टीप : प्रस्तुत ललितातील सर्व पात्रे खरी आहेत. कोणत्याही काल्पनिक व्यक्तीशी त्यांचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.
---
"So you all got catfished?! And I thought you were a bunch of smarties!" - लेक डोळे फिरवत उद्गारला आणि पुन्हा टीव्हीकडे वळला.
मी हळूच टेबलाखाली फोन धरून आम्ही Catfished म्हणजे काय झालो ते गूगल केलं. अर्बन डिक्शनरीने तत्परतेने सांगितलं: 'Catfish : Someone who pretends to be someone else, especially on the internet.'
---
तिची माझी ओळख जवळपास एका तपापूर्वीपासूनची. इन्टरनेटला घरीदारी सहज अॅक्सेस उपलब्ध झाला आणि जगभरातील मराठी पाउलखुणा जपणार्या संकेतस्थळांवर संचार करता येऊ लागला त्या काळातली. आता मुलांना आंतरजालाचं नागरिकशास्त्र शाळेपासून शिकवतात. आम्ही शिकलो अनुभवांतून. आपल्या फावल्या वेळेत, आपल्या मातृभाषेत ज्यांच्याशी संवाद साधता येतो अशी मंडळी भेटणं याचं अप्रूप परदेशात अजूनही वाटतं, तेव्हा तर तो जवळपास चमत्कार वाटायचा! मग त्यातही समानधर्मीयांबरोबर विशेष सख्य जमणं ओघाने आणि सहज झालं. पुढे यातली बरीच मंडळी प्रत्यक्षातही भेटली आणि आतातर आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत.
ती फारशी कोणाला प्रत्यक्ष भेटल्याचा इतिहास नाही. पण ऑनलाइन गप्पा मारायला कधीतरी यायची. अतिशय सुंदर, तरल ललित लेखन करायची. मला तिचं लिखाण आणि तिला माझ्या कविता आवडत असल्यामुळे मग कधीतरी व्यक्तिगत निरोप - ईमेल्सही सुरू झाल्या आणि मैत्री दृढ होऊ लागली. जुजबीच पण खाजगी माहितीही एकमेकींना सांगितली गेली.
माझ्यापेक्षा वयाने लहान होती ती. जाहिरातविश्वात काम करायची. पार्ल्यात तिच्या वडिलांचं घर होतं. डॉक्टर होते ते. भाऊ अमेरिकेत होता, आई पूर्वी विल्सन कॉलेजला मराठीची प्राध्यापिका होती. तिने लहानपणापासून हट्टाने मराठी वाचनाची सवय लावल्यामुळेच ही इंग्रजी माध्यमात शिकलेली असून इतकं उत्तम मराठी लिहायची.
कामाच्या निमित्ताने जगभरात भटकंती करायची ती आणि भेटली की नेहमी काहीतरी सुरस आणि चमत्कारीक असायचं तिच्या पोतडीत सांगण्यासारखं. बहुश्रुतता होती, तल्लख विनोदबुद्धी होती आणि एक तरुण सळसळता उत्साह होता - आमच्या नाठाळ ग्रूपमध्ये किती सहज मिसळून गेली होती ती.
पुढे एका बंगाली मुलाच्या प्रेमात पडली. त्यांचा शेजारीच होता. सुंदरबनाच्या पर्यावरण संवर्धन-संरक्षणाचं काम करणार्या टीमचा भाग होता. ही महागड्या उंची वस्तूंची शौकीन, जगभर फिरणारी, एलीट अर्बन उत्साही मुलगी आणि तो अबोल, विरक्त, ध्येयासक्त मुलगा. मजेशीर जोडा होता. पण ती आनंदात होती. त्याच्याबद्दल बोलायला, त्याच्यावरून चिडवून घ्यायला किती आवडायचं तिला! तिचा साखरपुडा झाल्याचं कळलं तेव्हा मी कधी नव्हे ते तिला फोटो पाठवायला सांगितलं. तोवर तितपत हक्क वाटायला लागला होता. तिच्या लिहिण्यावरून माझ्या डोळ्यांसमोर जशी छबी निर्माण झाली होती, तशीच होती फोटोतली ती. छान होता जोडा. खूप मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या तिला.
