कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

>>सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली.

काला बाझार मधले "ना मै धन चाहूं ना रतन चाहूं" मधला एक आवाज तिचा होता. Happy

सोनाली वाजपेयी, महालक्ष्मी अय्यर (फक्त हिंदीसाठी) आणि 'प्यार तो होनाही था' गायलेली- जस्पिंदर नरूला(?) ही येऊ शकतील ह्या यादीत. महालक्ष्मी अय्यरचा आवाज फार सुरेख आहे- पुढची कविता कृष्णमूर्ती जणू. तिचं दिल से मधलं 'पाखी पाखी परदेसी' अप्रतिम आहे. पण का कोण जाणे, हिंदीत खूप प्लेबॅक द्यायला संधी नाही मिळाली तिला. रेहमानसाठी बरंच गायली आहे ती.

मस्त लेख.

अजून काही माझ्या आवडीची:
१. दिलीप कुमार - लागी नाही छुटे रामा - मुसाफिर
२. उमादेवी - अफसाना लिख रही हू - दर्द
३. रेशमा - चार दिनोंका मेल - हिरो
४. जगजीत कौर - काहे को ब्याहे बिदेस - उमराव जान
५. उषा उत्थुप - दोस्तोंसे प्यार किया - शान
६. मदन मोहन - माई री - दस्तक
७. आर.डी - मेहबुबा मेहबुबा - शोले
८. एस.डी. - मेरे साजन है उस पार - बंदिनी

महालक्ष्मी अय्यर>>>>>>>>>>..... अजुन गात आहे ती............बरीच काम सुध्दा मिळत आहे,,,,, मराठी मधे सुध्दा गाणे गायले आहे तिने............आणि अजुन लहान आहे ती......बेला शेंडे च्या वयाची असेल.......त्यामुळे अजुन फार कारकिर्द आहे तिच्या समोर............. Happy

मदन मोहनच्या आवाजातल्या ' माई री मै का से कहुं..' ला तर तोडच नाही. >>>>>>अगदी अगदी. Happy

गीतकार आनंद बक्षी यांनी सुद्धा "मोम कि गुडिया" या चित्रपटा लता सोबत "बागोमें बहार आयी, होठो पे निखार आयी, आजा आजा मेरी रानी" हे गाणं गायलंय. Happy

हिंदी चित्रपट संगीतामध्ये मध्ये वसंतराव देशपांडे Happy
ह्यांचं मी एकच गाणे अजुन पर्यंत ऐकलय रंगबीरंगी चित्रपटातलं 'ओ मृगनयनी चंद्रमुखी'

प्रशांत सुरेख लेख.. गाणं हा आवडीचा प्रांत असल्याने अतिशय आवडला.. Happy

मला आठवणारे गायक..

अभिजीत - याने काही गाणी अतिशय सुंदर गायली, पैकी
* आँखे भी होती है दिल की जुबा..... - हासिल
* आँखो मे बसे हो तुम - टक्कर
* चुनरी चुनरी .. - बिवी नं १ (या गाण्यासाठी त्याने खास अन्नु मलिक स्टाईल आवाज काढलाय.)शिवाय खिलाडी, येस बॉस, बागी या चित्रपटातून गायलेली अनेक गाणी.

सलमा आगा - नाकातला आवाज असला तरीही.. माझी आवडती गायिका तिच्या आवाजात एक प्रकारची कसक का काय म्हणतात ती जाणवते, पण अ‍ॅक्ट्रेस म्हणून शून्य मार्क Sad फजाँ भी है जवां जवां, दिल की ये आरजू थी कोई, दिल के अरमा आसुंओमे बेहगये.. सगळीच निकाह मधली. पुढे कुठे लुप्त पावली कळलं नाही.

लकी अली - पुन्हा एकदा साधारण(??) नाकात गाणारा गायक... मेहमूदचा मुलगा.. गायकीत कसा काय उतरला देव जाणे.. Uhoh बहुतेक करून अल्बम्स केले त्याने, पण "सुर' सिनेमातलं 'आभी जा, आ भी जा.." "जाने क्या ढुंढता है, कहो ना प्यार है मधलं 'एक पल का जीना" आणि "क्यूं चलती है पवन, 'युवा' मधलं "है खुदा हाफिज... ही गाणी विशेष उल्लेखनीय आहेत.
या उप्पर त्याच्या अल्बम मधली दोन गाणि (अल्बम चं नाव विसरले) ओ सनम मोहोब्बत की कसम.. आणि गोरी तेरी ऑंखे कहे... रातभर सोयी नही.... ही मला प्रचंड आवडतात.

