कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

श्री.करंदीकर,
मला नाही असे वाटत की, इथे शारदासाठी एक प्रथितयश 'गायिका' म्हणून सुमनताई, जगजीत कौर आणि वाणी जयराम यांच्या पंगतीत ताट मांडले आहे. श्री.प्रशांत यांच्या लेखाचा तो उद्देशही नाही. केवळ "चला त्या आठवणीच्या रस्त्यावर जाऊन परत आपण त्या आवाजांना हाक देऊ या, त्यांच्यावर काहीतरी भाष्य करू या" अशा स्वरूपातील चर्चा लेख+प्रतिसादात अपेक्षित होती आणि बहुतांशी ते उद्दिष्ठ्य वा मर्यादा सर्वानीच पाळली आहे. शारदाचा उल्लेख "कुछ याद इन्हे भी कर लो" इतपतच मर्यादित आहे. त्यांची तुलना अन्य गायिकांशी करणे किमान मला तरी बिलकुल अपेक्षित नाही. तो एक वेगळा विषय होईल.

मराठीत "लावणीसम्राज्ञी" म्हणुन नावाजलेल्या "सुलोचना चव्हाण" यांनीही हिंदीत "सुलोचना कदम" (पूर्वाश्रमीचे नाव) या नावाने हिंदी गाणी गायली आहे. Happy

चित्रपट: ढोलक
मगर ए हसीना ए बेखबर - सोबत मो. रफि

छलक रहा है निगाहोंसे प्यार थोडासा

चोरी चोरी आग लगा कर

हे गाणं अवश्य ऐका Happy
भारत के लोकगीत (चित्रपट: फॅशन, सोबत मुबारक बेगम)

अजुन काही:
जो बिगड गयी वो किस्मत है - (चित्रपट : बाबूजी)
नजर से नजर लड गयी - (चित्रपट : बाबूजी)
क्यो परेशान हुए - (चित्रपट : बाबूजी)

जिप्सी, ते भारत के लोकगीत मधे मला आशाचा आवाज वाटतोय.
अगदी त्या काळातील तिच स्टाईल होती तिची. सुलोचनाबाईंच्या
आवाजात काही ओळी असतील, पण मुबारक बेगम नक्कीच नाही.

पुर्वी एक गाणे लागायचे,

आहे मैया सोने का बनायो तुने मेरा आचल
आहे मैया करियो किरपा रखियो लाज हमारो मैया

एक वेगळाच आवाज होता.एक गाव की कहानी असा काहिसा चित्रपट होता,
खुप वर्षात ऐकले नाही,ते गाणे.

जिप्सी पण कधी, सुमन कल्याणपूरच्या अखिया तरसन लागी चा उल्लेख
करताना दिसत नाही. बूंद जो बन गयी मोती, मधली मुमताजची काही
गाणी तिला होती. दुसरे मुकेशबरोबरचे, हा मैनेभी प्यार किया.
दोन्ही यू ट्यूबवर आहेत.

हो देखो देखो देख रहा था पपीहा
पपीहा जाके सबसे कहेगा पपीहा
पपीहा भला चुप क्यू रहेगा

असे एक साधारण डिस्को स्टाइलचे गाणे, महेद्रकपूरबरोबर ती गायली
होती. चित्रपटाचे नाव विसरलो, पण बहुतेक त्यातच, तिचे, हाले दिल
उनको सूनाना था, पण होते.

देखो देख रहा था पपीहा हे महेन्द्र कपूर आणि सुमनताईंचे गाणे, जरी चित्रपट ("फरियाद" अशोककुमार आणि झेब रेहमान - जीवनमृत्युमध्ये होती ती, एकाच गाण्यासाठी) साफ आपटला असला तरी गाणे वेगवान असल्याने त्यावेळी (६५-६६) फारच आगळेवेगळे वाटले होते. 'हाले दिल उनको' ही त्यातीलच. स्नेहल भाटकरांची ती गाणी.

