संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया

Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19

आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...

त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.

त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .

हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वाचला लेख. चांगला आहे. इथे माबोवरच शास्त्रज्ञ महिला आहेत. महिलांचे पोस्ट डॉक्टरल वर्क करायची वेळ आणि मुले जन्माला घाल ण्यासाठी बायोलोजिकली पर्फेक्ट वेळ साधारण एकाच रेंज मध्ये येते त्यामुळे असे होत असेल का? २५ - ३५ वय? त्या वयात संसार थाटून तो ही नीट सेट व्हायची फेज, मुले लहा न असण्याची फेज असते. शास्त्रज्ञ बनण्यासाठीची मानसिक एकाग्रता व वेळ तेव्हा देता येत नसावा. व मग संधी हातातू न गेली असे होत असावे का? ह्या फेज मध्ये लायक कँडिडेट ला योग्य तो सपोर्ट मिळाल्यास ती नक्की चांगली काम करून दाखवू शकेल. असा माझा विश्वास आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात जश्या रजा वगैरे असतात तश्या शास्रज्ञाना मिळतात का?

तशी विमेन फ्रेंडली पॉलीसी बनवली तर हे प्रमाण वर जाईल.

बाकी ५०% बौद्धिक कॅ पिटल बद्दल अनुमोदन.

धन्यवाद अमा
होय. आता मी / माझ्यासोबत शिकत असलेले माझे मित्र मैत्रिणी ह्यांचाच उदाहरण घेतलं तर सध्या आम्ही ३ऱ्या / ४ थ्या वर्षात आहोत वय २० - २१ त्यांनतर मास्टर्स न करता थेट PhD केली तरी त्यासाठी किमान ५( ६ धरू ) सो आम्ही २७ वर्षांचे होणार . त्याआधी कोणाचीच लग्न वगरे इच्छा / मानसिक तयारी नाहीये . साधारण त्या काळात लग्न केलं तरी tenure मिळवण्यासाठी post doc किमान २ तरी हव्या त्यात ३ वर्षे म्हणजे आमची तिशी उलटून गेलेली असेल. त्यामुळेच रोहिणी mam म्हणतात तसंच होतंय. हा जगभरातला प्रश्न आहे.
ह्यासंदर्भात UK मधील शास्त्रज्ञ महिला विचारमंथन करून अनेक योजना राबवताहेत ( हे अर्थात मला mam नी गप्पांच्या ओघात सांगितलं होतं . ( STEM Fields )

कॉर्पोरेट क्षेत्रात जश्या रजा वगैरे असतात तश्या शास्रज्ञाना मिळतात का? >> बहुदा मिळत असाव्यात. नुकत्याच माझ्या एक prof काही महिन्यांच्या रजेवर गेल्यात .

इतरांची मतही जाणून घ्यायला आवडतील .

त्या लेखात आणि अमा आणि लीलावतीने लिहिलेली लग्न-मुलं-संसार हे एक मोठ्ठं कारण आहेच आहे या सगळ्यामागे. ते बहुतांशी करिअरिस्ट मुलींच्या मार्गात असणारे शर्यतीतले अडथळे असतात. त्यांच्याबरोबरचे शर्यतीतले पुरुष स्पर्धक सहसा अशा अडथळ्यांविनाच पळत असतात (याला अपवाद असतात, बघितलेले आहेत पण ते अपवाद नियम सिद्ध करण्याइतपतच प्रमाणात असतात - निदान भारतात तरी)

