डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही वर्षापूर्वी माझे वडिल पोटदुखीने बरेच त्रस्त झाले होते. अ‍ॅलोपॅथी, आयूर्वेदीक, होमीओ सगळे करुन झाले. पोट दुखायचे काही थाम्बेना. ( मी पुढे डॉकची नावे बदलत आहे, त्याना पण त्रास नको आणी माझ्यासकट इतराना पण नको) आमचे फॅमिली डॉक बाबान्चे अगदी जवळचे मित्र बनले होते. बाबा प्रत्येक गोष्ट त्याना सान्गायचे. या डॉ न्चे नाव आपण विजय समजुया. तर त्यानी दुसरे डॉक सुचवले, डॉ. सन्जय. हे हृदय रोग तज्ञ असले तरी यान्च्या हॉस्पिटलमध्ये दुसरे पोटाचे, नाक-कान घशाचे असे तज्ञ भेटीला आठवड्यातुन एकदा यायचे. तर त्या पोटाच्या तज्ञ डॉकना बाबानी तब्येत दाखवली. डॉ नी ( त्यान्चे नाव आपण अमर समजु) बाबान्ची सोनोग्राफी केली व निदान केले की बाबाना अल्सर झालाय. आता अल्सरचे बरेच प्रकार आहेत, बहुतेक त्यानी ड्युओडनल अल्सर सान्गीतला होता. मग ते येत राहीले, बाबाना अल्सरवरची अनेक औषधे घ्यावी लागली. पोट थाम्बत नव्हते ते वेगळेच. अल्सरमुळे पथ्ये आली.

घरात स्वयम्पाकात तिखट-मीठ अगदी हळदी- कुन्कु आपण देवाला वहातो ना तसे वापरले गेले. मग शेवटी एकदा देवालाच दया आली. डॉ. ( फॅमिली) कडे पुण्यात केई एम मध्ये इन्टर्नशीप करणारे एक डॉ ( यान्चे नाव सुदीप समजु) आले, ते डॉना काका म्हणायचे. तेव्हा बाबानी त्याना सर्व सान्गीतले, आमचे फॅमिली डॉ म्हणाले आता तूच काय ते बघ. मग त्यानी केईएम मध्ये आमच्या सराना येऊन दाखवा असे सान्गीतले. तेव्हा त्या मेन डॉ. नी बाबाना तपासले. त्या डॉकनी बाबाना, डॉ. सुदीप बरोबर पुण्यातले प्रख्यात सोनोग्राफी तज्ञ डॉ. किनरे-रहाळकर यान्च्या लॅबमध्ये पाठवले. तिथे तपासताना ते डॉ. माझ्या बाबाना आणी डॉ. सुदीपना चिडुन म्हणाले की कुठल्या गाढवाने यान्ची सोनोग्राफी केली? नक्की तो डॉ आहे का? कारण बाबान्च्या सोनोग्राफीत अल्सर सापडलाच नाही. तर पिताशयात खडे आणी अपेन्डीक्स प्रॉब्लेम दिसला. त्या डॉकनी बाबाना लगेच अ‍ॅडमीट व्हायला सान्गीतले. ते म्हणाले की पित्ताशयाचे ठीक आहे, पण अपेन्डीक्स त्रासदायक ठरेल. त्यान्चे बरोबर निघाले. ओपरेशन करताना त्या मुख्य डॉकना पोटात सडलेले अपेन्डिक्स आढळले. ते म्हणाले हे पोटातच फुटले असते तर जीवावर बेतले असते.

बाबा नीट बरे झाले. पण आमचा ३ वर्षे जो या अल्सरच्या औषधावर, सोनोग्राफीवर ( त्या वेळी ७ ते ८ वेळा सोनोग्राफी केली त्याची प्रत्येक वेळेस ३०० रुपये घेतले गेले) जो खर्च झाला, सगळ्याना जो मनस्ताप झाला त्याचे काय? मान्य आहे की डॉ. सर्वज्ञ नसतात, पण या डॉ ला सोनोग्राफीचे जर नीट ज्ञान नव्हते तर यानी त्यात हात घालावा कशाला? आमची आर्थिक परिस्थिती मध्यम होती. बाबा तर एक वर्ष बीनपगारी घरी होते. वरीष्ठानी सर्व साम्भाळुन घेतले. आलेल्या म्हणजे मॅच्युअर झालेल्या विमा पॉलिसीवर आमचे घर चालले. माझी कॉलेज फी भरताना पण प्रॉब्लेम आले, लोक म्हणाले की इ बी सी ( Economical backward Class) फॉर्म भरा. पण बाबा नको म्हणाले. बाबा त्या डॉ वर केसच टाकणर होते, पण आमचे फॅमिली डॉ व आम्हाला मदत करणारे दुसरे डॉ नको म्हणाले म्हणून तो विचार सोडुन दिला.

