एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकुन्दा, असली अनुभव, नशिब खरच तुझ थोर की तुझ्या गाडीला तेवढ्या वेळेत कोणि उडवल नाही! Happy

मुकुंदा जबरी अनुभव... वाचताना पण घाम फुटला रे...

धन्स ऑल... आम्हाला आणि अजून काही भारतीय लोकांना हायकमिशनने डिनरला बोलावले होते.

स्लार्टी? भयानकच किस्सा आहे हा! वीड लावणार्‍यांशी मैत्री करू/टिकवू नये असं म्हणतात...
आणी बाकी दोन किस्से पण येउ देत.

मुकुंद, वाचून थरकाप उडाला. नशीब ट्रॅफिकमधल्या गाड्या तुझ्या गाडीवर आपटल्या नाहीत.

अजून एक किस्सा..
युरोपला गेलो तेव्हा नवर्‍याला "गॉडफादर" च्या सिसिलीला जायचंच होतं. आणि इथल्या अनेक, अगदी इटालियन लोकांनी पण ते किती धोक्याचं आहे ते वारंवार सांगितलं होतं. क्षुल्लक कारणासाठी कशा गोळ्या घालण्यात येतात त्याची वर्णनं पण ऐकवली होती. नवर्‍याला बरंच सांगून बघितलं, अगदी दोन मुलं अजून वाढवायची आहेत इ. पण नवर्‍याचं एकच टुमणं- मला एक तरी 'डॉन' बघायचाच आहे! (जणू काय तो डॉन आम्ही येईपर्यंत खुर्चीवर सजून बसलेलाच राहणार होता.)

शेवटी रोमहून सिसिलीतील पालेर्मो या (कु)प्रसिद्ध ठिकाणी ट्रेनने निघालो. माझा मूड खराबच होता आणि मी धास्तीतच होते. ट्रेनच्या खिडक्यांतून सूर्यफुलांच्या शेतीत पांढरीशुभ्र, सुरेख घरं दिसत होती. ती सगळी डॉन लोकांची इस्टेट असल्याचं शेजारच्या प्रवाशाकडून कळलं. थोडा वेळ गेला आणि मध्यरात्री एकदम ट्रेन डोलल्यासारखी हालली. मी दचकून उठले. नवरा जागाच होता. "काय झालं रे?" मी विचारलं. "काही नाही गं! या दोन स्टेशन्स मध्ये ट्रेनचे रूळच नाहियेत, समुद्र आहे ना! म्हणून आख्ख्या ट्रेनलाच शिपमध्ये घातलंय. किनारा आला की परत रुळांवर चढेल".
मला तो फेकतोय असंच वाटलं. चरफड्त उठले तो काय? खिडक्यातून दोन्ही बाजूला ट्रेनचे डबे, शिपच्या बेसमेंटमध्ये असलेल्या रुळांवर चढवले होते. डब्यातून बाहेर पडले तर बाजूलाच एक जिना होता. त्यावरून चढून गेले ती चक्क डेकवर! चारी बाजूला समुद्र काळ्या अंधारात डचमळत होता!
(नंतर कळलं की ही बर्‍यापैकी फेमस राईड आहे. ऐलतीरावर ट्रेनचे डबे जमिनीवरच्या रूळांतून सरळ शिपच्या बेसमेंटमध्ये असलेल्या रुळांवर (दोन्ही रूळ एका लाईनीत करून) चढवतात. त्यासाठी बेसमेंट्ला मोठ्ठा दरवाजा केलाय्! पैलतीरावर परत हा दरवाजा उघडतात आणी डबे जमिनीवर उतरवतात).

