अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा, तुमच्या वरच्या किस्स्यात खंबाटकी घाटाचा उल्लेख वाचुन एक घटना आठविली.

खंबाटकी घाटात एक जागा आहे तीथे खुप अपघात होतात. मी जो किस्सा सांगतीये तो २००० सालचा आहे . माझ्या काकाच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही गावी जात होतो . ठाणे-बेळगाव सेमी लक्झरी एसटी पकडली होती. सुमारे दुपारी २ च्या आसपास आमची एसटी त्याच जागेवर अचानक बंद पडली. ड्रायव्हर-कंडाक्टरला कदाचित त्याजागेबद्दल आधी पासुन माहित असावे, त्यांनी सगळ्यान्ना सांगीतले की शक्यतो खाली उतरु नका अन उतरलात तरी गाडीच्या जवळपासच थांबा. तरी बरेच लोक उतरले त्यात माझे पप्पाही होते. मी अन भाउ लहान असल्यामुळे, मम्मी आम्हाला घेवुन एसटीतच बसली होती. दोनएक तास झाले तरी एसटी रीपेअर झाली नव्हती. ती जिथे बंद पडली होती ती जागा खुप विचीत्रच होती, अन घाटात असल्यामुळे दुकाने वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. काही लोक मिळेल त्या दुसर्या गाडीने जात होते. पण आम्ही लहान अन लग्नासाठी जात असल्याने सामानही खुप होते. त्यामुळे एसटी ठिक व्ह्यायची वाट बघण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.
ड्रायव्हर कंडक्टर पण चिंतेत होते, कारण ४ तास होत आले तरी मदत मिळाली नव्हती की गाडीत नक्की काय खराबी झालीये तेपण कळत नव्हते. अन अचानक संध्याकाळी ६ वाजता गाडी जणु खराब झालीच नव्हती अशी चालु झाली .
सगळे जण थक्क झाले होते. घाट ओलांडल्यावर कंडक्टर बोलले की अमावश्या जवळ होती अन आज गाडी काढताना नारळ फोडायला विसरलो आम्ही म्हणुन असे झाले.

खरे खोटे माहीत नाही पण ते ४-५ तास सगळेच म्हणजे अगदी लहान मुलेही काहेतरी दडपणाखाली असावी असे वातावरण होते.

दक्षिणा, जगात भूत वगैरे नाहीये. पण अनाकलनीय अशा अतृप्त लहरी वातावरणात असतात. आणी बर्‍याच वेळा नको त्या घटना पाहिल्याने त्यांचा ठसा अंतर्मनावर उमटतो. माझ्याही अशा विचीत्र आठवणी आहेत. पण खरच सांगते, ज्या क्षणाला मी देवाची आराधना करायला सुरुवात करते, त्या क्षणाला मला खूप प्रसन्न वाटते. कारण जगात अशूभ जर आहे तर शुभ असणारच. तू अंबाबाई बद्दल उल्लेख केला आहेस, ती माझ्या माहेरची कुलस्वमिनी. तिचे स्तोत्रच एक दिव्य प्रभाव असतो. कुठलाही देव असो देवी-देवता, यांचे शुभ अस्तिस्त्वच मनाला उभारी देते. तेव्हा असे कधी तुला अस्वस्थ जाणवले की एखादे स्त्रोत्र म्हण, वा गाणी ऐक.

व्हिबी मी निघाले होते तेव्हा ही बहुधा अमावस्या असावी. माहित नाही. Sad
रश्मी अशा वेळी सुचतं का काही? मला फार कमी वेळेला असं होतं, पण जे होतं ते अत्यंत वाईट असतं.

