शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंड्रेला, केदार
'झेप'मध्ये मला पृष्ठ ५७ वर दुसर्‍या परिच्छेदात 'मोतिया'चा असा एक संदर्भ सापडला.
'हातातल्या मोतियाच्या गजर्‍याचा वास घेऊन समेची थाप श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी मांडीवर मारली..'
पण इथे मोतिया निश्चितच मोगरा या अर्थाने आला आहे.

अजून एक संदर्भ तोही मोतिया, मोगरा या अर्थानेच असावा
'मल्हारबारी मोतियाने द्यावी भरून नाहीतर देवा..देवा मी जातो दुरून'

'मोतिया' चा मोतीविक्या असा संदर्भ वाचल्याचे माझ्या स्मरणात नाही. अजून थोडी पुस्तकं चाळून बघीन तसा संदर्भ मिळतो का.

स्वामी, श्रीमान योगी, शिवचरीत्र ह्या तीनही पुस्तकांत आहे.

बशी मराठी आणि कप मात्र इंग्रजी असं का?

ही पुस्तके वाचून फारच वर्षे झालीत. Sad

आता वरच्या पोष्टींचा गोषवारा थोडक्यात...

मोती(ए), साठी मोती, मोतिये, मोत्ये अशी तीन अनेकवचनी रुपे वापरल्याचे दिसते.
मोतिया(ए), मोती विकणारा या अर्थाने, अनेकवचनी रुप मोतिये.
मोतिया - मोगरा अशा अर्थानेही वापरतात.

मूर्ती बघितल्या.
हत्ती माजले.
मती गुंग झाल्या. >> म्हणजे नक्की नियम काय आहे ते लिहिशील का माहिती असेल तर ....

'मोत्यें' या शब्दाविषयी :

व्याकरणाच्या नियमांनुसार 'मोती' हा शब्द नपुंसकलिंगी आहे. पाणी, लोणी, आशी, केंबरी हे याच गटातील काही शब्द. या शब्दांची अनेकवचनी रुपे मोत्ये, लोण्ये, पाण्ये, आश्ये, केंबर्‍ये अशी होतात.
मात्र 'मोती' हा शब्द पुल्लिंगी मानल्यास त्याचे अनेकवचनी रूप हे 'मोती' असेच होते. अनेकवचनी रुपे दर्शविण्यासाठी पूर्वी अनुस्वार वापरत. जसे, 'मोतीं'. आता तशी पद्धत नाही.
मात्र राज्य शासनाच्या नवीन नियमांनुसार 'मोती' हा शब्द पुल्लिंगी मानला जाऊन त्याचे अनेकवचन 'मोती' असे होते.
जुन्या पुस्तकांत सर्वत्र 'मोत्यें' हेच रूप आढळेल कारण तेच रूप रुढ होते.

आशी - पोहे पाखडताना सुपात मागे राहणारे छोटे तुकडे.
केंबरे - छपरावरून पडणारे गवताचे लहान तुकडे.

>केंबरे - छपरावरून पडणारे गवताचे लहान तुकडे.
अरे हे काहीतरी नविनच ऐकतोय... मग ते धान्यात "केंबरं" झाली म्हणतात ते काय? पोरकिड्या सारखा प्रकार असा माझा समज होता Sad

एकाचं होतं ते भजं आणि अनेकांच होतं ते ही भजं >>>
एकंदरीत या बीबीचे भजं झालय. Proud

केप्या, मिसळीचा वृत्तांत दे आधी .. भजींवर घसरू नकोस इतक्यात Proud

मला वाटतं मोतिया ही मोगर्‍याची एक जात आहे. जसा डबल मोगरा, हजारी मोगरा तशी.
एक प्रश्न. मराठीत मेंदी च म्हणतात ना? मग मेहंदी असा हिंदीसारखा शब्द मराठीत सर्रास का वापरतात ?संदर्भ : केसांचे आरोग्य हा बीबी व दैनंदिन वाचनातून उद्भवलेला प्रश्न. Happy

विदर्भात साळ्सुद या अर्थाने वापरण्यात येणारा शब्द हा उजागिरी आहे की उजागरी ?
धन्यवाद !

अनुदोन, उजागिरी हा शब्द विदर्भात आहे पण तो साळसुद या अर्थी वापरत नाही तर 'स्वतःची चूक असताना उघडपणे निर्लज्जपणे' बोलणारा/सांगणारा त्याला उजागिरी म्हंटले जाते. साळसुदला विदर्भात शावासारखा हा शब्द वापरतात.

उजागिरी हा शब्द हक्क या अर्थाने वापरला जातो ना? त्याचा निव्वळ विदर्भाल्या मराठीशी संबंध नाही.

चिनूक्स, धन्यवाद !!!

नि:संदेह व निस्संदेह ही दोन्ही रुपे वापरता येतात. याच न्यायाने निस्संशय हा शब्दही योग्यच.
प्रा. यास्मिन शेख यांच्या शब्दलेखनकोशात ही रुपे दिली आहेत.

चाहूल की चाहुल ?
आतूर की आतुर ? नेहेमी फसगत करणारे शब्द आहेत. जाणकारांनी सांगावे.