नंतर झोपच लागली नाही. शेवटी पालेर्मोला उतरलो. जाम भूक लागली होती. स्टेशनच्या बाहेर पडलो आणि ज्या दिशेने (काही ऐतिहासिक इमारतींच्या) चालायला लागलो तिथे कुठेही एकही रेस्टॉरेंट नाही. मैलोनमैल चालत गेलो. दोन्ही बाजूला फक्त कपड्यांची दुकाने- सुरेख, भारी कपडे. "तुझे डॉन सगळे बेकार होऊन कपड्याचे व्यापारी झालेत का काय?" मी नवर्‍याला विचारले. कपड्यांची दुकानेपण संपली आणि रस्त्याने निमुळता होऊन अचानक एक वळण घेतले. समोर उंचावर, थोडी दूर एक दगडी इमारत होती. तिच्यासमोर एक पाण्याचे पुरातन वाटणारे कारंजे होते. एक अरुंद आणि फरसबंद चढावाचा रस्ता तिच्याकडे जात होता. दोन्ही बाजूला उंच, पिवळ्या आणि धुरकटलेल्या इमारती दिसत होत्या. आत्तापर्यंत असलेल्या आधुनिक रस्ते आणि दुकानांपासून ही जागा नक्किच वेगळी होती. मला जाणवलं की इथे फारसे लोकं दिसत नाहियेत, जी आहेत ती फक्त माणसं आणी बाया नाहीतच. माणसं आमच्याकडे शांतपणे, पण रोखुन बघत होती. सगळ्यांचे कपडे एकजात पांढरेकाळे. डोक्यावर हॅट्स. ईटालियन गाण्यांच्या लकेरी कुठनंतरी ऐकू येत होत्या. माझी खात्रीच झाली की आम्ही डॉन डॉमिनेटेड एरियात आलोय. चुकलेला रस्ता विचारावा तरी कोणाला? त्या उंच इमारतीकडे परत एक नजर गेली तो काय? तिथे दोन धिप्पाड, काळे कपडे घातलेले पुरुष आमच्या दोघांकडे बोट दाखवून अगम्य भाषेत जोराजोरात बोलत होते. माझा अगदी धीर सुटला. नवर्‍याला कल्टी मारुया असे म्हणणार, तितक्यात ते दोघं चक्क आमच्यादिशेने जोरात पळत यायला लागले! पाठीवरची जड बॅकपॅक काढून पळायला पण वेळ न्हवता! मी जागीच गोठले, नवर्‍याची पण तीच स्थिती होती. आमच्यापाशी दोघं पोचले. नवर्‍याच्या खांद्याला गदागदा दोन्ही हातांनी हालवून त्यातला उंचाडा मोडक्या-तोडक्या इंग्लिशमध्ये काय म्हणाला असेल?
"आर यू फ्रॉम ईंडिया? वी लाईक धिस हिंडी साँग.... एक दो ती चार पाच छे सात... पुढचं त्याला येत न्हवतं ते नवर्‍याने म्हणून दाखवावं अशी विच्छा पण त्याने व्यक्त केली. नवर्‍याला अर्थातच सुटकेचा आंनद झाला आणि त्याने कधी नव्हे ते खुल्या गळ्याने, खडया आवाजात ते गाणं म्हणून दाखवलं (नाचून दाखवायचंच काय ते राहिलं).आम्हाला दोघांना धन्यवाद देउन ते त्यांच्या दिशेने गेले आणि नवर्‍याला मी (पार )बारा वाजल्याची आठवण कर्तव्यदक्षपणे करून दिली.

स्लार्टी, भाग्या सही किस्से आहेत. बरं आता घाबरवुन सोडणारे हे वाचल्यावर माझ्याक्डुन जरा हलकाफुलका- ही किस्सा एका मित्राक्डुन ऐकला आहे. तो त्याच्याच बाबतीत झाला की काय नक्की आठवत नाही. मित्र न्यु यॉर्क सिटीत भटकंटी करत होता, पायीच. पायी चालणार्‍यांना दिवा लाल असतानाही रस्ता ओलांडताना त्याला एका "कृष्णमोहन" मामुने बघितले. मित्राला थांबवुन त्याला एक तिकिट देउन मामु म्हणतो, "Now u may tell your 'desi' friends that a 'KALLU MAMU' gave you a ticket" Happy

