Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43
नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.
शिवाजी अंडरग्राऊन्ड इन भीमनगर
शिवाजी अंडरग्राऊन्ड इन भीमनगर मोहल्ला पाहिलं. आवडलं. काही संवाद म्हणताना काही पात्रांना प्रयास पडत होते. क्कचित म्युझिकमुळे गाण्याचे शब्द नीट ऐकू येत नव्हते. पण सगळ्यांचा अभिनय झकास आणि नाटकाची संकल्पना बेस्ट.
कोणी गोलपीठा पाहिलंय का? मी पहायचा विचार करतेय. प्लीज सांगता का?
ठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य
ठसठशीत वास्तवावरचे परखड भाष्य – ठष्ठ
मुलगी घरातच विकली जाते
प्रणयाराधनात केवळ मुलीकडेच पाहणारा, हळूहळू कुटुंबातील तिच्या उपयुक्ततेचा विचार करतो
मुली पाहतांना, “जाड वाटते” असे अभिप्राय तुंदिलतनू युवकही देत असतात
स्वतःचा निर्णय स्वतःच्या विचारांनी घेणार्या युवतीही, निराशेच्या काळात अंधश्रद्धेस शरण जातात
नोकरी करणार्या स्त्रियाही, स्त्रीने मुळी घराबाहेरच पडू नये असा विचार बाळगत असतात
माणसाच्या योजनेपलीकडे ईश्वरी सत्ताही असते! असे मानणार्या स्त्रिया ह्याही युगात खूप असतात
ह्या आणि असल्याच ठसठशीत वास्तवांवरचे परखड भाष्य म्हणजे ’ठष्ठ’. नव्या पिढीला वास्तवाचे भान आणून देऊन, भवितव्याप्रती इष्टमार्गाचे दर्शन घडवणारे हे नाटक आहे. पाहायलाच हवे असे! मात्र, कडेवरील लहान मुलांपासून, तर शाळेतल्या मुलांनाही नाईलाजाने घेऊन येणार्या पालकांना सावधानीचा इशारा असा की, हे नाटक त्यांना विदारक वास्तवाचे अकालीच भान आणून देऊ शकेल!!
नाटकातील भाषा हल्लीच्या पिढीची रोखठोक भाषा आहे. ती ताकाला जाऊन भांडे लपवत नाही. शहरी नवयुवतींपुढची आव्हाने ती व्यवस्थित प्रदर्शित करते. मात्र, अनेकदा ती नाटकी, भोंगळी वाटते. रोज-वापरातील वाटत नाही. तरीही सामाजिक कान-उघडणीसाठी आवश्यक वाटते.
समलैंगिक संबंध, धूम्रपान, मदिरासेवन, अश्लील भाषा ह्यांविषयीच्या संदर्भांचा वापर; समकालीन, सम-परिस्थित स्त्रियांच्या वापरात असतो त्याहून खूप जास्त आहे. नाटकातील पात्रे मात्र, हे एरव्ही अवघड वाटणारे संवाद, ताठ मानेने आणि स्पष्ट उच्चारांत व्यवस्थित मांडतात, तेव्हा कौतुकच वाटते. कित्येकदा नाटक समलैंगिक संबंध, धूम्रपान, मदिरासेवन, अश्लील भाषा ह्यांचे समर्थन करते आहे की काय असेही वाटते. नाटकातील वैचारिकदृष्ट्या स्वच्छ, स्पष्ट, रोखठोक आणि आदर्शवत् वाटावी अशी मते, अर्वाच्य भाषा आणि सवयींचा आदर्शही प्रेक्षकांसमोर ठेवते आहे असे वाटत राहते. सिगरेट-दारू आणि लैंगिक भाषा ह्यांचा वापर कमी केला असता तर कदाचित नाटक आजच्या युगातील ’उद्याचा संसार’ही ठरू शकले असते. मात्र आहे त्या परिवेषातील नाटकही कमी प्रभावी नाही. प्रेक्षकावर अंतिमतः सत्प्रभावाची छाप सोडणारे ते एक दमदार नाटक आहे. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टी नक्कीच संपन्न होईल.
