आय नीड अ चेंज.....

Submitted by षण्मुखानंद on 14 February, 2011 - 10:07

च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!

यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!

माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?

विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.

मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?

काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.

मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.

मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.

मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.

अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.

अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?

अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.

अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अ‍ॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.

ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.

तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्‍यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.

येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.

मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्‍यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आगाऊ अरे नुसता बसतोच नाही तर एकदमच फिट्टं बसतोय तुझा अनुभव ईथे.
मस्त!!! प्रत्येक वेळी तुला 'आता मजा येत नाही' असे कळले तेव्हाच बदल हवा हेही नक्की झाले. तू प्रयत्न करीत राहिलास आणि हवे ते मिळवत राहिलास.
पीएचडी ची तयारी म्हणून काही योजना आखली असशील ना. पाच वर्षांचे टार्गेट आहे म्हणालास. त्यातही सहा महिन्यांचे- वर्षावर्षांचे ट्प्पे ठरवले असशीलंच. शक्य असल्यास कसं जमवतोयेस ते लिही. अशीच पीएचडीची वाट घेऊ पाहणार्‍यांना नक्की फायदा होईल.

मला प्रस्थापित व्यवस्थेत काम करण्यापेक्षा नवी सिस्टीम बनवायचे चॅलेंज आवडते. त्याचबरोबर
'बेटर टू बी फर्स्ट इन अ‍ॅन आयबेरिअन व्हिलेज दॅन सेकंड इन रोम' अशी जरा वृत्ती असल्याने छोट्या जागेतली मोठी जबाबदारी हे जास्त आवडीचे. >>> १०००+

नुसते लिहितांनाही काही गोष्टी जसे आपले स्ट्राँग आणि वीक पॉईंट्स फार प्रकर्षाने आपल्या लक्षात यायला लागतात.

बुवा +१

> नुसते लिहितांनाही काही गोष्टी जसे आपले स्ट्राँग आणि वीक पॉईंट्स फार प्रकर्षाने आपल्या लक्षात यायला लागतात.

हो, पण लिहा, लिहा म्हणुनही लोक ऐकत नाहीत Sad

नुसते लिहितांनाही काही गोष्टी जसे आपले स्ट्राँग आणि वीक पॉईंट्स फार प्रकर्षाने आपल्या लक्षात यायला लागतात.>>> प्रचंड अनुमोदन!!! हे सगळे असे मी कधीच लिहिले नव्हते, पण डोक्यात होते. काल लिहिताना मलाच काही मुद्दे नव्याने दिसले आणि गंमत वाटली.
तू 'नॉट टू बिगिन टील हाफ डन' ही नवी म्हण ऐकली आहेस का? पीएचडीच्या बाबतीत माझा प्रयत्न तसा आहे. पाच वर्षे प्रत्यक्ष कामाला लागली पाहिजेत. माझे ग्राऊंडवर्क, रिसर्च प्रपोझल, रफ एमओ याची तयारी गेले वर्षभर स्लो बट स्टेडी चाललीच आहे. माझ्या कंट्रोलबाहेरचा सर्वात मोठ फॅक्टर म्हणजे मला हव्या त्या संस्थेतून हे करायला मिळणे. तसे नाही झाले तर बॅकअप प्लॅन मात्र अजून नीट स्पष्ट नाही.

@चिनूक्स- संदर्भासहित स्पष्टीकरण करा!!!!!!!!!!!

ईथल्या १०-१२ पानांच्या पूर्ण चर्चेचा सारांश ह्या एकाच लिंकवर आहे Happy

ही पूर्ण साईटच मस्त आहे. बदल घडवू पाहणार्‍यासाठी थोडं आत्मपरीक्षण, आपल्या बदलाच्या दिशेने प्रवासाबद्दलच्या कार्यक्रमासाठी 'एक डायरी' म्हणून छान ऊपयोग करता येवू शकतो.

बदलांबद्दलचे चांगले कोट्स

आगाऊ ती वन लाईनर सही आहे. Happy

अतिशय महत्वाचा विषय चर्चेसाठी पुढे आणलात, धन्यवाद.
परीक्षा, मार्क, टक्के आणि नंतर पगार एवढ्यातच आपला आयुष्याच्या भविष्याचा विचार थांबतो. मला किंवा मुलांना काय हवय, आवडतय, आयुष्यभर करायला आवडेल ह्याचा विचार महत्वाचा वाटत नाही.
सायन्स जमणार नाही, कोमर्स - आर्टसला जा, हुशार आहे म्हणजे डोक्टर किंवा ईंजीनीयजी व्हायला हव, भरपुर पगार म्हणून सोफ्टवेयर आय टि घे... पण कुठेही गेलं तर मेहनत करायची, यशस्वी व्हायच, आयुष्य वेचायच तर त्याची आवड नको?
आज कोणत्याही क्षेत्रात नाव कमावता येतं पैसा कमावता येतो. सिनेमा, खेळ, कला, ह्यात प्रत्यक्ष भाग घेऊन कींवा समिक्षा, लेखन, समालोचन, अभ्यास करुन यश मिळवता येतं. त्या साठी त्या विशयाचं वेड महत्वाचं. त्या करीता, मुलांना सर्व क्षेत्रांची ओळख करुन देणं गरजेचं आहे.
मनाजोगं काम असेल तर इतर त्रुटी निभाऊन नेता येतात, आणि भरपुर पैसा कमवून, तो वापरायला, मनाजोगता वापरायला, वेळ नसेल आणि नंतर ताण-तणावांमुळे शरीर-मन खिळखिळं झालं तर शेवटि हातात काय रहातं?
शाळेच्या दिवसात किंवा नंतरही मला नक्की काय करायचय हा निर्णय सर्वात कठीण आणि महत्वाचा. हे एकदा ठरलं तर. ९९% लोक त्यात यशस्वी होऊ शकतात.

Pages