आय नीड अ चेंज.....

Submitted by षण्मुखानंद on 14 February, 2011 - 10:07

च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!

यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!

माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?

विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.

मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?

काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.

मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.

मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.

मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.

अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.

अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?

अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.

अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अ‍ॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.

ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.

तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्‍यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.

येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.

मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्‍यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> नताशा: काम करण्याचा वैताग नसतो. नॉट हॅविंग कन्ट्रोल ऑन युवर ओन लाईफ - हे भयानक फीलिंग असतं.>>> यु सेड इट
>>>नीधप :फ्रीलान्सर्स, बिझिनेसवाले ते हातावर पोटवाले सगळेच वाट्टेल त्या वेळांना काम करत असतात पण नाराजी व्यक्त करताना, रडताना ऐकलंय ते नोकरीवाल्या लोकांनाच. त्यामुळे खरंच प्रश्न पडतो:>>

सासूच्या घरात तिच्या हाताखाली सूचना पाळत घर काम करणार्‍या सूना आणि स्वतःच्या घरात सगळे काम स्वतःच करणार्‍या बायका यांच्यात जो फरक आहे तोच 'नोकरी' करणारे आणि 'फ्रीलान्सर' मधे आहे असे मला वाटते. सासूच्या हाताखाली काम करणारीच नेहमी स्वतंत्र रहाणारीपेक्षा जास्त रडत असते. भले मग स्वतंत्र रहाणारीला कीतीही जास्त काम पडू दे ,तरी त्या कामाचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य तिला असते.

कोणत्याही कामात ओनरशिप , स्वातंत्र्य या गोष्टींनी फार फरक पडतो. स्वतंत्र काम करताना, काम बदलत नाही, कष्ट तेव्हढेच किंबहुना जास्तच घ्यावे लागतात तरीही डोक्यावर सततचा एकच बॉस नसतो आणि हे 'माझे' काम आहे ही भावना असते. नोकरी करताना मात्र आपण 'लोकाचे' काम करण्यासाठी मरतोय असे वाटत रहाते.

डेलिया, +१
आणखी एक मुद्दा, सासूच्या हाताखाली काम करून सासू तारीफ करेलच असे नाही. कधी थोड्या फार फरकाने पाण उतारा सुद्धा करु शकते. Happy

बाकी पोष्टी वाचून उगीच्च्या उगीच वाटल्या. साहेबाच्या काळातील टाईप..पुण्यात भेळ पन ५० रुपयाच्या वर आहे बरं का आताच्या काळात. Wink

डेलिया, +१
मस्त चर्चा.
माझ्या एका मित्राने ४ वर्षानंतर IT Job सोडुन Navy जॉइन केली. पण दुर्दैवाने एका छोट्या अपघातात त्याचा बॅकपेन परत बळावला. काही महिन्यातच Navy कायमची सोडावी लागली. मग परत IT जॉइन केली. १.५ वर्षात IT सोडली. आता गावाला परत गेलाय. आता त्याला आवडणारं, समाधान देणार काम सुरु केलंय. आणि हे सगळं २८ च्या आत Happy

फारेंड, मी स्केल अप केले आहे. व मला रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते आहे. आमचे फील्ड फारच वेगळे आहे इथे कितीही अनुभव कमीच पडतो. घरचा फाफट पसारा पार कमी करून टाकला आहे व इट रन्स ह्या पलिकडे काही वेगळे नाही. पण करिअर वाइज पुढील पाच सहा वरषे फार महत्त्वाची व शिकविणारी आहेत. मटेरिअली स्पीकिन्ग माझी स्वतःची लाइफ स्टाइल काहीच नाही -जाम साधी राहणी, थोडे, कमी खर्चाचे खाणे. इत्यादि. पण घर व डिपेंडंट्स यांना उत्तम चॉइस ऑफर करण्या इतके मिळवावे ही महत्त्वाकांक्षा आहे जरूर.
अँड व्हाय नॉट. १५ के मध्ये घरचालवणे फार अवघड आहे. मारुतीच्या स्किल्ड लेबररस ना पण जास्त मोठे पॅकेज मिळते आता. मला स्वतःला हाय टेक गॅजेट्सची आवड आहे पण ती ही वेड ह्या स्वरूपात नाही. जसे जमेल तसे. Happy

फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम ही एक विनोदी साइट आहे व मी त्या संदर्भातच म्हटले आहे. कुठल्याही फील्ड मधील चॉइसेस बद्दल मी आजिबातच जजमेंटल नाही. व्हॉटेवर रॉक्स युअर बोट. ( संदर्भ कुत्रापल्ली. )

निवांत पाटील, पोस्ट आणि अनुभव दोन्ही आवडले.
रैना, तुझी ही वरची पोस्ट आवडली. पटली.
बॅकवर्ड चेंज हा शब्द फारसा पटत नव्हता. का ते तुझ्या पोस्टमधून कळले.
डेलिया, खरं आहे. पण म्हणायचा हेतू तोच होता की आपल्या कामातून मजा येते का? तसे असेल तर बाकीचे प्रॉब्लेम्स जाणवेनासे होतात.
बाकी ७०% वेळांना केवळ टिकून रहाण्यासाठी गधामजुरी ही करावीच लागते. त्याला पर्याय नाही.

मात्र आता नक्की कशाबद्दल चर्चा आहे याबद्दल गोंधळ उडाला आहे. Happy

हा बाफ काढल्याबद्दल षण्मुखानंदांचे आणि इथं लिहिलेल्या सगळ्यांचे आभार.