त्याच काळात कधीतरी वडील गेले तिचे. त्यांच्याशी ती खूप - आईपेक्षाही अधिक अटॅच्ड होती. वडिलांचं जाणं खूप खोल परिणाम करून गेलं तिच्यावर. त्यात 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप'चे तोटे दिसायला लागले होते. भावी नवरा मुळात अबोल, आणि त्यात चॅट-ईमेलवर फार मोकळेपणी बोलणारा नव्हता. तिच्या बोलण्यात कधीतरी डिप्रेशन डोकावायला लागलं. काळजी वाटायची, पण वडिलांबद्दल सांत्वनपर ईमेल पाठवण्यापलीकडे आणि नंतर भेटेल तेव्हा थोडं खेळीमेळीचं बोलण्यापलीकडे काय करता येणार होतं आम्हाला?
खूप पॅशनेट माणसांचा उत्साह जसा झगमगीत असतो तितकंच त्यांचं नैराश्यही खोल काळोखं असणार हे बहुधा आपण गृहित धरलेलं असतं.
तशाही तिच्या भेटी, तिचं ऑनलाइन येणं किंवा ईमेल्स वगैरेंना उत्तर देणंही फार नियमीत नसायचं, पण फिरती-प्रवासांच्या गडबडीत नसेल जमत असं समजायचो आम्ही. आता ते आणखीनच अनियमित झालं होतं.
मग एकदा आली ती आनंदाची बातमी घेऊन. ती लग्न करणार होती. दोघंही आपापल्या फिरतीवर युरोपात असणार होते, तिथेच भेटून गाठ बांधणार होते. तिच्या एकाकीपणावर, नैराश्यावर आता इलाज होईल अशा कल्पनेने खूप आनंद वाटला. ती मुळातच रोमॅन्टिक, तेव्हा जवळपास इंद्रधनुष्यावरच पोचली होती! खूप थट्टामस्करी, कौतुकं करून घेऊन लग्नासाठी म्हणून गेली ती मात्र बराच काळ गायब झाली.
जगरहाटी सुरू राहातेच, पण मध्येच कधीतरी आठवण निघायची मात्र तिची. आता कुठे असेल, लग्न मानवलं असेल का असं मनात यायचं. एखादी चौकशीची ईमेल 'हवाओं पे लिख दो हवाओं के नाम' म्हणून पाठवली जायची.
मग अशीच एकदा धूमकेतूसारखी तिची ईमेल उगवली. खूप आनंदाने उघडली, पण बातमी चांगली नव्हती. प्रेग्नन्ट असताना, नवरा आणि इतर कुटुंबीय नको म्हणत असताना, कामाच्या निमित्ताने कुठे आडगावात जाऊन राहिली होती, तिथेच तिचा गर्भपात झाला होता. ते झालं तेव्हा अगदी एकटी होती, आणि नंतर एकाकी झाली होती. नवरा, आई, सासूसासरे जपत होते पण त्यांच्या डोळ्यांत कायम तिला 'तरी मी म्हटलं होतं' ही फिर्याद दिसायची! त्यात ती पूर्वी कधीतरी स्मोकिंग करायची हे सासूच्या कानावर गेलं होतं. तिचा गर्भपात हा तिचा गुन्हा ठरू पाहात होता. इतकी मोठी वैयक्तिक ईमेल तिने प्रथमच पाठवली असेल - पण वाचवत नव्हती. पूर्णपणे कोलमडून गेली असावी असं जाणवत होतं. त्यात नवरा परदेशात होता आणि ही सासरी राहिली होती रिकव्हरीसाठी.