अजून एक माझ्या विसा स्टँपिंगचा. इशान अडीच-पावणेतीन महिन्याचा असताना मी त्याला घेउन भारतात गेले. ३-४ महिने तिथेच रहायचा माझा प्लॅन होता. पण विसाची मुदत संपत असल्याने गेल्या गेल्या स्टँपिंग करणे भाग होते. श्रीगणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी (२४ सप्टें) मला दुपारी एक वाजता पोचायचे होते. बहिणीच्या घरचे घड्याळ नेमेकेच सकाळी ९-१० वाजता बंद पडले. दुसर्‍या दिवशी इशानला लसी द्यायच्या होत्या, त्या डॉक्टरांची वेळ घेण्यात थोडा वेळ गेला. एकुण उशीर झाला. रस्त्यात ठिकठिकाणी गणपतीसाठी मांडव घातलेले, रहदारीची अवस्था भयंकर. मी मधेच VFS ला फोन करुन रहदारीत अडकल्याचं सांगितलं आणि माझे स्टँपिंग होइल की नाही विचारलं. तर ते म्हणे परस्पर consulate ला जा. पोहोचायला दीड वाजला. इशान सगळ्या रस्त्याने झोपलेला त्यामुळे पोचेपर्यंत त्याच्या भुकेची वेळ झाली. तिथे मी आधी चौकशी करायला म्हणुन गेले तर त्या बाबाने मला, "ताई किती उशीर केलात, जा आत" (हो चक्क मराठीत) करुन आतच जायला लावले. आत गेल्यावर बघते तर भली मोठी रांग. सहा तर नक्की वाजले असते. आधी काय करावे सूचे ना. मग मी तिथल्या बाईला जाउन (अगदी हिरकणीच की नै Wink ) सांगितले की माझे बाळ बाहेर आहे. मला काही इथे अर्ध्या तासाच्या वर थांबता येत नाही. माझी अपॉइंटमेंट रद्द करा किंवा जमल्यास माझा नंबर आधी लावा. त्या बाईने असे काही माझ्याकडे बघितले, बाप रे इतक्या खडुसपणे तर मी पण कुणाकडे बघितले नसेल Proud माझा पासपोर्ट आणि बाकी कागदपत्रे जवळजवळ हिसकावुन घेऊन बाई गायब झाल्या. मला वाटले आता मला कायमची अमेरिकेत जायची बंदी करणारं पत्र मिळणार नक्की. बरोब्बर दहा मिन. झाल्यावर माझे नाव पुकारण्यात आले. मी घाबरत घाबरत गेले तर त्याच बाईंनी सगळी कागदपत्रे माझ्याकडे परत केली नी म्हणाल्या, "तुझा विसा झाला आहे. उद्या पासपोर्ट दिलेल्या पत्त्यावर मिळेल." मी अक्षरशः १०१ वेळा धन्यवाद दिले त्यांना. थोबाडही न दाखवता H1 चे स्टँपिंग झाले.

मस्त धागा आहे अरूण. भाग्या/स्लार्टी/मुकुंद काय किस्से आहेत.
त्या बाईने असे काही माझ्याकडे बघितले, बाप रे इतक्या खडुसपणे तर मी पण कुणाकडे बघितले नसेल - सिंडी- Happy

सगळ्यांचे किस्से एकदम भन्नाट आहेत.. तेंडुलकर, कल्लु मामा, एक दो दिन जबरी आवडले... Happy

भाग्या, तुम्हाला क्रिकेट मध्ये रस नाही आणी खेळाडुही माहित नसताना सह्या कश्यासाठी घ्यायच्या होत्या?? Happy

>>तुम्हाला क्रिकेट मध्ये रस नाही आणी खेळाडुही माहित नसताना सह्या कश्यासाठी घ्यायच्या होत्या?>><<

लोकांना दाखवायला सचिनची सही घेतली म्हणून. Happy मग इथे किस्सा कसा काय लिहिला असता? Proud

भाग्या, हलकेच घे गं.

कल्लु मामा, आणि स्टँपिंगचा किस्सा भारीच!
स्लार्तीचा किस्सा वाचून मीही घाबरले..

www.bhagyashree.co.cc

जबरी किस्से आहेत सगळ्यांचे.

भाग्या सह्हीच!!! मला तर असले काही सुचलेच नसते.... भारीच प्रसन्गावधान आहे तुझे...मान गये!
स्लार्टी, मुकुन्द, केदर्...सगळ्यान्चेच किस्से भारी......
मुकुन्द्.....माझाही....२ वर्शापुर्वी असाच अ‍ॅक्सीडेन्ट झाला होता....नवी कोरी गाडी.....डायरेक्ट लोरीला धडकले होते. एक क्षण असे वाटले..सम्पले सगळे.........मला वा लोरी वाल्याला फारसे लागले नव्हते, पण गाडी .बाप रे!! दीड महीना लागला होता दुरुस्त व्हायला. तेव्हापासून परत मी गाडी चालवलेली नाही......
फुलराणी

भाग्या...सिसिलीचा किस्सा आताच वाचला.एवढा सस्पेन्स तयार केला...आणी एक्दम एक, दो, तीन्...बॉलीवूडने वाचवले म्हणायचे...
पण ती शिप राईड मस्त असेल ना!
सिन्ड्रेला...भारीच नशीब्वान दिसतय तुझ बाळ! आणी तू...हिरकणी पण!
फुलराणी.

