कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

काल रात्री नभोवाणीवर एक जुनी चित्रपट कव्वाली ऐकत होतो,
"ये इश्क इश्क है ये इश्क इश्क", पडद्यावर भारतभुषण, मधुबाला आहेत.
पार्श्वगायनात रफी, मन्नाडे यांचे आवाज ओळखता आले, पण अजुनही काही आवाज होते.
ते कोणा कोणाचे आहेत ?

अहो महेश, फार फार लोकप्रिय आणि तितकीच दमदार कव्वाली आहे ती. रफी मन्ना डॅ, एस.डी.बातीश, आशा भोसले, सुधा मल्होत्रा, कमल बारोट आणि अनेक साथीदार यांचे तो एक अप्रतिम फुलोरा आहे. कधीही ऐका....ऑडिओ वा व्हिडीओ....भान हरपून जातेच जाते. आज जवळपास ५० वर्षे झाली त्या कव्वालीला पण खर्‍या अर्थाने अमर असलेली ती एकमेव कव्वाली आहे.

ओह एवढे लोक आहेत या कव्वालीत ? फारच छान... मला फार आवडते ऐकायला, पाहिली देखील आहे.
कव्वालीवरून अजुन एक आठवले. "चढता सुरज धीरे धीरे, ढलता है ढल जायेगा" हे गायलेल्या अजीज नाजा यांची अजुन काही गाणी प्रसिद्ध नाहीयेत का ?

अझिज नाझा यांची "झूम बराबर झूम शराबी" ही "चढता सूरज..." पेक्षाही जास्त प्रसिद्ध कव्वाली ऐकलेली नाही ? असणारच, याबाबत मला खात्री आहे. 'हुस्नवाले किसी के यार नही होते" ही त्यातल्या त्यात कमी प्रसिद्ध झालेली आणखीन एक.

"झूम...." जरूर ऐका. त्या विलक्षण अशा ठेक्यावर पाय आपोआप 'झूमत' राहतात अन् तेही शराबी न होता !! ही जादू आहे ती कव्वाली या गानप्रकाराची. फार मोठी परंपरा आहे सूफी परंपरेतील या 'नातो-कव्वाली' भक्ती रसप्रकाराला.

शक्य झाल्यास या प्रकारातील सखोल आनंदासाठी नूसरत फतेह अली खाँ यांचाही मागोवा घ्या.

अतिशय सुंदर माहीती मिळत आहे...खरच.....या प्रतिभावान गायिका गायिक यांच्यावर एक लेख लिहिला गेला पाहीजे ज्यात या प्रतिसादांचा समावेश असावा..कारण या प्रतिसादांमधुनच अनेक गायक गायिका आठवल्या गेल्या आहेत त्याच बरोबर त्यांच्या संबधी विशेष माहीती सांगीतली गेली.....जी अजुन अप्रकाशितच होती.........

सुरैय्या बाबत संगीतप्रेमींचे एकमत होईलच होईल की तिला कदापिही "कुछ उन्हे भी याद कर लो..." च्या मस्टर रोलमध्ये आणणे उचित ठरणार नाही, इतकी तिला तिच्या अल्पशा (साधारणतः १८-२० वर्षाचा कालावधी असेल) कारकिर्दीत प्रसिद्धी मिळाली होती. नूरजहान आणि खुर्शीद यानी फाळणीनंतर पाकिस्तानी नागरिकत्व घेणे पसंद केले पण मूळची गुजरानवाला [आता पाकिस्तानात] असलेल्या सुरैय्याने मुंबई हेच आपले घर मानले, तिथेच तिची कारकिर्द फुलली, बहरली, देव आनंदसमवेतच्या प्रेमाच्या आणाभाका तिथेच तिने घेतल्या, त्या असफल झाल्याचे पाहणेही तिच्या नशिबी आले, ग्रेगरी पेक या हॉलीवूडच्या देखण्या हीरोला ती मुंबईतच भेटली आणि वयाच्या ७४ व्या वर्षापर्यंत अविवाहित राहूनच मुंबईचाच नव्हे तर या दुनियेचाच तिने निरोप घेतला.

