माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटलेली लसूण नेहमीच हिरवी होते.. (खराब होत नाही). तसे होऊ नये असे वाटत असेल तर त्यात लिंबू रस टाकावा... (भरपूर टाकलात तर रंग बदलत नाही, पण लिंबू स्वत:चा आंबटपणा आणतं.. थोडा टाकलात तर अजून काही दिवस हिरवी होत नाही पण नंतर होते).

मी नवीन IFB 3 in 1 मायक्रोवेव्ह ओव्हन घेतला, आधी मी कुकरमध्ये केक करायचे, तेव्हा छान फुगायचा केक, आता तेच प्रमाण वापरुन केक केला, आणि कनव्हेक्शन मोडवर १८०C ला ४०मिनीटे ठेवला तरी केक तळाला चिकटला नीट फ़ुगला नाही, केकचा टीन ग्रीस अणि मैद्याने डस्ट करुन घेतला होता, ओव्हन प्रीहीट पण केला होता.
ती आतली गोल काच असते त्यावरच टीन ठेवायचा ना? ओव्हन प्रीहीट नक्की कसा करायचा? माझं नक्की काय चुकलं? मदत करा.

ओव्हन प्रीहीट पण केला होता.
ओव्हन प्रीहीट नक्की कसा करायचा? >> मायक्रोवेव्ह ओव्हनचं कन्व्हेक्शन मोडचं बटण दाबलं की आपोआप तापमान येऊन ओव्हन प्रीहीट व्हायला लागतो. तुम्ही कसे प्रीहीट केलेत? १८० डिग्रीवर ३० मिनिटे हे अगदी स्टॅन्डर्ड आहे, आणि बरेच केक या सेटिंगला व्यवस्थित होतात. तुमच्या केकचे प्रमाण जास्त होते का? ओव्हन बरोबर त्याची वापरायची पुस्तिका आली असेल. त्यात ओव्हनची, प्रीहीट कसे करावे इत्यादी माहिती तपशीलात आली असेल. त्यावरून कदाचित तुमचे नक्की काय चुकले ते कळावे.

तुमचे तुमचे काय म्हणताय मी काय म्हातारी नाहिये, तु म्हणा.
उत्तर दिल्याबद्द्ल धन्यवाद,
ते कुकबुक मिळालय पन त्यात दिलं तेच केल. प्रिहिट करायचा कसा ते महिती नव्हत मे ५-१० मिनीटेचं केला आणि केक आत ठेवला, प्रिहिट करायला ३० मिनिट्स लागतात का?

मुग्धा, मावेवर प्रीहिट असा रेडी मेनू असतो. तुझ्या ओव्हनवर तो आहे का बघ. त्यात साधारण पंधरा मिनिटे प्रीहिटसाठी लागतात.

दुसरं कारण म्हणजे केकमधे वापरलेले मैदा, बेकिंग पावडर/ सोडा जुनं झालं होतं का ते तपासून पहा.

बहूतांशी मावेमध्ये कन्व्हेक्शन मोडमध्ये प्रिहीटचा वेळ आपोआप घेतला जातो. माझ्या ओव्हनमध्ये ५-७ मिनीटांच्या आसपास लागतो वेळ. माझ्या मावेमध्ये कन्व्हेक्शन मोडमध्ये केक करताना केकचं भांड सोबत दिलेल्या एका रॅकवर ठेवावं लागतं, डायरेक्ट काचेवर न ठेवता.

तुमचे तुमचे काय म्हणताय मी काय म्हातारी नाहिये, तु म्हणा.>> Lol बर!

प्रिहिट करायला ३० मिनिट्स लागतात का?>> नाही. मी वर केकला लागणारा वेळ लिहिला होता तो. माझ्याकडे एलजीचा मावे आहे. त्यात आपोआप प्रीहीट होते. मी वेळ मोजली नाही कधी. पण ३० मि. नक्कीच नाही लागत Happy तुझ्याकडे मावे कंपनीचा माणूस डेमो द्यायला आला होता का? आला नसेल तर त्याला बोलाव आधी आणि शंकानिरसन करून घे.

माझ्या मावेमध्ये कन्व्हेक्शन मोडमध्ये केक करताना केकचं भांड सोबत दिलेल्या एका रॅकवर ठेवावं लागतं, डायरेक्ट काचेवर न ठेवता.>>> +१

ते रॅकचे बरोबर आहे एक रॅक मिळते त्यावर भांडे ठेवले तरच केकला हवी ती उष्णता त्या प्रमाणात मिळते. प्रीहिट चे वेळ पण प्रीसेटच असते. पुस्तकात सूचना असेलच. नाहीतर मुख्य म्हणजे कंपनीच्या माणसाकडून डेमो घ्या. त्ये बेस्ट.