मराठीतील लावणीची “फड सांभाळ तुर्याला ...”, “बुगडी माझी सांडली...” इत्यादींनी केलेली परिभाषा, “वाजले की बारा ...”, “अप्सरा आली....” इत्यादी नटरंगी लावण्यांनी पुन्हा नव्याने लिहीली. तशीच ’उद्याचा संसार’ ची नवी परिभाषा ह्या आणि अशाच अलीकडील नाटकांनी लिहीली आहे असाच माझा समज आहे.
कोण म्हणतो मराठी नाट्यसृष्टी जिवंत नाही? सळसळती नाही?
काल काही माबोकरणींबरोबर
काल काही माबोकरणींबरोबर 'ठष्ट' पाहिलं.
त्या नाटकात एकच आम्हा सगळ्यांना खटकलं की पुढारलेल्या विचारांच्या ज्या दोघी दाखवल्या आहेत त्या दारु, सिगरेट, xxx शिव्या/भाषा आणि फ्री सेक्स सहजपणे करणार्या दाखवल्या आहेत. ह्याने चुकीचा संदेश जातो की पुढारलेल्या विचारांच्या स्त्रिया आणि व्यसनं/फ्री सेक्स हे एकमेकांच्या हातात घात घालूनच असतात. त्या दोघींपैकी एक व्यसनं आणि फ्री सेक्स न करणारी, सोबर भाषा बोलणारी दाखवली असती तर पुढारलेले विचार आणि व्यसनं/सेक्स ह्यांचा काहीही संबंध नाही हे अधोरेखित झालं असतं आणि पुढारलेपणा जास्त हायलाईट झाला असता.
अदरवाईज, नाटक चांगलं आहे.
गोळेकाकांच्या --- <<<ह्या आणि असल्याच ठसठशीत........ तरीही सामाजिक कान-उघडणीसाठी आवश्यक वाटते.>>>> ह्याला सहमत.
एक माहिती हवी होती: 'दुसरा
एक माहिती हवी होती:
'दुसरा सामना' ह्या नाटकात कोणाच्या भुमिका होत्या? विक्रम गोखले आणि विनय आपटे?
दुसरा सामना नाटकात मूळ
दुसरा सामना नाटकात मूळ चित्रपटाच्या पुढचे कथानक होते. चित्रपटातल्या निळू फुलेंच्या मुलाची भुमिका विनय आपटे करत असे तर डॉ लागूंच्या मूलाची भुमिका विक्रम गोखले. दोघांच्या प्रेयसीच्या भुमिकेत इला भाटे असे तर घरच्या निकराच्या भुमिकेत सयाजी शिंदे.
----------------
मी कालच दिलीप प्रभावळकर अभिनीत पुलंच्या बटाट्याच्या चाळीची सिडी बघितली. प्रभावळकर कितीही आवडत असले तरी हे नाटक मात्र अजिबात आवडले नाही.
नाटकात प्रास्ताविक, उपोषण, भ्रमणमंडळ आणि समारोप असे चार भाग आहेत. त्यापैकी भ्रमणमंडळ प्रभावळकर एकट्याने सादर करतात तर बाकीच्या तीन भागात इतर पात्रे आहेत. मोहन वाघांचे नेपथ्य सुंदर आहे.
भ्रमणमंडळात व्हिक्टोरियाचा, स्टेशनवरच्या बाकाचा, रेल्वेच्या डब्याचा कट आऊट तसेच व्हीक्टोरियाच्या आवाजाचे व गाडीचे पार्श्वसंगीत वापरून छान परीणाम साधला आहे. अस्मिता चिंचाऴ्करच्या अनेक भुमिका व गायनही सुंदर आहे पण एवढे सगळे असूनही पुलंच्या धूसर चित्रफितीचा परीणाम अजिबात कमी होत नाही.
संगितीका अनेक पात्रे सादर करतात तरी त्याला पुलंच्या एनर्जीची व गायनाची सर नाही. उपोषणातही अनेक पात्रे असली तरी ती अस्सलपणे सादर होतच नाहीत.