मी गेले चार दिवस हा बाफ वाचतोय.
आपली कुत्तरओढ होऊ पाहतेय हे मला अलीकडं जाणवायला लागलं होतं. यावर आपला वेळीच कुठंतरी अंकुश असायला हवा असं वाटायला लागलं होतं. या चर्चेत बरेच दृष्टीकोन माझ्यासमोर आले ज्यांच्यामुळं मला बरं वाटलं. खरंच आभार!

अवांतर :
खरेतर आपल्या शिक्षणात कामाच्या नियोजनाचे किमान मुद्दे असायला पाहिजेत असे वाटते.
<<< मृदुला, हो हल्ली असे शिक्षण असते. अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमात मूल्यशिक्षणात या अनुषंगाने काही प्रकरणे बघून मला सुखद धक्का बसला होता.
उदा. ताणतणावाचे व्यवस्थापन (यातले काही मुद्दे :
- ताणतणावाची कारणे - स्वत्वाची सदोष संकल्पना, अयोग्य ध्येयधोरण, इच्छांचा अतिरेक;
- ताणतणावांचे प्रकार - संघर्ष, दडपण, वैफल्य, बदल;
- ताणतणावांचे मापन व परिणाम
- समस्यापरिहार व सामाजिक आधार यांतून ताणतणावांचे व्यवस्थापन
- वेळेच्या व्यवस्थापनातून ताणतणावांचे व्यवस्थापन)
पण मुलं आणि शिक्षक याकडे खरंच किती गांभीर्यानं बघतात देव जाणे!

१५००० पगारात महिना भागत नाही हे वाचून मला धक्का बसला आहे. खरोखर. आमच्या काळी आम्ही ५के वर सुरुवात करुन ८के वर पोचलो तेव्हा खूप भारी वाटायचं. खर्च वजा करता बचत-बिचत व्हायची त्या पगारातुन.<<< सिंडरेला, त्यावेळी साखर किती रुपये किलो होती? Proud

पायर्‍या चढून वर जाऊ तसतसे नोकरीतही स्वतःचा उद्योग असल्यासारखे होत जाते. आपली जबाबदारी वाढली की कामाच्या वेळाही अनियमित होऊ शकतात. त्यासाठीच, नियोजनाची शिस्त असायला हवी असे मला वाटते. <<< अनुमोदन.

मस्त चर्चा..
दोनतीनदा पोस्ट अर्धी टाईपली, पण पोस्ट करण्याइतका दम नाही राहिला..
आज पुन्हा एकदा प्रयत्न करतेय.
मला चमन बॅकवर्ड चेंज म्हणाला ते पटलं नव्ह्तं, पण फारेंडची पोस्ट वाचल्यावर कळलं त्यांना काय म्हणायचय.
मला स्वतःला असा चेंज म्हणजे बॅकवर्डच असेल असं नव्हे असं वाटतं.. कारण प्रत्येकापुढे अंबानींचाच आदर्श असेल असं नाही, एखाद्यापुढे बाबा आमटे, थोरो अशांचाही असू शकतं.. आणि मग फॉरवर्ड आणि बॅकवर्डची डेफिनिशनच बदलते. तरिही फारेंडच्या पोस्ट वरून त्यांची बाजू क्लिअर झाली.
मला आगाऊची,नंदिनीची, निवांत पाटलांची पोस्ट खूप भावली. (आपल्या गरजा, त्यासाठी लागणारा पैसा, आपली आवड, कल ह्या सगळ्या संदर्भात सुस्पष्टता आहे)
मला स्वतःला ज्या ज्या गोष्टी आयुष्यात गरजेच्या वाटताहेत - त्या त्या गोष्टी आता ह्या क्षणालाही माझ्याकडे आहेतच. १. पण प्रोजेक्ट किंवा मॅनेजर किंवा क्लाएंट साईडचा मॅनेजर बदलल्यावरही peace राहु शकते का ह्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे 'हो' असंच नाहिये (हो नाही - काहीही असू शकतं)
२. अमेरिकेतलं आयुष्य, भारतातल्या आयुष्यापेक्षा सोपं, सहज वाटतय (माझं स्वतःचं, इतरांचं माहित नाही), पण अमेरिकेतच लाँग टर्म रहायचं नाहिये हे मत आहेच.
३. आपण काय करू शकतो, कशा स्वरुपाचं आयुष्य अ‍ॅवेलेबल असू शकतं ते कळलं आहे, आता वेगळं काहीतरी करून बघायची इच्छा आहे. म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी 'अरेरे, तिशीत हे हे करावं वाटलेलं, तेव्हाच केलं असतं तर किती चांगलं झालं असतं' असं वाटू नये अशी इच्छा आहे.
४. थोरोच्या वॉल्डनचा आणि स्कॉट निअरिंगच्या 'लिविंग अ गुड लाईफ'चा खूप प्रभाव आहे (सरसकट पटलं नसलं तरी त्यातल्या काही विचारांचं गारुड मनावर बसलं आहे). अजून शारिरीक, मानसिक पात्रता आहे का ते माहित नाही. पण "उत्तम आयुष्य म्हणजे काय, आपल्याला आयुष्याकडून काय हवय, आपल्याला काय लाँग टर्म करता आवडू शकतं, काय जमू शकतं, आपला बॅकअप काय, आपल्याला आपण कसे असायला हवे असं वाटतं आणि आपण कसे आहोत" ह्या आणि अशा अनेक गोष्टींवर काही काळ विचार चालू आहे - काहीकाही विचार सुस्पष्ट झाले आहेत, काहीकाही व्हायचे आहेत. मोठी उडी घेण्यापूर्वी, रोजच्या आयुष्यात काही छोटे बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे.
नक्की काय ठरणार ते आताच माहित नाहीये. पण बघूया
हे कुठल्या पब्लिक फोरम वर शेअर करेन असं वाटलं नव्हतं.. कदाचित उडवून टाकेन इथूनही..