दुसरा आणखी एक मुद्दा म्हणजे नोकरदार करिअरिस्ट आणि संशोधक यांच्या कामाच्या स्वरूपात मूलभूत फरक असतात. कितीही तणावाची, जास्त तासांची असली तरी बहुतेक नोकर्‍या ऑफिसमधून घरी आल्या की त्या दिवसापुरत्या संपतात. शिवाय नोकरीचे तास-जबाबदार्‍या-रजा-मोबदला ही गणितं सहज समजण्यासारखी असतात. संशोधनाचे स्वरूप मात्र वेगळे असते. एकतर नोकरीचे/ प्रोजेक्टचे/ विद्यार्थी म्हणून डिपार्टमेन्टमधले काम करायचे तास संपले तरी काम संपत नाहीच. २४x७ असं काम असतं. नोकरीचं संपलं तरी वैयक्तिक व्यावसायिक लिखाण, वाचन हे संपत नाहीच. दिवसभरात काहीही इतर कामं केलीत तरी मागे डोक्यात सतत एक ट्रॅक कामाचा चालू असतो. शिवाय कायमस्वरूपी नोकर्‍या सगळ्यांनाच मिळतात असं नाही. त्या मिळायला वेळ लागतो. त्या नोकर्‍या जगात कुठेही असू शकतात, आपल्याला हव्या त्या सोयीच्या शहरात (विशेषतः लग्न झालेलं असेल तर त्या नवर्‍याच्या, सासरच्या दृष्टीने सोयीच्या) नसूच शकतात. शिष्यवृत्ती, विद्यावृत्ती, प्रोजेक्ट्सवर कामं असं करत करत शिडीवरून वरती चढायचं असतं. यात कामाचे तास फिक्स्ड नसतात. शिवाय त्या तुलनेने मोबदला मिळतोच असं नाही. इतर नोकरदार लोकांच्या तुलनेत बघत/मापत असणारे घरचेदारचे लोक ही परिस्थिती, ही वेळ-काम-मोबदला-नोकरीची संधीची गणितं समजूच शकत नाहीत... या सगळ्यामुळे कुटुम्बामधे असह्य तणाव निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे समाजाची जशी घरसंसार-लग्नं-मुलंबाळं या बाबतीत मानसिकता बदलायची, प्रबोधन करायची गरज आहे तशीच संशोधन म्हणजे इतर नोकर्‍यांपेक्षा वेगळे असते, मोबदला कितीही असला/नसला तरी ते २४x७x३६५ असं आयुष्य आहे (हो आयुष्यच, फक्त काम नव्हे) हे समजावून सांगायची, प्रबोधनाची आणखीच गरज आहे.

हे कामाच्या स्वरूपाचे प्रश्न पुरुषांनाही सोडवावे लागतात, पण त्याची तीव्रता इतकी नसते. मुळात अजूनही बहुतांशी ठिकाणी बायकांची नोकरी ही 'अ‍ॅडिशनल' म्हणूनच गणली जाते. त्यात मग संसार-मुलंबाळं (होणं/असलेली सांभाळणं)-सणसमारंभ-नातेवाईक-आलेगेलेले अशा सगळ्या 'अतिमहत्वाच्या जबाबदार्‍या' फाट्यावर मारायला लावणारा हा पेशा बायकांच्या बाबतीत कोण सहन करणार?

सामाजिक शास्त्रं असोत किंवा नैसर्गिक्/भौतिक इ.इ. परिस्थितीत उन्नीसबीस फरक असेल. पण मूळ लढा हा सामाजिक मानसिकतेशीच आहे.

वरदाताई खूपच मुद्देसूद आणि छान पोस्ट आहे . अगदी मनातलं लिहिलंय. धन्यवाद .

२४ X ७ विचार , मनन चिंतन । नाही म्हटलं तरी दमावणारे असते . आणि स्वत:ला सतत अद्ययावत ठेवण्यासाठी प्रचंड वाचन !

सामाजिक शास्त्रं असोत किंवा नैसर्गिक्/भौतिक इ.इ. परिस्थितीत उन्नीसबीस फरक असेल. पण मूळ लढा हा सामाजिक मानसिकतेशीच आहे. >>> +१०००

वरदा चांगली पोस्ट !! लेखही सुंदर!!

महाराष्ट्रासारख्या राज्यात आजही ७०% स्त्रिया घरी असतात. तेव्हा आजही खूप प्रयत्न केले तरी स्टॅटीस्टीकली पुढील १० वर्षे तरे परिस्थिती बदलणार नाही.