भ्रमणमंडळ आम्हाला शालेय पुस्तकात होते शिवाय पुलंच्या तोंडूनही ऐकलेले. त्यामूळे त्यातल्या गफलती
तर जास्तच जाणवतात.
त्रिलोकेकरशेट च्या तोंडचे, घर न हापिस न हापिस न घर हे वाक्य प्रभावळकर ऑफिस ते घर असे उच्चारतात.
कोचरेकर मास्तर लिंबू ( का चाकू ) ला "असू दे" अशी एक मस्त सबब सांगतात. ती नेमकी गायब आहे.
मला आठवतय मूळ लेखात, वडगाव तीन आहेत असे वाक्य आहे ( चूभूद्याघ्या ) प्रयोगात ते देहू रोड असे आहे.
सगळ्यात भयाण आहेत ती सबटायटल्स. ( रेव्यू जरा बघा बरं )
फणसाचे भाषांतर पंपकीन, धोतराचे तर अतिभयाण आणि साखरभाताचे भाषांतर शुगर अँड राईस असे केलेले आहे. या सिडीशी संबंधित एकाही व्यक्तीला हे खटकू नये ?
पुढे कदाचित तंत्रज्ञान सुधारले तर पुलंची मूळ फित जास्त सुधारून येईल.. तोच सुदिन. तोपर्यंत या माणसाच्या
कलाकृतींना हात लावण्याचे धाडस कुणी करु नये, हेच बरे.
मुक्ता बर्वे आणि रिमा
मुक्ता बर्वे आणि रिमा ह्यांच्या प्रमुख भुमिका असलेलं 'छापा काटा' पाहिलं.
ठिक ठाक वाटलं. म्हणजे काहितरी कमी राहिलय असं वाटलं. दोन अंकी नाटक जेमतेम २ तासांचं आहे. कदाचित अजून थोडं मोठं असतं तर चाललं असतं असं वाटलं.
मुक्ता बर्वेचं काम एकदम मस्त.. खूप नैसर्गिक अभिनय, डिक्शन पण खूप सही! ती टीव्हीवर दिसते त्यापेक्षा प्रत्यक्षात खूपच बारिक आहे. रिमाची अॅक्टींगही छान. पूर्ण नाटकभर कुठेही भुमिकेचं बेअरींग सोडत नाहीत, फक्त त्यांची काही काही ठिकाणी ओव्हरॅक्टींग वाटली, विशेषतः आजारी पडल्यानंतरच्या दृष्यांमध्ये. त्यांची वेशभुषाही एकदम त्या रोलला साजेशी आहे. नेपथ्य, प्रकाशयोजनाही खूप आवडली. म्हणजे खूप काही भारी वगैरे नाहीये पण एकंदरीत संपूर्ण सेटचा वापर आणि 'लाईट घेणे' हा प्रकार खूप मस्त जमलाय. पार्श्वसंगीतही साजेशं. फक्त ब्लॅकआऊट्सचा वेळ खूप जास्त वाटला.
यशवंतराव थिएटरचा ढिसाळपणा म्हणजे संपूर्ण अंकभर बाल्कनीची दोन्ही दारं सताड उघडी! त्यामुळे ब्लॅक आऊटमध्ये स्टेजवर काय सुरु आहे हे सगळं दिसत होतं! मध्यंतरात मॅनेजरला जाऊन सांगितलं तर हो हो करतो दारं बंद म्हणाले. तरी दुसर्या अंकात एक दार उघडचं. मग परत मॅनेजरकडे गेलो तर म्हणे एका प्रेक्षकाबरोबर लहान मुल होतं तर ते सारखे आत बाहेर करत होते. म्हटलं मग तुम्ही स्टाफ ठेवा ना तिथे तसंही एकदा नाटक सुरु झालं की ते कोंडाळं करून गप्पाच छाटत बसतात! तर म्हणे हो बघतो पुढच्या शो ला काय करता येईल. या आधी 'यशवंतराव'ला कधी असा अनुभव नव्हता आला. थिएटर मॅनेजमेंट अश्या बाबतीत इतके निष्काळजी कसे काय राहू शकतात? (आणि बाल्कनीतल्याही कोणाला उठून ती दार बंद करावी असं का वाटलं नाही देव जाणे!)
