व्यक्तिचित्रणः कॅटफिश - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 September, 2018 - 22:03

टीप : प्रस्तुत ललितातील सर्व पात्रे खरी आहेत. कोणत्याही काल्पनिक व्यक्तीशी त्यांचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.
---

"So you all got catfished?! And I thought you were a bunch of smarties!" - लेक डोळे फिरवत उद्गारला आणि पुन्हा टीव्हीकडे वळला.

मी हळूच टेबलाखाली फोन धरून आम्ही Catfished म्हणजे काय झालो ते गूगल केलं. अर्बन डिक्शनरीने तत्परतेने सांगितलं: 'Catfish : Someone who pretends to be someone else, especially on the internet.'
---

तिची माझी ओळख जवळपास एका तपापूर्वीपासूनची. इन्टरनेटला घरीदारी सहज अ‍ॅक्सेस उपलब्ध झाला आणि जगभरातील मराठी पाउलखुणा जपणार्‍या संकेतस्थळांवर संचार करता येऊ लागला त्या काळातली. आता मुलांना आंतरजालाचं नागरिकशास्त्र शाळेपासून शिकवतात. आम्ही शिकलो अनुभवांतून. आपल्या फावल्या वेळेत, आपल्या मातृभाषेत ज्यांच्याशी संवाद साधता येतो अशी मंडळी भेटणं याचं अप्रूप परदेशात अजूनही वाटतं, तेव्हा तर तो जवळपास चमत्कार वाटायचा! मग त्यातही समानधर्मीयांबरोबर विशेष सख्य जमणं ओघाने आणि सहज झालं. पुढे यातली बरीच मंडळी प्रत्यक्षातही भेटली आणि आतातर आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत.

ती फारशी कोणाला प्रत्यक्ष भेटल्याचा इतिहास नाही. पण ऑनलाइन गप्पा मारायला कधीतरी यायची. अतिशय सुंदर, तरल ललित लेखन करायची. मला तिचं लिखाण आणि तिला माझ्या कविता आवडत असल्यामुळे मग कधीतरी व्यक्तिगत निरोप - ईमेल्सही सुरू झाल्या आणि मैत्री दृढ होऊ लागली. जुजबीच पण खाजगी माहितीही एकमेकींना सांगितली गेली.

माझ्यापेक्षा वयाने लहान होती ती. जाहिरातविश्वात काम करायची. पार्ल्यात तिच्या वडिलांचं घर होतं. डॉक्टर होते ते. भाऊ अमेरिकेत होता, आई पूर्वी विल्सन कॉलेजला मराठीची प्राध्यापिका होती. तिने लहानपणापासून हट्टाने मराठी वाचनाची सवय लावल्यामुळेच ही इंग्रजी माध्यमात शिकलेली असून इतकं उत्तम मराठी लिहायची.

कामाच्या निमित्ताने जगभरात भटकंती करायची ती आणि भेटली की नेहमी काहीतरी सुरस आणि चमत्कारीक असायचं तिच्या पोतडीत सांगण्यासारखं. बहुश्रुतता होती, तल्लख विनोदबुद्धी होती आणि एक तरुण सळसळता उत्साह होता - आमच्या नाठाळ ग्रूपमध्ये किती सहज मिसळून गेली होती ती.

पुढे एका बंगाली मुलाच्या प्रेमात पडली. त्यांचा शेजारीच होता. सुंदरबनाच्या पर्यावरण संवर्धन-संरक्षणाचं काम करणार्‍या टीमचा भाग होता. ही महागड्या उंची वस्तूंची शौकीन, जगभर फिरणारी, एलीट अर्बन उत्साही मुलगी आणि तो अबोल, विरक्त, ध्येयासक्त मुलगा. मजेशीर जोडा होता. पण ती आनंदात होती. त्याच्याबद्दल बोलायला, त्याच्यावरून चिडवून घ्यायला किती आवडायचं तिला! तिचा साखरपुडा झाल्याचं कळलं तेव्हा मी कधी नव्हे ते तिला फोटो पाठवायला सांगितलं. तोवर तितपत हक्क वाटायला लागला होता. तिच्या लिहिण्यावरून माझ्या डोळ्यांसमोर जशी छबी निर्माण झाली होती, तशीच होती फोटोतली ती. छान होता जोडा. खूप मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या तिला.

त्याच काळात कधीतरी वडील गेले तिचे. त्यांच्याशी ती खूप - आईपेक्षाही अधिक अटॅच्ड होती. वडिलांचं जाणं खूप खोल परिणाम करून गेलं तिच्यावर. त्यात 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप'चे तोटे दिसायला लागले होते. भावी नवरा मुळात अबोल, आणि त्यात चॅट-ईमेलवर फार मोकळेपणी बोलणारा नव्हता. तिच्या बोलण्यात कधीतरी डिप्रेशन डोकावायला लागलं. काळजी वाटायची, पण वडिलांबद्दल सांत्वनपर ईमेल पाठवण्यापलीकडे आणि नंतर भेटेल तेव्हा थोडं खेळीमेळीचं बोलण्यापलीकडे काय करता येणार होतं आम्हाला?