लग्न-मुलं-संसार
हेच पुरुषांच्याहि आयुष्यात असते. असेहि अनेक पुरुष असतील ज्यांना बायका पोरांच्या हितासाठी संशोधन न करता पैशाच्या मागे धावावे लागत असेल.
लग्न, संसार, मुले हे करूनहि संशोधन जमत नसेल तर काहीतरी सोडावेच लागते. ते सोडण्यासाठी पुरुषाला पत्नीकडून जास्त सहाय्य अपेक्षित असते. त्याच न्यायाने स्त्रीला पण पुरुषांनी जास्त मदत केली पाहिजे, ज्यायोगे तिला संशोधनास हवा तेव्हढा वेळ देता येईल. असे झाले तरच लग्न, संसार, मुले, संशोधन एव्हढे सगळे जमेल. तरी अजून पैशाचे काय हा प्रश्न उरेलच. कारण अजूनहि संशोधनात पुरेसा पैसा मिळेल याची खात्री नाही.

बरोबर, अनेक पुरुष ही संशोधन सोडतात पण मूळातच संशोधन क्षेत्रात इतके पुरूष आहेत की थोडे सोडून गेले तर क्षेत्रातील त्यांच्या टक्केवारीवर जास्त फरक पडत नाही. संशोधन क्षेत्रात महिला येण्याचे प्रमाणच इतके अल्प आहे की थोड्या महिला सोडून जाण्याने फार जास्त प्रमाणात गळती दिसून येते.

झक्की , मान्य आहे .
सीमंतिनी >> + १

एक गंमत म्हणून थोडीशी अनौपचारिक आकडेवारी देते . आमच्या (१०० वर्षे जुन्या ) भारतीय विज्ञान संस्थेत गेली कित्येक वर्षे भौतिकशास्त्र विभागात केवळ एकमेव प्राध्यापिका ( full professor ) होत्या . सध्या गणिताच्या विभागात केवळ एकाच नुकत्याच जॉईन झालेल्या एक assistant prof आहेत . अशी अनेक departments आहेत आणि प्रत्येक विभागात किमान २० प्राध्यापक तरी असतील.
PhD विद्यार्थी आणि [पोस्ट docs ह्यांची संख्या तशी समाधानकारक आहे हे मात्र खरे !

टक्का तसा अजूनही खूप कमी आहे .

पण मुळात नवर्‍याला त्याच्या करिअरमधे साथ न देणार्‍या (भारतीय) बायका दुर्मिळच असतात. ते गृहितच धरलेलं असतं. आणि ते बायकोच्या कर्तव्यांमधे गणलं जातं. घरसंसार आघाडी पूर्णपणे बायकोवर टाकली तरी समाज फारसा काही म्हणत नाही. पण बायकोच्या नातेवाईक-गृहकृत्यदक्ष संसार अशा आघाड्यांना काट देऊन करायला लागणार्‍या पेशासाठी/करिअर साठी नवर्‍याने पाठिंबा दिलाच पाहिजे अशी काही सक्ती नसते. मग तो नवरा 'बिचारा' असतो. बायको कुगृहिणी, कुपत्नी असते. बहुतेकवेळा त्या समाजाचं दडपण एवढं होतं आणि त्यातच मोठ्या झालेल्या नवर्‍याचं कंडिशनिंग - किमान त्याच्या आईवडलांचं - की त्या रेट्याच्या विरुद्ध उभे रहाताना निम्म्याअधिक संशोधक बायका करिअरमधे बॅकसीट स्वीकारतात, किंवा सोडून देतात किंवा घरीदारी कलह निर्माण झाल्याने अगदी रंजीस येतात.

