महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2015 - 17:02

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.

ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..

खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.

रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.

योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.

पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!

विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.

पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.

एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्‍यानंतर दाट झाल्या असतील.

बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.

आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.

मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?

आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.

कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."

उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.

थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.

याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?

जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.

एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.

.........

यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनीच्या बाबतीत सगळे काही जगच बोलत बसले आजवर. तो स्वतः क्वचितच बोलला असेल. कर्णधार नसताना त्याच्यातील फलंदाज सेहवागपेक्षाही स्फोटक आणि महाशक्तीशाली होता. जग तेव्हा त्याला 'धो धो धोनी किंवा माही' म्हणत असे. कर्णधार झाल्यानंतर त्याने थंड डोक्याने आणि संयमी वर्तन ठेवून भल्या भल्या मॅचेस जिंकता येतात हे दाखवले. जग त्याला 'कॅप्टन कूल' म्हणू लागले. सांघिक कामगिरीमुळे मिळालेला एखादा मोठा विजय पुस्तकात कर्णधाराच्या नावापुढे लागत असला तरीही आपण सगळे जाणतो की २०११ चा विश्वचषक विजय हा धोनीचा एकट्याचा विजय नव्हता. युवराजने त्या चषकात कमाल केलेली होती. मात्र त्या वर्ल्डकप अंतिम सामन्यानंतर पुन्हा जगच धोनीला 'ग्रेटेस्ट फिनिशर' म्हणू लागले. त्यानंतर आपण २०-२० जिंकल्यावर आणि कसोटी रँकिंगमध्ये आपण टॉप केल्यावर जग त्याला भारताचा आजवरचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणू लागले. ह्या संपूर्ण प्रवासादरम्यान महेंद्रसिंग धोनी तोच होता. त्याच्यातील स्फोटक फलंदाज कर्णधारपदाच्या आणि क्रमांक ७ च्या फलंदाजाच्या जबाबदारीमुळे झाकला जात होता. रैना, कोहली, अश्विन हे सामने जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडत असल्यामुळे धोनीच्या नावापुढे कर्णधार म्हणून विजय लागतच होते. ग्रेटेस्ट फिनिशर हा किताब पूर्णपणे योग्य नाही हे धोनी स्वतःही सिद्ध करत होता. काही ऐन प्रसंगी तो बाद होत होता.

धोनीचा वकूब आधीइतकाच होता पण जग त्याला लावण्यात येणारी विशेषणे वेळोवेळी बदलत होते.

पण तो स्वतः कधीच काही बोलत नव्हता. तो नेहमीच संयमी आणि निगर्वीपणे वागला. आणि अश्या 'की पोझिशन्ससाठी' हा स्वभाव अत्यंत कुचकामी ठरतो. ह्या नियमाला अनुसरून भारताने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये दळभद्री राजकारण आणले.

ज्या रवी शास्त्रीला स्वतः खेळाडू असताना पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून द्यायची वेळ आली होती तो समालोचक होणे हा मोठाच विनोद! त्यावर ताण म्हणजे तो मॅनेजर होणे! त्यात त्याने धोनीची पाठराखण वगैरे न करणे हे तर अगदी 'सो इन्डियन लाईक'! विराट कोहली महान फलंदाज आणि अत्यंत सामान्य माणूस आहे. रैना फलंदाजही महान आहे आणि माणूस म्हणूनही स्थिर वर्तनाचा असल्याचे दिसून येते! शास्त्रीने कोहलीची साथ द्यायचे ठरवले. आजवर धोनीने जडेजाची पाठराखण करणे हा एक वादग्रस्त निर्णय ठरला. आता शास्त्री व्यवस्थापक होणे, त्याच्या गुड बूक्समध्ये कोहली असणे आणि धोनी नसणे ह्या खास भारतीय क्रिकेटला शोभतील अश्या टाकाऊ गोष्टी सध्या घडत आहेत. पुन्हा एकदा आपण १९९० ते २००० च्या दशकात पोचणार असे वाटू लागले आहे जेव्हा एक माणूस बाद झाला की सगळे संपले असे मानले जायचे.

एक क्रिकेटवेडा देश म्हणून आपल्याला आपलीच लाज वाटायला हवी आहे की रवी शास्त्रीसारख्या बांडगुळाला आपण प्रत्यक्ष खेळातून घालवल्यानंतरही इतकी वर्षे त्या खेळाशी निगडीत ठेवलेले आहे आणि आता तर त्याच्या हातात काय वाट्टेल ती सत्ता दिलेली आहे. रवी शास्त्री हे इतर अनेक भारतीय क्रिकेटर्सप्रमाणेच भारतीय क्रिकेटला लागलेले एक मोठे ग्रहण आहे. त्यात विरट कोहली कर्णधार झाला तर सहा महिन्यांत संघात मारामार्‍या व्हायची वेळ येईल.

प्रत्येकवेळी जिंका असे कोणीच म्हणत नाही, म्हणणार नाही, पण ढळढळीत निर्णय जे गल्लीतल्या शेंबड्या पोरालाही समजतील ते तरी योग्य घ्या!

-'बेफिकीर'!

एकेकाळी वन डे सामन्यामधे रवि शास्त्री बाद झाल्यावर आम्ही सर्व (होस्टेलवर रहाणारी विद्यार्थी) टाळ्या पिटायचो, सन्घाचा विजयातील अडसर दुर झाला म्हणुन... Happy

नाही म्हणायला बेन्सन हेजेस मधे मॅन ऑफ द सेरिज आणि सोबत ऑडी मिळाली होती.