सिक्स्थ सेन्स बद्दलचा अजून एक किस्सा. मी आणि माझी मैत्रिण एकत्र रहात होतो तिथे एक तरूण मुलगा रहायचा, आणि त्याची आई. एकदा तो क्रिकेट खेळताना पडला आणि आय सी यु मध्ये होता. आदल्या दिवशी सकाळी ठरलं की दुसर्‍या दिवशी हापिसातून आलं की त्याला पहायला जायचं. त्याच आदल्या दिवशी रात्री जेवल्यावर मला अचानक काहिहि कारण नसताना विचित्र विचित्र वाटायला लागलं आणि अचानक मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं मला नाही वाटत तो परत येइल. दुसर्‍या दिवशी मी हापिसला निघाले आणि बसमध्येच मैत्रिणीचा फोन आला तो गेल्याचा. Sad
आपण काय बोलून गेलो हे आठवून मी ८-१० दिवस डिस्टर्ब होते.

त्याबद्दलचा सविस्तर लेख खाली आहे.
https://www.maayboli.com/node/3926

दक्षिणा, मी त्या वेळेच म्हणत नाहीये. अशा वेळेस काही सुचणारच नाही, पण ती घटना घडुन गेल्यानंन्तर जर विचीत्र फिल होत रहात असेल तर असे प्रयोग करावेत, जे मी वर लिहीलेत.

बाकी त्या मुलाबद्दल Sad

मी ११वी-१२वी पुण्यात होते. नवी पेठमध्ये , घरमालकांच्या बंगल्यामागे ३ रूममध्ये १०-१२ मुली राहायचो. त्या आधीपासून राहणाऱ्या मुली सांगायच्या की पूर्वी तिथे फँमिली राहायची आणि त्यातील कुणीतरी आत्महत्या केली होती. (ही ऐकीव माहिती असावी असा माझा अंदाज)
तिथल्या बाथरूममध्ये रात्री आपोआप गीझर चालू व्हायचे, असं त्या सांगायच्या. एकीने तर रात्री अभ्यास करताना फेर्या मारता मारता गीझर चालू होताना पाहिलं होतं।माझा काही विश्वास नव्हता. पण बर्याचदा नळाला हात लागल्यावर शाँक लागायचा, गीझर बंद असतानाही. ईलेक्ट्रिशियनला पण बोलवलं होतं दोनदा. पण त्याला काही प्राँब्लेम नाही दिसला.
१२वीला मी आतल्या रुममध्ये शिफ्ट झाले( गीझर चालू होताना बघणार्या मुलीच्या ). तिथे एकच बेड, पण समोरच्या रुममधल्या ४ आणि मी अशा ५ जणींचं काँमन कपाट आणि ड्रेसिंग टेबल होते. माझा बेड खिडकीजवळ होता. खिडकीबाहेर जवळच एक पाण्याची टाकी आणि नळ. त्यावर पत्र्याची शेड.
तिथे बर्याचदा मला रात्री उशिरा खराट्याने बाहेर कुणीतरी झाडतंय असं वाटायचं. पहिल्या वेळी वाटलं की पहाटे उठून काकू ( आमच्या घरमालक) झाडताहेत. पण घड्याळ बघितलं तर २-२.३० ची वेळ होती. कधी कधी पत्र्याच्या शेडवर धपकन काहीतरी पडल्यासारखा आवाज यायचा. मी कधी खिडकी उघडून बाहेर चेक केलं नाही एवढ्या रात्री. पण नंतर नंतर मला सवय झाली होती. घाबरले नाही मी.
एकदा एक मैत्रीण आलेली अभ्यास करायला . ती राहणार होती रात्री. पण हा किस्सा ऐकून घाबरली.

लहान असताना ऐकलेला हा किस्सा आहे. आईच्या माहेरचे हे नातेवाईक मी कधीच प्रत्यक्ष पाहीलेले नाहीत. त्यामुळे थोडासा गोंधळ आहे. नंतर अनेकांकडून ऐकलेले किस्से साधारण असेच होते. कदाचित अनेकांना असे अनुभव आले असावेत.

