काथ्याकूट: नकळत चघळत (भाग सहा)

Submitted by चैतन्य रासकर on 21 January, 2018 - 11:45

उजळणी:
काथ्याकूट: भाग एक---पात्रांची ओळख झाली.
काथ्याकूट: नित्याचं ब्रेकअप (भाग दोन)---नित्याचा बॉयफ्रेंड मॅरीड निघाला.
काथ्याकूट: मोघम अमोघ (भाग तीन)---नित्याचा बॉयफ्रेंड अमोघ निघाला.
काथ्याकूट: इराची तऱ्हा (भाग चार)---नित्याचा बॉयफ्रेंड शरद निघाला.
काथ्याकूट: उरातला केर (भाग पाच)---नित्याचं मॅरीड निघाली.
........................

"नित्या?" इरा म्हणाली.
पण ती मुलगी नित्या नव्हती, कोण होती काय माहित? ही विशीतली मुलगी, नीरवला बघून खुशीत होती. ही उंच मुलगी, हातात प्रपंच घेऊन येत होती, तिने उजव्या खांद्यावर जिम बॅग, उजव्या हातात स्वेटर तर डाव्या हातात योगा मॅट पकडली होती. केस बांधलेले नव्हते, बांधा काय दिसत नव्हता. तिला बघून नीरव बाईकवरून उठला, त्या मुलीशी बोलू लागला.

"ऐ हाय..लॉन्ग टाईम नो सी" नीरव तिला म्हणाला.
"हो ना"
"इतके दिवस कुठे होतीस?" नीरवने तिला विचारले.
"अरे मलेरिया झाला होता" त्या मुलीने उत्तर दिले.
"बाप रे कसा काय?"
"क्रोएशिया गेले होते..."
"क्रोएशियात डास आहेत?"
"क्रोएशियाच्या प्लेन मध्ये डास होते"
"प्लेन मध्ये डास?"
"अरे हो, टेक ऑफ करताना प्लेनमध्ये डास होते, मी कप्लेंट पण केली" ती मुलगी म्हणाली.
"मग?"
"पण त्या केबिन क्रूकडे डास मारायला काही नव्हतं"
"डास मारायची रॅकेट नव्हती?"
"नाही ना"
"स्ट्रेन्ज" नीरव म्हणाला.
काय स्ट्रेंज? प्लेन मध्ये डास होते? का प्लेनमध्ये डास मारायला काही नव्हतं हे स्ट्रेंज? एवढे खास डास प्लेनमध्ये आलेच कसे? ते पण मलेरियावाले? मलेरिया एवढा मोठा कधी झाला? प्लेन मध्ये होऊ लागला? प्लेन मध्ये भांडणं होतात, मलेरिया कधी पासून होऊ लागला?
जर प्लेनमध्ये डास असले तर, एअर होस्टेसला "ऐ बाई डास मार" असं कसं सांगायचं? ती थोडीच लगेच डास मारणार? प्लेनचं जाऊ दे, पण कुठे ही कोणालाही "डास मार" असं कसं सांगायचं? डास स्वतःच मारावे लागतात. प्लेन मध्ये आपण स्वतः डास कसे मारणार? म्हणजे मारू शकतो, पण ते कसं दिसेल? ते पण सगळ्यांसमोर? कोणी व्हिडिओ काढला तर? व्हायरल गेला तर? मी आजूबाजूला बघू लागलो, मला या पार्किंगमधल्या डासांची भीती वाटू लागली!

बारावीला असताना 'जगाचा भूगोल' हा धडा मी बेधडक ऑप्शनला ठेवला होता, त्यामुळे क्रोएशिया कुठं असावं ते माहित नव्हतं, एशियन कंट्री असणार हे नक्की. बहुतेक क्रोएशिया पर्शियाच्या जवळपास असावे, मी लगेच पर्शिया मोबाईलवर गूगल करून बघितलं, पण सैराटच्या परश्याचे रिजल्ट मिळाले!!

