मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्री इन्क्रीमेंट लूप >>> Lol

'एक डाव भुताचा' मस्त होता की. ८-१० वर्षांपूर्वी पुन्हा पाहिला तेव्हाही बघणेबल वाटला होता.

मला आणखी एक म्हनायचे आहे.साधारण १०-१५ वर्षापूर्वीचे मराठी अथवा हिन्दि सिनेमे एस्डी Standard Definition मध्ये शूट केलेले असत ते जर आता डाउन लोड करून पाहिले किंवा सीडी वर पाहिले किंवा यू ट्युब वर पाहिले तर अस्प्ष्ट अथवा रंग पांग्लेले असे दिसतात , शार्प दिसत नाहीत. शिवाय बरेच से चौरस फ्रेम मध्ये दिसतात. त्यापेक्शा जुने ब्लॅक व्हाइट सिनेमे स्प्ष्ट , क्लिअर आणि शार्प दिसतात.त्यामुळे रंगीत पेक्शा सुसह्य वाटतात. मी उमराव जान व शक्ती हे माझे अतिशय आवडते चित्रपट नेहमी पाहतो. ते आता मला सगळीकडे एच डी पहायची सवय झाल्याने खूपच बेंगरूळ वाटू लागले आहेत. अगदी कॅसा ब्लान्का सारखा १९४१ चा कृष्ण धवल सिनेमा क्लिअर दिसतो अगर त्याच्या यु ट्युब वर्च्या क्लिप्स ही शार्प दिसतात. त्यामुळे जुने कृ ध . सिनेमे पहायला चांगले वाटतात.

एक डाव भुताचा चे सगळे शूट सासवडला झाले आहे. तेव्हा आम्ही बरेच्से शूट पाहिले आहे. शूटिंग पाहणे हा अत्यंत कंटाळवाना प्रकार असतो.

अशोक सराफ गुपचुप गुपचुप मध्ये जबरी काम केलयं. 'कित्या' ,'खरें' अस कोंकणीत मस्त बोललेत. आणि पगडी घालुन येतात तो सिन तर जबरी आहे.
त्यातल येन येना , जवळ घेना गाण तर एकदम मजेशीर आणि क्युट आहे. त्यातली श्यामा इतकी लाडीक बोलते. गाण खालच्या लिंक वर आहे.
https://www.youtube.com/watch?v=zMNatr_Qx6o

येन येना देना जवळ घेना देना देना जवळ
श्यामा तुही (?) माय लव्ह
देना मीठी माय लव्ह.....येना येना देना घेना जवळ येना
जाउ पॅरिसला , जाउ चौपाटीला राणी आहे उद्या संडे ...
भेळ चौपाटीची , प्रीत पॅरिसची खाउ घालीन तुला मंडे,
श्यामा माय लव्ह श्यामा माय लव्ह
येना येना देना जवळ येना , येना येना देना जवळ येना
राणी मॅरेज करून, तुला मीठीत धरून , प्रिये दाविन उटी सिमला घेवू मोटार गाडी, नंतर बाबा गाडी
फिरुन येवू कोल्हापुरला , श्यामा माय लव्ह
येना येना .........

हाखेसा मधे आशा काळे गावात येते तेव्हां तिला पहायला गर्दी जमते हे खूप मनोरंजक होतं. पब्लिकला काही टेस्टच नाही राव. सतत जळत राहणारी उदबत्ती , ती बघायला काय रांग लावायची ?
घाणेकर हे आडनाव तेव्हां पहिल्यांदाच ऐकलं होतं.

एक जयश्रीचाच चित्रपट असावा, (माझ्या लहानपणी मला सगळ्या जयश्रीच वाटायच्या.) त्यात जयश्री बाळंत व्हायच्या वेळेस नेमके नवरा बायको कुठेतरी कडमडतात. ही बया कळा देतेय, तिथेच राहणारी कुणी म्हातारी मदत करतेय आशा परिस्थितीत शेवटी बाळंत होऊन 1 मुलगा होतो. त्याला घेऊन नवरा डॉक्टर आणायला का कुठेतरी जातो व पूर येऊन सगळेच वाहून जाते. नवरा परत येतो तर सगळे संपलेले असते.

कालांतराने नवरा बायको परत भेटतात पण बायकोसोबत 1 मुल. नवऱ्याकडे 1 मूल आधीच असते. बायको म्हणते हेच तर तेव्हा जन्माला आलेले, नवरा म्हणतो ते तर माझ्याकडे आहे, हे कोणाचे ते सांग. नवरा बायको इतक्या वर्षांनी भेटले याचा आनंद नाहीच, भेटले कश्याला देवाला माहीत. मुल कोणाचे या प्रश्नावर उरलेला अर्धा चित्रपटभर चिंतन केले आहे.

