कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

थॅन्क्स दक्षिणा ~

अशी "दिल लुभावणारी" माहिती शेअर करण्यामध्ये जो आनंद आहे त्यापेक्षा तिला कुणीतरी दाद दिली गेल्याचे पाहिल्यावर मिळणारा आनंद कैकपटीने मोलाचा वाटतो. असा अनुभव मला इथे मिळत आहे, हे आवर्जून सांगणे गरजेचे आहे.

या सर्व माहिती वरून अशोक हे झक्की, दिनेशदा यांचे समकालीन किंवा त्यांच्या पेक्षा जास्त बुजुर्ग असावेत असे वाटते. Happy

@ महेश...

वेल वेल वेल ~ मी पन्नाशी गाठत आलो आहे, अगदी शिवेवर आहे असे म्हटले तरी चालेल. पण म्हणून मी म्हणजे काही फार अनुभवसंपन्न व्यक्तीमत्व आहे असे मानण्याचे बिलकुल कारण नाही. काहीसे अधिकचे वाचन आणि त्या त्या क्षेत्रातील आवडीच्या समवयस्क समविचारी मित्रांसमवेत व्यतीत होणारा वेळ, या आधारे माहितीचा खिसा भरण्याचे काम चालू असते.

महेश, मी अशीही काही उदाहरणे पाहिली आहेत की एखादा तरुण (प्रसंगी तरूणीही) ज्याने नुकतीच पंचविशी गाठलेली आहे, मात्र या क्षेत्रातील त्याच्याकडील माहितीचा खजिना अल्लाउद्दीनच्या खजिन्याशी बरोबरी करतो. मिरज येथील जावेद मुल्ला हे एक त्यातील उदाहरण. आहे तो २८ वयाचा टेंपररी कलाशिक्षक...बेकारीचे चटके सोसणारा घरचे टिपिकल मुलेबाळे, भाऊबहीणीनी भरलेले मुस्लिम वातावरण. तिथे गेल्यावर तुम्हास अन्य मुस्लिम वस्तीपेक्षा आगळेवेगळे काहीच वाटणार नाही. पण एकदा का तुम्ही त्याच्यासमवेत "हिंदी चित्रपट संगीत" [आणि त्यातही म.रफी] या विषयावर सुर्योदयापासून बोलत बसला की, सूर्यास्त कधी झाला हे अजिबात समजू शकणार नाही.

अशी कैक उदाहरणे आहेत, ज्यावेळी संगीतप्रेमी आपले वय विसरून केवळ त्या बोलणार्‍या अनुभवसंपन्न व्यक्तीसमवेत आदरयुक्त भाषेत संवाद साधतो.

(इथे मायबोलीवरसुद्धा त्यांची कमतरता नाही हे मला जाणवते, हेही नमूद करणे आवश्यक आहे.)

वाह अशोकजी तुमच्याकडे "विद्या" आणि "विनय" दोन्ही आहे. _/\_(प्रणाम)

वसंतराव देशपांडे यांचा उल्लेख आला आहे, पण त्यांनी मराठी चित्रपटात केलेल्या गायनाबद्दल फारसे लिहिले गेले नाही. त्यांचे मला माहिती असलेले चित्रपट म्हणजे "अवघाचि संसार" आणि "अष्टविनायक"
विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमधे त्यांनी पडद्यावर काम देखील केले आहे.
"अवघाचि संसार" : "आली सखी आली प्रिया मिलनाला" ; "राम भजन कर लेना रे एक दिन जाना रे भाई"
या व्यतिरिक्त त्यांची अजुनही काही चित्रपट गीते आहेत, त्याबद्दल माहिती असल्यास कृपया लिहावी.

