नाटक कसे वाटले?

Submitted by webmaster on 2 June, 2008 - 20:43

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चारचौघी पाहिलं. खूप ऐकलेलं नाटकाविषयी, सर्वात महत्वाचं म्हणजे रोहिणी हट्टंगडी मुक्ता बर्वे कांदबरी आणि पर्ण पेठे यांना प्रत्यक्षात बघायला मिळणे आणि त्यांचा अभिनय पाहायला मिळणे .चौघी जणींचं काम चांगलं आहे.तसही मुक्ताचा अभिनय पाहायला मिळणं पर्वणी असते रोहिणी हट्टंगडी बद्दल मी काय बोलणार एवढ्या सशक्त जेष्ठ अभिनेत्री आहेत. कादंबरीचं एवढं काम पाहिलं नाही एका सिरीयल मध्ये थोडं पाहिलं होतं पण इथे आवडली उलट पर्ण पेठेचा रोल जरा प्रोग्रेसिव्ह न वाटता गोंधळलेला वाटतो अभिनयही ठीकठाक कदाचित ज्यून्या जमान्यात फार फॉरवर्ड वाटत असावं .

नाटक मला ठीक ठाक वाटलं उलट थोडा अपेक्षाभंगच झाला मी जरा जास्तच अपेक्षा घेऊन गेले होते पण हल्ली जुनी नाटकं नव्या संचात तरी पाहायला मिळतायत हे आपलं भाग्य आहे .त्यामुळे नाटक पाहा रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय आणि मुक्ता कादंबरीचा मोनॉलॉग फार उत्तम जमून आलाय .

मी वर्षभरापूर्वी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये चारचौघी पाहिलं तेव्हाची एक आठवण. मुक्ता बर्वेचं ते फोनवरचं मोठं संभाषण कम स्वगत आहे त्याच्या एखाद मिनिट आधी नेमका प्रेक्षकातील कोणाचा तरी मोबाईल वाजला. त्याबरोबर स्टेजवर असलेल्या इतर दोघीजणी जागच्याजागी फ्रीझ झाल्या आणि मुक्तानं भुमिकेतून बाहेर येत प्रेक्षकांना संयत शब्दांत उपदेश केला. तिनं त्यात सांगितलं की नाटक सुरू असताना असा मध्येच मोबाईल वाजला तर एकाग्रता भंगते. आता पुढे तिचं मोठं स्वगत आहे तर असा अडथळा येऊ देऊ नका इ. इ.

तिचं हे बोलून झाल्यावर नाटक थांबलं होतं तिथून पुन्हा सहज सुरू झालं.

हे खूपच शिस्तशीर झालं. पण याचा अर्थ असा की ही परिस्थिती नेहमी येत असणार. प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी पाळायला हवी इतकं साधं सुशिक्षित लोकांना कळू नये याचा खेद वाटला.

मी वर्सेस मी - क्षीतिश दाते, शिल्पा तुलस्कर आणि ह्रिशिकेश जोशी. एक वेगळा विषय आणि नेपथ्य बघायला मिळाले. नक्की बघा.

चारचौघी दोन अंकी करून जरा सुटसुटीत करता आलं असतं. पहिले दोन अंक चांगले आहेत. तिसरा पर्ण पेठेचा खूप कंटाळवाणा वाटतो. तेव्हाच्या काळात ते शॉकींग वगैरे वाटलं असेल पण आता नाही तसं वाटत. आधीच्या संचातही (दीपा श्रीराम, वंदना ) हे नाटक पाहिले आहे आणि ते जास्त सरस वाटले होते. अर्थात नाटक पाहिलेला तो काळ त्या वेळचा, अनेक वर्षांपूर्वीचा होता हेही एक कारण असू शकते.
मधल्या बहिणीला अजून थोडा वेळ द्यायला हवा होता थोडा तिसर्‍या बहिणीवरचा वेळ कमी करून असं वाटलं.

गेल्या आठवड्यात मुलीसोबत आजीबाई जोरात नाटक बघितले. खूप आवडले. नाटकाची थीम मस्त आहे. मुलांना सोबत घेऊन नक्की बघा. नाटक संपल्यावर मुलांना नाटक बघितल्याबद्दल सर्टिफिकेट आणि वही दिली.

काही दिवसांपूर्वी शिकायला गेलो एक पाहिले. खूप उत्साहाने मैत्रिणी मिळून शुभारंभाचा प्रयोग पाहायला गेलो. १० मिनिटे खूप निर्मळ हसू आले. नंतर मात्र नाटकाने पातळी सोडली असे वाटले. पिंजरा सिनेमा चा सद्य स्थितीतला अवतार वाटला, पण त्या मास्तरांची सद्-असद् विवेकबुद्धी इथे नाही. उलट जे बदल झाले ते justify केलेत नाटकात. विनोदी न वाटता सवंग वाटले.