अमोल पालेकर आणि आयडीया
अमोल पालेकर आणि आयडीया सेल्यूलर यांची निर्मिती असलेल्या २००५ सालच्या तेंडूलकर महोत्सवाची डिव्हीडी पाहिली आहे का कुणी ?
त्यातल्या "मादी" या एकांकिकेतल्या स्त्री कलाकाराचे मला नाव हवेय. नागपूरच्या आहेत त्या, दिग्दर्शक कुणी बेडेकर आहेत. सिडीमधे निवेदनाचा भाग नाही. नाव कळले नाही.
या डीव्हीडीचा पहिला भागच
या डीव्हीडीचा पहिला भागच बघून झाला. बर्याच वर्षांनी एकांकीका बघायची संधी मिळाली.
वर उल्लेख केलेली मादी, आणि नाशिकच्या ग्रुपने सादर केलेले, " आमच्यावर कोण प्रेम करणार" चांगली वाटली.
थीफ पोलिस मधे, राजन भिसे, अक्षय पेंडसे आहेत. ती ठिकठाक.
वैर्याची रात्र मधेही नाववाले कलाकार आहेत पण प्रचंड आवाजी अभिनय केलाय. दाणादाणची पण तिच कथा.
मरेपर्यंत फाशी मधे तर कलाकारांचे पाठांतरही नीट नाही. दामू केंकरेंनी सादर केलेली, समोरचा नाडकर्णी पण अगदीच बाळबोध..
पालेकर ठिकठाक बोललेत. नाना पाटेकर छान बोलला. माजगांवकर आणि भटकळ ( प्रकाशक ) छान बोलले. गिरीश कर्नाड मराठी येत असूनही इंग्रजीत बोललेत पण चांगले बोलले आहेत.
डिव्हीडीच्या संकलनाच्या नावाने मात्र बोंब आहे.
स्वतः पालेकर, नाना आणि मुकुंदराव किर्लोस्कर यांनी देखील पालेकरांच्या पत्नी म्हणून कुण्या दुसर्याच व्यक्तीचा उल्लेख केला.
पुढच्या भागात काय आहे ते बघितले कि लिहितो.
सहज मनात आले. सखाराम बाईंडरवर हिंदी चित्रपट आला तर सखाराम म्हणून रणवीर सिंग, लक्ष्मी म्हणून कतरीना, चंपा म्हणून प्रियांका चोप्रा, चंपाचा नवरा म्हणून नाना पाटेकर आणि त्याचा मुसलमान मित्र म्हणून नवाजुद्दीन कसे वाटतील ?
<स्वतः पालेकर, नाना आणि
<स्वतः पालेकर, नाना आणि मुकुंदराव किर्लोस्कर यांनी देखील पालेकरांच्या पत्नी म्हणून कुण्या दुसर्याच व्यक्तीचा उल्लेख केला.>
तिघांनीही योग्य त्याच व्यक्तीचा, म्हणजे संध्या गोखले यांचा उल्लेख केला आहे.
आभार चिनूक्स, मला माहीत
आभार चिनूक्स, मला माहीत नव्हतं !
मी वर उल्लेख केलेल्या सिडीचा
मी वर उल्लेख केलेल्या सिडीचा दुसरा भाग प्रचंड आवडला.
त्यात काय काय आहे याची जंत्री दिली तरी हरखून जाल.
माझी बहीण, जन्मदाता या दोन एकांकीका.. यात किशोर कदम आहे. ( दोन्हीची वेषभूषा.. नीरजा पटवर्धन )
सामना च्या पटकथेचे वाचन. यात डॉ मोहन आगाशे आणि निळू फुले... पटकथेचे वाचन एवढे छान असू शकते,
यावर विश्वास ठेवणे कठीण जावे. या दोन कलाकारांनी केवळ आवाजाच्या वापराने प्रसंग जिवंत केले होते.
गिधाडे या इंग्रजी रुपांतराचे वाचन, यात अलेक पदमसी, फारुख मेहता, रॉजर परेरा, डॉली ठाकोर.. १९७५ साली सादर झालेल्या प्रयोगातली कबीर बेदी वगळून ही ओरीजिनल कास्ट.