हा धागा हिंदी चित्रपटगीतांचा आहे. तरीपण विचारलेच आहे, तर वसंतरावांची मराठी चित्रपटगीते :
उठ झाला प्रातःकाल- शाहीर परशराम -१९६१, जाशील मनातून सांग कसा- माया मच्छिंद्र- १९५१, ठरल्यालं लगीन मोडलं - मानाचे पान (संगीत - पु.ल.) १९५०, माझ्या कोंबड्याची शान -नवरा बायको -१९५० (संगीत पु.ल.), काय गाळतोसी डोळे - कान्होपात्रा-१९५०, मुशाफिरा ही दुनिया- जागा भाड्याने देणे आहे -१९४९, इये मराठीचिइये नगरी- शीर्षकगीत - १९६५, काही तरी तू बोल्-आधार -१९७०, सावधान होई वेड्या- भोळी भाबडी - १९७२, टाळ बोले चिपळीला - भोळी भाबडी- सोबत पं भीमसेन जोशी- सं राम कदम

पं.वसंतराव देशपांडे यांची जुन्या जमान्यातील दोन बहारदार युगलगीत आठवतात.
१. "सप्रेम नमस्कार विनंती विशेष" (वेगळे वाटती ना पहिली ओळ?). हे गाणे त्यानी गायिले होते मधुबाला झवेरी समवेत.
२. "तुझी न माझी जुळली प्रीत" ~ आशा भोसले यांच्यासमवेत

चित्रपट होता "वैजयंता". वसंत पवारांचे संगीत.

(मधुबाला झवेरी यांचा या धाग्यात उल्लेख आला आहे का ?)

भरत, अशोकजी, धन्यवाद !
यातली काही गाणी ऐकलेली आहेत. "कानडा राजा पंढरीचा" यामधे पण वसंतरावांचा आवाज आहे, पण हे चित्रपटगीत आहे का ?
असो, धागा पुन्हा हिंदीकडे वळवतो. उमादेवी (टुणटुण) यांनी एकच गीत गायले होते का ? "अफसाना लिख रही हूँ" ?

उमादेवीची आणखी गाणी आहेत. पण लक्षात हे एकच आहे.

कानडा राजा पंढरीचा चित्रपट : झाला महार पंढरीनाथ
सुधीर फडकेंच्या संगीतात अन्य पुरुष गायकांनी गायलेल्या मोजक्या गाण्यांतले एक.

उमादेवी यांची तुम्ही दिलेल्या गाण्यामुळेच गायिका म्हणून ओळख सर्व संगीतप्रेमींच्या मनी ठसली आहे. पण "अफसाना..." म्हणजेच उमादेवी नव्हेत. 'दर्द' शिवाय 'अनोखी अदा' मधील 'काहे जिया डोले' हे १९५० काळातील सुपर हिट गाणे होते. तिच गोष्ट 'दिल्लगी' मधील 'मेरी प्यारी पतंग' ची.

'नाटक' मध्येही 'दिलवाले तू जलजलकर - किंवा जलाजलाकर' असे काहीसे शब्द असणारे उमादेवीचे गाणे होते, पण त्याची रेकॉर्ड मला कुठे ऐकायला मिळाली नाही.

वसंतराव देशपांड्यांचं 'आज दिसे का चंद्र गुलाबी, हवेस येतो गंध शराबी, अष्टमीच्या त्या अर्ध्या राती, तुझी नि माझी जुळली प्रीती,' हे गाणं वैजयंता मधलं नसून उमज पडेल तर मधलं असावं असं वाटतं.सहगायिकाही आशा भोसले नसून मराठे (उषा?) असाव्यात. कुंदा बोकिलांचीही काही गाणी लोकप्रिय होती...मराठे/बोकील यात गोंधळ होतोय्..कोणी दूर करील काय?

वसंतराव आणि आशा भोसले यांचे "आज दिसे..." हे वैजयंता मधीलच आहे. 'उमज पडेल तर' मध्ये चंद्राला उद्देश्यून एक गाणे होतेच "नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी". हे सुधीर फडके आणि उषा अत्रे यांच्या सुरातील. [फार सुमधुर गाणे आहे...केव्हाही ऐकावे].

