरिकशास्त्र शाळेपासून शिकवतात. आम्ही शिकलो अनुभवांतून. आपल्या फावल्या वेळेत, आपल्या मातृभाषेत ज्यांच्याशी संवाद साधता येतो अशी मंडळी भेटणं याचं अप्रूप परदेशात अजूनही वाटतं, तेव्हा तर तो जवळपास चमत्कार वाटायचा! मग त्यातही समानधर्मीयांबरोबर विशेष सख्य जमणं ओघाने आणि सहज झालं. पुढे यातली बरीच मंडळी प्रत्यक्षातही भेटली आणि आतातर आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत.

ती फारशी कोणाला प्रत्यक्ष भेटल्याचा इतिहास नाही. पण ऑनलाइन गप्पा मारायला कधीतरी यायची. अतिशय सुंदर, तरल ललित लेखन करायची. मला तिचं लिखाण आणि तिला माझ्या कविता आवडत असल्यामुळे मग कधीतरी व्यक्तिगत निरोप - ईमेल्सही सुरू झाल्या आणि मैत्री दृढ होऊ लागली. जुजबीच पण खाजगी माहितीही एकमेकींना सांगितली गेली.

माझ्यापेक्षा वयाने लहान होती ती. जाहिरातविश्वात काम करायची. पार्ल्यात तिच्या वडिलांचं घर होतं. डॉक्टर होते ते. भाऊ अमेरिकेत होता, आई पूर्वी विल्सन कॉलेजला मराठीची प्राध्यापिका होती. तिने लहानपणापासून हट्टाने मराठी वाचनाची सवय लावल्यामुळेच ही इंग्रजी माध्यमात शिकलेली असून इतकं उत्तम मराठी लिहायची.

कामाच्या निमित्ताने जगभरात भटकंती करायची ती आणि भेटली की नेहमी काहीतरी सुरस आणि चमत्कारीक असायचं तिच्या पोतडीत सांगण्यासारखं. बहुश्रुतता होती, तल्लख विनोदबुद्धी होती आणि एक तरुण सळसळता उत्साह होता - आमच्या नाठाळ ग्रूपमध्ये किती सहज मिसळून गेली होती ती.

पुढे एका बंगाली मुलाच्या प्रेमात पडली. त्यांचा शेजारीच होता. सुंदरबनाच्या पर्यावरण संवर्धन-संरक्षणाचं काम करणार्‍या टीमचा भाग होता. ही महागड्या उंची वस्तूंची शौकीन, जगभर फिरणारी, एलीट अर्बन उत्साही मुलगी आणि तो अबोल, विरक्त, ध्येयासक्त मुलगा. मजेशीर जोडा होता. पण ती आनंदात होती. त्याच्याबद्दल बोलायला, त्याच्यावरून चिडवून घ्यायला किती आवडायचं तिला! तिचा साखरपुडा झाल्याचं कळलं तेव्हा मी कधी नव्हे ते तिला फोटो पाठवायला सांगितलं. तोवर तितपत हक्क वाटायला लागला होता. तिच्या लिहिण्यावरून माझ्या डोळ्यांसमोर जशी छबी निर्माण झाली होती, तशीच होती फोटोतली ती. छान होता जोडा. खूप मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या तिला.

त्याच काळात कधीतरी वडील गेले तिचे. त्यांच्याशी ती खूप - आईपेक्षाही अधिक अटॅच्ड होती. वडिलांचं जाणं खूप खोल परिणाम करून गेलं तिच्यावर. त्यात 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप'चे तोटे दिसायला लागले होते. भावी नवरा मुळात अबोल, आणि त्यात चॅट-ईमेलवर फार मोकळेपणी बोलणारा नव्हता. तिच्या बोलण्यात कधीतरी डिप्रेशन डोकावायला लागलं. काळजी वाटायची, पण वडिलांबद्दल सांत्वनपर ईमेल पाठवण्यापलीकडे आणि नंतर भेटेल तेव्हा थोडं खेळीमेळीचं बोलण्यापलीकडे काय करता येणार होतं आम्हाला?