नानबा, मस्त पोस्ट, उडवू नकोसच.
फॉरवर्ड आणि बॅकवर्डची व्याख्या वेगवेगळी असणारच, फक्त ती आपली स्वतःची, स्वतःच्या विचारतून तयार झालेली असावी. समाजाने या सगळ्याच्या ज्या प्रतिमा तयार केल्या आहेत त्या तपासून घेण्याची सवय हवी.

रैना (आणि ईतर)
वरच्या बर्‍याचश्या पोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला असे वाटत नाहीये का की वर आलेल्या बहूतेक सगळ्या पोष्टी, आहे त्या सध्याच्या कामात आता त्रास किंवा डिसकंफर्ट (ह्याची कारणं हजार कामाच्या वेळा, कमी पैसा, पॉलिटिक्स, प्रवास) जाणवू लागलाय म्हणून पक्की योजना न ठरवता जमेल तसे त्या कामातून ताण कमी करून घेऊन दुसर्‍या थोडे अधिक स्थैर्य, कमी ताण असलेल्या किंवा अधिक आनंद देणार्‍या कामात कसे लावता येऊ शकेल ह्याबद्दल आहेत. बहूतेक सर्वजण स्थैर्य, कंफर्ट (ह्यात पगार, लाईफस्टाईल, कामाचे तास सगळं आलं) ते कसं मिळवता येईल ह्याबद्दल स्पेसिफिक न बोलता गोल गोल विधानं करत आहेत. ती विधानं प्रामाणिक आहेत आणि त्यामागच्या त्यांच्या भावनाही खर्‍याखुर्‍या आहेत ह्याबद्दल वाद नाही आणि त्यांचा अनादर करण्याचा माझा आजिबात ऊद्देश नाही पण माझी अजूनही अशी प्रामाणिक भावना आहे की तो ह्या बाफचा विषय नाही.

आयुष्यात स्थैर्य आणि कंफर्ट आणण्यापेक्षाही मला कितीही त्रास पडला तरी चालेल पण मला हे आणि हेच काम करायचं आहे, मला गूगलमध्येच जॉब मिळ्वायचा आहे. मला कंपनी कुठलीही चालेल पण २ लाख महिनाच मिळ्वायचा आहे. मला पगार कितीही कमी मिळाला तरी चालेल पण संशोधन क्षेत्रातच जायचं आहे. अजून काही वर्ष बाबांकडून पैसे घेतले तरी चालतील पण मला पीएचडी करायचीच आहे. असं कोणीच बोलत नाही.

एवरेस्ट सर करायला निघालेल्या माणसाकडून तुला त्याच्या गोलबद्दल, तयारीबद्दल, अडचणींबद्दल, ऊपायाबद्दल, आत्मविश्वासाबद्दल ऐकायला आवडेल की 'अहो तिथे वर खूप थंडी आहे त्याने स्नो बाईट होतं, तिथे ऑक्सिजन फार कमी असतं हो...सामान खूप जड आहे, खर्च खूप आहे, आणि त्याबद्दलचीच चर्चा' असे सगळे ऐकायला आवडेल.
तू म्हणाशीलच ना अरे बाबा तू एवरेस्टवर जायचं ठरवलं आहेस ना ?तर हे सगळं चुकणार आहे का?
just tell me what are you doing about it. what are the plans to tackle those situations.

पण अशी योजना बनवण्यासाठी आपल्याला कुठे जायचे आहे हे आधी ठरलेले असले पाहिजे ना? आपल्याला कुठलं स्टेशन गाठायचं आहे. कुठली गाडी कधी सोडायची आणि कुठली कधी पकडायची आहे, सामान काय बरोबर न्यायचं आहे, पैसे पुरेसे आहे का?, चोरी झालीतर बॅकअप प्लॅन काय आहे. मला कोणी सहप्रवासी आहेत का? अशी छोटी छोटी समीकरणं मांडून आपण आपल्या ईच्छित प्रवासाची रूपरेषा आखतोच ना?
पण जर गाठायचं स्टेशनच माहित नसेल तर वाटलं होतं कदाचित पुण्याला पोहोचू पण हे बहूतेक ठाणे दिसतंय असं होण्याची शक्यता जास्त आणि मग चीडचीड, नाऊमेद होणं, राग्, तक्रारी हेही सगळ ओघानेच येणार.

वरच्याच ऊदाहरणांमध्ये कोणी नोकरी सोडून बी-स्कूल चा विचार करतोय. कोणी सिविल सर्विसेसचा, कोणी स्टँडअप कॉमेडीचा. कोणी बिझनेस सोडून मर्चंट नेवीत गेलाय कोणी परंपरागत सुतारकाम सोडून मॉडर्नायझेशनच्या लाटेवर चढू पाहतोय. ह्या मध्ये तुला त्या त्या लोकांचे डेफीनाईट गोल आहेत हे दिसून येत नाहीयेत का?
मागच्या दीडएक्शे पोष्टींमध्ये कोणी अश्या गोलबद्दल बोललं आहे का? तो गोल अचिव करण्यासाठीच्या योजनेबद्दल बोललं आहे का? आणि अश्या गोल आणि योजनांबद्दल बोलणं हाच ह्या बाफचा मुद्दा आहे हे माझं मत.