आजच लोकसत्तात चतुरंग पुरवणीत 'त्याग हाच प्रेमाचा पासवर्ड' आहे नामक स्फुट आलंय. अगदी प्रातिनिधिक आहे. घरसंसार सांभाळण्यासाठी एमेस्सी बायकोने बीकॉम नवर्‍याला करिअरमधे साथ दिली - प्रमोशनसाठी स्वतःच्या नोकरीत आवश्यक असलेली पीएचडी घरादाराच्या सुखशांतीसाठी न करता नवर्‍याला घरदार सांभा़ळून पाठिंबा दिला.
विथ ड्यू रिस्पेक्ट (आणि वैयक्तिक चॉईसचा आदर ठेवूनही) मंगला नारळीकरांचं उदाहरण आहेच - मला त्यांच्या त्या निर्णयाचं होणारं उदात्तीकरण कधीच झेपलेलं नाही (की यशस्वीपणे घरची आघाडी सांभाळली, मुलींना मोठं केलं, नवर्‍याच्या करिअरला मोकळीक दिली, इ.) जोपर्यंत अशा उदाहरणांचे गोडवे गायले जातात तोपर्यंत परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलणं शक्य आहे असं वाटत नाही.

जोपर्यंत अशा उदाहरणांचे गोडवे गायले जातात तोपर्यंत परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलणं शक्य आहे असं वाटत नाही. >> वाह!!! पण त्या आता वयस्कर आहेत. त्यावेळ्च्या परिस्थितीनुसार (डे केयर, सॅलरी, बाहेर फूड इ ऑप्श्न्स) त्यांचे निर्णय घडले.
वर्स प्रोब्लेम इज - पण आजही परिस्थिती (डे केयर, सॅलरी, बाहेर फूड इ ऑप्श्न्स) बदलेली नाही त्यामुळे त्याच प्रकारचे निर्णय घेतले जातात. ही एक चिकन-एग सायकल होवून बसली आहे.

सीमंतिनी, त्यांची पिढी वेगळी होती हे मान्य असलं तरी त्याच पिढीतल्या, त्यांच्याहून मोठ्या असणार्‍याही, लग्न-संसार करून संशोधन करणार्‍या स्त्रिया बघितल्या आहेत. तेव्हा अगदीच अशक्य वगैरे होतं त्या पिढीला असंही काही नाहीये.
त्यांचा निर्णय त्यांच्यापुरता बरोबर असेलही, फक्त गेल्या काही वर्षांत वाचनात आलेल्या दोनतीन मुलाखती, लेखांमधे त्याचे गोडवे, उदात्तीकरण दिसलं जे पटलं नाही. दोष त्यांचा नाहीये तर त्या मुलाखतकार आणि लेखकांचा आहे.

लेख विचार करायला लावणारा आहे.
वरदाने जे वर मुद्दे लिहिले आहेत, त्यांना + १
माझ्या क्षेत्रात अजून एक मोट्ठा फॅक्टर म्हणजे विचित्र/अनप्रेडिक्टेबल कामाच्या वेळा, आणि बायोलॉजीकल मटेरियलवर काम करण्याची मानसिक /शारीरीक क्षमता. खूप बायकांची तयारी नसते अशा रिस्क घेण्याची, किंवा कदाचित घरुन सपोर्ट नसावा. शिवाय फिजीकल काम /लॅबवर्क प्रचंड असतं.
मी पीचडी नंतर २ पोस्टडॉक केलेत. एक स्टेम सेल रिसर्च मधे आणि दुसरं लंग कॅन्सर रिसर्च मधे.
संशोधन हे खुपदा 'संधी' वर अवलंबून असते. त्या संधी, तुमच्या क्षेत्रात चांगलं काम करणार्‍या लॅब्स ह्या तुमच्या गावात्/नवर्‍याच्या/ कुटूंबाच्या गावात असतीलच असं नाही. त्यामुळे लग्नानंतरही वेगळ्या ठिकाणी राहणं, आठवडाभर काम करून विकेंडचे ४८ तास फॅमीली, मित्र, सोशल अ‍ॅक्टीव्हीटीज ही सगळी कसरत अनुभवून झालीये माझी.
कधीकधी तुमच्या कामामुळे तुम्ही त्या शहरातल्या संधींसाठी 'ओव्हरकॉलीफाय' होता, आणी अशावेळी तुम्हाला बेटर संधीसाठी बाहेर जावं लागतं किंवा तडजोड करावी लागते. ह्या सगळ्यासाठी किती जणींना कुटुंबाचा, इनक्लूडिंग नवर्‍याचा पाठिंबा असतो मनापासून , न कुरकुर करता, न टोमणे मारता ह्यावर खूप अवलंबुन असतं. शिवाय कितीही नाही म्हणलं तरी कुठेतरी 'आपण कुटुंबाला वेळ देत नाही आहोत' हे गिल्ट कुरतडतच. ह्या सगळ्या पायर्‍या ओलांडून पलीकडे पोचणं खूप अवघड आहे, पण जमू शकतं त्या त्या पायरीवर डीटरमिनेशन दाखवलं तर. पण फार कमी जणी ह्या सगळ्यापुढे 'टिकाव धरू शकतात'.