बेफी तुमची मतं पटली, - कुठेहि जिथे वारेमाप पैसा आहे, तिथे राजकारण असणारच
तसचं तुमच धोनीबद्दलच मतहि पटल, लोकांनी डोक्यावर चढवलं अथवा पाडल तरि तो आहे तसाच राहिला आहे
असे ४- ५च भारतीय क्रिकेटपटु मला तरि माहित आहेत, जे यशाच्या शिखरावर असताना पण अगदी आहे तसेच राहिले -
१. सचिन २. द्रविड ३. अनिल कुंबळे ४. लक्ष्मण ५ धोनी
पहिल्या ४ लोकांना एकामेकांची साथ होती आणी आय पी एल चा ईझी मनी हातात खेळत नव्हता, म्हणुन त्या बाबतीत धोनीला मानल पाहिजे
बाकी आपल्या देशात, क्रिकेट खेळण्याचा कमी आणी बोलण्याचा जास्ती विषय असल्यानि धोनी बद्द्ल २००० विवध मतप्रवाह असणारच

धोनी शांत राहूनच सगळ्यांना उत्तर देतोय, त्याच्या ह्या शांत चेहर्‍यामागे एक अतिशय हुशार, तल्लख आणि सेन्सिबली सार्कास्टिक माणूस लपलेला आहे.

बेफिकीर>>> अगदी शब्दाशब्दाशी सहमत.

त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही>>>>>>>>

हा अत्यंत मूर्ख पणाचा समज आहे. कोणीही खेळाडु अंतीम फेरीत हीरो बनण्याची संधी मुद्दामुन घालवणार नाही. कोहली नी रन करुन कप जिंकला असता तर त्याला जास्त फायदा झाला असता ( आर्थिक पण ).

रवि शास्त्री बद्दल अनेक बेधडक विधाने केलेली आहेत वर.
शास्त्री खेळाडु म्हणुन कसाही असला तरी गेली काही वर्ष तो BCCI च्या जवळ आहे कारण खेळाडुंना त्याच्या वर विश्वास आहे.

काहीवर्षा पूर्वी ( गांगुली, तेंडुलकर असताना ) शास्त्रीने खेळाडूंची बाजू अत्यंत उत्तमपणे BCCI च्या गळी उतरवली होती. शास्त्रीची सध्याची भुमिका खेळाडूंचा युनियन लीडर अशी आहे.

>>>शास्त्रीची सध्याची भुमिका खेळाडूंचा युनियन लीडर अशी आहे.<<<

युनियन नाही तिथे युनियन लीडर बनायचे. स्वतःला खेळवले तेव्हा देशाची कामगिरी रसातळाला नेली. आता युनियन लीडर झालाय. अंतर्गत राजकारणास कारणीभूत ठरतोय हे उघड होत आहे. वर केलेली बेधडक विधाने सौम्य आहेत. त्याने बीसीसीआयच्या गळी काय उतरवले असेल नसेल ते राहूदेत, शास्त्री शूड बी केप्ट आऊट ऑफ क्रिकेट इन द फर्स्ट प्लेस!

आणि युनियन लीडरच हवा असेल तर शास्त्री काय एकमेव पर्याय आहे का?

अजय जडेजा, अझरउद्दिन, श्रीशांत, रवी शास्त्री, सिद्धू, मांजरेकर आणि सध्या रवींद्र जडेजा ही भारतीय क्रिकेटला लागलेली ग्रहणे आहेत.

ह्यातले अझर आणि श्रीशांत सोडले तर बाकीचे अजूनही क्रिकेटशी निगडीत आहेत.

अजय जडेजा, अझरउद्दिन, श्रीशांत, रवी शास्त्री, सिद्धू, मांजरेकर आणि सध्या रवींद्र जडेजा ही भारतीय क्रिकेटला लागलेली ग्रहणे आहेत. >>> ह्यातले सिद्धु आणी मांजरेकर (संजय) खेळाडु म्हणुन ठीक होत, पण आता डोक्यात जातात. खेळताना २च्याहि देशाबाहेर द्विशतकी खेळी आहेत. मांजरेकर खेळाची कसर पळण्यात (रनिंग बीटवीन द विकेट्स) नि भरुन काढायचा मात्र
अझर खूप आवडता खेळाडू होता, पण .....
बाकी जडेजा अडनाव असलं कि बहुतेक काहि न करता टीम मधे जागा मिळतेच (आधीचा निदान एक बँगलोरची मॅच तरि खेळला होता)

रवी शास्त्री -
जरि तो १९८५ ला मॅन ऑफ द सीरीज ठरला तरि तुम्ही कोणताहि सामना पाहिलात तर पूर्ण टीम चांगली खेळली आहे, विशेषत सदानंद विशवनाथ आणि शिवा, तसच प्रत्येक मॅच ला कोणताच फलंदाज एकटा लढला नहिये, भागीदार्‍या चांगल्या झाल्या पूर्ण सीरीज. बाकी शास्त्री ईतके चपलांचे हार कोणालाच घातले गेले नसतील

विराट कोहली महान फलंदाज आणि अत्यंत सामान्य माणूस आ<<<<< प्रचंड टाळ्या.

सीरीय्सली, तो खूप आढ्यताखोर आणि छोट्या मनोवृत्तीचा माणूस आहे. आणि तो भारतीय टीमम्मध्ये येऊन सुपरस्टार फलंदाज झाल्यानंतरची अवस्था नाही. अंडर १९ खेळताना पण तो असलाच होता. त्याला एक ब्लॉगर "चिरकुट कोहलि" म्हणायचा. ही डीझर्व्ह्ड दॅट नेम.

बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणामधे रवी शास्त्रीला काहीच किंन्मत नव्हती, त्यानं खेळाडूंचा तारणहार बनून ती जागा पटकावली. आणि आता त्याच्यच असल्या टिनपाट माईन्ड गेम्समुळे टीम परत फुटत चालली आहे. गांगुली आणि त्यानंतर धोणीने परिश्रमपूर्वक "टीम ईंडीया" ही एंटीटी स्ट्राँग केली होती. शास्त्री त्यावर येऊन पाणी फिरवतोय.