त्यामुळे आता जोवर बाफ ऊघडणारे त्यांना नक्की काय अपेक्षित आहे हे सांगत नाही तोपर्यंत नक्की काय लिहायचंय हा घोळ कायम राहणार असंच दिसतंय.

निवांत पाटील, या बाफवरची तुमची पहिली पोस्ट खूप आवडली. 'परतोनी पाहे' बाफवरील चर्चेतील काही पानांची प्रकर्षाने आठवण आली Happy

चमन तू खूप छान लिहितो आहेस. Happy

<<आयुष्यात स्थैर्य आणि कंफर्ट आणण्यापेक्षाही मला कितीही त्रास पडला तरी चालेल पण मला हे आणि हेच काम करायचं आहे>>
चमन, मी या गटाची मेम्बर आहे आणी माझ्यासारखे अनेकजण इथे आहेत/ असणारेत. पण मुळात मला हवा असलेलाच ट्रॅक मी पकडला, तो सोडून इतर काही आवडत नाहीये याचीही काही वर्षं 'घालवून' खात्री करून घेतली आणि त्यावरूनच आनंदात गाडी चाललीये. पण 'आय नीड अ चेन्ज' या व्याख्येत ते बसतंय असं मला वाटलं नाही म्हणून मी इथे लिहिलं नाही (आणी संक्षिप्तात हा प्रवास मी इतरत्र माबोवर लिहिला आहेच)

चमन,
योग्य लिहिलं आहेस. उत्तम पोस्ट.

'मला हेच काम करायचं आहे', हे एकदा कळलं की मग कामाचे तास, कमी पैसा यांकडे दुर्लक्ष होतं. किंबहुना हे जाणवतही नाही. मात्र मला हेच करायचं आहे, हे कळायला कदाचित काही वर्षं जाऊ शकतात, किंवा क्वचित ते अगदी सुरुवातीलाही कळतं. 'तुमच्या आयुष्याचं ध्येय काय, हे शोधणं, हे तुमच्या आयुष्याचं ध्येय असावं', हे बुद्धाचं वचन म्हणून मला फार आवडतं.

चमन,
ध्येय हे तू म्हणतोस ते असू शकतेच, पण आय नीड अ चेंज हेही ध्येय असु शकते. करियरची पहिली दहा वर्षे पगाराचे, ब्रँडचे, इतर कशाचे ध्येय ठिकच, नंतर काय?
अंतिम ध्येय अशी फक्त प्रॅक्टीकल पातळीवर मिळतात का? ध्येयाचा प्रवास कमीपणाचा कसा?
तुला जी गोल अचिव्ह करायची पद्धत वाटते आहे तीच आम्हाला कदाचित गोल्स वाटतात आहेत आणि vice versa.
(तुझा दृष्टीकोन समजतो आहे. बाफवर काय चर्चा करायची, किंवा नाही त्याबद्दल फारसे काही म्हणणे नाही, आक्षेप, आग्रह, अग्रक्रम काहीच नाही. वृतीबाबत मात्र 'हे होणारच' एवढेच माझे म्हणणे आहे. आणि त्याबाबतीत बायसेस नको. आणि का नको तर 'choice by elimination' is a very powerful choice too. बुद्धापासून बर्‍याचजणांमध्ये ते दिसून येते. काय हवय सांगता येत नसेल, पण काय नको ते नक्की कळते, समोर आहे त्यातले काही तरी अस्वस्थ करते आणि त्यातुनही माणसाला हळुहळु जीवनध्येय सापडते.)

जर गाठायचं स्टेशनच माहित नसेल तर वाटलं होतं कदाचित पुण्याला पोहोचू पण हे बहूतेक ठाणे दिसतंय असं होण्याची शक्यता जास्त >> पुन्हा तेच. असे होणे यातही फारसे वावगे दिसत नाही. हा मानवी प्रवास आहे. गाड्या बदल्याव्याश्या वाटणे हेही ठिकच. ध्येयच बदलु शकतात की.

निवांत, रेव्ह्यु, मास्तुरे, नंदिनीचा नवरा ज्यांनी ज्यांनी बदल लिहीले आहेत ते त्यांनी ठरवून केलेले आहेत. कधी ठरवले, अमके न जमल्यामुळे तमके ठरवले का- याला काही अर्थ नाही. Uhoh

नंदिनी- पोस्ट आवडली.

'मला हेच काम करायचं आहे', हे एकदा कळलं की मग कामाचे तास, कमी पैसा यांकडे दुर्लक्ष होतं. किंबहुना हे जाणवतही नाही. <<
सुरूवातीला मी वेगळं काय म्हणत होते मग? असो..