मी इराकडे बघितले, तिच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्या हस्ताक्षरासारखे होते, पटकन वाचताच आले नाहीत. बरीच रात्र झाली होती, आम्ही नीरव आणि त्या मुलीचं बोलणं ऐकू लागलो.
"तुला तर माहितेय, मलेरियाच्या गोळ्यांनी वजन वाढतं" ती मुलगी नीरवला म्हणाली.
"अरे हो..मग?"
"मग काय, त्या गोळ्या नाही घेतल्या, त्यामुळे तर बरं व्हायला वेळ लागला" ती मुलगी म्हणाली.
आयला ही मोठी कोंडी आहे, मलेरिया झाल्यावर काय करायचं? बरं व्हायचं का बारीक?
"तू झुबांच्या नवीन बॅचला येणार आहेस" ती मुलगी नीरवला म्हणाली.
"झुंबा मला झोंबेल गं" नीरव म्हणाला.
"झोंबेल मीन्स?"
"जमणार नाही"
"ही बॅच मिस नाही करणार, असं तू प्रॉमिस केलं होतं"
या मुलीला प्रॉमिस? बहुतेक नीरव हिला मिसेस करायला बघतोय. नीरवने प्रॉमिस काय, मला कधी साधं बर्थडे विश किंवा भॉ केलं नव्हतं, नीरवने पेपरला कॉपी करताना कसं बघतात, तसं हळूच आमच्याकडे बघितले, मी पण "खूप अवघड पेपर आहे" असा चेहरा केला. मॉल मध्ये क्रेडिट कार्ड विकणाऱ्या मुलांशी जसं बोलतात, तसंच नीरव त्या मुलीला "आता नको, बघू, जमलं तर, वेळ झाला की, खूप कामं असतं" असं म्हणत टाळू लागला.

मी इराकडे बघितले, तिची अवस्था 'आला कंटाळा आता टाळा' अशी होऊ लागली. माझ्या डोक्यातील विचार सिग्नलवरच्या ट्रॅफिक सारखे हळू हळू पुढे सरकत होते. , मी मनातल्या मनात, मलेरिया पीडित मुलीचं नावं "रिया" असं ठेवलं आणि अचानक माझ्यातल्या रॅपरला सूर गवसला, तो मनातल्या मनात रॅप गाऊ लागला "एक होती रिया, ती गेली क्रोएशिया, तिला झाला मलेरिया, बरीच रात्र झाली, चला आपण निघूया"
साडे अकरा जांभया आणि मिनिटानंतर, रिया का कोण, तिचा मलेरिया, आमचा उत्साह बरोबर घेऊन निघून गेली. नीरव "सॉरी" तर इरा "जाऊया घरी" म्हणाली, मग थोडावेळ कोणी काहीच बोललं नाही, मग मी शांतात भंग करायची म्हणून, उगीच काहीतरी म्हणालो...

"कमाल आहे...."
"कमाल आहे....का माल आहे?" इरा हसत त्या मुलीबद्दल म्हणाली.
"माल तर आहे" नीरव म्हणाला.
"शिंगल आहे का?" मी विचारले, तशी इरा हसली, मी चुकून कधीतरी 'स' ला 'श' म्हणायचो, शंसार, शंस्कार, शायको, शंगीत, शहा असं शोयीस्कर म्हणायचो, तशी इरा हसायची, तिला जाम मजा वाटायची, सिंगलच शिंगल सारखं होतं असे, म्हणून इराने 'शिंगल आहे पण शिंग आहेत' अशी नवीन म्हण तयार केली होती.
"तिच्या बॉयफ्रेंडची मलेशियात शेती आहे" नीरव म्हणाला.
"तुझ्याकडे झाड लावायला कुंडी पण नसेल?" इराने विचारले, नीरवने 'नाही' म्हणून मान डोलवली. नीरवच्या घरी कुंडी नाही, नेहमी उकडलेली अंडी असायची, घरी आलेल्या लोकांना तो अंडदान करायचा.
"गोलकिपर असले म्हणून काय, गोल होतं नाहीत का?" नीरवच्या खांद्यावर थोपटत मी म्हणालो.
"नाही यार, शी इज जस्ट अ फ्रेंड, तिच्या घरी स्विमिंग पूल आहे" नीरव म्हणाला.
"काय??"
"आय मीन शी इज रिच" नीरवने उत्तर दिले.
'तिच्या घरी स्विमिंग पूल आहे पण माझ्याकडे बाथटब ही नाही' असं नीरवला म्हणायचं होतं, पण तो म्हणाला नाही. बरं झालं आठवलं, कपडे भिजवायला मला दुसरी बादली घ्यायची होती.