खूप पॅशनेट माणसांचा उत्साह जसा झगमगीत असतो तितकंच त्यांचं नैराश्यही खोल काळोखं असणार हे बहुधा आपण गृहित धरलेलं असतं.
तशाही तिच्या भेटी, तिचं ऑनलाइन येणं किंवा ईमेल्स वगैरेंना उत्तर देणंही फार नियमीत नसायचं, पण फिरती-प्रवासांच्या गडबडीत नसेल जमत असं समजायचो आम्ही. आता ते आणखीनच अनियमित झालं होतं.

मग एकदा आली ती आनंदाची बातमी घेऊन. ती लग्न करणार होती. दोघंही आपापल्या फिरतीवर युरोपात असणार होते, तिथेच भेटून गाठ बांधणार होते. तिच्या एकाकीपणावर, नैराश्यावर आता इलाज होईल अशा कल्पनेने खूप आनंद वाटला. ती मुळातच रोमॅन्टिक, तेव्हा जवळपास इंद्रधनुष्यावरच पोचली होती! खूप थट्टामस्करी, कौतुकं करून घेऊन लग्नासाठी म्हणून गेली ती मात्र बराच काळ गायब झाली.

जगरहाटी सुरू राहातेच, पण मध्येच कधीतरी आठवण निघायची मात्र तिची. आता कुठे असेल, लग्न मानवलं असेल का असं मनात यायचं. एखादी चौकशीची ईमेल 'हवाओं पे लिख दो हवाओं के नाम' म्हणून पाठवली जायची.

मग अशीच एकदा धूमकेतूसारखी तिची ईमेल उगवली. खूप आनंदाने उघडली, पण बातमी चांगली नव्हती. प्रेग्नन्ट असताना, नवरा आणि इतर कुटुंबीय नको म्हणत असताना, कामाच्या निमित्ताने कुठे आडगावात जाऊन राहिली होती, तिथेच तिचा गर्भपात झाला होता. ते झालं तेव्हा अगदी एकटी होती, आणि नंतर एकाकी झाली होती. नवरा, आई, सासूसासरे जपत होते पण त्यांच्या डोळ्यांत कायम तिला 'तरी मी म्हटलं होतं' ही फिर्याद दिसायची! त्यात ती पूर्वी कधीतरी स्मोकिंग करायची हे सासूच्या कानावर गेलं होतं. तिचा गर्भपात हा तिचा गुन्हा ठरू पाहात होता. इतकी मोठी वैयक्तिक ईमेल तिने प्रथमच पाठवली असेल - पण वाचवत नव्हती. पूर्णपणे कोलमडून गेली असावी असं जाणवत होतं. त्यात नवरा परदेशात होता आणि ही सासरी राहिली होती रिकव्हरीसाठी.

मी एरवी फार खत्रूड बाई आहे, पण ती ईमेल वाचताना जीव तुटला. तिचं सांत्वन करणारी, धीर देणारी खूप हळुवार ईमेल उत्तरादाखल तिला पाठवली. आता आठवलं की हसू येतं, पण भावनेच्या भरात मी तिला 'बाळा' म्हटलं होतं एका ठिकाणी. तिचंही लगोलग प्रत्युत्तर आलं - ती व्हिएन्नाला तिच्या नवर्‍याकडे चालली होती. माझी ईमेल तिने विमानात पुन:पुन्हा वाचली म्हणे.
धाकट्या बहिणीची वाटेल तशी काळजी वाटत राहिली त्यानंतर तिची!

काळाचं औषध लागू पडलं असावं. नंतर बर्‍याच काळाने पुन्हा ऑनलाइन भेटली तेव्हा बरीच सावरलेली, बर्‍यापैकी नॉर्मल वाटली. खूप बरं वाटलं.
मी तेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट होते. अजून बातमी ऑफिशियल व्हायची होती, पण हा धूमकेतू पुन्हा केव्हा उगवेल काय माहीत, असं वाटून तिला बातमी सांगितली. याही वेळी अगदी लगोलग उत्तर आलं तिचं. माझं अभिनंदन केलं होतं आणि 'आता मलाही पुन्हा चान्स घ्यावासा वाटायला लागला तुझं ऐकल्यावर' असं लिहिलं होतं. खूप भरून आलं वाचून. देवावर माझा विश्वास नाही, पण हिचं इथून पुढे सगळं छान होऊ दे असं एक मनोमन साकडं घातलं गेलं.

