आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रिणीसाठी रोजच जायचो ते दुकान म्हणजे रतन सायकल समोर देवधरांचं......तीन चार फूट फ्रंटेज वालं ......काका एक ऑर्डर पूर्ण झाल्याशिवाय पुढची घेत नसत ....आणि पोरं ओ काका ओ काका करून त्यांना भंडावून सोडत....>> अगदी अगदी अवनी.

वरदा सुरेख आठवण.

बर सध्या जिथे दगडुशेट हलवाई गणपती बसतो त्या समोर जे पार्कींग आहे ती जागा पण अशीच अचानक काळाच्या पडद्याआड गेली. एक त्रिकोण होता तिथे दुकानांचा. महराष्ट्र टी डेपो होते बहूतेक तिथे. आमच्या घरी तिथुनच सुट्टा चहा आणला जात असे. २००० किंवा त्याच्या थोडे आधी रस्तारुंदीकरणात गेली ती दुकाने. काका हलवाईच्या मागे आता जिथे फुलवाले बसतात तिथेच एक वाडा होता त्यात नेहेमी जा ये असे एका नातेवाईकांकडे. गुढीपाडव्याच्या गाठ्या व संक्रांतीचा हलवा बनवताना बघणे ही पर्वणी असे.

सपेमधल्याखरं तर पुण्यातल्या वाड्यांची संस्कृती हा एक वेगळ्याच धाग्याचा विषय होईल......२०-२२ बिर्‍हाडात दोन संडास ...तेही वाड्याच्या दरवाज्याजवळ असले पाहिजेत हा अलिखित नियम होता. प्रत्येक बिर्‍हाडाला १ किंवा २ खोल्या त्यामुळे निम्मे संसार वाड्याच्या मोकळ्या जागेत...>> अगदी. आमच्या वाड्यात पण २ होते. एक काळा व एक गोरा. काळ्या संडासात अंधार बुडुक, लै घाबरायची पोरे. मग कंदिल घेऊन जायचो. भयंकर किस्से आहेत संडासाचे Proud

वाड्यातच एक काळा व एक पांढरा जिना होता. लपाछपीत काळा जिना डिमांडमधे. काहीवेळा लपणारी पोरच घाबरायची अंधारामुळे.

<बर सध्या जिथे दगडुशेट हलवाई गणपती बसतो त्या समोर जे पार्कींग आहे ती जागा पण अशीच अचानक काळाच्या पडद्याआड गेली. एक त्रिकोण होता तिथे दुकानांचा. महराष्ट्र टी डेपो होते बहूतेक तिथे. आमच्या घरी तिथुनच सुट्टा चहा आणला जात असे. २००० किंवा त्याच्या थोडे आधी रस्तारुंदीकरणात गेली ती दुकाने. काका हलवाईच्या मागे आता जिथे फुलवाले बसतात तिथेच एक वाडा होता त्यात नेहेमी जा ये असे एका नातेवाईकांकडे. गुढीपाडव्याच्या गाठ्या व संक्रांतीचा हलवा बनवताना बघणे ही पर्वणी असे.>

तो दुकानांचा त्रिकोण म्हणजे कोतवाल चावडी. गणपतीसाठी जागा हवी म्हणून ती ऐतिहासिक इमारत महानगरपालिकेनं पाडली. चावडीसमोर बाहुलीचा हौद होता, तो आता फरासखाना पोलिसचौकीच्या आवारात आहे.

काका हलवायाच्या मागचा वाडा हा परांजप्यांचा वाडा. तो पूर्वी खाजगीवाल्यांच्या मालकीचा होता. हे परांजपे टिळकांचे मित्र आणि व्यवसायात भागीदारही होते.

करेक्ट चिनुक्स!!

त्या वाड्यात आईचे एक मामा रहायचे लेले म्हणुन. ७० पेक्षा जास्ती वय असताना पर्वती चढणे, सुर्यनमस्काराचे विक्रम करणे करत असत. बहूतेक सपच्या तलावात पोहायला पण शिकवायचे. त्यांनी म्हणे वाघ मारला होता अशी आईकडुन वदंता पण ऐकली होती बालपणी.