पण तरी चमन काही गोष्टी नाही पटल्या. नक्की कितव्या वर्षी गोल ठरवणे योग्य आहे? १६? २२? २५? आणि मग त्यानंतर गोल ठरवून केलेला बदल हा बॅकवर्ड चेंज का?
अनेक क्षेत्रे अशी असतात की ज्याबद्दल माहितीच नसते त्यामुळे ते समजून तेच आपल्याला करायचंय हे कळेपर्यंत बरीच वर्षे जातात.
गोल अचिव्ह करताना एका ठराविक पद्धतीने काम करत गेल्यानंतर लक्षात येऊ शकतं की हे आपल्या आयुष्याचं गोल होऊ शकत नाहीये. किंवा हे एवढेच नाही तर अजून क्ष, य आणि ज्ञ हे सुद्धा मला अचिव्ह करायचेय. आणि करणे शक्य आहेही. मग?
मी २१-२२ वर्षांची असताना कॉश्च्युम डिझायनरच व्हायचे नक्की केले. दुनियेने वेड्यात काढलेच कारण अभिनयाशिवाय वेगळे काही म्हणजे या क्षेत्रात बिनकामाचे अशी समजूत अजूनही आम दुनियेची आहेच. याच विषयात एम एफ ए केले. दुर्दैवाने हा असला वेडेपणा करणारी मी एकटीच निघाले. इथे काम करताना बराच भ्रमनिरास झाला इत्यादी आहेच पण एक नक्की झाली की केवळ कॉश्च्युम डिझायनिंग करत मी समाधानी राहू शकत नाही. २४/७ केवळ कॉ डि च केले तर जगण्यास पुरेसा आणि वर थोडा उरेलसाही पैसा मिळेल हळूहळू पण त्यासाठी मी २४/७ हेच काम करू शकत नाही. आणि हे काम पूर्णपणे नाकारूही शकत नाही. नाटक, दिग्दर्शन यातही हात चालवून बघितला. डॉक्युमेंटरी बनवली. लिखाण केले. प्युअर आर्ट संदर्भाने पण काही शोध घेतेय.. हे सगळं करायला मजा येतेय. डॉक्युमेकिंग आणि लिखाणात सगळ्यात जास्त.
पण हा सगळा प्रवास बर्‍याच वर्षांचा आहे. त्यामुळे आता होईल तो चेंज बॅकवर्ड असेल का? असेल तर असो बापडा.

रैना+१
चमन, तुमचे म्हणणे समजतेय मला पण मला हवी असलेलं गोल हे "मला गुगल मध्ये नोकरी हवी" किंवा "मला महिना २लाख पगार हवा" आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असं linear नाहीच आहे. शिवाय सध्या मी करत असलेलं काम मला आवडत नाही असंही नाही. मी विचारपुर्वक त्यात गेले आहे. काम मला भरपूर समाधान देतंय. पण मला आयुष्यातले सगळे दिवस फक्त तेच करायचं नाहीये. बेसिकली माणसाच्या आयुष्यात फक्त एकच गोल असावं/असतं हेच मला अप्लिकेबल नाहीये. I am looking for a well rounded growth, not a linear one. पण सध्याची नोकरी त्यासाठी सुटेबल नाहीये, एवढंच. आणि मुख्यत्वेकरुन भारतातल्या माझ्या फिल्डमधल्या नोकर्‍या तशा ओवरॉल ग्रोथसाठी संधी देत नाहीत हे खरं आहे. त्यामुळे प्रश्न हा आहे की या सगळ्यांचा समतोल कसा साधायचा? त्याविषयी विचार चाललाय अन तो इथे शेअर करतेय बस्स. "तुम्ही हे निवडलं आहे मग रडायचं कशाला" किंवा "लोकांना नोकरी मिळत नसताना तुम्ही आपलंच तुणतुणं कशाला लावताय?" या टाइपच्या कुठल्याही आर्ग्युमेंट्ला माझ्यामते अर्थ नाही कारण माझे प्रश्न हे खरे आहेत अन ते कुणी इतरांनी सोडवावे अशी माझी अपेक्षा देखील नाहीये.

नीरजा+१.
तेचकी. चेंज फॉर्वर्ड, बॅकवर्ड, साईडवेज, उभाआडवातिडवा कसाही असु देत. त्या दिशेने टाकलेली पावले महत्त्वाची.

नताशा +१.
माझ्यामते हे जे तू लिहीलेस त्यालाच 'पोस्टमॉडर्न लिटरेचर' म्हणतात. कुणाला हास्यास्पद का वाटेना, त्या त्या व्यक्तिचा भाकरीसाठी नसणारा पण चंद्रासाठी असणारा लढा आता (कदाचित वयाच्या या टप्प्यावर) मला खरा वाटतो. आणि त्यासाठी माणुस आपल्या संस्कृतीत अध्यात्मिक inclination कडे वळतो. मग तिथेही भ्रमनिरास होतो. Proud

२४/७ केवळ कॉ डि च केले तर जगण्यास पुरेसा आणि वर थोडा उरेलसाही पैसा मिळेल हळूहळू पण त्यासाठी मी २४/७ हेच काम करू शकत नाही. आणि हे काम पूर्णपणे नाकारूही शकत नाही. >> +१
फिल्ड वेगळे असले तरी माझा सुद्धा (एडिटेड) बराचसा हाच इश्यु आहे.

फिल्ड वेगळे असले तरी बराचसा हाच इश्यु आहे.<<<
शक्य आहे. पण हा माझ्यासाठी इश्यु नाही. फॅक्ट आहे. आणि इतर अनेक फेवरेबल सिच्युएशन्समुळे असेल कदाचित मी त्या दृष्टीने पावलं उचललीयेत ऑलरेडी. असो.. बाकीचे नंतर लिहीन. आता लेक्चर आहे.

नंदिनी, च्या पोस्ट वरुन मला असे वाटले, कि कुटुंबाचे सहकार्य, हा मुद्दा इथे चर्चेत
आलेला नाही.
तिनेही स्वतः नक्कीच सहकार्य केले आहे, त्याबद्दल लिहायला हवे होते. तसे नसते, तर
असे धाडसी निर्णय घेणे, खुपदा अवघडच होते.

इथे ७० % लोक, गाडा रेटतात असे मत मांडले आहे. त्यांच्यावर असणार्‍या जबाबदार्‍या, यादेखील काही अंशी, कारणीभूत असतीलच कि.

रैना
ध्येय हे तू म्हणतोस ते असू शकतेच, पण आय नीड अ चेंज हेही ध्येय असु शकते. करियरची पहिली दहा वर्षे पगाराचे, ब्रँडचे, इतर कशाचे ध्येय ठिकच, नंतर काय? >> नंतर काय? तेच तर विचारतोय ना मी.