पुन्हा चान्स नाही, पण दुसरी एक बेबी मात्र तिने त्यानंतर जन्माला घातली - कादंबरी. तोवर छोटे छोटे ललित लेख लिहीत होती, ते जोडून एक कादंबरी रचली होती तिने. मला पहिला मसुदा अभिप्रायासाठी पाठवला होता.
अभिप्रायाची तशी आवश्यकताच नव्हती, ती उत्तम लेखिका होतीच. कादंबरीची भट्टी जमून आली होती. विचारलं तर छापायची का, कधी छापायची असं काही ठरवलेलं नाही म्हणाली.

पुढे आणखी काही काळ लोटला. मध्यंतरीच्या काळात माझ्याबरोबर एका ऑनलाइन उपक्रमाच्या संयोजनातही तिने सहभाग घेतला.

तीनेक वर्षांपूर्वी मी व्हॉट्सअ‍ॅप वापरायला लागले. त्यात कॉन्टेक्ट्स पाहताना सहज लक्षात आलं की उपक्रमासाठी घेतलेल्या तिच्या फोन नंबरवर प्रोफाइलमध्ये निराळ्याच व्यक्तीचा फोटो आहे! मजा म्हणजे या व्यक्तिशीही माझी त्याच संकेतस्थळामुळे जुजबी ओळख होती. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीला मी एका स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष भेटलेही होते! ही व्यक्ती मध्यमवयीन आणि व्यवसायाने पत्रकार होती. मी गोंधळले. खरंतर अर्थ उघड होता, पण माझं मन मान्य करायला तयार नव्हतं. त्या दोघींत नामसाधर्म्य होतं, आपणच कदाचित नंबर सेव्ह करताना घोळ केला असेल अशी मी मनाची समजूत घातली.

मग काही दिवसांपूर्वी ती माझी ऑनलाइन आभासी सखी ही या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार्‍या व्यक्तीचाच एक अवतार असल्याची कुणकूण दुसऱ्य एका मैत्रिणीकडून मला लागली. या वेळीमात्र मी त्या नंबरवर मेसेज पाठवला - ओळख दोन्हीकडे होतीच, विचारलं - मी नंबर चुकीच्या नावाने सेव्ह केला आहे का?

उत्तर आलं नाही.
म्हणजे, थेट उत्तर आलं नाही. फक्त त्या व्यक्तीने तिचा प्रोफाइल फोटो तत्परतेने काढून टाकला.

एक गुपित फुटलं, एका विश्वासाला तडा गेला.

खूप वाईट वाटलं. आता इतकी वर्षं आंतरजालावर संचार केल्यावर आभासी अवतार / डुप्लिकेट आयडीज ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. त्याचं दु:ख वा राग वाटण्याऐवजी उलट 'आयडी ओळखा' खेळ खेळण्यापर्यंत मजल गेली आहे.
पण हे प्रकरण त्यातलं नव्हतं. इथे जीव गुंतला होता.

तिने मला काही harm पोचवला का? नाही. माझी दुरुपयोग करता येण्यासारखी काहीही माहिती ना त्या व्यक्तीने कधी मागितली, ना मी कधी दिली. तिने कुठला शब्द देऊन मोडला का? माझं काही नुकसान झालं का? नाही, अजिबातच नाही.
पण तिने एक इतकं elaborate आभासी विश्व विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीसारखं इतकी वर्षं maintain केलं? का? काय मिळालं असेल त्यातून?!
लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि न घडलेल्या अपघात-दुर्घटनांबद्दल हाडामांसाच्या माणसांकडून सांत्वनं करून घेणं निराळं! कोणाचेतरी साखरपुड्याचे फोटो आपले म्हणून पाठवणं निराळं!

यथावकाश त्या व्यक्तीने स्वत: वस्तुस्थिती मान्य केली असं कळलं. फोटो कोणाचे होते वगैरे तपशिलांत तसा अर्थ राहिला नव्हता, पण तेही समजलं. जे घडलं त्यात तिला फारसं काही गैर वाटलेलंच नाही असंही कानावर आलं. तिच्या लेखी हा सगळाच एक साहित्यिक प्रयोग होता.
मला एेकताना वाटलं की माझ्यासारखी मंडळी या प्रयोगाचं साहित्य ठरली.

