कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

मस्त लेख Happy

छाया गांगुली हे गजलगायकीतलं मोठं नाव आहे. त्यांनी गायलेलं 'जिहाले मिस्कीन' निवाळ थोर आहे. 'गमन'मध्ये त्यांचं 'आप की याद आती रही' हे गाणं होतं.

धन्स प्रशांत. एक छान माहीती. या लेखाच्या प्रतिसादांमधे आणखी बरंच वाचायला मिळेल हि आशा.
'जिहाले मिस्कीन' बद्दल काय बोलावं. लेखामधे उल्लेख झालेले गायक आणि त्यांनी गायलेली सगळीच गाणी खास आहेत.

तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
>>>>> "प्यार का मौसम" या चित्रपटातलं "तुम बिन जाउं कहां" हे आणखी एक गाणं किशोर, रफी, आणि आशा ने गायलं आहे. त्या पैकी किशोरने गायलेल गाणं चक्क भारत भुषण वर चित्रीत केलेलं आहे.

बरे झाले आठवण काढलीत. Happy

रुना लैला घाला त्या यादीत. 'तुम्हे हो ना हो' अहाहाहाहाहाच
गीता दत्त ?
अलीकडच्या काळात कोण बरं? सुनिधी?
माणिकताई वर्मा?

मला कधीकधी लताआशांची प्रचंड फॅन असूनही वैताग येतो. सारखे तेच. सारखे तेच. अशा वेळेस काही आवाज नुसतेच वेगळेपणामुळे किंवा मनापासून गायल्यामुळे म्हणा लक्षात राहतात. नंतर असेही वाटते की हे काही खरे नाही गड्या. ते आवाज, ते सादरीकरण कुठेच लताआशा तोडीचे वाटत नाहीत. फक्त नव्याची नवलाई असते त्यात. असोच.
रहमान आणि आनंद मोडक कधीकधी तेवढ्यासाठी आवडतात. निदान नवीन आवाज तरी सादर करतात.
मधुश्री किंवा अंजली मराठे का असेना.
ताल हा चित्रपट रीलीज झाला होता तेव्हा आमचा एक सहाध्यायी मला कँपसभर हुडकत आला होता. ते 'इश्क बिना' चे अगदी सुरवातीचे कडवे 'तू गायलीस का' विचारायला. आम्ही त्याची इतकी उडवली पण त्याचे म्हणणे एकच, नीट ऐक, तुझाच आवाज वाटतो तो. 'होहो, ही मी चाल्ले रहमानकडे गायला.. 'असे किती खवचटपणे म्हणले तरी मला वाटतं त्यात 'खरे' आवाज याचाच भाग जास्त असावा (उंच, किनरे, अतिगोड काळी दोनातले जीवघेणे नसलेले).. असो.
तर का वापरत नाहीत हे लोकं 'खरे' आवाज? देशात काय कमी गाणारे पडलेत? धंद्याची गणित असतील म्हणा.. Happy

लेख छान आहे, पण तरी हि मंडळी नवीनच आहेत. (पुर्वी आम्ही अशा गाण्यांची अंताक्षरी खेळलो होतो इथे.)
सुलक्षणा पंडीत (बेकरार दिल अरे तू गाये जा) राजकुमारी ( घबराके जो हम सबसे - महल) वर्षा भोसले (सावन कि आयी बहार रे- जुनुन) रेश्मा (लंबी जुदाई- हिरो) अशी दोनचार नावे आठवताहेत.
आरती मुखर्जी ने, दो पंछी दो तिनके.. हे पण छान गायलेय.
हिरा मोती मधे ओ पी ने, पुष्पा पागधरे आणि वाणी जयराम (बहुतेक) यांचा आवाज पण वापरला होता.

मस्तच लेख Happy
सकाळीच लेख वाचला आणि न राहवून छाया गांगुली यांचे "आपकी याद आती रही...." गाणं ऐकलं. Happy

तुझसे नाराज नही जिंदगी.. वाला अनुप घोषाल बद्दल काही माहिती असल्यास लिहाल का?>नचि, हेच लिहायला आलो होतो. Happy

अजुन काही Happy
१. जगजीत कौर (तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो (शगुन), देख लो आज हमको जी भर के (बाजार).