मी एरवी फार खत्रूड बाई आहे, पण ती ईमेल वाचताना जीव तुटला. तिचं सांत्वन करणारी, धीर देणारी खूप हळुवार ईमेल उत्तरादाखल तिला पाठवली. आता आठवलं की हसू येतं, पण भावनेच्या भरात मी तिला 'बाळा' म्हटलं होतं एका ठिकाणी. तिचंही लगोलग प्रत्युत्तर आलं - ती व्हिएन्नाला तिच्या नवर्याकडे चालली होती. माझी ईमेल तिने विमानात पुन:पुन्हा वाचली म्हणे.
धाकट्या बहिणीची वाटेल तशी काळजी वाटत राहिली त्यानंतर तिची!
काळाचं औषध लागू पडलं असावं. नंतर बर्याच काळाने पुन्हा ऑनलाइन भेटली तेव्हा बरीच सावरलेली, बर्यापैकी नॉर्मल वाटली. खूप बरं वाटलं.
मी तेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट होते. अजून बातमी ऑफिशियल व्हायची होती, पण हा धूमकेतू पुन्हा केव्हा उगवेल काय माहीत, असं वाटून तिला बातमी सांगितली. याही वेळी अगदी लगोलग उत्तर आलं तिचं. माझं अभिनंदन केलं होतं आणि 'आता मलाही पुन्हा चान्स घ्यावासा वाटायला लागला तुझं ऐकल्यावर' असं लिहिलं होतं. खूप भरून आलं वाचून. देवावर माझा विश्वास नाही, पण हिचं इथून पुढे सगळं छान होऊ दे असं एक मनोमन साकडं घातलं गेलं.
पुन्हा चान्स नाही, पण दुसरी एक बेबी मात्र तिने त्यानंतर जन्माला घातली - कादंबरी. तोवर छोटे छोटे ललित लेख लिहीत होती, ते जोडून एक कादंबरी रचली होती तिने. मला पहिला मसुदा अभिप्रायासाठी पाठवला होता.
अभिप्रायाची तशी आवश्यकताच नव्हती, ती उत्तम लेखिका होतीच. कादंबरीची भट्टी जमून आली होती. विचारलं तर छापायची का, कधी छापायची असं काही ठरवलेलं नाही म्हणाली.
पुढे आणखी काही काळ लोटला. मध्यंतरीच्या काळात माझ्याबरोबर एका ऑनलाइन उपक्रमाच्या संयोजनातही तिने सहभाग घेतला.
तीनेक वर्षांपूर्वी मी व्हॉट्सअॅप वापरायला लागले. त्यात कॉन्टेक्ट्स पाहताना सहज लक्षात आलं की उपक्रमासाठी घेतलेल्या तिच्या फोन नंबरवर प्रोफाइलमध्ये निराळ्याच व्यक्तीचा फोटो आहे! मजा म्हणजे या व्यक्तिशीही माझी त्याच संकेतस्थळामुळे जुजबी ओळख होती. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीला मी एका स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष भेटलेही होते! ही व्यक्ती मध्यमवयीन आणि व्यवसायाने पत्रकार होती. मी गोंधळले. खरंतर अर्थ उघड होता, पण माझं मन मान्य करायला तयार नव्हतं. त्या दोघींत नामसाधर्म्य होतं, आपणच कदाचित नंबर सेव्ह करताना घोळ केला असेल अशी मी मनाची समजूत घातली.
मग काही दिवसांपूर्वी ती माझी ऑनलाइन आभासी सखी ही या व्हॉट्सअॅपवर दिसणार्या व्यक्तीचाच एक अवतार असल्याची कुणकूण दुसऱ्य एका मैत्रिणीकडून मला लागली. या वेळीमात्र मी त्या नंबरवर मेसेज पाठवला - ओळख दोन्हीकडे होतीच, विचारलं - मी नंबर चुकीच्या नावाने सेव्ह केला आहे का?
उत्तर आलं नाही.
म्हणजे, थेट उत्तर आलं नाही. फक्त त्या व्यक्तीने तिचा प्रोफाइल फोटो तत्परतेने काढून टाकला.