इतका काळ इतक्या लोकांना एका काल्पनिक व्यक्तीवर विश्वास ठेवायला लावणं हा तिच्यातल्या लेखकाचा विजय म्हणायचा की हे इतकं बेधडक बेमालूम करावंसं वाटणं हा माणूसकीचा पराभव?
कोण जाणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे जात काढायची वेळ आली आंबोळेवर?
बाकी माझ्या कुटुंबात बरेच डॉक्टर्स आहेत की नाहीत याचा इथे कुठून संबंध आला?
अर्थात जसा जातीचा संबंध नव्हता तसाच कुटुंबाचाही नाही, मी कुठे राहते याचाही नाही आणि यापुढे जी काय वैयक्तिक भडास निघेल या बाईंच्या तोंडून तिचाही इथे संबंध नाही.
पण आश्चर्यही वाटत नाही. शेवटी तुम्ही टिपापावाले. यापलिकडे वेगळे काय करणार?

काय आहे, आपण कुणावर टीका करताना कुणि आपल्यावरहि टीका करू शकतात याचे भान ठेवावे! तुम्ही केलेली टीका बरोबर, विषयानुरूप, नी तरल अशीच असते नि इतरांनी केलेली मात्र चुकीची असे समजणे उपयोगाचे नाही हे इथल्या लोकांच्या लक्षात यावे म्हणून लिहीले.<<
Proud
हे झक्कीनी बोलावे? Rofl

नीधपला या सगळ्याची कल्पना पहिल्यापासून होती असं शर्मिला फडकेकडूनच समजलं. तेव्हा नीधपचा इथून लक्ष भलतीकडे वळवायचा करुण प्रयत्न मला समजू शकतो.

हेही बघण्यासारखं आहे:
tulip.jpg

'...only smarter' मागे केवढा अर्थ दडलाय म्हणायचा!
>>>>मलाही असं काहीसं वाटलं, की I am just like you! ..Only smarter! हे किती अ‍ॅप्ट टॅग लाइन आहे. स्मार्टर खरीच Happy

मी वैयक्तिक पातळीवर कधीच कनेक्टेड नसल्याने मला स्वतःला इतकं नाही तरी खूप हार्ड हिटिंग फसवलं गेल्याचं फीलिंग आलं. आपण इतके कसे बावळट ठरलो, असं काहीसं.

मला आत्ता त्रयस्थपणे विचार करताना जाणवतं की मला ट्युलिप आणी शर्मिला फडके दोघींचं लिखाण खूप आवडतं. एखाद्या लेखकाला असा प्रयोग करावासा वाटणं हे ही एका पातळीवर समजू शकते पण तो प्रयोग एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला अंगात भिनवून ब्लॉग लिहिणे यापुरता मर्यादित हवा होता. त्या व्यक्तिमत्वाच्या बुरख्याखाली लोकांशी वैयक्तिक पातळीवर कनेक्ट होणं याची गरज नव्हती. त्यामुळेच ते वियर्ड बिहेवियर खाली जातय माझ्या लेखी एथिकल / एन-एथिकल पेक्षा.

आता कादंबरी वाचावीच लागणार Happy

कृपया इथे भांडू नका ही नम्र विनंती.

स्वाती इथे स्क्रिनशॉट मध्ये शर्मिला फडके नी लिहिलं आहे की मुळात हे इतकं मोठं सिक्रेट कधीच नव्हतं. असं होतं तर मग जेव्हा तु नंबर चुकिचा सेव्ह केला आहेस का असं विचारल्यावर तुला उत्तर न देता डिपि का बदलला? Uhoh

आणि भावना दुखावल्याचं वाईट वाटतंय ही भावना शब्दात आलि आहे पण त्याबद्दल दु:ख प्रतित होत नाहिये. anything for a good fiction हे अजून वरचढ. (की मी केलं ते कसं योग्य होतं)

किती विचित्र अनुभव आहे हा .. मला जर कोणी गर्भपाताची किंवा तत्सम वैयक्तिक शारिरीक्/मानसिक दु:खाची/नुकसानीची बातमी सांगितली तर मी त्या व्यक्तीच्या दु:खाचा विचार करून प्रचंड अस्वस्थ होते. जर ती बातमी खोटी होती असं मला कळलं तर मला तरी खूप मानसिक त्रास होईल.

तुम्ही खूप संयंतपणे लिहिलंय खरोखरच !

शुम्पी छान पोस्ट.