२. मीनू पुरूषोत्तम (नी मै यार मनानी चाहे लोग बोलिया बोले (सोबत लता मंगेशकर, चित्रपट: दाग)

३. परवीन सुलताना (हमे तुमसे प्यार कितना (कुदरत))

४. कमलेश अवस्थी (तेरा साथ है तो मुझे क्या कमी है (प्यासा सावन) (लेखात उल्लेख आहे पण यांनी गायलेली अजुन काही गाणी समजली तर आवडेल. :-)).

गीता दत्त, परवीन सुलताना, राजकुमारी, सुमन कल्याणपूर यांची नावं या यादीत पटली नाहीत. परवीन सुलतानांनी शास्त्रीय संगीतात फार मोठं काम केलं आहे, आणि त्यांचे चाहते जगभर आहेत. उरलेल्या तिघींचीही कारकीर्द बरीच मोठी होती.

अरे सुमन कल्याणपूर ला लग्नानंतर नवर्‍याने अजिबात गाऊ दिले नाही त्यामुळे ही गुणी गायिका काळाच्या पडद्यामागे गेली.. आताच्या पिढीला तिचं नाव ही लक्षात नाही.. Sad Sad

खूपच छान माहिती. आरती मुखर्जीची खूप चांगली गाणी आहेत व मुख्य म्हणजे ओळखीची.

अजून एक....तलत अजीझ-डॅडी सिनेमातलं आइना मुझसे मेरी, पहलीसी सुरत मांगी

साधना सरगमलापण माझ्यामते उपेक्षितांच्या यादीत घातले पाहिजे. समकालिन अलका यांत्रिक Happy पेक्षा ती नक्कीच उजवी होती. पण जितकी संधी मिळायला हवी होती, तेवढी तिला नाही मिळाली.
पहला नशा (जो जिता...), चुपके से (साथिया), चंदा रे चंदा रे (सपने) आणि अशी अनेक.....

हो..आणी 'संजीवनी'देखील अशीच उपेक्षित आहे.. तिने 'करीब' मधली सर्व गाणी काय सुरेख म्हटली होती
'चुरालो ना दिल मेरा सनम..'

मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी>>>>>>"मुझको अपने गले लगा लो ए मेरे हमराही" हे ही सुंदर गीत त्यांचेच. Happy

एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. >>>>>>>

१. "मेहबूब कि मेहंदी हाथो में"
(चित्रपट: मेहबूब कि मेहंदी, संगीत: लक्ष्मीकांत प्यारेलाल, सोबत: लता मंगेशकर)

२. हम तेरे बिना भी नही जी सकते और तेरे बिना भी नही जी सकते
(चित्रपट: ज्वालामुखी, संगीत: कल्याणजी आनंदजी, सोबत: आशा भोसले, महेन्द्र कपूर)

६०च्या दशकातील गायिका शारदा हिचा आवाज 'राजश्री' ला किती पर्फेक्ट बसायचा!!!
तिने अराऊंड द वर्ल्डची सगळीच गाणी नि "जाने चमन, शोला बदन" हे गुमनाम मधील गाणे, 'जब भी ये दिल उदास होता है'.. हे सीमामधील गाणे अप्रतिम गायलेय.

बोले रे पपी.......हे गाणं जिनं गायलय ती वाणी जयराम का मागे पडली कळत नाही. सुमन कल्याणपूरकरलाही तिच्या आवाजाच्या मानाने कमीच संधी मिळाली. कदाचित त्या वेळी संगीतक्षेत्रात आशा आणि लता या दोघी तळपत असल्याने या आणि अशा इतर झाकोळल्या गेल्या असाव्यात.

लेखाचं शीर्षक वाचताच माझ्या मनात पहिलं नाव आलं ते अमित कुमारचं ! माझा सर्वात आवडता गायक..