आकाशवाणीच्या लहान मुलांच्या एका कार्यक्रमात तिला गाताना नौशाद अली यानी पाहिले आणि बाल कलाकार म्हणून 'शारदा' (१९४२) नावाच्या एका चित्रपटात तिचा आवाज वापरला. तिथून पुढे तिचा चित्रपट प्रवास कसा झाला आणि तिने किती घवघवीत यश मिळविले [एके काळी "टॉप ग्रॉसर रेटिंग" होते तिला] त्याचा उहापोह इथे नको. तुम्ही फक्त तिच्या गाण्यांविषयीचे विचारले असल्याने इतकेच सांगतो की, तिची "ओ मेरे दिल की धडकन - दो सितारे, "ये ना थी हमारी किस्मत - मिर्झा गालिब', "मन धीरे धीरे गाये रे - मालिक", "दूर पपिहा बोले - गजरे", "तेरे नैनो ने चोरी किया - प्यार की जीत", "नैन दिवाने - अफसर ", "मन मोर हुवा मतवाला - अफसर", "वो पास रहे या दूर रहे नझरों मे समाये रेहते है - बडी बहेन", "तू मेरा चांद - दुलारी", किसे मालूम था", "राही मतवाले - वारीस - तलत समवेत"... आदी गाणी आजही तुम्हाला विविध भारती आणि काही एफ.एम.बॅण्डवर सदैव ऐकायला मिळतील.

तिच्या प्रेमाविषयी देव आनंदने काय लिहिले आहे हे तुम्हाला त्यानीच लिहिलेल्या आत्मचरित्रात "Romancing with Life" मध्ये वाचणे रोचक वाटेल. मोह आवरत नाही म्हणून एकदोन ओळी त्यातील इथे देत आहे :

देव लिहितात : I was forbidden to meet her, the more my craving grew to have a union with Suraiyya. The forbidden apple now seemed to be more desirable and most delicious, being out of my reach. It turned me mad. I felt lost, totally disinterested in anything, like a Romeo without his Juliet or a Majnu without his Laila......" इ. इ. फार पागल झाले होते ते दोघे एकमेकासाठी, पण नियतीला ते मंजूर नव्हते. देव आनंदने निराशेने नंतर तिचा नाद सोडून दिला आणि कल्पना कार्तिक समवेत सुखी संसारी झाला.

- पण एक सच्ची प्रेमिका म्हणून सुरैय्या अखेरपर्यंत त्याच्याच आठवणीवर जगली आणि मरून गेली.

वाह, विनंतीला मान देऊन सविस्तर लिहिलेत, धन्यवाद !
तुमची या जुन्या आठवणी लिहिण्याची शैली फार सुंदर आहे.

अशोकजी, 'शमा-परवाना' मधलं "बेकरार है कोई..." हे रफी बरोबरच युगलगीत हे माझ्यामते सुरैयाचं सर्वोत्कृष्ट गीत.

खरंच मधुर युगलगीत आहे. पण झाले असे की शम्मी कपूरला तिच्यासमवेत त्या पोशाखी चित्रपटात पाहणे कठीण होते. त्यामुळे का कोण जाणे ते गाणेही [माझ्याकडून] कमीच ऐकले गेले...पण आज जरूर ऐकेन.

वरील यादी देताना मी शक्यतो सुरैय्याची सोलोच देण्याचे योजिले होते, तरीही "वारीस' मधील 'राही मतवाले' आणि 'मिर्झा गालिब' मधील 'दिल-ए-नादान तुझे हुवा क्या है?" ही तलत समवेतची गाणी कायम मनी घर करून राहणारी वाटतात.

१९५२ साली आलेल्या "गूंज" चित्रपटातही सुरैय्याचे रफीसमवेत "गूंज नही मेरे प्यार मन" असे काहीसे शब्द असलेले एक युगलगीत आता पुसटसे स्मरत आहे. चाल तोंडात येईना.

माझ्या ब-याच गप्पा मिस झाल्या.
महेश, त्या कव्वालीत मधुबाला गात नाही. खरे तर त्या चित्रपटातील
एकाही कव्वालीत मधुबाला गात नाही.
त्या दोघीजणी म्हणजे श्यामा आणि रत्ना आहेत. त्यातल्या बाकिच्या दोन
कव्वाल्या, निगाहे नाझ, आणि जी चाहता है..अवश्य ऐका.

