व्यक्तिचित्रणः कॅटफिश - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 September, 2018 - 22:03

टीप : प्रस्तुत ललितातील सर्व पात्रे खरी आहेत. कोणत्याही काल्पनिक व्यक्तीशी त्यांचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.
---

"So you all got catfished?! And I thought you were a bunch of smarties!" - लेक डोळे फिरवत उद्गारला आणि पुन्हा टीव्हीकडे वळला.

मी हळूच टेबलाखाली फोन धरून आम्ही Catfished म्हणजे काय झालो ते गूगल केलं. अर्बन डिक्शनरीने तत्परतेने सांगितलं: 'Catfish : Someone who pretends to be someone else, especially on the internet.'
---

तिची माझी ओळख जवळपास एका तपापूर्वीपासूनची. इन्टरनेटला घरीदारी सहज अ‍ॅक्सेस उपलब्ध झाला आणि जगभरातील मराठी पाउलखुणा जपणार्‍या संकेतस्थळांवर संचार करता येऊ लागला त्या काळातली. आता मुलांना आंतरजालाचं नागरिकशास्त्र शाळेपासून शिकवतात. आम्ही शिकलो अनुभवांतून. आपल्या फावल्या वेळेत, आपल्या मातृभाषेत ज्यांच्याशी संवाद साधता येतो अशी मंडळी भेटणं याचं अप्रूप परदेशात अजूनही वाटतं, तेव्हा तर तो जवळपास चमत्कार वाटायचा! मग त्यातही समानधर्मीयांबरोबर विशेष सख्य जमणं ओघाने आणि सहज झालं. पुढे यातली बरीच मंडळी प्रत्यक्षातही भेटली आणि आतातर आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत.

ती फारशी कोणाला प्रत्यक्ष भेटल्याचा इतिहास नाही. पण ऑनलाइन गप्पा मारायला कधीतरी यायची. अतिशय सुंदर, तरल ललित लेखन करायची. मला तिचं लिखाण आणि तिला माझ्या कविता आवडत असल्यामुळे मग कधीतरी व्यक्तिगत निरोप - ईमेल्सही सुरू झाल्या आणि मैत्री दृढ होऊ लागली. जुजबीच पण खाजगी माहितीही एकमेकींना सांगितली गेली.

माझ्यापेक्षा वयाने लहान होती ती. जाहिरातविश्वात काम करायची. पार्ल्यात तिच्या वडिलांचं घर होतं. डॉक्टर होते ते. भाऊ अमेरिकेत होता, आई पूर्वी विल्सन कॉलेजला मराठीची प्राध्यापिका होती. तिने लहानपणापासून हट्टाने मराठी वाचनाची सवय लावल्यामुळेच ही इंग्रजी माध्यमात शिकलेली असून इतकं उत्तम मराठी लिहायची.

कामाच्या निमित्ताने जगभरात भटकंती करायची ती आणि भेटली की नेहमी काहीतरी सुरस आणि चमत्कारीक असायचं तिच्या पोतडीत सांगण्यासारखं. बहुश्रुतता होती, तल्लख विनोदबुद्धी होती आणि एक तरुण सळसळता उत्साह होता - आमच्या नाठाळ ग्रूपमध्ये किती सहज मिसळून गेली होती ती.

पुढे एका बंगाली मुलाच्या प्रेमात पडली. त्यांचा शेजारीच होता. सुंदरबनाच्या पर्यावरण संवर्धन-संरक्षणाचं काम करणार्‍या टीमचा भाग होता. ही महागड्या उंची वस्तूंची शौकीन, जगभर फिरणारी, एलीट अर्बन उत्साही मुलगी आणि तो अबोल, विरक्त, ध्येयासक्त मुलगा. मजेशीर जोडा होता. पण ती आनंदात होती. त्याच्याबद्दल बोलायला, त्याच्यावरून चिडवून घ्यायला किती आवडायचं तिला! तिचा साखरपुडा झाल्याचं कळलं तेव्हा मी कधी नव्हे ते तिला फोटो पाठवायला सांगितलं. तोवर तितपत हक्क वाटायला लागला होता. तिच्या लिहिण्यावरून माझ्या डोळ्यांसमोर जशी छबी निर्माण झाली होती, तशीच होती फोटोतली ती. छान होता जोडा. खूप मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या तिला.