महेन्द्र कपूरचे त्यानंतर अशाच धर्तीचे 'ना सून सून बुरा ना देख देख ना बुरा' हे मंकी गीतही अशाच वेगवान चालीमुळे बर्‍यापैकी गाजले होते.

दक्षिणा यानी माहितीचा मुद्दा छेडलाच आहे तर त्या निमित्ताने एका गुणी गायिकेची इथे आत्ता आठवण झाली तिच्याबद्दलही थोडेसे :-

लता मंगेशकर यांचा "श्रद्धांजली" हा अल्बम आपणा सर्वानाच माहीत असणार याबद्दल माझ्या मनी संदेह नाही. त्यातील गायक-गायिका आणि त्यांच्याबद्दल लताजीना वाटणारा आदर प्रतीत होतो. यातील काही गाणी (लताच्या आवाजात) ऐकताना मूळ गायिकेच्या आवाजातही अमुक एक गाणे कसे असेल याची उत्सुकता कायम मनी रूंजत असे. या गायकांपैकी फार ओढ लागून राहिली होती ती 'पारूल घोष' यांच्याविषयी.

पारूल घोष ~ जिचा आवाज ऐकून खुद्द गुरुदेव रविन्द्रनाथ टागोरांनी जिला शांतिनिकेतनमध्ये येण्यासाठी निरोप धाडला होता ती पारूल. अनिल विश्वास यांची धाकटी बहीण तर बासुरीवाद्क पन्नालाल घोष यांची पत्नी. 'श्रध्दांजली' मध्ये लताजीनी गायिलेले पारूलचे गाणे "पपिहा रे मेरे पिया से कहियो जाए" ऐकताना पटते की हेच गाणे त्यानी का निवडले असेल. मग मी मूळ गाणे (जे गीतकार प्रदीप यांच्यासमवेत पारुलने गायिले होते) कोल्हापुरातील एका संगीतप्रेमीच्या संग्रहातून ७० RPM माध्यमातून ऐकले. चित्रपट होता बॉम्बे टॉकिजचा 'किस्मत'. पडद्यावर कुणी गायिले याचीही माहिती नव्हती पण ढोबळ मानाने पार्श्वगायनासाठी प्रथमच पारुल घोषचा आवाज वापरला गेल्याचा इतिहास सांगतो. अर्थात त्यावेळी नायक-नायिकेनेच गाणी म्हणायची हा प्रघात होता त्यामुळे खुद्द लता मंगेशकर यानाही 'ऐ बादे सबा इठलाती न आ' हे लहानपणी देविकाराणीने स्वतःच गायलं आहे असं वाटायचं मग ज्यावेळी ते गाणे पारुल घोषने गायले आहे हे समजल्यावर त्या आवाजाच्या प्रेमातच त्या पडल्या. दिलीपकुमारच्या 'ज्वार भाटा', राज कपूरच्या 'हमारी बात' असे काही मोजके चित्रपट होते ज्यात पारूलचा आवाज वापरला गेला.

असो.

लताने पारूल घोषला वाहिलेली "श्रद्धांजली" या लिंकवर ऐकण्यास मिळेल.
http://www.youtube.com/watch?v=FVs0bd8pDFg&feature=related
जरूर ऐकावी असे म्हणतो.

अशोकजी, खुप छान माहिती.
धन्यवाद शेअर केल्याबद्दल. अजुन असेल तर नक्की शेअर करा. Happy

Dominique Cerejo हे एक नाव अजुन नोंदवावसे वाटते कारण कठीण कठीण आलाप आणि शब्द गाण्यात हिचा हातखंड आहे..उदा. पुकार या चित्रपटातले सुनता है मेरा खुदा.. या गाण्यातील सुरवातीचा आलाप... रंगीला चित्रपटातले थिम साँग मधला आवाज.. गाण्यांमधले इंग्लिश शब्द...इत्यादी. रेहमानच्या गाण्यात आलाप सरगम वगैरे जे काही उपद्व्याप Happy त्याचे असतात मुख्यतः डोमिनिक च्या आवाजात असतात.......तरी सुध्दा ही इतर दुनिये पासुन जरा दुर्लक्षीतच आहे..........