मला एकच म्हणायचे आहे की आम्ही खरच डॉ ना देव मानतो, डॉ. हे माणुस आहेत, त्यान्च्या कडुनही चूका होऊ शकतात हेही मान्य. पण मग ज्यातले आपल्याला खरच ज्ञान नाही, अशी मशीनरी वापरुन लोकान्च्या जीवाशी का खेळावे? निव्वळ पैशासाठी? या डॉ ना मी भेटले तेव्हा त्यान्च्या बोलण्यातुन तुच्छता स्पष्ट जाणवत होती. असे २- ३ च डॉ मला भेटलेत. बाकी भेटलेले, उपचार करणारे सर्वच डॉ हे माणुसकीला जपणारे आहेत. पण हे असले २- ३ नग पूर्ण डॉक्टरी पेशाला बदनाम करतात याचे वाईट वाटते.

माझ्या २ बहिणी, १ भाची डॉक्टर आहेत. वरचे सगले वाचून वाईट वाटले. ही लि़ंक वाचायला सांगते त्यांना. माझ्या मते निदान माबो करंचे जे नातेवाईक डॉ. आहेत त्याणा थोडे ब्रिफ करा या लिंकविषयी. केवढे सारे अनुभव आहेत, अजूनही असतीलच. इथले द्डॉ वाचत असतीलच.

छान आवडीचा विषय आहे.
डॉक्टर हा देव आणि दैत्य दोन्हीही भासू शकतो.
अर्थात त्याच्याकडे जाताना मी त्याच्यात देवच बघत जातो, कारण माझ्या आईच्या लॉजिकनुसार डॉक्टरवर पुर्ण विश्वास ठेवला, असला, तरच त्याच्या उपचारांचा गुण येतो.
किस्से बरेच आहेत, चांगले वाईट दोन्ही .. लिहेन सावकाश.. आधी ईतरांचे वाचून घेतो

मला फसवायच्या इंटेन्शनने आलेले असे लोक आजकाल ओळखू येतात, अन मी १००% अ‍ॅडव्हान्स घेतल्याशिवाय अशांचे ऑपरेशन करीत नाही. कारण माझे चॅरिटेबल हॉस्पिटल नाही.>>>>>:फिदी: दिमा, माझ्या हसण्याचे कारण मी नन्तर लिहीते. तेव्हा गैरसमज नसावा.

निल्सन, तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल वाईट वाटलं.यातून गेले असल्याने ते सर्व परत अनुभवलं:(.
पुण्यातही एक प्रसिद्ध क्लीनिक आहे, डॉ कॉम्प्लेक्स केसेस यशस्वीपणे हाताळण्याबद्दल प्रसिद्द आहेत.(डॉ बद्दल कोणतीही तक्रार नाही, ते त्यांच्या फील्ड मध्ये बेस्ट आहेत. पण असे बेस्ट डॉ निवडताना आपल्याला त्याना प्रचंड वेटिंगचा वेळ द्यावा लागतो.मी पहिल्यांदा गेले होते तेव्हा ऑफिशियली 'यु आर प्रेग्नन्ट' शिक्कामोर्तब होण्यासाठी नंबर लावून चार तास बसले होते, राजा हिन्दुस्तानी हा प्रदीर्घ पिक्चर वेटिंग हॉलमध्ये पूर्ण पाहून झाला.(नंतर जायची वेळच आली नाही कारण दीड महिन्यात मिस्कॅरीड. Sad
पुढच्या वेळी दूसरे डॉ गाठले, पहीले चांगले होते पण प्रत्येक कंसल्ट ला तीन तास वेटिंग जमणार नव्हतं.
मिस कॅरिज बरेचदा बाळातील नैसर्गिक दोषामुळे होतात, बऱ्याच जणींची होतात ई. डॉ नी बरेच समजावूनही 'कोणाचं काय चुकलं, काय करता आलं असतं' हा रूट कॉज अनालिसिस बायका बरेच वर्षं करतातच.:(

बट द वुमन नीड्स टु मुव्ह ऑन.

मी शाळेत असताना ( ८-९ वीत) एक नवीन सर्जन आमच्या इथे आले. नवीनच दवाखाना त्यानी बराच लाम्ब उघडला होता. ( एक बन्गला भाड्याने घेऊन त्याचे हॉस्पिटल केले) आधी ते एकटे आले कारण मुलगी लहान असल्याने कुटुम्ब आले नव्हते. आमच्या घरमालकीण बाईना त्यानी जेवायची सोय कुठे होईल का हे विचारले. पण मालकीणबाईनीच आपल्या घरी त्यान्ची सोय केली कारण काकुन्ची आर्थिक परीस्थिती खराब होती. डॉ आणी घरमालकीण दोघेही शाकाहारी ( आम्ही पण ) असल्याने त्याना बरे झाले.

