व्यक्तिचित्रणः कॅटफिश - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 September, 2018 - 22:03

टीप : प्रस्तुत ललितातील सर्व पात्रे खरी आहेत. कोणत्याही काल्पनिक व्यक्तीशी त्यांचा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा.
---

"So you all got catfished?! And I thought you were a bunch of smarties!" - लेक डोळे फिरवत उद्गारला आणि पुन्हा टीव्हीकडे वळला.

मी हळूच टेबलाखाली फोन धरून आम्ही Catfished म्हणजे काय झालो ते गूगल केलं. अर्बन डिक्शनरीने तत्परतेने सांगितलं: 'Catfish : Someone who pretends to be someone else, especially on the internet.'
---

तिची माझी ओळख जवळपास एका तपापूर्वीपासूनची. इन्टरनेटला घरीदारी सहज अ‍ॅक्सेस उपलब्ध झाला आणि जगभरातील मराठी पाउलखुणा जपणार्‍या संकेतस्थळांवर संचार करता येऊ लागला त्या काळातली. आता मुलांना आंतरजालाचं नागरिकशास्त्र शाळेपासून शिकवतात. आम्ही शिकलो अनुभवांतून. आपल्या फावल्या वेळेत, आपल्या मातृभाषेत ज्यांच्याशी संवाद साधता येतो अशी मंडळी भेटणं याचं अप्रूप परदेशात अजूनही वाटतं, तेव्हा तर तो जवळपास चमत्कार वाटायचा! मग त्यातही समानधर्मीयांबरोबर विशेष सख्य जमणं ओघाने आणि सहज झालं. पुढे यातली बरीच मंडळी प्रत्यक्षातही भेटली आणि आतातर आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत.

ती फारशी कोणाला प्रत्यक्ष भेटल्याचा इतिहास नाही. पण ऑनलाइन गप्पा मारायला कधीतरी यायची. अतिशय सुंदर, तरल ललित लेखन करायची. मला तिचं लिखाण आणि तिला माझ्या कविता आवडत असल्यामुळे मग कधीतरी व्यक्तिगत निरोप - ईमेल्सही सुरू झाल्या आणि मैत्री दृढ होऊ लागली. जुजबीच पण खाजगी माहितीही एकमेकींना सांगितली गेली.

माझ्यापेक्षा वयाने लहान होती ती. जाहिरातविश्वात काम करायची. पार्ल्यात तिच्या वडिलांचं घर होतं. डॉक्टर होते ते. भाऊ अमेरिकेत होता, आई पूर्वी विल्सन कॉलेजला मराठीची प्राध्यापिका होती. तिने लहानपणापासून हट्टाने मराठी वाचनाची सवय लावल्यामुळेच ही इंग्रजी माध्यमात शिकलेली असून इतकं उत्तम मराठी लिहायची.

कामाच्या निमित्ताने जगभरात भटकंती करायची ती आणि भेटली की नेहमी काहीतरी सुरस आणि चमत्कारीक असायचं तिच्या पोतडीत सांगण्यासारखं. बहुश्रुतता होती, तल्लख विनोदबुद्धी होती आणि एक तरुण सळसळता उत्साह होता - आमच्या नाठाळ ग्रूपमध्ये किती सहज मिसळून गेली होती ती.

पुढे एका बंगाली मुलाच्या प्रेमात पडली. त्यांचा शेजारीच होता. सुंदरबनाच्या पर्यावरण संवर्धन-संरक्षणाचं काम करणार्‍या टीमचा भाग होता. ही महागड्या उंची वस्तूंची शौकीन, जगभर फिरणारी, एलीट अर्बन उत्साही मुलगी आणि तो अबोल, विरक्त, ध्येयासक्त मुलगा. मजेशीर जोडा होता. पण ती आनंदात होती. त्याच्याबद्दल बोलायला, त्याच्यावरून चिडवून घ्यायला किती आवडायचं तिला! तिचा साखरपुडा झाल्याचं कळलं तेव्हा मी कधी नव्हे ते तिला फोटो पाठवायला सांगितलं. तोवर तितपत हक्क वाटायला लागला होता. तिच्या लिहिण्यावरून माझ्या डोळ्यांसमोर जशी छबी निर्माण झाली होती, तशीच होती फोटोतली ती. छान होता जोडा. खूप मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या तिला.