एक गुपित फुटलं, एका विश्वासाला तडा गेला.
खूप वाईट वाटलं. आता इतकी वर्षं आंतरजालावर संचार केल्यावर आभासी अवतार / डुप्लिकेट आयडीज ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. त्याचं दु:ख वा राग वाटण्याऐवजी उलट 'आयडी ओळखा' खेळ खेळण्यापर्यंत मजल गेली आहे.
पण हे प्रकरण त्यातलं नव्हतं. इथे जीव गुंतला होता.
तिने मला काही harm पोचवला का? नाही. माझी दुरुपयोग करता येण्यासारखी काहीही माहिती ना त्या व्यक्तीने कधी मागितली, ना मी कधी दिली. तिने कुठला शब्द देऊन मोडला का? माझं काही नुकसान झालं का? नाही, अजिबातच नाही.
पण तिने एक इतकं elaborate आभासी विश्व विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीसारखं इतकी वर्षं maintain केलं? का? काय मिळालं असेल त्यातून?!
लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि न घडलेल्या अपघात-दुर्घटनांबद्दल हाडामांसाच्या माणसांकडून सांत्वनं करून घेणं निराळं! कोणाचेतरी साखरपुड्याचे फोटो आपले म्हणून पाठवणं निराळं!
यथावकाश त्या व्यक्तीने स्वत: वस्तुस्थिती मान्य केली असं कळलं. फोटो कोणाचे होते वगैरे तपशिलांत तसा अर्थ राहिला नव्हता, पण तेही समजलं. जे घडलं त्यात तिला फारसं काही गैर वाटलेलंच नाही असंही कानावर आलं. तिच्या लेखी हा सगळाच एक साहित्यिक प्रयोग होता.
मला एेकताना वाटलं की माझ्यासारखी मंडळी या प्रयोगाचं साहित्य ठरली.
इतका काळ इतक्या लोकांना एका काल्पनिक व्यक्तीवर विश्वास ठेवायला लावणं हा तिच्यातल्या लेखकाचा विजय म्हणायचा की हे इतकं बेधडक बेमालूम करावंसं वाटणं हा माणूसकीचा पराभव?
कोण जाणे!
छान लिहिलं आहे
छान लिहिलं आहे
तो catfishचा भाग शेवटी टाकल्यास किंवा पूर्णच काढून टाकल्यास लेख अधिक परिणामकारक होईल असे वाटते.
स्वाती, उत्तम लेख. पात्र आणि
स्वाती, उत्तम लेख. पात्र आणि घटना खऱ्या आहेत म्हणून अजून पोचतोय. तंत्रज्ञान प्रगतीचे असेही दुर्दैवी पैलू जगाच्या विशेषतः पुढच्या पिढीच्या लहानपणापासूनच समोर येणार, आणि त्यांचा सामना करायला लागणार. कदाचित ते फार पटकन शिकतीलाही. लेकाच्या कंमेंट वरून तरी अशी आशा आहे.
तुम्ही लिहिल्याप्रमाणे तपशील गैर ठरतात पण आपण वापरले गेल्याची भावना मात्र उरतेच.
तळटीप - कॅटफिश शेवटी लिहिलात तरी चालेल पण काढून टाकू नका.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
थोडाफार असा अनुभव आला आहे. यात आपला कुठला गैरफायदा घेतला गेला नाही, पण आपण जीव ओतून, मनापासून त्या व्यक्तीला धीर देण्याचा, सांत्वन करण्याचा
खटाटोप केला तो व्यर्थ होता याची खंत नक्कीच वाटते.
Catfish भागाबद्दल अॅमीशी सहमत.
छानच लिहिलं आहे.
छानच लिहिलं आहे.
याला गैरफायदा घेणेच म्हणतात. नुकसान काय फक्त आर्थिकच असतं का?
असेही प्रकार चालतात हे माहीत नव्हते.