एकदा डॉ जास्त पैसे घेतात म्हणून लोकानी स्थानिक पेपरमध्ये कटकट केली. डॉ आमच्याशी खूप चान्गले बोलायचे, तेव्हा त्यानी सान्गीतले की एकदा त्यान्च्याकडे एक वयस्कर माणुस पोटात जखम घेऊन आला. बरेच खोल जखम होती. डॉ नी ऑपरेशन केले मग दोन दिवस पेशन्ट उपचार व ड्रेसिन्गकरता अ‍ॅडमीट होताच. मग त्याचे नातेवाईक आले आणी म्हणाले की आज पेशन्टला घेऊन जातो. डॉ म्हणाले एवढे पैसे झालेत ( फी व ऑपरेशन खर्च) ते भरा आणी त्याना उद्या सकाळी घेऊन जा. डॉ. सन्ध्याकाळी घरी आले. एकच पेशन्ट होता आणी रात्रपाळीला एक मुलगा असायचा. तो आणी त्याचे मित्र असायचे पहाटेपर्यन्त कारण तो शिकत होता.

दुसर्‍या दिवशी तो मुलगा धावत डॉ कडे आला आणी म्हणाला की काल रात्री त्या जखमी पेशन्टचे नातेवाईक आले आणी पैसे न देताच गेले. मेन गेट बन्द होते तेव्हा या महाभागानी आपल्या नातेवाईकाला ( पेशन्टला ) भिन्तीवरुन उडी मारुन पळायला लावले. आणी नन्तर तोन्ड दाखवलेच नाही. आता भिन्तीवरुन उडी मारल्याने त्याचे पोटाचे काय झाले असेल देव जाणे.

मग या डॉ नी दुधाने तोन्ड पोळल्याने आधीच पैसे मागायला सुरुवात केली तर मग चूक काय? आणी असे इरसाल लोक आम्ही पाहीले आहेत.

पुण्यातल्या मध्यवर्ती पेठेत असलेल्या एका लहान मुलांच्या हॉस्प. चा अनुभव.
निओआयसीयूमधे माझी मुलगी होती जन्मल्यावर ५ दिवस. १२०० ग्रॅम वजन. (मला ७वा महिना लागतानाच आययुजीआर डिटेक्ट झाल्यामुळे माझ्या डॉकनी पुढे उद्भवू शकणार्‍या सगळ्या गुंतागुंतींची कल्पना दिली होती. अमायनो सलाईन्सवर (चक्क!) ३५ आठवडे कॅरीऑन करू शकले आणि ३५.२ जेस्टेशन असताना डॉकनी सगळी परिस्थिती बघून, सोनोलॉजिस्ट डॉकशी बोलून मग सीझर केलं. अर्थातच आदल्या दिवशी मला अ‍ॅडमिट करून घेताना आम्ही दोघं आणि आम्चे दोघांचेही आई-वडील यांना नीट सगळं समजावून सांगितलं. हे गायनॅक हॉस्प माझ्या घराजवळ आहे, आणि इथे लहान मुलांचा वॉर्ड नसल्यामुळॅ आम्ही पेठेतल्या हॉस्प मधे मुलीला अ‍ॅडमिट केलं.)