तुझे ध्येय काय आहे?
नक्की सांगता येत नाही
सध्या तुला एकदम निकडीने काय हवे आहे?
मला चेंज हवा आहे.
आता चेंज हवाय हा निर्णय पक्का झाला का?
हो
मग सांग पाहू नक्की काय चेंज हवाय तुला?
नक्की नाही सांगता येत.
मग आधी थॉट प्रोसेस पूर्ण कर आणि माझ्या पुढच्या प्रश्नाचं ऊत्तर दे! नक्की काय चेंज हवाय तुला?
मला समजलंय मला काय चेंज हवा आहे आणि माझं ध्येय काय आहे.
गूड! सांग मग.
मला स्थैर्य आणि कंफर्ट हवं आहे.
बरं! नक्की काय काय चेंज केल्याने तुला स्थैर्य आणि कंफर्ट मिळणार आहे असं तुला वाटतं.
नाही माहित.
पुन्हा विचार कर आणि सांग.
मला फक्त ८ तासंच काम असलेली नोकरी आणि ५० हजार रुपये पगार मिळाला की स्थैर्य आणि कंफर्ट मिळेल.
तुझी सध्याची नोकरी कशी आहे.
कमीतकमी १० तास काम आणि २५ हजार पगार.
मग ५० हजाराची नोकरी मिळवण्यासाठी तुला काय करावं लागणार आहे हे तुला सांगता येईल का?
नक्की नाही सांगता येत.
पुन्हा विचार कर आणि सांग.
मला कळलं. मला २ लाख रुपये घालून आणि पूर्ण वर्षभर अभ्यास करून हे सर्टीफिकेशन करावं लागणार आहे.
गूड! मग तुझ्या १० तासांच्या आणि २५ हजारांच्या नोकरीत तू सर्टीफिकेशनसाठी वेळ आणि पैसा कसा ऊभा करणार?
नक्की नाही सांगता येत.
पुन्हा विचार कर आणि सांग.
मला समजले. मी एका वर्षात काटकसर करून लाखभर रुपये वाचवू शकतो. वडिलांकडून, बायकोकडून मित्रांकडून, लोन काढून अजून लाखभर जमवू शकतो. आणि वेळेसाठी मी रोज सकाळी किमान दोन तास आणि शनिवारी पाच तास डीवोट करू शकतो.
गूड! मग तयारी कधी पासून चालू करतोयेस.
प्रयत्न चालू आहे.
केल्यावर मला सांग.
मी पुस्तकं आणली. वडिलांशी, मित्रांशी बोललो. रोज सकाळी दोन तास लवकर ऊठण्याची सवय लाऊन घेतली आहे. शनिवारी लायब्ररीत ७ ते १२ जाऊन बसतो.
गूड!! कीप ईट अप. यश तुझंच आहे.
परीक्षा महिन्याभरावर आहे पण नोकर्‍या मंदीत आहेत, मी जी कंपनी टारगेट करत होतो तिथे भरती बंद केली आहे.
मग आता तू काय ठरवलंयेस.
मी माझ्या सध्याच्याच कंपनीत सर्टीफिकेशनच्या जोरावर थोडं अजून वेगळं आणि अनुभव देणारं काम मागून घेणार, पगार वाढणार नाही पण मी वाट बघेन.
सर्टीफिकेशन झालं. नवीन जबाबदारीचं कामंही मिळालं पण पगार वाढला नाही. कामाचे तास कमी झाले नाहीत.
मग आता तुझी योजना काय आहे?
मी सर्टीफाईड असल्याने ह्या यू एसच्या प्रोजेक्टसाठी मी अर्ज आणि मुलाखत दिली आणि कंपनीने एक टीममेंबर म्हणून पाठवण्याचं नक्की केलंय.
गूड!! मग तिथे तुला स्थैर्य आणि कंफर्ट मिळेल असं तुला वाटतं का?
अपेक्षा तशीच आहे, पण मला आता ह्या प्रोजेक्टचा टीम मेंबर न राहता प्रोजेक्ट मॅनेजर बनायचं आहे.
गूड! मग त्यासाठी तुला काय करावे लागणार आहे.
मला मॅनेजमेंटचा कोर्स करावा लागेल आणि...
......................................................पुन्हा वरचे सगळे प्रश्न त्याच क्रमाने येणार!

आज अमेरिकेत पाच वर्षांनंतर तुला स्थैर्य आणि कंफर्ट आहे का?
माहित नाही. पण मला दोन वर्षे तरी हेच काम करून पूर्ण आनंद घ्यायचा आहे.
आज दोन वर्षांनंतर तुला कामातून आनंद मिळून तुझं समाधान झालं का?
हो आणि नाही पण...
असं का?
मॅनेजर म्हणून जबाबदारी खूप वाढलीये, शरीराला फॅमिलीला, स्वतःला वेळ देता येत नाहीये.
मग ते मिळवण्यासाठी तुला काय चेंज हवा आहे काय नवीन ध्येय तू ठेवलं आहेस?
मला ४५ वर्षी निवृत्त व्हायचं आहे.
त्यासाठी तुला काय करावं लागेल?
मला बँकेत किमान ७५ लाखाचा बॅलंस हवा. माझं घर कर्जमुक्त हवं. मुलांच्या शिक्षणाची आणि आयुर्विम्याची पूर्ण हमी हवी आहे.
हे कसं जमणार?
नक्की जमेल!! का नाही जमणार? आजपर्यंत सगळं प्रयत्न करून मिळवलंच ना! हे पण मिळवेन.
मी त्यासाठी योजना आखली आहे. ही बघ.........
......................