ओह!
ओह!
बापरे स्वाती! हे वाचून मलाही
बापरे स्वाती! हे वाचून मलाही आता कायम रुखरुख लागून राहील.
बाप रे! पाहिलं नाव सारखं(सेम)
बाप रे! पाहिलं नाव सारखं(सेम) का आडनांव. मायबोलीवर टोपणनावानी (डुप्लिकेट आयडी ने)इतकी फेमस कविता लिहिली आहे!
त्या व्यक्तीला फारसं काही
त्या व्यक्तीला फारसं काही वाटल नाही हे वाचून खुप आश्चर्य वाटलं.
Catfish भागाबद्दल आभा यांच्याशी सहमत.
स्वाती... !!! काहीच कल्पना
स्वाती... !!! काहीच कल्पना नव्हती. आजच कळतेय हे तुझा लेख वाचल्यावर.
मॅगी + १
छान व्यक्तिचित्रण.
छान व्यक्तिचित्रण.
हे खालचं, कुठूनतरी आणलेलं वाक्य रिलेट होईल
कलाकृतीतलं वास्तव आणि कल्पना ह्या संधीप्रकाशासारखे असतात. कलावंताच्या कल्पनाशक्तीत मिसळून ते वास्तव प्रत्यक्ष वास्तवापासून फार फार दूर येऊन ठेपलेलं असतं. तिथले वास्तवाचे तुकडे घेऊन कुणी प्रत्यक्षातल्या वास्तवाशी ताडून बघायला जाऊ नये.
सुरेख लिहिले आहेस स्वाती!
सुरेख लिहिले आहेस स्वाती! तुझी भावनिक इन्वॉल्वमेन्ट आणि खरा प्रकार कळल्यानंतर खरोखर किती हर्ट झाली असावीस ते जाणवत आहे पण तरीही तक्रारीचा सूर न जाणवता किती बॅलन्स्ड लिहिले आहेस!!
लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि असं कुणाच्या भावनांशी खेळणं वेगळं >>> +१११
ओह !
ओह !
सुरेख लिहिले आहेस स्वाती! तुझी भावनिक इन्वॉल्वमेन्ट आणि खरा प्रकार कळल्यानंतर खरोखर किती हर्ट झाली असावीस ते जाणवत आहे पण तरीही तक्रारीचा सूर न जाणवता किती बॅलन्स्ड लिहिले आहेस!!>>>>>+ १
फार सुंदर लिहिलं आहेस.
फार सुंदर लिहिलं आहेस.
आजच्या युगात असं ही खऱ्या आयुष्यात घडू शकतं हे माझ्या कल्पनेच्या ही पलीकडचं आहे. वाचल्या पासून माझ्या मनातून ही जात नाहीये तर तुझी अवस्था काय झाली असेल !
स्वाती चांगले लिहिले आहे.
स्वाती चांगले लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वी मला हे कळले होते पण तेव्हा धक्काच बसला केवळ. पण आता तू लिहिलेले वाचून खूप चीड आली, हताश वाटले. ती जाहिरातविश्वातली सुंदर लिहिणार्या व्यक्तीच्या लेखनशैलीच्या प्रेमात पडले होते. कितीतरी वर्षं!
थँक्यू हे लिहिल्याबद्दल.
स्वाती, छान लिहिलं आहेस. वर
स्वाती, छान लिहिलं आहेस. वर म्हटल्याप्रमाणे बॅलन्स्ड.
>>लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि न घडलेल्या अपघात-दुर्घटनांबद्दल हाडामांसाच्या माणसांकडून सांत्वनं करून घेणं निराळं! कोणाचेतरी साखरपुड्याचे फोटो आपले म्हणून पाठवणं निराळं!>> मान्यच. इतकी वर्ष ह्या दुसर्याच व्यक्तीची दुनिया निर्माण करुन खोटं बोलून चालवत रहायची काय मानसिक गरज असावी? आणि ह्यात काही चुकलं असंही न वाटणं हे कल्पनेपलिकडचं आहे.