खूप पॅशनेट माणसांचा उत्साह जसा झगमगीत असतो तितकंच त्यांचं नैराश्यही खोल काळोखं असणार हे बहुधा आपण गृहित धरलेलं असतं.
तशाही तिच्या भेटी, तिचं ऑनलाइन येणं किंवा ईमेल्स वगैरेंना उत्तर देणंही फार नियमीत नसायचं, पण फिरती-प्रवासांच्या गडबडीत नसेल जमत असं समजायचो आम्ही. आता ते आणखीनच अनियमित झालं होतं.

मग एकदा आली ती आनंदाची बातमी घेऊन. ती लग्न करणार होती. दोघंही आपापल्या फिरतीवर युरोपात असणार होते, तिथेच भेटून गाठ बांधणार होते. तिच्या एकाकीपणावर, नैराश्यावर आता इलाज होईल अशा कल्पनेने खूप आनंद वाटला. ती मुळातच रोमॅन्टिक, तेव्हा जवळपास इंद्रधनुष्यावरच पोचली होती! खूप थट्टामस्करी, कौतुकं करून घेऊन लग्नासाठी म्हणून गेली ती मात्र बराच काळ गायब झाली.

जगरहाटी सुरू राहातेच, पण मध्येच कधीतरी आठवण निघायची मात्र तिची. आता कुठे असेल, लग्न मानवलं असेल का असं मनात यायचं. एखादी चौकशीची ईमेल 'हवाओं पे लिख दो हवाओं के नाम' म्हणून पाठवली जायची.

मग अशीच एकदा धूमकेतूसारखी तिची ईमेल उगवली. खूप आनंदाने उघडली, पण बातमी चांगली नव्हती. प्रेग्नन्ट असताना, नवरा आणि इतर कुटुंबीय नको म्हणत असताना, कामाच्या निमित्ताने कुठे आडगावात जाऊन राहिली होती, तिथेच तिचा गर्भपात झाला होता. ते झालं तेव्हा अगदी एकटी होती, आणि नंतर एकाकी झाली होती. नवरा, आई, सासूसासरे जपत होते पण त्यांच्या डोळ्यांत कायम तिला 'तरी मी म्हटलं होतं' ही फिर्याद दिसायची! त्यात ती पूर्वी कधीतरी स्मोकिंग करायची हे सासूच्या कानावर गेलं होतं. तिचा गर्भपात हा तिचा गुन्हा ठरू पाहात होता. इतकी मोठी वैयक्तिक ईमेल तिने प्रथमच पाठवली असेल - पण वाचवत नव्हती. पूर्णपणे कोलमडून गेली असावी असं जाणवत होतं. त्यात नवरा परदेशात होता आणि ही सासरी राहिली होती रिकव्हरीसाठी.

मी एरवी फार खत्रूड बाई आहे, पण ती ईमेल वाचताना जीव तुटला. तिचं सांत्वन करणारी, धीर देणारी खूप हळुवार ईमेल उत्तरादाखल तिला पाठवली. आता आठवलं की हसू येतं, पण भावनेच्या भरात मी तिला 'बाळा' म्हटलं होतं एका ठिकाणी. तिचंही लगोलग प्रत्युत्तर आलं - ती व्हिएन्नाला तिच्या नवर्‍याकडे चालली होती. माझी ईमेल तिने विमानात पुन:पुन्हा वाचली म्हणे.
धाकट्या बहिणीची वाटेल तशी काळजी वाटत राहिली त्यानंतर तिची!

काळाचं औषध लागू पडलं असावं. नंतर बर्‍याच काळाने पुन्हा ऑनलाइन भेटली तेव्हा बरीच सावरलेली, बर्‍यापैकी नॉर्मल वाटली. खूप बरं वाटलं.
मी तेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट होते. अजून बातमी ऑफिशियल व्हायची होती, पण हा धूमकेतू पुन्हा केव्हा उगवेल काय माहीत, असं वाटून तिला बातमी सांगितली. याही वेळी अगदी लगोलग उत्तर आलं तिचं. माझं अभिनंदन केलं होतं आणि 'आता मलाही पुन्हा चान्स घ्यावासा वाटायला लागला तुझं ऐकल्यावर' असं लिहिलं होतं. खूप भरून आलं वाचून. देवावर माझा विश्वास नाही, पण हिचं इथून पुढे सगळं छान होऊ दे असं एक मनोमन साकडं घातलं गेलं.

