मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन 14-15 चा आहे त्यात. बाल गुन्हेगार मुलांची शाळा व शाळेची मुख्याध्यापिका सुलोचना. गुन्हेगार सचिन व सुलोचना यांचे हृद्य नाते तयार होते >> बहुधा 'अजब तुझे सरकार'

कसला भारी धागा आहे हा!
जुने मराठी चित्रपट एवढे कधी पाहिले नाहीत. कारण ते एकतर रविवारी दुपारी लागायचे (मला ती वेळ कधी आवडली नाही फारशी का कोण जाणे आणि बहुतेक करून सगळे रडके सिनेमे मग अजूनच उदासवाणे वाटायचे. पण तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, थोडी खरखर यायची सिनेमा चालू असताना ते एकदम आठवतेय.

हो, रविवारी दुपारपासूनचा वेळ डिप्रेसिंग असायचा. सोमवारच्या शाळेचे वेध लागल्यामुळे. त्यात जुने सिनेमे बघायला नको वाटायचे. आमचं गाव कोकणात डोंगराळ भागात असल्यामुळे टीव्ही स्पष्ट दिसायचाही नाही आधी. नंतर डिश अॅंटेना आल्यावर प्रश्न मिटला. पण त्याआधी सिनेमा बघण्याचा सोर्स म्हणजे गावात कुणाकडे सत्यनारायणाची पूजा असली की रात्री हमखास व्हीसीआर आणि टीव्ही भाड्याने आणून पिक्चर दाखवायचे. Lol एक मराठी आणि एक हिंदी अशी वाटणी असायची बहुतेक वेळा. कधीकधी पडद्यावरही दाखवायचे. ( स्वदेस टाइप) . मजा यायची.
सचिन-सुप्रिया- अजिंक्य देवचा 'कुंकू' आवडला होता. अजिंक्य देव, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, निशिगंधा वाड , अशोक सराफ, सतीश शहा यांचा ' वाजवा रे वाजवा' पण आवडलेला तेव्हा.
वर साधनानी जयश्री गडकरला जुळं होतं त्या सिनेमाचा उल्लेख केला आहे तो ' मुंबई ते मॉरिशस' का? वर्षा उसगावकरचा डबल रोल.

विवेक आणि भाभू सारखे दिसायचे.
जिथे सागरा धरणी मिळते , तिथे तुझी मी वाट पाहते .. या गाण्यात हिरविण समुद्राकाठी गाणे म्हणत असते. या सिनेमात बहुतेक विवेक आहे. त्याचा चेहरा इतका मख्ख आहे की ती अशा ठिकाणीच त्याची का वाट पाहते, काट्याकुट्यात किंवा दगडधोंड्यात पाहिली असती तरी त्याच्या चेह-यावरचे भाव अजिबात बदलले नसते असं वाटतं.

मृत्युंजय कार शिवाजी सावंत एकदा म्हणाले होते की कर्ण पडद्यावर आला तर तो कुलदीप पवार ने साकारावा. पण कुलदीप पवारची ती तलवार ग्राईंडरवर धार लावताना जास्त घासली जाऊन तिची सुरी व्हावी तशी मिशी पाहून ते पटलं नव्हतं. त्यात त्याचे संवाद म्हणायची स्टाईल पण मनोरंजक होती.
गोष्ट धमाल नाम्याची मधे तो खलनायक असतो. "तुझ्या जीवनाची टीक टीक टीक आता अमक्या तमक्या वर अवलंबून आहे" हा डायलॉग म्हणताना टीक टीक टीक ला जाम हसलो होतो.

अगदी कॅसा ब्लान्का सारखा १९४१ चा कृष्ण धवल सिनेमा क्लिअर दिसतो अगर त्याच्या यु ट्युब वर्च्या क्लिप्स ही शार्प दिसतात. त्यामुळे जुने कृ ध . सिनेमे पहायला चांगले वाटतात.
>>>>>>>
बाबा, मलापण हा प्रश्न पडायचा,
मी मनातल्यामनात मध्ययुगीन मराठी चित्रपटांच्या प्रोडक्शन व्हॅल्यू ला दोष देऊन गप्प बसायचो,
आता करण कळले.