पालेर्मोला, 'KALLU MAMU', H1 चे स्टँपिंग... सगळे जब्बरी किस्से Happy

हम्म्म्म... मस्त आहेत सगळे किस्से.. Happy
माझा जरा वेगळा किस्सा , पि.जे. म्हंटल तरी चालेल..
साबा चालतांना कुठेतरी धडपडल्या.. हाताला थोडं लागल. माझ्या मुलाने मुव्हचा स्प्रे आणला व आजीच्या हातात दिला व सांगीतल ' हलवुन स्प्रे कर' साबांनी लागलेला हात हलवला आणि मग स्प्रे केला....:)

त्यांना 'देसी' ,कल्लु हे शब्द अगदी सहज कळतात. माझ्याच बरोबरचा एक कलीगने मला एकदम सुरुवातीला सांगितले होते, विचारले होते की मी त्याला काय म्हणेन्?(अर्थात तो कृष्णवर्णीय होता). Happy

भाग्या,
जबरी किस्सा आहे !
प्रियांका चोप्राची सही का नाही घेतलीस.
आपके गोरेपनका राज क्या है, असे तरी विचारायचे होतेस तिला !!

हा एक...

(खरं तर हा मराठी लोकांचे हिंदी यामध्ये शोभून दिसेल.. पण तरीही..)

मार्गशिर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आमच्या Cubicle मधील एका मुलीने महालक्ष्मीव्रताचे उद्यापन केले होते..

दुसर्‍या दिवशी सकाळी दुसर्‍या एका हिंदी भाषिक मुलीला उशीर का झाला याचे कारण सांगताना ही मुलगी म्हणाली, "मैने कल ना व्रत का विज्ञापन किया :)"...

...

Cool :d

भाग्या, दोन्ही किस्से एकदम मस्त आणि वेगळे आहेत, मजा आली.

सगळे किस्से एकदम मस्त आहेत.

स्लार्टी, तुझा किस्सा तर एकदम थरारक आहे. त्या दिवशी तू पकडला गेला असतास तर 'चोरट्या अफूची आयात करणारी टोळी' या फोटोमध्ये दिसला असतास... Lol Light 1

तर 'चोरट्या अफूची आयात करणारी टोळी' या फोटोमध्ये दिसला असतास... >> त्याच्या विपूमधला फोटो पाहिल्यावर तो वरचा किस्सा शेवट बदलून लिहिलाय असे मला वाटतेय :फिदीफिदी

आसामीला मोदक!

किस्से फुल जबराट!

माझा पण एक किस्सा -

माझी मैत्रिण तिच्या बाळासह व्हाया पॅरीस प्रवास करत होती. पॅरिसला त्या बाहेर पडेपर्यंत शटल गेली होती. हिला कोणीही कसलीही मदत केली नाही. पुढच्या उड्डाणात फक्त १.५ तासाचा वेळ होता. त्यात बर्फ पडल्याने विमान उतरायलाच वेळ झाला होता.

ही चक्क एका टर्मिनल वरुन दुसरीकडे धावत सुटली होती. त्यात केबीन सामान, बाळाचे सामान, लॅपटॉप आणि बाळ बरोबर. शटलमधून न आल्याने पुन्हा एकदा सिक्युरिटी! तिथे तर तिला अग्रक्रम मिळाला पण चप्पल, स्वतःचे जॅकेट, बाळाचे जॅकेट, लॅपटॉप असे सगळे सामन वेगवेगळे करावे लागले. बाळाला ओवरॉल प्रकारचे जॅकेट घातल्याने ते काढता येईना. दुसर्‍या विमानाची वेळ टळून गेली. तिचा पहिला प्रवास असल्याने पुढे करायचे तिल सुचेचना! त्या लोकांनी बाळाला तसेच झोपलेल्या अवस्थेत स्कॅनिंग मशिनमध्ये घातल्याने तिची सहनशक्तीच संपली. तिच्या तोंडाचा पट्टा सुटला! नशिबाने पुढचे फ्लाईट लेट झाले आणि तिला मिळाले.