काय भरजरी आठवण आहे वरदा! माय गॉड! एकदम जेलस ऑफ यु वगैरे! Happy
ह्म्म. वाडा आणि संडास आणि लपाछपी! Proud सेम पिंच इकडेही.
वेदपाठशाळा आहे अजूनही. सुरेख इमारत केली आहे आता. जोगेश्वरी आणि कसबा गणपती आहेत तसे ठेवले आहेत अजूनतरी. त्या देवळांत जाणं म्हणजे टाईम ट्रॅव्हल केल्यासारखं आहे.

हो, गणपतीसाठी/ पार्किंगसाठी घाशीराम कोतवालाची कोतवाल चावडी पाडली, फरासखान्याचं आगीच्या बंबाचं स्थानक हलवलं... कुठे आग लागली तर बाप्पालाच साकडं घालायचं. आपोआप आग विझेल!!!!
पुणेकरांना एकदाही सगळ्यांनी एकत्र येऊन (तुरळक काही जण सोडता) एकमुखाने विरोध करावासा वाटला नाही. तेव्हा आपल्याला तसाही वारसा असायची फारशी लायकी नाही (हे भारतीयांबद्दल बर्‍याच अंशी खरंच आहे) आणि कुठल्याही नागरी सोयीसुविधेच्या अडचणींबद्दल तक्रार करायचा हक्क नाही. असोच.

पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडले कि ते पहायला लकडी पुलावर जायचे(हा सर्वात कमी उंचीचा पूल असल्याने पाणी जवळ दिसायचे.) मग रविवारी आमचे आई वडील आंम्हाला बंड गार्डनला घेऊन जायचे , बन्धार्यावरून ओवर फ्लो होउन वहाणार्या पाण्याचे द्रुष्य पहायला. गंभीर आणि मोठ्ठा आवाजही आसमंतात भरून राहिलेला असायचा. येताना भाजलेलं कणीस खात पुणे स्टेशन पर्यन्त चालत येऊन बस पकडुन परत घरी. या साध्या आउटिंगचेही अप्रुप असे.
पुढे बालगंधर्वचा पूल झाल्यावर , उन्हाळ्यात रात्री वारं खात या पुलावर जाऊन गप्पा मारत बसणे हाही पुणेकरांचा शिरस्ता होता. या पुलाचे दोनही अर्धे भाग एक मेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. डिव्हायडरच्या एका बाजूच्या सिमेंट ब्लॉक्वर बसून पाय पलिकडच्या ब्लॉकवर ठेवायचे. मग एका बाजूने जड वाहन गेले की त्या बाजूचा पुलाचा भाग खाली दाबला जायचा हे पाय आणि शरीर यांच्या सापेक्ष हालचालीतून जाणवयचे.

बालगंधर्व रंगमंदीराच्या आवारात असलेली बकुळीची झाडे आठवताहेत का कुणाला अजूनही आहेत.
बकुळफुलाचा वृक्षच असतो. झाडावर फुललेली फुले देखिल पानांमधे दबलेलीच असतात. पण त्यांचा सुवास तो कसा लपणार. उन्हाळ्याच्या सुट्टीत साधारण साडेचार पाच च्या सुमारास ती फुले खाली पडायला सुरुवात झाली की ती वेचायला बरीच मंडळी येत असत. मी सुद्धा एकदा दोनदा गेलो आहे. आणि त्यात वरून पडणारी फुले जमिनीवरून उचलण्यापेक्षा वरच्या वर झेलणे हे लई भारी मानले जात होते. जमिनीवर पडलेली फुले पाचोळ्यात लपली / दबली जायची शोधायला लागायची त्यामुळे हे वरच्यावर झेलणे सोपे असे काहीतरी लॉजिक होते त्यामागे. पण माना वर करकरून दुखायला लागल्याची आठवण मात्र आहे.

