नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज 'राजा सिंह' हे बालनाट्य बघितलं.

काय आवडलं नाही:

१. Lionking ची कथाच नाटकाचा बेस आहे त्यामुळे लहान मुलांसाठीसुद्धा बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल आहे. थोडी कॉपी सुद्धा आहे. 'हकुना मटाटा' वगैरे.

२. गाणी म्हणून जो काही धिंगाणा आहे त्यात फक्त ध्रुवपद ऐकू येत होते. मधल्या कडव्यातले मोजून 2-3 शब्द ऐकू येत होते. कधी एकदा ते संपतंय असं झालं सर्वच गाणी ऐकताना.

३. बालनाट्याच्या दृष्टीने भाषा अनेक ठिकाणी बोजड म्हणावी अशी वाटली. बरेच शब्द लहान मुलांना किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या / शिकणाऱ्या थोड्या मोठ्या मुलांना सुद्धा कळणार नाहीत असे होते.

४. गाणी आणि नाच खरंच जास्त वाटतो. एखादे तरी गाणे कमी करायला हवे. आणि उरलेल्या गाण्यांचे सर्व शब्द प्रेक्षकांना नीट ऐकू यायला हवेत.

काय आवडलं:

१. Lionking बेस घेऊनही त्यांनी कथेत केलेलं व्हेरिएशन इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे नाटक आवडतं. बघावं असं आहे.

२. सर्वांचा अभिनय एक नंबर झालेला आहे.

३. प्रकाशयोजना सुंदर आहे.

४. कास्टिंग उत्तम जमलंय.

५. लहान मुलं एन्जॉय करतील (माझ्या लेकाने तरी गाणी सोडून सगळं एन्जॉय केलं).

छान.

सारखं काहीतरी होतंय - प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर - कुणी पाहिलं आहे का?

सुमारे चार वर्षांनी रंगमंदिरात जाऊन नाटक पाहिले.
खरं खरं सांग..’!

फ्रेंच नाटककार फ्लॉरियन झेलरच्या "the truth’वर आधारित नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित नाटक.

हलकेफुलके धमाल मनोरंजन. विवाहबाह्य प्रेम प्रकरण हा नेहमीचा विषय छान फुलवला आहे. आनंद इंगळे यांच्या बहुरंगी अभिनयावर नाटक पेललेले आहे.
अन्य कलाकार: रुजुता देशमुख, सुलेखा तळवलकर आणि राहुल मेहंदळे.

नाटक संपल्यानंतर चारही कलाकार उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन करतात तसेच ते त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही करतात.
" नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा",
असे आवाहन इंगळे यांनी केले.

>>ओटीटी वर रिलीज का करत नाही नाटके

नाटक हा फॉर्मेटच असा आहे की त्याची मजा त्याच्या जिवंतपणात आहे..... बाकी नाटकांच्या सिडीज मिळायच्याच की किंवा खुप वर्षापूर्वी बहुतेक "प्रभात" की "तारा" (नाव नक्की आठवत नाही) नावाचे चॅनेल होते फक्त नाटकांसाठी!!
नाटक स्क्रीनवर बघताना एकतर त्यातले नाट्य निघून जाते किंवा ते खुप लाऊड वाटते.

स्मृतिगंध यूट्यूब चॅनेलवर प्रशांत दामलेंच्या १२५०० प्रयोगाच्या निमित्ताने १×३ अशी गप्पांची सिरीज आलीय!
प्रशांत दामलेंच्या उपस्थितीत त्याच्या सहकलाकारांना यानिमित्ताने संकर्षण कऱ्हाडे बोलत करतोय
जनरली अश्या कार्यक्रमातुन शक्यतो चांगलेच बोलतात हे गृहीत धरले तरी प्रशांत दामलेंचे एक नट आणि निर्माता म्हणून असलेले प्रोफेशनलीझम; त्यांची स्वयंशिस्त आणि नाट्यव्यवसायतले खाचखळगे याच्याबद्दल त्यांना असलेली समज अनेक किश्श्यातुन कळते आणि गेली इतकी वर्षे ज्या चिकाटीने आणि सातत्याने हा माणूस नाटक करतोय त्याबद्दल खुप कौतुक वाटते Happy

१×३ अशी गप्पांची सिरीज आलीय!
>>> होय, पाहायला सुरवात केलीय.
अनौपचारिक गप्पा छान वाटतात.

कऱ्हाडे, दामले व केंकरे हा भाग पहिला
चांगला आहे.