"जावसं वाटत नाहीये ना?" नीरवने आम्हा दोघांना विचारले.
मला पण जावंसं वाटतं नव्हतं, पण करणार काय? रात्र झाली होती, घरी जाऊन झोपावं? का इथेच थोडं झोपून घरी जावं?
"नित्याचा काही मेसेज?" मी विचारले.
"आपण नित्यालाच सरळ सगळं विचारू ना" नीरव फोन बघत म्हणाला
"तिचा फोन लागतं..."
"आत्ताच नित्याच्या घरी जाऊन विचारू, मला माहितेय ती कुठे राहते" नीरव म्हणाला, मला पण नित्याला सगळं खरं काय ते विचारायचं होतं. नित्या.. कसली खात्री नव्हती? की तू आपल्या मैत्रीला कात्री लावलीस? आधी तुझं लग्न मग तुझा दादला आमच्यापासून दडवून ठेवलास? असं मला सगळं तिच्या घराच्या दारावर उभं राहून, तिला दरडावून, खरडवून विचारायचं होतं.

"नित्या नवऱ्याबरोबरच राहत असेल ना" नीरव म्हणाला, मी इराकडे बघितले.
"माफ करा मला जाऊ द्या" एखाद्या ट्रॅफिक पोलिसाने अडवल्यावर आपण त्याच्याकडे कसं बघतो अगदी तसंच आमच्याकडे बघत इरा म्हणाली.
"चल ना" नीरव म्हणाला.
"ऐ नाही रे, तुमची आवड मला नाही सवड, तुम्ही जाऊन या" इरा जांभई देत म्हणाली, तिला झोप आली होती, ती ही खूप आली होती. चहा बरोबर नेहमीच मारी चालत नाही, म्हणून इराची स्वारी नित्याच्या घरी येणार नाही, हे मला माहित होतं म्हणून मी तिला आग्रह केला नाही.

"चल ना, तू घरी जाऊन काय करणार?" नीरवने इराला विचारले.
"भांडी घासणार"
"का? तू भांड्याला बाई नाही ठेवली?"
"ठेवली होती पण तिला काम सोडावं लागलं"
"का?"
"तिच्याकडे आधार कार्ड नव्हते"
"मग?"
"सोसायटीमध्ये सगळ्या कामवाल्या बायांना आधार कार्ड कंपलसरी केलं आहे" इरा म्हणाली.
"याला काय अर्थ आहे?" नीरव माझ्याकडे बघत म्हणाला.
'खूप मोठा अर्थ आहे, आधार कार्ड शिवाय आता भांडी घासता येणार नाहीत' असं मी म्हणणार होतो, पण म्हणालो नाही. इरा घरी जाऊन भांडी नाही पण दात घासून झोपणार होती, हे मला मनापासून कळत होतं. सहिष्णुता पाळत, इरा आम्हाला टाळत होती. कसं, किती, केव्हा, कोणाला, कशाला टाळावं हे इराकडून शिकावं.

नीरव जिमला बाईक आणली होती की नाही, हेच विसरला होता, माझ्याकडे बाईक नव्हती, इरा ऍक्टिव्हावर आली होती, मग आम्ही इराच्या ऍक्टिव्हाजवळ आलो, निरोप समारंभ सुरु झाला, "खूप छान वाटलं, वरचेवर भेटत जाऊ, ऐ हो चालेल, जाऊयात" अशा वाक्यांची सरबत्ती करत, इराने ऍक्टिव्हाची बत्ती सुरु केली.
"कळत नसेल तर चघळत बसू नका" इरा आम्हाला नित्याबद्दल म्हणाली, म्हण क्रमांक चौदा 'नाही कळत तरी बसलाय चघळत'
"नेमका काय प्रकार आहे, हे तिच्या घरी जाऊन बघतो" नीरव म्हणाला, तसे इराने खांदे उडवले, आम्हाला 'गोड नाईट' करून पार्किंग मधून वाट काढत, इरा आऊट ऑफ साईट झाली.
"ही जाड झालीय" नीरव इरा गेल्यावर म्हणाला, मी प्रश्नाला प्रश्नाने मारत "हो का?" एवढचं म्हणालो.