मी पन्नाशीला आलो आणि आज निवृत्त होतोय्..पाच वर्षे ऊशीर झाला पण ठीक आहे. योजनेत गृहीत न धरलेल्या काही गोष्टी घडून आल्या. नवीन अनुभव देऊन गेल्या ..बरंच काही शिकवून गेल्या.
गूड!! मग आता तुला स्थैर्य आणि कंफर्ट मिळाला का?
माहित नाही. पण मला आधी गावाकडे जाऊन सहा महिने निवांत रहायचे आहे. त्यानंतर कायम मनात असूनही करता न आलेली 'दुनिया की सफर' करायची आहे. मग त्यानंतर शिक्षकी पेशात राहून दिवसातून फक्त ४ तास काम करायचे. थोडी समाजसेवापण करायची आहे.
गूड मग त्यासाठी ....
हो हो मला माहितीये तुझा प्रश्न....मी योजना बनवली आहे...ही बघ....सुरुवात जपानपासून..ऊगवत्या सूर्याच्या देशापासून आणि वर्षभरानंतर समाप्ती अलास्कावर. मग तिथून आल्यानंतर ह्या कॉलेजमध्ये रूजू होणार. ह्या स्वयंसेवी संघटनेसाठी प्रत्येक गुरूवार आणि शनिवार पूर्ण वेळ विना मोबदला काम करणार.
पण वर्ल्ड टूर साठी पैशांचं कसं जमवणार.
अरे सांगतोय की धीर धर...
गूड... शेवटचा प्रश्न तुला स्थैर्य आणि कंफर्ट मिळाला का?
बहूतेक हो किंवा नसेलही माहित नाही. पण मनाला वाटतंय ते घडवून आणण्यात जास्त समाधान मिळतंय स्थैर्य आणि कंफर्ट बहूतेक शरीराला हवाय आणि मन नवनवीन गोल्स ठरवून तो काही केल्या मिळवू देत नाही.
हे स्थैर्य आणि कंफर्ट बहूधा शरीर थकत नाही तोपर्यंत मन मिळवू देणार नाही हे एवढ्या वर्षांनंतर कळतंय.
गूड! मला वाटतं तू जिंकलास, यशस्वी झालास. शुभेच्छा!! आता ह्यापुढे मला तझ्यासाठी काही प्रश्न नाहीत. तू अजून ६० व्या वर्षी नवीन ऊद्योग, एवरेस्ट मोहीम, बॉडी बिल्डींग. नवीन जॉब असे काही ठरवलेस तर योजना घेऊन पुन्हा ये आपण पुन्हा नव्याने बोलू. तूर्तास राम राम.

पुढचा/ची कोण आहे..............

आता हे वरचं संभाषण चेंज घडवून आणू पहाणार्‍याच्या प्रोफाईलनुसार बदलत राहिल पण मुख्य प्रश्न तोच राहिल.. काय ठरवलंयेस आणि योजना काय आहे?

आता ह्या चक्रात आपण कुठे आहोत हे प्रत्येकाला नक्की माहित असतं. प्रश्न फक्त एवढा आहे की त्यासाठी मी काय करतोय? हे मला लिहून काढायचंय.
जर आयुष्य जस नेतंय तसं आणि जिथे नेईल तिथेच जायचं असेल तर हे आणि ते राहून गेल्याचं म्हणत गळे काढण्याची पाळी हमखास येणार. त्यासाठी काही योजना बनवण्याचीही गरज नाही आणि पर्यायाने त्याबद्दल काही लिहिण्याचीही.

बेसिकली माणसाच्या आयुष्यात फक्त एकच गोल असावं/असतं हेच मला अप्लिकेबल नाहीये. >>> नताशा, नीधप, सावली, नंदिनी ... आयुष्यात एकच गोल नाही अनेक आहेत...खूप चांगली गोष्टं आहे.
तूर्तास आपण तुमच्या यादीतल्या सर्वात वरच्या गोलबद्दल आणि तो मिळवण्यासाठीच्या योजनेबद्दल बोलूयात. एका वाक्यात सांगा पाहू तो पहिला गोल ते पहिलं ध्येय काय आहे.

I am looking for a well rounded growth, not a linear one. >> फार छान वाक्य आहे. पण वेल राऊंडेड, अशी ३६० डीग्रीची वर्तूळाकार ग्रोथ साधण्यासाठी तुम्हाला परिघावरूनच एकेक बिंदू जोडत चालावं लागणार आहे की नाही. मग बर्‍याच लिनिअर सेगमेंटसची मिळून राऊंडेड ग्रोथ होईल की नाही.
एकाचवेळी अनेक बिंदू जोडल्यास त्रिकोण, चौकोन, शटकोन नि अजून काय काय होईल हे कसं सांगता येईल?

वरदा >>> मी वाचलेलं आहे तू लिहिलंस ते. प्रतिक्रियाही दिल्याचं आठवतंय. आहे त्या कामाचं समाधान आणि आनंद मिळतोय ह्यासारखी सुखी करणारी दुसरी गोष्टं असूच शकत नाही. पण मनाने पुन्हा काहीतरी करण्याची ऊचल खाल्ली आणि त्यासाठीची योजना तयार झाली की ईथे नक्की लिहिच.
मायबोली आणि हा धागा असेलच असेल. योजनेचा पाठपुरावा करायलाही कोणीतरी नक्की मिळेल.