युनियन लीडरच हवा असेल तर शास्त्री काय एकमेव पर्याय आहे का?>>>>>>

तो त्या काळी खेळाडुंचा चॉइस होता. खेळाडुंना त्यांची बाजू मांडायला शास्त्रीच हवा होता. असे असताना, आपण कोण? आणि नावेच ठेवायची तर त्या खेळाडूंना ठेवायला हवीत ना.

<<<<<बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणामधे रवी शास्त्रीला काहीच किंन्मत नव्हती, त्यानं खेळाडूंचा तारणहार बनून ती जागा पट<<<<<>>>> हे त्याचे यश नव्हे का?

येथील प्रतिसाददात्यांपैकी कितीजणांनी ती शास्त्री चँपियन ऑफ चँपियन्स झालेली टूर्नामेंट फॉलो केली होती हे माहीत नाही. मी तरी केली होती, अत्यंत रटाळ व स्वार्थी खेळून त्याने धावा जमवल्या होत्या आणि ऑडी मिळवली होती. तेव्हा तो 'दिसायलाही चांगला असल्याने' आपल्या समाजात अपेक्षेप्रमाणेच आधीपासूनच सुपरस्टारही ठरला होता. (कोणी दिसायला चांगले असले की जगाला तो एकुणच चांगला असणार असे वाटते आणि त्यातल्यात्यात आपल्या लोकांना तर वाटतेच वाटते).

आपण संघात का होतो, काय केले आणि आपल्याला का घालवले एवढे जरी शास्त्रीने विचारात घेतले आणि लाजलज्जा बाळगली तर तो स्वतःहून निघून जाईल.

एवढे करूनही हे मान्य करायला सगळेच तयार होतील की एखादा मनुष्य खेळाडू म्हणून सुमार असला तरी व्यवस्थापक म्हणून महान ठरू शकतो. पण ह्या दिव्य रत्नाच्या आगमनानंतर संघात फूट पडल्याचे चोहीकडून ऐकून येत आहे आणि त्यावर कोणाचेही कसलेही स्टेटमेंट नाही. ही अशी मनोवस्था असलेला संघ काय दिवे लावेल? हे सगळे आत्ताच का घडत आहे? प्रथमच धोनीच्या नेतृत्वात आपण हरलो वगैरे की काय?

अजय जडेजा फलंदाजीचा कोच होण्याची वाट पाहूया चला!

बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणामधे रवी शास्त्रीला काहीच किंन्मत नव्हती, त्यानं खेळाडूंचा तारणहार बनून ती जागा पट<<<<<>>>> हे त्याचे यश नव्हे का?<<< असेनात का यश! त्यानं टीम बोंबलतेय हे जास्त महत्त्वाचे नाही का? त्यानं खेळाडूंमध्ये दुफळी माजवली हा त्याचा सर्वांत मोठा दोष आहे.त्याला यापुढे राजकारणी म्हणून महत्त्व देत खेळ गमवायचा की खेळाला महत्त देत राजकारण बाजूला काढायचे हा बीसीसीआयचा निर्णय असेल (बीसीसीआयचे आजवरचे कर्तुत्व पाहता निर्णय काय असेल ते कुणीही गेस करू शकतं)

असो. पअब्लिक फोरमवर याहून जास्त लिहिणे शक्य नाही.

कमाल आहे !

अरे प्लेअर मध्ये वाद काय शास्त्रीमुळे वर आला आहे का? त्या आधी गंभीर - धोणी, गंभीर-सेहवाग वाद ( अगदी कॅप्टन्सी द्यावी या पर्यंत) झालेले आहेत. तेंव्हा शास्त्री होता का?

शास्त्री प्लेअर म्हणून कसाही असला तरी तो व्यवस्थापक आणि समालोचक म्हणून चांगला आहे. ( तो प्लेअर म्हणून मलाही नंतर आवडत नव्हता आणि मी देखील बेन्सन अ‍ॅड हेजेस कप बघितला आहे ) उगाच तिथे वाईट म्हणून इथेही वाईट असे नसते. तसेच बिसीसीआयचे राजकारण प्लेअर मार्फत खेळले जात नसते.

धोणी कॅप्टन म्हणून वनडे मध्ये श्रेष्ट आहे ह्यात वाद नाही, पण ग्रुमींग झाली असती तर आज टेस्ट टीमचा कोहली ऐवजी गंभीर कप्तान झाला असता आणि तो कप्तान म्हणून कोहलीपेक्षा लाख पटीने चांगला आहे. तसेच तोच वनडेचाही कप्तान होऊ शकला असता. पण त्याला धोणीनेच सडवले ना? कोहली हा गंभीर वा सेहवाग सारखा नाही, त्यामुळे ही रिफ्ट लगेच लक्षात येत आहे. त्यामुळे चुक केवळ शास्त्रीची आहे, त्याने हे लावून दिले वगैरे स्वतःच्या समाधानासाठी म्हणले तर बरे, पण त्यात तथ्य नाही. गंभीर / सेहवाग वेळी कुठे होते हे सर्व? गुड बुक्स वगैरे सगळं बाहेर चांगल असतं, पण मैदानावर उपयोग नाही. आज धोणीला ड्रेसिंग रूम मध्ये टेन्शन आहे म्हणून परफॉर्म करता येत नाही असे लिहिल्या जाते, कुठे होते मग जेंव्हा सेहवाग, गंभीर , " धोणी टेन्शनमुळे " परफॉर्म करू शकले नाहीत? इनफॅक्ट वी लॉस्ट अ गुड फ्युचर कॅप्टन.

बरं धोणीच्या गेल्या २० इनिंग पाहा, (त्याने खेळलेल्या) तो चाचपडतोय हे सरळ लक्षात येईल. एकीकडे भारतीय क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलियासारखे धडक निर्णय घेतले जात नाहीत असे ही म्हणायचे आणि जर ते घेतले गेले तर लगेच तो लिजंड आहे, त्याला हात लाऊ नका असेही म्हणायचे. हा दुटप्पीपणा आहे.