त्याच काळात कधीतरी वडील गेले तिचे. त्यांच्याशी ती खूप - आईपेक्षाही अधिक अटॅच्ड होती. वडिलांचं जाणं खूप खोल परिणाम करून गेलं तिच्यावर. त्यात 'लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप'चे तोटे दिसायला लागले होते. भावी नवरा मुळात अबोल, आणि त्यात चॅट-ईमेलवर फार मोकळेपणी बोलणारा नव्हता. तिच्या बोलण्यात कधीतरी डिप्रेशन डोकावायला लागलं. काळजी वाटायची, पण वडिलांबद्दल सांत्वनपर ईमेल पाठवण्यापलीकडे आणि नंतर भेटेल तेव्हा थोडं खेळीमेळीचं बोलण्यापलीकडे काय करता येणार होतं आम्हाला?

खूप पॅशनेट माणसांचा उत्साह जसा झगमगीत असतो तितकंच त्यांचं नैराश्यही खोल काळोखं असणार हे बहुधा आपण गृहित धरलेलं असतं.
तशाही तिच्या भेटी, तिचं ऑनलाइन येणं किंवा ईमेल्स वगैरेंना उत्तर देणंही फार नियमीत नसायचं, पण फिरती-प्रवासांच्या गडबडीत नसेल जमत असं समजायचो आम्ही. आता ते आणखीनच अनियमित झालं होतं.

मग एकदा आली ती आनंदाची बातमी घेऊन. ती लग्न करणार होती. दोघंही आपापल्या फिरतीवर युरोपात असणार होते, तिथेच भेटून गाठ बांधणार होते. तिच्या एकाकीपणावर, नैराश्यावर आता इलाज होईल अशा कल्पनेने खूप आनंद वाटला. ती मुळातच रोमॅन्टिक, तेव्हा जवळपास इंद्रधनुष्यावरच पोचली होती! खूप थट्टामस्करी, कौतुकं करून घेऊन लग्नासाठी म्हणून गेली ती मात्र बराच काळ गायब झाली.

जगरहाटी सुरू राहातेच, पण मध्येच कधीतरी आठवण निघायची मात्र तिची. आता कुठे असेल, लग्न मानवलं असेल का असं मनात यायचं. एखादी चौकशीची ईमेल 'हवाओं पे लिख दो हवाओं के नाम' म्हणून पाठवली जायची.

मग अशीच एकदा धूमकेतूसारखी तिची ईमेल उगवली. खूप आनंदाने उघडली, पण बातमी चांगली नव्हती. प्रेग्नन्ट असताना, नवरा आणि इतर कुटुंबीय नको म्हणत असताना, कामाच्या निमित्ताने कुठे आडगावात जाऊन राहिली होती, तिथेच तिचा गर्भपात झाला होता. ते झालं तेव्हा अगदी एकटी होती, आणि नंतर एकाकी झाली होती. नवरा, आई, सासूसासरे जपत होते पण त्यांच्या डोळ्यांत कायम तिला 'तरी मी म्हटलं होतं' ही फिर्याद दिसायची! त्यात ती पूर्वी कधीतरी स्मोकिंग करायची हे सासूच्या कानावर गेलं होतं. तिचा गर्भपात हा तिचा गुन्हा ठरू पाहात होता. इतकी मोठी वैयक्तिक ईमेल तिने प्रथमच पाठवली असेल - पण वाचवत नव्हती. पूर्णपणे कोलमडून गेली असावी असं जाणवत होतं. त्यात नवरा परदेशात होता आणि ही सासरी राहिली होती रिकव्हरीसाठी.