पुन्हा चान्स नाही, पण दुसरी एक बेबी मात्र तिने त्यानंतर जन्माला घातली - कादंबरी. तोवर छोटे छोटे ललित लेख लिहीत होती, ते जोडून एक कादंबरी रचली होती तिने. मला पहिला मसुदा अभिप्रायासाठी पाठवला होता.
अभिप्रायाची तशी आवश्यकताच नव्हती, ती उत्तम लेखिका होतीच. कादंबरीची भट्टी जमून आली होती. विचारलं तर छापायची का, कधी छापायची असं काही ठरवलेलं नाही म्हणाली.

पुढे आणखी काही काळ लोटला. मध्यंतरीच्या काळात माझ्याबरोबर एका ऑनलाइन उपक्रमाच्या संयोजनातही तिने सहभाग घेतला.

तीनेक वर्षांपूर्वी मी व्हॉट्सअ‍ॅप वापरायला लागले. त्यात कॉन्टेक्ट्स पाहताना सहज लक्षात आलं की उपक्रमासाठी घेतलेल्या तिच्या फोन नंबरवर प्रोफाइलमध्ये निराळ्याच व्यक्तीचा फोटो आहे! मजा म्हणजे या व्यक्तिशीही माझी त्याच संकेतस्थळामुळे जुजबी ओळख होती. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीला मी एका स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष भेटलेही होते! ही व्यक्ती मध्यमवयीन आणि व्यवसायाने पत्रकार होती. मी गोंधळले. खरंतर अर्थ उघड होता, पण माझं मन मान्य करायला तयार नव्हतं. त्या दोघींत नामसाधर्म्य होतं, आपणच कदाचित नंबर सेव्ह करताना घोळ केला असेल अशी मी मनाची समजूत घातली.

मग काही दिवसांपूर्वी ती माझी ऑनलाइन आभासी सखी ही या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार्‍या व्यक्तीचाच एक अवतार असल्याची कुणकूण दुसऱ्य एका मैत्रिणीकडून मला लागली. या वेळीमात्र मी त्या नंबरवर मेसेज पाठवला - ओळख दोन्हीकडे होतीच, विचारलं - मी नंबर चुकीच्या नावाने सेव्ह केला आहे का?

उत्तर आलं नाही.
म्हणजे, थेट उत्तर आलं नाही. फक्त त्या व्यक्तीने तिचा प्रोफाइल फोटो तत्परतेने काढून टाकला.

एक गुपित फुटलं, एका विश्वासाला तडा गेला.

खूप वाईट वाटलं. आता इतकी वर्षं आंतरजालावर संचार केल्यावर आभासी अवतार / डुप्लिकेट आयडीज ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. त्याचं दु:ख वा राग वाटण्याऐवजी उलट 'आयडी ओळखा' खेळ खेळण्यापर्यंत मजल गेली आहे.
पण हे प्रकरण त्यातलं नव्हतं. इथे जीव गुंतला होता.

तिने मला काही harm पोचवला का? नाही. माझी दुरुपयोग करता येण्यासारखी काहीही माहिती ना त्या व्यक्तीने कधी मागितली, ना मी कधी दिली. तिने कुठला शब्द देऊन मोडला का? माझं काही नुकसान झालं का? नाही, अजिबातच नाही.
पण तिने एक इतकं elaborate आभासी विश्व विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीसारखं इतकी वर्षं maintain केलं? का? काय मिळालं असेल त्यातून?!
लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि न घडलेल्या अपघात-दुर्घटनांबद्दल हाडामांसाच्या माणसांकडून सांत्वनं करून घेणं निराळं! कोणाचेतरी साखरपुड्याचे फोटो आपले म्हणून पाठवणं निराळं!

यथावकाश त्या व्यक्तीने स्वत: वस्तुस्थिती मान्य केली असं कळलं. फोटो कोणाचे होते वगैरे तपशिलांत तसा अर्थ राहिला नव्हता, पण तेही समजलं. जे घडलं त्यात तिला फारसं काही गैर वाटलेलंच नाही असंही कानावर आलं. तिच्या लेखी हा सगळाच एक साहित्यिक प्रयोग होता.
मला एेकताना वाटलं की माझ्यासारखी मंडळी या प्रयोगाचं साहित्य ठरली.

इतका काळ इतक्या लोकांना एका काल्पनिक व्यक्तीवर विश्वास ठेवायला लावणं हा तिच्यातल्या लेखकाचा विजय म्हणायचा की हे इतकं बेधडक बेमालूम करावंसं वाटणं हा माणूसकीचा पराभव?
कोण जाणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे लिखाण ज्याच्याबद्दल आहे तो आयडी आणि त्यामागची प्रत्यक्ष व्यक्ती कोण आहे याबद्दल एवढं कोड्यात का बोलतायत लोक? दोन्ही नावं सरळसरळ उघड लिहील्यास काय प्रॉब्लेम होणार आहे?