पिंजरा नाही. द.मा. मिरासदारांच्या व्यंकुची शिकवणी या कथेचं नाट्यरूपांतर.

हो, ते नाटकात पण सांगतात. ती कथा अनेक अनेक वेळा वाचली आहे. ती अशी सवंग नाही वाटत.
ह्या नाटकातून काही लोक उठून गेले.

आजीबाई जोरात मलाही फार आवडलं, मागच्यावर्षी बघितलं. निर्मितीताई आणि अभिनवची एनर्जी कसली आहे, सहीच एकदम. जाम एन्जॉय केलेलं.

काल झी नाट्य गौरव 2025 बघितलं त्यात त्यांनी अनेक नाटकांचे छोटे-छोटे प्रवेश सादर केलेत. खूप सुंदर होता. त्यात आजीबाई जोरात चा एक प्रवेश केलाय अतिशय आवडला. तो बघूनच असं वाटलं की नाटक खूप छान वाटत असेल.

शिकायला गेलो एक चा सुद्धा प्रवेश होता. तो प्रशांत दामले आणि त्यांच्या शिष्याने, दोघांनीही धमाल सादर केला.
पण कदाचित पूर्ण नाटकात सवंगपणा तुम्ही म्हणताय तसं वाढत गेला असेल. अजूनही एक-दोन ठिकाणी असंच ऐकायला मिळालेल.

शिकायला गेलो एक नाटक पाहिले नाही पण ते ज्या कथेवरून घेतले आहे ती मिरासदारांची कथा फारच मस्त आहे. कथेत मास्तर तसा तरूण आणि अविवाहित दाखवला आहे त्यामुळे जे काय घडतं ते कुठेही सवंग वाटत नाही. नाटकात दामलेंना मुलगी दाखवली आहे आणि वयानेही मोठे दाखवले आहेत त्यामुळे रुपांतर करताना योग्य ते बदल केले नाहीत तर सवंग नक्की वाटू शकेल.
प्रशांत दामले यांनी त्यांच्या नेहमीच्या पठडीतील नाटके सोडून जरा वेगळ्या काही भूमिका कराव्यात अशी इच्छा आहे...ते बहुतेक एक स्वप्नच राहाणार आहे Happy

प्रशांत दामलेला तरूणपणी पिक्चरमधे तशा वेगळ्या भूमिका मिळायला हव्या होत्या.
रूपडं भारी होतं तेव्हांचं..

शिकायला गेलो एक नाटक पाहिले नाही पण ते ज्या कथेवरून घेतले आहे ती मिरासदारांची कथा फारच मस्त आहे. कथेत मास्तर तसा तरूण आणि अविवाहित दाखवला आहे त्यामुळे जे काय घडतं ते कुठेही सवंग वाटत नाही. नाटकात दामलेंना मुलगी दाखवली आहे आणि वयानेही मोठे दाखवले आहेत त्यामुळे रुपांतर करताना योग्य ते बदल केले नाहीत तर सवंग नक्की वाटू शकेल. >>>

व्यंकूची शिकवणी आज ऐकली... आवडली. दळण, माझ्या बापाची पेंड वगैरेच्या अंगानी जाणारी विनोदी पण कुठेही तोल न ढळणारी..

गोष्ट ऐकल्यावर मलाही तसंच वाटलं, की कदाचित नाट्यरूपांतर करताना तो समतोल राखता आला नसावा , तसेच आधुनिकीकरण किंवा नागरिकरण करण्याच्या प्रयत्नातही काही अंशी अयशस्वी झाला असू शकतो.

पण हे बऱ्याच वेळा बघितलंय की पुस्तक किंवा गोष्टीत जेवढा चांगला अनुभव मिळतो पण त्याचं नाट्यरूपांतर किंवा सिनेमा किंवा मालिका करतात तेव्हा ते तेवढं प्रभावी होत नाही.

इंग्लिश मध्ये ही असं जाणवलं आहे.

मला वाटतं अपवाद फक्त श्रीयुत गंगाधर टिपरे चा असावा.. त्यांना मालिकाही मस्त जमली होती.

