माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> 'टिकेल का हो?'
तीथे मात्र ठळक अक्षरात ल्याहावं लागेल :
'येथे फक्त खाद्यपदार्थांबाबत पोस्ट्स अपेक्षीत आहेत. लग्न व नातेसंबंधांसाठी नवा धागा सुरु करावा!'

पन्ना, इडली पात्र स्वच्छ नव्हतं का निघालं Wink

मृ, Lol

किती त्या पोस्टी. माझा न्यूनगंड (हा शब्द म्हंटला की मला तोंडावर मोठा फोड आलाय असं वाटतं, का ?) दूर झाला एकदम Proud

सिंडे Proud मला पण तसचं वाटलं Wink
मृ, खरच सुरु करायला हवा असा धागा Happy खाद्य पदार्थांचा Wink

'येथे फक्त खाद्यपदार्थांबाबत पोस्ट्स अपेक्षीत आहेत. लग्न व नातेसंबंधांसाठी नवा धागा सुरु करावा!' >>>मृ.. लई हसले !! .... टिकेल का हो, बुरशी तर नाही ना येणार, कधी मेला मनासारखा (पाक) जमतच नाही, गच्चीवर वाळवूयात का ? चांगली तिखट फोडणी द्या बरं ! सगळ नीट वाचून केलं होतं तरिही बिघडलं-ही सगळी वाक्य ना***** पण लागू पडतात नाही ?

एक धागा दागिने इ. विषयी पण सुरु करावा. तेथे पण मृ ची सूचना तंतोतंत Wink

'येथे फक्त खाद्यपदार्थांबाबत पोस्ट्स अपेक्षीत आहेत. लग्न व नातेसंबंधांसाठी नवा धागा सुरु करावा!' >>> सहीच...

मी टिन मधुन काढून फ्रिज मध्येच ठेवते. फिजर मध्ये पण ठेऊन बघीतल... पण टिन लगेच संपवायचा म्हणजे... त्या पेक्षा त्या नारळाच्या दुधाच्या क्युब्ज कशा करायच्या ते कोणी सांगा प्लीज... ते सोप्प वाटतय.. आणी तो अननस खराब झाला हे कस कळेल?
बाकी बीबी खरच पॉप्युलर झालाय की !

पन्ना, इडल्यांसाठी उडीद डाळ भिजवताना मेथीचे दाणे घालतेस का? मी एकदा फोनवर बोलताना एकीकडे डाळ भिजवण्याचा उद्योग केला आणि निदान चमचाभर तरी मेथीचे दाणे घातले गेले. त्यावेळच्या इडल्या गुलाबी झाल्या होत्या. पण अगदी मस्त मऊ झाल्या होत्या.

लालू, BB ची कल्पना आवडली.

वॉव, दागिन्यांचा धागा!!!! करा बै सुरु लवकर.

खोबर्‍याचा एक स्कॅपर बाजारात मिळतो. त्याने खोबरे खवणले जाते पण विळी वा खवणीसारखे काम होत नाही.
माझ्याकडे ब्राउनचा मिनी पायमर आहे. त्यात खोबर्‍याचा बारिक किस होतो. मला तरी सालाचे वावडे नाही पण साले काढण्यासाठि नारळ फोडून फ्रीजमधे काहि तास ठेवावा. नंतर त्याचे खोबरे करवंटीपासून वेगळे करावे ( ते सहज होते ) मग धारदार चाकूने साले काढावीत, पीलर तितकासा उपयोगी पडत नाही.
याच पायमर मधे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची छान बारिक चिरुन होते. हे सगळे किस छान कोरडे होतात. हे पदार्थ वाटले जात नाहीत. दाण्याचे कूट पण होते.

इडलीच्या पिठात वाटतानाच जर थोडे खोबरे घातले तर इडल्या हलक्या आणि चवदार होतात. नारळाचे पाणीपण वाटणात घ्यावे.

नारळाच्या दूधापेक्षा मला नेस्ले ची पावडर जास्त योग्य वाटते, मॅगीची पण मिळते.
डब्यातला अननस हा लाईट किंवा हेवी सिरपमधला मिळतो. तो सहसा खराब होत नाही. पण खराब झाला असेल तर चवीला गोड न लागता पाणचट लागतो. वासही विचित्र येतो त्याला.