ऋन्मेषला वेगळी ट्रीटमेंट आणि या आयडीला वेगळी असे का?
पुरुष-स्त्री भेदभाव का? की
दोघांच्या जालीय वर्तनात फरक आहे. एक अतिनियमित येऊन काड्या करायचा. दुसरा अतिअनियमित येऊन तरल, भावूक वगैरे लिहायचा म्हणून?
(<- ही दोन्ही माझी वै म नाहीत. जालकऱ्यांच्या मतांची सरासरी आहे.)

दोघांपैकी कोणी कितीजणांना, किती जास्त दुखावलंय? किती काळ येडा बनवलंय? I mean who has caused more damage?

लेख तटस्थपणे लिहिला आहे. फसवणूक झाल्याचं कळल्यावर तुम्हाला काय वाटलं ते नेमकं पोचलं.
पण दुसर्‍या क्षणी हसायलाही आलं. सॉरी. पण कारुण्यपूर्ण विनोद वाटला.
तुमच्या लेकाशी तंतोतंत सहमत आहे.
टीप: या सदस्य कोण ते मला माहिती नाही. फेसबुकवरच्या एका पोस्टवरून त्यांचं ब्लॉगर नाव कळलं, मी त्यांचा ब्लॉगही वाचल्याचं आठवत नाही.

हे लिखाण ज्याच्याबद्दल आहे तो आयडी आणि त्यामागची प्रत्यक्ष व्यक्ती कोण आहे याबद्दल एवढं कोड्यात का बोलतायत लोक? दोन्ही नावं सरळसरळ उघड लिहील्यास काय प्रॉब्लेम होणार आहे?

ऋन्मेषला वेगळी ट्रीटमेंट आणि या आयडीला वेगळी असे का?
पुरुष-स्त्री भेदभाव का? की
दोघांच्या जालीय वर्तनात फरक आहे. एक अतिनियमित येऊन काड्या करायचा. दुसरा अतिअनियमित येऊन तरल, भावूक वगैरे लिहायचा म्हणून?
(<- ही दोन्ही माझी वै म नाहीत. जालकऱ्यांच्या मतांची सरासरी आहे.)

दोघांपैकी कोणी कितीजणांना, किती जास्त दुखावलंय? किती काळ येडा बनवलंय? I mean who has caused more damage?

नवीन Submitted by अॅमी on 24 September, 2018 - 11:01 >>>> + ११११

सांगा कि नाव त्यात काय, किमान आयडी तर बोला

उत्सुक्ता लागली आहे मला

Submitted by अॅमी on 24 September, 2018 - 11:01 >>>> + ११११

त्या आयडीला फारसं काही वाटत नाहीये तर इथे आय्डीचं नाव लिहिल तरी काही वाटणार नाहीच!

हे लिखाण ज्याच्याबद्दल आहे तो आयडी आणि त्यामागची प्रत्यक्ष व्यक्ती कोण आहे याबद्दल एवढं कोड्यात का बोलतायत लोक?
>>> स्वातीने लेखात नावं उघड केलेली नसल्याने इतरही कुणी बोलत नाहीयेत.

त्या लेखिकेने दुहेरी आभासी रूपं सांभाळण्यासाठी बराच बारीकसारीक विचार केला असणार; हे येर्‍यागबाळ्याचं काम नाही; पण मग एकच फोन नंबर दोन्हीकडे शेअर करू नये, हे नाही का डोक्यात आलं? कमाल आहे !!

जीएस +१

टुलिप आयडी का हा कॅट्फिश म्हणजे? इतक नाव लपवण्यासारख काय आहे? जिथे हवा तिथे खत्रुडपणा कसा शेपटी घालतो जाउद्या झाल ... हे इतक सगळ उजेडात घेतलत तसच हेही घ्या Wink

स्वाती, तुझ्या लेखावर काय प्रतिक्रिया व्यक्त करू हेच उमजत नाहीये. फसवलं गेल्याची भावना त्रासदायक असतेच, त्यातला 'मी सुद्धा?' हा प्रश्न ठुसठुसत राहतो.

अश्याच एका अधूनमधून गायब होणाऱ्या सुप्रसिद्ध मायबोली आयडीने एका धाग्यावरच्या माझ्या एका प्रतिसादाच्या निमित्ताने छान गप्पा मारणाऱ्या ईमेल मला पाठवल्या होत्या. त्यात 'द्यावेसे' वाटणारे तपशील पुरवले होते. पण मला त्यावेळी त्यात काही वावगं न वाटल्याने मीही माझ्याकडून ईमेल गप्पा मारल्या होत्या. नंतर कधीतरी काही संदर्भ आठवताना मला त्यात काहीतरी खटकलं आणि मग मी त्या आयडीशी संपर्क वाढवला किंवा राखलाही नाही.