ला आत्ता त्रयस्थपणे विचार करताना जाणवतं की मला ट्युलिप आणी शर्मिला फडके दोघींचं लिखाण खूप आवडतं. एखाद्या लेखकाला असा प्रयोग करावासा वाटणं हे ही एका पातळीवर समजू शकते पण तो प्रयोग एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला अंगात भिनवून ब्लॉग लिहिणे यापुरता मर्यादित हवा होता. त्या व्यक्तिमत्वाच्या बुरख्याखाली लोकांशी वैयक्तिक पातळीवर कनेक्ट होणं याची गरज नव्हती. त्यामुळेच ते वियर्ड बिहेवियर खाली जातय माझ्या लेखी एथिकल / एन-एथिकल पेक्षा. >> हे खुपच पटलं. एकदम छान शब्दात सुस्पष्ट केलं आहेस.

आता यापुढे इन्टरनेटवरच काय, प्रत्यक्ष व्यक्ती भेटून "हॅल्लो, मी अमुक अमुक" म्हणाली तर मनात 'कशावरून?' असा प्रश्न उमटेल इतका धसका मला बसला. मग काय आता भेटलेल्या प्रत्येकाला फोटो आयडी मागायचा? तोही फोर्ज करता येतो की!
फसवणूक करणारे फसवले जाणार्‍यांपेक्षा स्मार्टरच असतात. असो.

ग्लोबल सिटिझनशिपची लालूच दाखवणार्‍या आंतरजालावरच्या अनुभवांमुळे आपण शेवटी आपलं वर्तुळ प्रत्यक्ष भेटू शकणार्‍या लोकांइतकं मर्यादित ठेवायला शिकायचं हा भलताच विरोधाभास झाला!

स्वाती, एक अनुभव म्हणून हा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे.

इतक्या प्रतिथयश, यशस्वी आणि समाजात एक वेगळीच इमेज घेऊन वावरणार्‍या व्यक्तीकडून इतकं विचित्र वर्तन घडावं आणि त्याचा खेदही नसावा हे फारच क्रीपी आहे.

त्या व्यक्तिमत्वाच्या बुरख्याखाली लोकांशी वैयक्तिक पातळीवर कनेक्ट होणं याची गरज नव्हती. त्यामुळेच ते वियर्ड बिहेवियर खाली जातय माझ्या लेखी एथिकल / एन-एथिकल पेक्षा. >>> एक्झॅक्टली. शूम्पी +१

>>> स्वाती इथे स्क्रिनशॉट मध्ये शर्मिला फडके नी लिहिलं आहे की मुळात हे इतकं मोठं सिक्रेट कधीच नव्हतं. असं होतं तर मग जेव्हा तु नंबर चुकिचा सेव्ह केला आहेस का असं विचारल्यावर तुला उत्तर न देता डिपि का बदलला

मलाही तोच प्रश्न पडला!
बहुधा ते सीक्रेट नव्हतं असं म्हणणं ही आता सुचलेली सारवासारव आहे.

स्वाती, लेख वाचला तेव्हाची ओह ही प्रतिक्रिया तशी आणि तेवढीच उमटवली होती.
आता डिटेल्स समोर आल्यावर आणखी काही तरी लिहायला हवं, असं वाटतंय, काय ते कळत नाहीए.
मैत्रेयी यांच्या पहिल्या प्रतिसादाला +१ इतकंच लिहीन.

Any publicity is good publicity नियमानुसार कादंबरीला ह्या धाग्यामुळे additional वाचकवर्ग मिळणार की काय! कादंबरीसाठी एकदम चारों उंगलीया घी में! आधी खोटे व्यक्तीगत संबंध प्रस्थापित करायचे मटेरीयल साठी आणि हा गौप्यस्फोट आयतीच पब्लिसिटी! स्वतःच डोकं काहीच नाही म्हणजे Happy सगळीच उधारी, आयजीच्या जीवावर बायजी उदार Happy

क्लास वै तर काही बोलायलाच नको क्लास C चा पण नाही Happy

हे सगळं कल्पनेपलिकडचे आहे.
आता नावाचा खुलासा झालाच आहे तर सांगायला हरकत नाही, लेख वाचल्यावर मला ट्यूलिप आणि नंदिनी जोडी वाटलेली. (ती ही पत्रकार असल्याचा संदर्भ आठवतोय, आणि कादंबरयाही लिहिते) (नंदिनी, मनापासून सॉरी, काहीच माहिती नसताना चुकीची समजूत मीच मनात करून घेतली)
त्यामुळे योग्य ते नाव जाहिर केल्याबद्दल आभार. मनातला गैरसमज तरी दूर झाला.