तेंडूलकरांच्या पटकथा यावर चर्चा, शाम बेनेगल, डॉ जब्बार पटेल, शबाना आझमी आणि गिरिश कर्नाड.
तेंचे लढे या चर्चेत, लालन सारंग, निखिल वागळे, गो.पु. देशपांडे आणि कुमार केतकर.
सर्वात आवडलेला भाग म्हणजे तेंच्या नाटकातील स्त्री व्यक्तीरेखा..
कलाकार - सुलभा देशपांडे, आदीती देशपांडे, रोहिणी हत्तंगडी, ज्योति सुभाष, अमृता सुभाष, लालन सारंग, माधुरी पुरंदरे, सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुर्वे.. आणि इतर.. एकेक कलाकार प्रचंड ताकदीचा. नेपथ्य वगैरे नसताना त्यांनी जे काही सादर केले त्याला तोड नाही. शेवटी सावली मित्रा ( शंभू आणि तृप्ती मित्रा यांची कन्या ) यांनी, लिला बेणारे चे स्वगत.. बंगालीतून सादर केले.. केवळ अप्रतिम.
आवर्जून संग्रही ठेवावी अशी सिडी आहे ही.
"एक होतं देऊळ" नाटक नाहीये.
"एक होतं देऊळ"
नाटक नाहीये. कार्यक्रम आहे जो स्लाईडशोद्वारे दाखवला जातो. प्रवेशमुल्य ऐच्छिक आहे.
अतीशय सुरेख कार्यक्रम. कोणत्याही भारतीयाने चुकवु नये असा.
नो धर्म.. नो देव.. ओन्ली सायन्स.. प्युअर सायन्स..
पियू, बघायला मिळेल का ते
पियू, बघायला मिळेल का ते माहीत नाही.. थोडे सविस्तर लिहिणार का प्लीज ?
मागच्या आठवड्यात 'अलिबाबा आणि
मागच्या आठवड्यात 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' नाटक पाहिलं.
लिहिलंय फार छान. (विवेक बेळे)
काही काही संवाद, प्रसंग एक नंबर आहेत. अभिनय पण सर्वांचा सुरेख. आनंद इंगळे, विद्याधर जोशी हे विशेष लक्षात राहतात. अवश्य पहा. लहान मुलांना सोबत नेऊ नका. मुलं बरोबर असताना मोठे नाटकाचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकणार नाहीत.
नाटकाचा सेट मला जरा क्लम्झी वाटला. पण ३ पातळ्यांवरचा कलाकारांचा वावर चांगला मॅनेज केलाय.
थोडे सविस्तर लिहिणार का प्लीज
थोडे सविस्तर लिहिणार का प्लीज ?
>> भारतात अनेक देवळे आहेत. प्राचीन भारतातही होती (प्राचीन भारतात कंबोडीयाचाही समावेश होतो).
भारतात देवळे फार उशीरा बांधली गेली इतर काही देशांच्या तुलनेत. याचे कारण म्हणजे जवळपास ३०० (किंवा ३०००) वर्षे भारतात फक्त संशोधन करुन ज्ञान मिळवणे यातच देशातले विद्वान गुंतले होते.
या ३०० वर्षात भारतात संशोधन करुन जे ज्ञान मिळवले गेले ते पुढच्या पिढ्यांसाठी जतन कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला. यातुनच भारतात देवळांचा उगम झाला.
या कार्यक्रमात उदयन इंदुरकर म्हणुन जे इंडॉलॉजिस्ट आहेत ते विज्ञानातले वेगवेगळे शोध प्राचीन भारतात निर्माण झालेल्या देवळात कोणत्या रुपाने जतन केले गेले हे सांगत जातात आणि देवळांकडे पाहाण्याची एक नवी दृष्टी आपल्याला देऊन जातात.