तुझा हा अनुभव वाचता 'सन्युक्ता' हा क्लोज्ड ग्रूप बंद झाला ते बरंच झालं असं वाटून गेलं आणि आंतरजालावर 'क्लोज्ड' वगैरे काही नसतं हे जुनं मत अधिक ठाम बनलं.

मला अश्या डुआयडींबद्दल भयंकर आदर वगैरे वाटतो. सगळे संदर्भ आणि त्यांची कन्सिस्टन्सी वर्षानुवर्ष जपायची म्हणजे गंमत नाही. असं आभासी जग त्यांना का निर्माण करावंसं वाटतं - जे क्षणिक नसतं, त्यामागची मनोभूमिका काय किंवा का असते, उद्देश काय असतो वगैरे प्रश्नांची उत्तरं मिळवायला मला आवडेल.

फार सुंदर लिहिलं आहेस.

आजच्या युगात असं ही खऱ्या आयुष्यात घडू शकतं हे माझ्या कल्पनेच्या ही पलीकडचं आहे. वाचल्या पासून माझ्या मनातून ही जात नाहीये तर तुझी अवस्था काय झाली असेल !> +१

आभासी आयडीबद्दल आपलेपणा आणि खऱ्या व्यक्तीबद्दल ची तटस्थता बरोबर वेगळी जाणवते आहे म्हणून हे व्यक्तिचित्रण वाटतंय. खरी व्यक्ती कोण ते कळणं आवश्यक आहे जर अजूनही active असेल तर!

किती वर्षे active होता id!

एकच फोन नंबर दोन्हीकडे शेअर करू नये, हे नाही का डोक्यात आलं? कमाल आहे !! ---मला कळलंय ते - दोन वेगळे नंबर पण आभासी आयडी च्या फोन नंबर वर खरा फोटो, ते विसरायला झालं वाटतं!

छान लिहिलय .
मला अश्या डुआयडींबद्दल भयंकर आदर वगैरे वाटतो. सगळे संदर्भ आणि त्यांची कन्सिस्टन्सी वर्षानुवर्ष जपायची म्हणजे गंमत नाही. > +१ हो खरच . मुळातच हे आभासी विश्व ! त्यात अजुन एक आभास वाढवून साम्भाळ्णं याच ओझं / डोक्याला ताप कसा होत नाही देव जाणे.

छान लिहीलय. तुम्ही किती दुखवला गेला असाल ती वेदना लेखात जाणवते. +
एकच फोन नंबर दोन्हीकडे शेअर करू नये, हे नाही का डोक्यात आलं? >>> बहुतेक ते एकच नंबर शेअर केला असे नसून शेअर केलेल्या नंबरवर दुसरे डिपी लावले असे आहे. पुर्वी व्हॉट्सअप नसल्याने तेव्हा जाणवले नसेल.

मुळात ह्याला व्यक्तिचित्रण का म्हणावे असे वाटले. आणखी एक आभासी जगतातला अनुभव म्हणून खपून जाईल.

आभासी जग असो वा प्रत्यक्ष जग असो, बहुतांशी लोकं हे असे मुखवटे घेवून फिरत असतात. राहता राहिला प्रश्ण, कोण कोणाचा वापर कसा करतो?
करमणूक करण्यासाठी म्हणा की एक ‘ साहित्यिक वापर’ म्हणून वाढीव काळासाठी वापर म्हणा. आता व्यक्ती तितक्या प्रवृती किंवा विकृती म्हणूया ना... प्रत्येकाच्या करमणूकेचे मार्ग व संज्ञा वेगळ्या असतात हे मायबोलीवरच दिसलेय.
आता इथे मायबोलीवरच अशी विकृती/प्रकृती पाहिल्यात की, स्वतःच्या रोजच्या रोज करमणूकीसाठी लोकं इतरांना टारगेट बनवतात, रोज खिदळतात तेव्हा स्वतःची करमणूक म्हणून एक माणूस, दुसर्‍या हाडामासाच्या माणसाचा ‘वापरच’ करत असतो जो दुसरा आयडीधारक असतो आणि ह्याला नाहक बळी पडतो. पण वापर करणार्‍याला “फक्त” वाटते असते की, त्यात आपण कसले नुकसान करतो दुसर्‍याचे? जराशी रोजची मजा. इथेही लेखातल्या त्या आभासी व्यक्तीला तेच वाटले. आता, लेखात म्हटल्याप्रमाणॅ, आयडी-आयडी खेळताना सुद्धा करमणूकच वाटायची ना? त्यात तेव्हा काही नाहक आयडीं वापरलेच जायचे ना? असे पाहिल्यावर प्रश्ण असायचे, काय मिळते असे करून काहींना?