शेवटी त्या म्हातारीला हा बाबा शोधतो, तीला मग तो पूर बिर सगळे आठवते व जयश्रीला जुळे झाल्याचे शुभवर्तमान ती कानावर घालते. ती म्हातारी इतकी वर्षे जगली ते नशीब. बायको मूल तुझेच म्हणून कोकलत होती ते पटले नाही, परकी बाई सांगते ते नवऱ्याला लगेच पटते. एकदा पटल्यावर मात्र सुखाने संसार करतात. असल्या नवऱ्याला लाथा घालून बाहेर फेकायला हवे होते खरे तर....

रणांगण नावाचा सिनेमा प्राईम वर आहे. महागुरू आणि लघुगुरू दोघेही आहेत. फेसबुकवर त्याचं परीक्षण व्हायरल झालेलं. लघुगुरू उर्फ लव्हगुरू म्हणजे आपला झबा याच्याकडे कुठलीतरी विशेष शक्ती असते. तो बासरी वाजवून आणि खीर खायला देऊन मूल होत नसलेल्यांना प्रेग्नंट करत असतो. प्राईमवर बघायला सुरूवात केली. पण थोड्याच वेळात सचिनच्या घरी ते तसलं खानदानी वातावरण आणि भरजरी संवाद ... मेक अपचे थरच्या थर अगदी म्हातारेकोतारेही आणि जडजंजाळ ड्रेसेस हे असलं वातावरण १५ मिनिटांच्या वर सहन झाले नाही.
सिनेमा नवा असला तरी परीक्षणात म्हटल्याप्रमाणे फंडाज जुन्या सिनेमांना लाजवतील असे आहेत.

हाखेसा मधले गोमू संगतीनं गाणं ऐकायला इतकं गोड आहे पण काशिनाथ घाणेकर फार फनी दिसतात नाचताना. बघवत नाही ते गाणं खरंतर. ती त्या काळातील बेल बोट्म प्यांट आणि अगदीच हडकुळी अंगकाठी. (तसेही ते गाणे तूनळी वर सध्या जे आहे ते क्वालिटी पण चांगली नाही म्हणा. पण तो भाग वेगळा)

हा चित्रपट येईतो काशीनाथने दारू पिऊन पिऊन स्वतःचा सत्यानाश करून घेतला होता, त्यामुळे तो दिसायला विचित्र दिसतो, अन्यथा तो मराठीतला अतिशय देखणा नायक होता.

विक्रम गोखलेही अतिशय देखणा दिसायचा. सेम विथ कुलदीप पवार. यांच्या खूप जुन्या चित्रपटात ते दोघे मला खूप सारखे दिसायचे. कोण कुलदीप व कोण विक्रम कळायचे नाही. आणि नयनतारा मराठीची मुमताज.

राजा गोसाव्याला कुणी हिरो केला याचे उत्तर कधी मिळाले नाही.

कोण कुलदीप व कोण विक्रम कळायचे नाही >>> एक मिशा अपवादाने काढायचा , तर एक अपवादाने लावायचा- हे लॉजिक चालले असते Happy

पण मला कधी त्या दोघांत साम्य दिसले नाही. सूर्यकांत आणि चंद्रकांत मधे मात्र नेहमी गोंधळ व्हायचा.

>> मुल कोणाचे या प्रश्नावर उरलेला अर्धा चित्रपटभर चिंतन केले आहे
Rofl

>> हा चित्रपट येईतो काशीनाथने दारू पिऊन पिऊन स्वतःचा सत्यानाश करून घेतला होता

Sad हे मी लिहिता लिहिता थांबलो. कारण याबाबत त्यांच्याविषयी नाथ हा माझा मध्ये वाचले होते. पण या चित्रपटाच्या वेळच्या त्यांच्या स्थितीबाबत खात्री नव्हती.

मुल कोणाचे या प्रश्नावर उरलेला अर्धा चित्रपटभर चिंतन केले आहे. >>
ती म्हातारी इतकी वर्षे जगली ते नशीब. बायको मूल तुझेच म्हणून कोकलत होती ते पटले नाही, परकी बाई सांगते ते नवऱ्याला लगेच पटते. >>> Lol हे सही आहे.

सचिन बालकलाकार असलेल्या एका रहस्यपटात काय रहस्य आहे हे माझ्या बालबुद्धीला खूप ताण देऊनही तेव्हा नव्हते, बरीच वर्षे लागली कळायला.

बाई माझी करंगळी मोडली वाल्या चित्रपटात सुरवातीलाच हिरोईन आपल्या 2 मुलांपैकी एक मूल तुझे नाही असे नवऱ्याला सांगून मरते. नवरा लगेच शिस्तीत डोक्यात राखबीख घालून घेतो. मग चित्रपटभर तो व आपण विचार करतो नक्की कूठले मूल त्याचे नाही.. त्यातल्या त्यात दुरवर्तनी मूल त्याचे नसणार याची आपल्याला खात्री पटल्यावर कळते की बाईचा गैरसमज झालेला असतो. तिला वाटत असते की आपण बेशुद्ध पडलो असताना आपल्यावर बलात्कार झाला व त्यातून मूल जन्माला आले. प्रत्यक्षात असे काही घडलेले नसते. जुना मराठी संस्कारी चित्रपट असल्याने हे प्रकरण खूप सटलपणे दाखवलंय व त्यामुळे माझ्या डोक्यात असे काही झाले याचा प्रकाश पडू शकला नाही. तो पडायला बरीच वर्षे लागली.