तिने एअर फ्रांसच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली नंतर पण तेंव्हा अख्ख्या टर्मिनलला जागे केले होते तिच्या आरड्याओरड्याने!

त्या लोकांनी बाळाला तसेच झोपलेल्या अवस्थेत स्कॅनिंग मशिनमध्ये घातल्याने तिची सहनशक्तीच संपली. >>> बापरे... नुसती तक्रार काय, खटलाच भरायला हवा होता...

मला कान्ये वेस्ट चा एक विडियो आठवला. त्यात त्याच्या वर्णामुळे (कृष्ण) त्याला पन स्कॅनर मध्ये घालतात. (अर्थात ते काल्पनिकच होते.)

त्या लोकांनी बाळाला तसेच झोपलेल्या अवस्थेत स्कॅनिंग मशिनमध्ये घातल्याने तिची सहनशक्तीच संपली >> जबरदस्तच आहे किस्सा.. खरंच खटला भरायला पाहिजे होता...
पॅरीसचा विमानतळ म्हणजे भयानक प्रकार आहे..

>>लोकांनी बाळाला तसेच झोपलेल्या अवस्थेत स्कॅनिंग मशिनमध्ये घातल्याने तिची सहनशक्तीच संपली
अरे काय? खुळचट आहेत का काय? बाप्रे !!

हो, पण ते लोक फ्रेंचमध्येच बडबडत रहातात न ऐकून घेता.. फार फार शिष्ठ!

आताच्या प्रवासात पण माझे हवाईसुंदरीशी भांडण झाले. माझ्याकडे देखिल केबीन लगेज आणि लॅपटॉप होता. माझे एक जॅकेटदेखिल होते. सामान वरच्या कप्प्यात ठेवताना मी तिला विनंती केली की जरा मला मदत करशील का माझे जॅकेट माझ्याच बॅगेवर ठेवायला? ती बरीच उंच होती.

तिने माझे ऐकून न घेता सुरुवात केली की ते माझे काम नाहिये, मी इथे तुमचे सामन उचलायला नाही आहे. (तुम्ही भारतीय) एवढे सामान आणताच कशाला?

तिला म्हणाले तुझ्या वरिष्ठाला बोलाव. त्याला बोलवताना पण ही फ्रेंच मध्ये वजन, सामान असे शब्द वापरत होती. माझ्या डोक्यात तिडीकच गेली.

अख्ख्या विमानाला ऐकू जाईल अशा आवाजात बोलले की तिकीटाचे पूर्ण पैसे भरतेय मी ह्या सेवेसाठी आणि तुझे काम सेवा द्यायचे आहे. तुमच्या वजनात, नियमात बसेल एवढेच सामान मी आणलेय. ते सुध्दा तुला उचलायला सांगत नव्हते तर तुझ्या उंचीमूळे फक्त जॅकेट बॅगवर ठेवायला सांगत होते ज्यामुळे अजून एका प्रवाशाला त्याचे सामान ठेवता येईल. तुझी कर्तव्ये काय आहेत ते मला नक्कीच माहित आहे. तिच्या वरिष्ठाला पण विचारले की असेच प्रशिक्षण देतात का? लक्षात ठेवा विमान सेवेचा सर्वाधिक वापर भारतीय करतात.

तेंव्हा सॉरी वै. झाले. पण परत गेले की कार्यालयात तक्रार करणार आहे.
शिकल्या सवरल्या, विमान प्रवासाची सवय असलेल्या माणसाशी असे वागत असतील, तर माझ्या नवख्या मैत्रिणीला किती त्रास झाला असेल?

त्या विमानात चुकून कोणी माबोकर असेल तर तो सगळा गोंधळ मी घातला होता. Proud

लोकांनी बाळाला तसेच झोपलेल्या अवस्थेत स्कॅनिंग मशिनमध्ये घातल्याने >>>

बापरे.. Uhoh खरच भयानक आहे... Sad

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

>>त्या लोकांनी बाळाला तसेच झोपलेल्या अवस्थेत स्कॅनिंग मशिनमध्ये घातल्याने

खरच खटला भरायला हवा होता!