अतुल पटवर्धन सुप्रभात. कळाले कि नाही अजून रावपाटील कोण होता ते ? हेला कोण , विठ्ठल कोण. असे कसे हो ? हे आयडी आजूबाजूला वावरतात तुमच्या, तुम्हाला माहीत नाही.

अजून बनवाबनवी कसा आला नाही>>>>

इथे मराठी चित्रपटातली न झेंपलेली दृश्ये चर्चिली जाताहेत ह अनिष्का, झेपलेली दृश्ये नाही.

कुलदीप पवार वरून तो एक ऐंशी ब्याऐंशीच्या दरम्यानचा चित्रपट आठवला (दिस जातील दिस येतील गाणे असलेला). महाबोअर चित्रपट आहे तो. फक्त ते गाणे तेवढे ऐकायला चांगले वाटते. फक्त दूरदर्शन दिसायचे त्याकाळात एकदा टीव्ही वर तो लागला होता. त्यात कुलदीप पवार कौटुंबिक हालअपेष्टा आणि शिवाय कुणाशीतरी कलह सुरु असतो. आणि ते सगळे सोडवता सोडवता अक्षरशः तीन का चार पिढ्या दाखवलेत पडद्यावर. थियेटरला कसा काय बघितला असेल लोकांनी देव जाणे.

वर साधनानी जयश्री गडकरला जुळं होतं त्या सिनेमाचा उल्लेख केला आहे तो ' मुंबई ते मॉरिशस' का? वर्षा उसगावकरचा डबल रोल>>>

नाही नाही, मी उल्लेखलेला चित्रपट जुना, कृष्णधवल आहे. त्यात मौरीशस तर अजिबात नाही व तेव्हा वर्षाच्या आईबाबांचे लग्न तरी झाले असेल का शंका आहे. चित्रपटात मुलांचे वय 7 8 ते 10 12 च्या दरम्यान आहे.

फारएन्ड बरोबर. अजब तुझे सरकार. शेवटी सुलोचना मरते असे वाटते. आम्हाला शाळेत सुद्धा हा चित्रपट दाखवलेला.

अंजली_12, मी हे सगळे चित्रपट शनिवारी संध्याकाळचे पाहिलेत. प्रत बहुतेकवेळा चांगली असायची. शनिवारी 6 ते 9 मराठी व रविवारी 6 ते 9 हिंदी असा क्रम असायचा. एखाद्या शनिवारी कोकणी चित्रपट दाखवायचे. रविवारी दुपारी इतर भाषिक प्रादेशिक चित्रपट. हे 1994 पर्यंत. त्यानंतर वेळापत्रक बदलले असल्यास माहीत नाही. 1994 नंतर माझे टीव्ही पाहणे कमी होत गेले व आता घरात टीव्हीच नाही ही परिस्थिती आहे. मी अतीव भक्तिभावाने हे चित्रपट पाहिले आहेत. एखादा भक्त पंढरीवारी चुकवेल, पण माझा क्रम चुकला नाही. कितीही वाईट चित्रपट असला तरीही तो पाहिलेला आहे. खंडहर ह्या चित्रपटात मिनिट मिनिट कॅमेरा हलत नाही, तरी मी शेवट पर्यंत पाहिलाय... रविवारच्या चित्रपटात आसामी, उडिया पण पाहिलेत. अग्निदिव्य नावाचा एक आसामी चित्रपट आजही लक्षात आहे. चित्रपटस्तृष्टीच्या ह्या सेवेबद्दल घरच्यांनी मला ऑस्कर द्यायचे शिल्लक ठेवले होते.

पण मराठीत वर उल्लेख केलेले न झेपलेले चित्रपट जसे बनले तसे अतिशय चांगले निखळ कॉमेडी चित्रपटही बनले हे खरे आहे. दामुअण्णा मालवणकरसारख्या चांगला चेहरा नसलेल्या, तिरळे डोळे असलेल्या नटाला प्रमुख भूमिकेत घेऊन खूप चांगले चित्रपट फक्त मराठीतच बनले असावेत.

अतिशय जुना, प्रभातचा कुंकू व माणूस हे चित्रपट काहींना ओव्हरहाईपेड वाटतील, पण मला आवडलेले आहेत. दुर्दैवाने प्रभातचा 'लख लख चंदेरी तेजाची' गाणे असलेला शेजारी मला अजून पाहायला मिळालेला नाही. तो पाहायची खूप इच्छा होती/आहे.

