व्यक्तिचित्रणः कॅटफिश - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 September, 2018 - 22:03

टीप : प्रस्तुत ललितातील सर्व पात्रे खरी आहेत. कोणत्याही काल्पनिक व्यक्तीशी त्यांचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.
---

"So you all got catfished?! And I thought you were a bunch of smarties!" - लेक डोळे फिरवत उद्गारला आणि पुन्हा टीव्हीकडे वळला.

मी हळूच टेबलाखाली फोन धरून आम्ही Catfished म्हणजे काय झालो ते गूगल केलं. अर्बन डिक्शनरीने तत्परतेने सांगितलं: 'Catfish : Someone who pretends to be someone else, especially on the internet.'
---

तिची माझी ओळख जवळपास एका तपापूर्वीपासूनची. इन्टरनेटला घरीदारी सहज अ‍ॅक्सेस उपलब्ध झाला आणि जगभरातील मराठी पाउलखुणा जपणार्‍या संकेतस्थळांवर संचार करता येऊ लागला त्या काळातली. आता मुलांना आंतरजालाचं नागरिकशास्त्र शाळेपासून शिकवतात. आम्ही शिकलो अनुभवांतून. आपल्या फावल्या वेळेत, आपल्या मातृभाषेत ज्यांच्याशी संवाद साधता येतो अशी मंडळी भेटणं याचं अप्रूप परदेशात अजूनही वाटतं, तेव्हा तर तो जवळपास चमत्कार वाटायचा! मग त्यातही समानधर्मीयांबरोबर विशेष सख्य जमणं ओघाने आणि सहज झालं. पुढे यातली बरीच मंडळी प्रत्यक्षातही भेटली आणि आतातर आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत.

ती फारशी कोणाला प्रत्यक्ष भेटल्याचा इतिहास नाही. पण ऑनलाइन गप्पा मारायला कधीतरी यायची. अतिशय सुंदर, तरल ललित लेखन करायची. मला तिचं लिखाण आणि तिला माझ्या कविता आवडत असल्यामुळे मग कधीतरी व्यक्तिगत निरोप - ईमेल्सही सुरू झाल्या आणि मैत्री दृढ होऊ लागली. जुजबीच पण खाजगी माहितीही एकमेकींना सांगितली गेली.

माझ्यापेक्षा वयाने लहान होती ती. जाहिरातविश्वात काम करायची. पार्ल्यात तिच्या वडिलांचं घर होतं. डॉक्टर होते ते. भाऊ अमेरिकेत होता, आई पूर्वी विल्सन कॉलेजला मराठीची प्राध्यापिका होती. तिने लहानपणापासून हट्टाने मराठी वाचनाची सवय लावल्यामुळेच ही इंग्रजी माध्यमात शिकलेली असून इतकं उत्तम मराठी लिहायची.

कामाच्या निमित्ताने जगभरात भटकंती करायची ती आणि भेटली की नेहमी काहीतरी सुरस आणि चमत्कारीक असायचं तिच्या पोतडीत सांगण्यासारखं. बहुश्रुतता होती, तल्लख विनोदबुद्धी होती आणि एक तरुण सळसळता उत्साह होता - आमच्या नाठाळ ग्रूपमध्ये किती सहज मिसळून गेली होती ती.

पुढे एका बंगाली मुलाच्या प्रेमात पडली. त्यांचा शेजारीच होता. सुंदरबनाच्या पर्यावरण संवर्धन-संरक्षणाचं काम करणार्‍या टीमचा भाग होता. ही महागड्या उंची वस्तूंची शौकीन, जगभर फिरणारी, एलीट अर्बन उत्साही मुलगी आणि तो अबोल, विरक्त, ध्येयासक्त मुलगा. मजेशीर जोडा होता. पण ती आनंदात होती. त्याच्याबद्दल बोलायला, त्याच्यावरून चिडवून घ्यायला किती आवडायचं तिला! तिचा साखरपुडा झाल्याचं कळलं तेव्हा मी कधी नव्हे ते तिला फोटो पाठवायला सांगितलं. तोवर तितपत हक्क वाटायला लागला होता. तिच्या लिहिण्यावरून माझ्या डोळ्यांसमोर जशी छबी निर्माण झाली होती, तशीच होती फोटोतली ती. छान होता जोडा. खूप मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या तिला.