जबरीच किस्से आहेत राव... भाग्या, एकदम "जय महाराष्ट्र" Happy
स्लार्टी एकंदरीत तुझा संबंध गूढ अन अगम्य अशा गोष्टींशी जास्त दिसतोय.. जबरी कीस्सा आहे Happy
असच थोड माझ्या बाबतीत होत असतं.. एक नाही दोन नाही अनेक वेळा झालय, अर्थात on lighter note, झालय काय की बरेच वेळा परदेशी प्रवासात चक्क फिल्म स्टार सहप्रवासी निघाला अन म्या पामराने त्यातील अर्धे वेळा त्याला/तिला आधी ओळखलेले नाही.. Sad

लक्षात रहाण्याजोगा किस्स्सा म्हणजे एकदा amsterdam bombay प्रवासात दीया मिर्झा चक्क सहप्रवासी अन दुसर्यांदा अगदी अलिकडे बसंती (अर्थातच हेमामालिनी) मुंबई विमानतळावर आम्ही आमच्या सामानाची वाट पहात बाजूला ऊभे असताना घडलेला किस्सा.

अनेक वेळा northwest ने अमेरिका मुंबई वारी केल्याने एकदा असच अ‍ॅमस्टरडॅम ते मुंबई मधे चक्क wolrd business class का काय म्हणतात ते अप्ग्रेड दिलं न मागता..(विमान रिकाम होत हे मुख्ख्य कारण). मग पहिल्यांदाच विमानाच्या आतील तो वर जाणारा जिना चढून मी त्या केबिन मधे गेलो. आयला तिथे तर मस्त अंथरून पांघरून झोपायची जागा.. हव तर चार सहा जणांचा मिळून मेंढीकोट चा डाव खेळता येईल इतके पुढे मोकळी जागा. विमानात ईतकी मोकळी जागा अन त्यातून माझ्या आजू बाजूला लोक सगळे आत्ताच धोब्याकडून धुवून इस्त्री करून आलेल्या पोशाखात वावरणारे पुतळे.. त्यामूळे मी जामच गांगरलो होतो. त्यातून मी अजून बसायची खोटी तितक्यात हवाई सुंदरीने "प्यायला काय पाहिजे" विचारत पेयपानाचं मेनू कार्ड समोर ठेवलं.. या सर्वाने मला त्या मोकळ्या जागेत भलतच घुसमटायला झालं होत.. एकंदरीत अशी स्थिती असताना अचानक माझ्या बाजूला थोड्या वेळाने एक भिषण सुंदर युवती येवून बसली. असेल कुणितरी अशीच business executive म्हणून थोड दुर्लक्ष केल पण एकंदरीत हवाई सुंदर्‍यांचे तिच्याशी संवाद अन चक्क हिंदी ईग्रजी मिश्रीत तिचं बोलण ऐकलं तेव्हा एकदम ट्यूब पेटली. आता लोचा म्हणजे तिला एकदम आपादमस्तक वगैरे कसं निरखून बघणार? पण त्यातही जमेल तितक्या तिरप्या नजरेने बघून घेतो तो तीनेच विचारलं? तुम्ही पण इथे कामानिमित्त आला होतात का? छ्या राव, तीने ते डोळ्यात डोळे घालून असा थेट प्रश्ण टाकल्यावर क्षणभर काय बोलावे तेच सुचेना.. म्हणजे चुकून अप्ग्रेड मिळालय सांगाव, का घरी कामानिमित्त चाललोय सांगावं का तसा अमेरिकेत असतो पण अगदी frequnt fly करतो अशी काही शाईन मारावी हे सांगावं काहीच कळेना.. अन हे सर्व विचार डोक्यात चालू असताना नेमकं नको तेव्हा ट्यूब पेटली की ही बहुदा ९९% दीया मिरझा आहे. (राव पडद्यावर मेकप मधे या वेगळ्या दिसतात, प्रत्यक्षात वेगळ्याच..) तर त्या गडबडीत नाही अचानक घरी काम आलय म्हणून भारतात चाललोय अस काहीतरी भलतच उत्तर दिलं..(जे खरं होत). "तुम्ही (अर्थातच विंग्रजी मधून "you" ) ईथे कशा काय"? असं वर मिही विचारून घेतलं. पहिल्यांदाच तू अन तुम्ही अस मराठीतून ठ्सठशीत स्पष्ट उल्लेख न करावा लागल्याचा भारी आनंद झाला होता मला.. you कसं बरं असतं, म्हटल तर तू म्हटल तर तुम्ही.. Happy .. त्यावर अर्थातच तीने तितक्याच कूलपणे "नाही इथे जवळच युनिट च शूट होत अन मग काल शॉपिंगला आले होते आज परत चालले आहे" असं कुठलाही आव न आणता सांगितलं.. मला पुन्हा एकदा चुकून या क्लास मधे अप्ग्रेड मिळून आल्याची जाणिव करून दिली बयेने .
मग काय पुढले चक्क ९ तास मी त्या केबिन मधे तीच्या "सहवासात" घालवले.. पहिल्यांदा वाटलं हे विमान असच आकाशात नुसतं घिरट्या घालत बसलं तर काय बहार येईल. अशा बर्‍याचश्या ईकडच्या तिकडच्या गोष्टिंची देव्हाण घेवाण करत तो प्रवास पार पाडला.. म्हणजे मिही उगाचच ती किती फेमस आहे अन मी तीचे चित्रपट पाहिले आहेत (ईन मीन एक पाहिला होता, रेहना है तेरे दिल मे) या अविर्भावात तीच्याशी गप्पा ठोकल्या.. अशा वेळी तिची सही घेणं किंवा तीच्याबरोबर एखादा फोटू घेणं मला उगाचच जरा चीप वाटलं..(आता हळहळतो नाही घेतलं म्हणून...). पण आमच्या दोघात फक्त काय ते सहा इंचाचं अंतर.. तेही बिझनेस क्लास म्हणून. जेवाय्चा मेनू आला तेव्हा "तुम्ही हे ट्राय करून बघा" असं चक्क तीने लडीवाळपणे सुचवलं.. नेमकी मी निघालो कट्टर शाकाहारी तेव्हा दिया मिरझा चा आग्रह टाळाण्याचं घोर पाप माझ्या हातून घडलं..असं वाटलं त्या क्षणी नरो वा कुंजरोवा करून त्या कबाब वर ताव मारावा केवळ तीची मर्जी राखण्या आधी..
"नाही मी शाकाहारी आहे".. मी जितक्या खजिलतेने सांगितलं तितक्याच उत्साहाने तीने "अर्रे वा! मस्तच! मलाही शाकाहारी व्हायचय" म्हणून समजूत घातली.. बाकी कुणि प्रवासी तिला ओळखत नव्हते अन तीच्या सर्व वायफळ गप्पा, पि.जे. ना मी दाद देत होतो बहुदा म्हणून ती ईतकी सहज वागत होती का बया मूळची अशीच आहे मला कळत नव्हत. पण अगदी कॉलेज मधील मैत्रीण असावी तशी, अवखळ, गप्पिष्ट, चंट, लडीवाळ.. काय हवं ते म्हणा.. तशी भासली. अन सौंदर्य तर आहेच देखणं त्यात काही वादच नाही.