सारखं काहीतरी होतंय - नाटक बघितलं. प्रशांत दामले असले की धमाल येते हे निर्विवाद सत्य पुन्हा अधोरेखित झाले. वर्षा उसगावकर यांनी अनेक वर्षांनी नाटकात काम केले आहे असे ते म्हणाले आणि ते जाणवतेसुद्धा. दोघांच्या अभिनयात आणि सहजतेेत फारच तफावत आहे. कदाचित आणखी ३०-४० प्रयोगानंतर वर्षा यांना पाहणे योग्य ठरेल. नाटकाची कथा यथातथाच आहे. बऱ्याच संवादांत काहीच नावीन्य नाही. विनोद साचेबद्ध आहेत. तरीही आपल्याला हुकमी खळखळून हसवू शकणारे प्रशांत दामले असल्यामुळे पाहताना कंटाळा येत नाही. पौर्णिमा केंडे - अहिरे यांनीही उत्तम काम केले आहे. छोट्या भूमिकेतही त्या अनेक हशे आणि टाळ्या वसूल करतात.

स्मृतिगंध यूट्यूब चॅनेलवर प्रशांत दामलेंच्या १२५०० प्रयोगाच्या निमित्ताने १×३ अशी गप्पांची सिरीज आलीय!
>>>यासाठी अनेक धन्यवाद स्वरूप. Happy
अशा कुठलेही प्रमोशन नसलेल्या व अनौपचारिक गप्पा असलेल्या मुलाखती आवडतात.

छान लिहिले आहे कुमार सर आणि हर्पा. Happy

स्मृतिगंध यूट्यूब चॅनेलवर प्रशांत दामलेंच्या १२५०० प्रयोगाच्या निमित्ताने १×३ अशी गप्पांची सिरीज आलीय!-=+११११
मस्त आहे.

त्यातल्या विनय येडेकर आणि संदीप पाठक या दोघांबरोबरच्या गप्पा धमाल आहेत. बाकीही बर्‍याच आवडल्या. फक्त कोडकौतुकच करणार्‍या जाम कंटाळवाण्या वाटल्या.

प्रशांत दामले खूप तंबाखू खातात काय? अनेकांनी त्यांची तशी नक्कल केली आहे ह्या गप्पांत.

ओटीटी वर रिलीज का करत नाही नाटके... सगळे जग पैसे कमावतेय - मराठी नाटक करणारे मागे कशाला... >>> विशेषतः पहिल्या लाटेनंतर जेव्हा नाट्यगृहे पूर्णपणे बंद होती तेव्हा हृषीकेश जोशींनी स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, गौरी देशपांडे, मयुरा रानडे, आणि ... वंदना गुप्ते अभिनित 'मोगरा' नावाचे नेटक (लाईव्ह इंटरनेट प्ले) आणले होते. त्यात ह्या अभिनेत्री रंग व वेशभूषा करून प्रयोग घरूनच (एकमेकींना प्रत्यक्ष न भेटता व कोणत्याही नाट्यगृहाच्या वापर न करता) करत असल्याचे वाचनात आले होते. त्याचेही अगदी शहरानुरूप प्रयोग होत असत (कदाचित प्रत्येक शहरात त्यांनी प्रयोगासाठी व्यवस्थापक नेमले असावेत किंवा स्थानिक नाट्यगृहातील व्यवस्थापकांची प्रयोग लावायला व लिंक शेअर करायला मदत घेतली असावी). मात्र हे नाविन्यपूर्ण नेटक फारसे चालले नाही. किंबहुना अन्य नाट्यदिग्दर्शक व निर्मात्यांनी त्यांच्या नाटकांसाठी पुढाकार घेतला नाही. अन्यथा एक नवीन चळवळ फोफावली असती. त्यादरम्यानच श्रेयस तळपदेनेही केवळ नाटकांसाठीच 'नाईनरस' ह्या बहुभाषिक डिजिटल प्लॅटफॉर्मचा शुभारंभ केला होता. काही नाटकांचे शूटिंगही सुरु केले होते पण त्याचे काय झाले काहीच समजले नाही.