दिस जातील.... शापित.

मधू कांबीकरला ह्या चित्रपटाने ओळख दिली. त्याआधी तमाशा कलावंत जगतात ते परवडीचे आयुष्य ती जगत होती. चित्रपट चांगला होता, त्यात वेठबिगारांची जी परवड दाखवलीय, प्रत्यक्षात त्याहीपेक्षा भयाण आयुष्य लोक पिढ्यान पिढ्या जगत आले आहेत. आपल्याला नुसते बघायलाही बोअर होते, जगणारे काय म्हणत असावेत.

प्रभात (व्ही शांतारामांचे) सुरवातीचे काही चित्रपट आज एकवेळ बघायला होतील. पण नंतरचे काही (उदाहरणार्थ पिंजरा) आज पूर्णपणे न झेपणारे आहेत. पिंजरा त्याकाळात प्रचंड गाजला. गाणी आज अजूनही ऐकली जातात. पण चित्रपट पाहणे किती बोजड? खूपच इंटेन्स आहे. एका भल्या माणसाच्या आयुष्याची बाई मुळे वाट लागली हे दाखवताना तब्बल चार तास लावलेत. खरे तर डॉ. लागूंचे पात्रच मला झेपले नाही. अतिशय दुबळ्या मानसिकतेचा वाहवत जाणारा मनुष्य "मास्तर" म्हणून दाखवलाय. मग वेगळे काय होणार? त्यासाठी चार तास घालवायची गरज नव्हती. शेवटी शेवटी तर प्रेक्षकांचे हाल हाल होतील आजच्या काळात.

>> आपल्याला नुसते बघायलाही बोअर होते, जगणारे काय म्हणत असावेत.

मान्य आहे. समाजवादावर चित्रपट असण्याचा तो काळ होता. पण "सेल्फ सिम्पथी", प्रत्येक समस्येला अतिभावनिक होऊन रिएक्ट होण, पाल्हाळीक प्रसंग हे जे दाखवत होते ते सगळे असह्य करणारे असायचे. प्रेक्षकांना विषयाच्या गांभीर्यामुळे चित्रपट असह्य होणे म्हणजे अशा चित्रपटांचे यश असेल, पण मांडण्याच्या पद्धतीमुळे बघायला होत नसेल तर त्याला काय अर्थ.

मांडण्याच पद्धत चुकत असेल. जे मांडत होते त्यांचा मांडत असलेल्या विषयाचा व माध्यमाचा पूर्ण अभ्यास नसेल व त्यामुळे चांगले विषय वाया गेले. पण मूळ विषय होते हे नाकारून चालणार नाही.

प्रत्येक भावना चेहऱ्यावर दिसलीच पाहिजे ह्या हव्यासामुळे शांतारामांचे चित्रपट पाहणे अशक्य झाले. तरीही पिंजरा आवडला. आयुष्यात स्त्रीसुख कधीही न अनुभवलेल्या मास्तरांना एक सुंदर स्त्री आयुष्यात आल्यावर सगळ्याचा विसर पडतो. याचा अर्थ आधी त्यांनी जे केले ते सगळे पाण्यात असा नाही ना होत. मोहाच्या एका क्षणाची जबरदस्त किंमत त्यांना द्यावी लागते.

फक्त त्यातल्या गाण्यांवर संध्याचा नाच पाहावत नाही व त्यावेळचा मेकपही पाहवत नाही.

शिरीष कणेकरांनी लिहिले होते की शांताराम बालचित्रपट का बनवत नाहीत असा प्रश्न त्यांना पडला किंवा कुणी त्यांना विचारला, त्यावर उत्तर होते की त्यातही ते संध्याला घेतील व मग तो भयपट होईल, बालपट नाही.

मराठीत नाटकांची परंपरा इतकी जुनी आहे की मराठी चित्रपटांवर नाटकांचा प्रभाव खूप जाणवतो. नाटकात कोणतीही भावना जरा जास्तच गडद करून दाखवली जाते तसंच मराठी सिनेमांत असतं (आता चित्रं बदलायला लागलंय). संवाद, पात्रांचे हावभाव, बोलण्याची पद्धत, घटना, प्रतिकं अतिशय नाटकी असतात त्यामुळे सिनेमे अगदी बाळबोध वाटतात.