त्याच काळात कधीतरी वडील गेले तिचे. त्यांच्याशी ती खूप - आईपेक्षाही अधिक अटॅच्ड होती. वडिलांचं जाणं खूप खोल परिणाम करून गेलं तिच्यावर. त्यात 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप'चे तोटे दिसायला लागले होते. भावी नवरा मुळात अबोल, आणि त्यात चॅट-ईमेलवर फार मोकळेपणी बोलणारा नव्हता. तिच्या बोलण्यात कधीतरी डिप्रेशन डोकावायला लागलं. काळजी वाटायची, पण वडिलांबद्दल सांत्वनपर ईमेल पाठवण्यापलीकडे आणि नंतर भेटेल तेव्हा थोडं खेळीमेळीचं बोलण्यापलीकडे काय करता येणार होतं आम्हाला?

खूप पॅशनेट माणसांचा उत्साह जसा झगमगीत असतो तितकंच त्यांचं नैराश्यही खोल काळोखं असणार हे बहुधा आपण गृहित धरलेलं असतं.
तशाही तिच्या भेटी, तिचं ऑनलाइन येणं किंवा ईमेल्स वगैरेंना उत्तर देणंही फार नियमीत नसायचं, पण फिरती-प्रवासांच्या गडबडीत नसेल जमत असं समजायचो आम्ही. आता ते आणखीनच अनियमित झालं होतं.

मग एकदा आली ती आनंदाची बातमी घेऊन. ती लग्न करणार होती. दोघंही आपापल्या फिरतीवर युरोपात असणार होते, तिथेच भेटून गाठ बांधणार होते. तिच्या एकाकीपणावर, नैराश्यावर आता इलाज होईल अशा कल्पनेने खूप आनंद वाटला. ती मुळातच रोमॅन्टिक, तेव्हा जवळपास इंद्रधनुष्यावरच पोचली होती! खूप थट्टामस्करी, कौतुकं करून घेऊन लग्नासाठी म्हणून गेली ती मात्र बराच काळ गायब झाली.

जगरहाटी सुरू राहातेच, पण मध्येच कधीतरी आठवण निघायची मात्र तिची. आता कुठे असेल, लग्न मानवलं असेल का असं मनात यायचं. एखादी चौकशीची ईमेल 'हवाओं पे लिख दो हवाओं के नाम' म्हणून पाठवली जायची.

मग अशीच एकदा धूमकेतूसारखी तिची ईमेल उगवली. खूप आनंदाने उघडली, पण बातमी चांगली नव्हती. प्रेग्नन्ट असताना, नवरा आणि इतर कुटुंबीय नको म्हणत असताना, कामाच्या निमित्ताने कुठे आडगावात जाऊन राहिली होती, तिथेच तिचा गर्भपात झाला होता. ते झालं तेव्हा अगदी एकटी होती, आणि नंतर एकाकी झाली होती. नवरा, आई, सासूसासरे जपत होते पण त्यांच्या डोळ्यांत कायम तिला 'तरी मी म्हटलं होतं' ही फिर्याद दिसायची! त्यात ती पूर्वी कधीतरी स्मोकिंग करायची हे सासूच्या कानावर गेलं होतं. तिचा गर्भपात हा तिचा गुन्हा ठरू पाहात होता. इतकी मोठी वैयक्तिक ईमेल तिने प्रथमच पाठवली असेल - पण वाचवत नव्हती. पूर्णपणे कोलमडून गेली असावी असं जाणवत होतं. त्यात नवरा परदेशात होता आणि ही सासरी राहिली होती रिकव्हरीसाठी.

मी एरवी फार खत्रूड बाई आहे, पण ती ईमेल वाचताना जीव तुटला. तिचं सांत्वन करणारी, धीर देणारी खूप हळुवार ईमेल उत्तरादाखल तिला पाठवली. आता आठवलं की हसू येतं, पण भावनेच्या भरात मी तिला 'बाळा' म्हटलं होतं एका ठिकाणी. तिचंही लगोलग प्रत्युत्तर आलं - ती व्हिएन्नाला तिच्या नवर्‍याकडे चालली होती. माझी ईमेल तिने विमानात पुन:पुन्हा वाचली म्हणे.
धाकट्या बहिणीची वाटेल तशी काळजी वाटत राहिली त्यानंतर तिची!