आईचे वडील वालचंदनगर भागात शिक्षक होते. संस्कृत चांगले शिकवत असल्याने त्यांची बदली पुण्याला झाली होती. त्यांची मोठी बहीण गंगा नाव तिचं, वालचंदनगरलाच राहिली. मुलं लहान असल्याने तिच्याकडेच ठेवली होती. आईची आई लहानपणीच गेली होती. एक दिवस आजोबांना दुपारची झोप लागली. त्यांना आयुष्यात कधीही दुपारचे झोपलेले कुणी पाहीले नव्हते. झोपेत त्यांना दिसले की त्यांची बहीण त्यांना म्हणत होती " भाऊ, उठ चल मी आलेय. मुलं एकटी आहेत " . ती त्यांना ज्वाळांमधे दिसत होती.

भाऊ म्हणजे माझे आजोबा तडक वालचंदनगरला आले तेव्हां त्यांना समजलं ज्या क्षणी त्यांना स्वप्न पडलं त्याच क्षणी गंगा गेली होती. आजोबांची आई जिवंत होती. तिलाही गंगा दिसली होती.

हा किस्सा कुणाला सांगितला की अनेकांकडे असेच किस्से निघत. याचं नेहमी विशेष वाटतं.

माझ्या बाबतीत घडलेला विचित्र किस्सा.... अमानवीय नाही आहे.

लहानपणी कोल्हापूरला होतो. १२ वी ला असताना एकदा घरी अभ्यास करत होतो. संध्याकाळची वेळ होती. आई कोणाकडे तरी गेली होती आणि वडील बॅकेतून घरी यायची वेळ झाली होती. मी जेथे बसलो होतो तेथे बाजूला गोदरेजचे कपाट होते. त्यावर एक बाबांचे जूने हेल्मेट ठेवले होते. बरेच दिवस ते हेल्मेट तेथेच होते.

अचानक वरून ते हेल्मेट खाली पडले आणि जोरात आवाज झाला. मी दचकलो. बघीतले तर हेल्मेटला चांगलाच तडा गेला होता. मला आश्चर्य वाटले की साधारण मध्यभागी ठेवलेले हेल्मेट कसे काय पडले. त्याच्या आजूबाजूला छोट्या-मोठ्या गोष्टी होत्या त्या तश्याच वरती होत्या. वाटले की उंदीर वगैरे चा धक्का लागला असेल पण घरात उंदीर नव्हते आणि इतक्या उंचीवर उंदीर उगाचच काही चढणार नाही असे वाटले. पालीची पण शंका आली पण पाल काही एवढे जड हेल्मेट हलवू श़कणार नाही. सगळेच अनाकलनीय होते. मी ५ मि. विचार केला आणि हे सर्व निस्तरून परत अभ्यासाला बसलो.

साधारण १५-२० मिनीटांनी बाबा बँकेतून घरी आले. त्यावेळी ते स्कुटरने ये-जा करत. घरी आले तर कपडे थोडे मळलेले, थोडे खरचटेले होते. थोडे थरथरत पण होते. काय झाले म्हणून विचारले तर त्यांनी सांगितले की साधारण १५ मिनिटांपूर्वी स्कुटर घसरून रस्त्यावर पडलो. मागे एक गाडी होती, तिने करकचून ब्रेक दाबला. ती गाडी थांबली पण त्या गाडीचे चाक अगदी १ इंच डोक्यापासून दुर होते. अगदी थोडक्यात वाचलो. प्रत्यक्ष म्रुत्यू समोर बघीतला. त्यांचे हे ऐकून मी सुद्धा थरथरत होतो. हेल्मेटचे वरून पडणे आणि बांबाचा अपघात साधारणपणे अगदी एकाच वेळी झाले होते.

घरी आई आल्यावर दोन्ही किस्से ऐकून पहीले तिने आम्हाला नवीन हेल्मेट घ्यायला लावले आणि हेल्मेट सक्ती सुद्दा केली.