अनेक कसलेल्या नाट्यकर्मींमते नाट्यगृहातच प्रयोग करण्यात आनंद असतो. शिवाय प्रेक्षकांनाही नाट्यगृहात प्रत्यक्ष प्रयोग बघण्यात जो एक वेगळाच आनंद भेटतो तो कदाचित ऑनलाईन बघण्यात भेटणार नाही (अगदी युट्युब वरही अनेक नाटके आहेत, पण ती प्रत्यक्ष बघायला जास्त आवडले असते असे वाटते). त्यामुळे अनेक नाट्यकलाकार, दिग्दर्शक व निर्मात्यांकडून हृषीकेश जोशींनाही नेटकसाठी जरा विरोधच होता तरी त्यांना कसा प्रतिसाद भेटतो हेही जाणण्यास उत्सुक होते. कदाचित नेटक चालले असते तर आणखी रंगकर्मी पुढे आले असते.

स्मृतिगंध यूट्यूब चॅनेलवर प्रशांत दामलेंच्या १२५०० प्रयोगाच्या निमित्ताने १×३ अशी गप्पांची सिरीज आलीय! >>> काही दिवसांपूर्वी ह्या सिरीजमधला पहिला भाग ज्यात पुरुषोत्तम बेर्डे होते, तो अचानक बघण्यात आला आणि एकंदरीत सिरींजमधील पुढे येणारे भाग बघण्याचा मोह झाला. मी संदीप पाठक व उमेश कामथ वगळून सगळेच भाग पाहीले. खरं तर प्रशांत दामलेंबद्दल एवढं काही वाचल किंवा ऐकलंय तरीही ही सिरीज आवडत आहे.

पण का कुणास ठाऊक मला संकर्षण कऱ्हाडे कधीही आवडला नाही. एखादे वेळी कविता वगैरे चांगल्या करत असला तरी अभिनयात आनंदी-आनंदच असतो. त्यामुळेच खूप आधी झी मराठीवर आलेल्या 'मला सासू हवी' ह्या मालिकेनंतर त्याला मुख्य नायकाची भूमिका कधीही मिळाली नाही. तो सदैव सहाय्यक भूमिकेत व अलीकडे जरा निवेदनात गती घेतांना दिसला. आणि जरी ह्या सिरीजमध्ये तो मुलाखती बऱ्या घेत असला तरी तो दामलेंचा शिडीसारखा वापर करून नाट्य-सिनेमा क्षेत्रात पुढे जायचे मनसुबे रचत असल्याचे सारखे मला वाटत असते (अश्या अनेक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने मनी व डोई भिन्न भिन्न भाव असलेले लोक सहज ओळखता येतात).

प्रशांत दामले खूप तंबाखू खातात काय?- होय. हे मला पण नुकतेच कळाले . संदीप पाठक, सुकन्या मोने आणि शुभान्गी गोखले यान्चा पण छान आहे एपिसोड . कोडकौतुकच करणार्‍या पेक्शा किस्से असलेल्या मस्त आहेत.

Submitted by राहुल बावणकुळे on 2 November, 2022 - 15. चांगली माहिती. याबद्दल काहीच माहीत नव्हते.

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने ऋतुजा बागवेने ‘अनन्या’ नाटकातील आठवणींना दिला उजाळा!
एकांकिका, नाटक, चित्रपट असा अनन्या या कलाकृतीचा प्रवास आहे.
https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/3236418/photos-mar...

यापैकी मी चित्रपट पाहिला आहे (प्राईमवर). त्यात हृता दुर्गुळे आहे.

मुघल ए आझम पाहिलंय का कोणी? 5000 तिकीट आहे स्टॉलच. ऑपेरा टाईप वाटत आहे. चारचौघी आलंय, कायम हाऊसफुल्ल आहे, अजून दोन तीन महिन्यांनी बघू. 1 बाय 3 सगळे भाग बघितले, कविता लाड , अशोक पत्की, येडेकर, बेर्डे, केंकरे इ भाग आवडले. मोने, उसगावकर, गोखले यांनी बोर केलं.

चारचौघी हल्लीच बघितलं, सुपर्ब. सर्वांनी छान अभिनय केलाय.

जुन्या संचातलं बघितलं नव्हतं.

हो मला ते बघायचं होतं, पण तेव्हा डोंबिवलीत नाटकं फार येत नव्हती. वेस्टला एकच ओपन थिएटर होतं. ठाण्यात जॉब करत होते पण गडकरीला वगैरे जाऊन बघायला जमलं नाही.

"रघुपती राघव राजाराम "
हे नाटक इथे पाहिले.
https://www.youtube.com/watch?v=971l3LGtNh0&t=5723s

छान, आवडलेच..
त्या नावाचा भजनाशी काही संबंध नाही ! नाटकातल्या तीन भावांची नावे आहेत ती .