जन्मानंतर अर्ध्या तासात बाळाला पेठेतल्या या प्रसिद्ध इत्यादी हॉस्प मधे आणलं गेलं. ५ दिवसांनी मला डिस्चार्ज निळाल्यावर मी तिथे गेले. "तुम्ही इतकं नाजुक बाळ सांभाळायला मानसिकदृष्ट्या तयार आहात का?" असं त्या डॉकनी विचारलं. अगदी हसून वगैरे. त्यांच्या मते बाळ फिट आहे आणि आता आईअ-बाबा तयार असतील तर एन आय सी यू ची गरज नाही. बाळाचं वजन १२५०. आम्ही म्हटलं, "आम्ही तयार आहोत, पण बाळासाठे जे जास्त योग्य असेल ते करा. आमची हरकत नाही, तिला बाहेर आणून कसलाही त्रास होऊ नये" मग ५ दिवस रूमिंग इन केलं आणि घरी आलो. ७२ तासांच्या आत तिला इन्फेक्शन झालं. ताबडतोब पुन्हा अ‍ॅडमिट झालो. औषधं सुरू केली. अँटीबायोटीक्स तिला अर्थातच शिरेतून द्यावी लागत होती. ब्लडचे कल्चर रिपोर्ट्स करू हे आम्हीच सुचवलं(घरी २ डॉक आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार). त्या डॉक आधी ऐकत नव्हत्या. मग तयार झाल्या. "तुम्ही मला कोर्टात्सुद्धा खेचाल!" अशी वरकरणी हसून पण कुचकट कॉमेंट केली. आम्ही दुर्लक्ष केलं. ताप उतरल्यावर डॉकनी घरी पाट्।अवायची तयारी दाखवली. दुसर्‍या दिवशी सकाळचं डिस्चार्ज कार्ड केलं आणि नेमका सकाळी पुन्हा ताप. मधल्या ८ दिवसांत डॉक्याची सोनोग्राफी करायला सांगितली ती नॉर्मल आली. पुन्हा ताप आल्यावर पुन्ही सोनोग्राफी सांगोतली तर पुन्हाही केली, नॉर्मल आली. सोनोलॉजिस्टच म्हणाले शेवटी, की "त्यांना (डॉ़कना) सांगा, काही शंका असेल, गंभीर वाटत असेल तर एम आर आय करा. सोनोग्राफी अजून तीनदा केलीत तरी निदान होणार नाही". एव्हाना आम्हीपण त्या सगळ्या टेस्ट्स, त्यासाठी वारंवार एव्हाना वजन १३०० ग्रॅमच्या बाळाला त्रास देणं याला कंटाळलो होतो. यात आम्ही सांगित्लयावरच सगळ्या टेस्ट्स होत होत्या. स्वतः डॉक काहीही निर्णय घेत नव्हत्या. शेवटी एम आर आय केलं. आजार गंभीर होताच, आणि घाईघाईने एन आय सी यू मधून बाहेर काढल्यामुळे झाल्याचं अनेक डॉकनी सांगितलं. मधल्या काळात सेकंड ओपिनिअनसाठी नवर्‍याने दीनानाथ, केईम वगइरे हॉस्प मधल्या डॉकना तिची फाईल दाखवली होती. "उगीच घाई केलीत. राहिली असती अजून एन आय सी यू मधे तर आजारी नसती पडली" असं सगळे म्हणाले. खरंतर आम्ही अजिबात घाई केली नव्हती, पण "मानसिक तयारी आहे का?" अशा प्रश्नाला मी ५ दिवसांची बाळंतीण काय उत्तर देऊ शकणार होते हे माहिती नाही. तरीही, असा गंभीर आजार होईल याची त्या डॉकना तरी कशी कल्पना येणार म्हणून काहीसे गप्प बसलो. (खरंतर कल्पना असायला हवी होती. कारण प्रिमॅचुरिटी संबंधीचे सगळे फलक तिथे लावलेले होते!!) असो.

एवढं होऊनही तिच्या वॅक्सिन्सना आम्ही तिथे जात होतो. अतिअतिशिस्त, मोजून ५ मिनिटांचाच वेळ हे त्रासदायक वाटत होतं. जिवावरच्या आजारातून मुलगी उठली, पण तिचे माईलस्टोन्स कधीच तपासले गेले नाहीत. जस्ट कॅजुअली "ती अमुक करते का... तमुक करते का..." असे फक्त प्रश्न विचारून आम्हाला वाटेला लावलं जात असे. शेअटी एका वॅक्सिनच्या वेळी संयम संपला. ते वॅक्सिन उपलब्ध नव्हतं. एका वेळी तीन होती. मग जे नव्हतं ते वॅक्सिन जर आठवडभरात मिळत असेल तर एकत्र तीन्ही देऊ म्हणून "अंदाजे कधी मिळेल ते वॅक्सिन सांगू शकाल का?" असं विचारलं. त्यावर अत्यंत उर्मटपणे " काही सांगता येत नाही. कंपनी देईल तेव्हा येईल! (हे आम्हालाही कळत होतंच की! पण तुम्ही एवढी वर्षं हा पसारा चालवताय तर निदान अंदाज तरी देऊच शकता ना! Angry ) कदाचित एक महिना, सहा महिने किंवा एक वर्षही लागू शकतं वॅक्सिन मिळायला!" हे उत्तर ऐकून आम्ही मागेही वळून न बघता तिथून निघालो. पुन्हा कधीही तिथे गेलो नाही.

महत्त्वाची गोष्ट, नंतर जिथे जायला सुरूवात केली तिथे त्या डॉकनी (डॉ. तोष्णिवाल) फाईल बघून "हा जुना चार्ट फॉलो केलाय. नवीन चार्ट वेगळा आहे. अपडेट केलं पाहिजे होतं!" असं म्हटलं. Sad
नशिबाने त्यांनी सगळी फाईल स्वतः अपडेट केली. कोणतंही इण्जेक्शन दिल्यावर त्याचा टॅग फाईलवर लावणं बंधनकारक आहे हे आम्हाला नवीन समजलं. त्या हॉस्प मधे असा कोणताही टॅग कधीही लावला गेला नाही. शिवाय इंजेक्शनचे भरमसाठ पैसे, नुसते टॉचायचे ४००, तपासणी (जी अगदी कॅजुअली होत असे) ४०० असे एका वेळी किमान ३००० रुपये बिल होई.