पण हे बऱ्याच वेळा बघितलंय की पुस्तक किंवा गोष्टीत जेवढा चांगला अनुभव मिळतो पण त्याचं नाट्यरूपांतर किंवा सिनेमा किंवा मालिका करतात तेव्हा ते तेवढं प्रभावी होत नाही.>>

ते रूपांतर कसं केलंय त्यावर ते अवलंबून आहे. सत्यजित रे यांनी अनेक प्रसिद्ध बंगाली कथांवर चित्रनिर्मिती केली होती. पाथेर पांचाली, चारुलता, तीन कन्या ही काही उदाहरणे. त्यातील मूळ बंगाली कथांचे अनुवाद मी वाचले आहेत आणि रे यांनी चित्रपटात त्याला पूर्ण न्याय दिला आहे. मराठीतही 'न पटणारी गोष्ट' या कथेवरून कुंकू हा अतिसुंदर चित्रपट निर्माण झाला होता. स्वामी जुनी मालिकाही पुस्तकाला न्याय देणारी होती. woman in white वरून श्वेतांबरा ही जुनी मराठी मालिकाही चांगली जमली होती.

पण ही जुनी उदाहरणं आहेत हे ही खरंच. हल्ली नवीन अशी उदाहरणं पटकन डोक्यात येत नाहीत Sad

श्वेतांबरा आजच्या काळात असती, तर मीमचा पाऊस पडला असता. कदाचित पहिलाच डेली सोप म्हणून हवा झाली असेल. पण शेवट पाहिल्यावर आम्ही तरी केस उपटले होते.

मराठी कथांवर दूरदर्शन आणि झी मराठीने मालिका केल्या होत्या. व्यंकुची शिकवणी हिंदीत डब केलेला भाग दूरदर्शन यु ट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. निखिल रत्नपारखी आणि अंशुमन विचारे प्रमुख भूमिकांत.

तुम्ही दिलेली उदाहरणं मी त्याचा विचार केला नव्हता.. पण माझ्या डोळ्यासमोर अलीकडेच आलेले बरेच नेटफ्लिक्स शोज, वेब सिरीज, काही नाटकं आणि त्याची ओरिजिनल पुस्तक यांची तुलना होती.

खरंतर अद्वैत दादरकर चांगलं काम देतो पण काय माहिती..
नाटक बघितल्यावर कळेल /ठरविता येईल.

असेन मी, नसेन मी. __ मराठी नाटक
निर्मिती आणि दिग्दर्शन - अमृता सुभाष
लेखन - संदेश कुलकर्णी
प्रौढपणी होणारे विस्मरण, डिमेंशन ही या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे. विषयामुळे, त्यातील कलाकारांच्या नावांमुळे बरेच दिवस ऐकून होते या नाटकाबद्दल. त्यामुळे पाहिले.
नीना कुलकर्णी यांचा अभिनय उत्तम झाला आहे. प्रयोगात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाताना बदलणारी देहबोली आणि संवादफेक अचूक पकडली आहे. शुभांगी गोखले यांच्या अभिनयाला पण दाद द्यावी असा चांगला आहे. अमृता सुभाष मला फार कधी आवडली नाही , तशी यात पण नाही. तिचा अभिनय बऱ्याचदा मला थोडा बटबटीत वाटतो (आवाजाची चढ उतार, हावभाव आणि हातवारे सगळेच जास्त प्रमाणात करते असं वाटतं).
पण नाटकाचा एकूण प्रभाव पडत नाही. विस्कळीत वाटलं. एक दोन प्रसंग सोडले तर नाटक किंवा संवाद मनाला भिडत नाही. याचे मूळ नाट्यलेखन आणि संहिता बांधण्यात असावे.
विस्मरण हा मूळ गाभा असला तरी इतर कमीतकमी १०/१२ गोष्टीना घुसडून संहिता पातळ झाली आहे. ( See spoiler below).
नेपथ्य चांगले आहे पण तीनही खोल्या passage मध्ये उघडतात, एकाही खोलीतून दुसरीकडे थेट जाता येत नाही आणि जा ये पुष्कळ आहे. ते जरा विचित्र वाटले. दोन प्रवेशांमध्ये, मध्यंतरानंतर पण blackout जरा जास्त वेळ असतो त्यामुळे थोडा रसभंग होतो. कपडेपट चांगला आहे पण अमृता सुभाष खूपच विविध कपड्यांमध्ये दिसते( अती जाणवण्याइतके कपडे बदलले आहेत)
हल्ली २/३ नवीन नाटकात असे पाहिले आहे की नाटकातील व्यक्तिरेखा या त्या पात्राचे ठाशीवपण दाखवण्यापेक्षा जे कलाकार ती व्यक्तिरेखा साकारणार आहेत त्याच्या अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन कसे जास्त होईल या विचाराने लिहित असावेत. अमृता सुभाष आणि शुभांगी गोखले यांनी साकारकेलेल्या पात्रांच्या बाबतीत असे काहीसे झाले असावे असे वाटते.
एकूण नाटक ठीक आहे. एकदा बघायला हरकत नाही.
(### छोटासा स्पॉयलर - - अनेक कोंबलेले विषय असे - व्यसन, इतर दुखणी, नवरा बायको यांच्यामधले ताण , एकल पालकत्व, मतिमंदत्व, घटस्फोट, मुलगा मुलगी भेद, आई मुलीच्या नात्यातले तणाव, ऑफिस आणि मॅनेजमेंट आणि त्यातील male dominance, नवऱ्याचे possessive वागणे, सासूच्या संसारातील दुःखे......)