शूम्पी +१
मामी +१ क्रीपी वाटतंय

बाब्बो! मला हे वरचे स्क्रिन शॉट बघून धक्काच बसला. हे असे काही कनेक्शन असेल असे क्षणभरही वाटले नाही. Uhoh
मला ट्युलिप आणि शर्मिला या दोन्हीचे लेखन आवडते. मात्र लेखन वाचले, 'आवडले, छान लिहिलयं ' म्हणून प्रतिसाद दिला इतपतच इंटरअ‍ॅक्शन! मात्र माझी भावनिक गुंतव्णूक झाली असती तर मी देखील खूप दुखावली गेली असते. आपण कुणाच्यातरी आयुष्यातल्या वाईट घटना खर्‍या समजून एकीकडे दु:खी होतो, एकीकडे त्या व्यक्तीला धीर देतो, तिच सगळं चांगलो होवो म्हणून प्रार्थना करतो आणि मग कळत अशी कुणी खरी व्यक्ती अस्तित्वातच नाहीये अशावेळी माणूस दुखावले जाणारच ना!
इथे काहींनी स्वातीवर वैयक्तिक शेरेबाजी का केलेय? कुणाच्याही बाबत कुणीही हा असा प्रकार केला तर ते चुकीचेच आहे. अगदी साहित्य निर्मितीसाठी वगैरे लेबल लावले तरी हे असे भावनांशी खेळणे जस्टीफाय नाही होत. हे असे कॅलक्युलेटेड दुसर्‍यांच्या भावनांशी खेळून मग तरल की काय ते उच्च दर्जाचे लेखन होणार असेल तर काय उपयोग?

शुम्पी, पोस्ट आवडली.

ओह तो शर्मिला चा स्क्रीशॉ पाहिला. मग हे सीक्रेट नव्ह्यतंच तर आता रीसेन्टली त्या "ये शहर बडा पुराना" वर मी एक साधीच ( मला अजूनही ती हार्मलेस वाटतेय) कमेन्ट दिली होती ती डिलीट कर असे का सुचवण्यात आले ( आणि मग तो आख्खा लेअखच का उडवला गेला) ते कळले नाही!
नी, तुझे पोस्टस् वाचून "सिरियसली?" असे वाटले. स्वातीशी किंवा शर्मिलाशी तुझे संबंध कसेही असले तरी झालेली घटना जस्टिफाय करता येतेय का तुला? कशी? Uhoh जे चूक आहे त्याची पाठराखण कशाला!! असो.

मै, मला हा लेख तिखटमीठ लावून केलेला कांगावा जास्त वाटतोय.
आताच बघ "नीधपला या सगळ्याची कल्पना पहिल्यापासून होती असं शर्मिला फडकेकडूनच समजलं." या पूर्णपणे खोट्या वाक्यातून ही बाई काय सांगायला बघतेय नक्की? हा कांगावा नाही? ज्या व्यक्तीला व्हिलन ठरवायचे असते त्या व्यक्तीला सर्वजणच व्हिलन ठरवतील अश्या प्रकारे लिखाण आणि कमेंटस आर्टिक्युलेट करण्यात स्वाती आंबोळे तरबेज आहे याचा भरपूर अनुभव मी घेतलाय. सो तिच्याबद्दल ना सहानुभूती, ना तिच्या बोलण्यावर विश्वास.

दुसरीकडे बघशील तर मला कादंबरी पूर्ण झाल्यावरचा पहिला ड्राफ्ट वाचला तेव्हा हे समजलं होतं. धक्का बसलाच. मी तिच्याशी खूप तपशिलात बोलले आहे यावर. जे खटकले, जे चुकीचे वाटले तेही. काही चूकांना तीही चूकच मानते हे मला माहितीये. तिच्या पण तिला लक्षात येईतो ते घडून गेले होते. अनडन करता येण्यासारखे नव्हते. हे सगळे मला माहितीये.