मी एरवी फार खत्रूड बाई आहे, पण ती ईमेल वाचताना जीव तुटला. तिचं सांत्वन करणारी, धीर देणारी खूप हळुवार ईमेल उत्तरादाखल तिला पाठवली. आता आठवलं की हसू येतं, पण भावनेच्या भरात मी तिला 'बाळा' म्हटलं होतं एका ठिकाणी. तिचंही लगोलग प्रत्युत्तर आलं - ती व्हिएन्नाला तिच्या नवर्‍याकडे चालली होती. माझी ईमेल तिने विमानात पुन:पुन्हा वाचली म्हणे.
धाकट्या बहिणीची वाटेल तशी काळजी वाटत राहिली त्यानंतर तिची!

काळाचं औषध लागू पडलं असावं. नंतर बर्‍याच काळाने पुन्हा ऑनलाइन भेटली तेव्हा बरीच सावरलेली, बर्‍यापैकी नॉर्मल वाटली. खूप बरं वाटलं.
मी तेव्हा दुसऱ्यांदा प्रेग्नन्ट होते. अजून बातमी ऑफिशियल व्हायची होती, पण हा धूमकेतू पुन्हा केव्हा उगवेल काय माहीत, असं वाटून तिला बातमी सांगितली. याही वेळी अगदी लगोलग उत्तर आलं तिचं. माझं अभिनंदन केलं होतं आणि 'आता मलाही पुन्हा चान्स घ्यावासा वाटायला लागला तुझं ऐकल्यावर' असं लिहिलं होतं. खूप भरून आलं वाचून. देवावर माझा विश्वास नाही, पण हिचं इथून पुढे सगळं छान होऊ दे असं एक मनोमन साकडं घातलं गेलं.

पुन्हा चान्स नाही, पण दुसरी एक बेबी मात्र तिने त्यानंतर जन्माला घातली - कादंबरी. तोवर छोटे छोटे ललित लेख लिहीत होती, ते जोडून एक कादंबरी रचली होती तिने. मला पहिला मसुदा अभिप्रायासाठी पाठवला होता.
अभिप्रायाची तशी आवश्यकताच नव्हती, ती उत्तम लेखिका होतीच. कादंबरीची भट्टी जमून आली होती. विचारलं तर छापायची का, कधी छापायची असं काही ठरवलेलं नाही म्हणाली.

पुढे आणखी काही काळ लोटला. मध्यंतरीच्या काळात माझ्याबरोबर एका ऑनलाइन उपक्रमाच्या संयोजनातही तिने सहभाग घेतला.

तीनेक वर्षांपूर्वी मी व्हॉट्सअ‍ॅप वापरायला लागले. त्यात कॉन्टेक्ट्स पाहताना सहज लक्षात आलं की उपक्रमासाठी घेतलेल्या तिच्या फोन नंबरवर प्रोफाइलमध्ये निराळ्याच व्यक्तीचा फोटो आहे! मजा म्हणजे या व्यक्तिशीही माझी त्याच संकेतस्थळामुळे जुजबी ओळख होती. एवढंच नव्हे, तर त्या व्यक्तीला मी एका स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष भेटलेही होते! ही व्यक्ती मध्यमवयीन आणि व्यवसायाने पत्रकार होती. मी गोंधळले. खरंतर अर्थ उघड होता, पण माझं मन मान्य करायला तयार नव्हतं. त्या दोघींत नामसाधर्म्य होतं, आपणच कदाचित नंबर सेव्ह करताना घोळ केला असेल अशी मी मनाची समजूत घातली.