अनुप घोशाल - मासूम मधलं "तुझसे नाराज नही जिंदगी..." हे गाणं सोडल्यास अजून कुठली गाणी या गायकानं गायल्याचं मला स्मरत नाही. Sad

भर लता आशाच्या कारकिर्दित सुद्धा स्वत:चा वेगळा छाप उमटवणारी
अनुराधा पौडवाल - फार लाडीक गायची हे माझं वैयक्तिक मत, तरिही तिची
डिंग डाँग ओ बेबी सिंग साँग - हिरो
आज हम तुम ओ सनम मिलक ये वादा करे - साथी
आजा मेरी जान, कहा था तुने सनम - आजा मेरी जान (हे गाणं तर आमच्या लहानपणी प्रचंड म्हणजे प्रचंड गाजलं होतं.)
आशिकी मे हर आशिक हो जाता है मजबूर - दिल का क्या कसूर..
बहुत प्यार करते है तुमको सनम - साजन
बेकदर, बेखबर बेवफा बालमा - राम लखन...
आणि अजून बरीच आहेत.. Happy

सध्या इतक्या आठवणी बास, आठवल्या की अजून लिहिनच.. Happy

सैलाब सिनेमातलं " धक धक गर्ल" च्या तोंडी असलेला कोळी गीत मला वाटत अनुपमा देशपांडे नी गायल आहे. त्यानंतर तिनी काही हिंदी गाणी म्हटली आहेत का?>>>>>>सैलाब मधील गाणं खरं तर कोरसचंच होतं Happy अनुपमा देशपांडे यांनी फक्त "हमको आज कल है इंतजार कोई आए लेके प्यार" इतकंच म्हटलय. त्यांच अजुन एक सुंदर गाणं "काश" या चित्रपटातील किशोर कुमारसोबतच "ओ यारा तु जान से है प्यारा" आठवतंय. (जॅकी/डिम्पल)

"डिस्को दिवाने" आणि "दिलमें मीठी मीठी मस्ती है हलचल (बूम बूम ......चित्रपट बहुदा "स्टार") हि दोन गाणीही नाझिया हसनचीच ना? खरंतर "आप जैसा कोई मेरी जिंदगीमें आए" हेच गाणं जास्त गाजलं.

अजुन एक नाव अ‍ॅड करतो. Happy
कंचन - "लैला मै लैला" (कुर्बानी), "क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो" (धर्मात्मा), "तुमको मेरे दिलने पुकारा है बडे नाज से" (रफू चक्कर) इ. सुरेख गाणी यांच्या नावावर आहे. Happy

संजीवकुमार, देवेन वर्माच्या अंगूर सिनेमात एक गीत आहे,
प्रीतम आन मिलो, दुखिया जीवन कैसे बिताऊ
हे कोणी गायले आहे ?

धन्यवाद मंडळी !! चुका दुरुस्त केल्याबद्द्ल आणी या यादीत चांगली भर घातल्याबद्द्ल. मला १००% ठाउक होते की यादी पूर्ण नाही पण ब-यापैकी यादी देउन सर्वांना त्यात लिहिण्याची एक सुरुसुरी देणे हा पण लेखाचा एक उद्देश होता Happy एका रात्रीत ४०-५० प्रतिसादावरुन ते योग्यच होते असे आता वाटायला लागले आहे Happy नाहीतर नुसतीच मी एक भली मोठी यादी देऊन तुम्ही फक्त वाचत बसायची हे काही मला स्वतःलाच पटले नव्हते. मा.बो. वरती लेख आणी त्यावर प्रतिक्रिया आणि भर घालणे हा एक चांगला ट्रेंड आहे तो फक्त मी चालू ठेवत आहे म्हणून यादी अपूर्ण ठेवली Happy कुठे पुस्तकात छापायची असेल तर फुल लिस्ट पाहिजे...इथे नको Happy

६० च्या अलिकडील गायक-गायिका पण घेतल्या नाहीत कारण लेख बिग-५ यांचे साम्राज्य प्रस्थापित झाल्याच्या काळापासून ते ९० पर्यंतचा घेतला आहे. तो अश्या साठी की त्या अश्या काळात सुद्धा ही लोक गाउन, आणि ब-याच वेळा चांगली गाणी देउन गेली आपल्याला म्हणून. तो धागा काहींनी पकडून बरोब्बर भर घातलेली आहे.