मी राहत होते त्या होस्टेलच्या रूममध्ये खुप मुलींना रात्री पांढऱ्या साडीवाली आकृती दिसली होती म्हणे , खासकरून त्या बेडवर जिथे मी शिफ्ट झाले नंतर ..त्यामुळे मोक्याची प्रशस्त रूम असूनही त्या रूम मध्ये त्या बेडवर कोणीही आलं नव्हतं राहायला.. शिफ्ट झाले तेव्हा मला हा प्रकार माहित नव्हता .. मी आल्यानन्तर खूप दिवसांनंतर समजलं हे प्रकरण .. पण सांगताना मुलींचा सूर असा होता की तू आल्यापासून कुठलाच त्रास झाला नाही , बाई पण नाही दिसली आणि काहीच नाही.. Happy

एका रूम मध्ये दोन भुते कशी राहणार ना Lol

@किल्ली - जरा विस्ताराने येऊ दे .
(फेसबुक वरून इकडे आल्यावर लाईक करता करता तारांबळ उडते. फक्त माऊस फिरत राहतो. )

अनिश्का.
तुझे दोन्ही अनुभव अक्षरश: मी घेतले आहेत.(वडीलांचा आणि अजोबांचा)

वरचा किस्सा खूप संक्षिप्त लिहील्याने वाचताना गैरसमज होतील असे वाटले तर संपादनाची वेळ निघून गेली आहे. असो. असेही कुणी वाचतच नाहीये. Lol

सोफिया कॉलेज हॉस्टेल

मुंबई मध्यात मग उत्तर आणि पूर्वेला जितकी बकाल होत गेलीय, अस्ताव्यस्त वाढत गेलीय त्याच्या उलट ती मोहक, सुंदर, उच्चभ्रू अशी दक्षिणमुखी आहे. त्यामुळेच सोबो म्हणजेच साऊथ मुंबई हे वेगळं संस्थान मानलं जातं. पण या दक्षिण मुंबईत अनेक भयंकर, पाशवी गुपितं ही दडलीयेत....

ऑगस्ट १९९८. सोफिया कॉलेजच्या (हे मुलींचं कॉलेज आहे.) प्रशासनानं कधी स्वप्नात विचार केला नसेल की तो दिवस त्यांच्या कॉलेजच्या प्रतिष्ठेला येणारी वर्षानुवर्ष हादरे देत राहील. त्या दिवशी त्यांच्या कॉलेजची हॉस्टेलची विद्यार्थिनी इंदू अंटो हीचा हॉस्टेल मध्येच संशयास्पद मृत्यू झाला. इंदू हिच्या डायरी मध्ये कॉलेजच्या सिनियर विद्यार्थिनीवर व काही नन्सवर रॅगिंग चे गंभीर आरोप लिहिलेले सापडले. कोर्टात केस अनेक वर्ष चालली. पण कुजबुजत्या चर्चांमध्ये हॉस्टेल, तिथल्या मुली, नन्स यांच्याबद्दल गूढ भय व्यक्त होत होतं. जी अनेक वर्षांची या परिसरात एक दंतकथा वावरत होती. Something unusual असण्याची. पण on the record कुणीच काहीच बोलत नाही.

हा परिसर जो ऑगस्ट क्रांती मैदानापासून, बाबुल नाथ मंदिर, हँगिंग गार्डन घेत नैऋत्येला पासून राजभवन येथे संपतो हाच मुंबईचा प्रसिद्ध मलबार हील भाग. मुंबईचा बिवर्ले हिल्स. इथं जशा गगनचुंबी इमारती आहेत, तसाच गर्द झाडीने लपलेला भयकारी निर्जन परिसर ही आहे. अनेक चित्र विचित्र अमानवी गोष्टींची दक्षिण मुंबईत दबक्या आवाजात चर्चा होते आणि विरून जाते कारण इथं पैशांच्या छन छन पुढं सगळं गौण.