नशीब माझे कुठले कुठले चित्रपट पाहिले आहेत वगैरे असं काही विचारलं नाही तीने..
"चलो नाईस मिटींग यू" चा तीचा हॅंड्शेक मला अजूनही चांगलाच लक्षात आहे. नशीब हे सर्व आम्चे दोनाचे चार व्हायच्या आधी झालं.. नाहीतर घरी आल्यावार सांगितलं तरी बायकोने डोळे वटारले असते नाही सांगितलं तरी वटारलेच असते .. कारण दरम्यान (म्हणजे या घटनेनंतर नव्हे) मी दिया मिरझा चा प्रचंड मोठा पंखा झालेलो आहे हे बायकोला माहित आहे.

अन दुसरा किस्सा अगदी अलिकडचा. दुबई हून मुंबईला गेलो तेव्हा सर्व सोपस्कार आटोपून मी सामान घ्यायला baagaage claim च्या इथे गेलो. पहातो तर माझ्या आधी अजून एकच बया तिथे उभी होती. दुसरं कुणीच नाही.. बरं आहे म्हटल पटकन सामान उचलून घरी निघुया. तसा एक माणूस तीच्यापासून थोड्याश्या अंतरावर ऊभा होता पण सामानाची वाट पहात ती एकटीच होती. मिही तिथे बाजूला जावून उभा राहिलो.. ती हसली मिही हसलो. "दुबई फ्लाईट" का? तीने विचारलं. "हो मी म्हटलं"..
"बिझनेस आहे का"? तीने विचारलं. नाही, नोकरी.. मी म्हटलं. "तुम्ही"..? "मी डांस च्या प्रोग्राम्स ना आले होते माझे शोज होते दुबई आणि ईतर ठिकाणी.." तीने म्हटलं तरिही माझी ट्यूब पेटली नव्हती.
"ओह म्हणजे तुम्ही मुंबईच्याच तर..?" या माझ्या प्रश्णावर तीने आश्चर्याचा धक्का बसल्यागत (तीच्या त्या बरोबरच्या माणसाच्या चेहेर्‍यावर काहितरी विचीत्र भाव होते तेव्हा) उत्तर दिलं "हा.. हा.. मुंबईमेही".