सिनेमा हे नाटकापेक्षा कितीतरी जास्त प्रभावी माध्यम आहे आणि घटना, भावभावना, कॅरेक्टर्स सटल असू शकतात/ दाखवले जाऊ शकतात हे सहसा लक्षात येत नाही मराठी सिनेमावाल्यांच्या. मग फारच ठोकळेबाज सिनेमे बनतात.

शांतारामांच्या विषयी लिहिताना मला सुद्धा कणेकरांची आठवण झाली. एके ठिकाणी "आजच्या काळात शांतारामांचे चित्रपट बघणे असह्य होते" असे त्यांनी लिहिले होते. ते खरे आहे. थियेटर मध्ये पिंजरा मी तरी आज बघूच शकणार नाही.

त्यामानाने जब्बार पटेल भारीच म्हणयला हवेत. उगाचच भावनिक इंटेन्स दाखवत नव्हते. सामना, सिंहासन आजही थियेटर मध्ये मला पाहायला आवडतील (किंबहुना 'सामना' मी आजच्या काळात पाहिलाय थियेटरला. काही वर्षापूर्वी कुठ्ल्याश्या फेस्टिवलच्या निमित्ताने 'अलका'ला लागला होता. खूप सुंदर अनुभव होता सामना थियेटर ला पाहणे). सिंहासन मधले एकच दृश्य न झेपणारे आहे. डॉ. लागू आणि रीमा सासरा-सून नाते आहे. पण मला अजूनही कळले नाही नक्की त्यांच्यात असे संबंध का दाखवलेत. चित्रपटाची ती गरज आहे का हे सुद्धा आता आठवत नाही. एके ठिकाणी तर डॉ. लागू रीमा (त्यांची सून) यांना किस्स करताना दाखवलेत आणि तिचा नवरा (डॉ. लागूंचा मुलगा) असहायपणे हे सगळे पाहत असतो. तो भाग जरा अतीच दाखवलाय असे वाटते. न झेपणारा आहे. प्रेक्षकांना ऑकवर्ड न करता सुद्धा ते दाखवले जाऊ शकत होते. तेवढे सोडले तर बाकी चित्रपट आजसुद्धा टकाटक.

विक्रम गोखलेही अतिशय देखणा दिसायचा. सेम विथ कुलदीप पवार. यांच्या खूप जुन्या चित्रपटात ते दोघे मला खूप सारखे दिसायचे. कोण कुलदीप व कोण विक्रम कळायचे नाही>>>>>> हो माझाही हाच गोंधळ झाला होता.

<एक सचिन व सुलोचनाचा चित्रपट आहे, नाव विसरले. सचिन 14-15 चा आहे त्यात. बाल गुन्हेगार मुलांची शाळा व शाळेची मुख्याध्यापिका सुलोचना. गुन्हेगार सचिन व सुलोचना यांचे हृद्य नाते तयार होते व गुन्हेगार सचिन संस्कारी मुलगा होतो अशी काहीशी कथा होती. पूर्ण रुमाल ओलांचीप्प करायचे सामर्थ्य होते या चित्रपटात.>
मी हा सिनेमा पाहिलाय आणि आवडलेला.
म्हागृ होण्याआधीचा सचीन जबरदस्त काम करायचा. बालअभिनेता म्हणून तर त्याच्यासारखा समजून घेऊन काम करणारा कुणी असेल असे वाटत नाही.
त्याचे सगळेच विनोदी, सिरियस पिक्चर(जुने) मला आवडतात, कुंकू, माझा पती, आयत्या घरात घरोबा, एकापेक्षा एक, नवरी मिळे नवर्‍याला, अशी ही बनवाबनवी, हमाल दे धमाल सगळेच..
मला एक हृदयस्पर्शी नावाचा पिक्चर आठवतोय. इतका रडका, इतका रडका.. की तो लागला तरी भिऊन मी टिव्ही बंद करायचो..