आम्ही पार्किंगच्या बाहेर आलो, मी डाव्या बाजूला बघितले तर, इरा ऍक्टिव्हा घेऊन तशीच उभी होती!
ती ऍक्टिव्हा सुरु करायचा प्रयत्न करत होती.
"काय झालं?" मी इराकडे जात म्हणालो.
"अरे मध्येच बंदच पडली, मी चोक देऊन स्टार्ट करत होते पण स्टार्टच होतं नाही" इरा म्हणाली.
मग आमचे मल्ल, मिनिटाला पन्नास जोर मारणारे, असंच कंटाळा आला की भरलेला सिलेंडर एका हाताने उचलून व्यायाम करणारे मित्र एकदम पुढे झाले, त्यांनी काही न बोलता, ऍक्टिव्हा एका झटक्यात मेन स्टॅण्डवर लावली, ऍक्टिव्हाची किक मारण्यास सुरुवात केली. नियमित जिमला जाणाऱ्या माणसाला, जिमच्या बाहेर गाडीची किक मारायला कधी देऊ नये. का? कारण ती किक तुटू शकते!! चौथ्या किकला किक तुटली, हे नीरवला सातवी किक मारताना कळाले!!

मी तुटलेली किक खिशात ठेवत असताना "हळू किक कशी मारायची?" असं म्हणत नीरव व इरा भांडले. नीरव ऍक्टिव्हा ढकलत परत पार्किंगमध्ये आणि इराच्या डोक्यात जाऊ लागला, तसं इरा त्याला "आता का ढकलतोय? उचलूनच घेऊन जा" म्हणाली, "अशी आयडीया देऊ नको" असं म्हणत मी इराला समजावले, नीरवने निमूटपणे गाडी पार्किंगला लावली,तिथल्या वॉचमनला "लक्ष ठेवा" असं सांगून आम्ही परत पार्किंग बाहेर आलो.

इराला आमच्याबरोबर, आम्हाला इराच्या रागाबरोबर जायचे नव्हते, पण मग काय करायचे? असा विचार करत नीरवने अॅपवरून कार बोलावली, पूर्वीच्या काळी हाक मारून, पण आता तर अॅपवरूनच गाडी बोलावता येते. बापाची किंवा स्वतःची गाडी नसल्यामुळे, अॅपच्या गाडीची वाट बघत आम्ही रस्त्यावर उभे होते. इरा आणि नित्याने भेटावं, आमच्या ग्रुपच मिलन नाही निदान रीयुनियन व्हावं, असं माझं तरी ओपिनिअन होतं.
मैत्री अॅपसारखी असते, तिला अधून मधून अपडेट करावं लागतं.
हम्म..चांगली लाईन आहे, शेअर करू का? पण किती लाईक्स येतील? निदान पन्नास तरी हवेत.

थोड्याच वेळात टकाटक कार घेऊन ड्राइव्हर प्रकट झाला. इरा पुढे बसली, आम्ही दोघे मागे बसलो, आम्ही नित्याच्या घरी निघालो.
मस्त वारा सुटला होता, मी सुस्त झालो होतो, ड्राइव्हरने रेडिओ सुरु केला, "तू घे करून आरती, मग करू पार्टी, नको सांगू आईला, तुझी आय लय मारती" हे गाणं सुरु होतं, माझं ऑल टाईम फेव्हरेट गाणं!! मी ते गाणं गाऊ लागलो, इराने माझ्याकडे वळून रोखून बघितलं, मी लगेच गायचा थांबलो, मला एकदम चौथीत असल्या सारखं वाटलं, मग रेडिओवर रोमँटिक गाणं "तेरे दिल के ब्राऊजर में, मेरा टॅब खोल दे" सुरु झालं.