मराठीतील बालगीतं गाणारी योगेश खडीकर वै. मंड्ळी (खोडी माझी काढाल तर, दिवसभर पावसात असुन, ए आई, मला पावसात जाऊ दे.. फेम )कुठे गेली???

शेरॉन प्रभाकर आणी आलिशा चिनॉय दोघीही विंग्रजी म्युझिकल्स गाणार्‍या जास्त. विंग्रजी म्युझिकल्समधे मुंबईत भरपूर गायलेल्या आहेत त्या. आणि स्टेज शोज पण.
शहझान पदमसी शेरॉनची मुलगी.

बाकी वर कुणीतरी कुमार सानू म्हणजे संगीतावरील बलात्कार म्हणलंय ते मात्र अगदी अगदी.. आम्ही कॉलेजात असताना असल्याच सगळ्या टुकार जोकरांची जाम चलती आलेली होती. नाकात गाणारे वॉन्नाबी किशोरकुमार सगळे..

कुमार सानु एकदाच चांगलं गायला.... रादर, आर.डी.बर्मननी त्याच्याकडून चांगलं गाऊन घेतलं..... १९४२ अ लवस्टोरीसाठी.... Happy

हो पण मधेच काही सूर असे गेंगाणे लावलेत त्याने ना की कळतं हे ब्येणं मुळातलंच ब्येकार हे... आणि आरडी जादूगारच हे अजून जास्त पटतं. Happy

@ उदय
Dominique Cerejo चा उल्लेख झाला ते छान झाले. नव्या दमाच्या गायक/गायिकेत हे नाव नक्कीच पुढे येईल असा आज तरी विश्वास वाटतो. डॉमिनिकला विविध अ‍ॅड जिंगल्समध्ये ऐकत होतोच पण ज्यावेळी 'रॉक ऑन' मधील तिचे 'ये तुम्हारी मेरी बाते' चांगलेच हिट झाल्यावर बर्‍याच नव्या संगीत दिग्दर्शकांचे तिच्याकडे लक्ष गेलेले दिसते. गुणी गायिका वाटते. चोप्रांच्या "प्यार इम्पॉसिबल' चे टायटल सॉन्गही तिचेच आहे.

१९४२ अ लव्ह स्टोरी मधे कुणीतरी शिवाजी नावाचा गायक गायला होता ना. साधारण हेमंत कुमारसारखाच आवाज होता. त्याचेही गाणे नंतर कधी ऐकले नाही.

दिनेशदा, १९४२....मधले 'ये सफर बहुत है कठीन मगर' बद्द्ल म्हणताय का? त्या गाण्यात भूपेन हजारिकांचा पण आवाज आहे ना ?

@ अशोक....ती रोजा पासुन रेहमान कडे काम करत आली आहे आता आता कुठे ती मुख्य प्रवाहात येत आहे..

कुमार सानु एकदाच चांगले गायला १९४२ मधे ?
मला तरी त्याची सुरूवातीच्या काळातली आशिकी मधली गाणी खुप आवडतात.
तेव्हाचा त्याचा आवाज आणि दर्जा नंतर कुठे ऐकू आला नाही अगदी १९४२ मधे पण नाही.

सारा मोरा कजरा चुराया तूने हे गाणं आरती मुखर्जीचंच आहे ना? आणि नानी तेरी मोरनी को मोर ले गये हे बालगीत तिचंच का?की (रुपा) गांगुलीचं?
ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता हे उषा मंगेशकरांनी(सुद्धा) गायलेलं आहे का?
आणि जानूं जानूं मैं काहे खनके है तोरा कंगना यात आशा भोसले बरोबर गीता दत्त आहेत का? गीता दत्तांची हिंदी चित्रपटगीतं बरीच आहेत पण दोन मराठी गैरफिल्मी गीतं आठवतात.१) जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला २)उदे उदे ग उदे मागते अंबाबाईचा जोगवा.
जुन्या जमान्यातल्या अमीरबाई कर्नाटकी. कोई कह दे गुलशन गुलशन हे त्यांचंच ना?
शमशाद बेगम ह्या प्रस्थापितही आणि दुर्लक्षितही. काहे कोयल शोर मचाये रे मोहे अपना कोई याद आये रे हे आग मधलं गाणं त्यांचंच. अशी अनेक.
वरती कुठेतरी वसंतराव देशपांड्यांचा उल्लेख आहे. मराठीत त्यांनी पार्श्वगायन केलेले आहे.तुझी नि माझी जुळली प्रीती हे युगलगीत आठवते.
शिवाय आमीरखां आहेत, धाकटे पलुसकर आहेत...