मग काही दिवसांपूर्वी ती माझी ऑनलाइन आभासी सखी ही या व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणार्‍या व्यक्तीचाच एक अवतार असल्याची कुणकूण दुसऱ्य एका मैत्रिणीकडून मला लागली. या वेळीमात्र मी त्या नंबरवर मेसेज पाठवला - ओळख दोन्हीकडे होतीच, विचारलं - मी नंबर चुकीच्या नावाने सेव्ह केला आहे का?

उत्तर आलं नाही.
म्हणजे, थेट उत्तर आलं नाही. फक्त त्या व्यक्तीने तिचा प्रोफाइल फोटो तत्परतेने काढून टाकला.

एक गुपित फुटलं, एका विश्वासाला तडा गेला.

खूप वाईट वाटलं. आता इतकी वर्षं आंतरजालावर संचार केल्यावर आभासी अवतार / डुप्लिकेट आयडीज ही काही नवलाईची बाब राहिलेली नाही. त्याचं दु:ख वा राग वाटण्याऐवजी उलट 'आयडी ओळखा' खेळ खेळण्यापर्यंत मजल गेली आहे.
पण हे प्रकरण त्यातलं नव्हतं. इथे जीव गुंतला होता.

तिने मला काही harm पोचवला का? नाही. माझी दुरुपयोग करता येण्यासारखी काहीही माहिती ना त्या व्यक्तीने कधी मागितली, ना मी कधी दिली. तिने कुठला शब्द देऊन मोडला का? माझं काही नुकसान झालं का? नाही, अजिबातच नाही.
पण तिने एक इतकं elaborate आभासी विश्व विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीसारखं इतकी वर्षं maintain केलं? का? काय मिळालं असेल त्यातून?!
लिहिण्यासाठी टोपणनाव घेणं निराळं आणि न घडलेल्या अपघात-दुर्घटनांबद्दल हाडामांसाच्या माणसांकडून सांत्वनं करून घेणं निराळं! कोणाचेतरी साखरपुड्याचे फोटो आपले म्हणून पाठवणं निराळं!

यथावकाश त्या व्यक्तीने स्वत: वस्तुस्थिती मान्य केली असं कळलं. फोटो कोणाचे होते वगैरे तपशिलांत तसा अर्थ राहिला नव्हता, पण तेही समजलं. जे घडलं त्यात तिला फारसं काही गैर वाटलेलंच नाही असंही कानावर आलं. तिच्या लेखी हा सगळाच एक साहित्यिक प्रयोग होता.
मला एेकताना वाटलं की माझ्यासारखी मंडळी या प्रयोगाचं साहित्य ठरली.

इतका काळ इतक्या लोकांना एका काल्पनिक व्यक्तीवर विश्वास ठेवायला लावणं हा तिच्यातल्या लेखकाचा विजय म्हणायचा की हे इतकं बेधडक बेमालूम करावंसं वाटणं हा माणूसकीचा पराभव?
कोण जाणे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या लेखाबद्दल मला शून्य माहिती होती. त्या अविकाच्या दुख-या बाफ वर समजले म्हणून पाहिले. लेख वाचून ठेवणार इतक्यात प्रतिसादांची धक्कादायक मालिका सुरू झाली. डोक्याचं भजं झालं. आता कोण कुणाची कसं वागलं, कोण कशा परिस्थितीत पलट्या मारतं यामधे मला खरंच इटरेस्ट राहीलेला नाही. मात्र साळसूद कुणीच नाही यावर सहमत होऊयात. आदमखान यांचे संरक्षण नसेल तर अनेकांची मस्ती जिरवणे सहज शक्य आहे. असो. अनावश्यक आहे हे ही.

ट्युलिप या आयडीचे लिखाण मला खूप आवडायचे. मला या आयडीच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती नव्हती. तसेच ड्युआयडी असल्याचा अंदाजही आलेला होता. मात्र काही ड्युआयडींच्या मागचे लोक उघड होऊ नये असं वाटतं त्यातला हा आयडी होता. एक शृंगारीक कविता वाचली होती. मुक्तछंद असूनही त्या तरलतेने जीव घेतला होता.