मॅगी ची पावडर मी आणली होती, ( चुकून आणली गेली ) पण सोलकढी किंवा पिनाकोलाडा करायला ती कशी वापरायची हे न कळल्याने मी ती आमटी, भाजीत घालून संपवली.. तिचा नारळाच्या दुधासारखा कसा उपयोग करायचा?

ती बर्‍यापैकी कढत पाण्यात घालून विरघळवून घ्यावी लागते. मग ते मिश्रण फ्रीजबाहेरच थंड करायचे. हे मिश्रण काय किंवा ताजे नारळाचे दूध काय, फ्रीजमधे ठेवले कि त्यावर साय ( कोकोनट क्रीम ) धरते.
अश्या प्रकारे थंड केलेले दूध सोलकढी वा पिना कोलाडासाठी वापरता येते.

वा मस्त बाफ आहे हा. आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईला फोन करायची गरज नाही. Happy
तर माझा प्रश्न असा आहे की, गेल्या दोन वेळेला माझ्या पुर्‍या बिघडल्या. तेलकट्ट झाल्या. काही वेळा कडक पापड झाल्या. काय चुकले असेल? पुर्‍या किंवा इतर तळणीच्या पदार्थांसाठी तेल कितपत गरम करावे? आणि आंच मंद ठेवावी की मध्यम? आणि पुर्‍या लाटताना जाड लाटाव्यात की पोळीसारख्या पातळ?

................................
माझे जगणे होते गाणे...

पुर्‍याचे पिठ कधी पण घट्ट भिजवावे. तेल घालू नये त्यात भिजवताना. नुसत्या कणकेच्या केल्या तरी तेलकट होत नाहीत पुर्‍या. हवा असेल तर मैदा नाहीतर रवा घालावा एक वेगळी चव असते रवा घतलेल्या पुर्‍यात. १ वाटी कणीक + चार चमचे रवा + मीठ +साखर असे किंवा १ वाटी कणीक + पाव वाटी मैदा + २ लहान चमचे कच्चे तेल + मीठ + एक चिमटी साखर्(सीक्रेट आहे ते माझे :)). मैदा जर घातलाच तर तेल घालावे.
रवा घातला तर नीट मळून घ्यावे. पातळ खूप लाटल्या तर पापड होतात. तेल एकदम कडक नाही पण एखादी छोटीशी गोळी टाकून पहावी जर अंदाजे मिनीटाच्या आत वर आली तर तेल योग्य आहे. पुरी टाकताना आच आधी जरा मोठी करावी मग कमी ठेवावी. पुरीची एक बाजू फुलली की पलटावी. लहान कढईत ज्यास्त पुर्‍या नी कमी तापलेले तेल ह्यानेपण पुर्‍या तेलकट होतात. Happy

हूश्श! निबंध लिवलाय मी इथं 'पुरीवर' Happy

प्राची
नीट सांगते पहिल्यापासून.
कणकेत थोडं तेल,मीठ घाल. पाणी घालून अगदी घट्ट मळून घे. (फूड प्रोसेसरमधील कणकेच्या पुर्‍या फारच उत्तम होतात. ) या घट्ट कणकेच्या छोट्या गोळ्या कर. त्या मध्यम आकाराच्या लाट .....खरं म्हणजे तो गोळा कडेकडेने लाटायचा. म्हणजे ती पुरी मध्ये किंचित जाड व कडेने पातळ होते. मग ती हमखस फुगते. तर आता तेल तापवायला ठेव. तेल चांगले कडकडीत तापले म्हणजे पुरी तेलात सोड. थोडा झार्‍याने मध्यभागी दाब दे...जेणेकरून पुरी तेलात पूर्ण बुडेल. मग ती लगेच फुगेल. फुगल्यावर अर्ध्या सेकंदानंतर ती उलटव. उलटवल्यावर मात्र एक/दोन सेकंद तेलात राहू द्यावी. म्हणजे खालून चांगली तळली जाईल. (हे टायमिंग.. करून करून अंदाजानेच जमते) . नंतर झार्‍याने हळूच बाहेर काढावी. पुरी एकदा तेलात टाकल्यावर एकदाच उलटावी. म्हणजे ती खालून छान खर्पूस व वरून मऊ रहाते. आपला स्पीड खूप असेल तर गॅस बारीक करण्याची गरज नाही. कारण जर आच कमी पडली तर पुर्‍या फुगणार नाहीत. पण जर लाटण्याचा स्पीड कमी पडत असेल तर अधून मधून गॅस बारीक करावा. पण अगदी ऐन पुरी तेलात सोडण्याच्या वेळी आच भरपूर आहे ही खात्री करून घ्यावी. जर पुर्‍या करताना मदतीला कुणी नसेल तर सगळे गोळे आधीच करून घ्यावे. मगच लाटायला घ्यावे.
करून पहा...............!