लेख वाचून वाटले की, आपण सुद्धा कोणाच्या तरी करमणूकीचे साधन होवु शकतो हि जाणीव जरा बोचरी असतेच .... कारण आपला गंड ज्यास्त दुखावतो ना..

——
हे आपलं उगीच आठवलं, ते ईंग्लिश मध्ये म्हणतात ना, “आय एम एट दी अदर साईड ऑफ दी फेन्स.... हॉउ कुड बी? इट फिल्स वियर्ड“

.

स्वाती अतिशय प्रभावीपणे मांडलायस तुझा अनुभव. वाचून धक्का बसला खूप. बर्‍याच जणांनी लिहिल्याप्रमाणे जे दिसतं तेच नुकसान असतं असं नव्हे, पण विश्वासाला तडा बसणं, आणि असे बुरखेधारी आणि संशयास्पद काहीतरी आपल्या अवतीभवती वावरत होते/आहे ही कल्पना सुद्धा हादरवून टाकणारी आहे.
इथे अनेक जण तो आयडी कोण याची प्रचंड उत्सुकता खबरदारी म्हणून कळावी या पांघरूणाखाली दडपून विचारत आहेत. ही अतिरिक्त माहिती घेऊन आपल्याला त्याचा काय उपयोग आहे? त्या आयडीची मानसिकता त्या मागे काय होती ते आपल्याला कधीही कळणार नाही बहुधा, आणि जाणून घेऊनही ज्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे तो भरून नक्की निघणार नाही. पण असे आयडी/व्यक्ती समाजात संशयास्पद वातावरण निर्माण करतात आणि मग खर्‍या खुर्‍यांवरही विश्वास ठेवताना सामान्य माणूस हजारदा विचार करतो. म्हणतात ना सुक्याबरोबर ओलं जळतं..

लेखिका पुरेशी खर्त्रुद आहे. कुणीहे मी तुझ्या दुखात सहभागी आहे असे गले काधने बंद करा. फार दुख व्हावे असे कही घदलेले नाहिये.
फक्त एक विआचर डोक्यात आला असाच तरल लिखाण करनारा आयडी पार्ल्या ऐवजी विरार गेला बाजार ठाण्यात रहाणारा असते, त्याचे वदील साधे कार्कुन असते, आइ पोलीभाजीचा व्यवसाय करणारी ,आदनाव nonकोकनस्थ असते तर न भेटता एतकी जवळेक केली असती का?

> मुळात ह्याला व्यक्तिचित्रण का म्हणावे असे वाटले. >

व्यक्तिचित्रणातील साम्यस्थळे आणि फरक स्पष्ट करा

हायझेनबर्ग - 'बोहेमियन राप्सडी' x स्वाती_आंबोळे - 'कॅटफिश'

छान लेख.
स्वाती ताई तुम्ही इतक्या सुंदर कविता लिहायचात..... आता का थांबविलं?
आणि हे ड्यू आय डी प्रकरण -- खरंच समजत नाही!
आपल्या मूळ नावानीच लेख लिहीती तर काय फरक पडला असता...? उगीच हे लक्षात ठेवा नी ते ध्यानात ठेवा......!!

ऋन्मेष आणि यात खूप फरक आहे. ऋन्मेष केवळ एक व्हर्च्युअल आयडी आहे. त्यामागची व्यक्ती कोण आहे हे उघड न करणारा - जे अनेक लोक करतात. त्यात काहीच गैर नाही.

स्वाती छान लिहीले आहेस. वाचून वाइट वाटले.

ऋन्मेषला वेगळी ट्रीटमेंट आणि या आयडीला वेगळी असे का? >>> हे ज्यांच्या कुणाच्या मनात आलेय त्यांनी सगळाच पॉइन्ट मिस केला आहे असे म्हणावेसे वाटते Happy
तसेही ऋन्मेष आणि ही व्यक्ती यांची तुलना कुठून आली ? त्यांना ही वेगवेगळी ट्रीटमेन्ट या लेखिकेने दिली आहे का? काहीही!
इथे मुद्दा डुप्लिकेट आयडीने लेखन करणे हा नाहीच आहे. नेट वर अनेक आयडीज खरी ओळख न देता लिहितात. त्यात काही चूक नाही. ती त्यांची मर्जी. पण आभासी व्यक्तिमत्त्व निर्माण करून माणसांशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करणे , त्यांच्या भावनांशी खेळ करणे, त्यांना त्यांच्या परवानगीशिवाय तुमच्या साहित्यिक प्रयोगाचे गिनिपिग बनवणे, वर पुन्हा यात काही गैर आहे हे मान्य न करणे, संबंधितांकडे त्यांचा असा वापर करून झाल्यावरसुद्धा साधी दिलगिरी ही व्यक्त न करणे हे गंभीर आणि अनएथिकल आहे. कुऋ ने असे काही केल्याचे (माझ्या) माहितीत तरी नाही. त्याने तसे केले असल्यास गोष्ट वेगळी,