वाईट्ट अनुभव!

निल्सन, तुझा अनुभव खरंच भयानक आहे. माझा अनुभवः सानपाड्याला एकदा हेवी ब्लिडींगसाठी नंबर वगैरे काही न लावता एका पूर्ण नवीन डॉक्टरकडे गेले असता रिसेप्शनिस्टने ताबडतोब असा पेशंट आल्याचं डॉक्टरांना आत जाऊन सांगितलं. डॉक्टरीण बाई बाहेर वेटींग एरियामध्ये आल्या आणि मला काय होतंय वगैरे व्यवस्थित विचारून त्यांनी ट्रीटमेंट दिली.

प्रज्ञा, तुझा अनुभव देखील तितकाच भयानक आहे. एन आय सीयु मध्ये अजून काही दिवस ठेवायला त्या डॉक्टरांना काय प्रॉब्लेम असतो म्हणे!! Angry

मानव एक सान्गायचे राहीले. बाबाना त्या डॉ नी इन्डोस्कोपी करायला सान्गीतली होती. त्यात काहीच आढळले नाही. बेरीयम मिल्क पण केली, त्यातही काही नाही म्हणून त्यानी सोनोग्राफीतुन अल्सर आहे असे सान्गीतले. जे झाले ते झाले पण त्या डॉनी जे उपचार केले त्यानी काही फरक पडला नाही. शेवटी एक्सपर्ट ते एक्सपर्टच.

आणखीन एक डॉ आहेत. माझ्या मैत्रिणीचे वडील. त्यानी आता प्रॅक्टीस बन्द केली. त्यान्चे उपचार आणी निदान अतीशय उत्तम असायचे. पण स्वभाव अतीशय फटकळ आणी गर्विष्ठ. फार उद्धटपणे बोलायचे ते. शेवटी आम्ही त्यान्च्याकडे जाणे सोडले. पण वैद्यकीय ज्ञान अतीशय उत्तम. वाईट वाटते या गोष्टीचे की ते फटकळपणा मुळे खूप मागे पडले. लोक जाईनासे झाले त्यान्च्याकडे. कारण डॉ चा एक सहानूभुतीचा शब्द देखील पेशन्टची अस्वस्थता पाव पटीने कमी करतो.

निल्सन

काय हॉरीबल अनुभव आहे....आणि निर्लज्ज डॉ आहेत.

हेच मला म्हणायचे आहे. पेशंट हा तुमचा क्लायेंट आहे.... पण त्याला नका हो दुर्लक्षित होवु देवु.

बरोब्बर उलटा अनुभव मला ठाण्यातिल डॉ. गायतोंडेंचा आला. माझ्या ओव्हरीयन सीस्ट च्या ऑपरेशन च्या वेळी इमर्जन्सी आली म्हणुन त्यांच्या हॉस्पिटल ला फोन केला, तर नर्स ने त्यांचा मोबाईल नं देवुन फोन करायला सांगितला. शनीवार ची रात्र होती. ११ वाजलेले होते. मी त्यांना फोन करताच, "तुम्ही कुठे रहाता" असे त्यांनी विचारले. मी त्यांना सांगितले की मी लुईसवाडीत रहाते, त्या बरोबर ते म्हणाले" माझा बंगला तिकडेच आहे. ताबडतोब घरी या!!!"

आम्ही गेलो, तर घरीच त्यांनी मला तपासले. आणि पुढली ट्रीट्मेंट निश्चित केली.

एक पूर्वीचा अनुभव.

१७ वर्षांपुर्वी सासरे पंखा साफ करताना स्टुला वरुन पडले. घरात कोणीच नव्हते. त्यांना त्यांच्या उजव्या मनगटाला इजा झाली आहे ह्याची जाणीव झाली. आमच्या जवळच डॉ. कामत ह्यांचा दवाखाना आहे. सासरे तेंव्हा ठाण्यात नवखे होते. शेजारच्या वैद्य आजोबांबरोबर ते डॉ.कामत कडे गेले. तिकडे गेल्यावर डॉ. सरळ म्हणाले... " काका फ्रॅक्चर आहे.... मनगट तुटलय.... गेला तुमचा उजवा हात..." माझ्या सासर्‍यांना तिकडेच चक्कर आली. वैद्य आजोबा त्या डॉ. वर सॉल्लिड चिडले. पेशंटशी नीट बोलायला काय होतं वगैरे वरुन डॉ.आणि त्यांचा वाद झाला. त्या वैद्य आजोबांचा मुलगा म्हणजे ठाण्यातले प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. मिलिंद वैद्य. एकदम उत्तम डॉ. व म्रुदु बोलणारे म्हणुन प्रसिद्ध........ त्यांनी शेवटी मुलाला फोन केला. आणि मग त्यांनी सांगितल्या प्रमाणे ऑर्थोपेडिक कडे नेले.