पण इंदू प्रकरण धुमसत राहिलं. इतकंच नाही तर त्याच हॉस्टेलच्या गच्चीवरून अजूनही काही आत्महत्या झाल्या. हॉस्टेल व कॉलेजच्या मागच्या बाजूचा परिसर हा रात्रीच्या वेळेला एखाद्या हॉलिवुडच्या भयानक चित्रपटाचा सेट वाटतो. तिथले रहिवासी सुद्धा मध्यरात्री हॉस्टेल प्रेमायसेस कडे फिरकत नाहीत. अपरात्री तिथल्या गच्चीवर एखादी मुलगी उभी आहे असं दिसतं म्हणे. किंवा परिसरातल्या झाडाझुडपातून काळा पोशाख परिधान केलेल्या जोगतिणी फिरताना दिसल्याचे ही काही रहिवाशांनी सांगितले आहे. पण एकंदरीतच तो भाग अत्यंत निर्जन असल्याने फारसं कुणी त्रासात अडकल्याच ऐकिवात नाही. कधीही न झोपणारी मुंबई इथं मात्र अगदीच गूढ, भीतीदायक वाटते....

माझा मित्र मुकुंद देशपांडे बाबत झालेला किस्सा ..

घटना 2011 ची आहे, तो नोएडा सेक्टर 12 मध्ये राहत होता. त्या वेळेस तो ienergizer या international BPO मध्ये कामास होता, ही कंपनी सेक्टर 58, नोएडा येथे असून इथे जवळपास 2000 लोक कामास होते. त्याने सांगितलेला किस्सा ...