@ उदय ~
होय. तुम्ही तिच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर मी तिच्यासंदर्भात गुगलींग केले. रेहमानसमवेत शंकर-एहसान-लॉय या त्रयीचाही तिच्या करीअरवर छान प्रभाव दिसतो. शुभेच्छा असू देत या नव्या गायिकेला [किमान काही काळ तरी 'कुछ याद इन्हे भी कर लो' असे म्हणण्याची वेळ येऊ नये.]

@ रैना ~
आभारी आहे, आवर्जुन गाणे ऐकल्याबद्दल. गंमत म्हणजे तुमची पोस्ट वाचून मी परत एकदा 'पपीहा रे...' मनापासून ऐकले आणि पुनश्च भारावून गेलो. "आज किधर चली मै अकेली, कांप रही मेरी जीवनबेली...." वा: किती टची वाटते इथे !! इथल्या सर्वच सदस्यांनी हे गाणे त्या लिंकवर ऐकावे, इतके सुंदर गायिले आहे, लतादिदीनी.

@ हीरा ~
"सारा मोरा" हे १९६५ च्या 'दो दिल' मधील, रफी आणि आरती मुखर्जी (लग्नानंतर त्या आरती मुखोपाध्याय झाल्या. फार प्रसिद्ध आहेत बंगाली चित्रपटसृष्टीत).
मात्र "नानी तेरी मोरनी" हे मासूम मधील बालगीत गायिले होते 'राणू मुखर्जी" या हेमंत कुमार यांच्या कन्येने.

लताने श्रद्धांजलीच्या अल्बममधे सर्वच कलाकारांबद्दल भावपूर्ण उदगार काढले आहेत. त्यातला तो ध्रुपद धमार आहे (सप्तसूरन तीनक्राम..) तो माझा अत्यंत आवडता. ती रचना सैगल, मन्ना डे आणि लता या तिन्ही कलाकारांच्या आवाजात मी ऐकलीय. मन्ना डेचे गाणे नेटवर उपलब्ध नाही पण सैगल साहेबांचे आहे. त्या आधी दुसर्‍या एका कलाकाराने केलेले गायनही खास आहे.

संगीतसम्राट तानसेन ची गाणी शोधताना, पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी गायलेले एक गाणे पण सापडले. सुंदर आवाज आणि गायन. पण अर्थातच त्यांनी नंतर चित्रपटासाठी गायन केल्याचे ऐकले नाही.

वर पपीहरा चा उल्लेख आलाय. ती मूळ चीज गंगुबाई हंगल आणि कृष्णा हंगल यांनी गायलीय. तूलना योग्य नाही, पण त्या मियाँ मल्हार नंतर, वाणी जयराम ला ऐकणे अशक्य आहे. गेल्यास आठवड्यात गंगुबाईंवर, ईप्रसारण वर सुंदर कार्यक्रम सादर झाला. टॉन्सिलचे ऑपरेशन व्हायच्या पुर्वी त्यांच्या मधाळ आवाजातल्या, काही उत्तम रचना ऐकवल्या त्यावेळी.