काळाचं औषध लागू पडलं असावं. नंतर बर्‍याच काळाने पुन्हा ऑनलाइन भेटली तेव्हा बरीच सावरलेली, बर्‍यापैकी नॉर्मल वाटली. खूप बरं वाटलं.
मी तेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट होते. अजून बातमी ऑफिशियल व्हायची होती, पण हा धूमकेतू पुन्हा केव्हा उगवेल काय माहीत, असं वाटून तिला बातमी सांगितली. याही वेळी अगदी लगोलग उत्तर आलं तिचं. माझं अभिनंदन केलं होतं आणि 'आता मलाही पुन्हा चान्स घ्यावासा वाटायला लागला तुझं ऐकल्यावर' असं लिहिलं होतं. खूप भरून आलं वाचून. देवावर माझा विश्वास नाही, पण हिचं इथून पुढे सगळं छान होऊ दे असं एक मनोमन साकडं घातलं गेलं.

पुन्हा चान्स नाही, पण दुसरी एक बेबी मात्र तिने त्यानंतर जन्माला घातली - कादंबरी. तोवर छोटे छोटे ललित लेख लिहीत होती, ते जोडून एक कादंबरी रचली होती तिने. मला पहिला मसुदा अभिप्रायासाठी पाठवला होता.
अभिप्रायाची तशी आवश्यकताच नव्हती, ती उत्तम लेखिका होतीच. कादंबरीची भट्टी जमून आली होती. विचारलं तर छापायची का, कधी छापायची असं काही ठरवलेलं नाही म्हणाली.

पुढे आणखी काही काळ लोटला. मध्यंतरीच्या काळात माझ्याबरोबर एका ऑनलाइन उपक्रमाच्या संयोजनातही तिने सहभाग घेतला.

तीनेक वर्षांपूर्वी मी व्हॉट्सअ‍ॅप वापरायला लागले. त्यात कॉन्टेक्ट्स पाहताना सहज लक्षात आलं की उपक्रमासाठी घेतलेल्या तिच्या फोन नंबरवर प्रोफाइलमध्ये निराळ्याच व्यक्तीचा फोटो आहे! मजा म्हणजे या व्यक्तिशीही माझी त्याच संकेतस्थळामुळे जुजबी ओळख होती. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीला मी एका स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष भेटलेही होते! ही व्यक्ती मध्यमवयीन आणि व्यवसायाने पत्रकार होती. मी गोंधळले. खरंतर अर्थ उघड होता, पण माझं मन मान्य करायला तयार नव्हतं. त्या दोघींत नामसाधर्म्य होतं, आपणच कदाचित नंबर सेव्ह करताना घोळ केला असेल अशी मी मनाची समजूत घातली.

मग काही दिवसांपूर्वी ती माझी ऑनलाइन आभासी सखी ही या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार्‍या व्यक्तीचाच एक अवतार असल्याची कुणकूण दुसऱ्य एका मैत्रिणीकडून मला लागली. या वेळीमात्र मी त्या नंबरवर मेसेज पाठवला - ओळख दोन्हीकडे होतीच, विचारलं - मी नंबर चुकीच्या नावाने सेव्ह केला आहे का?

उत्तर आलं नाही.
म्हणजे, थेट उत्तर आलं नाही. फक्त त्या व्यक्तीने तिचा प्रोफाइल फोटो तत्परतेने काढून टाकला.

एक गुपित फुटलं, एका विश्वासाला तडा गेला.

खूप वाईट वाटलं. आता इतकी वर्षं आंतरजालावर संचार केल्यावर आभासी अवतार / डुप्लिकेट आयडीज ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. त्याचं दु:ख वा राग वाटण्याऐवजी उलट 'आयडी ओळखा' खेळ खेळण्यापर्यंत मजल गेली आहे.
पण हे प्रकरण त्यातलं नव्हतं. इथे जीव गुंतला होता.

तिने मला काही harm पोचवला का? नाही. माझी दुरुपयोग करता येण्यासारखी काहीही माहिती ना त्या व्यक्तीने कधी मागितली, ना मी कधी दिली. तिने कुठला शब्द देऊन मोडला का? माझं काही नुकसान झालं का? नाही, अजिबातच नाही.
पण तिने एक इतकं elaborate आभासी विश्व विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीसारखं इतकी वर्षं maintain केलं? का? काय मिळालं असेल त्यातून?!
लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि न घडलेल्या अपघात-दुर्घटनांबद्दल हाडामांसाच्या माणसांकडून सांत्वनं करून घेणं निराळं! कोणाचेतरी साखरपुड्याचे फोटो आपले म्हणून पाठवणं निराळं!