असेन मी नसेन मी वाटलं होतं चांगल असेल.. (जमलं तर) बघायच्या यादीत टाकायचं होता... अर्थात एक किंतू अमृता सुभाष कितपत झेपेल हा होताच.. Happy

******
जर तरची गोष्ट..

हे नाटक लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप या भोवती फिरणारं आहे.

लग्न असो किंवा (लिव्ह-इन) रिलेशनशिप, ती एक ठराविक/ मर्यादित(?) कमिटमेंट , देवाण - घेवाण (गिव्ह and टेक), सुसंवाद, आणि मुख्य म्हणजे एकमेकांना आवश्यक तेव्हढी दिलेली स्पेस यावर उभी असते. जर एखाद पारडं कमी/जास्त भझालं की त्या नात्याचा तोल बिघडला जाण्याची शक्यता वाढते.. हा नाटकाचा गाभा.
आशुतोष गोखले, प्रिया बापट, उमेश कामत आणि पल्लवी अजय चढत्या भाजणीत स्वतः च्या स्पेस विषयी जागृत किंवा less dependant दाखवलेत.

उमेश आणि प्रियाच्या साखरपुड्यापासून नाटकाला सुरुवात होते.
लगेचच पुढच्या प्रवेशात उमेश आणि पल्लवी जमिनीच्या व्यवहारासाठी एक हॉटेलवर येतात, तिकडेच प्रिया आणि आशुतोष येतात. तेव्हा प्रेक्षकांना कळते की उमेश आणि प्रियाचे लग्न होऊन, घटस्फोट होऊन काही काळ गेला आहे. तिथून मग पुढील नाटकाला सुरुवात होते. फ्लॅशबॅक मध्ये प्रिया उमेश च्या घटस्फोटाचे (संभाव्य) कारण अगदी थोडक्यात सांकेतिकपणे दाखवले आहे. त्यानंतर मग ही जर तर ची मालिका सुरू होते.. जर आपण एकमेकांना सगळं सांगितलं असतं तर, जर आपण वेळेत मदत मागितली असती तर, जर मी खूप पझेसीव्ह झालो नसतो तर.. वगैरे वगैरे

सगळ्यात लक्षात राहिलेलं वाक्य म्हणजे, उमेश कामत म्हणतो,
“ म्हणजे बघ हं जर हे लग्न वगैरे ठरलं / झालं की लगेच डोळे मिटून परत उघडले की डायरेक्ट लग्नाला दहा वर्ष होऊनही गेलीयेत.. आणि सुखाने संसार सुरू आहे असं झालं तर… “ - म्हणजे इन्स्टंट (noodles/) रिझल्ट सारखे..सुरुवातीचे टक्के टोणपे, मुलांच्या खस्ता वगैरे सगळे चढउतार बायपास करून थेट रेडीमेड संसार २ मिनिटात तयार.. Happy

नाटकाची सुरुवात थोडी ढिली वाटली पण मग हळू हळू नाटकाने पकड घेतली. काम सगळ्यांचीच तशी चांगली ते ठीक या रेंजमध्ये आहेत. काही बाबतीत बारकावे चांगले दाखवलेत - उमेशच्या हाताची खाज मधून दाखवलेला त्याचा स्ट्रेस, आशुतोषचे स्ट्रेस आला की मोठ्या आवाजात न कळणारे संगीत ऐकणे, त्याचा पॅनिक अटॅक, प्रिय बापटची देहबोली विशेष करून ज्यावेळी ती सतत आधार शोधत असते, पल्लवी अजयचा बिनधास्तपणा.
उमेशने वाजवलेलं गिटार आणि प्रियाने म्हंटलेले गाणे ही सम पण चांगली जमवली आहे. उमेशने अजूनही स्वतःला खूप चांगल मेंटेन केले आहे आणि त्याचा प्रेझेन्सही त्यामुळे सुखावह वाटतो. प्रिया बापटची एकंदर छाप थोडी टिपिकल जशी ती मुलाखतींमध्ये वगैरे बोलते तशीच जाणवत राहिली. उमेशचा शेवटचा रडण्याचा सीन थोडा नाटकी किंवा ओव्हर वाटला. आशुतोष ही कधी कधी थोडा लाऊड किंवा आक्रस्ताळी वाटत होता पल्लवी अजय चे काम मी पहिल्यांदा बघितले.. तिने आत्मविश्वासु, बिनधास्त, करियर माईंडेड, स्वतःच्या स्पेसचा आग्रह धरणारी अशी व्यक्तिरेखा अतिशय सहजपणे उभी केलीये.