भिमबेटका, खजुराहो, वेरुळ, गुजरातमधील रानी कि वाव हि मंदीरे कोणत्या वैज्ञानिक तत्वांना, संशोधन करुन मिळवलेल्या ज्ञानाला दृश्य स्वरूप देण्यासाठी बांधली गेली; ब्रम्हा-विष्णु-महेश हे भौतिकशास्त्रातल्या कोणत्या नियमांना मुर्तरूप देण्यासाठी मानले गेले इ. माहिती या ३ तासाच्या कार्यक्रमात मिळते.
विज्ञानाच्या दृष्टीने हल्ली लागलेले शोध आणि जगाला माहित झालेले अवकाशाचे नियम भारताला खुप आधीपासुन अवगत होते. अफाट अश्या या ज्ञानाला काहीतरी करुन जतन करावे यासाठी बर्याचश्या देवांच्या संकल्पना उदयास आल्या. समुद्रमंथनासारखी आपल्याला पौराणिक वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात उत्तरायण- द्क्षिणायन इ. संकल्पना समजावण्यासाठी जन्माला आली/ घातली गेली आहे, शंकर-पार्वती किंवा नटराज हि संकल्पना प्रत्यक्षात भौतिकशास्त्र आणि अवकाशशास्त्र यातील भारताच्या अफाट ज्ञानावर आधारीत आहे इ. माहिती ते विज्ञानाच्या आधारेच पटवुन देतात आणि आपण थक्क होतो.
भारतात किती अफाट ज्ञान होते याची जाणीव आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते नि मन अभिमानाने भरुन जाते. तर एकीकडे आपणच ते ज्ञान समजुन घेण्यात किती तोकडे आहोत याची जाणीव होऊन मान शरमेने खाली जाते.
खरे तर इंडॉलॉजिस्ट इंदुरकरांच्या २० वर्षाच्या संशोधनाला ३ तासात आपल्यापुढे ठेवतांना तेही दमतात नि आपणही. या कार्यक्रमात ते आपल्यापुढे भारत आणि कंबोडिया मिळून जवळपास १५० देवळांची तत्वे विषद करतात. त्यांनी या कार्यक्रमात इतकी माहिती दिली कि ती इथे लिहायला मला जमेल कि नाही शंकाच आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतातील देवळांकडे विज्ञानाच्या दृष्टीकोनातुन बघण्याची दृष्टी ते आपल्याला देऊन जातात हे नक्की.
हा कार्यक्रम त्यांनी जाणीवपुर्वक ऐच्छिक प्रवेशमुल्यावर ठेवला आहे कारण त्यांना माहित असलेले हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची त्यांची धडपड आहे. निदान ज्यांना बघणे शक्य आहे त्यांनी अज्जिबात चुकवु नका. पेपरमध्ये जाहिरात येते तेव्हा प्रवेशिका नोंदवण्यासाठी त्यांचा नंबर दिलेला आहे. आधी फोन करुन ठेवल्यास अगदी पहिल्या-दुसर्या रांगेतील सीट्स आपल्यासाठी राखुन ठेवतात. याव्यतिरीक्त ऐनवेळी गेलो तरी प्रवेश मिळतो.
ज्यांना जमेल त्यांनी अगदी नक्की नक्की पहाच.
ता.क. इतकी वैज्ञानिक माहिती ते इतक्या रंजकप्रकारे सांगतात कि अज्जिबात बोर होत नाही. त्यामुळे असा पुर्वग्रह मनात ठेऊन जाऊ नये.
मला नक्कीच आवडेल.. अश्या
मला नक्कीच आवडेल.. अश्या कार्यक्रमांचे चित्रीकरण होणे गरजेचे आहे. एकटा माणूस प्रयोग तरी किती आणि किती ठिकाणी करणार ? कोणार्कच्या मंदीराबाबतही असे बरेच वाचले होते.
पियू, इंदूरकर हे हौशी
पियू,
इंदूरकर हे हौशी इंडॉलॉजिस्ट आहेत. त्यांना वाटतं ती मतं ते मांडतात.दुर्दैवाने ते सगळे पुरावे ओढूनताणून मांडतात, बरेच वेळा त्यात सत्याचा अपलाप करतात. त्यांचा देवळांचा अभ्यास जरूर आहे, पण त्यामागे असलेले विज्ञान विशद जे करतात ते अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर बिनबुडाचं आहे. कुठल्याही तज्ञाने मान्य न केलेलं आहे. मी इथे तपशीलात जात नाहीये, पण प्लीज त्यांच्या तथाकथित थिअरीजवर विश्वास ठेवू नका.
