नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गालबोट म्हणजे लोकांनी ३-४ वर्षांच्या मुलांना आणल होत. नाटक शेवटाकडे असताना जोशी बाईंनी एकदम रडून (हो, रडून) विनंती केली प्रेक्षकांना की मुलांना बाहेर न्या, लक्ष विचलीत होत आहे. >> खरंच का असे वागतात प्रेक्षक ?
त्या गिरीश जोशी आणि मुक्ता बर्वे च्या "फायनल ड्राफ़्ट" ला गेलो होतो तेव्हा पण गिरीश जोशींनी एकदम खाडकन प्रवेश थांबवला आणि प्रेक्षकांना विनंती नाही तर ठणठणीत सांगितलं कि "पाच वर्षाच्या खालच्या मुलांना प्रवेश नाही असं स्पष्ट पणे जाहिरातीत लिहिलेल असतानाही प्रेक्षक का आणतात ? . जर का मुलं रडायचं थांबलं नाही तर नाटक आम्ही इथेच बंद करू " Sad

साखर खाल्लेला माणूस अजिबात आवडलं नाही. प्रशांत दामलेचा अभिनय उत्तम होता पण ते सोडलं तर नाटकाला ना धड कथा होती, शेवटही गुंडाळलेला होता आणि दोन वेगळ्या विषयांची उगीचच सरमिसळ केली होती Sad

आम्ही आणि आमचे बाप बघितलं काल. खूप छान आहे. पु. ल. देशपांडे आणि अत्रे यांच्या नाटकातील काही प्रवेश, त्यांच्या चित्रपटातील गाणी आणि किस्से असंं स्वरूप आहे. गाणी अजित परब याने गायली आहेत तर अतुल परचुरे, पुष्कर श्रोत्री आणि आनंद ईंगळे यांनी नाटकातले प्रवेश फारच सुंदर वठवले आहेत. जरूर बघावे असे नाटक.
आज पती गेले गं काठेवाडीचा शेवटचा प्रयोग होता. बघता आले नाही. कोणी बघितले असल्यास परिक्षण लिहावे.

अनन्या बघितले काल. अप्रतिम नाटक. रूजुता बागवेने खूप छान काम केले आहे, अर्थात सगळ्यांनीच काम छान केले आहे पण रूजुताची मेहेनत वाखाणण्यासारखी. चुकवू नका अजिबात.

फायनली `अमर फोटो स्टुडिओ' बघितलं. एक नंबर नाटक. पहिलं म्हणजे सगळी टीम यंग टर्क्सची आहे. त्यातच अर्धी-अधिक मजा आहे.
मनस्विनी लता रविंद्रने अचाट लिहिलंय; निपुण धर्माधिकारीने अफाट दिग्दर्शन केलंय.

मी मुख्य अमेय वाघसाठी म्हणून गेले होते. तो मालिकेत आवडला नव्हता; सिनेमात प्रचंड आवडला होता; तो मूळचा नाटकवाला, म्हणून त्याला स्टेजवर पाहायचाच होता. तो काम छान करतोच; पण नाटकात अधिक लक्षात राहतो सुव्रत जोशी!! त्याने कमाल केली आहे.
सखी गोखलेनेही तिची सगळी लिमिटेशन्स इथे हातखंडा म्हणून वापरून मजा आणली आहे. (ही देखील मला मालिकेत अजिबातच आवडली नव्हती.)
पूजा ठोंबरेची भूमिका मुळातच जरा कृत्रिम, जुन्या वळणाची आहे. ती तिने छान केली आहे.

काळाचे संदर्भ, फ्लॅशबॅक आणि वर्तमानातल्या पुढे-मागे उड्या, सगळं जमून आलंय. रंगमंच आणि प्रेक्षकांची पहिली रांग यांच्यामधल्या स्पेसचाही झकास वापर केलाय.

'दोन स्पेशल' नाटक पाहिल्यानंतर जसं मला वाटलं होतं, की जितेंद्र जोशीने फक्त नाटकातच काम करावं तसंच हे नाटक पाहून वाटलं की या नव्या दमाच्या तरूण कलाकारांनी नाटकातच काम करावं. फार मजा आणली त्यांनी!

अजिबात चुकवू नका हे नाटक... काहीतरी वेगळं, नवं, प्रयोगशील बघण्याचा आनंद मिळेल!

'संगीत देवबाभळी' या नाटकाबद्दल फार उत्कट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. कोणी पाहिलं आहे का? कसं आहे?