कुंदा बोकिल या तशा नव्या पिढीतील म्हणाव्या लागतील. अनिल मोहिले यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्या गात असत [सध्याची स्थिती माहीत नाही]. 'प्रितीचा पारिजात फुलला" आणि श्रीनिवास खळ्यांनी दिलेले "निळासावळा नाथ" ही नित्यनेमाने ऐकलेली गाणी आहेत, कुंदा बोकिलांची.

सुधीर फडकेंच्या संगीतात अन्य पुरुष गायकांनी गायलेल्या मोजक्या गाण्यांतले एक<<<
तसंच एक संत गोरा कुंभार मधलं 'उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला' हे पण ना?
आवाज बाबुजींचा वाटत नाही आणि श्रेयनामावलीत पण वेगळंच नाव सापडलं सगळीकडे.

लहानपणी गाण्याच्या क्लासमधे घोटून घेतलं गेल्यामुळे असेल पण तेव्हा हे मूळ गाणं ऐकायला इतकं सुंदर असेल असं वाटलं नव्हतं. मधे खूप वर्षांनी ऐकल्यावर मस्त वाटलं.

धन्यवाद अशोक. होय, प्रतिसाद लिहिताना नवीन आज चंद्रमाच डोक्यात होतं. त्यातही अत्रे/मराठे/बोकील ही गडबड झालीच.

नाही वाढ वेळ झाला असंच आहे.
शब्दाचा अर्थ फार वेळ झाला असाच आहे. पूर्वीच्या साहित्यात हा शब्द दिसतो अनेकदा.

@ हीरा : "त्यातही अत्रे/मराठे/बोकील ही गडबड झालीच."

~ उषा अत्रे की उषा वर्तक की उषा मराठे ही नावेदेखील या ना त्या निमित्ताने संगीतप्रेमींच्या मनी गोंधळ निर्माण करतातच. कदाचित तुमच्या मनी "उषा किरण" ही एक गुणी अभिनेत्रीही असेल. मो.ग.रांगणेकरांच्या "आशीर्वाद" मध्ये उषा किरण सर्वप्रथम 'उषा मराठे' या नावाने रसिकासमोर आल्या होत्या. 'माया बाजार' मध्येही त्या उषा मराठे याच नावाने वावरल्या. मात्र हिंदीत प्रवेश करताना त्यानी "उषा किरण" हे नाव घेतले आणि अखेरपर्यंत त्याच नावाने वावरल्या.

'मेरे प्यार की उमर हो इतनी सनम' या गाण्याचा उल्लेख झालाय का? हे गाणं गाणार्‍या पुरूष गायकाचा आवाज गोड नसला तरीही ऐकणेबल आहे. मनमोहन सिंग नावाच्या छायाचित्रकाराने हे गाणे लता मंगेशकरांबरोबर गायले होते असे वाचल्याचे आठवते.

अभिनेता डॅनीनेही काही गाणी गायली आहेत. 'काला सोना' मधले 'सुन सुन कसम से' त्याने गायलय.

"...मनमोहन सिंग नावाच्या छायाचित्रकाराने हे गाणे..."

~ थोडीशी दुरुस्ती. "मंगल सिंग" हे त्या गायकाचे नाव. हेच गाणे नंतर विनोद राठोडच्या आवाजातही ध्वनीमुद्रीत झाले होते.

"काली तेरी चोटी" हे 'बहार आने तक' नावाच्या एका रद्दी चित्रपटातील मंगल सिंगचे गाजलेले गाणे.

मी अमि...

~ तुम्ही दिलेल्या imdb च्या लिंक्स पाहिल्या. तिथे मनमोहन सिंगचे नाव आहे हे कबूल. पण आता यूट्युबची ही लिंक पाहा

http://www.youtube.com/watch?v=hPqPYp1TItY&playnext=1&list=PL5F7D02A3B3E...