हॅविंग सेड दिस - धोणीने अजून खेळावे हे व्यक्तीशः मला वाटते. त्यातील कॅप्टन अजून संपलेला नाही, पण तो हट्टी होत चालला आहे. त्याचीच टीम (उदा जडेजा) खेळवायचेच हा निर्णय भारताला खूपदा नडलेला आहे. (हे केवळ एक उदा. मध्ये मध्ये अश्विनही चालत नव्हताच. ते अलहिदा )

फक्त धोनीच्या बाबतीत बोलायच झाला तर तो एक प्लेयर म्हणुन नक्कीच टीम प्लेयर नाहि असं माझं मत आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौर्‍यात कर्णधारपद जाणार तर मी टीम मधेहि नाहि खेळणार हा अ‍ॅट्टिट्युड अतिशय वाईट
आधी त्याच्या कर्णधारपणाच्या हट्टामुळेच निवडसमितीतुन मोहिंदर ला बाहेर काढण्यातहि आलेल आहेच

तो ५० ओव्हर बाबतीत - ठीक ठाक, २० ओव्हर बाबतीत - उत्तम ते सर्वोत्तम याच्या मधे आणी कसोटी बाबतीत "फार बिहाईंड द गेम" कर्णधार आहे असं माझ मत आहे

बाकी तो टीम मधे असावाच अस काहि उरलेल नाहि आता त्याच्या खेळात, (५० ओव्हर आणी टेस्ट मधे)
तो चांगला कीपर आहे, ह्यात वादच नाहि, पण आता लिमिटेड ओव्हर्स मधे फक्त चांगला कीपर असुन जागा मिळेल ह्याची खात्री नाहि.
कदाचित बांग्ला मधे २ डाऊन येउन तो टीममधली जागा वाचवायचा प्रयत्नहि करत असेल

धोनी ज्या CSK टीम चा कप्तान आहे त्याच टीम ने IPL च्या ८ पर्वा पैकी CSK ने २ जिंकणे.......४ वेळा फायनल ला जाणे.........त्याच टीम मधील कमीत कमी ४ खेळाडू कायम भारतीय संघात असणे .........श्रीनिवासन त्याच वेळी BCCI चे अध्यक्ष असणे .........हा निव्वळ योगायोग आहे आणि भोळ्या धोनीला जे चाललंय त्याची
अगदी का SSS ही म्हणजे का SSS हीच कल्पना नव्हती असे जर कोणाला वाटत असेल तर, श्रीनिवासनच त्याचं भलं करो.

कारण ऑस्ट्रेलिया दौर्‍यात कर्णधारपद जाणार तर मी टीम मधेहि नाहि खेळणार हा अ‍ॅट्टिट्युड अतिशय वाईट
>>
असे कुठे म्हटले, त्याने सरळ निवृत्तीच घेतली, कर्णधारपद आपसूक गेले, तसेही तो सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू नव्हताच, पण असे तडकाफडकी जाणे धक्कादायक होते, ज्यात मला त्याचा अ‍ॅटीट्यूड कमी आणि राजकारणाचा भाग जास्त वाटतो.

कदाचित बांग्ला मधे २ डाऊन येउन तो टीममधली जागा वाचवायचा प्रयत्नहि करत असेल
>>>
धोनी एकदिवसीय संघातली आपली जागा वाचवतोय हि कल्पनाच भोवळ आणनारी आहे.

बरे जागा कोणापासून वाचवतोय त्या विकेटकीपरचेही नाव घ्या, मग चर्चेला मजा येईल Happy

धोनी ज्या CSK टीम चा कप्तान आहे त्याच टीम ने IPL च्या ८ पर्वा पैकी CSK ने २ जिंकणे.......४ वेळा फायनल ला जाणे.........>>

त्याच्या संघाने आयपीएलमध्ये सरस कामगिरी करणे यामागचे कारण त्याची कप्तानी तर आहेच पण तो संघच जबरदस्त आहे. रैना,अश्विन नावाचे भारतीय हिरे आहेत, मॅकुलम सारखा २०-२० मधील विस्फोटक खेळाडू आहे, आणि धोनी त्याला फुल्ल लायसन्स सुद्धा देतो, अरे त्या ब्राव्होला देखील त्याने जसे वापरले तसे कधी खुदद वेस्टईंडिजने नाही वापरले, ना वापरू शकत.

>>>शास्त्री प्लेअर म्हणून कसाही असला तरी तो व्यवस्थापक आणि समालोचक म्हणून चांगला आहे. <<<

व्यवस्थापक म्हणून चांगला आहे हे कधी ठरले? कसे ठरले?

त्याच टीम मधील कमीत कमी ४ खेळाडू कायम भारतीय संघात असणे.
>>>
हे विधान फक्त रवींद्र जडेजाबाबत लागू होते आणि तो देखील अगदीच टाकाऊ खेळाडू नाही.

बाकी आश्विन हा आजघडीचा आपला सर्वोत्तम स्पिनर आहे, पण वेळप्रसंगी धोनीने त्यालाही बाहेर ठेवलेय.

रैनाला मर्यादीत षटकांच्या खेळात तोड नाही. २०-२० चा भारतीय संघ त्याच्याशिवाय कल्पनाही आपण करू शकत नाही.

मोहीत शर्मा म्हणाल तर तो फॉर्मनुसार आतबाहेर ये जा करणारा शिलेदार आहे.

मुरली विजय हा सध्याचा आपला सर्वोत्तम कसोटी सलामीवीर आहे, सध्या तो चेन्नईमध्ये नाही, पण त्याची कसोटी संघातील जागा पक्की आहे.

खुद्द धोनीला पर्याय म्हणून आणखी कोणी विकेटकीपर असल्यास सांगा !