अशोक, सांगते ऐका मधली हंसाबाईंची सर्वच गाणी मधुबालाने गायलीत
(अरे अरे नंदाच्या पोरा, काल राती बाई मजसी आणि कसे घडले सांगत्ये ऐका.)
बूट पॉलिश मधले एक गाणे, त्यांच्या आवाजात ऐकल्याचे आठवतेय.

सुरैयाचे, बंद ना हो किसीकी मोटर कार रस्तेमे ऐकलय का ? मस्त आहे.

दिनेशदा, ही कव्वाली पाहिली आहे, मधुबाला गात नाही, रडते Sad
सांगत्ये ऐका मधे गायलेली मधुबाला जव्हेरी, मी विचारात पडलो की हिंदीतली मधुबाला मराठीमधे पार्श्वगायन कसे करेल. Happy
बंद ना हो किसीकी मोटर रस्ते मे ऐकले आहे, फार भारी आहे.
मध्यंतरी एक खुप जुन्या जमान्यातले उर्दूमिश्रित पंजाबी चित्रपट गीत सापडले, खुप छान आहे.
"टाँगेवाला खैर मँग दा" त्यात टाँगा लाहोरचा असल्याचा उल्लेख आहे.
रफीने गायले आहे असे वाटत होते, पण कोणी वेगळाच गायक असावा.

सुरैयाची आणखी काही गाणी
नुक्तचीन है गमे दिल, उनको भुलाए न बने (मिर्झा गालिब)
आह को चाहिये इक उम्र असर होने तक (मिर्झा गालिब)
ये कैसी अजब दास्ता हो गयी है (रुस्तम सोहराब)
आरारी आरारी आरारी (दास्तान, जूना मुकेश सोबत.)

अशोकजी सुरेख माहीती.. Happy आज पुन्हा भूले बिसरे गीतांचा आनंद घेतला, 'सारा मोरा कजरा छुडाया तूने लागलं होतं. Happy

अरे व्वा ! मझा आ रहा है, खूबसा !

@ दिनेशदा : होय. गंमत म्हणजे मधुबाला जव्हेरी यानी 'सांगत्ये ऐका' मध्ये तितके गाऊनही लोकांच्या कानी सतत गुंजत राहिले ते सुप्रसिद्ध 'बुगडी माझी सांङली' हे आशाताईंचे गाणे.
(जाता जाता : माडगूळकरआण्णांच्या प्रतिभेबद्दल काय आणि किती बोलावे असेच वाटते. याच चित्रपटात मधुबाला जव्हेरींचे एक शृंगारगीत आहे, त्यातील खालील कडवे इतके मस्त आहे :
"कशी आत घेऊ मी चोरा ?
कशी उघडू मी दारा ?
पाच माळ्यावरती कोपर्‍यात माझी खोली."

काय सुरेख चित्रण नजरेसमोर येत आहे. प्रियकराला आत तर घ्यायचे आहे, पण ही नखरेल लटक्या तक्रारीने नकार देण्याचे कारण सांगते पाचव्या मजल्यावर माझी खोली, मी कशी खाली जाऊ. सलामच केला पाहिजे आण्णा, वसंत पवार, हंसा आणि मधुबाला या चौकडीला.

"कभी ना बिगडे" हे खट्याळ आणि मस्तीचे सुरैय्याचे गाणे [तुम्ही दिलेले 'आरारा' हे तिच्यावर आणि राज कपूरवर चित्रीत झालेले असेच एक]. वास्तविक पाहता अशा धाटणीची फार कमी गाणी तिच्यासाठी संगीतकारांनी रचली होती. अर्थात १९५०-६० चा तो जमाना फारसा अशा हलक्याफुलक्या कथानकांचा नव्हता, त्यातच सुरैय्याच्या वाट्याला आले होते ते प्रामुख्याने पोशाखी चित्रपट आणि जी काही सामाजिक कथानकावर आधारित होती त्यातही हिच्या वाट्याला अश्रू ढाळणे नायकासाठी इतपतच.
'मोती महल' मधील तुम्ही दिलेले 'मोटार'चे गाणे [अन् तेही अजित सारख्या ढिगासाठी तिने गायचे'. पचनी पडत नाही. पण लकी गाय दॅट अजित फेलो, सुरैय्या, मीनाकुमारी, मधुबाला, वैजयंतीमाला आदी सौंदर्याच्या पुतळ्याच त्याला मिळत गेल्या]