अजून चालू राहुद्यात. मी पण जसे आठवेल तशी यात भर घालत राहीन...

सैलाब सिनेमातलं " धक धक गर्ल" च्या तोंडी असलेला कोळी गीत मला वाटत अनुपमा देशपांडे नी गायल आहे. त्यानंतर तिनी काही हिंदी गाणी म्हटली आहेत का? >>>

अनुपमा देशपांडे ही खरंतर ८०-९० मधील आघाडीची डबिंग सिंगर. म्हणजे जेव्हा मल्टि-ट्रॅक रेकॉर्डिंग सुरु झाले तेव्हा संगीत आणि गाणे वेग-वेगळ्या ट्रॅक्स वरती रेकॉर्ड करता येऊ लागले. त्यामुळे अश्या डबिंग आर्टिस्ट ला घेउन तेव्हा संपूर्ण गाणे रेकॉर्ड करुन ठेवायचे मग खरा गायक/गायिका वेळ मिळेल तेव्हा स्टुडिओ मध्ये जाउन फक्त आवाजाचा ट्रॅक रेकॉर्ड करणार. अश्या वेळा डबिंग आर्टिस्टनी गायलेले गाणे ऐकून मग त्यांना ते गाणे सोपे व्हायचे. अश्या वेळेस डबिंग आर्टिस्टचा ट्रॅक उडवुन टाकला जायचा. अनु-मलिक चा सोहनी-महिवाल जेव्हा चालू होता तेव्हा गाणे आशाताई गाणार होत्या. त्यांनी डबिंग ट्रॅक ऐकून ते गाणे अनुपमाच्याच आवाजात ठेव असे सांगितले आणि त्या गाण्यासाठी त्या वर्षी अनुपमाला फिल्मफेअर बक्षिस मिळाले. परंतु व्यावसायिक यशात त्याचे रुपांतर झाले नाही.

भूपेन्द्रः एक अकेला इस शहरमें.
ती भूमिका मधे 'तुम्हारे बीन जीना लगे घर में..' म्हणणारी???
चंद्रशेखर गाडगीळही रेकॉर्डवर 'सुख दुख की हर ईक माला, कुदरत ही पिरोती है' गायिला. सिनेमात रफीचा आवाज आहे..
अमितकुमार म्हटला की मला, 'बडे अच्छे लगते है. (बालिकाबधू) आठवतं.

मदन मोहनच्या आवाजातल्या ' माई री मै का से कहुं..' ला तर तोडच नाही.<<<<<<१०० मोदक Happy

रझिया सुलतान मध्ये 'तेरा हिज्र मरा नसीब है' गायलेला कब्बन मिर्झा आठवतोय?

बॉबी मध्ये 'बेशक मंदिर मस्जिद तोडो' गायलेला नरेंद्र चंचल
याला थोडी फार गाणी मिळाली. उदा. 'बेनाम' मधलं 'मै बेनाम हो गया' . बाकी तो भजन आणि पंजाबी संगीतातच जास्त रमला.

छान लेख. मस्त वाटलं या गाण्यांच्या आठवणींनी.

छाया गांगुली माझ्या खूपच आवडत्या गायिका. त्यांचं आपकी याद आती रही.. काळजातली ठेव आहे. त्यांची 'नाझ था खुद पर..' ही पण एक खूप सुंदर गझल आहे. जयंतराव जोशींनी रेकमेन्ड केल्यावर त्यांची काही भजनं ऐकली जी अती अप्रतिम होती. 'बेदर्दी तोहे दरद ना आवे..' किंवा 'सावलियां मन भाया रे..' कधी न विसरता येण्यासारखी. जयदेव यांच्या बरोबर त्यांनी 'भक्तीसुगंध' हा आल्बम केला.
थोडासा रुमानी मधली त्यांची तारों ने कहा, धर धर बरसे, जब कभी हम तुम मिलते, चांदनी रात भर ही गाणी सुद्धा आवडतात.

अमितकुमार गुणी असून मागे पडला आणि अभिजीत, कुमार सानूसारखे किशोर क्लोन्स पुढे गेले.