चमन, ह्या आधीची तुझी पोस्ट आवडली आणि नताशाचं त्यावरच उत्तरही..
मुळात गुगलमधे नोकरी, २ लाख पगार देणारी नोकरी ह्या गोल म्हणाव्यात इतक्या मोठ्या गोष्टी आहेत का? Uhoh
स्वतःच्या लाईफचा कंट्रोल घेऊन त्याला हवं तसं वळवण हे बेस्टच.. पण मुळात 'एनर्जी स्वतःच्या शोधात वळणं' हेच मुख्य गोल वाटत असेल(ह्यात आपण काम कसं करतो, आलेले आनंदाचे/त्रासदायक क्षणांना कसे रिअ‍ॅक्ट करतो, प्रोब्लेम्स मधून कसा मार्ग करतो, काय शिकतो, निवांत वेळात काय करतो हे ही आलच - आणि हे मान्यच आहे). आणि जे लोकं वरती बदल हवा म्हणताहेत, त्यांच्यातही हाच शोध चालला आहे असं मला का वाटतंय?
जे लोक हाय प्रेशरची नोकरी सोडून घरी बसलेत ते काम आवडत नव्हतं म्हणून नाही बसलेत. कामाची बायप्रॉडक्टस असणार हे मान्य करूनही, कामात लई मजा येते हे मान्य करूनही वर्क लाईफ बॅलन्स हवा आणि त्याकरता बदल गरजेचा असेल तर तो काय असेल असा विचार करणं चुकीचं कसं? स्वतःकरता वेळ, विचार करायला वेळ, पुस्तकं वाचायला वेळ, घरच्यांकरता वेळ, मित्रमैत्रिणींबरोबरचा वेळ हे ही पार्ट ऑफ लाईफ आहेत, खूप महत्त्वाचा पार्ट. काही जणांना वेळ मिळत असेलही जॉब मधून, पण गेले १.५ ते २ महिने (निदान एका विशिष्ट, प्रायवेट) बँकेत काम करणारी सगळी लोकं मार्च एंड टारगेट्सच्या नावाखाली दर रविवारीही काम करताहेत, दररोज रात्री ९ -९:३० ला येतात, त्यांची अवस्था ही कामातली मजा अनुभवायच्या पुढे गेलेली असते. (स्वतःला, मुलांना, स्पाऊसला, घराला वेळ देऊ शकत नाही म्हणून होणारी कुतरओढ). काम कितीही आवडत असलं तरी हे अमानुष आहे आणि हे आपल्या भारतवर्षात घडतं - असं प्रेशर, वेळा अनुभवलेली माणसं मला हे फिल्ड बदलायचय म्हणतात कारण स्वतःच्या आयुष्यावर कन्ट्रोल नाही, मागणी आणि पुरवठा ह्या तत्वानुसार एकानं नाही केलं तर आणखीन कुणीतरी करतं, स्वतःसाठी वेळ नाही, तब्येतीची वाट, वयाच्या तीशीत, पस्तिशीत डायबेटिस, बीपीचे प्रॉब्लेम्स. शनिवारी रविवारी तरी हक्काची सुटी मिळणार्‍यांना(माझ्यासारख्या) हे पाहिल्याशिवाय कळणार नाही(ही माझी अवस्था नाहिये, नाहीतर मी माबोवर पोस्ट लिहित बसले नसते Wink पण मी हे आजूबाजूला पाहिलय)
हे सगळं झालं की आपली लाईफस्टाईल सुधारणं हेच गोल होऊन बसतं, आयुष्याकडून नक्की काय हवय ह्याचा विचार एका टप्प्यावर व्हायाला लागतो, गरजांचा पुनर्विचार व्हायला लागतो.
हा विचार आत्मशोधासाठीही महत्त्वाचा आहे. बॅकवर्ड तर नक्कीच नाही.

चमन अल्गोरिदम एकदम झक्कास Happy अल्मोस्ट मनातला ...
दिनेशदा, कुटुंबाचे सहकार्य म्हणाल तर त्याचा वाटा हा ९९%. कारण तेच मिळालं नाही तर सगळ प्लॅनिंग केरात Happy

वाचतोय... नविन नविन / वेग्वेगळे परस्पेक्टीव मिळताहेत ...

ओके. पटले नाही चमन. पण तुम्ही goal oriented चर्चा करु इच्छिता आहात तर तसे.
आम्ही कुठल्यातरी दुसर्‍या धाग्यावर जातो.
थँक्स फॉर द थॉट्स. Happy Enjoyed the discussion.

नानबा- मस्त. मला तो कुठला प्रभाव म्हणतेस त्याची जरा माहिती देशील का प्लीज?

कोणी दुसरा धागा काढला तर मलाही आवाज द्या.

चमन, दोन्ही प्रतिक्रिया पटल्या.

मला वाटते, २ लाख पगार, अमक्या कंपनीत नोकरी, अमकी पदवी, अमक्या प्रकारचा प्रोजेक्ट असे डेफिनिटिव गोल असले तर जास्त चांगले. तिथवर पोचलो की आनंद होतो हे एक, आणि प्रवासाची आखणी करणेही सोपे होते. एकावेळी अनेक गोल्स असणारच. ते तर आहेच. त्यात प्राधान्यक्रम ठरवून पुढे पुढे जाणे हे आपण कायमच करत असतो.

>> मार्च एंड टारगेट्सच्या नावाखाली दर रविवारीही काम करताहेत, दररोज रात्री ९ -९:३० ला येतात
वर्षातून एक महिना असे झोकून देऊन काम करायला मजा येत असणार असे मला वाटते. म्हणजे जर काम मुळात आवडत असेल तर. (आणि बाकी व्यवधानांचे नियोजन करता आले तर.)

Pages