बापरे!
हा आयडी कोण याबद्दल काहीच माहिती नाही. पण इथे बर्‍याच जणांना माहित आहे असे दिसतेय.
स्वाती, इतका भावनेशी खेळ होऊनही तुम्ही खूप संयत शब्दात मांडलेत. तुमची भावनिक गुंतवणूक पोहोचली आणि भ्रमनिरासही! तुम्हाला एका आयडीने प्रत्यक्ष भेटूनही ती व्यक्ती जालावर दुसरा अवतार घेवून तुमच्या भावनांशी खेळत राहीली हे फारच अस्वस्थ करणारे आहे.मिसकॅरीएज झाले वगैरे सांगून भावनांशी खेळणे हा कसला साहित्यिक प्रयोग ?
हा अनुभव आल्यावर नुसती त्रागा करणारी तक्रार न मांडता त्याचेच इतके संयत व्यक्तिचित्रण ! ग्रेट!

पण फार पूर्वी जुन्या माबोबरही असे भावनांशी खेळणे एकदा झाले होते. फक्त तेव्हा दोन अवतार असे नव्हते. एकच अवतार , माबोवर पोस्ट असे होते. आता निटसे आठवत नाही पण अपंगत्व, आजारपण असलेला तरुण मुलगा असा काहीतरी अवतार होता. त्यामुळे नकळत सॉफ्ट कॉर्नर वाटे मात्र नवे माध्यम आणि भिडस्त स्वभावामुळे कधी वैयक्तिक संपर्क, विपू वगैरे नव्हता. आतासारखे २४ तास नेट , वायफाय, सेलफोन भानगडही नव्हती. नंतर त्याच्या निधनाची बातमी, हळहळणे , श्रद्धांजली, वगैरे झाले होते. नंतर असे काही नव्हतेच हे कळले. हे अगदी सुरवातीच्या काळात झाले. मराठीत संवाद या गरजेपोटी जालावर भेटले तरी हे जग आभासी, आयडी मागची व्यक्ती खरी कोण आहे हे कळायला मार्ग नाही हा धडा मिळाला . मग त्यानंतर बराच काळ आपणहून कुणाशी विपूतूनही संपर्क करायचा नाही, कुणी केला तरी वाढवायचा नाही असेच धोरण राहीले. संयुक्ता क्लोज्ड ग्रुप, वेरीफाईड मेंबर्स म्हणून जरा मोकळा वावर सुरु झाला. पण आता तुमच अनुभव वाचल्यावर शेवटी सगळे आभासी आहे हेच पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.

लेखिका पुरेशी खर्त्रुद आहे. कुणीहे मी तुझ्या दुखात सहभागी आहे असे गले काधने बंद करा. फार दुख व्हावे असे कही घदलेले नाहिये.
फक्त एक विआचर डोक्यात आला असाच तरल लिखाण करनारा आयडी पार्ल्या ऐवजी विरार गेला बाजार ठाण्यात रहाणारा असते, त्याचे वदील साधे कार्कुन असते, आइ पोलीभाजीचा व्यवसाय करणारी ,आदनाव nonकोकनस्थ असते तर न भेटता एतकी जवळेक केली असती का? >>>> arc ने हे लिहिलंय हे पण असंबद्ध आहे . सरळ सरळ वैयक्तिक शेरा वाटतो आहे. कुणाला कुणाशी कोणत्या परिस्थितीत मैत्री/जवळिक निर्माण करावी वाटेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, लिखाणावर चर्चा व्हावी, वैयक्तिक निवडी/निकषांवर कशाला घसरावे? Uhoh

स्वाती मघाशी लिहायचं राहून गेलं, हे लिखाण व्यक्तिचित्रण वाटत नाहिये असं अनेकांनी लिहिलंय पण मला तसं वाटत नाही. फक्त अनेक लोक त्या व्यक्तिला ओळखत आहेत की नाही याच तर्कात गर्क असल्याने त्यांचा गोंधळ उडतो आहे. पण हे एक प्रभावी व्यक्तिचित्रण आहे नक्की.