शशी कपूर आणि नीतू सिंग हे पण सासरा सूनच होते. हिंदी सिनेमा पाहताना आपण थोडे प्रगल्भ आणि इंग्रजी पाहताना अजून प्रगल्भ असतो. मराठी सिनेमा पाहताना आपणही बाळबोध होऊन जातो. आपण अ‍ॅडजस्ट होत राहतो. हिंदीत बोल्ड प्रणयदृश्ये दाखवली कि ही टाळता नसती का आली असे मन विचार करते, तर इंग्रजीत बोल्ड सिन्स दाखवले की आपले लोक कधी बोल्ड होणार असे वाटत राहते.
आपण असे समजत राहतो कि या इथे इथे हे असे असे वातावरण आहे. प्रत्यक्षात प्रेक्षक एकच असतो.

पद्मा चव्हाण फार बोल्ड, सेक्सी म्हतली जायची म्हणे.. काय लोकांच्या टेस्ट्स होत्या पुर्वीच्या..
एनी वे, पण तिचे जुने पिक्चर भारी होते. जावयाची जात, शेक्सपिअरच्या taming ऑफ द श्र्यूचे मराठी रूपांतर.. कुलदीप पवार, सरला येवलेकर, धुमाळ, पद्मा चव्हाण ही रूपगर्वीता फेमिनिस्ट.. भारी पिक्चर आहे. पण त्यातला एमसीपीपणा बघून लाज वाटते.
गाणी मात्र मस्त. उन्हात चांदणं पडलं, होऊन आज राधा, प्रिय सखि चंद्रमुखी, ही गुलाबी ही शराबी(यात मॉबमध्ये रीमा दिसते मॉबमध्ये नव्हे पद्माच्या मैत्रिणींच्या घोळक्यात आहे ती).. चाबूक गाणी..

>> शशी कपूर आणि नीतू सिंग हे पण सासरा सूनच होते

मी सिनेमातल्या भूमिकांविषयी बोलतोय हो. प्रत्यक्ष अभिनेत्यातील नाती नाही म्हणत. मराठी चित्रपटात सासरा-सून भूमिका करणाऱ्यांच्या असे नाते तेही थेट असे दृश्य पडद्यावर दाखवले कि ऑकवर्ड होणारच ना. पटेलांना डॉ. लागू भूमिका करताहेत ते कॅराक्टर तसे दाखवायचे असेलही. पण ज्या पद्धतीने पडद्यावर थेट मांडलेय ते जरा अतीच वाटते (असे माझे मत).

माझा गोंधळ होतोय का ?
म्हणजे श्रीराम लागू आणि रिमा यांच्यातले पडद्यावरचे नाते सासरा सून असे दाखवले आहे का ? तसे असेल तर माझा प्रतिसाद गैरलागू आहे.
( श्रीराम लागू - रीमा यांच्यात खरे नाते नाही का काही )

अतुल पाटील कदाचित जब्बार पटेलांनी त्यांच्या माहीतीत असलेल्या एखाद्या नात्यावर सूचक भाष्य केले असावे. जे थोड्यांसाठी असावे. त्यामुळे बाकीचे ऑकवर्ड होऊ शकतात.

>> श्रीराम लागू आणि रिमा यांच्यातले पडद्यावरचे नाते सासरा सून असे दाखवले आहे का

हो. आणि ती नवऱ्याला काहीच किंमत देत नसते. सासऱ्याबरोबरच (जो मंत्री असतो) जास्त मैत्रीपूर्ण असते असे दाखवलेय. हे म्हणजे लिहिताना सुद्धा कसेतरी होत आहे.

हे म्हणजे लिहिताना सुद्धा कसेतरी होत आहे >>> अशाने कसे व्हायचे हो ? चला आपल्याला नवा भारत घडवायचा आहे. लोक प्रात्यक्षिके करून राहीले आणि तुम्हाला कसेतरी होऊन राहिले बाप्पा !

>> लोक प्रात्यक्षिके करून राहीले आणि तुम्हाला कसेतरी होऊन राहिले बाप्पा !