यथावकाश त्या व्यक्तीने स्वत: वस्तुस्थिती मान्य केली असं कळलं. फोटो कोणाचे होते वगैरे तपशिलांत तसा अर्थ राहिला नव्हता, पण तेही समजलं. जे घडलं त्यात तिला फारसं काही गैर वाटलेलंच नाही असंही कानावर आलं. तिच्या लेखी हा सगळाच एक साहित्यिक प्रयोग होता.
मला एेकताना वाटलं की माझ्यासारखी मंडळी या प्रयोगाचं साहित्य ठरली.

इतका काळ इतक्या लोकांना एका काल्पनिक व्यक्तीवर विश्वास ठेवायला लावणं हा तिच्यातल्या लेखकाचा विजय म्हणायचा की हे इतकं बेधडक बेमालूम करावंसं वाटणं हा माणूसकीचा पराभव?
कोण जाणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साखरपुडा फोटो, वडील गेले म्हणून सहानभूती, लग्न, गर्भपात, नैराश्य इतके खोटे तपशील देउन कोणाच्याही भावनांशी खेळणे ही मला विकृत मानसिकता वाटते.
>>> +1

पथेटिक !!!!

ओके, शर्मिला.
माझ्यासाठी विषय संपला.

खास (above average) सामाजिक,कौतुंबिक परिस्थीती असलेल्या व्यक्तीशी जवळीक वाधवणे हा भारतीयांचा स्वभावविशेश आहे मह्नुन तो विचार मनात डोकावला इतकेच. आणि ते तसे नाहीच्च्च असा claim तुम्ही करुच शकता. पन तिर्हाइतांना शंका घ्यायला वावही आहेच.

मला कादंबरी वाचायला नक्की आवदेल. मायबोली महणजे जग नाही. शर्मिला फदके यांचे लिखाण दर्जेदार सासते. बाहेर लाखो सामन्य वाचक आहेत.त्यांना ही कादंबरी नक्कीच आवडेल.

साखरपुडा फोटो, वडील गेले म्हणून सहानभूती, लग्न, गर्भपात, नैराश्य इतके खोटे तपशील देउन कोणाच्याही भावनांशी खेळणे ही मला विकृत मानसिकता वाटते.>> +१

माझ्या प्रश्नाचे उत्तर सोइस्कर रीत्या टाळले जात आहे का? दिनेशदा उर्फ दिनेश शिन्दे यांना ट्रोलिंग करून त्यांचा बळी कोणी घेतला? हेही पुढे येउ द्याना . या चर्चेत सहभागी असनार्‍या उच्च भ्रू व्यती त्यात नव्ह्त्या का? नवीन आय डीना कळू द्या ना जरा. आणि वेमाही कसे धृतराष्ट्रासारखे बसले होते तेही कळू द्या.

https://www.quora.com/Is-catfishing-illegal

ही माहितीही वाचनीय आहे. भारतात व अमेरिकेत या संदर्भात वेगवेगळे कायदे असू शकतात. परंतु दुसऱ्या व्यक्तीचा फोटो (त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय वापरला असे गृहित धरले तर) स्वत:चा म्हणून पाठवणे, वापरणे हे प्रताधिकार भंग, आयडेंटिटी थेफ्ट वर्गवारीत यायला हरकत नाही. एकंदरच आभासी विश्वात तुम्ही खोटी व्यक्तिरेखा घेऊन वावरणे हा गुन्हाच नाही. परंतु त्या व्यक्तीरेखेला 'खरी' बनवायला खऱ्या जगातील दुसऱ्या व्यक्तीचे फोटो विनापरवानगी स्वत:चे म्हणून वापरणे, त्या चेहऱ्याने आंतरजालावर वावरणे, त्यातून मिळालेल्या माहितीचा, पत्रव्यवहार, गप्पा, देवघेव केलेली माहिती यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कमर्शियल स्तरावर उपयोग करणे हे कायद्याच्या नजरेत नक्कीच आक्षेपार्ह ठरू शकते. असे लिखाण जे छापतील तेही तशी माहिती असतानाही ते छापत असतील तर सहभागी म्हणून गोत्यात येऊ शकतात. आता तरी असेच जाणवत आहे. सायबर कायद्यातील निष्णात व्यक्ती यावर आणखी प्रकाशझोत टाकू शकतील.

दिनेश यांचे ट्रोलिंग झाले होते पण पळून जायचा निर्णय त्यांचा होता. ट्रोल कङे दुर्लक्ष करुन पण ते राहू शकले असते.