'मोटार' मध्ये एक मजेशीर ओळ आहे :
"कपडे हो मैले, मूंह काला काला
हो ओ सुरैय्या, या हो मधुबाला"

(मधुबालाने सुरैय्याच्या देखणेपणाबद्दल काय उदगार काढले होते हे माहीत आहे तुम्हाला, दिनेशदा?)

तिला खर्‍या अर्थाने भावला तो चॉकलेट हीरो देव आनंदच. "प्यार की जीत" मधील "तेरे नैनोने चोरी किया..." हे सत्यच होते. पण दोघांच्या दुर्दैवाने 'धर्म' मध्ये आणला दोन्ही घरांनी. देवने निदान बंडखोरी करून तिच्यासाठी प्रयत्न तर केले, पण तीच आजीच्या दडपणाने चूप बसली ~ अखेरच्या श्वासापर्यंत.

@ दक्षिणा ~ लकी यू आर. आरतीची फार कमी गाणी आहेत हिंदीत. मात्र बंगालीत तिचे चांगलेच बस्तान बसले होते. पडद्यावरदेखील एका बंगाली बाबूलाच [विश्वजीत] उद्देश्यून मराठी बाला [राजश्री] हे गाणे म्हणते. थॅन्क्स.

अशोक, आजही सांगत्ये ऐका चे कथानक, अभिनय, भाषा याला तोड नाही.
बुगडी जरी गाजलं असलं तरी, दिलवरा दि माझे ओळखा पण तितकेच सुंदर होते.
आशा आणि बालकराम यांचे युगुलगीत, चंद्र आणखी पृथ्वी यांचे काय असावे नाते, हे तर गदिमांच्या प्रतिभेचा कळस होते.
सुलोचनाच्या तोंडी पण आशाचे एक गाणे होते. पुर्व दिशेला -- सुंदर भुपाळी आहे ती.
रत्नमालाच्या तोंडी - धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा, हे भोंडल्याचे गाणे होते.

अगदी सुरवातीलाच, लवकर यावे सिद्ध गणेशा.. असेही एक छान गाणे आहे.

असो, आपण हिंदी गाण्यांकडे वळू या.

"आपण हिंदी गाण्यांकडे वळू या."

~ जरूर. वर दक्षिणा यानी 'आरती मुखर्जी' च्या 'दो दिल' मधील गाण्याच्या उल्लेख ज्यावेळी केला त्याच क्षणी माझ्या मनी आणखीन एका मुखर्जी कन्येचा आवाज घुमू लागला. ~ "संध्या मुखर्जी". चक्क उस्ताद बडे गुलाम अली खाँ सारख्या दिग्गजाची संध्या शिष्या होती. १९५२ च्या "अंजान घर' या अजिबात न चाललेल्या हिंदी चित्रपटात तिने प्रथम गाणे गाईले, पण त्याच सुमारास श्यामल गुप्ता यांच्याशी तिने विवाह केला आणि दोघांनीही कलकत्ता हेच आपल्या करीअरचे शहर नक्की केले. तिथे मात्र संध्याच्या गानशैलीला पोषक अशी संधी मिळाली. उत्तम कुमार अभिनीत कित्येक बंगाली चित्रपटांतील नायिकांसाठी तिथल्या संगीतकारांनी [विशेषतः हेमंत कुमार] यानी संध्याच्या आवाजाचे अगदी सोने केले.

आपण हिंदीसंगीत प्रेमी तिची आठवण काढू शकतो ते दोनचार फुटकळ गाण्यासाठीच.
पैकी १. "आ गुपचूप गुपचूप प्यार करे - 'सजा' [पडद्यावर निम्मी आणि देव आनंद] आणि २. "बोल पपीहे बोल रे तू बोल पपीहे ~ 'तराना' : पडद्यावर मधुबालेसाठी लता तर श्यामासाठी संध्या.