हात २१ दिवसांच्या फ्रॅक्चर नंतर पूर्ववत झाला...... तुमची केस नाही ना... मग नीदान नीट तरी बोला. आधीच पेशंट्चे मनोधैर्य खचवुन काय फायदा.........

नंतर आम्हाला समजले की गांधी हॉस्पिटल मधे असताना ह्या कामत डॉ. कडून एका पेशंटची डेथ झाली आहे. त्यामुळे ते एम.डी. ऑर्थोपेडिक असले तरी प्रॅक्टीस करु शकत नाहीत.कारण पेशंटच्या नातेवाईकांनी केस जिंकली होती. त्यांची डॉ. बायको दवाखाना चालवते. हे कधी कधी तिकडे असतात. नेमके आम्हाला भेटले!!!!

दिमा....

शब्दात पकडु नका हो..... आम्ही काही तुमच्या येवढे मेडिकल टर्म्स मधे तय्यार नाही.... मला येवढच म्हणायचे आहे की ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.... त्यांना टेक्निकली काय म्हणतात ते मला फारसे माहित माहित नाही....... म्हण्जे एम.डी, की सर्जन... काहीही असो.... ऑर्थो मधे पोस्टग्रॅज्युएट येवढे समजले.

येवढे कडवट का झालात..... इकडे ज्या डॉ. ना शिव्या घातल्या आहेत त्या सगळ्यांचे वकिल पत्र घेतल्या सारखे बोलु नका हो...... आहेत माल प्रॅक्टीसेस.... कराना अ‍ॅक्सेप्ट.....

----- हे शेवटी समाजातीलच घटक असल्याने समाजात असलेल्या अपप्रवृत्तींचे प्रतिबिंब त्यात दिसणार. त्यामुळे सर्वच--- यांना दोष देता येणार.---- हेही शेवटी माणसेच असल्याने माणूस म्हणून असलेले सर्व गुणदोष त्यांच्यात असणारच आहेत.
टीप- ---- मधे डॉक्टर वकील पोलीस इ. आपापल्या गरजेप्रमाणे पेशे घालता येतील.

घाटपांडे +१

बरोबर आहे. ह्या अपप्रव्रुत्ती आहेत. पण इकडे ह्या सगळ्यांची किंमत आमचा जीवाशी खेळ करुन चुकवावी लागते......त्या मुळे फिकीर आहे.... बाकी काही नाही.

काळे पांढरे असायचेच....

आमचं सी.ए. चं प्रोफेशनही ह्याला अपवाद नाही.....

मोकिमी,
शब्दांत पकडायचं काहीच नाही. पण डिग्री तशी असेल, तर मुळातच तो डॉक्टर बोगस असण्याची शक्यता वाटली, इतकेच. कारण भारतातले एमएस किंवा डीऑर्थो असतात.

पण आम्ही सी ए चे वाईट अनुभव असा धागा काढणार नाही!
Wink

वरचे सगळे अनुभव वाचल्यावर मला खरेच वाईट वाटतेय.
या लोकांना कदाचित डॉक्टरकीचे सायन्स येत असेल पण डॉक्टरकीची कला येत नाही.

मी एम डीच्या पहिल्या वर्षाला असताना कामामुळे वैतागलेली आणि अतिशय कर्कश्य डॉक्टर होते.
पण तिसर्‍या वर्षाला येईपर्यंत सिनीयर लोकांचे पाहून पाहून अतिशय 'गोड' डॉक्टर झाले.
इतके की युनिटचे पेशंट्स डबे आणणं, दिवाळीला गिफ्ट , भाऊबीज देणं इत्यादी करू लागले. Happy

पेशंटचं शारीरिक दुखणं कमी केलं नाही तरी चालेल पण मानसिक दुखणं तरी तुमच्याकडे पाहून बरं झालंच पाहिजे.