कादंबरी लिहिण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून व्यक्तिरेखेच्या नावाने ब्लॉग सुरू करणे हा जेन्युइन मास्टरस्ट्रोक होता. मात्र पुढचं सगळं 'गॉट कॅरीड अवे' रकान्यात जातंय. >> +++ १

@शर्मिला ,
तुमची आणि ट्युलिपच्या लिखाणाची एक फॅन म्हणून लिहीत आहे. तुमच्या चूकीबद्दल तुम्ही माफी मागितली ते योग्यच. तुम्ही खूप सुंदर लिहीता. जे झाले ते झाले. अजून लिहीत रहा. ट्युलिपचं तसं तरल लेखन अजून वाचायला नक्की आवडेल. भले ते तुमच्या आयडीने का असेना.

एखाद्या व्यक्तीबरोबर ऑनलाईनच का असेना चटकन नाळ जुळते, आदर वाटतो, आपुलकी वाटायला लागते, ती काही काळ दोन्ही बाजूंनी असते आणि अचानकच काहीतरी बिनसतं. याचं कारण उगाचंच असेल, मुद्दाम असेल, नकळत असेल, फसवणूक असेल, काहीही असेल. एक सुंदर नातं सुरू होता होताच मरतं हेच काय ते सत्य. अनेकदा, जी व्यक्ती दुसर्‍याला दुखावते, तिच्या खिजगणतीतही नसतं की आपण कोणाला हर्ट केलं असेल. तसं असतं तर घाव घालण्यापर्यंत मजलच गेली नसती. त्यामुळे पश्चाताप आणि माफीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण चुकून नंतर कधीतरी त्या व्यक्तीने माफी मागितलीच तर दुखावल्या गेलेल्या व्यक्तीने काय करायचं असतं? माफ करणं इतकं सहज असतं? टाईप करणं जितकं सहज असतं तितकं? कदाचित असेलही. प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असेल. पण सगळंच काही एका माफीनाम्यानिशी विसरलं जाऊ शकतं? माफी मागण्याचं महत्त्व मला कमी करायचं नाहीये, ते तितकं सिम्प्लिस्टिक नसतं इतकाच म्हणायचं आहे.

यातला सर्वात मोठा सल काय असतो माहितेय, जे नातं फिस्कटलं नसतं आणि एव्हाना परिपक्व झालं असतं, अनेक लेव्हल्सला गेलं असतं, ज्या नात्याने अनेक सुंदर वळणं कदाचित घेतली असती, अनेक सुखःदु:ख जिथे शेअर केली गेली असती, त्या सर्व शक्यतांचाच अकाली खून घेऊन जे प्रेशियस मोमेन्ट्स हातून निसटले ना- त्याचं दु:ख सर्वाधिक असतं. त्या नात्यात या सगळ्याचं पोटेन्शिअल असतं आणि म्हणूनच वाया गेलेल्या अनेक शक्यतांची हळहळ सर्वाधिक वाटते. माफी मागून कदाचित लोक मूव्ह ऑन करतील, कदाचित मनं सांधली जातील आणि नव्याने मैत्रीही होईल, आणि त्यानंतर हेच प्रसंग आठवून त्याच दोन व्यक्ती हसतीलही. but what about the time that was lost? ही हानी नाही भरून निघत. तो घाव दुखावली गेलेली व्यक्ती खूप काळ सोसते. बिलिव्ह मी, त्यातून रिकव्हर होणं खूप कठिण असतं काही जणांना, ज्यात मी एक आहे. हे ट्युलिप्/शर्मिलाबद्दल नाही, जनरल आहे.

असो. आता स्पेसिफिक ट्युलिपबद्दल- धागा आता वेगळंच वळण घेतोय. ट्युलिपच्या अनेक 'लाभार्थीं'पैकी एक मीही होते, कदाचित तिला आठवतही नसेल, कारण तिच्या साखरपुड्यापर्यंतच आमचा वैय्यक्तिक संपर्क होता. हे उघडकीला आलं तेव्हा मला धक्का बसला पण त्यापेक्षाही वाईट वाटलं, no, no no, it could have been anyone but Sharmila! का? का? का? असं वाटलं होतं. पण जे झालं ते झालं, can't be undone. पण इतका मोठा विश्वासघात, इतकं स्कीमिंग, इतकं कॅल्क्युलेशन असूनही मला अजूनही (कोणत्या भाबड्या आशेवर माहित नाही, पण तरीही) वाटतंय, की ट्युलिपने ज्या ज्या लोकांशी व्यक्तिगत संपर्क ठेवला, तो वाढवला, त्या दरम्यान झालेल्या गप्पांचा, माहितीचा थेट वापर कादंबरीत झाला नसावा. ती त्या पात्राच्या भरात वाहवत गेली, रिस्पॉन्सेस देत राहिली. त्याचा आणि कादंबरीच्या प्लॉटचा थेट संबंध नसावा. I sincerely hope so. काय खरं काय खोटं हे कदाचित शर्मिलाच सांगू शकेल. पण I pray to God, I hope, I want to believe that she hasn't stooped to a level that low .