तेव्हड्यात लक्षात आलं हिला आधी कुठेतरी पाहिलय.. कुठे ते आठवेना.. तशी अंगकाठीने बाई चक्क तिशीतील वाटत होती पण चेहेर्‍यावरील पोक्तपणा नक्कीच पन्नाशीकडे झुकणारा होता. खरं तर मी त्यामूळेच जास्ती गोंधळलो.. ईतका विरोधाभास? पुन्हा ड्रेस म्हणाल तर चक्क कॉलेज तरूणी घालतात तसा टाईट स्लॅक अन वर फुल स्लीव चा शर्ट.. मला जाम झेपेना तो प्रकार.. एकीकडे बॅगेज चा पट्टा चालू झाला तशी माझ्या डॉक्यात विचारचक्र चालू झालं.. कुठ बघितलय हिला..? तितक्यात त्या बाजूच्या माण्साशी काहितरी यंडु गुंडू मधे बोलली.. ते टिपिकल वाक्याच्या शेवटी हेल काढण्याची तीची "सिग्नेचर संवाद फेक" ऐकूनही माझ्या डोक्यात प्रकाश पडला नव्हता.. एव्हाना आजूबाजूला सामान अन बघ्यांची गर्दी जमली होती. राव सगळे लोक पट्ट्यावरच्या बॅगा सोडून तीच्याकडे बघत होते. काही लोक तर इतके थेट तिला आपदमस्तक न्याहाळत होते, ईतके की मलाच शरम वाटायला लागली.. एक दोघांनी तर मलाही "संशयित" नजरेने पाहिलं. ती मात्र "हे रोजचच आहे" या थाटात थंडपणे उभी होती. अन तेव्हड्यात एक मोठा खोका आला त्या पट्ट्यावर अन त्यावर एक मैलावरून दिसेल ईतक्या ठळक अन मोठ्या अक्षरात लिहिलं होत.. हेमामालिनी, मुंबई.

च्यामारी तेव्हा माझी ट्यूब पेटली.. आणि कहर म्हणजे नको तिथे प्रामाणिकपणा दाखवत म्हटल देखिल " ओह तुम्ही हेमाजी का? माफं करा हं मि तुम्हाला आधी ओळखलच नाही"..

खरं तर वाटलं होत की ही बहुतेक हेमामालिनीच असावी पण खरं सांगतो, अशी एरवी बरोबर बस मधे चढली परदेशात वगैरे तर फार तर एखादी मॉडेल म्हणून आपण लक्ष देवू. पण हीच ती करोडोंच्या हृदयाची धडकन "ड्रीम गर्ल"..? अशक्य! ते गुलाबी तेज, मादक डोळे, भरलेला बांधा, त्या सर्वाची जागा आता टँड स्कीन, लवचिक बांधा याने घेतली आहे. अर्थात माझाच दोष! पण पडद्यावरील अशा व्यक्ती कायमच्या त्याच रुपात लक्षात असतात प्रत्त्यक्षात इतकी तफावत असली की पंचाईत होते ना.

मग नंतर अर्थातच बाहेर जाताना तीच्याबरोबर फोटु काढायला सह्या घ्यायला हा गलका जमला होता.. तिलाही त्या जमावात खूप हायसं वाटत होत बहुदा अगदी आवडीने फोटू अन सह्या देत होती. मी अर्थातच माझं सामान उचलून घरची टॅक्सी पकडली.

योग, काय रे हे?

हेमा सोड, पण दियाबरोबर एकादा फोटो घेउन टाकायचास ना? बायको भांडली की ते हत्यार कामी आलं असतं! Happy

Pages