एक स्टॅन्ड मिळालाय स्टीलचा तो बहुतेक ग्रील साठी आहे अणि एक काळ्या रंगाचा आहे, कोणता वापरु?
आणि मंजिरी ताई सोडा बहुतेक जुना झालाय हे पण बदलून बघते. नक्कि केक कसा ठेवायचा ते सांगा ना, आणि नानकटाइ सुद्धा, डेमोवाला संध्याकाळी ऑफिसमधुन गेल्या गेल्या डेमो द्यायला आला, त्याने काय सांगितल घाईघाइत ते कळलचं नाही.

दक्षिणा आहे का? मागे कुठेतरी म्हणाली होतीस ना की मटकीच्या उसळीकरता मटकी कुकरला शिजवून घेऊन जर पुन्हा शिजवली तर अगदी मेण होते. म्हणून काल हा फोटो काढलाय. कुकरला दोन शिट्ट्या करुन घेऊन पुन्हा बाहेरही शिजवलीये.

mataki usaL 1.jpg

एक भा.प्र. इतक्या वेळा मटकी का शिजवावी लागते? आधी शिजलीच नव्हती का? मी सरळ फोडणीबिडणी करून मग झाकण लावून किंवा स्लो कुकरला शिजवते.

वेका, कुकरला लावणं/न लावणं हा आपला चॉईस आहे. मला एखाद दोन शिट्ट्या काढल्या की बाहेर कमी शिजवून चालते म्हणून कुकर बरा वाटतो.

अगं स्लो कुकरच्या धाग्यात लिहिलंय न कुणीतरी तसंच. फोडणीला कांदा इ. घातलंस की मटकी/मसूर जरासे परतले की स्लो कुकरमध्ये घालून बुडेस्तो पाणी घालून शिजवायचं. वेळ आत्ता आठवत नाहीये. पुन्हा केली की सांगेन.

सायो पाहिली तुझी मटकीची उसळ. (जळून खाक झालेय मी. ) Proud
माझा कुकर लईच फास्टात दिसतोय.
आता तूच सांग मेण होऊ नये म्हणून काय करू ते.

माझ्याकडून नेहमी पराथा करताना फाट्तो. मा का चु. ईथल्या मुळ्याच्या पराठा प्रमाणे पराथा केला तरी तो सुद्धा फाट्ला. प्लीज काही टिप द्या ना.

हा फोटो बघून उसळ बनविली आणि खाल्ली पण.

pl put little oil in the paratha paari before putting the filling and close it. Mag halkya haaathaane laaTA. khaalee peeth pan have. make small shapes first.

रेड व्हेलवेट केक साठी अगदी रास्प बेरी रेड कलर घातला तरी पिंकच येतो कलर. बीट रूट ज्यूस घातला तर तो लाल कलर येइल. बीट रूट ज्यूस कसा घालायचा आणि किती प्रमाणात? जर ४ अंड्यांचा केक असला तर?

अश्विनी,
एक मोठे बीट उकडून किसून घे. तो किस पिळून घेतल्यावर जे पाणी निघेल ते तुला हव्या त्या शेडचे असेल पण केकमधे घालताना ते आटवावे लागेल. आटवल्यावर छटा थोडी दाट होईल. पाकाप्रमाणे दाट झाल्यावर वापरण्याजोगा होईल असे वाटतेय, ( पण मी प्रयोग केलेला नाही. ) केकमधली थोडी साखर कमी करुन ती या रसात घालून देखील आटवता येईल.

माझ्या अंदाजाप्रमाणे दोन टेबलस्पून असा आटवलेला रस लागेल.

पिंकी,
पराठ्यासाठी सारणाची आणि कव्हरच्या पिठाची कसिस्टन्सी अगदी बरोबर हवी. तरच पराठा नीट लाटता येतो.
त्यापेक्षा दोन वेगळ्या पण खात्रीच्या पद्धती.

१) सारण पराठ्यात न भरता, पुर्ण पोळी लाटून, तिच्या अर्ध्या भागावर सारण पसरून चंद्रकोरीप्रमाणे घडी घालायची. काठ नीट जुळवून तशीच चंद्रकोर भाजायची. एका वेळी दोन भाजता येतात.

२) सारण शिजवले कि त्यातच पिठ घालून नीट मळायचे. पण जरासे घट्टच ठेवायचे. असे पराठे लगेच लाटावे लागतात.

Pages