संगीत देवबाभळी उत्कृष्ट आहे. आवली आणि रखुमाई यांच्यातलं नातं संवादातून आणि गाण्यातून दाखवलं आहे. आवली सारखी विठ्ठलाबद्दल वाईट बोलते आणि त्याचा रखुमाईला फार त्रास होतो तरी तिला आवलीची मदत करावीच लागते कारण तिच्या नव-याची (विठ्ठलाची) तशी ईच्छा असते. दोघींनी फार छान काम केलंय, जरूर बघा.

परवाच नव्या संचाचे हसवाफसवी गावात झाले. मस्त आहे. पुष्कर शोत्रीचे काम सुंदर. सहा भुमिका मस्त केल्यात. चायनीज माणुस तर अफलातुन जमलाय. व वृद्ध गायक पण सुंदर जमलंय.

'संगीत देवबाभळी' हा एक उत्कृष्ट कलाविष्कार आहे. संगीत नाटकांची आवड असेल तर नक्की चुकवू नका.

संगीत सौभद्र बघितले, आवडले. प्रशांत दामलेमुळे जास्त आवडले पण त्यांचे एकही गाणे नाही यामध्ये. सर्व कलाकारांची कामे उत्तम आणि राहुलचे गाणे तर अप्रतिमच.
ज्यांना काही आॅफबीट बघायचे असेल त्यांनी अबुलाल अडकित्ते आणि मुमताझ महल बघा. नावावरून काही अंदाज येत नाही पण नेहा जोशी अतिशय आवडते, तर ती आहे म्हणून बघितले. नम्रता आवटे आणि शशांक केतकर नेहेमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत आहेत आणि कामेे चोख केली आहेत. नेहा नेहेमीप्रमाणे धडाकेबाज, पारंपारिक रूढी-परंपरांना छेद देणारी भूमिका आहे तीची. अजून दोनजण आहेत, नेहाच्या हाताखाली काम करणारा (तोच दिग्दर्शक आहे बहुतेक) आणि त्याची बायको, त्यांच्याही भूमिका छान आहेत.
अलबत्या गलबत्याची तिकिटे फक्त बुक माय शोवर उपलब्ध आहेत Uhoh

अखेरचा सवाल बघितलं होतं आधी कधीतरी.. डॉक्टर आईच्या मुलीला कॅन्सर होतो असं कथानक आहे बहुदा. बऱ्यापैकी रडारड आहे त्यात.

काही दिवसांपूर्वी 'संगीत देवबाभळी' पाहिलं. खूप आवडलं. एक वेगळाच नाट्यानुभव आहे.

विठूभक्तीत रंगलेले संत तुकाराम, त्यांचं संसाराकडे होणारं दुर्लक्ष, त्यामुळे कातावलेली पोटुशी आवली, तिला प्रापंचिक कामांमध्ये मदत करण्यासाठी पांडुरंग रखुमाईला धाडतो. आवली पांडुरंगाला उद्देशून सतत घालून पाडून बोलत असते. तर रखुमाईचं तिथे येण्यापूर्वी पांडुरंगाशी भांडण झालेलं असतं, मात्र मनात स्नेह असतोच.
रखमा आवलीला आपण खर्‍या कोण आहोत हे कळू देत नाही; दोघींची हळूहळू गट्टी होते. संवाद, सहवास यांच्यातून रखमाला सहजीवनाचा एक मौलिक धडा आवलीकडून मिळतो.
आपल्या अगदी नकळत या हाय-पॉइंटला नाटक इतकं अलगद पोचतं...!

लिहिलंय फार छान (संहिता या अर्थाने)

दोनच कलाकार, शुभांगी सदावर्ते - आवली; मानसी जोशी - रखमा. दोघी स्टेजवर लाईव्ह गाणी गातात. आवलीच्या घरातला आणि नदीच्या घाटावरचा दोघींचा वावर बारीकसारीक हालचालींमधून फार छान प्रत्ययास येतो. तुकाराम प्रत्यक्ष रंगमंचावर येत नाहीत. त्यांनी गायलेले २-३ अभंग्/भजनं आनंद भाटेच्या आवाजात रेकॉर्ड करून वाजवली जातात.

आवर्जून पाहा हे नाटक.

स्वप्ना, काही महिन्यांपूर्वी म.टा.मध्ये 'ओवी'चा रिव्ह्यू आला होता.