~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

<<मग मेहंदी असा हिंदीसारखा शब्द मराठीत सर्रास का वापरतात ?>>
हे आजकालचे सुधारलेले, प्रगल्भ झालेले मराठी आहे. त्यात मराठी शब्द माहित असला तरी हिंदी, इंग्रजी शब्द नेहेमीच वापरले जातात. जसे, गाडी उशीरा आली ऐवजी गाडी लेट आली.

चिनूक्स ...

भाकरी चे अनेकवचन भाकरी का भाकर्‍या? आम्ही भाकर्‍या म्हणतो कारण

तसेच आरत्या असेच सर्रास सर्वजण वापरतात

ह्यासाठी काय नियम आहे का?

नोकरी : नोकर्‍या

पापणी : पापण्या

लावणी : लावण्या

मूर्ती : मूर्ती (मूर्त्या का नाही मग?)

-------
हे ऐकलेत का? मराठी गझल इ-मुशायरा

मिल्या मला वाटतेय कि नियम असेल कि ईकारांत शब्द असेल तर अनेकवचन या लावून होते. पण मूर्ती सारखे काही शब्द ज्यांचे वेगळे अनेकवचन आधीपासून प्रचारात असेल म्हणून तिथे नियमाचा अपवाद केला गेला असेल. खर खोटे परमेश्वर जाणे.

'आरत्या' मीही सगळीकडे ऐकलाय.
भाकरी, मूर्ती>> 'लेणी' पण याच प्रकारात मोडतो ना? एक लेणी, अनेक लेणीच ना? असे अनेकवचन होणारे अजून आहेत कुठले ईकारान्त स्त्रीलिंगी शब्द?

एक लेणी, अनेक लेणीच ना?<<< एक लेणे (नपुसकलिंगी), अनेक लेणी.

>>>>चाहूल की चाहुल ?
आतूर की आतुर ?

जयावि, मी जाणकार नाही पण माझ्या मते चाहुल आणि आतुर हे बरोबर आहेत.

बीसके , चिनूक्स ,

विस्तारित शब्दरत्नाकर ( मूळ लेख वा गो आपटे, विस्तार ह अ भावे) याच्यात तज्ज्ञ आणि तज्ञ असे दोन्ही शब्द आहेत अन दोन्हींचा अर्थ माहितगार, कुशल असाच दिलेला आहे.

अवांतर : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या विश्वकोषाच्या डी व्ही डी कोणाकडे आहेत का ? माझ्या व्हिस्टा मशिनवर त्यातल्या पी डी एफ फाइल उघडता येत नाहीत Sad
काही ट्रिक असेल तर कोणी सांगाल का ?

शोनू,

शासकीय शब्दलेखनकोशानुसार केवळ 'तज्ज्ञ' हेच रूप योग्य आहे. हा तत्सम शब्द आहे, व तो मूळ रुपातच वापरला जायला हवा.

तज्ज्ञ या शब्दाविषयी -

ज्ञा (जानाति, जानीते) हा धातू आहे.
तत् + ज्ञ = तज्ज्ञ (अर्थ - ते जाणणारा)

मात्र, संगीतज्ञ, गणितज्ञ, शास्त्रज्ञ या शब्दांत 'तज्ज्ञ' हे रूप येत नाही. कारण इथे तशी संधी होत नाही. मात्र, या शब्दांचे संदर्भ घेऊनच आपण 'तज्ञ' हे अशुद्ध रूप वापरतो.
'तज्ञ' या शब्दाचा अर्थ काय? 'त जाणणारा'? म्हणून 'तज्ञ' हे रूप अशुद्धच आहे.

शासकीय शब्दलेखनकोशानुसार केवळ 'तज्ज्ञ' हेच रूप योग्य आहे. >>>>> शोनू, जा जाऊन सांग... वा गो आपटे किंवा ह अ भावे यांना... !!

अडमा,

शोनूला प्लॅन्चेट वगैरे येतं का? Lol

आणि केवळ ते एकच वाक्य वाचलंस का? तो शब्द अशुद्ध का आहे, याचं कारण मी दिलं आहे. ते चुकीचं वाटत असेल, तर तो शब्द योग्य कसा, हे इथे लिही.

श्श! असं मोठ्याने सगळ्यांना सांगू नकोस चिनूक्स Happy

>>>चाहूल

चाहूल माझ्याकरता खूप फसवा शब्द आहे.र्‍हस्व 'हु' आणि दिर्घ 'हू' दोन्ही मला बरोबरच वाटतायत म्हणजे डोळ्यांना खटकत नाहियेत. जसा आतूर चा दिर्घ 'तू' डोळ्यांत खुपतो.

शोनूला प्लॅन्चेट वगैरे येतं का? >>>> LOL !
अरे. तुझं विश्लेषण चुकीचं आहे असं मी म्हणत नाहिये.. पण शोनू नी ज्यांच्या पुस्तकांचा दाखला दिलाय ते पण तज्ञ च होते ना? असो..

जसा आतूर चा दिर्घ 'तू' डोळ्यांत खुपतो. >>>> सायो.. डोळयांत खुपून किंवा कानांना योग्य न वाटून काही उपयोग नाही !! शासकीय नियमावलीत काय आहे ते बघ.. Wink

Pages