तिथे एका प्रतिक्रियेत उल्लेख आला आहे की, "@MiracusG ON the CD that I have of Waris, the singer's name is listed as Mangal Singh, not Manmohan." त्यामुळे माझ्या मनात हेच नाव आले. शिवाय ते 'बहार आने तक' मधील गाजलेले गाणेही मंगल सिंगचेच असल्याने तेच नाव दोन्ही गाण्याच्या गायकाचे असेल असे वाटले.

पण imbd च्या नोंदीवर विश्वास ठेवावा असे वाटत आहे.

अशोक, वारिस मधला आवाज मंगलसिंग चा वाटत नाही. त्यामुळे अमि ह्यांचे बरोबर असावे Happy

शॅकी...

~ होय. आत्ताच परत ती दोन्ही गाणी ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात पाहिली. 'वारीस' मधील दुसरे एक हिट गाणे "घटा छा गयी है" हे लतादिदीसमवेत सुरेश वाडकर यांचे होते. त्यामुळे मीदेखील पहिले गाणे सुरुवातीला सुरेशजीचेच आहे असे समजत होतो. पण आता तर दोन दोन 'मोहन' समोर आले.

वेल, 'मी अमि' यानी दिलेली imbd लिंक मी मान्य केल्याचे वर म्हटलेच आहे.

अशोकजी, सुप्रभात आणि _/\_ Happy
आज सकाळीच भुले-बिसरे गीत ला "कुछ और जमाना केहता है..." लागलं होतं. तुमची अगदी आवर्जुन आठवण आली. Happy

अशोक, छान माहिती (आपण समवयस्क आहोत आणि समव्यसनी पण !!) मधुबालांची आठवण निघालीय त्या माझ्या लांबच्या आत्या लागतात. त्यांच्या मातोश्री श्यामलाबाई माजगांवकर पण गात असत.

@ दक्षिणा : फार प्रसन्न वाटले मला तुमची पोस्ट वाचून. 'कुछ और जमाना' च्या निमित्ताने आठवण निघाली यातच आपल्या सर्वांचे चित्रपट संगीत या विषयावरील अलोट प्रेम व्यतीत होते. जादूच आहे विलोभनीय अशी, जी इथली मंडळी आवर्जुन जपत असल्याचे प्रत्ययास येत आहे. [तुम्ही या पानाअगोदर दिलेली लताची 'श्रध्दांजली' लिंकवरील पारूल घोषचे ते गाणे जरूर ऐका....म्हणजे अजून ऐकले नसेल तर....हरखून जाल.]

@ दिनेशदा : मनःपूर्वक धन्यवाद. आणि होय आपण समवयस्क आणि समव्यसनी, तसेच समविचारीसुद्धा असल्याचे मला नुकतेच येथीलच एक पोस्ट वाचून समजले. मला फार विषाद होत आहे की मी काहीसा 'लेट' अशा सुंदर ठिकाणी प्रवेश केला आहे. पण इथून पुढे जास्तीतजास्त [आणि आता नोकरीचेही बंधन राहिलेले नाही] या मन शांत करण्यास साहाय्य करणार्‍या स्थळावर जालीय भाषेत म्हटले जाते तसे "पडीक" राहीन.

मधुबाला जव्हेरी (की झव्हेरी?) आपल्या नात्यातील असल्याचे वाचून आनंद झाला. अगदी "सांगत्ये ऐका" मधील विठ्ठल शिंदे यांच्यासोबत गाईलेल्या 'सांगा या वेडीला" पासून मधुबाला जव्हेरी याना मी वेळोवेळी ऐकत आलो आहे. पूर्वी मुंबई आकाशवाणीवर दुपारी ११ वाजता 'कामगारांसाठी' नामक एक कार्यक्रम लागत असे. दशरथ पुजारी, कुमुदिनी पेडणेकर, गजानन वाटवे, रोशन सातारकर यांच्याबरोबरीने मधुबाला यानाही ऐकत असू. [मात्र श्यामलाबाईंचे नाव आता प्रथमच तुमच्याकडून ऐकले.]

Pages