<<विज्ञानाच्या दृष्टीने हल्ली लागलेले शोध आणि जगाला माहित झालेले अवकाशाचे नियम भारताला खुप आधीपासुन अवगत होते. अफाट अश्या या ज्ञानाला काहीतरी करुन जतन करावे यासाठी बर्याचश्या देवांच्या संकल्पना उदयास आल्या. समुद्रमंथनासारखी आपल्याला पौराणिक वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात उत्तरायण- द्क्षिणायन इ. संकल्पना समजावण्यासाठी जन्माला आली/ घातली गेली आहे, शंकर-पार्वती किंवा नटराज हि संकल्पना प्रत्यक्षात भौतिकशास्त्र आणि अवकाशशास्त्र यातील भारताच्या अफाट ज्ञानावर आधारीत आहे>> हे निव्वळ कल्पनारंजन आहे त्याला पाठिंबा देणारा शास्त्रीय पद्धतीने सिद्ध होणारा किंचितसाही पुरावा नाही.
ते जितकी वर्षं इंडॉलॉजीचा अभ्यास करत आहेत तितकी वर्षं (गेली २०पेक्षा जास्त) माझे स्नेही आहेत. स्वतःच्या मित्राविरुद्ध असं काही लिहिताना मला त्रासच होतोय पण त्यासाठी मी बिनबुडाचं स्यूडो-सायन्टिफिक 'संशोधन' हे पटण्यासारखं आहे, त्यात तथ्य आहे वगैरे मतांना पाठिंबा देऊ शकत नाही.
इंदूरकर का ही ही म्हणले तरी - भारतीय पुरातत्त्व आणि इतिहासात मंदिरस्थापत्य, त्यामागचं तंत्र-शास्त्र, मूर्तीशास्त्र, कला याचा अतिशय उत्तम आणि सखोल अभ्यास झालेला आहे, चाललेला आहे. प्रत्येक विज्ञानाचा नियम घेऊन ओढूनताणून कॅल्क्युलेशन्स करून तो नियमच कसा अमुक स्थापत्यामागे आहे वगैरे दाखवणं हा निव्वळ 'आमच्या संस्कृतीत सग्गळं काही होतं' वाल्या अतिरेकी हिंदुत्ववादी विचारसरणीचाच प्रकार आणि प्रसार आहे.
ते उत्तम वक्ते आहेत, प्रभावी बोलतात. पण म्हणून त्यावरून कन्टेन्टचा दर्जा ठरत नाही.
वरदा.. कळकळ जाणवली. असे अनेक
वरदा.. कळकळ जाणवली. असे अनेक वास्तूंच्या बाबतीत घडतेय ( ताजमहाल - तेजोमहाल वगैरे ). त्यांचा प्रतिवाद मात्र होताना दिसत नाही. सत्य काय ते, संशोधकांनी पण जमेल त्या व्यासपिठावर मांडले पाहिजे.
वरदा.. इथे लिहिल्याबद्दल खुप
वरदा.. इथे लिहिल्याबद्दल खुप खुप आभार. तो कार्यक्रम पाहतांना तुझी आठवण आलीच होती.
तू हा कार्यक्रम पाहिला असशीलच (माझा निव्वळ अंदाज हा. तुझे स्नेही आहेत म्हणुन).
मी तर इतकी भारावुन गेलीये त्यांचा कार्यक्रम पाहुन. तू एकदम जमिनीवर आणलंस.
त्यांचा प्रतिवाद मात्र होताना दिसत नाही. सत्य काय ते, संशोधकांनी पण जमेल त्या व्यासपिठावर मांडले पाहिजे.
>> याला अनुमोदन. मला तुझीही मते जाणुन घ्यायला मनापासुन आवडेल. इथे अवांतर होत असेल तर प्लीज विपुत सांगितले तरी चालेल मला.