नीरव त्याच्या फोनमध्ये, मी विचारांमध्ये, तर इरा रागात होती, कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं, जसं ते रोमँटिक सॉन्ग सुरु झालं, तशी इरा एकदम म्हणाली....
"आई वडील, भाऊ बहीण, दोन मित्रांवर पण गाणी आहेत पण..."
"पण काय?"
इरा मागे वळत म्हणाली "असा कुठला पिक्चर आहे ज्यात मित्राने मैत्रिणीसाठी गाणं गायलं आहे?"
"मैत्रीण?"
"मैत्रीण, जस्ट फ्रेंड, नो लव्ह"
"फ्रेंडशिपवर कितीतरी गाणी..."
"तशी फ्रेंडशिप नाही रे, मुला मुलीची फ्रेंडशिप" इरा असं म्हणाली तेव्हा मी मैत्रिणीवर असलेलं गाणं आठवू लागलो.
"मैत्रिणीवर गाणी का नाहीत?" इराने स्वतःलाच प्रश्न विचारला.
"कारण सगळी गाणी तर जेन्टसच लिहतात"
कोण बोललं? मी दचकलोच! मी नीरवकडे, त्याने माझ्याकडे बघितलं, आम्ही ड्रायव्हरकडे बघितले, ड्राइव्हर बोलला? ड्राइव्हरला मतं आहे? म्हणजे असावं, पण या विषयावर? मला या विषयावर मतं काय "हम्म.." पण करता येतं नव्हतं. मतं नसल्याची खंत तर वाटते, कारण आपल्याला मत नसेल, तर किमंत कोण देणार? मग इरा आणि त्या ड्राइव्हरमध्ये, "मैत्रीवर गाणी आहेत मैत्रिणीवर का नाहीत?" या प्रश्नांवर सुमारे पावणे चार मिनिटांचं चर्चासत्र घडलं. मी, नीरव फक्त श्रोते होतो. या विषयावर आम्हाला मत नव्हतं कारण हा विषय आहे हेच आम्हाला माहित नव्हतं.

"मला तुझ्या आत्याचं गाणं आठवलं" नीरव हसत इराला म्हणाला.
"लग्नातलं ना?" मी विचारले, नीरवने 'हो' म्हणून मान हलवली.
"ऐ..त्या लग्नाचा अजिबात विषय काढायचा नाही" इरा रागावून म्हणाली, तसं आम्ही हसलो. इराच्या स्वतःच्या लग्नाचा स्वाहा आधीच झाला होता, त्यामुळे त्या लग्नाचा विषय तिला कधीच काढायचा नव्हता. दोन वर्ष झाली असतील, मला त्या लग्नातल्या गोष्टी आठवू लागल्या.

इराचं लग्न!!

मला अजून आठवतं, ग्रुपमधलं पहिलंचं लग्न त्यात प्रेम विवाह, म्हणून आम्ही कायच्या काय चेकाळलो होतो. प्रत्येक लग्न समारंभात फक्त 'कडचे' असतात, मुलाकडचे नाहीतर मुलीकडचे, इकडेच नाहीतर तिकडचे, इरा आणि अनिकेतच्या लग्नात आम्ही दोन्ही 'कडचे' होतो.
ते पावसाळ्याचे दिवस होते म्हणून वॉटरप्रूफ लग्नपत्रिका तयार करण्यात आल्या होत्या.
लग्न समारंभाची थीम "शेअर मार्केट" ठेवू, असा आग्रह शेअरमार्केट मध्ये काम करणाऱ्या अनिकेतच्या दोन्ही काकांनी केला, पण "लग्नाच्या दिवशी शेअर मार्केट पडलं तर?" असं म्हणत इराच्या आत्याने हा डाव हाणून पाडला, मग थीमलेस लग्न करण्यापेक्षा सर्वानुमते टाईमलेस "प्रेम" थीम ठेवण्यात आली.

सगळ्या लग्नात सगळंच मोफत असतं, या लग्नात वायफाय पण मोफत होतं. काही होतकरू नातेवाईकांनी फ्री वायफायची संकल्पना मंगल कार्यलयात राबवली होती , त्या वायफायच नावं "रेंज मॅरेज" असं ठेवलं होतं, तर "गोडमानूनघ्या" हा मोठा पासवर्ड अक्षदांबरोबर शेअर झाला. त्यात या वायफायला कमाल स्पीड होता, त्यामुळे मानवर करून काढलेल्या, किमान सहा सेल्फीज प्रत्येक दहा मिनिटाला अपलोड होत होत्या. हे लग्न लांबलं असतं तर फेसबुकवर काय, गूगलवर ट्रेंड झालं असतं.