चांगला लेख.

शर्मिला, अमित कुमार मला कधी गुणी नाही बॉ वाटला. फारच मर्यादा होत्या त्याच्या गाण्याला. बरेचदा चक्क बेसुरही लागतो कानाला. साधं 'रोज रोज आँखोंतले'सारखं 'सुगम' गाणं गातांनाही फेफे उडते त्याची आणि आशाच्या आवाजासमोर ती आणखीनच अधोरेखित होते! तसंच त्याचं वागणं प्रोफेशनल नव्हतं असं ऐकून आहे. त्यामुळे तो मागे पडला यात नवल नाही वाटलं कधी.

रैना, माणिक वर्मा आणि गीता दत्त?
>> पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही.
यांच्याबद्दल आहे ना लेख?

तो १९४२ मधलं 'ये सफर बहुत है कठिन मगर' गाणारा कोण? एकदम हेमंत कुमारची आठवण झाली होती ऐकून. नंतर नाही ऐकला कधी.

>>प्रीतम आन मिलो, दुखिया जीवन कैसे बिताऊ
हे कोणी गायले आहे ? <<
देवेन वर्मानेच... (चुभुध्याघ्या). त्याची बायको, रुपा गांगुलीनेहि (दादामुनींची कन्या) काहि गाणी गायली आहेत...

छान लेख. पहिल्या पॅरॅत हेमंत नाही (निषेध).

सुरिंदर कौर एक आठवली. 'बदनाम ना हो जाये महोब्बत का फसाना..'
यांची पंजाबी गाणी बरीच आहेत.

ते 'जैसे सूरज की गरमी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है मै जबसे शरन तेरी आया, मेरे राम" हे गाणं गाणारे कोण ते बंधुद्वय? हे गाणं कोणत्या सिनेमातलं आहे. याला जयदेवचं संगीत आहे.

छान लेख. पहिल्या पॅरॅत हेमंत नाही (निषेध). >>> हेमंतकुमार हा प्रसिद्ध गायक आहे आणि चिकार गाणी गायला आहे म्हणून तो, मन्ना, तलत वगैरे कुणीच नाही.. तसेच हौशी प्रकारतले लोक पण नाहीत. भुपींदर खरे तर गिटार वादक आणि मग गायक होता म्हणून नाही घेतला..प्रयत्न असा होता की मेन-स्ट्रीम शी स्पर्धा करु शकणा-या गाण्यांसारखी गाणी गायली असतील तरच त्याचा उल्लेख असावा अन्यथा बप्पी लाहीरी, मदन-मोहन, पंचम, लक्ष्मिकांत पण (गोरे नही हम काले सही) गायलेत. एक-दोन गाणी आनंद बक्षी पण गायलेत. ते सगळे हौशी प्रकारात मोडतात असे मला वाटते..

>>प्रीतम आन मिलो, दुखिया जीवन कैसे बिताऊ
हे कोणी गायले आहे ? << हे गाणे सपन चक्रवर्तीने गायले आहे.

'परिणय' मधलं आहे. शर्मा बंधू. पडद्यावरही तेच होते ना?

>>हेमंतकुमार हा प्रसिद्ध गायक आहे आणि चिकार गाणी गायला आहे
पहिल्या पॅरॅत हो!! Happy

ते 'जैसे सूरज की गरमी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है मै जबसे शरन तेरी आया, मेरे राम" हे गाणं गाणारे कोण ते बंधुद्वय? हे गाणं कोणत्या सिनेमातलं आहे. याला जयदेवचं संगीत आहे. >>> शर्मा बंधू - चित्रपट परिणय

स्वाती हो अमितकुमार अनप्रोफेशनल होता हे खरंय. बहुतेक गंभीर नसावा तो गाण्याच्या बाबतीत. पण त्याचा आवाज प्रामाणिक वाटायचा गाण्यात. हळुवारपणा आणि एक लाइटनेस होता त्याच्या आवाजात. सुरात कच खायचा काही वेळा पण त्याच्याही पेक्षा खूप कमी गुणवत्ता असणारे त्याला मागे टाकून पुढे गेले त्याचं वाईट जास्त वाटतं. त्याला जरा अजून संधी मिळाली असती तर बरीच प्रगती करु शकला असता.

माणिक वर्मा आणि गीता दत्त?? कोण विसरलय त्यांना Uhoh

Pages