अरे कौन हे वो...
नाव डिक्लेर करुन टाका ब्वॉ एकदाच, लै सस्पेन्स वाटुन र्हैला!!
रच्याकने जालावर वावरुन मन निगरगट्ट व्ह्यायला मदत झाली. (अर्थात पुष्कळश्या ठेचा खाल्यानंतर). आता सहानुभुती, दया, माया सगळं विकुनच जालावर येतो. :इमोशनलेस बाहुली:

सरळ सरळ वैयक्तिक शेरा वाटतो आहे..माफ करा पन तसा हेतु नवता.
ज्या कोनी हे केलय ती व्यक्ती हुशार आहे. तीला अथ्वा त्याला स्वतःचा target audience व्यवस्थित कळला होता. नक्की कसे project केले महणजे लोक जवळ येतील्/करतील हे त्याला समजले होते. एक प्रयोग म्हनुन तो यशस्वी झालाय.unethical /ethical च्या भान्गदीत मी पदव्णार नाही. ते खुप सापेक्श असते.

स्वाती, वैषम्य वाटले वाचून.
चांगले आणि संयतपणे लिहिले आहेस. शेवटपर्यंत वाचल्यानंतर एक माणूस म्हणून मानसिक/भावनिकदृष्ट्या झालेल्या त्राग्याची चांगलीच कल्पना आली.

खरेतर लेखात नमूद केलेल्या नैराश्य आणि इतर घटना वाचताना 'यातून योग्य मार्ग निघालाय, असे लेखात पुढे यावे' असेच क्षणभर वाटून गेले होते.

किती तिखटमीठ लावून जोरात गळा काढलाय.

>>लेखिका पुरेशी खर्त्रुद आहे. कुणीहे मी तुझ्या दुखात सहभागी आहे असे गले काधने बंद करा. फार दुख व्हावे असे कही घदलेले नाहिये.<<
+१०००००००००००००००००००

सर्व अभिप्रायदात्यांचे मनःपूर्वक आभार.

नावं न लिहिण्यामागे हेतू तपशिलांपेक्षा त्या अनुभवावर लक्ष केंद्रित करण्याचा होता. ट्युलिपच्या संपर्कात आलेल्यांना लेखात आलेल्या माहितीवरून लक्षात येईलच, आणि न आलेल्यांना नावाशिवायही त्या अनुभवाचं गांभीर्य कळेलच असा विचार केला होता.

अनेक जणांनी विचारलेलं दिसलं म्हणून : तो फेक आयडी ट्युलिप असा होता, आभासी व्यक्तिमत्त्वाचं नाव शर्मिला गोखले असं होतं आणि त्यामागची खरी व्यक्ती शर्मिला फडके ही आहे.

पराग, I really do wish it was that simple! Happy
तीही दुखरी नस आहेच, पण या बाबतीत सर्वात दुखरी मात्र नाही.

पेशवे, बरेच दिवसांनी मायबोलीवर दिसलात, पण निराश केलं नाहीत तुम्ही. इथे माझ्याप्रमाणेच भावनिक फसवणूक झालेले इतके आयडीज इतक्या संयत भाषेत लिहीत असताना 'शेपुट घालणे' वगैरे वाक्प्रचार वापरण्याचा अकारण, अनाठायी आणि अनावश्यक कडवटपणा तुम्हाला का दाखवावासा वाटला असेल हे मी समजू शकते.

arc, कोणी असाही विचार करू शकतं हे मला तुमच्या पोस्टमुळे कळलं, त्याबद्दल तुमचे आभारच मानायला हवेत.
या नीधप बघा - जन्माने कोकणस्थ आहेत, त्यांच्या फॅमिलीत बरेच डॉक्टर्स आहेत आणि त्या पार्ल्याच्या आहेत - आमच्यातलं प्रेम पाहताय ना? Proud

जीएस Lol
You always bring a smile to my face! Thank you! Happy

<+१०००००००००००००००००००>
Rofl
अक्षरात लिहून दाखवा: ५ पाच. १०० शंभर. १००० हजार.
+१००००००००००००००००००० आँ!!! बाबो, अय्योयो, कित्ति कित्ति शून्ये!
अहो नुसते अनुमोदन म्हणायचे की! का ० कळ अडकली? मधून मधून साफ करावा कळफलक हो .
आणि तुम्ही भारतात असाल तर तुम्हाला समजेल अश्या मराठीत लिहितो: की केकी स्टक झाली कीबोर्डवर? अधून मधून कीबोर्ड क्लीन करावा हो!
Light 1

काय आहे, आपण कुणावर टीका करताना कुणि आपल्यावरहि टीका करू शकतात याचे भान ठेवावे! तुम्ही केलेली टीका बरोबर, विषयानुरूप, नी तरल अशीच असते नि इतरांनी केलेली मात्र चुकीची असे समजणे उपयोगाचे नाही हे इथल्या लोकांच्या लक्षात यावे म्हणून लिहीले.

Pages