आमची batch नवीन होती व नुकतीच आम्ही training आटोपून फ्लोअर वर उतरलो होतोत. माझ्या batch मध्ये अंकित गुप्ता आणि रश्मी जैस्वाल अशे अजून दोघे जण होते. आम्ही तिघेही अट्टल स्मोकर्स असल्यामुळे आमची चांगलीच गट्टी जमली होती. दररोज रात्री 1 ते 2:30 आम्हास डिनर ब्रेक असल्यामुळे आम्ही लवकर जेऊन बाहेर सिगरेट पिण्यास जात असुत. आमची कंपनी ही मोठी असून त्यात तीन बिल्डिंग होत्या. एक बिल्डिंग ही मुख्य, व त्या बाजूस दोन छोट्या बिल्डिंगस होत्या, त्यातली एक बिल्डिंग ही कॅन्टीन होती व त्यात इतर ही दोन हॉटेल्स होती.
मुख्य बिल्डिंग व कॅन्टीन ह्या मध्ये अजून एक तिसरी बिल्डिंग होती जिच्यात प्रवेश निषिद्ध होता. तो एक जुना swimming pool होता जो काही वर्षांपासून बँद होता. 2008 मध्ये तिथे दोन मुलींचा बलात्कार व खून झाल्यापासून तिथे भुताटकी आहे म्हणायचे व ती जागा मोडकळीस आलेली होती व कोणीही तिथे जात नव्हते, अगदी आमच्या training period मध्ये सुद्धा आम्हास हेच सांगण्यात आले होते.
असो, आमच्या कंपनीच्या आवारात धुम्रपानास सख्त मनाई होती, म्हणून आम्ही तिघेही नेहमी एखादी आडोशाची जागा हुडकून सिगारेट पित असुत. एके दिवशी असेच सिगारेट पीत असताना आम्हास security guard ने पकडले. आम्हाला ताकीद देऊन परत आत पिऊ नका म्हणून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही कंपनी आवाराच्या बाहेर गेलो पण रात्रीची वेळ व मुलगी सोबत असल्यामुळे आम्हास थोडे अवघड वाटले कारण एकूणच दिल्ली व त्यातले त्यात नोएडा चा भाग हा थोडा unsafe च आहे. रश्मी ने त्यास तोड काढून आपण swimming पूल च्या मागे जाउत कारण तिथे कोणी येत नाही असे म्हणली, आमचा ही भुताखेतांवर विश्वास नसल्यामुळे आम्ही हो म्हणलोत.
त्याच्या दुसऱ्या रात्री आम्ही swimming पूल च्या मागे गेलो, सिगरेट पीत असताना मी व अंकित आम्ही दोघेही त्याच (खुनाच्या) घटनेबद्दल बोलत होतो पण रश्मीचे लक्ष मात्र आमच्या कडे नव्हते, ती सारखे आपण आत मध्ये जाउत म्हणू लागली, आम्ही ही मूर्खासारखे हो म्हणून आत गेलोत, पूल अत्यंत शांत व भेसूरवाना वाटत होता, पुलाच्या आतमध्ये पावसाचे पाणी साठलेले होते. रश्मी बराच वेळ त्या ठिकाणी फेऱ्या मारत होती, एव्हाना आमचा ब्रेक संपत आला होता व आम्ही रश्मीस वापस चालण्यास सांगितले, रश्मी एव्हाना बरीच शांत होती व अचानक तिने आपणास पोहण्याची इच्छा होत आहे व मी थोडे पोहून येते म्हणाली. प्रथम आम्हास वाटले की ती चेष्टा करत आहे कारण तिला अशी चेष्टा करण्याची हौस होती पण ती नंतर सोबत येण्यास नकार देऊ लागली व मला पोहायचे आहे असे सारखे म्हणू लागलीं. आम्ही कसेतरी तिला घेऊन वापस फ्लोअर ला घेऊन आलोत, पण ती शांत शांत होती. दुसऱ्या दिवशी ती कामास आली नाही, ती आजारी आहे असे कळाले, चार दिवसा नंतर ती आली पण फारच शांत व घाबरलेली होती, आम्ही तिला सोबत येण्यास विचारले पण ती काही आली नाही. नंतर तिने आपली नोकरी सोडून दिली बरेच विचारपूस केल्यानंतर तिने सांगितले की त्या दिवसानंतर तिला नेहमी आपल्यासोबत कोणीतरी असल्याची जाणीव होत होती व त्यामुळे तिची तब्येत ही साथ देत नव्हती...
दोन महिन्यानंतर रश्मीने आत्महत्या केली, तिच्या घरी आम्ही गेलो तेंव्हा तिच्या घरच्या लोकांच्या तोंडून ऐकले की ती आपल्याच मनाशी सारखे बोलत असायची व विशिष्ट दिशेला हाथ दाखवून सारखे शिव्या द्यायची.

आज या गोष्टीस 7 वर्ष झाले, तो ही हैदराबादला शिफ्ट झालाय परंतु हा किस्सा तो कधीही विसरू शकत नाही ...

लहानपणी ऐकलेले दोन किस्से घरच्यांकडून पुन्हा ऐकले. बरेचसे डिटेल्स लक्षात नसतात. आता टाईप करायचे होते पण खूप लिहायला लागेल. जरा कामं झाली की एक तरी किस्सा लिहीन.

माझे वडील लहान असतानाचा म्हणजे दोन तीन महीन्यांचे असतानाचा हा किस्सा आहे ( आता पुन्हा गावाचे नाव राहीले विचारायचे ). त्या वेळची आमची परिस्थिती अगदी हलाखीची होती. आमच्या हिश्शाला एक एकर जमीन आली होती. तिच्यात काही पिकवायचे म्हणजे दिव्य होते. वाड्याचा पडका हिस्सा आमच्या आजोबांच्या वाटेला आल्याने त्यांनी वाडा सोडून मातीचे घर बांधले होते. त्यात वडलांचा जन्म झाला. त्यानंतर आजोबा चिंताक्रांत असायचे. आता मुलगा झाल्यावर याचे कसे करावे म्हणून त्यांनी नोकरीचे प्रयत्न केले. त्या वेळी नोकरीसाठी चौथी किंवा सातवी शिकलेले कुणी असेल तर सहजच नोकरी मिळायची. आजोबांचे मॅट्रिक्युलेशन झाले होते. त्यांना सातवीच्या बेसवर पोस्टात नोकरी मिळाली. बहुतेक पोस्टमनची.