काही जण शनिवारवाड्यात देखिल जात असत अशी ऐकीव आठवण आहे.

>>> बालगंधर्व रंगमंदीराच्या आवारात असलेली बकुळीची झाडे आठवताहेत का कुणाला अजूनही आहेत. <<< मला अतिशय पुसटसे आठवते आहे. सध्या नसावित बहुधा Sad इतकेवेळा जुन/जुलैमधे वविकरता तिथल्या कट्ट्यावर गेलो पण तेव्हा जाणवले नाही. कदाचित तेव्हा बहर नसेल.
गोंदवल्याच्या मंदिराच्या आवारात बकुळीचा एक वृक्ष होता (१९७८) (अजुनही असेल), तिथे फुले वेचल्याचे आठवते .

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहोणे शिकण्याचे केलेले अनेक प्रयत्न चांगलेच लक्षात आहेत.
दोन वेळा महाराष्ट्र मंडळात, एकदा गोपाळ हायस्कूलच्या तलावावर आणि सरते शेवटी जिथे शिकलो तो टिळक तलाव.

ममंमधला पूल म्हणजे जरा मोठा हौदच अर्धा भाग स्लॅब खाली अर्धा बाहेर. तिथे पोस्टमनच्या तेलाचे डबे भोपळे / फ्लोट म्हणून दोरीने पोटाला बांधायचे. शिकवणे म्हणजे त्याची गाठ हळूच सोडायची आणि मार हात मार पाय असे जोरजोरात ओरडायचे. शिवाय तिथे एक विहीर आहे त्यातही उड्या मारायला लावायचे. मग काही जण घाबरायचे आणि त्यानिमित्ताने जो काही गदारोळ चालू असायचा त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. इथे मी तरंगायला / डॉग स्टाईल पोहायला/ विहीरीत उडी मारायला शिकलो पण ते काही खरे पोहोणे नाही. कारण किती अंतर पोहता येतय हे तपासून पाहण्याची सोयच नव्हती. इथल्या लोकांना विहीरीत मुटके मारून पाण्याने वर काठावर असलेल्यांना भिजवायचे हा एक छंदच होता. (उडी मारताना पायांचा एका विशिष्ट प्रकारे आकॄतीबंध बनवून उडी मारली असता आपल्या पायांमधून पाणी खूप वर उडते ह्याला मुटके मारणे म्हणतात)

गोपाळ हायस्कूल मधे पुर्ण बंदीस्त पूल होता. इथे माझा एक काकाच शिकवायचा पण माझे आणि त्यापूलाचे काही जुळले नाही. मी बहुतेक वेळा दांड्याच मारल्या होत्या. त्यामुळे शिकलोच नाही. ( गो हा पूलाची सद्यस्थिती काय आहे माहीत नाही, कोणाला माहीत असेल तर पुरवावी)

टिळक तलाव हा खरोखरच (बांधून काढलेला पण) तलावच होता. डेक्कनवरच्या अनेक चिरेबंडी वाडया बंगल्यां करता वापरलेला दगड इथल्या खाणीतून काढलेला आहे अशी आठवण सांगतात. इथे पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत ( छोटा केल्यानंतर अजूनही) टिळक तलावावर नूतनीकरण करायच्या अगोदर तिथल्या तलावाची लांबी ऑलिंपिक करता असलेल्या तलावाच्या लांबी पेक्षाही जास्त होती. त्या पाण्यात एक कासव होते. मासेही होते म्हणे. इथे दुसर्‍या पुणेरी तिसर्‍या मजल्यावरूनही उडी मारायची सोय होती. दुसर्‍या मजल्यावरून एक घसरगुंडी देखिल होती. इथे मी लांबवर अंतर पोहायला आणि ब्रेस्टस्ट्रोक प्रकारे पोहोणे शिकलो.