लग्नात आधी बुफे होता मग त्याची रमत गमत पंगत झाली. बासुंदीमध्ये केसर ऐवजी केस निघत होते, मटर पनीर मध्ये खीर मिक्स झाली होती, तर भाज्या खारट होत्या म्हणून, प्रत्येक ताटात केचअपचे पाऊच वाढले गेले. काहीजण थोडंच खात होती, तर काहीजण प्रत्येक पंक्तीत थोडं थोडं खात होती. जे जेवणात तल्लीन झाले, ते जेवणानंतर मलीन झाले. ज्यांना 'लीन' राहायचं होतं ते डोकं सोडून काही खातं नव्हते. मुलाकडच्यांना शर्टपीस, पॅण्टपीस बरोबर सेल्फीस्टिक मिळत होत्या, तर तरुण मुला मुलींना "लवकर लग्न करा" असे सल्ले मिळत होते.

आख्ख लग्न 'फेसबुक लाईव्ह' करण्यात आलं, जे लग्नाला आले नाहीत त्यांनी कमेंटवर आशिर्वाद कळवले, त्या कंमेंट्सला लाईक्स करून अनिकेत, इरा त्यांच्या पाया पडले. फेसबुकवर "पाया पडणे" नावाची रिऍक्शन का नाहीये? एखाद्याची पोस्ट वाचून 'चरण दाखवा, पाया पडतो' असं साहजिकच वाटू शकतं. पोस्ट खूपच आवडली, लाईक्स, कॉमेंट, शेअर करून सुद्धा भागलं नाही तर मग? लाईक्सच्या वर काय? तर पाया पडणे, "टच फीट्स" शॉर्टमध्ये "टफी"

त्याचबरोबर "हो का?" "अगदी अगदी" "निर्विकार" "कशाला उगीच" अशा अर्थाच्या किंवा नावाच्या फेसबुक रिऍक्शन असाव्यात, त्यामुळे फेसबुकवर होणारी अर्धी भांडणं टाळता येऊ शकतात, यावर विचारमंथनाची खरंच गरज आहे.

मग बाहेर पाऊस सुरु झाला, वायफाय स्लो झालं, तशी लोकं कंटाळली, काहीतरी टाईमपास म्हणून, इराच्या आत्याने "माहेरला हूल, सासरला पाऊल" नावाचं प्रसिद्ध गाणं आधी माइकवर, मग स्टेजवरून गायला सुरुवात केली, इथे आत्याने सूर लावला तिथे इरा रडायला लागली. "नवरी आत्ताच रडली, तर तिचा मस्कारा चेहऱ्यावर पसरेल" अशी काळजी फोटोग्राफरने व्यक्त केली, हा फोटोग्राफर तर द्रष्टा निघाला!! अनिकेतच्या मावशीने "रडू दे, मस्कारा वॉटरप्रूफ आहे" असं म्हणत फोटोग्राफरला समजावले, प्रसंगावधान राखून काही नातेवाईकांनी "फोटो खराब येतील" असं म्हणून रडणाऱ्या इराला समजावले, पण इराच्या आत्याला कोणी समजावले, थांबवले नाही, कारण तो सुरेल आवाज ऐकून, पाऊस थांबला!!

परीक्षेत पेपर लिहिताना, अभ्यास कमी झाला असेल तर, प्रत्येक वेगळ्या प्रश्नाला एकचं उत्तर लिहावे लागत असे. अगदी तसचं, या लग्नात काहीजण प्रत्येक वेगळ्या प्रश्नाला "नाही हो, लवकर जायचं" हे एकच उत्तर देत होती.