त्याच काळात कधीतरी वडील गेले तिचे. त्यांच्याशी ती खूप - आईपेक्षाही अधिक अटॅच्ड होती. वडिलांचं जाणं खूप खोल परिणाम करून गेलं तिच्यावर. त्यात 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप'चे तोटे दिसायला लागले होते. भावी नवरा मुळात अबोल, आणि त्यात चॅट-ईमेलवर फार मोकळेपणी बोलणारा नव्हता. तिच्या बोलण्यात कधीतरी डिप्रेशन डोकावायला लागलं. काळजी वाटायची, पण वडिलांबद्दल सांत्वनपर ईमेल पाठवण्यापलीकडे आणि नंतर भेटेल तेव्हा थोडं खेळीमेळीचं बोलण्यापलीकडे काय करता येणार होतं आम्हाला?

खूप पॅशनेट माणसांचा उत्साह जसा झगमगीत असतो तितकंच त्यांचं नैराश्यही खोल काळोखं असणार हे बहुधा आपण गृहित धरलेलं असतं.
तशाही तिच्या भेटी, तिचं ऑनलाइन येणं किंवा ईमेल्स वगैरेंना उत्तर देणंही फार नियमीत नसायचं, पण फिरती-प्रवासांच्या गडबडीत नसेल जमत असं समजायचो आम्ही. आता ते आणखीनच अनियमित झालं होतं.

मग एकदा आली ती आनंदाची बातमी घेऊन. ती लग्न करणार होती. दोघंही आपापल्या फिरतीवर युरोपात असणार होते, तिथेच भेटून गाठ बांधणार होते. तिच्या एकाकीपणावर, नैराश्यावर आता इलाज होईल अशा कल्पनेने खूप आनंद वाटला. ती मुळातच रोमॅन्टिक, तेव्हा जवळपास इंद्रधनुष्यावरच पोचली होती! खूप थट्टामस्करी, कौतुकं करून घेऊन लग्नासाठी म्हणून गेली ती मात्र बराच काळ गायब झाली.

जगरहाटी सुरू राहातेच, पण मध्येच कधीतरी आठवण निघायची मात्र तिची. आता कुठे असेल, लग्न मानवलं असेल का असं मनात यायचं. एखादी चौकशीची ईमेल 'हवाओं पे लिख दो हवाओं के नाम' म्हणून पाठवली जायची.

मग अशीच एकदा धूमकेतूसारखी तिची ईमेल उगवली. खूप आनंदाने उघडली, पण बातमी चांगली नव्हती. प्रेग्नन्ट असताना, नवरा आणि इतर कुटुंबीय नको म्हणत असताना, कामाच्या निमित्ताने कुठे आडगावात जाऊन राहिली होती, तिथेच तिचा गर्भपात झाला होता. ते झालं तेव्हा अगदी एकटी होती, आणि नंतर एकाकी झाली होती. नवरा, आई, सासूसासरे जपत होते पण त्यांच्या डोळ्यांत कायम तिला 'तरी मी म्हटलं होतं' ही फिर्याद दिसायची! त्यात ती पूर्वी कधीतरी स्मोकिंग करायची हे सासूच्या कानावर गेलं होतं. तिचा गर्भपात हा तिचा गुन्हा ठरू पाहात होता. इतकी मोठी वैयक्तिक ईमेल तिने प्रथमच पाठवली असेल - पण वाचवत नव्हती. पूर्णपणे कोलमडून गेली असावी असं जाणवत होतं. त्यात नवरा परदेशात होता आणि ही सासरी राहिली होती रिकव्हरीसाठी.

मी एरवी फार खत्रूड बाई आहे, पण ती ईमेल वाचताना जीव तुटला. तिचं सांत्वन करणारी, धीर देणारी खूप हळुवार ईमेल उत्तरादाखल तिला पाठवली. आता आठवलं की हसू येतं, पण भावनेच्या भरात मी तिला 'बाळा' म्हटलं होतं एका ठिकाणी. तिचंही लगोलग प्रत्युत्तर आलं - ती व्हिएन्नाला तिच्या नवर्‍याकडे चालली होती. माझी ईमेल तिने विमानात पुन:पुन्हा वाचली म्हणे.
धाकट्या बहिणीची वाटेल तशी काळजी वाटत राहिली त्यानंतर तिची!

