माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाक गरम तर हवाच शिवाय, गुलाबजामचे मिश्रण पण पुरेसे सैल हवे. पाकिटावर दिलेल्या प्रमाणातच त्यात दूध वा पाणी घातले पाहिजे. तरिही खात्री हवी असेल तर प्रत्येक गुलाबजामच्या मधे एक खडीसाखरेचा चौकोनी खडा ठेवायचा.

एम्पी, इथे पहा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59984.html?1079651858
आणि रेसिपी विचारायची असेल तर 'पाककृती हवी आहे...' धाग्यावर विचारा. पोळ्या करताना काही चुकले असे वाटले तर इथे विचारा. Happy

थोड साजुक तुप सोड मस्त लागतात मग वर ओल खोबर, कोथिंबीर लिंबु अहाहा,>>>>>
अहाहा..खरच एकदम झक्कास!!! तोंडाला पाणी सुटले!!!

दुधाचे जे टेट्रा पॅक असतात, त्यावर लिहील असत heating not required पण फ्रिज मधल थंड दुध प्यायला नको वाटत, ते तापवल तर चालत का?

सुरभी, हा प्रश्न इथे विचार. मग ते दुध तापवल्यावर फाटलं तर ह्या बाफवर प्रश्न विचार, माझं काय चुकलं ? Happy

सींडरेला तुझ्या उत्तारा चि खुप गम्मत वाटली. Happy

मी पण गिट्झ चेच गुलाबजाम पाकिट आणते. पिठ सैल भिजवते (?? नक्की आठवत नाहीय), चांगले मळुन घेते. मग मंदाग्नीवर तळते. वर त्यांना गरम गरम पाकात टाकते. एवढा सगळा पेशन्स दाखवते तरीही पाकात घातले की थोड्याच वेळात बिचा-यांना खोSSSल खळी पडते Sad मग खाताना अगदी चिवट लागतात....

काय चुकतेय?? मला वाटते मी पिठ बहुतेक सैल भिजवत नाही. कारण गोळे बनवताना गोळे असे सुबक गुळगुळीत होत नाहीत. सगळ्या चुका लक्षात ठेऊन परत पुढच्या वेळेस करायला गेले की झाले... परत ते खळीवाले गुलाबजाम तय्यार...........

*****&&&*****
What others think about me is none of my business Happy

पिठ साधारण चपातीच्या पिठासारखे मऊ भिजवायचे. पण हलक्या हातानेच, म्हणजे बोटानीच मळायचे. दोन्ही तळव्यात दाब न देता घोळून गोल करायचे. तसेच वळून झाले कि साधारण ओल्या फडक्याखाली झाकून ठेवायचे ( तळेपर्यंत )
आणि फार टक लावून बघून नये. लाजून त्याना खळी पडते बहुतेक.

आणि फार टक लावून बघून नये. लाजून त्याना खळी पडते बहुतेक.>>>>
हे हे हे हे....लै भारी दिनेशजी Biggrin

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

मी अगदी दाबदाबुन मळते....शिवाय गोळे करतानाही भरपुर दाबते... बहुतेक आधीच्या वेळच्या खळीवाल्या जामुंचा राग काढत असणार.....

मळतानाच्या खड्ड्यांच्याच मग खळ्या होतात वाटते Happy

*****&&&*****
What others think about me is none of my business Happy

साधना, एकदा मावा आणून गु.जा. करून पहा. मावाच्या कसाप्रमाणे मैदा मिसळायचा.. मस्त होतात अगदी.. मी नेहेमी माव्याचेच करते, अन चव नंबर १. Happy अन भरपूर मळलं तरी चालतं.. Happy

>>>>मी अगदी दाबदाबुन मळते....शिवाय गोळे करतानाही भरपुर दाबते
अ‍ॅशबेबी, मला वाटतं इथेच चुकतं तुझं. मळताना आणि गोळे करताना हाताला तूप लावून अगदी हलक्या हाताने करायचं असतं तसंच पिठ सैल किंवा फार घट्टही असता कामा नये. आपली पोळीची कणिक जशी असते तसंच हवं.

एक प्रश्ण. मला एका साऊथ इंडियन मैत्रिणीने डबा भरून मुरकू (तांदळाच्या पिठाच्या चकल्या) दिल्या आहेत. त्या फारच कडक आहेत. त्या मऊ करता येतील का? ( वाफ देऊन वगैरे?) किंवा त्याच काय करता येईल?

हां त्याचा चाट होउ शकेला. तुकडे करुन वरुन कांदा टोमाटो घाला. चांगले लागेल.

त्या दह्यात भिजवून खाता येतील.
दातांच्या डॉक्टरकडे अधूनमधून जावे म्हणतात.
मैत्रिणीच्या हेतूबद्दल पण शंका घेता येईल.

दह्यातली चकली चाट. हा तर पार्टी आयटम झाला. छान आहे कल्पना. मला वाट्त अशाच नवीन रेसीपीच तयार होत असतील. दह्यात टाकण्याआधी गरम पाण्यात टाकू का दहिवड्यासारख?

रुपा आणि दिनेश thanks!

पाण्यात टाकण्यापेक्षा ताकात टाकल्या तर चांगल्या. पण चुरा करुनच टाकाव्यात. नाहीतर वातड होतील.
बिघडलेल्या जिलेबीचा मालपुवा झाला, किंवा मोनॅको आणि ग्लुकोजचे पिठ मिसळल्याने, क्रॅकजॅक झाले नाही का ?