चूक आहे त्याची पाठराखण केली नाहीये. पण चूक झाली म्हणून पताका लावून, बारकेसारके प्रसंग आपल्या बाजूने फिरवून जाहिर डांगोरा पिटणे आणि त्या व्यक्तीचे खच्चीकरण करणे हे असलं करायची मला गरज वाटली नाही. विशेषतः तीने स्वतःच हे सगळं तपशिलात लिहिले आहे तिच्या कादंबरीच्या फॉर्वर्डमधे त्यावेळेला तर अजिबातच नाही. आणि तिने लिहिले नसते तरी हे असलं करायला ही चूक आहे गुन्हा नाही. हे असलं करायला मी न्यायाधीश नाही, सर्वगुणसंपन्न आणि कधीच कुठली चूक केलेली व्यक्ती नाही. अर्थात आंबोळे अशी व्यक्ती आहे असा तिचा स्वतःबद्दल गैरसमज आहे त्यामुळे तिने असे करणे साहजिकच आहे. पण म्हणून प्रत्येकाने तिच्याशी सहमत असावे आणि तिने जिच्याबद्दल लिहिलेय तिचा जोरदार निषेधच करावा इथे जाहिररित्या ही अपेक्षा अनाठायी आहे.

आणि हे शेवटचे.. 'एनिथिंग फॉर गुड फिक्शन!' या वाक्याला ज्या डंबपणे इथे सगळे जगबुडी टाइप समजतायत तेवढे कोणीच इथे डंब वा इनोसंट नाहीये.

तो अजिबात करायला नको होता, या आयडीचे वैयक्तिक मेल्स, मेसेज बंद ठेवायला हवे होते हे त्यावेळी लक्षात आले नाही. >>>
हे खरं वाटत नाहिये, infact तेंव्हा एन्जोय केलय असं वाटतय.

>>>चूक झाली म्हणून पताका लावून, बारकेसारके प्रसंग आपल्या बाजूने फिरवून जाहिर डांगोरा पिटणे आणि त्या व्यक्तीचे खच्चीकरण करणे -

हे खच्चीकरण फारच बोकाळले आहे मायबोलीवर. पाठ फिरवुन म्हणुनच लोकं निघुन गेले आहेत. आपण दुसर्‍याला जसे बरेवाईट अनुभव देतो, तसेच आपल्याला येणार. काही विशेष नाही.

>>> हे सगळे मला माहितीये. चूक आहे त्याची पाठराखण केली नाहीये.
पण चूक झाली म्हणून पताका लावून, बारकेसारके प्रसंग आपल्या बाजूने फिरवून जाहिर डांगोरा पिटणे आणि त्या व्यक्तीचे खच्चीकरण करणे हे असलं करायची मला गरज वाटली नाही.
<<<

नीधप,
तू हे जे आत्ता लिहिलंस त्यानंतर तुझ्या कोणत्याही पोस्टला उत्तर द्यायची तसदी मी घेणार नाही.

ही पार्श्वभूमी माहिती असूनही तुला हे शर्मिलाचं खच्चीकरण करण्यासाठी फॅब्रिकेट केलेलं लिखाण वाटत असेल आणि मला वाटलेलं सखेदाश्चर्य चुकीचं किंवा बेगडी, तर I can only feel sorry for you.

प्लीज डोण्ट फील सॉरी फॉर मी. प्लीज डोण्ट फील एनिथिंग फॉर मी.

>>तू हे जे आत्ता लिहिलंस त्यानंतर तुझ्या कोणत्याही पोस्टला उत्तर द्यायची तसदी मी घेणार नाही.<<
हे प्लीज कल्पांतापर्यंत लक्षात ठेव.

मला पहिल्यापासून माहिती होतं असं तुला शर्मिलाने सांगितल हे तू खोटं बोलते आहेस. वरच्या सगळ्या कथेतले काही बारकेसारके प्रसंग तू स्वतःच्या बाजूने फिरवून लिहिले आहेस हे मला माहितीये पण त्याबद्दल मी लिहिणार नाही. शर्मिलाला लिहायचे असेल तर ती लिहील.

इतक्या प्रकारे उठसूठ लोकांना दुखावणे, अपमान करणे, ठरवून हल्ला करणे वगैरे केलेल्या व्यक्तीने इतके दुखल्याचे नाटक केले की हास्यास्पद ठरते हे विसरायला झाले असेल तर ते ही लक्षात ठेवावे.