एका महिन्यांनी त्यांना पोस्टींगचे गाव मिळाले. आजुबाजूच्या गावात पत्र वाटायचे काम असायचे. रहायला जागा मिळेना किंवा मिळत असलेली परवडायची नाही. अशातच एक वाडा मिळाला. त्या वाड्यातल्या खालच्या दोन तीन खोल्यात रहा आणि भाडे जसे जमेल तसे द्या असे सांगितले गेले. (नंतर समजले की ज्याने हा सौदा केला त्याने चेष्टा केली होती ).

वाड्यात काही काही वेळा विचित्र अनुभव यायचा. जसे जेवण गायब होणे. रात्री वस्तू खाली पडणे. अजून बरेच काही. पण नाईलाज असल्याने आणि मनाची समजूत घालून तिथे राहणे भाग होते. अलिकडे एक काळे मांजर सतत सोबतीला असायचे. आजीला त्याची खूप भीती वाटायची.
विशेष म्हणजे शेजार कुणी नव्हता. घरं होती पण खेटून नव्हती. तुरळक होती.

एक दिवशी बटवड्याला सुटी होती. आजोबा गावात फिरत होते. गावात देवळाजवळ एक देवऋषी असायचा, त्याने आजोबांना बोलावून घेतले.
हात पाहिला आणि विचारले की अमक्या तमक्या वाड्यात उतरला आहेस का ? आजोबांनी होय म्हणून सांगितले. त्यावर तो देवर्षी रागाने लालबुंद झाला आणि आजोबांची चांगलीच खरडपट्टी काढली.

ती वास्तू पंचक्रोशीतली सर्वात वाईट वास्तू होती. त्या दिवशी कुठली तरी अमावस्या होती. मला सांगता नाही येणार. पण खूप धोकादायक दिवस होता. देवऋषी म्हणाले मुलाला पहायचे असेल तर वेळ न दवडता त्याला बाहेर काढ. आजोबा अनवाणी पळत सुटले. घरी आले तर डोळ्यासमोर वाडा हलताना दिसत होता. तो कोसळायच्या बेतात होता.

आजोबा वेड्यासारखे झाले. पळत आले आणि बाळाला उचलून घेतले आणि आजीला खेचतच बाहेर काढले. ती भांडी कुंडी गोळा करू म्हणत होती. पण आजोबांनी ऐकले नाही. ते बाहेर पडले आणि वाडा कोसळला.
आजोबांची खात्री होती कि देवऋषीने आपले संरक्षण केले असणार. ते पुन्हा देवळाकडे गेले. त्याने सांगितले की नुकतेच जन्मलेले बाळ, शापीत वास्तू. तुम्ही आपोआप खेचले गेले होतात. हे व्हायचेच होते. त्या दिवशी तू माझ्याकडे आलास हे सुद्धा व्हायचेच होते. जर तू नसला आलास तर मग आपल्याला काहीच समजले नसते.
ज्याने ही चेष्टा केली होती त्याच्या अंगावरून वारे गेले.

आजोबांना दुसरी जागा मिळाली. ते देवऋषीच्या पाया पडायला आले तर तो तिथे नव्हता. नंतर पुन्हा तो कधीही सापडला नाही. कुणालाच सांगता आले नाही तो कुठे गेला ते.
गावाचे नाव लक्षात नाहीये. पण बहुतेक नातेपुते किंवा असे काही असावे (मला हे गाव ठाऊक नाही. चुकण्याची शक्यता आहे ).

असेही कुणी वाचतच नाहीये.....
@मधुरांबे....अहो आम्ही रेग्युलर वाचतो...पण तुम्ही काय लिहिले कळलेच नाही Happy

Pages