स्वाती, खूपच बॅलन्स्ड लिहिलं
स्वाती, खूपच बॅलन्स्ड लिहिलं आहेस.
मराठी ब्लॉग विश्वाच्या अगदी सुरुवातीच्या काळात जे मुठभर ब्लॉगर होते त्यात ही असल्याने माझीही ओळख होती. मलाही साखरपुड्याचे फोटो आले होते आणि तू जे वैयक्तिक आयुष्यातले प्रसंग लिहिले आहेस त्या शिवायच अजूनही एक दोन प्रसंग सांगितले गेले होते. ब्लॉगविश्वातल्या आणखी तीन चार तरी जणांशीही ही व्यक्ती संपर्कात होती हे माहीत आहे.
तिने मला काही harm पोचवला का? नाही. माझी दुरुपयोग करता येण्यासारखी काहीही माहिती ना त्या व्यक्तीने कधी मागितली, ना मी कधी दिली. तिने कुठला शब्द देऊन मोडला का? माझं काही नुकसान झालं का? नाही, अजिबातच नाही. >>>>> हे खरं आहे. पण सगळच tangible नुकसानाने मोजलं पाहिजे असं आहे.
मुळात ही व्यक्तिरेखा खोटी आहे हा धक्कादायक भाग होताच पण जी लेखिका ही व्यक्तिरेखा चालवत होती ते नाव तर अजून धक्कादायक होतं कारण माझ्यासाठी ते एक well balanced, well respected व्यक्तिमत्त्व होतं.
बादवे, कादंबरी येऊ घातली आहे. आपल्यातली काही लोक त्यात characters असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण after all it was just a fiction म्हणे!
And I thought you were a bunch of smarties! >>>> सगळ्यात दुखरी ठसठसती नस ही आहे!
हे वाचून ती व्यक्ती / खरे तर
हे वाचून ती व्यक्ती / खरे तर आयडी ( मूळ व्यक्ती कोण हे नाही माहित) कोण असावी याचा अंदाज आला आणि धक्का बसला. माझा कधी त्या आयडीशी वैयक्तिक संपर्क नव्हता पण तिचे लिखाण आवडायचे. तिच्या माबोवर येण्याची आणि लिहिण्याची वाट पाहिली जायची.
तुला किती वाईट वाटले असेल याचा अंदाज येवू शकतो. पण तरीही तुझ्या लिहिण्यात तिच्याबद्दल कडवटपणा नाही आला याचे कौतूक वाटते.
तू मनापासून लिहिले आहेस, ते पोचतेय पण कदाचित बसलेल्या धक्क्यामुळे असेल हे व्यक्तिचित्रण वाटत नाहीये.
कोणाबद्दल आहे हे लिखाण कोणी
कोणाबद्दल आहे हे लिखाण कोणी सांगेल का?
खरी व्यक्ती कोण हे कळलं नाही
खरी व्यक्ती कोण हे कळलं नाही
म्हणजे चुकून खऱ्या व्यक्तीशी संपर्क असेल तर काळजी घेतली जाईल.
फार धक्कादायक आहे! डुप्लिकेट
फार धक्कादायक आहे! डुप्लिकेट आय डी घेऊन नुसत्या जनरल गप्पा मारणे वेगळे आणि दुसरी व्यक्ती आहे असे भासवून खोटेपणा करत राहणे वेगळे ! त्याबद्द्ल काहीही गैर न वाटणे , हा साहित्यिक प्रयोग होता असे स्पष्टीकरण म्हणजे अगदी कळस आहे!
स्वाती , तुम्ही खूप छान लिहिलंय आणि संयम ठेवलाय !
प्रकरण लेखात जाणवलं
प्रकरण लेखात जाणवलं त्यापेक्षा खूपच गंभीर दिसतंय.