हाच लेख मायबोली गणेशोत्सवाचे निमित्त साधूनफडकेबाईंच्या नव्या पुस्तकाची जाहिरात करण्यासाठी लिहिला असेल का?
मागे त्या गुलाबजाम सिनेमाच्यावेळी कुंडलकरांनी असंच केलं होतं.
मग तर मायबोली गणेशोत्सवाला वापरून घेतलंय आज्ञि आपणा सगळ्यांनाही.
खरंतर ट्युलिपचा 'बाय इन्विटेशन ओन्ली ' नसलेला ब्लाॅग वाचून खूप वर्षे झाली, मात्र आता अचानकच ती परत सर्वांना दिसेल असं लिहायला लागली, आता अचानकच गणेशोत्सवाचा टी आर पी लक्षात घेऊन हा लेख लिहिण्यात आलाय.
सारी बाईंया मिली जुली हैं जी!

टिपापा वर वावर असणार्‍या व्यक्तींशी व्यक्तीगत संपर्क राखण्यात इंटरेस्ट होता वाटतं.

हे व्यक्तीचित्रण वाटत नाही. लेखाचं नावंही मिसफिट वाटतं. व्यक्तीचित्रण असण्याच्या दृष्टीने.

बाकी, लेखात उल्लेख केलेला डुप्लिकेट आयडी, "खरा" आयडी आणि अर्थातच स्वाती स्वतः हे सर्वजण लिहीण्यात एकदम तरबेज आहेत तेव्हा हा लेख, लेखनशैली त्याला अजिबात अपवाद नाही.

स्वाती आंबोळे, लेख खूपच प्रभावी आणि संयत झाला आहे. हे वंचनेचे दु:ख नाही, कुणीतरी आपल्याला मूर्ख ठरवून गेल्याची ठसठसणारी जखम नाही. हे खूप खोल, आतपर्यंत हलवून टाकणारे आर्त आहे. कुणाशीतरी एका वेगळ्याच, उच्च पातळीवर जपलेला उत्कट भावबंध समूळ उखडून गेल्याची हळवी व्यथा आहे. तुमच्यासाठी ट्यूलिप ही खरीखुरी, हाडामांसाची ब्यक्ती होती आणि आता ती मृत झाली आहे.

बाकी नीधपंच्या कुठल्याही पोस्टला उत्तर देणार नाही हा निर्णय एकदम स्तुत्य!
आणि नीधप, ह्यावेळेस खरा आयडी वापरला म्हणून तुमचे पण अभिनंदन. Lol

आणि त्या हेलांना पण इग्नोअर मारा. त्या मा.ल.क. च्या वेळेस तुम्ही त्यांच्या ओरिजिनल आयडीला त्याची योग्य जागा दाखवलीत तेव्हापासून दुखावलेत ते. Proud

सर्वप्रथम तुम्ही कॅट्फिश झाल्याची कबुली दिल्याबद्दल अभिनंदन. बरेच होतात पण अशी जाहिर कबुली देण्याचं धाडस कोणी सहसा करत नाहि. Proud कॅटफिशिंग अनएथिकल (जोवर समोरच्याचं न भरुन निघणारं नुकसान करणारं असेल तर) आहे का, हा वादाचा मुद्दा आहे. टोपण नावांने लिखाण करणं हा गुन्हा नाहि आणि त्याच नावाच्या भूमिकेला अनुसरुन प्रतिसाद देणे हा हि नसावा. आता हे सगळं आपण कितपत सिरियस्ली घ्यावं हा प्रश्न व्यक्तिसापेक्ष आहे. शर्मिला फडक्यांच्या बाजुची क्ल्पना वरच्या स्र्किन्शॉटवरुन येत आहेच, तुमच्या भावनाहि समजल्या आहेत पण या प्रकरणात तुम्ही थोडं ओवरबोर्ड गेला आहात असं वाटतंय...

आता कादंबरी वाचावीच लागणार
<<
प्लस चक्रम यांच पर्तिसाद.

टीपार्टीपार्ले अन पार्ल्यातल्या गप्पा, अशा लुगडी ब्रिगेडच्या आयमिन लुगड्याच्या दोन चिंध्या, उर्फ डिझायनर साड्या झाल्याच्या काळी मी तिथे होतो, इतकेच नोंदवितो.

बादवे, फडके काकू स्वतः का नाही आल्या अजून इथे

Pages