बेगम परवीन सुलताना आणि दिलशाद हुसेन खान यांनी रझिया सुलतान साठी (शुभ दिन आयो रे) गायन केले होते. त्या गाण्यावर गोपीकृष्णने उत्तम नृत्य सादर केलेय. अर्थात बेगम परवीन सुलताना यांचे नाव शास्त्रीय गायन क्षेत्रात खुपच मोठे आहे, पण त्यांनी जी मोजकी चित्रपटगीते गायली त्यापैकी, हमे तूमसे प्यार कितना हेच जास्त ऐकले गेले. त्यामानाने बिसरत जाये मोसे कान्हा आणि देव पुजी पुजी हिंदु हि दोन गाणी कुठे ऐकण्यातच आली नाही. (माझ्याकडे होती. )

दिनेशदा, इथे उल्लेख झालेलं पपीहा रे पारुल घोष यांचं किस्मत चित्रपटातलं, गुड्डीतलं नव्हे.

राणो मुखर्जीवरून अंतरा चौधरीची आठवण झाली. सलील चौधरींची कन्या.
'तेरी गलियों में हम आए दिल ये अरमानों भरे लाए' हे मन्ना डेंच्या सोबतीने तिने गायलेलं गाणं ऐकायला मिळतं.

श्रद्धांजलीबद्दल : जिथे मूळ गाणी आधी ऐकलेली नाहीत, फक्त तेवढीच लताच्या आवाजात ऐकायला छान वाटतात.
कॅसेटमध्ये प्रत्येक गायक-गायिकेच्या (मूळ) गाण्याची एक हलकीशी झलकही पार्श्वभागी ऐकायला मिळते. त्यात काननदेवींच्या आवाजात 'कुछ याद रहे तो सुन कर जा; हां कर जा या ना कर जा' या दोन ओळी ऐकायला मिळतात. हे मूळ गाणं मात्र ऐकायला मिळालेलं नाही.

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातल्या गायकांची चित्रपट संगीतात मुशाफिरी : यात शोभा गुर्टुंचा उल्लेख आला का? सैंया डोली लेके आए तेरे द्वार सबेरे लेक जाएंगे

सादारी बेगम मधे: आरती अंकलीकर टिकेकर आनि शुभा जोशी : हुजूर इतना अगर हम पर करम करते तो अच्छा था; राह में बिछी हैं नजरें

साज मध्ये देवकी पंडित : फिर भोर भयी जागा मधुबन

@ जिप्सी
~ तुम्ही वर म्हटले आहे की, अजून माहिती शेअर करा. तर थोडेसे त्या अनुषंगाने (खरे तर 'पारुल घोष' हा माझ्याप्रमाणे कित्येकांच्या मनातील हळवा कोपरा आहे, त्यामुळे त्याबाबत कुणी कुठेही छेडले तर चर्चा करायला मला आवडतेच.)

पार्श्वगायन संकल्पनेची तिच्यापासूनच सुरूवात झाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सायगल युगानंतर (किंवा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर) खर्‍या अर्थाने रफी, मन्ना डे, मुकेश व नंतर किशोर यांचा उदय झाला तर त्याच अगोदर लताने ते विश्व व्यापून टाकण्यास सुरूवात केली होती. पन्नालाल घोष यांची पत्नी म्हणून तसेच एक गृहिणी म्हणून पारूल संसारात रमून गेली असली तरी अनिल विश्वास या थोरल्या भावाच्या मार्गदर्शनाखाली पार्श्वगायनही छानपैकी मार्गस्थ झाले होते. मुंबई चित्रपट व्यवसायात १९५५ नंतर जे बदल घडत गेले त्याला सामोरे जाण्यात ना अनिल विश्वासनी ना पन्नालाल घोषनी स्वारस्य दाखविले व दोघेही काही काळानंतर दिल्लीला निघून गेले. अनिलदा या ना त्या निमित्ताने आकाशवाणी आणि नंतर दूरदर्शनच्या प्राथमिक अवस्थेत त्या प्रवाहाशी स्वतःला जोडुन घेत गेले [दूरदर्शनच्या १९८४ च्या पहिल्या हिट सीरिअलचे - "हम लोग" चे संगीत अनिलदा यांचे होते], परंतु नैराश्येने ग्रासलेले बासरीवादक पन्नालाल घोष १९६० मध्ये स्वर्गवासी झाले.