आजचा नवा सक्सेस्फुल प्रयोगः
चकली चाट
कोमट ताकात भिजवून हे मुरुक्कु दह्यात टाकले. दह्यात मीठ, थोडि साखर टाकली. वर चाट मसाला, थोडा पुदिना, तिखट घातल. मस्त चाट तयार झाली. थोडी क्रंची ठेवली. हव तर चिंचेची चट्णी घालावी. दिसायलापण छान दिसत होती.

पुढच्या पार्टीला चकली चाट नक्की. It is going to be a hit item.

ह्याबद्दल रुपा आणि दिनेशंना thanks!

वाह!! माझ्या साउदिडींयन मैत्रिणीला सांगायला हवे की बाई लवकरात लवकर कडक मुरुक्कू पाठव! Wink

आर्च, शक्य असल्यास रेसिपी योग्य जागी हलव.

हे करुन पाहीन गं आर्च.

माजं काय चुकलं ठाव हाय मला पन ते शेयर करायला आले इथे बाकीच्या भगिननींना वाचावया:)
भगिनींनो, फ्रोजन सेकशन मधून चुकून सुद्धा daily delight चे कुठलेही products आणू नका.
गवार नी आठळा भाजी बनवायची म्हणून फ्रोजन कूक्ड आठळा आणल्या. उत्साहाने गवार अर्धा तास घालून नीट वगैरे केली. आठळा कूक्ड म्हणून शेवटी घातल्या पण हाय रे कर्मा, शिजता शिजत न्हवत्या आठळा,नुसती लाकडं. बरे चव कशाचीही नाही.
एवढी चांगली टवटवीत गवार फुकट गेली. निवडून निवडून खल्ली शेवटी.
नेक्ट टायमाला चेस्टनटस आणूनच भाजे बनवेन.
(पण माझे काय आणखी चुकले असे असेल तर सांगा जर कोणी daily delight चे products च्या आठळा खल्ल्या असतील.

साबुदाणा भिजवताना नेहमीच कुठेतरी चुकते. पाण्याचे प्रमाण? भिजवण्याचा कालावधी? साबुदाण्याचा प्रकार?... नेमके काय चुकते हेच समजत नाही. आई सारखे अगदी मऊ का नसतील भिजत? दूध वापरुन पाहिले, कोमट पाणी वापरले पण हवे तसे भिजत नाहीत आणि खिचडी एवढी चिकटते की अर्धी पातेल्यातच राहते अथवा साबुदाणा कच्चाच राहतो.

साबूदाणा भिजवायला एकदम फुलप्रुफ मेथड- जेव्ढा साबुदाणा आहे तो आधी स्वच्छ धूवून घ्यायचा (खूप वेळ नाही कारण स्टार्च जाते). त्याच्या बरोब्बर अर्ध्या प्रमाणात पाणी साबूदाण्यात ठेवायचे. झाकण ठेवून द्यायचे की खिचडी करायच्या वेळेस काढायचे. आम्ही एकदा १६ किलो साबूदाण्याच्या खिचडीचा (यशस्वी) प्रयोग केला होता- त्या संशोधनाचे हे फलित.

बाजारात वेगवेगळ्या आकाराचा साबुदाणा उपलब्ध आहे. मोहरी एवढा ते मिरी एवढा. जर आकाराने लहान असेल तर फार पाणी लागत नाही आणि फार वेळ भिजवावेही लागत नाही. जो आपला नेहमीचा आकार, म्हणजे जो मधलाच आकार आहे त्यासाठी वरिल प्रमाण योग्य आहे. त्यापेक्षा जो थोडा मोठा असतो त्याला जरा जास्त पाणी लागते. तसेच कालावधी देखील जास्त लागतो. मध्यम साबुदाणा तीन तासात भिजतो तर मोठा साबुदाणा रात्रभर भिजवावा लागतो.
खिचडी करायच्या आधी हाताने साबुदाणा मोकळा करुन घ्यायचा. त्यावेळी जर बोटाला तो ओला लागला तर तो भिजला नाही असे समजायचे. मग तो जरा वार्‍याखाली ठेवायचा. दाण्याचे कुट या वेळीच मिसळून घ्यायचे.
जर साबुदाणा ओला राहिलाच तर एकतर त्याची खीर करावी किंवा कूटाचे प्रमाण वाढवावे. तसेच कूट बारिकही घ्यावे. नीट भिजलेल्या साबूदाण्याची खिचडि झाकण न ठेवताच छान मोकळी होते.

रैना, किती वेळ ठेवलास पाण्यात ते नाही लिहीलेस ? रात्रभर ? २ तास ? Happy

सोनू, साबुदाण्याची खिचडी यशस्वी होण्यामागे साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण आणि भिजण्याचा वेळ हेच कारण आहे. मी साबुदाणा धुतल्यावर ज्या लेव्हलवर साबुदाणा असेल त्याच लेव्हलला पाणी ठेवते. मस्त फुलतो, खिचडी चिकट होता नाही. अगदी तास ठेवला तरी चालतो. बर्‍याचदा संध्याकाळी ४,५ ला भिजत घालून साडेआठ, नऊला खिचडी केलेली आहे.

मला आलेपाक फार आवडतो. माझ्याकडे ginger paste ची भली मोठी बाटली आहे. त्याचा आलेपाक करण्याची इच्छा आहे. कृति सांगाल का? धन्यवाद.

Pages