मास कॉमचं शिक्षण घेणारा अनिकेतचा चुलत भाऊ, लग्नात 'पत्रकार, पत्रकार' खेळत होता, तो काही लोकांना "या लग्नाबद्दल काय वाटतं?" असं विचारत, व्हिडिओ शूटिंग करत होता. शेवटी तो आमच्याकडे आला, त्याने मायिक आमच्या हातात देतं, आम्हाला विचारले..
"तुम्ही अनिकेत, इराचे जवळचे मित्र, आत्ता नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे?"
मी कॅमेऱ्याकडे बघत बोलू लागलो "अनिकेतसाठी इरा लव्ह ऑफ द लाईफ आहे"
"अनिकेतसाठी ती लस्ट ऑफ द लाईफ सुद्धा आहे" नीरव म्हणाला.
"हो..हे दोघे कुठे पण सुरु व्हायचे"
"पिक्चर कोणताही असो, यांची कॉर्नर सीट ठरलेली असायची" नीरव पुढे म्हणाला.
"कुठलं थिएटर?" अनिकेतच्या चुलतभावाने विचारले.
"गुलबदन थिएटर, लास्ट रो रिक्लायनर कॉर्नर सीट्स" मी म्हणालो.
"ती रो नेहमी फुल्ल असते ना?"
"तुला नेक्स्ट वीकच बुकिंग आत्ता करावं लागेल" नीरव म्हणाला.
"एकदा त्यांनी सीटचं तोडली...." मी असं म्हणत असताना, अनिकेतचा चुलतभाऊ म्हणाला.."सॉरी यार पण..हे नाही ठेवता येणार, हा व्हिडिओ सगळ्या फॅमिलीला दाखवायचा आहे"
आयला लग्नाच्या व्हिडिओत पण सेन्सॉर? ह्या..

"काहीतरी असं थोडं सेंटी..." अनिकेतचा चुलतभाऊ पत्रकारचा लगेच संपादक झाला. नीरवने माझ्याकडे बघितले, माझं लक्ष ताटातल्या कांदा भजीकडे गेलं, ती भजी बघत मी म्हणू लागलो.."अनिकेत आणि इराचं नातं कांद्यासारखं आहे, त्यांच्या नात्याला खूप पदर आहेत, कुठलाही पदर उलगडत असताना डोळ्यात पाणी येतचं....

"इरा ऐक ना"
"काय?"
"अनिकेतच्या चुलत भावाचं नावं काय होतं" मी विचारले.
"कुठला चुलत भाऊ?" नीरवने मला विचारले
"तो जो लग्नात व्हिडिओ शूटिंग करत होता"
नीरव सुद्धा आठवू लागला.
इरा मागे वळून माझ्याकडे बघत म्हणाली "शरद??"

क्रमश:

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग्गं! एकसे एक पंचेस ची बरसात आहे ह्या भागात पण स्टोरी जैसे थे च राहीली की राव! पुढचा भाग छोटा लिहा पण कथा पुढे जाऊ दे Happy

Sahi

मस्त.. पंचेस भारी आहेत.
शरद म्हणजे नित्याचा बॉयफ्रेंड मधला का?
कथा अजून थोडी पुढे सरकायला हवी होती.

"तू घे करून आरती, मग करू पार्टी, नको सांगू आईला, तुझी आय लय मारती" >>> कम्माल गाणं Lol

म हा न .... __/\__
अरे काय एक एक पंचेस आहेत...
"तिच्या चेहऱ्यावरचे भाव माझ्या हस्ताक्षरासारखे होते, पटकन वाचताच आले नाहीत. "
"आयला ही मोठी कोंडी आहे, मलेरिया झाल्यावर काय करायचं? बरं व्हायचं का बारीक?"
"नीरवच्या घरी कुंडी नाही, नेहमी उकडलेली अंडी असायची, घरी आलेल्या लोकांना तो अंडदान करायचा."
"तू घे करून आरती, मग करू पार्टी, नको सांगू आईला, तुझी आय लय मारती"

नित्या च्या घरी शरद आणि अनिकेत पण असतील तर ? पुढचा भाग लवकर टाका प्लीज.

सोमवार सकाळ चं सार्थक झालं.
हा आठवडा मस्त जाणार. Happy

वायफायच नावं "रेंज मॅरेज" असं ठेवलं होतं, तर "गोडमानूनघ्या" हा मोठा पासवर्ड>> भन्नाट!
मजा आली पण गोष्ट पुढे सरकू द्या आता.

नेहमीप्रमाणे पंचेस छान.
कथा मात्र पुढे सरकत नाहीये.. तेवढं जरा बघा ना.....
फिरुन फिरुन तिथेच येतेय... जरा पुढे जाऊदे कथा..

हा भाग पण मस्तच..! Happy
एक से बढकर एक पंचेस..!
पुढचा भाग लवकर टाका..