>>>टिळक तलावावर नूतनीकरण करायच्या अगोदर तिथल्या तलावाची लांबी ऑलिंपिक करता असलेल्या तलावाच्या लांबी पेक्षाही जास्त होती.

मला एकदा बळंच एक्स्ट्रा म्हणून शाळेच्या स्विमिंग टीम मध्ये घातले होते. मला तेव्हा कुठल्याही खेळात गती नव्हती. तरी मला त्या टीम मध्ये का घेतले आणि मी का गेले हे माहित नाही. पण मला सध्या २५ मीटरच्या पुलात पोहायची प्रॅक्टिस होती. आणि त्यातसुद्धा एकदा जाऊन परत आल्यावर ४ फुटात दम खात बसायचं.

टिळक टॅंक मध्ये होती स्पर्धा. मी शाळेची लाज काढली.

आता मी पोहण्यात हुशार झाली आहे. पण ते दिवस कसे परत येतील?

आमच्या पोहायच्या सुखात गोपाळ हायस्कुलच्या जलतरण तलावाचा मोठा वाटा आहे. स.प. चा तलाव परवडायचा नाही. शाहु कॉलेज पाशी जनता बेक्कार असायची, तलावातच घाण करायची वगैरे. सारसबागेच्या जवळ नेहेरु स्टेडीयमसमोर एक मनपाचा तलाव झाला होता तो सुरुवातीला छान होता पण नंतर तोही बिघडला. त्यामुळे गोपाळचा तलाब बेष्ट. ५ फुट ८ फुट पाणी असेल. नुसता दंगा. गोपाळ अजुन बहूतेक चालु आहे.

गोपाळमध्ये भजी तळावीत तशी मुले पोहायची.
बालगंधर्व बकुळीचे झाड आठवते मला.
टिळक तलाव भारी होता. एक किलोमीटर रोज पोहायचो आम्ही तेव्हा.

संभाजी बागेत एका पिंजर्‍यात मोर होते.
मधल्या गेटासमोर असलेल्या कारंज्यामागे असलेल्या जागेत दर गुरुवारी किंवा आठवड्यातल्या कोणत्या तरी एका वारी बँड वादनाचा कार्यक्रम असायाचा.
बालगंधर्वच्या बाजू च्या गेट जवळ लहान मुलांकरता खेळायाची जागा / खेळणी (घसर्गुंडी , झोपाळे, जंगलजिम वगैरे) होती. जिथे आता पोहोण्याचा नांदे तलाव आहे.
पाकीस्तान बरोबरच्या युद्धात जिंकलेले रणगाडे / विमान महापालिकेला मिळालेले तेव्हा त्यातला एक संभाजी बागेत आणला होता त्यावेळी तो
आतल्या रस्त्यावरून चालवताना उमटलेले ठसे चाकाच्या पट्ट्यांचे ठसे अनेक वर्षे तसेच होते.

त्यातले एक विमान कमला नेहरू पार्कात तर एक श्री शिवाजी मिलेटरी प्रिपेरेटरी शाळेत ठेवण्यात आले. त्यावेळी एस एस पी एम एस ही फक्त शाळा होती. आता बरीच कॉलेजेस वगैरे झाल्येत