काळाचं औषध लागू पडलं असावं. नंतर बर्‍याच काळाने पुन्हा ऑनलाइन भेटली तेव्हा बरीच सावरलेली, बर्‍यापैकी नॉर्मल वाटली. खूप बरं वाटलं.
मी तेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट होते. अजून बातमी ऑफिशियल व्हायची होती, पण हा धूमकेतू पुन्हा केव्हा उगवेल काय माहीत, असं वाटून तिला बातमी सांगितली. याही वेळी अगदी लगोलग उत्तर आलं तिचं. माझं अभिनंदन केलं होतं आणि 'आता मलाही पुन्हा चान्स घ्यावासा वाटायला लागला तुझं ऐकल्यावर' असं लिहिलं होतं. खूप भरून आलं वाचून. देवावर माझा विश्वास नाही, पण हिचं इथून पुढे सगळं छान होऊ दे असं एक मनोमन साकडं घातलं गेलं.

पुन्हा चान्स नाही, पण दुसरी एक बेबी मात्र तिने त्यानंतर जन्माला घातली - कादंबरी. तोवर छोटे छोटे ललित लेख लिहीत होती, ते जोडून एक कादंबरी रचली होती तिने. मला पहिला मसुदा अभिप्रायासाठी पाठवला होता.
अभिप्रायाची तशी आवश्यकताच नव्हती, ती उत्तम लेखिका होतीच. कादंबरीची भट्टी जमून आली होती. विचारलं तर छापायची का, कधी छापायची असं काही ठरवलेलं नाही म्हणाली.

पुढे आणखी काही काळ लोटला. मध्यंतरीच्या काळात माझ्याबरोबर एका ऑनलाइन उपक्रमाच्या संयोजनातही तिने सहभाग घेतला.

तीनेक वर्षांपूर्वी मी व्हॉट्सअ‍ॅप वापरायला लागले. त्यात कॉन्टेक्ट्स पाहताना सहज लक्षात आलं की उपक्रमासाठी घेतलेल्या तिच्या फोन नंबरवर प्रोफाइलमध्ये निराळ्याच व्यक्तीचा फोटो आहे! मजा म्हणजे या व्यक्तिशीही माझी त्याच संकेतस्थळामुळे जुजबी ओळख होती. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीला मी एका स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष भेटलेही होते! ही व्यक्ती मध्यमवयीन आणि व्यवसायाने पत्रकार होती. मी गोंधळले. खरंतर अर्थ उघड होता, पण माझं मन मान्य करायला तयार नव्हतं. त्या दोघींत नामसाधर्म्य होतं, आपणच कदाचित नंबर सेव्ह करताना घोळ केला असेल अशी मी मनाची समजूत घातली.

मग काही दिवसांपूर्वी ती माझी ऑनलाइन आभासी सखी ही या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार्‍या व्यक्तीचाच एक अवतार असल्याची कुणकूण दुसऱ्य एका मैत्रिणीकडून मला लागली. या वेळीमात्र मी त्या नंबरवर मेसेज पाठवला - ओळख दोन्हीकडे होतीच, विचारलं - मी नंबर चुकीच्या नावाने सेव्ह केला आहे का?

उत्तर आलं नाही.
म्हणजे, थेट उत्तर आलं नाही. फक्त त्या व्यक्तीने तिचा प्रोफाइल फोटो तत्परतेने काढून टाकला.

एक गुपित फुटलं, एका विश्वासाला तडा गेला.

खूप वाईट वाटलं. आता इतकी वर्षं आंतरजालावर संचार केल्यावर आभासी अवतार / डुप्लिकेट आयडीज ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. त्याचं दु:ख वा राग वाटण्याऐवजी उलट 'आयडी ओळखा' खेळ खेळण्यापर्यंत मजल गेली आहे.
पण हे प्रकरण त्यातलं नव्हतं. इथे जीव गुंतला होता.

तिने मला काही harm पोचवला का? नाही. माझी दुरुपयोग करता येण्यासारखी काहीही माहिती ना त्या व्यक्तीने कधी मागितली, ना मी कधी दिली. तिने कुठला शब्द देऊन मोडला का? माझं काही नुकसान झालं का? नाही, अजिबातच नाही.
पण तिने एक इतकं elaborate आभासी विश्व विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीसारखं इतकी वर्षं maintain केलं? का? काय मिळालं असेल त्यातून?!
लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि न घडलेल्या अपघात-दुर्घटनांबद्दल हाडामांसाच्या माणसांकडून सांत्वनं करून घेणं निराळं! कोणाचेतरी साखरपुड्याचे फोटो आपले म्हणून पाठवणं निराळं!