मी प्रिया उमेश यांच्या अलीकडे आलेल्या नाटकापैकी पाहिलेलं हे पहिलंच नाटक.
आतापर्यंत लग्न किंवा नातेसंबंध या भोवती फिरणारी अनेक नाटक येऊन गेली आहेत. सुरुवातीला हुंडा पद्धती, एकत्र कुटुंबपद्धती, सासू सुनेचे खटके - नोकरीवरून , कामावरून त्यात मुलाची होणारी ससे होलपट, राजा राणी चा संसार, त्यातला/ ली तिसरा/ री, मुल होणे/ न होणे वगैरे वगैरे असे मुद्दे कालपरत्वे येत गेले. परतू या पलीकडे जाऊन नात्यात लागणारा ( वर म्हटल्या प्रमाणे) सुसंवाद, एकमेकांप्रती विश्वास, एकमेकांना मिळालेली किंवा राखलेली स्पेस पण त्या बरोबरच असलेली आणि दाखवलेली कमिटमेंट या अत्यंत कळीच्या मुद्द्यावर भाष्य करणारी ही कलाकृती आजच्या काळाच नाटक - बदललेल्या समाजाचा आरसा - वाटते. अर्थात ही नाटकाची एक जमेची बाजू झाली

एकंदर नाटक चांगलं/ ठीक आहे एकदा पहायला हरकत नाही.

जाता जाता अजून एक -

बे एरियातील प्रयोगाविषयी, नेपथ्य छान होतच. पण महत्वाच म्हणजे ते येथील स्थानिक @CALAA कारांनी केले होते. उमेश कामत ने स्वतः केलेल्या कौतुकामुळे त्यामागे या सगळ्यांनी केवढे कष्ट घेतले ते कळले. तसेच प्रकाश संयोजक म्हणून टेक्सास मधील एका व्यक्तीने (मी नाव विसरले) अमेरिकेतील तिन्ही प्रयोगांचे काम बघितले. इकडे ही सर्व नाटकं/ कार्यक्रम आम्हाला बघायला मिळतात त्यामागे बऱ्याच नाट्यप्रेमी / कलाप्रेमी स्वयंसेवकांचे एकत्रित परिश्रम असतात.

PXL_20250505_021216321~3.jpg

ईकडे एका मराठी संस्थेच्या कृपेने वाडा चिरेबंदी नाटक पाहायला मिळालं आणि आवडलं. वडिलोपार्जित वास्तू, जमिनी, दागदागिने त्यातले हेवेदावे, भावा बहिणींमधे त्यावरून असलेली तेढ, हे सगळं मी अनुभवलं आहे त्यामुळे रिलेट झालं बर्‍यापैकी. कलाकार संच पण सगळा उत्तम होता. निवेदिता जोशी खास करून आवडली. करतील स्गळ्यांसाठी सगळं पण तोंडाने बोलून घालवणार अशी वहिनी तिने उत्तम साकारली आहे. मुंबईत राहात असलेल्या जावेबद्दल थोडी असुया, इर्षा, दिरावरचं प्रेम सगळे एक्प्रेशन्स तिने बोलण्याच्या लकबीतून बरोबर दाखवलेत. वैभव मांगले, प्रसाद ओक तर बेस्ट आहेतच.
बाकी ३५ वर्षापूर्वीचा लहानशा गावातला काळ पण चांगला उभा केला आहे. पूर्ण नाटक फक्त वाड्यामधेच घडतं. तिथल्या वेगवेगळ्या खोल्या, त्याच्या जाण्या येण्याची रचना, माजघर, अंगण, ओटी सगळं बघायला फार छान वाटलं. एका सीनमधे सगळा अंधार आणि वैभव मांगले हातात कंदील घेऊन माजघरात जातो ती फार परक्फेट प्रकाशयोजना वाटली. ओव्हरॉल मस्त!

Pages