ऑर्कुटच्या काळात नाम काकांनी (नाम गुम जायेगा ) दोन आयडी निर्माण केले होते. त्यातला एक टल्ली. ही व्यक्तिरेखाच त्यांनी जिवंत केली. त्यामुळे त्या आयडीच्या लिखाणाला एक वेगळीच नशा आली. याच कविता नामकाकांनी स्वतःच्या नावाने लिहील्या असत्या तर त्या अपील झाल्या नसत्या हे मला कबूल केले पाहीजे. टल्लीच्या कवितात त्याची बेफिकिरी, जगाकडे क्रांतिवीरच्या नानाप्रमाणे उनाडपणे पाहणे पण त्यात त्याचा कुठेतरी उफाळून येणारा जीवघेणा दर्द...

यातून आल्या समुद्रकविता. समुद्राशी असलेलं त्याचं भांडण, त्याचं नशेत टल्ली होणं यातून त्याचा दर्द सूचकपणे येत गेला. मग शाळा ही कविता आली. आणि टल्ली उलगडत गेला.

ज्या दिवशी टल्ली म्हणजे नामकाका हे उघड झालं तेव्हां अनेकांनी नामकाकांना घरी जाऊन सुनावलं. शाळा मधल्या काही कविता त्यांना आता अश्लील वाटू लागल्या होत्या. तर काही स्त्री आयडींना त्यांनी रिप्लाय दिले त्यांनी थयथयाट सुरू केला. नामकाका पुरते बदनाम झाले. पण ते स्थितप्रज्ञाप्रमाणे अबोल झाले. सहा महीन्यांनी लोकांना टल्लीचा प्रयोग आपोआप ध्यानात आला. लोक पुन्हा त्यांना लिहीते व्हायची विनंती करत राहीले. पण नामकाकांनी नंतर कधीच लिहीले नाही.

हे सर्व आठवले.

बाळासाहेब गेल्यानंतर महाराष्ट्रात मैद्याचं पोतं वि. बाळासाहेब असा सामना बंद झाल्याने दु:खी जिवांना आज आशेचा किरण दिसू लागला हे मायबोलीचं मोठंच योगदान म्हणायला हवं, नै का ?

माझ्यासारखे अनेकजण इथे असतिल ज्यांना ट्युलिपही माहित नाही आणि शर्मिलाही माहित नाही. जुन्या काही लोकांपुरता असलेला हा अनुभव सगळ्यांसमोर मांडुन काय मिळाले? ही चिखलफेक गणपती उपक्रमाच्या निमित्ताने केली हे तर अजुनच खटकले. पर्सनल धुणी धुवायला दुसर्या जागा नव्हत्या का?

पर्सनल धुणी धुवायला दुसर्या जागा नव्हत्या का? >> Lol हाच प्रश्न इथे तुम्ही धरून बर्‍याच इतरांना लागू होतो की Happy
हा अनुभव सगळ्यांसमोर मांडुन काय मिळाले? >>> लो कल्लो बात!! काय मिळालं म्हणजे ??व्यक्तिचित्रण स्पर्धा आहे ना ही? वाचा नियमः
काही वल्ली तुम्हाला तुमच्या आयुष्यात भेटल्या असतीलच. मग तो मित्र/मैत्रीण असू शकतो, वाटाड्या किंवा कोणीही ज्यांच्याबद्दल खूप काही लिहण्यासारखं आहे. अश्याच तुम्हाला भेटलेल्या वल्लींबद्दल तुम्हाला लिहायचंय.
नियम
१. कोणत्याही विषयाचे बंधन नाही.
Happy

माझ्यासारखे अनेकजण इथे असतिल ज्यांना ट्युलिपही माहित नाही आणि शर्मिलाही माहित नाही >>> म्हणजे बाकी प्रवेशिका ज्यांच्यावर बेतल्यात त्या व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत का? बाकी, हा लेख गणेशोत्सवातील स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून लिहायला नको होता हे मत त्याच गणेशोत्सवातीलच एका धाग्यावर असभ्य भाषेत लिहिलेलं चालतं वाटतं.