हो, पुर्‍याची कणीक घट्ट भिजवावी. तसेच भिजवताना पाव चमचा साखर घालावी असे मला आईने सांगितले होते. कारण आठवत नाही. तेल चांगले तापले असेल तर पुरी तेलात सोडल्याक्षणी टम्म फुगुन वर येते. कधी कधी तर कडा कच्च्या राहतात की काय असे वाटते. फार जाड नाही आणि फार पातळ नाही अशी एकसरखी पारी लाटावी. आणि हो, पुरीवर झार्‍याने तेल टाक, १० वेळा उलटुन बघ वगैरे खेळत बसायचे नाही Proud

पुरीचे पीठ भिजवताना कणकेत थोडा बारीक (गव्हाचा रवा) घालून, त्यावर थोडे कडकडीत तेल ओतावे व थंड पाण्याने पीठ घट्ट भिजवावे. भिजवलेले पीठ थोडावेळ तसेच ठेवून परत एकदा चांगले मळून घ्यावे.
पुर्‍या लाटताना पिठी किंवा कणीक लावू नये. पोळपाटाला थोडे थोडे तेल लावून पुर्‍या लाटाव्यात.
पुरी तेलात टाकल्यावर त्यावर झार्‍यानेच थोडे तेल घालावे व पुरी हलकेच तेलात बुडेल असे करावे. मग उलटून दुसर्‍या बाजूने पण तळून घ्यावी. पहिल्यांदा तेलात टाकल्यावर जी खालची बाजू असेल ती मऊ व जाडसर अन वरची बाजू पातळ पण कुरकुरीत व्हायला पाहिजे.

थॅन्क्यू दिनेश. हे सोप्पे वाटत आहे, शिवाय वाया जाणार नाही. नक्की करुन बघीन.

पुरी लाटायला 'पुरी प्रेस मशीन' एकदम बेस्ट... भराभर होतात, कुणी मदतीला नसेल तरी चालत.

लालु झक्कास बाफ! पन्ना मी पण हिरव्या चटणीचे क्युबस् ठेवते. खोबर्‍याबद्दल अश्विनी म्हणते तसंच मीपण करते, फक्त डब्यात खोबरं ठेवतांना छोटे छोटे भाग थोड्या अंतरावर ठेवते. त्यामुळे काढुन वापरायला सोपं जातं. वापरण्याआधी बाहेर काढुन ठेवायला क्वचित विसरले तर चक्क २० सेकंद (हाय) माइक्रोवेवमध्ये ठेवते.

पूर्‍या लाटायला एखादा मदतीचा हात असेल तर जास्त चांगले. मोठी चपाती लाटून वाटीने त्याच्या पुर्‍या कापायची जुनी पद्धत होती, पण त्याने पुर्‍या नीट होत नसत. पुरी नीट होण्यासाठी मधे किंचीत जाड व कडेने पातळ असावी. पण हा जरा वरचा टप्पा झाला. उत्तर भारतात बहुतांशी मैद्याच्याच पुर्‍या असतात, तसेच त्याना त्या थोड्या तेलकटच आवडतात.
मस्कतमधे स्थानिक लोकांची पुर्‍या करायची वेगळीच रित आहे. तेलावर मोठी पोळी लाटुन त्याचे ते चार त्रिकोणी तूकडे कापतात. आणि ते तसेच तळतात. या पुर्‍या त्रिकोणी होत असल्या तरी भराभर होतात. खमंग लागतात.