पूनम, नाही, त्या कशाचाही प्लॉटमधे वापर नाही. ट्युलिपच्या वैयक्तिक आयुष्यातले संदर्भच फक्त, जे वर उल्लेख झालेले आहेत, वडलांचा मृत्यू इत्यादी, फक्त त्याच घटनांचा वापर कादंबरीत आहे. तिची ब्लॉगवर जी व्यक्तिरेखा होती फक्त तिचाच वापर आहे. ब्लॉगवर प्रेम करणाऱयांशी वैयक्तिक संपर्क, मेसेजेस, मेल्स वगैरे सुरू झाले आणि ट्युलिपच्या कॅरेक्टरशी प्रामाणिक राहून मी ते त्याच संदर्भांनी वाढवत नेले, मी स्वतः:ही त्यात गुंतत गेले. ही माझी अक्षम्य चूक. मुळातच हा वैयक्तिक संपर्क बंद ठेवायला हवा होता.

इतका काळ इतक्या लोकांना एका काल्पनिक व्यक्तीवर विश्वास ठेवायला लावणं हा तिच्यातल्या लेखकाचा विजय म्हणायचा की हे इतकं बेधडक बेमालूम करावंसं वाटणं हा माणूसकीचा पराभव?
कोण जाणे!

खूप सुंदर मतितार्थ ....

'वोडका डायरीज' नावाचा एक सिनेमा रिसेंटली आला होता. फ्लॉप झाला, कारण तो होताही यथातथाच.
पण त्यातला लेखक, ज्याची भूमिका केके मेनननी केलीय, असाच एक पॅरलल विश्व जगत असलेला दाखवलाय. अर्थात त्याची केस खूप गंभीर वळण घेते आणि तो मनोरुग्णच बनतो.
लिखाणासाठी असे प्रयोग करणं, दीर्घ काळासाठी ते चालू ठेवणं, त्याच्या अस्तित्वासाठी खोटे पुरावे देणं, त्यात गुंतत जाणं, हे सगळं फार धोकादायक आहे. आयुष्य हे लिखाणापेक्षा मोठं आणि महत्वाचं आहे. अश्या प्रयोगांमुळे आत्मघात संभवतो.
काळजी वाटली, हे सगळं वाचून.

असो.
लेख मस्त आहे. सगळी सफर घडवून आणणारा आहे आणि शेवटी इंग्रजीतलं 'सफर' सुद्धा जाणवून देणारा आहे.

माझा दोन्ही आयडींशी वैयक्तीक संपर्क नाही. (खरं तर व्हॉटसप ग्रुप हा प्रकार अस्तित्वात येईपर्यंत असे आंतरजाल आयडीशी वैयक्तीक संपर्क हा प्रकार खूप घाबरवून जायचा.पण व्हॉटसप ग्रुप मधून खूप चांगल्या मैत्रीणी भेटल्या.त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटी झाल्या.आता भीती वाटत नाही.)

ट्युलिप आयडी चं लिखाण खूप आवडायचं. एका केशरी संध्याकाळी, भोचक काका काकू, पारीजातक हाराची गोष्ट, जर्मनी तलं शॉपिंग वगैरे एकदम चवीने वाचलेत (ते मेरी जेन चे हिल्स, टोट बॅग, फिरनी च्या पार्ट्या वगैरे.) या आयडी बरोबर मीही जर्मनीत मनाने राहून, शॉपिंग करुन यायची. बंगाली माणसाशी जुळलं त्याच दरम्यात ब्लॉग प्रायव्हेट झाला आणि पुढे काहीही वाचता आलं नाही.मूळ आयडी चित्रपट लिखाण माहीतगार आहेत हे माहीती, पण १-२ लेखापलिकडे जास्त लिखाण वाचलेले नाही.