दु:ख पराभवाचं नसतं, फसवणूक करुन पराभव गळ्यात मारला जातो त्याचं दु:ख होतं, कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याचं वाईट वाटतं.
- व. पु. काळे
एकूणच धक्कादायक... निवांत वाचतो सगळं!

दु:ख सुविचारांचे नसते, बेसावध क्षणी सुविचार गळ्यात मारला जातो त्याच दु:ख होतं, वपुंचे लेखन सुमार असतांनाही त्यांचे सुविचार ज्या परिस्थितीत ऐकवले जातात त्याचं वाईट वाटतं.
- गो सो काळे

उपास बऱ्याच दिवसांनी दिसलास, दिवे घे Proud

स्वाती, विश्वास ठेवणं हा तुझा साधेपणा होता. तुझा अनुभव वाचून वाईट वाटलं. पण गेल्या काही वर्षांत व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते आणि किती क्षुल्लक गोष्टींमुळे जाऊ शकते हे अनुभवलं.
असो, तुझं लिखाण जिथे मिळेल तिथे आवर्जुन वाचतो. You never disappoint with your writing skills! कविता येऊ दे थोड्या...

या निमित्ताने अनेक वर्षांनी माबोवर आलो...

अरेच्चा,
आम्ही एका मित्राला फिल्म इंडस्ट्रीत तुला काम मिळेल म्हणून फोटो काढायला लावायचो. तसेच एक मुलगी तुझ्यावर लट्टू आहे असे सांगून प्रेमपत्रं लिहून घ्यायचो. त्याला भेटायला बोलावलेले तिथे आमच्यातलाच एक जण मुलगी बनून गेला होता.. हे प्रकरण नंतर उघडकीस आलेच.
एक फिमेल प्रोफाईल बनवली होती कवितांपुरती. फोटो दुस-या व्यक्तीचा न लावता स्वतःच्याच फोटोवरून फिमेल कन्व्हर्जन करून लावला होता. जे जे लाईन मारत होते त्यांना नंबर देऊन बाईच्या आवाजात गप्पा पण मारल्या होत्या. पण सीक्रेट सांभाळणं जमलं नाही. इथेच काही लोकांना ही गंमत सांगितली. लगेचच त्यांच्याकडून ते सगळीकडे पसरलं. पण कुणी हाणायला नाही आले हे नशीबच. ज्यांना सतावले ते पण नंतर हसत होते. तो फोन नंबर बंद केला पण अजून त्या नंबरवर आशिकांचे फोन जात असतात.
आज इथले भावना प्रधान प्रतिसाद वाचल्यानंतर आत्महत्याच कराविशी वाटू लागलीय.
क्या मुझे इस सभ्य समाज मे जीने का हक है ?
बाबा कामदेव जी कृपया आप मुझे स्वयंप्रकाशित करें ( प्ळिज एनलायटन मी )
( ब्लॉगवर होतं हे.. पण चुकून डिलीट झाला ब्लॉग )

वरच्या प्रतिसादात ज्यांना त्रास दिला त्या व्यक्तीही तशाच टणक आणि निब्बर होत्या. तरी पण त्यांच्या नसलेल्या भावना दुखावल्या असतील तर इथेच क्षमा मागून घेतो. ज्यांना अजून माहीत झालेलं नाही त्यांनी आता पुढील संभाषण थांबवावे व मोठ्या मनाने माफ करावे ही विनंती. (कारण कि, मी इथे नवीन आहे).