यथावकाश त्या व्यक्तीने स्वत: वस्तुस्थिती मान्य केली असं कळलं. फोटो कोणाचे होते वगैरे तपशिलांत तसा अर्थ राहिला नव्हता, पण तेही समजलं. जे घडलं त्यात तिला फारसं काही गैर वाटलेलंच नाही असंही कानावर आलं. तिच्या लेखी हा सगळाच एक साहित्यिक प्रयोग होता.
मला एेकताना वाटलं की माझ्यासारखी मंडळी या प्रयोगाचं साहित्य ठरली.

इतका काळ इतक्या लोकांना एका काल्पनिक व्यक्तीवर विश्वास ठेवायला लावणं हा तिच्यातल्या लेखकाचा विजय म्हणायचा की हे इतकं बेधडक बेमालूम करावंसं वाटणं हा माणूसकीचा पराभव?
कोण जाणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका निराळ्या अर्थाने हे व्यक्तिचित्रण आहेच. मात्र हे अनुभवकथन अधिक आहे व एका (व्यक्तिचित्रण लेखन ह्या) ऑनलाईन उपक्रमाचा 'मनातील उचंबळ अभिव्यक्त करण्यासाठी' केलेला वापरही आहे.

इतके वाद का व्हावेत हे न समजल्यामुळे जरा खोलात शिरण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजले की 'आपणही गुंडाळले जाऊ शकतो' हे जिव्हारी लागणे शब्दबद्ध होण्यास अनेकांचा हा आक्षेप आहे की 'हेच आपण इतरांबाबत करतो तेव्हा कसे चालते?'

ह्यावर मला असे म्हणावेसे वाटते की चांगले, माहितीयुक्त लेखन (जसे सध्या पहिले महायुद्ध ही मालिका येत आहे) वगैरे गोष्टी केवळ दिखाऊ असून एकमेकांवर कुरघोडी करू शकण्यास नकळत दिली गेलेली परवानगी हे येथील प्रमुख आकर्षण आहे. भडास काढता येणे हे USP होऊ नये.

ट्युलिप, शर्मिला ह्यांचे काहीच वाचलेले नाही, किंबहुना, कोण खरे आहे व कोण भ्रामक हेही मला अजूनही समजलेले नाही. अगदी वरचा माफीनामा वाचूनही समजलेले नाही. शर्मिला ह्या आय डी च्या कादंबरी ह्या धाग्यावर पूर्वी प्रतिसाद दिलेले आठवतात, पण तो तोच आय डी आहे की कसे हे माहीत नाही. तो धागाही वाहता झाला असावा बहुधा.

कादंबरी लिहायला इतके काही करावे लागते ही नवीन माहिती समजली.

एकमेकींच्या झिंज्या ओढणाऱ्या व्यक्ती अजून सक्रिय आहेत हे पाहून गहिवरून आले.

गेल्या कैक महिन्यात इतके सकस साहित्यमूल्य असणारे अभिप्राय वाचायला मिळाले नव्हते.

दहा व्यक्तिचित्रणे लिहायचे potential असलेला धागा आहे हा!

-'बेफिकीर'!

दहा व्यक्तिचित्रणे लिहायचे potential असलेला धागा आहे हा!

-'बेफिकीर'!>>
मनावर घ्या खरच लिहायचं. आम्ही वाट बघतच आहोत.

<<प्रत्येकाला त्याचे मत असण्याचा आणि त्या प्रमाणे वागण्याचा पूर्ण हक्क आहे Happy>>
इतकेच नव्हे तर पुनः पुनः तीच तीच मते किंवा वेगळी मते लिहायचाहि अधिकार आहे! तसेच दुसर्‍याचे मत चूक आहे, त्याला/तिला अक्कल नाही हेहि मत लिहायचा अधिकार आहे!!
कारण बेफिकीर म्हणतात त्याप्रमाणे <<<एकमेकांवर कुरघोडी करू शकण्यास नकळत दिली गेलेली परवानगी हे येथील प्रमुख आकर्षण आहे>>

मायबोली ही अशी आहे असे माझे मत झाले आहे! त्यामुळे इथले लिखाण जास्त मनावर घेऊ नये. कुणी काही का लिहिना!