आता सगळा खुलासा झालाच आहे तर सर्व विसरुन कादंबरी धडाक्यात येऊदेत. दोन्ही आयडीने लिखाणाला शुभेच्छा!

वरती कोणीतरी कायद्याविषयी लिहिलेय, ट्रोलिंग कायद्याविषयीही तेवढेच तत्परतेने लिहले असते तर बरे झाले असते ना.
हे वरती ज्यांनी, दिनेश एपीसोड बद्दल विचारलेलं आहे त्या प्रश्णाची माहिती:
इथे बिनबोब्बाट ट्रोलिंग चालयचे. शेवटी दिनेश ह्या आयडींच्या लेखाने अडमिनला मग डोळेझाकपणा न करता उत्तर द्यावे लागले. स्वाती आबोळे ह्यांनी इतरांचे केलेले ट्रोलिंग संतापजनक होतेच व आहे.

आता ट्युलिप ह्यांचे ब्लॉगविषयी: लिखाण छान असायचेच पण त्यातली लेखिकेची प्रतिमा एक तरूण, तरल मनाची युवती असे तयार झालेले. तर त्या प्रतिमेचा मोह शेवटी लेखिकेला झाला असावा अशी शक्यता गृहित धरली तर असे घडु शकते. आता, ते कितपत चुक वा बरोबर वा किती काळ, कुठल्या परीस्थीतीत, काय गरज हे नक्की कोणीच ठरवु शकतो का?. आभासी जगतात, त्यात जरा ज्यास्तच वहात जाणे होवु शकते. पण शर्मिला आयडीने माफी मागणे सुद्धा हे हिंमतीचे काम आहे, नाहितर दुसर्‍यांच्या भावना दुखवून रिमोर्स नसणारी आयडी बद्दल लिहिलेच आहे वरती. सरतेशेवटी, भावनांना दुखावले हाच मुद्दा आहे ना.
कायद्याच्या गोष्टी सोयीस्करपणे लोक करतात पण बोलणारे हे नेहमीच कायदा पाळणारे असते तर मग काय हवे?
दुसर्‍यांकडून माणूसकीची अपेक्षा ठेवणारे ते स्वतः आधी पाळतात का हा प्रश्ण आहेच. बाकी, आंतरजालावर निरागस, कोमल हृदयाचे कमीच सापडतील.
————
“खालील भागाचा कोणाशीच सबंध नाहिये.. आणि ट्युलिप वा कुठल्याही आयडीवर टिप्पणी नाहिये.” कारण मी कोणालाच ओळखत नाही.
पण, लेखक व त्याचे गोष्टीसाठी प्रयोगः हि गोष्ट इतकी धक्कादायक का वाटली हे म्हणून हे लिहावेसे वाटले जे काही मी फक्त वाचलेले.
लेखक हा नेहमीच त्याचे अनुभव वा टिपलेले क्षण लिहित नसतो. त्याच्या कल्पनाविश्वातली पात्रे रंगवतो. त्याच्या लेखातील एखादे पात्र कोणा वाचकाला हेलावून सोडते पण ते पात्र खरे असते का? तर नेहमीच नाही. आणि वाचकाला भावनिक पातळीवर पोहोचवून तर त्याची फसवणूक आहे का? तर उत्तर हो वा नाही असु शकते.
हा एक किस्सा आहे घडलेला, एका प्रथितयश लेखकाला विचारले, तुमची एखादी संवेदनशील कथा प्रसिद्ध झाल्यावर काय आवडते प्रतिसादात? बरचसं गुढ हसून उत्तरले, वाचकाचे गुंतणे/हेलावणे आवडते. पण कथा तर तुमची फक्त कल्पना असेल तर? त्यावर लेखक महोदय हसले... कल्पकता खुंटलेला लेखक असेल मग तो.
हा फक्त किस्सा आहे, ह्यातुन कुठलाही मेसेज द्यायचा नाहिये. की काहीही प्रूव करायचे नाही. अश्या प्रयोगाला कसे वळण द्यावे व कुठे नेवून थांबवावे हा प्रोटोकॉल धुसर असतो. असे ह्या किस्स्यातून मला वाटले माझ्या मतीनुसार.
रसप ह्यांनी सांगितलेल्या किस्स्यात/मूवीत म्हटल्याप्रमाणे, कधी कधी गंभीर वळण घेवु शकते. मला वाटते, शब्द हा हिंदी मूवी थोड्याफार असाच (रसप ह्यांनी उल्लेखलेला चित्रपट) होता.
तर असो.