इथे मी लांबवर अंतर पोहायला आणि ब्रेस्टस्ट्रोक प्रकारे पोहोणे शिकलो.>>मी पण. पाण्यात ग्लाइड करणे, पाठीवर उताणे पडून पोहणॅ. आणि वरचे आभाळ बघणे, अचानक पाउस आल्यास त्यात पाण्यातूनच भिजणे. डॉ, खलपांची मिसेस माझ्या मैत्रीणीची आई. त्यांच्या प्रोत्साहनाने आम्ही दोघी बरोबर स्विमिन्ग ला जात असू. ह्याच्या पुढे गल्ली क्रमांक दोन मध्ये एक अपार्ट मेंट आहे जल तरंग बहुतेक त्याच्या पुढे एक दुमजली इमारत होती. वर लेडीज होस्टेल समोर काही बारकी घरे व खाली एक रिकामा हॉल तिथे कत्थकचे क्लासेस संध्याकाळी असत. तिथे आम्ही दुपारी दोन वाजता इंग्रजी शिकायला जात असू. पाटसकर नावाचे वयस्कर सर होते. कवळी लावून सायकल वरून येत. पँटला सायकलच्या क्लि पा
वगैरे लावून. छान इंग्रजी शिकवत. ह्या हॉल मध्ये एक च कपाट व बाकी सतरंज्या होत्या. व कपा टा वर एक रशिअन बबुश्का डॉल होती. ती मला खूपच आवडे. ती कायम उघडून बघायची आणि परत ठेवायची. जलतरंग मध्ये एक भावे म्हणून मैत्रीण होती. ह्यांचे जीवन अतिशय परफेक्ट मला वाट्त असे. म्हणजे तो तसा त्या लोकेशनला फ्लॅट एक भाउ बाबा इंजिनिअर व पाचवारी साडी नेस्णा री हसरी गोड आई.
कधी स्नॅक्स बनवून आणायचे असतील तर ब्रेड उपम्याला सुद्धा ब्रेडचे तुकडे एकसारखे क्यूब कात्रीने कापलेले असत. आम्ही अजागळ पणे हाताने तोडून भुस्सा करून पण फोडणीस टाक्णारे. ह्यांचे बाबा फिरत असत व गंम्तीच्या गो ष्टी घेउन येत. एक सिगरेट होल्डर गोल जो अर्धा उघडला की गोल फिरे व संगीत वाजे, ह्यांच्याकडे चांगली म्युझिक सिस्टिम, घराला पडदे, पेल्मेट्स, सोफा वेग्ळी ड्राइन्ग रूम व किचन असा अगदी डॉल हाउस सारखा किस्सा होता. इंग्रजी संगीताच्या रेकॉर्ड ती कधी कधी लावत असे. इतके राजस जगणे. कधी हेवा नाही वाटला पण नवलाई होती.

>>>> आता मी पोहण्यात हुशार झाली आहे. पण ते दिवस कसे परत येतील? <<<<
>>> झाली आहे ? की झाले आहे?::अओ:
अन "हुशार" झाले आहे का "पारंगत" झाले आहे? :घोर विचारग्रस्त चेहरा: :घोर चिनुक्साची "वाटग्रस्त" चेहरा :
वाटग्रस्त = वाट पहाणारा Proud

>>>> कधी हेवा नाही वाटला पण नवलाई होती. <<<<< अगदी अगदी.....
हेवा वाटून न घेणे ही शिकवण अंगी भिनलेली होती, कारण आज हेवा वाटेल, उद्या असूया, मग मत्सर, अशी मनाची अधोगति चालुच होईल, त्यामुळे मुळात अमक्या तमक्या कडे अमुक आहे याबद्दल नवलाई जरुर वाटायची पण आपल्याकडे नाही याबद्दल हेवा नाही वाटायचा.
नंतरच्या काळात मात्र "नाहीरे वर्गाची" असुया/मत्सरास अधिक्रुत समाजमान्य भडकाऊ रुप देण्याच्या प्रयत्नात अन आहेरे/नाहिरे वर्गातील दरी अजुन रुंद करण्याच्या नादात, आमच्या पिढीची ती हेवा वाटून न घेण्याची खासियत नाहीशी झाली बहुधा.
किंबहुना, "आम्हीही तुमच्या पेक्षा काही कमी नाही आहोत" हे दाखविण्याची अत्यंत घातक अहमहमिका समाजातील सर्व आर्थिक स्तरांवर सुरू झाली.