मधुबाला सुरेय्या चा मुका घ्यायची जेव्हा जेव्हा ती घरी जायची..तिच्या प्रेमात होती ती..
मधुबाला ज्या मुलीच्या प्रेमात असेल ती किती सुंदर असेल... मी एका पुस्तकात वाचला आहे हे..

रिमझिम बरसे पानी, आज मोरे अंगना.. असे एक गाणे संध्या मुखर्जीच्या आवाजात होते का ? गाणे आठवतेय पण गायिका नाही.

नमस्ते...

आज सकाळीसकाळी 'भूलेबिसरे' ऐकताना 'सम्राट चंद्रगुप्त' मधील एक मधुर गीत ऐकण्याची संधी एफ.एम. बॅण्डने दिली.

"मुझे देख चाँद शरमाये...घटा थम जाये, मै निकलू तो कहे हाये जमाना कहे हाये !!" ~ लता मंगेशकर. ~ कल्याणजी वीरजी शाह {अजून ते 'कल्याणजी-आनंदजी' झाले नव्हते}

~ दिदींच्या अनेक मधुर गाण्यापैकी एक असले तरी त्याचा इथे या धाग्यावर उल्लेख करण्याचे कारण म्हणजे त्या निवेदकातर्फे अशी माहिती मिळाली की हे गाणे चक्क "निरूपा रॉय" यानी लिहिले होते....त्यांच्या शालेय जीवनात. ज्याची माहिती चित्रपट निर्माते सुभाष देसाई याना होती. त्या गाण्यासाठी मग चित्रपटात, कथानकाशी फटकून असली तरी, तशी खास सिच्युएशन निर्माण करण्यात आली.

सुंदरच. छान माहिती मिळते हल्ली एफ.एम.द्वारे.

इथल्या रसिकांसाठी ही ती गाण्याची लिंक
http://www.youtube.com/watch?v=k-wWzBHBAaU

(दिनेश दा ~ पडद्यावर ती 'शीला वाझ' आहे का ? तशीच दिसते)

काल एफेम गोल्डवर मधुमतीची गाणी ऐकली.
त्यात द्विजेन मुखर्जीनी गायलेलं `तन जले मन जलता रहे'(१) हे आणि
कांचा ले कांची लाय लाजो हे आशा भोसले - सबिता चौधरी, गुलाम मोहम्मद यांनी गायलेलं
अशी दोन गाणी मी प्रथमच ऐकली.
तन जले मधे कोरसलाच जास्त ओळी आहेत.

सबिता मुखर्जी य नावाने शोध घेतला असता अन्नदाता मधलं किशोरकुमारचं चंपावती तू आजा(३) हे आणखी एक गाणं मिळालं.

(१) http://ww.smashits.com/audio/player/free-music.cfm?SongIds=220609
(२) http://ww.smashits.com/audio/player/free-music.cfm?SongIds=220608
(३) http://www.youtube.com/watch?v=cU3S8yoPtSA

छान माहिती. विशेषतः सबिता मुखर्जी यांच्या निमित्ताने का होईना त्या हेलेनची झेरॉक्स असलेल्या 'मधुमती' ची आठवण निघाली. हेलेनला निदान अगदी शम्मी कपूरची सहनायिका होण्याचे किमान भाग्य तरी लाभले पण मधुमतीला वर लिंकेत दिलेल्या 'चंपावती' सदृश्य गाण्यातूनच तिच्या अल्पशा कारकिर्दीत नृत्यांगणेचेच स्थान मिळाले. तेही प्रामुख्याने 'बी' 'सी' दर्जाच्या देमार चित्रपटातून. आज ती कुठे आहे केवळ देव जाणे !

सबिता मुखर्जी ह्या सलिल चौधरी यांच्या पत्नी हे माहीत होते, पण वर उल्लेख केलेली गाणी प्रथमच समजली. 'अंतरा' या त्यांच्या कन्येने गायनक्षेत्रात बर्‍यापैकी नाव कमाविले आहे.

ती मधुमती आहे का? मधुमती अ‍ॅक्टिंग स्कूल चालवायची ना? मराठीत सुनील गावसकर अभिनीत सावली प्रेमाची या चित्रपटात जिची मुख्य भूमिका होती, ती हीच का?

Pages