व्यवस्थापक म्हणून चांगला आहे हे कधी ठरले? कसे ठरले? >>. तो वाईट आहे असे तुम्ही म्हणता त्याचा आधार काय? त्याचे खेळणे? कमॉन.

ऑस्ट्रेलिया मधील पानिपतानंतर वल्डकप मध्ये टीम अचानक कशी काय बाऊन्स होते. त्याला तर तुम्ही युनियन लिडर म्हणत आहात ना? मग त्यानेच बाउंस केली असे म्हणता येईल का?

समालोचक म्हणून तो चांगला नाहीच असेच तुमचे म्हणणे असले तर त्यालाही माझी काहीच हरकत नाही.

धोणीच्या नेतृत्वाखाली पहिली सिरिज हार नाही, तर ती सिरिज बांग्लादेशाकडून हारली आणि ते पण भारतासारख्या सो कॉल्ड बलाढ्य संघाने, ते पण कॅप्टन कुल असताना. हे सगळे एकत्र केले तर कदाचित तुम्हालाही चित्र वेगळे दिसेन.

युवराज आणि धोणी हा विषय तर मी अजून छेडलाही नाही. ( म्हणजे गंभीर, सेहवाग आणि युवराज ) शिवाय धोणीचेच " सिनियर प्लेअर" स्टेटमेंट्स आठवून पहा. आज तो सिनियर प्लेअर आहे, कुणीतरी त्यालाही तसेच म्हणू शकते. इतकेच !

What goes around, comes around (पेरावे तसे उगवते), धोनी च्या बाबतीत हे सत्य ठरतय आता. द्रविड, लक्ष्मण, पासून, गंभीर, सेहवाग, युवराज पर्यंत जे काही केलं ते तो फेडतोय. निमित्तमात्र कुणीही ठरो. बाकी जडेजा, मोहित शर्मा, रैना वगैरे मडळींविषयी ईतकच की छत जितकं ऊंच असतं, तितकीच त्याच्या खाली रहाणार्यांची वाढ होते.

शास्त्रीला सचिनसकट सर्वांचाच पाठिंबा कायम राहिलेला आहे. बहुधा एक व्यवस्थापक म्हणून तो रोकठोक व राजकारणी अजेंडा नसलेला आहे असा खेळाडूंमधे विश्वास आहे - तसे वाचलेले आहे.

बेफि - १९८५ शी बर्‍यापैकी सहमत. त्याचा त्या स्पर्धेतील खेळ रटाळ होता हे खरे. पण सगळे प्रमुख संघ खेळत असताना त्यातील तो सर्वाधिक यशस्वी खेळाडू होता. युवी ने २०११ मधे मॅन ऑफ द सिरीज जिंकेपर्यंत माझ्या मते कोणत्याही भारतीयाने जिंकलेले ते सर्वोच्च वैयक्तिक पारितोषिक होते.

बेकार तरूण - तुमच्या त्या ५ खेळाडूंच्या यादीत गांगुलीसुद्धा दिसेल असे वाटले होते. तो मैदानावर आक्रमक असला तरी बाहेर कधीच काड्या नव्हत्या.

युवी ने २०११ मधे मॅन ऑफ द सिरीज जिंकेपर्यंत माझ्या मते कोणत्याही भारतीयाने जिंकलेले ते सर्वोच्च वैयक्तिक पारितोषिक होते. >>>> फा, सचिनला २००३ मध्ये मॅन ऑफ द सिरीज होते ना युवराजच्या आधी ?

केदार आणि फारेंडच्या पोस्टींना अनुमोदन.

असो. पअब्लिक फोरमवर याहून जास्त लिहिणे शक्य नाही. >>>> Happy पण अशी अर्धवट माहिती लिहून त्या पोस्टींमधून सनसनाटी निर्माण होण्याशिवाय काहीच होत नाही. ह्या निमित्ताने 'आयपीएलच्या अर्थकारणाविषयी एकदा लिहायचं आहे.' हे तू बर्‍याचदा म्हणालीस पण लिहिलं नाहीस ह्याची आठवण करून देतो. ह्या बद्दल वाचायची उत्सुकता आहे, तेव्हा लिही लवकर.

>>>युवी ने २०११ मधे मॅन ऑफ द सिरीज जिंकेपर्यंत माझ्या मते कोणत्याही भारतीयाने जिंकलेले ते सर्वोच्च वैयक्तिक पारितोषिक होते.<<<

दूरान्त,

प्रचंड असहमत!

येथे देशप्रेम, सो कॉल्ड पारितोषिकांचा प्रश्नच नाही आहे.

एक सामान्य क्रिकेट रसिक मॅच बघताना अगदी, अगदी सहज सांगू शकतो की कोण आत्ता 'पाहिजे तसा' खेळत आहे आणि कोण बकवास खेळत आहे.

रवी शास्त्री हा खेळाडू म्हणून अत्यंत सुमार होता ह्यावरच जर आता चर्चा होणार असेल तर (निदान माझा तरी) भडका उडेल Proud

कुठे युवराज आणि कुठे शास्त्री!

मला तर ही दोन नांवे एका ओळीत लिहायचीही लाज वाटत आहे.

बाप रे केदार, मी वाचलाच नाही तुमचा प्रतिसाद!

आत्ता वाचला.

>>>त्याला तर तुम्ही युनियन लिडर म्हणत आहात ना? <<<

छे छे, टोचा म्हणत आहेत. मी नाही. कृपया सगळे प्रतिसाद नीट वाचा अशी विनंती!

>>>तो वाईट आहे असे तुम्ही म्हणता त्याचा आधार काय? त्याचे खेळणे? कमॉन. <<<

नाही. माझी झेप वृत्तपत्रे आणि वाहिन्या इतकीच! ह्या सर्व ठिकाणी तो व्यवस्थापक झाल्यानंतर संघात वाद सुरू झाले असे सांगितले जात आहे.