हे नाटक एकांकिकेवरून घेतलेलं आहे. त्या संदर्भात काही दिवसांपूर्वी म.टा.मध्येच रत्नाकर मतकरींचा एक लेख वाचल्याचा आठवतो.
एकांकिका आणि पूर्ण लांबीचं नाटक यांच्या लेखनाच्या टप्प्यावर वेगवेगळा विचार आवश्यक असतो, दोन्हींतली स्पेस वेगळी आणि स्वतंत्र असते, आधी एकांकिका लिहून मग त्याच कथानकाचं पूर्ण लांबीचं नाट्क करणे हा प्रघात रंगभूमीसाठी काही बरा नव्हे, असा साधारण त्या लेखाचा सूर होता.

सुखनचा प्रयोग बघितला . अक्षरशः मंतरलेले 3 तास. केवळ अफाट सुंदर उर्दू शेरोशायरी. नक्की बघा.

'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' हे नाटक पाहिले. चांगले आहे. सर्व कलाकारांची कामे चोख झाली आहेत. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक आहेत. संवादलेखन ही चांगले आहे, त्यामुळे एकंदरच भट्टी चांगली जमलीये. नाटकाचा विषयही आजच्या काळाशी अतिशय सुसंगत असाच आहे. आणि सर्व पात्र किंवा व्यक्तीरेखा अगदी आपल्या परिचयातल्या वाटतात. हलकी फुलकी सुरवात असणारे हे नाटक मध्यंतरानंतर बर्‍यापैकी गंभीर होतं. सर्व व्यक्तीरेखा अधिकाधिक वास्तववादी होत जातात.
पण वंदना गुप्तेंचे वय आणि त्यांची सिनेमा/ सिरीयल मधली व्यस्तता लक्षात घेतली त्या फार दीर्घकाळ नाटकात काम करू शकतील की नाही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांची प्रमुख भुमिका असणारे हे नाटक आवर्जून बघावे असेच आहे.

मीही पाहिलं आज 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला'. आवडलं. वंदना गुप्ते आणि प्रतीक्षा तर सुंदर काम करतातच पण दीप्ती लेले आणि जोशी यांनीदेखील छानच साथ दिली आहे. आणि एक छान गोष्ट म्हणजे त्या तिघींनी आम्हाला सेल्फी व फोटो काढू दिले त्यांच्यासह. इतकं मस्त वाटलं त्यांच्याशी बोलताना.. दीप्ती तर गोड दिसते प्रत्यक्षातही.

'एका लग्नाची पुढची गोष्ट' पाहीलं.
नाटक ठिकठाकच आहे. खरतर विशेष गोष्ट अशी नाहीच्चे. आधीच्या नाटकाची लोकप्रियता पुढे व्यवस्थित वापरून घेतली आहे. प्रशांत दामलेचा अभिनय आणि विनोदांचं टायमिंग नेहमीप्रमाणे भारीच. त्यामुळे नाटक बघायला धमाल येते. कविता लाड ह्याही नाटकात भारी दिसते.
सध्याच्या राजकारणाबद्दलचे काही काही पंचेस मस्त जमतात. 'ती परी अस्मानीची' आणि 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' ही दोन्ही गाणी पुन्हा ह्या नाटकात आहेत. प्रशांत दामलेच्या आवाजात ऐकायला छान वाटतात.

हरवलेल्या पत्त्यांचा बंगला बघितलं आज. अप्रतिम नाटक. सगळे कलाकार चपखल बसतात भूमिकेत आणि सुरेख काम करतात. दीप्ती छान दिसते आणि कामही छान करते. वंदना ताईंनी खूप म्हणी वापरल्या आहेत आणि त्यांचे संवादही चुरचुरीत आहेत. मध्यंतरानंतरचे त्यांचे संवाद टाळ्या घेणारे होते. चुकवू नये असं नाटक.

मध्यंतरी 'झुंड' नाटक पाहिलं.
दिवाणखान्यातल्या मराठी नाटकांहून वेगळं म्हणून आवडलं. विषय समकालीन, सामाजिक आहे. (आणखी काही सांगितलं तर स्पॉयलर होऊ शकतो.) तो विषय पाहता शेवट जरा आदर्शवादी वाटला. पण बघण्यासारखं आहे.

नुकतेच आमनेसामने पहिले.मस्त आहे नाटक serious विषयाला खमंग विनोदाची फोडणी.लीना भागवत,मंगेश कदम दोघेही आवडतात पण रोहन आणि मधुराचे कामही मस्त झालंय.must watch

आई-बाबा “माझी माय सरसोती“ नाटक पाहून आले. फार तारीफ करत होते. इथल्या नाट्यप्रेमींच्या माहीतीसाठी.

आमने सामने (शशांक केतकर) आणि सारखं काहीतरी होतय (प्रशांत दामले) ही दोन नाटके कशी आहेत? कोणी पाहिली आहेत का?

Pages