या कथेमुळे मला माझ्या चुकांचा बोध झाला आणि पश्चात्ताप झाला आहे. आपले आभार.
(लोक वाचणार असतील तर इथेही टंकतो )

हे सगळं आज वाचलं. धक्कादायक प्रकार आहे हा.तरीच हा आयडी वाचून बरेच जण मला ती ट्युलिप समजायचे. अर्थात हा आयडी घेताना मला अशा नावाचा आयडी आधीपासून अस्तित्वात आहे हे माहीतच नव्हतं. त्या ट्यूलिपचं लिखाण वाचायचं वाचायचं म्हणून राहूनच गेलं.
असो.. परत.. ती मी नव्हेच

आज इथले भावना प्रधान प्रतिसाद वाचल्यानंतर आत्महत्याच कराविशी वाटू लागलीय.>>
बिन्धास्त करा हो, पाहिजे तर धागा उघडा कशी करायची ह्याबद्दल..

दिनेशदा म्हणून माय्बोलीवरचे खूप छान लेखक होते, त्यांना ह्या च आंबोळे बाई आणित्यांच्या काही सख्यांनी किती bullying, trolling करून इथून शेवटी घालवलं. त्या मानाने ट्युलिप नामक ड्यु आयडी ने यांच्याबरोबर जे केलं ते ब रं च कमी उपद्रवी होतं.
त्यामुळे हा लेख म्हणजे अगदीच सौ चूहे खाके...टाईप चा आहे.

ही चिखलफेक गणपती उपक्रमाच्या निमित्ताने केली हे तर अजुनच खटकले. पर्सनल धुणी धुवायला दुसर्या जागा नव्हत्या का?>>+१००००००

मी हा सगळा धागा फार दिवस झाले वाचते आहे. हा धागा ज्यांनी लिहिला ते किंवा ज्यांच्याबद्दल लिहिला ते मायबोली जगतात माझ्याहून फार मोठे आहेत. मी बहुतांशी वाचनमात्र असूनही न राहवून बोलावे वाटते की या सगळ्यात फक्त एक वाक्य असे आहे जे मनात ठसून गेले. ते म्हणजे anything for a good fiction. आपल्या साहित्यकृतीशी आणि आपणच निर्माण केलेल्या पात्राशी इतके एकरूप होता येणे हे फार romantic वाटले मला. असे काही जे... जे मला जमावे. जमायला हवे... असंही वाटलं की मी जर लेखिकेच्या जागी असते तर? तर मी तिला मिठी मारून म्हटले असते 'बायो! .....' असो.
इथे मीही विकृत ठरेन तर त्यालाही माझा आक्षेप नाही.

Plot twist... ट्युलिप ही व्यक्ति खरोखरच अस्तित्वात आहे... शर्मिला फडके ही तिनेच बनवलेली काल्पनिक व्यक्तिरेखा होती.
खरी कादंबरी रिलिज होईल तेव्हा हजारो जबडे वासले जातील! Lol

हजार लोक वाचणार का त्या कादंबरीला ? माबोवरचे दहावीस वाचतील बाकीचे रिव्यू ची वाट पाहतील. माबो बाहेर कोण पदरमोड करून विकत घेऊन वाचतंय ? त्यामुळे कुठले हजार जबडे वासणार ?

बाबाजी,
लोकांनी ओढून ओढून हा धागा FB वर नेलाय,
त्यामुळे बऱ्याच लोकांना या बद्दल कळलंय