>>>समालोचक म्हणून तो चांगला नाहीच असेच तुमचे म्हणणे असले तर त्यालाही माझी काहीच हरकत नाही.<<<

असे मी एक्झॅक्टली कुठे म्हणालो? इतकेच सांगा!

तो समालोचक होणे हाच मोठा विनोद आहे असे माझे म्हणणे होते. समालोचक, विशेषतः तज्ञ समालोचक हा समोर चाललेल्या खेळातील प्रत्येक खेळाडूच्या खेळीबाबत चांगल्या वाईट टिपण्ण्या करणे अपेक्षित असते. गावसकर पटतो. हर्षा भोगले कधीच खेळला नाही तरीही तो (समहाऊ) पटतो हेही सोडून द्या. पण शास्त्री? विशिष्ट परिस्थितीत कोणी कसे खेळावे हे शास्त्री सांगणार? ह्याला मी 'विनोद' असे नांव देतो.

कृपया !

नाही. माझी झेप वृत्तपत्रे आणि वाहिन्या इतकीच! ह्या सर्व ठिकाणी तो व्यवस्थापक झाल्यानंतर संघात वाद सुरू झाले असे सांगितले जात आहे.>>>
भारतीय संघाला वाद नवीन नाहीत. गावस्कर, कपिल यांच्यापासून (आधीपासूनही असेल) कर्णधार आणि संघातला वरिष्ठ खेळाडू यांच्यात वाद/वैर असल्याच्या बातम्या येतच आहेत.

मी तरी केली होती, अत्यंत रटाळ व स्वार्थी खेळून त्याने धावा जमवल्या होत्या आणि ऑडी मिळवली होती.
----- मी त्यावेळी क्रिकेट खेळाचा निस्सीम चहाता होतो.... खुप रटाळ खेळला होता... ऑडी नजरेसमोर ठेवुनच (शतकी) फलन्दाजी केली होती, नाबाद राहुन अ‍ॅव्हरेज वर आणले होते अशी त्यानेच नन्तर मुलाखतीत सान्गितले होते. जो स्वार्थ जगाला दिसत होता तो प्रामाणिक पणे मान्य केला...

गान्गुली आणि धोनी यान्नी आपल्याला जिन्कायची सवय लावली होती. कपिल्ने १९८३ चषक जिन्कुन सुरवात केली होती. त्याची १७५ नाबाद आजरामर खेळी आठवली तर आजही उत्साह येतो.

>>>भारतीय संघाला वाद नवीन नाहीत. गावस्कर, कपिल यांच्यापासून (आधीपासूनही असेल) कर्णधार आणि संघातला वरिष्ठ खेळाडू यांच्यात वाद/वैर असल्याच्या बातम्या येतच आहेत.<<<

श्री दुर्योधन,

हे वाक्य लिहिण्याआधी माझ्या प्रतिसादातील एक विधान कोट करण्याचा असंबद्ध प्रकार कश्यासाठी?

तुमचे वाक्य संपूर्णपणे वेगळे आहे आणि तुम्ही माझा कोट केलेला प्रतिसाद संपूर्णपणे वेगळा! Happy

>>>त्याची १७५ नाबाद आजरामर खेळी आठवली तर आजही उत्साह येतो.<<<

+१

>>>जो स्वार्थ जगाला दिसत होता तो प्रामाणिक पणे मान्य केला..<<<

म्हणून स्वार्थ माफ केला जाऊ शकणार नाही. अन्यथा हॅन्सी क्रोनिए तर आज विश्वविजेता असता. Happy

खरे तर बिचार्‍या, होय बिचार्‍या क्रोनिएने फक्त वातावरण आणि पीच कसे आहे हे अनौपचारीक गप्पांत सांगितले. त्याला कल्पनाही नव्हती की हे त्याच्या जिवावर उठेल.

इथे कैक कोटींचा देश टीव्ही बघत असताना (ओह येस, तेव्हा, त्या काळी क्रिकेट खरोखरच पॅशन होती) शास्त्री जवळपास देशविरोधी कारवायाच करत होता. Proud

असो. विषय धोनीचा आहे आणि जर शास्त्री त्याला संपवत असेल तर शास्त्रीने सांगावे की सद्यस्थितीत धोनीची जागा नेमका कोणता खेळाडू घेऊ शकेल.

(वर गौतम गंभीरचा उल्लेख आलेला आहे कप्तान म्हणून आणि त्याच्याशी मी तरी सहमत आहे बुवा)

पण हा गंभीर संघातच नाही आहे.

बेफिकीर, मला फक्त एवढेच म्हणायचे आहे कि शास्त्री आल्याने संघामध्ये वाद सुरु झालेत असे तुम्ही म्हणताय त्यात काही जास्त तथ्य नसावे. आज शास्त्रीच्या बरोबर इतरही माजी खेळाडू मार्गदर्शक आहेत. वन man आर्मी असा प्रकार नसावा...

धोनी माझ्या अगदी आवडत्या खेळाडूंच्या यादीत फारसा कधी नव्हता पण नक्कीच तो नावडत्या खेळाडूंमध्येही नाहीये.... तो आजही या घडीला सर्वोत्तम कर्णधार आहे.... त्याचे कुल असणे, नम्र असणे, निस्वार्थी असणे माझ्यासारख्या "Old school of cricket" च्या चाहत्याला नेहमीच भावत आलेय
इतक्या स्पर्धातुन इतक्या वेळेला स्वताला सिद्ध केल्यानंतर आणि संघाला सर्वोच्च शिखरावर नेउन ठेवल्यानंतरही इतके अलिप्त रहाणे सगळ्यांनाच जमते असे नाही
अजून यशाच्या पहील्या काही पायर्‍यांवरच असताना आकाशाला हात टेकल्यासारखे वागणार्‍या आणि अर्ध्या हळकुंडानेच पिवळ्या झालेल्या खेळाडूंची अपरिपक्व विधाने ऐकल्यावर तर या माणसाची उंची जास्तच जाणवते