सर्वाना मनापासून धन्यवाद
हा भाग सर्वाना आवडला आहे हे बघून छान वाटलं Happy

@चैत्रगंधा
नित्याचा बॉयफ्रेंड कोण आहे? अमोघ आहे का शरद? हाच मोठा प्रश्न आहे
एक शरद नोटाबंदीत भेटला होता, हा दुसरा शरद इराच्या लग्नात कदाचित नित्याला भेटला असेल.
नित्याने लग्न लपवून का ठेवले? हा सुद्धा एक प्रश्न आहे

@ जिज्ञासा, चैत्रगंधा, कऊ१९९८, आनंदिता, मॅगी, सस्मित
हो, कथानक पुढे सरकलं नाही, पण बहुतेक पुढचा भाग हा शेवटचा, अंतिम भाग असेल.

हा भाग जेव्हा लिहिला होता तेव्हा बऱ्याच गोष्टी वेगळ्या होत्या, उदारणार्थ इरा घरी निघून जाते आणि फक्त कथानायक व नीरव नित्याच्या घरी जातात, मग तेथून कथा पुढे जाते. हा भाग खरं तर तीन हजार शब्दांचा होता, पण रटाळ होऊ नये म्हणून, इराच्या लग्नातले बरेचसे प्रसंग मी नंतर काढले.

@स्मिता श्रीपाद
धन्यवाद Happy
शरद असेल की नाही ते सांगता नाही येणार, पण अनिकेत नक्की नसेल, पुढचा भाग जर शेवटचा असेल तर मग अनिकेत या ग्रुपला भेटणार नाही.

हो, कथानक पुढे सरकलं नाही, पण बहुतेक पुढचा भाग हा शेवटचा, अंतिम भाग असेल.>>>>
ओ हॅलो साहेबा,तू बोलला होता की २० च्या वर भाग असतील...
मग एवढ्यात आटपत का घेतोय?

वाह भारी आहे हा भाग पण.
कथानक पुढे सरकलं नाही>> +१
हा भाग खरं तर तीन हजार शब्दांचा होता, पण रटाळ होऊ नये म्हणून, इराच्या लग्नातले बरेचसे प्रसंग मी नंतर काढले.>> त्यापेक्षा २ भागात १५००
ठेवले असते तर अजून वाचायला मिअळाले असते ना. 'रेन्ज मॅरेज' बद्दल. Happy
पुलेशु.

कमाल, धमाल
जबरदस्त पंचेस. इतक्यात नका संपवू मजा येतेय वाचायला.

@विद्या भुतकर
हो, तसंच करायला हवं होतं, दोन छान, व्यवस्थित भाग झाले असते, आता पुढच्या कथेच्या वेळेस हे नक्की लक्षात ठेवेन Happy

@कऊ१९९८, @अक्षय दुधाळ
तुमच्या सारखे वाचक मिळाले म्हणूनच एका कथेचे सहा भाग लिहिता आले, मी दुसऱ्या कथा लिहीत राहीन, पण या काथ्याकूटचा पुढचा भाग शेवटचा भाग असेल Happy

भारी हसलो.

पण या काथ्याकूटचा पुढचा भाग शेवटचा भाग असेल >> अरे हे काय ?

पण या काथ्याकूटचा पुढचा भाग शेवटचा भाग असेल>>एकदम उत्तम निर्णय
खर म्हणजे मलाही तुमच्या कथा प्रचंड आवडतात आणि काथ्याकूटची मी जबरी फॅन आहे पण योग्य वेळी दि एन्ड झाला तरच बरा नाहीतर इतके सुंदर लिखाण नंतर बोअर होऊ शकते ..अर्थात हे मा वै म so राग मानु नये

या कथेचा जर पुढचा भाग शेवटचा असेल, तर तुम्हाला पुढची नविन कथा मात्र लगेच सुरू करावी लागेल हा.
त्यात डीले अजिबात चालणार नाही. आम्ही सगळे वाट बघतोय.

@आदू
मनापासून धन्यवाद, मी नेहमीच आपल्या प्रामाणिक प्रतिक्रियांची वाट बघत असतो

@आनंदिता @असामी @चैत्राली उदेग
मनापासून धन्यवाद, एक नवीन कथा लिहायला घेतली आहे, लवकरच पोस्ट करेन

@साधना
पण कथानक तिथेच रेंगाळतेय... +१११
पुढच्या कथेच्या वेळी नक्की खबरदारी घेईल

Pages