वरदाने लिहिलं आहे तसं संशोधन हा ८- ६ जॉब नाही… ते तुमचं आयुष्य होतं. सतत डोक्यात मागे ट्रॅक चालू असतो.
शिवाय ह्या क्षेत्रात काँपीटीशन वरून जाणवली नाही, तर प्रचंड आहे. आणि आमचं फील्ड तर प्रचंड वेगाने पुढे जातंय. त्यामुळे सतत नवीन काय चालू आहे, नवीन टेक्नॉलॉजी काय, ती वापरता कशी येईल ह्याबद्दल वाचन चालू असावं लागतं. कितीही शिकलेले असलात, तर दर चार दिवसांनी नवीन काही शिकावं लागतं अशी अस्वस्था आहे, त्यामुळे ह्या सगळ्याला लागणारा वेळ, शक्ती, मानसिक इनव्हॉल्व्हंमेंट सांभाळून शिवाय कुटुंब, मुलं, संसार, सामाजिक अ‍ॅक्टीव्हीटीज जमण खरंच तारेवरची कसरत आहे. अगदी नवर्‍याचं, कुटूंबाचं सहाय्य असलं तरीही.

आमच्या फील्ड मधे कामाच्या वेळा हा एक प्रचंड मोठा फॅक्टर आहे. लाइव्ह/बायोलॉजीकल सँपल्स असल्याने आयुष्य ' टायमर' वर चालतं, आणि एकदा चालू केलेला प्रयोग मधेच थांबवता येत नाही. विषेश्तः डिसकव्हरी आणि डेव्हलपमेंट स्टेजेस मधे काम करताना. हे असं आयुष्य स्वीकारणं, स्वतः स्त्रीनी आणी घरच्यांनी गरजेचं आहे.
शिवाय एक संशोधक म्हणून रोजच्या कामाच्या ठिकाणी 'निगेटीव्ह रीझल्टस/ निराश होण्याचे प्रसंग' असण्याचे दिवसच जास्त असतात. वर्षभर काही न घडता काम करत राहिलं की कुठेतरी आशेचा किरण दिसल्यासारखं थोडं यश दिसतं. ह्या सगळ्याचा तुमच्या मूडवर, मानसिकतेवर परिणाम होतो आणि तो नुसता लक्षात घेणं आवश्यक नाही तर समजून घेणंही आवश्यक आहे.

१६-१८ तासाचे प्रयोग करुन, घरी येऊन परत स्वयंपाक करणं, घरची कामं, कुटुंब सांभाळणं अशी अपेक्षा करणंच योग्य नाही, स्त्रीकडून घरच्यांनी आणि त्याही पेक्षा खुद्द स्त्रीने स्वतःकडून.

लीलावती, लेखाची लिंक इथे दिल्याबद्दल धन्यवाद. चांगला लेख आहे.

- खूप बायकांची तयारी नसते अशा रिस्क घेण्याची...
- कितीही नाही म्हणलं तरी कुठेतरी 'आपण कुटुंबाला वेळ देत नाही आहोत' हे गिल्ट कुरतडतच.
- त्यामुळे ह्या सगळ्याला लागणारा वेळ, शक्ती, मानसिक इनव्हॉल्व्हंमेंट सांभाळून शिवाय कुटुंब, मुलं, संसार, सामाजिक अ‍ॅक्टीव्हीटीज जमण खरंच तारेवरची कसरत आहे. अगदी नवर्‍याचं, कुटूंबाचं सहाय्य असलं तरीही.
- त्याही पेक्षा खुद्द स्त्रीने स्वतःकडून.
>>>>>