अल्पनांच्या संपूर्ण
अल्पनांच्या संपूर्ण प्रतिसादाला +1
बस्स आता ऋन्मेष या आयडीने इथे
बस्स आता ऋन्मेष या आयडीने इथे येऊन आश्चर्य व्यक्त केलं की मी सुडोमि
लेख छानच आहे, अनुभव विचित्र
लेख छानच आहे, अनुभव विचित्र आहे तरी तटस्थ शैलीत लिहिले आह ते आवडले. व्यक्तिचित्रण मात्र फारसे वाटत नाही.
अवांतर:
"मी एरवी फार खत्रूड बाई आहे" हे वाक्य काळजाला भिडले
आभासी दुनियेत देखिल पलीकडे एक
आभासी दुनियेत देखिल पलीकडे एक हाडामासांची खरीखुरी व्यक्ती आहे या समजावर आपण सगळे जगत असतो. त्या समजाला तडा गेल्यावर किती धक्का बसला असेल याची कल्पना येते आहे.
ओहह, बापरे.
ओहह, बापरे.
बाप्रे! याची काहीच कल्पना
बाप्रे! याची काहीच कल्पना नव्हती. तुझा लेख वाचून हे समजतयं, धक्कादायक आहे. आयडी कोण असावी याचा अंदाज आला.
तू फार बॅलन्स्ड लिहिलं आहेस!
लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि असं कुणाच्या भावनांशी खेळणं वेगळं >>> +१
ओह, हे वाचून वाईट वाटले.
ओह, हे वाचून वाईट वाटले. आभासी विश्वाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी किती धूळफेक करू शकतो/ते व इतरांच्या भावनांशी किती प्रदीर्घ काळ खेळू शकते याचा हा पुनर्प्रत्यय. भावनिक, मानसिक नुकसान / त्रास हे तर आहेच पण नशीबाने यात काही आर्थिक देवघेव झाली नाही किंवा इतर प्रकारे गैरवापर झाला नाही हेही नसे थोडके! परंतु विश्र्वास तुटला की तो तुटलाच!
माझ्यासाठी तरी मी एखाद्या आंतरजालीय आयडीला प्रत्यक्ष भेटत नाही तोवर ती व्यक्ती खरोखर अस्तित्त्वात आहे/ नाही याबद्दल यापुढे शंकेस वाव राहीलच. माझ्या आंतरजालीय संपर्कातील व मला प्रत्यक्ष भेटलेल्या लोकांची जर त्या आयडीशी प्रत्यक्ष भेट झाली असेल तरच साक्षीपुराव्यानिशी त्या व्यक्तीचे आभासी खरेपण (!!!) पडताळता येईल.
नवल हेही वाटते की जे कोणी ही गोष्ट जाणत होते त्यांनीही इतरांना उल्लूच बनवले. षडयंत्राचाच एक भाग. वाईटच.
स्वाती, छान लिहिलं आहेस.
स्वाती, छान लिहिलं आहेस. भिडलं अगदी. धक्काही बसला.
तो मायबोली-आयडी कोण असावा याचा अंदाज आला. (आणि बहुतेक तो बरोबर असावा.) प्रत्यक्ष व्यक्ती कोण याचा अंदाज मात्र येत नाहीये. अर्थात त्याची चर्चा इथे नको.
कॅटफिशबद्दल सुरूवातीला लिहिलंस ते देखील मला बरोबर वाटलं. त्यामुळे सुरूवातीलाच मनाची एक बैठक तयार झाली.
छान आहे व्यक्तीचित्रण.
छान आहे व्यक्तीचित्रण.
व्यक्ती कोण ते माहित नाही तरी वाचुन धक्का बसला.
व्यक्तीचित्रण वाटत नाहीये असं का लिहिताहेत लोक?
एका व्यक्तीबद्दल लिहिलंय म्हणजे व्यक्तीचित्रणच आहे की.
व्यक्तीचित्रण फक्त चांगल्या गुडी लोकांबद्दलच असावं असं वाटतंय का?
Pages