हो. ते सुद्धा १९७५ का काय साली Rofl Rofl

. आणि ती नवऱ्याला काहीच किंमत देत नसते. सासऱ्याबरोबरच (जो मंत्री असतो) जास्त मैत्रीपूर्ण असते असे दाखवलेय.>>> मूळ कादंबरीत हेच आहे बहुधा (नीट आठवत नाही.. खूप वर्षं झाली वाचून).. जब्बारनी माध्यमांतर केलंय फक्त..
तत्कालीन महाराष्ट्रातलं राजकारण आणि गुंतागुंतीचे वैयक्तिक- राजकीय संबंध आणि त्याच्या बदलत जाणाऱ्या पातळ्या हाच विषय आहे..
सासरा- सून संबंध खरेच असतीलही राजकीय घरांमध्ये.. अरुण साधू आणि जब्बारनी फक्त ते उघड मांडले

प्रत्यक्षात सासरा सून असलेल्यानी चित्रपटात प्रियकर प्रेयसीची भूमिका करावी व चित्रपटातील कथेत सासरा सुनेला किस करताना दाखवणे यात काहीही फरक नाही का? ह्या दृश्यावर तेव्हा माफक गदारोळ उठलेला इतकेच आठवतेय.

जब्बार पटेलांनी खूप चांगले चित्रपट बनवले. सिंहासन, सामना हे थेटरात बघितले गेले. फारसे कळण्याचे वय नव्हते तेव्हा अर्थात पण आईबाबांसोबत आमची यात्रा. उंबरठा खूप नावाजला गेला पण मला अजिबात पटला नाही. लग्न, मुल वगैरे झाल्यावर सुलभा घराबाहेर पडते, तिथे भ्रमनिरास झाल्यावर परत घरी येते. घरचे तोवर तिच्याशिवाय आयुष्य जगायचे शिकलेले असतात. घरचे दुरावले म्हणून ती दुःखी होते. चित्रपट पाहताना यात घरचे दोषी आहेत असे वाटत राहते. हे मला आवडले नाही. दोषच द्यायचा तर तो सुलभाला द्यावा असे मला वाटले. जेव्हा तिला वाटले तेव्हा नवरा, लहान मूल याना दूर करून ती घराबाहेर पडली, जेव्हा वाटले तेव्हा परतली. घरच्यांनी हिची वाट बघत आयुष्य काढायला हवे होते का? तसेही बाहेर वाईट अनुभव आले नसते तर ही परतली नसती. रथचक्रमधली ती सुद्धा घरातून गेलेला नवरा अकस्मात परततो तेव्हा त्याला नाकारते. कारण त्याला वगळून तिने आयुष्य परत उभे केलेले असते, आता तो परत आलाय तर त्याच्यासाठी जागा नाहीय तिच्या नव्या आयुष्यात. अर्थात दोन्ही कथा पूर्ण वेगळ्या आहेत.

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी हाही एक सुंदर चित्रपट होता. हा दुरदर्शसनने दाखवला तेव्हा बरीच टीका झालेली. सामान्यतः मराठीत तोवर थेट न दाखवलेली हिंसा यात खूप ठळकपणे दाखवलीय व त्यावर टीका झालेली. आमच्या एका गाववालीला चित्रपट बघून हार्ट अटॅक आलेला त्यामुळे हा चित्रपट काही दिवस आमच्या वर्तुळात चर्चेला होता.

चित्रपट एका रात्रीत घडतो. गावात तमाशाफड आलेला असतो व रात्रभर तमाशा रंगतो. हे मला जास्त वास्तववादी वाटले. लोक दुरून येणार, तिकीट काढणार व 1 नाच बघून परतणार हे होईल का? तमाशाबारी रात्रभर चालत असणार. उषा चव्हाण खूप गोड दिसलीय व नाचलीय.

यात चंद्रकांत व चंद्रकांत गोखले दोघेही आहेत. चंद्रकांतचे काम अतिशय उत्तम झालेय, पाहूनच भीती वाटते, हा कोणालाही दया दाखवणार नाही असे वाटते व ते खरे ठरते.

शेवट आवडला नाही. शेवटी सगळ्या वॉन्टेड गुन्हेगारांची प्रेते पोलिसांना मिळतात पण ते कसे मेले हे समजत नाही, ते समजण्याचा मार्गही बंद होतो. एवढा मोठा दरोडा पडतो पण कुणाला काही समजत नाही. ड्युटीवरचे पोलीस ऑफिसर धोतर नेसून फिरतात हे बघून थोडी गम्मत वाटते.

मी हल्लीच यु ट्यूबवर पाहिला. गाणी खूप सुरेख आहेत, हिंसा मात्र अंगावर येते.

Pages