काशीनाथ घाणेकर मद्यधुंद होऊन स्टेजवर अवतरले व त्यानंतर नाटक करणे शक्य नाही म्हणून लोकांची माफी मागितल्याच्या बातम्या मी तेव्हा पेपरात वाचलेल्या आहेत. एक चांगला कलाकार दारूमुळे वाया गेला.

पुनरावृत्तीचा दोष आणि रोष पत्करुन परत एकदा इया उवा तुळ तुळ गाण्याची आठवण काढते.
माझं सौभाग्य मधलं गाणं. हा पूर्ण पिक्चरच बघण्यासारखा आहे.गाणं ५५ व्या मिनीटाला आहे बहुतेक.>> अरे ह्यातली हिरवीन ती सुनंदा का कोण ती म्हणजे रात या रामसेच्या भयपटातली भूत आहे ना.. आत्ता परत खातरजमा करुन आली गाणे पाहिल्यावर.. दोन दिवसांपूर्वी रात बघीतला म्हणुन लक्षात आले..

काशीनाथ घाणेकर पाठलाग मधे देखणे दिसले होते.
देखणे मराठी अभिनेते शोधायचे त्या काळचे तर अभिनेता विवेकचा चेहरा पटकन डोळ्यासमोर येतो. विशेषकरून त्याला बघितल्यावर देव आनंदचा भास व्हायचा. अवघाची संसार, पुत्र व्हावा ऐसा, सुवासिनी या मोजक्या चित्रपटात त्याने काम केले आहे. कोणाला या अभिनेत्याविषयी जास्त माहिती आहे का?

यांच्या खूप जुन्या चित्रपटात ते दोघे मला खूप सारखे दिसायचे. कोण कुलदीप व कोण विक्रम कळायचे नाही. >> चला माझ्या बोटीत आहे म्हणायचे कुणतरी...

बाकी गोमू संगतीन माझं आवडत गाणं हय..

टीना, रात रामसेचा नाही ग. रामगोपाल वर्माच्या चांगल्या दिवसांतील एक चांगला चित्रपट आहे रात!

घाणेकर हे आडनाव तेव्हां पहिल्यांदाच ऐकलं होतं.>>>>>
साधना सरगम ही मूळची साधना घाणेकर आहे.

स्वाती, धन्यवाद. मला नाव आठवत नव्हते. सचिनने मस्त नाच केलाय गाण्यात.

एक सचिन व सुलोचनाचा चित्रपट आहे, नाव विसरले. सचिन 14-15 चा आहे त्यात. बाल गुन्हेगार मुलांची शाळा व शाळेची मुख्याध्यापिका सुलोचना. गुन्हेगार सचिन व सुलोचना यांचे हृद्य नाते तयार होते व गुन्हेगार सचिन संस्कारी मुलगा होतो अशी काहीशी कथा होती. पूर्ण रुमाल ओलांचीप्प करायचे सामर्थ्य होते या चित्रपटात.

वहिनीच्या बांगड्यामध्येही विवेक आहे. अजून भरऊर चित्रपट बघितल्याचे आठवतेय. सोशिक भावाची भूमिका हातखंडा होती त्याची.

टीना, रात रामसेचा नाही ग. रामगोपाल वर्माच्या चांगल्या दिवसांतील एक चांगला चित्रपट आहे रात!>> अर्र मी त्यालाच रामसे म्हणायची Proud

धनाजी राव मुर्दाबाद ...हे डॅमिट च गाणं ज्या मुव्ही मध्ये आहे ना...वाक्ख्खे वुख्खु विख्खी वाला मुव्ही......
त्यात लक्ष्मीकांत बेर्डे ला मुव्ही बनवायचा असतो. तो बेदिंग ब्युटी चा सिन शूट करायला जातो तेव्हा त्याला ती धिप्पाड हिरोईन अंघोळ करताना दिसते.... ( अजागळ, भयानक, पुरुषी चेहऱ्याची )
आणि तो म्हणतो व्हॉट अ ब्युटी........

अजून बनवाबनवी कसा आला नाही
धनंजय माने आहेत का घरात??

तुमचे 70 रुपये वारले

अर्रे शँतनू... ही कोण आणली?

हा माझा बायको आणि तो त्याचा बायको

अर्रे सारख सारख त्याच झाडावर काय

सकाळी केलेला अभ्यास चांगला असतो...तुम्ही केलेला काय कधी अभ्यास??

जाउबाई...... नका बाई जाऊ इतक्यात....

अजून बनवाबनवी कसा आला नाही
>>>>>>>

बनवाबनवीची चर्चा इथे नको.
त्यासाठी स्वतंत्र धागा हवा.
खरंतर एक स्वतंत्र साईट चालू शकेल एवढं पोटेन्शियल आहे त्यात.

Pages