माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण उचलताना पटकन तुटतात >>>>>>> प्रीती, गुलाबजाम अगदी तळल्या तळल्या लगेच गरम पाकात टाकले होते का? गिट्सचे गुलाबजामून कराताना ते तळल्यानंतर जरा निवू द्यायचे (थंड होऊ द्यायचे) आणि गरम पाकात टाकायचे.

प्रीती, अजुन एक टिप - गिट्सचे गुलाबजामून कराताना थोडा रवा (मी १/२ वाटी घेते) दुधात भिजवुन गुलाबजामून मीक्स मधे घालावेत - मस्त होतात, अगदी खव्या सारखे....

बीघडलेले गुलाबजामून पोळी बरोबर खाउ शकतेस.....

काल आळुवड्या केल्या पण त्यात कोळ जरा जास्त झालाय तर जरा आंबट लागतात वड्या. कुठल्या भाजीत वगैरे खपवता येतील का?

धन्यवाद सिंडरेला, दिनेशदा.. आंबट वड्यांचे चांगले लागेल का आणी ह्या वड्या तळलेल्या पण आहेत.. वरच्या पा क्रु मधे न तळलेल्या वड्या वापरायच्या आहेत ना.

मला कल्पना नाही की हा योग्य धागा आहे की नाही, पण तरी विचारते.

  1. जसा पोळ्यांसाठी हा धागा आहे, तसाच धागा भाकरी किंवा थालीपीठासाठी आहे का? माझ्या एका नवीनच गृहिणी झालेल्या मैत्रिणीला या बाबतीत फोनवरून लहान-सहान टिप्स सांगून सांगून मी (खर तर आम्ही दोघीही) कंटाळले आहे. तेव्हा असा धागा असल्यास कृपया सांगा.
  2. मला मैदा, रवा, भगर, साबुदाणे, गूळ किंवा तत्सम काही तरी प्रोसेसिंग होऊन थेट घरात येणारे पदार्थ कसे बनवतात, किंवा त्यांचा दर्जा कसा ओळखावा, वगैरे गोष्टींची गेली कितीतरी वर्षे उत्सुकता आहे. वरील पदार्थांपैकी फक्त गूळ कसा बनवतात याची माहिती इथे मिळाली. याबाबतीत काही माहिती देणारा(रे) धागा(गे) आहे(त) का?

दिनेशदा नारळाच्या दुधात शिजवलेल्या अळुवड्यांची पा.क्रु. तुम्ही दिली आहे का असल्यास लिंक द्या न?

धन्यवाद. सगळ्यांना......
मला तुमच्या मुळे कळ्ले की चुक काय झाली होती लाडू करताना.
ते चुकलेले लाडू तसेच खाण्याचा प्रयत्न चालू आहे.
पण आता परत अशी चुक नक्की नाही होणार.... ़काय चुकले ते आता मला कळ्ले आहे..
परत सगळ्यांना मनापासुन धन्यवाद......

साक्षी,
वड्या आंबट झाल्यात म्हणून नारळाचे दूध न वापरता चवच बारीक वाटून घेतला तर चांगला. वड्या तळलेल्याच आहेत त्यामूळे शिजवायला नको.
दूध वापरले तर त्यात वड्या घालून जरा गरम करायचे. त्यात गूळ घालायचा.

चव वापरला तर बारिक वाटून असेच करायचे. मसाले हवे तर एखादी मिरची फोडणीला द्यायची. बाकी काही घालायची गरज नाही.

धारा, असा वेगळा धागा नाही, पण विषयाला अनुसरुन मी लिहिले होते.

दुधिचे दहि, मिर्ची पावडर, धणे जिरे पवडर, कुटलेली बडीशेप घालुन पराठे बनवले होते, तेल / तुप न लावता.
चव चांगली आली आहे पण थोडे चिवट झाले आहेत. गळ्याकडे डिंक कसा लागत आहे. काय झाल असेल?

हो हो पथ्य म्हणुन. प्रत्येक वेळी दुधी भोपळ्याची भाजी खाववत नाही म्हणुन म्हटल पराठे करुन पाहु.
अनघा_मीरा मी यात फक्त गव्हाच पिठ घातल होत.
दुधी तयार नसेल का? कच्चा खाउन पाहीला होता, तो चांगला लागत होता.

दूधीच्या सालीजवळ डिंक असतो. जून दूधी असेल तर जास्तच असतो (दुधीच्या सालीत नख खुपसून बघायचे. सहज आत गेले नाही तर दूधी जून समजायचा) अशावेळी साले काढून किसायचा.

अनघा_मीरा मी यात फक्त गव्हाच पिठ घातल होत.>>. नुसत्या कणकेने, तेही तेतू विरहित म्हंजे चामट होणार. एक वाटी कणीक + १/२ वाटी ज्वारीचे पीठ टाकले तर खुसखुशीत होतील. (डाळीचे पीठ २ चमचे(बेसन) फ्थ्याकरता म्हणून लिहीत नाही)

आज पहिल्यान्दा मी घरी दही केले आहे. ते जमलेय नीट पण कवडी काढताना तार येतेय. ह्याचा काय अर्थ? चव घेउन पाहिले तर गोड दही आहे. कडवट वगैरे नाही. फ्रिजमध्ये ठेवून दिले आहे. उपयोगात घ्यावे की नको? पुन्हा तार न येण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? धन्यवाद!