अगदी वरची उदाहरणे पाहिल्यास-
१. वाईट/ गास्पिंग पेशंटला मी अगदी कारमध्ये किंवा अँब्युलन्समध्ये जाऊन बघून तपासते.
२. बॅड पेशंटला वेटींग रूममध्ये येऊन तपासते.
३. प्रेग्नंट पेशंट किंवा लहान बाळांबरोबर आलेल्या पेशंटाना रांगेत ताटकळत ठेऊ नये अशी स्टाफला सक्त ताकीद आहे.
४. वर बहुदा झंपी यांनी लिहिलंय शुगरचं चार्टींग वगैरे केल्याबद्दल. असे इतके कन्सर्न लोक असले की त्यांना डबल कन्सर्न दाखवते.
पुन्हा वर 'आजकालच्या जगात असं इतकं कोण करतोय हो जेष्ठांसाठी, तुम्ही एवढं करताय म्हणून तुमचा पेशंट इतका बरा आहे' असं अ‍ॅप्रिशिएशन करते.
४. इमर्जन्सीत काँटॅक्ट व्हावा म्हणून प्रिस्क्रीप्शनवर माझा पर्सनल फोन नं प्रिंटच करून दिला आहे. २४ तास सेवा.
५. मी पुढे हैद्राबाद्/सोलापूर/ बंगलोर इथे रिफर केलेल्या पेशंटला तिथून फोन करून योग्य ट्रीटमेंट्मिळतेय की नाही हे कन्फर्म करते.
६.अ‍ॅडमिट पेशंटचे दिवसातून तीनदा राऊंड आणि नातेवाईकांचे दिवसातून दोनदा काऊंसेलिंग करते.
७. 'घोडा अगर घाससे दोस्ती करेगा , तो खायेगा क्या?' हे माहित असूनही जिथे म्हणून पेशंटचे पैसे वाचतील तिथे वाचवायचा प्रयत्न करते.

एवढं करूनही काही विचित्र पेशंटचे सगेवाले भेटतात, ते पार्ट अँड पार्सल ऑफ बिझनेस म्हणून स्विकारते.:)

(आमच्या हॉस्पिटलात पण एकदोनदा मस्तं दंगे झालेत विनाकारण!)

साती
मायबोलीवर किंवा अन्य संस्थळांवर सरकारी अधिकारी / राजकारणी भ्रष्ट असतात, वाईट असतात, चुकतात असं लिहीलेलंच नाही असं शपथेवर सांगता का ? वर मोकिमी यांनी त्या डॉक्टरला शिक्षा झालेली आहे असा अनुभव नोंदवलेला आहे. इथेही त्याची काही तरी बाजू असेल ती समजून घेत बसायचंय का ? किंवा त्याला शिक्षा होण्यातही पेशंटचा मूर्खपणाच जबाबदार असावा का ?

अशाने नेटवरचे कार रिव्ह्यूज , सिनेमाचे रिव्ह्यूज, अनेक सेवांचे रिव्ह्यूज हे सर्वच बंद करावं लागेल. कुणालाही वाईट अनुभव आला तरी तुम्ही त्या फील्डमधले तज्ञ नसाल तर लिहायचे नाही असा कायदा बनवावा लागेल.

ज्यांचे वाईट अनुभव येतात त्यांच्याकडे जाताना इतरांना विचार करता येईल. काहींचे अनुभव वाचताना त्यांचा गोंधळ झालाय हे वाचणा-याला कळतच नसेल असा विचार का ? असो.

शिवजयंतीच्या बिलेटेड शुभेच्छा !

अहो कपोचे, मी या अनुभवांना चुकीचे म्हणतच नाहीये.
उलट ते डॉक्टर कसे चुकतायत ते सांगत्येय.
सिरीयसली ते डॉक्टर रूग्णांची मानसिकता समजून घ्यायला कमी पडतायत.

इलाज व्यर्थ जाऊदेत पण डॉक्टरचा प्रामाणिकपणा सार्थ होता असा विश्वास पेशंटला वाटला पाहिजे.
हे वरच्या माबोकरांच्या उदाहरणांतील डॉक्टर्स हे सगळे समजून घ्यायला का असमर्थ ठरतायत कळत नाही.

असे वाईट अनुभव इथे आलेले मला चालतील. माझ्यातही काही सुधारणा घडून येतील यामुळे.

काही अनुभव, उदा. ते बोन फ्रॅक्चर आणि सीए थायरॉईड यांत मात्र डॉक्टरांची काही चूक नाही हे स्पष्ट आहे.

असो. शुभेछांबद्दल धन्यवाद!
Happy

एक गंमत आठवली, माझ्या एमडीच्या शिक्षिका- माझ्यात डॉक्टर म्हणून काही चांगुलपणा असेल तर ८० टक्के श्रेय त्यांना जातं.
त्यांनी मध्ये सरकारी नोकरी सोडून मोठ्ठं फेमस हॉस्पिटल जॉईन केलंय.
गेल्यावर्षी सहज एक अशीच इंग्रजी पब्लिक ग्रिवन्स साईट वाचत असताना त्यांच्याविषयी 'हायली अ‍ॅरोगंट, नॉट कन्सर्न्ड अबाऊट पेशंट' अशी तक्रार वाचली.
बापरे! तक्रार का असेल तर मॅडमनी त्या पेशंटला तुमचे रिपोर्ट तुमच्या पाकिटातून स्वतः काढून द्या असं सांगितलं म्हणून.