इतका काळ इतक्या लोकांना एका काल्पनिक व्यक्तीवर विश्वास ठेवायला लावणं हा तिच्यातल्या लेखकाचा विजय म्हणायचा की हे इतकं बेधडक बेमालूम करावंसं वाटणं हा माणूसकीचा पराभव?>> मला तरी तिच्यातल्या लेखिकेचा विजय वाटतो आहे. माणूसकीचा पराभव असा भलाथोरला शब्द वापरण्यासारखं काही अमानुष झालेलं मला तरी वाटत नाही. It was a literary experiment. At some point, she got carried away and so did you or any other readers who feel personally betrayed.
तुम्ही स्वतः लेखिका आहात, तुम्ही ट्यूलिप या आभासी व्यक्तिरेखेच्या प्रेमात तिच्या लेखना मुळे पडलात. इतक्या की तुम्ही तिला आपल्या भावनिक विश्वात स्थान दिलं.
मला असा एक आभासी प्रसंग सुचतोय Happy
हा सगळा उलगडा झाल्यानंतर, पहिल्या धक्का ओसरल्यानंतर, तुम्ही ट्युलिप मागच्या खऱ्या व्यक्तीला म्हणताय Wink मान गये गुरु दिस वाॉज अ मास्टरस्ट्रोक!

It was a literary experiment.>>
पण experiment मध्ये consent असतो ना. consent नसेल तर काय म्हणाव experiment ला हा विचार करतोय. (हे वाचुन stranger than fiction आठवला थोडासा, थोडासा beautiful mind पण, त्या जॉन नॅशला काय वाटत जेंव्हा त्याला कळंत कि त्याला दिसत होतं ते सगळं प्रत्यक्षात नाहिये)

वंदना, शर्मिला फडकेने ट्युलिप ही व्यक्ती उभी केली आणि लिहिण्यापुरती उभी केली असती तर प्रश्नच नव्हता पण त्या आयडीने ती पार्ल्यात रोज गप्पा मारायला यायची. तिचं लेखन आवडत होतंच आणि रोजच्या गप्पांतून मैत्रीही झाली. त्यातून इमेलमधून संपर्क वगैरे झाले. इंटरनेट एवढं भितीदातक नव्हतं तेव्हा. आणि मायबोलीतून ओळख म्हटल्यावर एक विश्वासही होता. ह्यात तिने ज्यांची फसवणूक केली ते कॅरीड अवे व्हायचा प्रश्न कुठे आला?

शर्मिला फडकेने ट्युलिप ही व्यक्ती उभी केली आणि लिहिण्यापुरती उभी केली असती तर प्रश्नच नव्हता पण त्या आयडीने ती पार्ल्यात रोज गप्पा मारायला यायची. तिचं लेखन आवडत होतंच आणि रोजच्या गप्पांतून मैत्रीही झाली. त्यातून इमेलमधून संपर्क वगैरे झाले. इंटरनेट एवढं भितीदातक नव्हतं तेव्हा. आणि मायबोलीतून ओळख म्हटल्यावर एक विश्वासही होता. ह्यात तिने ज्यांची फसवणूक केली ते कॅरीड अवे व्हायचा प्रश्न कुठे आला?---पूर्ण अनुमोदन.

कोणी नवीन id हा लेख वाचेल त्याला + ve/ -ve प्रतिक्रिया द्यावीशी वाटली , आणि त्याने तसे लिहिले , तर प्रतिक्रियेला उत्तर द्यायला हिरीरीने पुढे येउन लिहायची गरज आहे असे मला वाटत नाही ,
स्पेशली जेव्हा ट्युलिप णे माफी मागितली आणि लेखिकेने विषय संपला असे म्हंटले आहे तेव्हा.
यात आपण तेच तेच मुद्दे परत परत उगाळतो आहोत असे वाटते.

अर्थात हे माझे मत झाले,
प्रत्येकाला त्याचे मत असण्याचा आणि त्या प्रमाणे वागण्याचा पूर्ण हक्क आहे Happy

> स्पेशली जेव्हा ट्युलिप णे माफी मागितली आणि लेखिकेने विषय संपला असे म्हंटले आहे तेव्हा. > +१. ट्युलिपला माफ करायचे कि नाही हे तिच्याशी १:१ बोलणाऱ्यानी ठरवावे.

सिम्बा+१११

विषय संपला
गणपती स्पर्धा संपली
आता रविवारी कॅटफिश करी बनवून इतिश्री करु अन् सुडोमि

Pages