एक शंका : आज मी वृत्तपत्रात
एक शंका :
आज मी वृत्तपत्रात 'मी नथुराम..' ची जाहिरात पाहिली.त्यात 'दिग्दर्शक : विनय आपटे'असे लिहीले आहे. नाटकाच्या बाबतीत दिवंगत व्यक्तीचे नाव लिहीलेले चालते का? चित्रपटाच्या बाबतीत मी समजू शकतो. कारण त्याचे चित्रीकरण एकदाच होते व ते कायमचे असते.नाटकाच्या बाबतीत प्रत्येक प्रयोगात थोडे फार बदल होउ शकतात. तेव्हा नाटक दिग्दर्शकाचे निधन झाल्यावर त्याचेच नाव लिहीत रहाणे योग्य आहे का?
दिग्दर्शक प्रत्येक प्रयोगाला
दिग्दर्शक प्रत्येक प्रयोगाला दिग्दर्शित नाही करत वेगळं वेगळं.
ती फुलराणी च्या बाबतीत पुलंचे
ती फुलराणी च्या बाबतीत पुलंचे नाव असेच घेतले जात असे. नंतर त्या नाटकातील जुने कलाकार नव्या कलाकारांना दिग्दर्शन करत असत, तरी नाव पुलंचेच असायचे.
जर सादरीकरणाचा ढाचा त्या
जर सादरीकरणाचा ढाचा त्या दिग्दर्शकाने बसवून दिलेला असेल तर त्याचेच नाव सांगायला हवे ना. कलाकारांची तालीम यापलिकडेही दिग्दर्शकाने बरेच काही केलेले असते. रिप्लेसमेंट कलाकारांची तालीम घेणार्याला तालीम मास्तर म्हणतात दिग्दर्शक नाही.
हो, ते ही बरोबरच. ते नाटक
हो, ते ही बरोबरच. ते नाटक पुलं ( मग भक्ती, दुभाषी ) गेल्यावरही त्याच ढाच्यात सादर होत होते.
माझ्या आठवणीप्रमाणे स्वाती चिटणीस / सुकन्या कुलकर्णी / अमृता सुभाष तिघींनी प्रयोग केले.
अमृताने केले त्याचे दिग्दर्शन
अमृताने केले त्याचे दिग्दर्शन वामन केंद्र्यांनी केले होते. तो ढाचा मूळ ढाच्यापेक्षा खूप वेगळा होता.
विजयाबाईंचा अप्रतिम लेख आहे
विजयाबाईंचा अप्रतिम लेख आहे इथे. अवश्य वाचा
http://www.loksatta.com/lokrang-news/invention-my-and-mahesh-elkunchwar-...
हा धागा वर आलेला पाहुन अगदी
हा धागा वर आलेला पाहुन अगदी बर वाटल.
काल रात्री ९:३० वाजता बालगंधर्व रंगमंदीरात विनय आपटे दिग्दर्शित आणि शरद पोंक्षे अभिनीत "मी नथुराम गोडसे बोलतोय" नाटक बघितल..... अप्रतिम निव्वळ अप्रतिम नाटक.... नुसती कथा, दिग्दर्शन तगड असुन चालत नाही तर कलाकारही तेवढे सक्षम हवेत तरच नाटक प्रभावी ठरत... मराठीच भाषा अगदी तुम्ही आम्ही बोलतो तिच, कुठेही अतिअलंकारीक, बोजड शब्द नाहीत पण वाक्य उच्चारताना योग्य शब्दांवर योग्य ठिकाणी जोर दिला तर फार काही उरफोड न करता तुमच म्हणण तुम्ही लोकांपर्यंत सह़ज पोचवु शकता याच उत्तम उदाहरण म्हणजे हे नाटक....
मुग्धा, कधी पासून बघायचे आहे
मुग्धा, कधी पासून बघायचे आहे हे नाटक मला. बघू कधी योग येतो ते.
हो ना नताशा.. माझही तेच
हो ना नताशा.. माझही तेच झाल... फायनली काल बघितल
मी भरत मधे पाहिलेले कदाचीत
मी भरत मधे पाहिलेले कदाचीत सदाशीव पेठेत आहे
अप्रतीम आहे
Pages