रार, हे सगळे मुद्दे लिहिल्याबद्दल धन्यवाद ! तुझ्या पोस्टीच्या आधीच्या काही पोस्टी बघता असं चित्र उभं रहातं की सगळ्या बायका संशोधन करण्यासाठी अगदी तयार उभ्या आहेत, पण नवरा, मुलं, समाज त्यांच्या हातापायांत बेड्या घालून त्यांना संशोधन करण्यापासून परावृत्त करत आहेत. ( ह्यावर भाऊंना एक व्यंग्यचित्र काढायला सांगायला हवं.. :))

मुळ लेखातही लेखिकेने मुलं, संसार, प्रापंचिक जबाबदार्‍या हा 'एक' मुद्दा आहे असं लिहिलं आहे. शिवाय 'गळती का होते?' ह्या भागात..
"१) या बौद्धिक भांडवलातील गुंतवणुकीचा अपव्यय थांबविणे. २) पीएच.डी करूनही शास्त्राचा मार्ग सोडून देणाऱ्यांची संख्या कमी करणे आणि ३) त्या क्षेत्रात राहणाऱ्या स्त्रियांचा संशोधन संस्था, विद्यापीठे यात व विज्ञानातील राष्ट्रीय धोरणांच्या बाबतीतील चर्चामध्ये नेतृत्वपदी तसेच निर्णय घेण्याची जबाबदारी असलेल्या पदांवरील सहभाग कसा वाढेल याचा विचार करून ते अमलात आणणे. "
ह्या तीन गोष्टींची गरज आहे असं लिहिलं आहे. ह्याविषयची इथल्या स्त्री संशोधकांची मतं किंवा अनुभव काय हे वाचायला आवडलं असतं/ आवडेल.

पण मुळात नवर्‍याला त्याच्या करिअरमधे साथ न देणार्‍या (भारतीय) बायका दुर्मिळच असतात. >>>> 'साथ देणे' ह्यात नक्की काय काय धरलं आहे ते माहित नाही. पण नवर्‍याच्या कामाच्या विचित्र वेळा, नेहमीच्या नोकरीपेक्षा असलेले कमी स्थैर्य तसेच कमी आर्थिक मिळकत ह्या बद्दल खुष नसलेल्या बायका आणि त्यामुळे त्यांच्यात उडणारे खटके, नसलेले समाधान, त्यामुळे दोघांनाही होत असलेला मानसिक त्रास वगैरे वगैरे केसेस अजिबात नसतात असं आहे का? (असे प्रॉब्लेम सैन्यात काम करणार्‍यांच्या आयुष्यातही असतात हे जवळच्या उदाहरणांवरून पाहिलं आहे...) ह्यात बायकोचा दोष आहे असं म्हणत नाहीये. पण परिस्थितीमुळे असमाधानी असणं / रहाणं हे 'साथ न देणे' ह्यातच मोडेल ना ?

विथ ड्यू रिस्पेक्ट (आणि वैयक्तिक चॉईसचा आदर ठेवूनही) मंगला नारळीकरांचं उदाहरण आहेच - मला त्यांच्या त्या निर्णयाचं होणारं उदात्तीकरण कधीच झेपलेलं नाही (की यशस्वीपणे घरची आघाडी सांभाळली, मुलींना मोठं केलं, नवर्‍याच्या करिअरला मोकळीक दिली, इ.) जोपर्यंत अशा उदाहरणांचे गोडवे गायले जातात तोपर्यंत परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलणं शक्य आहे असं वाटत नाही. >>>> ह्या यादीत सुधा मुर्तींनाही घाला. एकीकडे मुलगी आहे म्हणून नोकरी नाकारली जात आहे हे बघितल्यावर त्यांनी थेट जेआरडी टाटांना पत्र लिहील्याची गोष्ट सांगितली जाते आणि दुसरीकडे इन्फोसिसची स्थापना झाल्यावर त्यांच्यासारख्या कर्तबगार व्यक्तीकडून 'आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की मी घरची जबाबदारी घ्यावी' असंही सांगितलं जात. हे समहाऊ पटत, रूचत नाही.