मी मागे एकदा लिहिला होता, तरी परत एका मराठी सिनेमातला शरद तळवलकर आणि रत्नमाला ( या म्हणजे दादा कोंडके यांच्या आये, त्या प्रत्यक्षात फार सुगरण होत्या. भाकर्‍या फार उत्तम करत असे दुर्गाबाईनी लिहून ठेवले आहे ) यांचा प्रसंग लिहितोय.
बाई पुर्‍या करत असतात आणि शरद खात असतात. बाई म्हणतात, कधीच्या पुर्‍या करतेय, तर ताटात फक्त चारच पुर्‍या. ते म्हणतात, चव बघत होतो. त्या म्हणतात, आता प्रत्येक पुरीची चव वेगळी का असणार आहे, तर ते म्हणतात, तेच तर बघत होतो.

'पुर्‍या तेलकट होऊ नयेत म्हणून मोठ्या आचेवर, कढत तेलात तळणं हा एकमेव उपाय' इती सुगरण आजी.

धन्यवाद. मृण, आईने पण हेच सांगितले.
भजी, वडे, करंज्या तळताना आंच कमी ठेवायची ना? आमच्याकडे तळण खूप कमी होते, त्यामुळे करायची वेळ आली की मी गडबडते.:)
................................
माझे जगणे होते गाणे...

चकल्या, शंकरपाळयांसाठी पण आच कमी ठेवायची. पहिल्यांदा करत होते. पहिला घाणा शंकरपाळ्याचा पाहता पाहता तपकिरी आणि सगळे शंकरपाळे कढईतुन काढेपर्यंत आणखी ढुस्स काळा रंग झाला होता.

पदार्थ तळताना, पदार्थातील पाण्याचे प्रमाण किती आहे, यावर उष्णता किती द्यायची ते ठरवायचे असते. गुलाबजाममधे पाणी जवळपास नसतेच, त्यामूळे ते मंद आचेवर तळायचे. शंकरपाळे, करंज्याचे पण तसेच. पण बटाटावडा वा भजी यासारख्या पदार्थ तळताना, उष्णता जास्त लागते. कारण त्यात पाणी जास्त असते.
ज्या पिठात साखर असते, त्या पदार्थाना सोनेरी रंग येण्यासाठी पण आच मंद असावी लागते.
ओले पदार्थ तेलात टाकले कि तेलाचे तपमान एकदम कमी होते, म्हणून त्याचा घाणा पण कढईच्या मानानेच ठरवायचा.

पूरी पूराणात अजुन भर..

पूरी थोड्या गार पाण्यातच भिजवावी. मी अर्ध फ्रिज मधल गार पाणी आणि रूमटेंप्रेचरचं पाणी घालुन पीठ भिजवते.

भिजवलेलं पीठं थोडा तेलाचा हात लावून १५ मिनीटं झाकुन ठेवावं.

टम्म फुगलेली पूरी तळून बाहेर काढल्यावर वरच्या पातळ पापुद्र्याला हलहेच छोटं छिद्र पाडायचं (टूथपीक/उदबत्तीची काडी), त्यामुळे आतली वाफ बाहेर पडून पुरी छान लुसलुशीत रहाते. रवा घातलेली पूरी असेल तर त्याचा फुगीरपणा ही टिकुन रहातो.

इथे मी काही दिवसांपुर्वी शिरा/उपमा या विषयी विचारले होते..
सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिले.. हे दोन्ही पदार्थ एकदम झक्कास जमले Wink

सगळ्यांचे मनापासुन आभार....या एकदा घरी..मस्त बेत करु Happy

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

मी चितळे/ गिटझ चे गुलाबजाम करते आणि पाकात घालते. पण पाक आतपर्यंत जात नाही. काय चुकत असेल?
प्राजक्ता

प्राजा, पाक गरम असतानाच टाकतेस ना? तसं केल्याने लवकर मुरतात.

Pages