मध्यंतरी नाशिकात किशोरकुमारच्या भक्तांचा मेळावा झाला, त्यात अमितकुमार सकट बर्‍याच हरहुन्नरी किशोरकुमार भक्तांनी गाणी म्हटली (संदर्भ: मटा आणि लोकसत्ता). शिरीष कणेकर साहेबांनी अमित कुमारची 'लोकप्रभा'मधे उडवलेली टर वाचून जाम संताप आला होता. माझ्यासारख्याच अमितकुमार पंख्यांसाठी त्याची काही मला आवडलेली आणि याक्षणी चटकन आठवत असलेली गाणी:-

ये जमीं गा रहीं है, बडे अच्छे लगते है, मांग लूंगा मैं तुझे तसवीर से... लव्हस्टोरीमधली सगळीच...
आणि हल्ली हल्लीच गायलेली... दिल में बजी गिटार, छोरी की आँखे, बोले चुडीयाँ गाण्यातला मधला एक छोटा पण लक्षात राहणारा तुकडा...

मस्त... ग्रेट.. एकदम रीफ्रेशींग लेख आहे.. ज्ज्जाम आवडला.. Happy काही माहिती नवीन समजली तर काही शंका दूर झाल्या.. Happy

एक छोटासा बदल.. म्हारो गाव काठावाडो गाणं मंथन सिनेमामधलं आहे. Happy भुमिका नाही..

रैना.. Happy रुना लैला, तुम्हे हो ना हो... काय आठवण दिलीत.. Happy व्वा... त्या एका गाण्यासाठी ती कायम लक्षात राहिल.. Happy

रुना लैला, तुम्हे हो ना हो... काय आठवण दिलीत.. व्वा... त्या एका गाण्यासाठी ती कायम लक्षात राहिल.. >>>>>>"ओ लाल मेरी पत रखियो बला झुलेलाल" आणि "ओ मेरा बाबू छैल छबिला मै तो नाचूंगी" हि दोन नॉन फिल्मी गाणी रूना रैलाचीच ना?

म्हारो गाव काठावाडो गाणं मंथन सिनेमामधलं आहे>>>

एक शंका... अमूलच्या जाहिरातीत वापरलेलं गाणं ते हेच का?.. स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्यावरचं ?

जिप्सी...
ओ लाल मेरी पत रखियो बला झुलेलाल हे तिचंच.. दुसर्‍याचं माहित नाही... Sad

मित.. हो हो.. तिच अ‍ॅड.. सिनेमा पाहिला तेव्हापर्यंत मला माहितच नव्हतं हे सिनेमातलं गाणं आहे मला वाटायचं अमूलचंच आहे ते.. Happy

प्रिती सागरचे बच्चे कंपनीसाठीचे अल्बम फेमस आहेत की. माझ्या लहानपणी मी आणि माझ्या बहिणीने तिच्या "फुलवारी बच्चोंकी" या अल्बम मधल्या गाण्यांची पारायणे केली होती. अजूनही ती गाणी लागली तर पाठ म्हणून दाखऊ शकेन. शिवाय नर्सरी र्‍हाईम्स च्या सीडीज आहेत तिच्या. पिल्लूसाठी काही महिन्यांपूर्वीच एक आणलीये आणि खूप छान चालीत असतात तिने गायलेल्या नर्सरी र्‍हाईम्स Happy

नाझिया हसन ही पाकिस्तानी गायिका राहिली या यादीत.>>>>>>>>>>>>>>>.. हो एकदम वेगळा आवाज आणि कामाली सुंदर .......एक वेगळेच कॉम्बिनेशन होती ती.............यंग तरंग नावाचा अल्बम मधे ती आणि तिचा भाउ झोहेब याची छान गाणी आहेत...............

मस्त लेख.
सैलाब सिनेमातलं " धक धक गर्ल" च्या तोंडी असलेला कोळी गीत मला वाटत अनुपमा देशपांडे नी गायल आहे.
त्यानंतर तिनी काही हिंदी गाणी म्हटली आहेत का?

Pages