अमी

peacelily2025, विरजण कशानी लावले ? नेहमीच्या दह्यात जिलेटीन असते , त्यामुळे दह्याला तार येते. तेव्हा जिलेटीन नसलेले आणि लाइव्ह अ‍ॅक्टीव्ह कल्चर असलेलं दही आणा. ट्रेडर ज्यो चे किंवा इंग्रो मधलं दही वापरुन बघा. तसंच दूध उकळी येइपर्यंत तापवून गार करायचे. विरजण लावून खूप ढवळायचे. मी चांगले ५० वेढे घेते. दूध जर २%, १% किंवा फॅट फ्री असेल तर कवडी पडते पण खूप पाणी सुटते. तसंच रुमचे तापमान पण कळीचा मुद्दा आहे. थंडीच्या दिवसात ओव्हन मिनिमम तापवून बंद करावा. त्यात दह्याचे भांडे ठेवून द्यावे.
दही प्रोजेक्ट ला शुभेच्छा.

माझी दही लावायाची पध्दत. हमखास कवडी दही होते
१] स्टीलच्या भांड्यात दुध चांगले उकळुन घेणे.
२] मोठ्या भांड्यात पाणी घेउन त्यात हे उकळलेल्या दुधाचे भांडे ठेवणे.
३] चमच्यान हलवत दुध कोमट करणे. (बोटाला सहन होइल इतपत कोमट) [ २-४ मिनीटातच होते ]
४] ज्या भांड्यात दही विरजवायचे आहे त्यात चमचाभर विरजण टाकणे.
५] जरा उंचावरुन त्या भांड्यात दुध ओतणे.
६]चमच्याने थोडे ढवळुन भांडे शेगडीजवळ ठेवणे.
रात्री ९ वाजता लावले की सकाळी ७ वाजता अगदी कवडि दही तयार. आणी जर १-२ तास फ्रीजमधे ठेवले तर उत्तम.
मी दही लावताना एकाच भांड्यात न लावता २-३ भांड्यात लावते म्हणजे प्रत्येकवेळी कवडि मिळते.

मस्त बीबी आहे...
मला कोणी सांगेल का-

साम्बार करताना, साम्बार मसाला फोडणीत टाकावा का, वरून घालावा..
मस्त सुगंध सुटला पाहीजे अगदी...

काल मी केप्रचा लोणचे मसाला वापरुन मिक्स (फ्लॉवर, गाजर, मिरची) लोणचे घातले आहे. ते जरा कडवट लागते आहे. काय चुकले असेल?
भाज्या चिरुन त्यावर मसाला, मीठ, तिखट घातले. सगळे एकत्र करुन मग गार केलेली फोडणी घातली. फोडणीत अगदी थोडे मेथी दाणे (चुकुन) घातले. त्या मेथी दाण्यांमुळे झाले असेल काय कडवट?
आता सुधारता येईल का?

अदिती, मेथीदाण्यांमुळेच आलाय कडूपणा. आवडत असेल तर थोडा गूळ चिरुन घाल त्या लोणच्यात. आंबटपणासाठी काही घातलं आहेस का?

धन्यवाद अश्विनी.

लिंबू घातलय. गूळ घालुन बघते. उद्या पाहुणे येणार आहेत. होईल का गूळ मिक्स तोपर्यंत?

@ शुगोल, दही नेहमीच्या ग्रोसरी स्टोरमधून आणले होते - तेच चुकले हे कळले. आता मात्र ईन्डीयन ग्रोसरीमधून आणेन. बाकी सगळे तुम्ही लिहिल्याप्रमाणेच केले होते. उत्तरासाठी धन्यवाद!

अमी

सांबारासाठी भाज्या थोडं पाणी, मीठ,, चिमूटभर हळद , चमचाभर मसाला घालून शिजवाव्या. भाज्या शिजत आल्या की वेगळी शिजवून घोटलेली तुरीची डाळ घालावी. व परत चमचा भर ( वा हवा तितका ) मसाला घालावा. हे सर्व उकळलं की मोहरी , कडीपत्ता, सुक्यामिरच्या, हळद, हिंग याची फोडणी करावी. फोडणीत मसाला घालत नाहीत.

उपमा करताना रवा आधी मस्त गुलाबी भाजून घ्या. फोडणी झाल्यावर त्यात तुमचा नेहेमीचा माल मसाला टाका. म्हणजे कांदा, उडीद डाळ. काजू इत्यादी. रव्याच्या दुप्पट पाणी त्यात टाक, त्यात मीठ आणि थोडीशी साखर टाका. चांगलं उकळायला लागलं कि आच मन्द करा. भाजलेला रवा हळू एका हातानी पाण्यात सोडा आणि सतत ढवळत राहा. अजिबात गुठळ्या होणार नाहीत.

.मायबोलीवरचा ७ कप स्वीट http://www.maayboli.com/node/10848 हा पदार्थ आज करुन पाहीला..पण वड्या चिक्कीसारख्या चिकट झाल्या..
खुट्खुटीत नाही झाल्या...काय चुकलं असेल...
सगळं प्रमाण निम्म वापरलं होतं

१/२ कप बेसन,१/२ कप खोबरं,१/२ कप दुध,१/२ कप तूप,१ कप साखर आणि १/२ कप मँगो क्रश वापरला...
(११/२ कप साखरेऐवजी १/२ कप मँगो क्रश आणी १ कप साखर घातली)

कोणी करुन पाहील्या असतील तर प्लीज मदत करा

Pages