पारूल पन्नालाल दांपत्याला 'सुधा' नावाची एकच मुलगी होती. पती निधनानंतर पारूल दिल्लीच्या एका उपनगरात भावाच्या साहाय्याने संगीताचे छोटेछोटे वर्ग घेत राहिल्या व तेच त्यांच्या आर्थिक आयुष्यातील साधन बनले. पुढे सुधाचा विवाह देवेन्द्र मुर्डेश्वर (हे देखील एक सुप्रसिद्ध असे बासरीवादक होते. त्यांचे २००० मध्ये निधन झाले) यांच्याशी झाल्यानंतर तिच्या सुखी संसाराकडे पाहात पारूल आपली दु:खे विसरत चालली.

पण नियतीचा खेळ विचित्रच म्हणावा लागेल. सुधाच्या संसारात 'आनंद' चे आगमन झाल्यावर नातवासोबत पारूलचे दिवस चांगलेच जाऊ लागले पण तेवढ्यात एका किरकोळ आजाराचे निमित्य होऊन पंचविशी ओलांडायच्या आतच सुधा मृत्युमुखी पडली. हा पारुलला बसलेला जबरदस्त धक्का होता ज्यातून ती पुन्हा कधीच सावरली नाही. पुढच्याच वर्षी म्हणजे १९७७ मध्ये तिनेही या जगाचा निरोप घेतला.

बंगालीत 'पारूल' म्हणजे चंपकफूल. हे फुल आनंदाचे प्रतिक मानले जाते. पारूल तशीच होती...इतरांसाठी.

[मृत्युबाबत एक उपकिस्सा :
१३ ऑगस्ट १९७७ ला पारूलच निधन झाले. याची बातमी १५ ऑगस्टच्या 'म.टा.' मध्ये एका कोपर्‍यात क्षीणपणे प्रकाशित झाली. त्यातही म.टा.चे जे कुणी वृत्त-संपादक असेल त्यानी बातमी देताना असे छापले "प्रसिद्ध दिवंगत बासरीवाद्क कै.पन्नालाल घोष यांच्या पत्नी श्रीमती पारूल घोष यांचे काल निधन झाले. त्यांचे वय ६२ होते. त्या पार्श्वगायिकाही होत्या." पारुलला गायिका म्हणून ओळखणारे आणि तिच्याविषयी आदर बाळगणार्‍यांना "त्या पार्श्वगायिकाही होत्या' असे म.टा.ने केलेले मूल्यमापन पाहून विलक्षण वेदना झाल्या. त्यातील एक खुद्द लता मंगेशकर आणि दुसर्‍या शांता शेळके. दोघींनी त्याबाबत विषादाने गोविंदराव तळवळकरांना व्यक्तिगत पत्र लिहिले होते. तळवळकरांनाही त्यामागील वेदना जाणवली असावी कारण पुढच्याच रविवारी मग म.टा. मध्ये पारुल घोष यांच्या कारकिर्दीवर एक प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला होता. पण म्हणतात ना 'बूंद से गयी सो....']

असो.

शोभाताईंची ठुमरी नाना पाटेकरनी 'प्रहार'मधे वापरली होती... याद पिया की आये.... वैशाली दांडेकरवर गाणं चित्रित झालं होतं.

हिंदी सिनेमांच्या संदर्भात चर्चा चालू असली तरी शोभाताईंचा उल्लेख आल्यामुळे अजून दोन गाण्यांबद्द्ल थोडंसं.....
श्रीराम लागू-तनुजा-बाल कलाकार उर्मिला मातोंडकर असलेल्या 'झाकोळ' या मराठी सिनेमात पण शोभाताईंचे एक गाणे आहे. याच सिनेमात पं.कुमार गंधर्वांचे 'आज अचानक गाठ पडे' हे माझं फेवरेट्ट गाणं पण आहे. Happy

Pages