झक्कींच्या पोष्टीलाही अनुमोदन..!

तुझ्या आधीच्या काही पोस्टी बघता असं चित्र उभं रहातं की सगळ्या बायका संशोधन करण्यासाठी अगदी तयार उभ्या आहेत, पण नवरा, मुलं, समाज त्यांच्या हातापायांत बेड्या घालून त्यांना संशोधन करण्यापासून परावृत्त करत आहेत. ( ह्यावर भाऊंना एक व्यंग्यचित्र काढायला सांगायला हवं.. स्मित) >>> समजलं नाही, कारण संशोधन आणि स्त्रीया या धाग्यावरची आणि या विषयावरचीही माझी मायबोलीवरची ही वर लिहिलेली पहिलीच पोस्ट असावी.

वाक्यरचना चुकली, तुझ्या पोस्टीच्या आधीच्या पोस्टी असं म्हणायचं होतं.. आता बदललं आहे.. Happy

आणि भगवती नाही लीलावती >>> Lol ऑफिसमधलं एक नाव चुकून इथे लिहिलं.. हे पण बदललं आहे.

महिलांना इतर सामान्य चाकोरीबद्ध नोकरी /काम वगैरे करण्यापेक्षा वेळखाऊ संशोधनाची आवड असूनही मुलं संसार यातून वेळ मिळत नाही हा खूपच जुना आणि पटलेला मुद्दा आहे.
महिलांनी/च शास्त्रज्ञ/च का व्हावे आणि आताच्याच काळाची गरज कशी आहे यावर कोणी प्रकाश टाकेल का?

महिलांनी शास्त्रज्ञ होण्याची गरज आहे कारण व्यावसायिक क्षेत्रात स्त्री-पुरूष समानता तत्त्व मानतो. पी.एच.डी स्तरावर सुमारे ४६% टक्के उमेदवार महिला असतात. सो फार सो गुड. मग अचानक एन्ट्री लेव्हल जॉब्स (असिस्स्टंट प्रोफेसर, सहायक शास्त्र्ज्ञ इ पदे) ह्या वर अचानक फक्त २०% महिला असतात. इथे समानता हे तत्त्व डुबते. म्हणून ही सगळी बोंबाबोंब.
गेल्या तर काय बिघडल, फक्त तत्त्वच बुडाल ना? वेल नाही. हे ज्या संस्थात शिकले त्या सामान्य माणसाच्या टॅक्स वर चालतात. थोडक्यात तुमचाच पैसा वाया गेला. चालू ठेवायच का जे चालले आहे ते??
ह्या महिला एका विशिष्ट क्षेत्रात एक्स्पर्ट्स असतात. त्यांनी फिल्ड सोडले की इतर कामे करायला रि-ट्रेनिंग लागते, किंवा परत फिल्ड मध्ये ब्रेक नंतर यायचे तरी रि-ट्रेनिंग आले. प्रायव्हेट स्कूल्स मध्ये गेल्या तर ठीक नाहीतर परत ह्या टॅक्सपेयर वर बर्डन. महिला क्षेत्रातून बाहेर पडण्यात कुणाचेच भले नाही - ना त्यांचे, ना इतरांचे.

महिलांनी शास्त्रज्ञ च व्हावे असा लेखाचा मुद्दा नाही. किंवा महिलांनी च व्हावे असाही नाही.

त्या क्षेत्रात राहणाऱ्या स्त्रियांचा संशोधन संस्था, विद्यापीठे यात व विज्ञानातील राष्ट्रीय धोरणांच्या बाबतीतील चर्चामध्ये नेतृत्वपदी तसेच निर्णय घेण्याची जबाबदारी असलेल्या पदांवरील सहभाग कसा वाढेल याचा विचार करून ते अमलात आणणे. >> हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

अनेक वेळा स्त्रिया मागे पडतात कारण सेल्फ-प्रमोशन स्किल्स नसतात. आणि मोठ्ठाठठा फॅक्टर म्हणजे 'नेटवर्किंग स्किल्स' नसतात.