या धाग्यावर मी खालील मानसिक अवस्थांमधुन गेलो

  1. चांगलं व्यक्तिचित्रण लिहिलंय. हायझेनबर्ग सारखं काल्पनिक असेल की हा स्वातींचा खराच अनुभव असेल?
  2. आयला ही तर सत्य घटना निघाली! नक्की कोणाबद्दल असेल हे? मी होतो का तेव्हा मायबोलीवर?
  3. काय लोकं उगाच फसवणुक वगैरे शब्द वापरुन राईचा पर्वत करताहेत! मायबोलीला ड्युआयडी नविन आहेत का!
  4. ह्म्म्म शर्मिला.... आधी कधी ऐकलं नव्हतं या आयडी बद्दल. ट्युलिपचं पण काही वाचलेलं नाही. सगळेजणं तरल/तलम वगैरे म्हणताहेत म्हणजे भारीच असणार. शोधुन वाचायला हवं
  5. वॉव स्वाती आणि नीधप मधली कॅटफाईट मस्त रंगणार असं दिसतंय, भैय्या एक एक्स्ट्रा लार्ज पॉप्कॉर्न देना Happy
  6. अरेच्या, लोकांनी स्वातींवरच हल्ला चढवला? अरे गिधाडांनो, त्यांच्या हळुवार कवीमनाला झालेल्या जखमांवर फुंकर मारायची सोडुन टोच्या मारताहात, कुठे फेडाल ही पापं!
  7. Anything for a good fiction. ??? फारच उद्दाम्/निर्लज्ज प्रतिक्रिया वाटतेय ही. पण या मॅडम माबो धाग्यावर का येत नाहीयेत? कुठल्या तोंडाने येतील म्हणा...
  8. लोकांना खोटी माहीती सांगुन त्यांच्याकडुन भावुक प्रतिसाद उकळणे आणि त्यात त्यांची खाजगी माहीती मिळवणे हा सोशल इन्जिनिअरींगचा प्रकार दिसतोय. तो ही कशासाठी तर for a good fiction! माझं सुरुवातीचं "नॉट अ बिग डिल" हे मत चुकीचं होतं तर...
  9. Anything for a good fiction??!!?? खरंच हा कादंबरीच्या प्रसिद्धीपुर्वी केलेला पब्लिसिटी स्टंट असु शकतो का? स्वाती/नीधप/शर्मिला सब मिले हुए है! बिक चुकी है गोर्मिंट...
  10. हुश्श्श... आली बाबा एकदाची अनकंडिशनल माफी. आता माफी अ‍ॅक्सेप्ट होउन तुझ्या गळा माझ्या गळा झालं की पब्लिसिटी स्टंट होता हे नक्की झालं
  11. LOL, खरोखरच माफी अ‍ॅक्सेप्ट झाली की Proud
  12. Yawn......कंटाळा आला....दुसरीकडे काही तमाशा चालु नाहीये का? ट्विटर वर जाऊ की फेसबुकवर?

सर्व वाचून हा लेख व्यक्तिचित्रण स्पर्धेत असायला नको होता असे वाटते.

>>>अरेच्या, लोकांनी स्वातींवरच हल्ला चढवला? अरे गिधाडांनो, त्यांच्या हळुवार कवीमनाला झालेल्या जखमांवर फुंकर मारायची सोडुन टोच्या मारताहात, कुठे फेडाल ही पापं!<<<<

Rofl

>>झंपी, ट्रोलिंग ना?<<
हो, हो भावनेच्या भरात जरा गलतीसे मिस्टेक...

——
व्यक्तीचित्रण स्पर्धेच्य नावाखाली नकोच हवे होते.

लेख वाचुन बापरे झालं....
लेखिके बद्दल सहानभूती पण वाटली..आणि फसवणुकी बद्दल राग पण आला...
पण माझं एक वैयक्तीक मत :

गणेशोत्सव हा प्लॅट्फॉर्म वापरुन हा लेख लिहायला नको होता..एरवीही माबो वर भरपुर गोंधळ चालुच असतो...कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या धाग्यावर सतत गोंधळ घालतच असतं.आणि सध्या ईथे भरपूर नकारात्मक उर्जा पसरली आहेच...
निदान गणेशोत्सवा च्या वेळी ईथली निगेटीव्हिटी कमी होईल असे धागे यावेत अशी अपेक्षा होती....
त्यामुळे ईतर वेळी हा लेख टाकला असतात तरी चाललं असतं...

Pages