लिखाण उत्तम !

धागा देखील छान आहे. प्रामाणिक मनोरंनज झाले.

मधल्या काळात माबोवर फिरकता आले नसल्याने या स्पर्धेबद्दल कल्पना नव्हती, आणि भाग घेता आली नाही याची हळहळ देखील वाटली.

असो, एका मैत्रीणीने व्हॉटसपवर या धाग्याची लिंक दिली आणि कुस्तितपणे म्हटले, तुझ्या(सारख्यां)वर धागा आहे. बघ वाचून. पण अगदीच तसा नाहीये. मी सुद्धा एक ड्यू आय डी आहे ईतकेच काय ते साम्य.

बाकी दोन्ही बाजू पटल्या.

१) ड्यू आयडी काढताना, स्पेशली बायकी आयडी काढत असल्यास, एक काळजी घेणे खरेच गरजेचे. ते म्हणजे त्यातून कोणाशीही वैयक्तिक संपर्क वाढवू नये. याला आपण ड्यू आयडी एथिक्स बोलू शकतो. मी स्वत: हे नेहमीच पाळायचा प्रयत्न करतो. पण अर्थात मी देखील हे अनुभवांतूनच शिकलो आहे. ते अनुभव फार जुने ऑर्कुट काळातील आहेत. वेळ मिळाल्यास पुन्हा कधीतरी स्वतंत्र धाग्यात लिहेनच.

२) ड्यू आयडी कोणी भलताच निघाला हे धक्कादायक आणि दुखावणारे असते. पण त्या आयडीशी आपण शेअर केलेली माहिती आपली आपणच केली असते. तसेच आंतरजालावर कोणाशीही शेअर करण्यासारखी माहितीच आपण शेअर केली असते अशी अपेक्षा. तर आपले फार काही वैयक्तिक सिक्रेट कोणी चोरलेत असा ओरडा करण्यात अर्थ नाही.

३) एखाद्या ड्यू आयडीला सन्मान द्यायला शिकायची गरज सर्वांनाच आहे.
हे या प्रकरणाशी संबंधित नाही पण सर्वसाधारणपणे लिहितोय. जर एखाद्याला आपली ओळख लपवून आंतरजालावर वावरायचे असेल तर त्याला तसे वावरू द्या, त्याला लगेच ओळख लपवत फिरतो, वा खरया नावाने लिहायची हिंमत नाही वगैरे हिणवण्याची गरज नाही. मुळात कोणत्या आयडीच्या मागे कोण आहे याचे आपल्याला काय पडलेय असाच विचार सर्वांनी करावा. आणि तसेही प्रत्यक्षात तरी खरया नावाने लिहीणारे किती जण ईथे खरे चेहरे घेऊन फिरत असतात हा प्रश्न ज्याने त्याने स्वत:लाच विचारावा.

>>> एखाद्या ड्यू आयडीला सन्मान द्यायला शिकायची गरज सर्वांनाच आहे.
हे या प्रकरणाशी संबंधित नाही पण सर्वसाधारणपणे लिहितोय. जर एखाद्याला आपली ओळख लपवून आंतरजालावर वावरायचे असेल तर त्याला तसे वावरू द्या, त्याला लगेच ओळख लपवत फिरतो, वा खरया नावाने लिहायची हिंमत नाही वगैरे हिणवण्याची गरज नाही. मुळात कोणत्या आयडीच्या मागे कोण आहे याचे आपल्याला काय पडलेय असाच विचार सर्वांनी करावा. आणि तसेही प्रत्यक्षात तरी खरया नावाने लिहीणारे किती जण ईथे खरे चेहरे घेऊन फिरत असतात हा प्रश्न ज्याने त्याने स्वत:लाच विचारावा.

=====

सर,

एक लहानशी दुरुस्ती सुचवू का?