अर्थात तो जेष्ठ खेळाडूंच्या बाबतीत जे वागला तेच त्याला परत मिळतेय वगैरे कुणी म्हणत असेल तर त्यालाही माझी काही हरकत नाही.... बर्‍याच अंशी ते खरेही आहे!
पण तेंडुलकर जेंव्हा म्हणतो की मला पाहिजे असलेला संघ मला कधीच मिळाला नाही तेंव्हा आपण त्याला सहानभुती दाखवतो पण धोनीने त्याला हवा असलेला संघ खेळवला तर तो वशिलेबाजी करतो असे म्हणणे हा दुटप्पीपणा झाला

संघात दुफळी माजण्याचा हा काही पहीलाच प्रसंग नाही..... जुन्या कर्णधाराच्या मर्जीतले असल्याने नवीन कर्णधाराकडून डावलले जाण्याची भिती वाटणारे असतात तसेच उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याच्या मानसिकतेचेही काही असतात..... हे प्रत्येक सत्ताबदलावेळी होत आलेले आहे आणि आत्ताही होते आहे

आत्तापर्यंत पॅव्हेलियनच्या चार भिन्तीत राहणारी आणि क्वचित अगदी जवळच्या आणि विश्वासू पत्रकारांपर्यंतच मर्यादित राहणारी ही गुपिते, ही वादळे आज मिडियाच्या अतिभोचकपणामुळे तुमच्या-आमच्या पर्यंत लगोलग पोहोचतायत इतकेच!

शास्त्री खेळाडू म्हणून क्वचितच कुणाचा आवडता असेल..... समालोचक म्हणून तो काही तितकासा वाइट नाही (तो समालोचन करत असताना त्याच्याकडे समालोचक म्हणून बघा.... हा कोण शहाणा असे खेळायला हवे होते, तसे खेळायला हवे होते वगैरे म्हणणे असेल तर तेंडूलकर-द्रवीड-लारा वगैरे मंडळी खेळताना तर टीव्ही म्यूटच करायला लागेल ;))
तो एक चांगला मोटीव्हेटर असावा असे विश्वचषकादरम्यान वाटून गेले आणि अर्थात बहुतांशी खेळाडूंचा त्याला असणारा पाठिन्बा बघता त्यात तथ्यही असावे!

अर्थात आत्ताच तो मुख्य प्रशिक्षक झालाय...... त्यालाही थोडा वेळ द्या!

स्वरुप | 26 June, 2015 - 22:41 नवीन

शास्त्री खेळाडू म्हणून क्वचितच कुणाचा आवडता असेल..... <<<

+१

>>>समालोचक म्हणून तो काही तितकासा वाइट नाही (तो समालोचन करत असताना त्याच्याकडे समालोचक म्हणून बघा.... हा कोण शहाणा असे खेळायला हवे होते, तसे खेळायला हवे होते वगैरे म्हणणे असेल तर तेंडूलकर-द्रवीड-लारा वगैरे मंडळी खेळताना तर टीव्ही म्यूटच करायला लागेल डोळा मारा)<<<

>>>तो समालोचन करत असताना त्याच्याकडे समालोचक म्हणून बघा..<<< का बुवा? किस खुषीमे?

>>>हा कोण शहाणा असे खेळायला हवे होते, तसे खेळायला हवे होते वगैरे म्हणणे असेल तर तेंडूलकर-द्रवीड-लारा वगैरे मंडळी खेळताना तर टीव्ही म्यूटच करायला लागेल डोळा मारा<<< Lol म्हणजे काय?

>>>तो एक चांगला मोटीव्हेटर असावा असे विश्वचषकादरम्यान वाटून गेले आणि अर्थात बहुतांशी खेळाडूंचा त्याला असणारा पाठिन्बा बघता त्यात तथ्यही असावे!<<< हे 'बहुतांशी खेळाडू' कोण कोण? Happy

तसेच, 'वाटून गेले'चा अर्थ काय? Happy

>>>अर्थात आत्ताच तो मुख्य प्रशिक्षक झालाय...... त्यालाही थोडा वेळ द्या!<<<

तो एकटाच तर आहे ज्याला त्याने काहीही बरे केलेले नसतानाही फक्त वे़ळच वेळ मिळत आहे. Happy

>>बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

अहो.... संझगिरींचे काय इतके मनावर घेताय.... ती एका मुंबईकराने दुसर्‍या मुंबईकराची केलेली पाठराखण होती Wink

ती एका मुंबईकराने दुसर्‍या मुंबईकराची केलेली पाठराखण होती
>>>>

हो अ‍ॅक्चुअली... मी बस्स धागा काढताना जो कच्चा माल हाताला लागला तो ओतला Wink

पण माझ्यामते यात आणखी काही दडलेय, जे मी धाग्यात अप्रत्यक्षपणे लिहिले आहे.

धोनीच्या मते शास्त्री+कोहली त्याचा गेम करत आहेत, आणि रहाणे जो आजवर धोनीकडून उपेक्षला गेला होता तो देखील यात सामील आहे. जर हे दोन फलंदाज नाही खेळले तर जिंकणे कठीणच. आता यातील कोहलीला बसवणे शक्य नाही, ना त्याला मागे ठेवणे शक्य आहे म्हणून धोनीने रहाणेला बसवून त्याचा प्रश्न सोडवला आणि स्वताच आता स्वताचे कर्णधारपद वाचवायचे म्हणत नाईलाजाने पुढे येऊ लागला. दोन्ही वेळा तो बरेपैकी चांगला खेळला पैकी शेवटच्या सामन्यात जिंकवून देण्यात यशस्वी झाला.