त्या पेशंटने या 'अरोगन्स' विरुद्ध चक्कं तीन तीन तक्रारी केल्या होत्या.

मोकिमी
विपू वाचा. .

साती
इथे मायबोलीवर असंख्य डॉक्टर्स असतील. जिथे अज्ञानातून टीका झालीय तिथे वस्तुस्थिती लक्षात आणून देणं मी समजू शकतो. पण जिथे असं काहीच नाही तिथेही डॉक्टरांची काल्पनिक बाजू वकीलपत्रं घेतल्यासारखी का मांडत बसताय हे कळत नाही. उदाहरणार्थ डॉक्टरला उशीर झाला, यात अमूक झालं असेल , तमूक झालं असेल हे देण्याची काय आवश्यकता आहे ? प्रत्येक वेळी पेशंटला अजिबातच काही कळत नाही, जरा सुद्धा समजून घेत नाही असा टोन येणं गरजेचं आहे का ?

डॉक्टरांना ग्राहक हक्क संरक्षण कायदा नको आहे. त्याची कारणं काय हे मायबोलीवर सुद्धा दिसेल. मग अशी कारणं दिल्यानंतर स्वतःच स्वतःच्या प्रोफेशनमधे सुविधा कशा मिळतील हे त्यांनी पहायला नको का ? नाहीतर जंसं इलेक्ट्रॉनिक माध्यमांना स्वायत्तता दिल्याने आज त्यांचा भस्मासूर झाला तसं इथे नाही होणार का ? इथे जिवाशी खेळ आहे.

याला उपाय म्हणून रुग्णांनीच अद्ययावत ज्ञान ठेवायला पाहीजे असं सुचवणे ही परिस्थिती हाताबाहेर गेल्याची कबुली आहे का ? ग्रासंहका नको आणि सर्टीफिकेट कळत नाही म्हणून पेशटच जबाबदार हा विरोधाभास नाही का ?

रुग्णालयातून डिस्चार्ज शी संबंधित कागदपत्रं मिळावीत यासाठी दीर्घकालीन न्यायालयीन लढा द्यावा लागलेला आहे ना ? ही कागदपत्रं हॉस्पिटलची प्रॉपर्टी आहे म्हणून दिली जात नव्हती, दुसरीकडे सेकंड ओपीनियन घेतला नाही का, हिस्टरीशी संबंधित कागदपत्रं दाखवली नाहीत म्हणून पेशंटच जबाबदार. असं सगळं पेशंटवर ढकलून डॉक्टर्स कसे बिचारे, गरीब, या पेशात येणं कसं शहाणपणाचं नाही असे शेरे मारले की लोक लिहायचे बंद होतील. पण ही एक गैरसमज निवळण्याची संधी आहे असं का नाही समजत ? थेट असे धागे आम्ही काढत नाही असं म्हणणं योग्य आहे का ?

इथे अनुभव देतानाही ज्याच्या फाईल्स माझ्याकडे आहेत तितकेच मी लिहीलेले आहे . मेव्हण्याचे वगैरे अनुभव देताना त्याला विचारले नाही, त्याच्याकडे फाईल सांभालून ठेवली नसेल किंवा उद्या कुणी केस केली आणि त्याने जाऊ द्या कशाला वाढवता असा पवित्रा घेतला तर...म्हणून लिहीलेले नाही.

अनुभव येतच असतात. ते थांबणार आहेत का ?

१.'डॉक्टरला उशीर झाला असेल तर असं खालं असेल तसं झालं असेल' असं मी कुठे लिहीलंय दाखवता का?
. रूग्णाने ज्ञान अद्ययावत ठेवलं पाहिजे असं कुठं लिहिलंय मी, उलट रूग्णाला नेटवरून काही कळणे बर्‍याचदा शक्य नसते डॉक्टरनेच प्रामाणिक राहिलं पाहिजे असंच लिहिलंय.
तुम्ही किंवा तुमचे कुणीही Happy परवा अड्ड्यावर नव्हते , तुमच्या 'रूग्णाने अद्ययावत ज्ञान ठेवणे शक्य नाही , डॉ ने प्रामाणिक राहिले पाहिजे' या विधनाच्या बाजूने मी परवा रात्रभर एकटीने मोठमोठ्या आयडींशी लढा दिला. Happy

Pages