डुप्लिकेट आय डी म्हणजे मूळ आय डी कार्यरत असताना आणखीन एक आय डी काढून तो चालवणे

आपली ओळख लपवून वावरणे, खरे नाव न देणे म्हणजे डुप्लिकेट असणे नव्हे

तसे असते तर इथल्या तीन चार जणांचे आजवर प्रत्येकी बत्तीस ते सेहेचाळीस ड्यु आय डी आहेत असे म्हणावे लागले असते

बेफी, अहो ते सर वगैरे बोलू नका, उगाच कोणीतरी आपली टिंगल करतेय असे वाटते Happy
अर्थात, आपला हेतू तोच असेल तर काही हरकत नाही Wink

येनीवेज, जोक्स द अपार्ट
डुप्लिकेट आयडीचा अर्थ आपण म्हणता तोच असावा. मला तर हा ड्यु आय कि डु आय या शब्दाचा फुलफॉर्म डुप्लिकेट होतो हे सुद्धा फार उशीरा कळले. मला आधी ते Due ID असे काहीतरी वाटायचे Happy
असो, पण सर्वसाधारणपणे ओळख लपवून वावरणार्‍या आयडीलाच ईथे डुआयडी संबोधले जाते. मी त्याच अनुषंगाने लिहीले आहे.

उदाहरण घेऊया, आपण ईथले अष्टपैलू व्यक्तीमत्व आहात. कथा, कादंबर्‍या, गझल कविता आणि बरेच काही लिहीता, राजकीय सामाजिक चर्चांमध्येही भाग घेता. जर तुम्हाला उद्या वाटले की आपण गझल लिहायला एक वेगळा आयडी घ्यावा. बेफिकीर या टोपननावाने कथा लिहाव्यात आणि अमुकतमुक आयडी घेत गझललिखाण करावे. दोन वेगळे आयडी घेऊन आपण दोघांमागील व्यक्ती एकच आहेत हे सदस्य माहीतीत आपले नाव टाकून डिक्लेअर केले तर कोणाला काहीच प्रॉब्लेम नसेल.
पण तेच समजा आपण दोन वेगळे आयडी घेतले. एकातून साहित्यनिर्मिती करू लागलात आणि एकातून राजकीय चर्चात भाग घेऊ लागलात. आणि आपल्या राजकीय मतांचा परीणाम कथाकवितांवर येणार्‍या प्रतिसादावर पडू नये म्हणून आपण त्या राजकीय चर्चा करणार्‍या आयडीची ओळख गुप्त ठेवायचा निर्णय घेतला. तर मात्र काही लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हा कोण आयडी हे शोधायची खुमखुमी येऊ शकते. मला बस्स हेच पटत नाही ईतकेच Happy

स्वाती अभिनंदन. मी तर हेच एक वाचले व मतदान पण केले. असे का करावे वाटले असेल ह्याचा खेद वाटला. विश्वासाचा गैरफायदा घेणे बरोबर नाही. लॉरेन्स सँडर्स च्या बुक मध्ये अश्याप्रकारच्या स्वभावात एक प्रकारची व्हॅनिटी असते. म्हणजे नाव उदा पीटर फ्लॅ ने गन असेल तर तोच व्यक्ती दुस र्‍या गावी जाउन नवी सावजे गाठताना स्वतःच्या नावाचा काही तरी भाग रिटेन करतो ( किंवा इनिशि अल्स कारण त्यांच्या कडे मोनोग्राम कपडे, कफलिं क वगैरे असतात!!) पीटर फॉगार्टी नाव घेइल किंवा पॉल फ्लॅने गन. असे वाचले होते. त्याचा इथे प्रत्यय आला त्यामुळे मजा वाटली. एखाद्यावेळी पैशाचा धोका बसला तर आपण राइट ओफ करू शकतो. पण हे कधीच विसरता येत नाही.

मी इथे कायमच जे विचार डोक्यात येतील ते लिहीत आले ते बरेच विनोदी, विस्कळीत असतात. त्याचे मला नंतर लाजल्या सारखेही होत असे.
माबोवर नीट प्रतिसाद देण्याचे कसब जमत नाही गडे आपल्याला असे वाट्ते. पण जे काही आहे ते खरे आहे जीवनातील अनुभव कि प्राणी प्रेम, आहाराच्य शंका कि इतर काही आचरट पणा असो आपण आहोत तसेच व्यक्त होतो व आपल्याला असे काही जम णार नाही कधीच ह्याचे ही एक प्रकारचे व्हॅलिडेशन मिळाले व्हिच इज व्हेरी हार्टनिन्ग.

कॅट फिशिंग वागणुकीचे लंगडे जस्टि फिकेशन फारच विनोदी वाटले. बट इशू क्लोज्ड नाव. तुम्हाला नवरात्री व दिवाळीच्या शुभेच्छा.

Pages