>>का बुवा? किस खुषीमे?
कारण ती दोन्ही वेगवेगळी प्रोफेशन्स आहेत...... As simple as that

>>म्हणजे काय?
म्हणजे हे की जर खेळाडूवर टिपणी करण्यासाठी खेळाडूपेक्षा वरच्या दर्जाचा खेळाडू असणे ही जर अपेक्षा
समालोचकाकडून असेल तर त्या तिघांपेक्षा वरच्या दर्जाचा फलंदाज कुठुन आणणार?

>>'वाटून गेले'चा अर्थ काय?
त्याचा अर्थ विश्वचषकाच्या मॅचेस आणि नंतर खेळाडूंच्या मुलाखती बघताना तसे वाटले होते..... आता विश्वचषक होउन गेला ना.... म्हणून वाटून गेले!

>> हे 'बहुतांशी खेळाडू' कोण कोण?
A news by Indian Express:
“You can be rest assured that BCCI top brass informally sounded out the likes of Virat Kohli and Mahendra Singh Dhoni about their view on the support staff. It has been found that Shastri is immensely popular within this current set-up and the players in general want him to continue. The current BCCI set-up wants inclusive approach and want the players to express themselves,” a BCCI official told PTI on Tuesday.

A member of the Indian team’s erstwhile support staff had said during the World Cup that Shastri’s one-on-one sessions with Shikhar Dhawan changed it all for the left-hander during the World Cup -
आणि शिखर धवनला हे सांगताना एका पोस्ट मॅच इंटरव्य्युमध्ये मी ही ऐकलय

>>रहाणे जो आजवर धोनीकडून उपेक्षला गेला होता तो देखील यात सामील आहे. जर हे दोन फलंदाज नाही खेळले तर जिंकणे कठीणच

ऋन्मेष, तुला खरेच असे वाटते की रहाणे असे काही करेल म्हणून?..... मी आजवर जेव्हढे त्याला फॉलो केलेय त्यावरुन मला असे अजिबात वाटत नाही की तो असल्या काही (जर असलेच तर) राजकारणाचा भाग होईल..... आपण बरे आपला खेळ बरा टाईप्सचा खेळाडू आहे तो!

अतिसामान्य खेळाडू किंवा टेस्टमध्ये कधीच न खेळलेला माणूस उत्कृष्ट प्रशिक्षक असल्याची अनेक उदाहरणं इतिहासात आहेत. ऑस्ट्रेलियन टीमचा कोच जॉन बुकॅनन हे चटकन आठवणारं उदाहरण. अर्थात त्या ऑस्ट्रेलियन टीमला राहुल गांधी कोच असता तरी ते जिंकलेच असते हा भाग वेगळा! सध्याच्या ऑस्ट्रेलियन टीमचा कोच डॅरन लिहमनही खेळाडू म्हणून फार ग्रेट वगैरे नव्हताच, पण कोच म्हणून त्याची कामगिरी चांगलीच आहे. त्यामुळे शास्त्री कितीही सामान्य खेळाडू असला तरी चांगला कोच होणारच नाही हा मुद्दाच चुकीचा आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे संघात दुफळीचा आणि धोणीच्या कामगिरीचा!

धोणीची कसोटीतून अचानक निवृत्ती हीच मुळात खूप उशिरा आली होती हे माझं स्पष्टं मत आहे. निवृत्त होण्यापूर्वीच्या काही मालिकांमध्ये बॅट्समन आणि कॅप्टन म्हणून तो कन्सिस्टंटली फेल होत होता. केवळ कॅप्टन आहे म्हणून तो टेस्ट टीममध्ये टिकून राहिला होता ही वस्तुस्थिती नाकारण्यात काही अर्थ नाही.

वनडेमध्येही गेल्या कित्येक सामन्यांमधून तो चाचपडतानाच दिसत होता. वर्ल्डकपच्या आधीही आणि नंतरही! परंतु वनडे आणि टी २० मध्ये त्याला आणखीन २-३ वर्षे खेळणं सहज शक्यं आहे. प्रश्न आहे तो फॉर्मचा!

विराट कोहलीवर वर्ल्डकपच्या दरम्यान होत असलेली टीकाही काही अंशी अनाठायी आहे. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट सिरीजमध्ये कोहली जबरदस्तं फॉर्ममध्ये होता. वर्ल्डकपला त्याचा फॉर्म गळपटला पण हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं, त्यामुळे कोहलीने मुद्दाम विकेट फेकली हा दावा निव्वळ मूर्खपणाचा आहे. वर्ल्डकप जिंकणं हे कोणाही प्लेयरचं स्वप्नं असतं. सचिनने ते २२ वर्ष उराशी बाळगलं होतं!

आजच्या घडीला निव्वळ फॉर्मचा विचार केला तर धोणीला वन डे मध्ये पर्याय उपलब्ध होऊ शकतोही. अर्थात बॅट्समन म्हणून ते धोणीइतके धोकादायक ठरणार नाहीतही कदाचित, परंत पर्यान नाहीतच असं नाही. संजू सॅमसन हे चटकन आठवणारं नाव! निव्वळ विकेटकिपींगचा विचार केला तर आदित्य तरे, वृद्धिमान सहा हे आणखीन ऑप्शन्स.

राहणे हा साधा-सिधा आणि अजिबात राजकारणाच्या भानगडीत पडणारा माणूस नाही हे मी खात्रीने सांगू शकतो कारण मी त्याला पर्सनली ओळखतो. हा दावा निव्वळ बिनबुडाचा आहे.

शास्त्री खेळाडू म्हणून यथा-तथा होता हे सर्वसामान्य चाहते आणी त्याची आकडेवारी, दोन्ही सांगतील. समालोचनातला 'नाट्य' हा भाग सोडला तर तो जे समोर दिसतं किंवा जे 'ऑबव्हियस' असतं तेच सांगतो आणी त्यामुळे फार काही व्हॅल्यू अ‍ॅड होत नाही असं माझं मत आहे. पण तो मॅनेजर म्हणून कसा आहे, ह्या बाबतीत काही मत नाही देता येत.

Pages