नवीन संचातलं 'चारचौघी' पाहिलं या भारतवारीत. नाही आवडलं.
मुळात आता पाहताना संहिता, कॅरेक्टर डेव्हलपमेन्ट तीसेक वर्षांपूर्वी वाटली होती तितकी ग्रेट वाटली नाही. त्यात मी पाहिलेल्या प्रयोगात रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वेसारखी नावं असून अभिनयही फारसा प्रभावी वाटला नाही. उलट त्यांच्या मानाने कादंबरी कदम आणि पर्ण पेठेचाच वावर जास्त आवडला.
नाटकातल्या पुरुष पात्रांचे अगदीच विदुषक करून टाकलेत या सादरीकरणात - त्यामुळे विषयाचं गांभीर्य आणखीनच कमी होतं असं वाटलं.
मी गेले तेव्हा प्रेक्षकांत ज्येष्ठ नागरीक जास्त दिसत होते. ते चित्रविचित्र वेळी हसत होते - विशेषत: सर्वात धाकट्या मुलीचं मनोगत ऐकताना. त्यानेही रसभंग झाला.

अ परफेक्ट मर्डर पाहिले ... अनिकेत विश्वासराव, सतीश राजवाडे, प्रिया मराठे सर्वांची कामे उत्तम... ट्विस्ट देखील छान आहे...

डिसेंबरमध्ये पुण्यात एका नाट्यमहोत्सवात गो.पु.देशपांडे लिखित 'उद्ध्वस्त धर्मशाळा' हे नाटक बघितलं. आवडलं. मुंबईतील एका हौशी नाट्यसंस्थेने हा प्रयोग केला होता. नायकाचं काम करणाऱ्या अभिनेत्याचा अभिनय फारच छान. नाव विसरले. समाजवादी विचारसरणीच्या, पण त्या विचारसरणीशी स्वतःला बांधून घ्यायला तयार नसणाऱ्या एका लेखक-प्राध्यापकाचा आयुष्यात झालेला पराभव असा नाटकाचा विषय आहे. नाटकाबद्दल ऐकून होते, पण फारसं माहिती नव्हतं. काही काही ठिकाणी भाषा जड वाटते. पण तेवढं ठीक आहे.
प्रेक्षकांमध्ये ज्योती सुभाष, अमृता सुभाष, किरण यज्ञोपवीत, गिरीश जोशी असे काही प्रसिद्ध चेहरे होते Happy

काल इथे 'चारचौघी' बघितलं. जुन्या संचातलं बघितलं नसलं, तरी तेव्हा हे नाटक खूप गाजलं होतं हे आठवतंय.
नवीन संचातलं खूपच आवडलं. नाटक तर जबरदस्तच आहे, अभिनयही सगळ्यांचे आवडले. वंदना गुप्तेच्या फोनवरच्या प्रवेशाचं तेव्हा कुठेतरी खूप कौतुक वाचलं होतं, ते का असेल, हे काल लक्षात आलं. मुक्ता बर्वेचाही तो प्रवेश अत्यंत सुंदर झाला!
वर स्वाती आंबोळे यांनी लिहिलंय तसं इथेही काही काही ठिकाणी झालेल्या टाळ्या आणि हशे अनावश्यक वाटले. रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वेच्या एन्ट्रीलाही जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. हे कॉमन आहे का?
१९९१ सालचं नाटक आजही बहुतांशी कालबाह्य वाटलं नाही. नाटकाचं कौतुक तर आहेच, पण याचा अर्थ समाज फारसा बदललेला नाही, असाही असू शकतो.
धाकट्या मुलीची-विनीची व्यक्तिरेखा मात्र मला बाकी तिघींच्या मानाने convincing वाटली नाही. कदाचित माझा bias असू शकेल, कारण ती कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे , तिच्या वयाच्या मुली माझ्या भाच्या-पुतण्या आहेत आणि त्या आयुष्याबद्दल असा काही एवढा गंभीरपणे विचार करत असतील अशी कल्पना मला करता येत नाही. Proud कदाचित करत असतीलही. पर्ण पेठेचा अभिनयही बाकी तिघींच्या मानाने जरासा डावा वाटला.
बंगळुरात मराठी नाटक बघायला मिळालं याचाही आनंद झाला. काल दोन खेळ होते आणि दोन्ही हाऊसफुल होते. आम्ही गेलो होतो त्या शोला पुष्पाताई द्रविड (राहुल द्रविडची आई) आणि डॉ. सुनंदा कुलकर्णी (सुधा मूर्तींची बहीण) या दोघी आल्या होत्या Happy

Pages