>>>>अन "हुशार" झाले आहे का "पारंगत" झाले आहे? :घोर विचारग्रस्त चेहरा: :घोर चिनुक्साची "वाटग्रस्त" चेहरा :
वाटग्रस्त = वाट पहाणारा

बापरे! हे काय करून बसले मी? "झाली आहे" हा गूगलचा टायपो आहे.
पण पुढचं माझंच अज्ञान. मी चिनुक्सला प्रत्यक्ष भेटून, "मी जेवण बनवते" हा वाक्यप्रयोग सुद्धा केला आहे.
त्यावर शाब्दिक छडी मिळालेली आहे, भास्कराचार्य आणि चिनुक्सकडून.

>>> "मी जेवण बनवते" हा वाक्यप्रयोग सुद्धा केला आहे. त्यावर शाब्दिक छडी मिळालेली आहे, भास्कराचार्य आणि चिनुक्सकडून. <<< आँ? यात काय चुक आहे?
मग काय "मी जेवण शिजवते, मी जेवण भाजते, मी जेवण करपवते, मी जेवण उकडवते, मी जेवण तिखट/खारट करते " असले काही म्हणायचे अस्ते का? Proud

मी चिनुक्सला प्रत्यक्ष भेटून, "मी जेवण बनवते" हा वाक्यप्रयोग सुद्धा केला आहे.
त्यावर शाब्दिक छडी मिळालेली आहे, भास्कराचार्य आणि चिनुक्सकडून.>> कसली लोभस कबुली आहे सई Happy

इतके राजस जगणे. कधी हेवा नाही वाटला पण नवलाई होती.>> अमा, पुलंचं चौकोनी कुटुंब आठवलं Happy

टिळक पुलाबद्दल खूप ऐकलंय, पहायचाय एकदा जाऊन.

स्वयंपाक चुकत नाहीत तो बिघडतो. वाचा आता सगळे भाग
अवांतर पुरे!

आठवणीतल्या पुण्याबाबत अजून एक गोष्ट म्हणजे ब्रिटीश लायब्ररी
मला इथले सदस्यत्व केवळ मी विद्यार्थी असल्याने मिळाले होते. अन्यथा त्या करता सहा-आठ महिने ते वर्ष असा कालावधी लागत असे म्हणे.
त्या काळी लायब्ररीमधे लहान मुलांचा / व्हिडीयो सेक्शन आलेला नव्हता. अभ्यासाच्या विषयाची व इतरही भरपूर पुस्तके असत. तिथेच वरच्या मजल्यावर काही पुस्तके केवळ संदर्भाकरता वाचायला मिळत. त्यांना घरी घेऊन जाता येत नसे. पुस्तकातल्या पानांच्या प्रती तिथल्या तिथे काढण्याकरता फोटोकॉपी मशिनही होते ही सोय त्याकाळी भार्री मानली जात असे.

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर लायब्ररीच्या आधी इंग्रजी मासिकांचे जुने अंक , जुनी पुस्तके विकायला ठेव लेली असत. तिथून काही नॅशनल जिओ ग्राफिक चे अंक विकत घेतल्याचे आठवते आहे. इंटरनॅशनल बुक स्टॉलच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी त्याच्यासमोरही एक विक्रेता बसत असे.

लकडी पुलाच्या खंडुजी बाबा चौकाच्या बाजूला अंधलोकांची काठी ज्यात रात्री लाईट लागत असे. बहुदा पुना ब्लाईंड मेन्स असो ची जाहिरात होती ती त्याबाजूला असेच जुनी पुस्तके विकणारे विक्रेते बसत असत.

लक्ष्मी रस्त्यावर देखिल सुरुवातीस डाव्या हाताला लाकडी देव्हारे वगैरे विकण्याचे दुकान होते त्या फूटपाथवर स्त्री मासिकाचे जुने १९३७ सालचे अंक मला मिळाले होते. त्यात ल्या एका अंकाच्या मुखपॄष्ठावर एका माणसाने ओढा / नदी ओलांडताना एका स्त्रीस उचलून घेतले असे चित्र होते त्याच्या पुढच्या दोनेक महिन्यांत त्या चित्रावरून चर्चा गदारोळ उठलेला होता. एका अंकात सावरकरांचाही लेख होता.

Pages