रूमाल... बाकी नंतर लिहीते.

>> संशोधन करण्यासाठी अगदी तयार उभ्या आहेत, पण नवरा, मुलं, समाज त्यांच्या हातापायांत बेड्या घालून त्यांना संशोधन करण्यापासून परावृत्त करत आहेत. ( ह्यावर भाऊंना एक व्यंग्यचित्र काढायला सांगायला हवं.. स्मित)>> आमची मै ही आहे हो चित्र काढायला. Wink

शीर्षकावरून असं वाटलं की फक्त स्त्रियाच अमुक एक मुद्द्यावर चांगलं जाणतात आणि काम करू शकतात आणि तो प्रश्न आताच उपस्थित झाला आहे याविषयी उहापोह आहे. बाकी पेपरांतील लेखांचा उद्देश
बऱ्याचवेळा करमणूक हाच असतो(काणापूर्ती =गुजराती, रिकामे चौकोन भरणे)

'स्त्रिभृणहत्त्या रोखणे' हा एक यातला विषय होऊ शकेल परंतू त्याला आशिया खंडातील सामाजिक वैचारिक बैठक आणि ढोंगीपणा कारण आहे संशोधनाचा विषय वगैरे नाही.

स्त्री ही मुलगी (कन्या, बेटी)या नात्यात असते तोपर्यँत पुरुष वडील /काका यांजकडून शिक्षणाकरता भरपूर प्रोत्साहन मिळते परंतू पत्नी ,आई या भूमिकेतमात्र पुरूष नवरा ,मुलगा या नात्याने इतर जबाबदाऱ्यांची अग़्रक्रमाने मागणी होते.

भाऊंनी काढले काय मैत्रेयीने काढले काय ते व्यंगचित्र नसेल. एक सत्य परिस्थिती आहे. रार ने वर्णन केले आहे तो बेस्ट केस सिनारिओ आहे - सर्व काही उपलब्ध आहे पण स्त्री स्वखुशीने रिस्क, गिल्ट ह्या सार्ख्या भावनिक कारणाने रिसर्च सोडते. हा सिनारिओ फार थोड्या मुलींच्या वाट्याला येतो. बाकींची लढाई नवरा, मुले, समाज ह्या रिंगणातच होते.

नेटवर्किंग हे रिसर्च मध्ये अगदी महत्त्वाचे स्किल. तुम्ही जो रिसर्च प्रॉब्लेम सोडवत आहात तशा पद्धतीचे काम करणार्या जगात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था असतात. जेव्हा एखादी नोकरी उपलब्ध होते/ ग्रँट मिळणार असते अशा वेळी लोकांना तुम्ही आणि तुमचे काम माहित हवे. नाहीतर फार सहज बाहेर फेकल्या जाऊ शकता. 'ओल्ड बॉईज क्लब' हा प्रकार आजही थोडाफार चालतो. वरिष्ठ महिला प्रोफेसरांनी मुलीना नेटवर्किंगच्या आणि इतर मार्गदर्शक संधी उपलब्ध करून द्यायला हव्या.

आपल्या कामाविषयी बोलताना महिला कमी पडतात. (ह्याची सुरुवात निश्चितच घरात-समाजात होते. फार थोड्यावेळा स्त्रीला तिच्या कामाविषयी विचारले जाते.) बढाई नाही पंण आपल्या कामाचा ईंपॅक्ट समजावून सांगता आला पाहिजे. एखाद्या कंपनी किंवा संस्थेकडून ग्रँट मिळवायला हे जरूरी आहे.

सीमंतिनी - तुझ्या ८:३६ च्या (म्हणजे शेवटच्या) पोस्टला भरपूर अनुमोदन. मला जे म्हणायचं होतं ते पहिल्या परिच्छेदात लिहून टाकलंस एकदम मुद्देसूद.
नेटवर्किंगच्या बाबतीतही लिहिण्यासारखं खूप आहे. नंतर येऊन लिहिते.

Pages