कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

अलिशा चिनॉय काही उपेक्षित गायक नाही. अजुनही गाते कि ती बर्‍याच चित्रपटांसाठी ( e.g. कजरा रे कजरा रे किती फेमस झालं तिचं. तिला अ‍ॅवॉर्डस पण मिळाली या गाण्यासाठी. नंतर ते कतरिनाचं - तेरा होने लगा हुं - हुआ है मुझे जो भी जो भी....)

वसुंधरा, येस. ती पण छान होती, पण फार पुढे नाही आली. तिचं ' It's the time to disco' गाजलं होतं. ते आधी Viva Band च्या महुआ कामतला ऑफर केलं होतं गाणं, तिच्या तारखांचा प्रॉब्लेम झाल्यामुळे वसुंधराला मिळालं.

आमीरच्या लगान मधल्या त्या गोर्‍या मडमेच्या तोंडी असलेलं "ohh, i m in luv...." हा पण वसुंधरा दस चाच आवाज आहे.
आंखे (नवीन) मधले अक्षय आणि बिप्स चे "गुस्ताखीया है, बेताबीया है...." यातलाही आवाज तिचाच Happy

ओह, म्हणजे ती पण चांगलीच अ‍ॅक्टिव्ह होती की. मागे वगैरे नाही पडली. म्हणजे मी किती तरी गाणी नुसतीच ऐकते. गायकाकडे फार लक्ष न देता.

थँक्स, निंबुडा.

बरसात कि रात मधली, ये इष्क इष्क है, हिच कव्वाली आपण जात ऐकतो. पण याच सिनेमात, जी चाहता है चूम लू, अपनी नजर को मै.. आणि निगाह नाझ के मारोंका हाल क्या होगा.. या आणखी दोन कव्वाल्या आहेत. त्यात आशा आणि सुधा मल्होत्रा यांचे आवाज आहेत. दोन्ही अप्रतिम आहेत. आशा आणि सुधाचा एक आलाप तर इतका एकसूरात आहेत कि एकच गायिका गातेय असे वाटतेय.
या दोन्ही गाण्यात रफी किंवा मन्ना डे नसून, बहुतेक बातिश चाच आवाज आहे. यू ट्यूबवर शोधल्या तर मिळतील. आहेत तिथे.

कामही करते की वसुंधरा दास. तिला मान्सुन वेडिंग मधे कोण विसरेल? आज जाने की जीद ना करो... हे फरिदा खानुमच अफलातून गाणं तिच्याच तोंडी होतं. कमल हसनच्या हेराम मधेही होती ती. थोडी उग्र आहे पण पर्स्नॅलिटी छान आहे.

प्रशांत मस्त लेख!

मला वाटतं 'कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी' हे हमारी याद आयेगी पिक्चर मधलं गाणं स्नेहल भाटकरने दिलेलं आहे. आणि हेमंतकुमारच्या आवाजातलं 'लहरोंपे लहर' हे बहुतेक त्यातलंच दुसरं गाणं आहे.

उषा मंगेशकरने पण हिंदीत गाणी म्हंटली आहेत. मला एकच आठवतंय 'ओ मेरी मैना' मन्नाडे बरोबरच प्यार किये जा मधलं.

सलील चौधरीच्या बायकोने किशोर बरोबर म्हंटलेलं 'ओ मेरी प्राण सजनी' अन्नदाता मधलं एक गाणं आठवलं.

पद्मिनी आणि शिवानी (कि शिवांगी ) कोल्हापुरे पण गायच्या ना ? दी बर्निंग ट्रेन मधल्या, तेरी है जमीं, तेरा आसमाँ मधे दोघींचा आवाज होता असे वाटतेय. यादों की बारात, मधल्या गाण्यात टायटल साँगमधे पण होता.

सुरेश वाडकरने म्हंटलेली 'सीनेमें जलन' आणि 'सुरमई शाम'.

भीमसेन जोशी आणि आमिर खान यांची नावं खालती दिनेशने ऑब्जेक्शन युवर ऑनर म्हंटल्यामुळे काढली आहेत. Happy

बनश्री सेनगुप्ता - खुशिया हि खुशियां हो दामन में जिसके (सोबत येसुदास, हेमलता), चित्रपट-दुल्हन वही जो पिया मन भाये

>>उषा मंगेशकरने पण हिंदीत गाणी म्हंटली आहेत. मला एकच आठवतंय 'ओ मेरी मैना' मन्नाडे बरोबरच प्यार किये जा मधलं. <<
इन्कार मधलं, सुपर्-डुपर हिट आयटम साँग... http://www.youtube.com/watch?v=jDOnSUy_fMM

चिमण... वाडकर बरेच गायलेत की हिंदीत.. चप्पा चप्पा चरखा चले, सपने मे मिलती है, ये जिंदगई गले लगाले..

आणि तुला मुंगळा आठवत नाहीये.. उषा मंगेशकरांनी म्हणलेलं..

>> तुला मुंगळा आठवत नाहीये
हिम्या, राजने सांगितल्यावर आठवलं! आताशा फारसं काही आठवत नाही बघ!

वाडकर बरेच गायलेत हिंदीत पण नाव घेण्यासारखी फारशी गाणी नाही गायले. चप्पा चप्पा चरखा सॉलिड भिकार गाणं आहे आणि बाकीची तू लिहीलेली गाणी मला माहिती नाहीत.

वाडकरांना बरीच मिळालीत की गाणी त्यांच्या आवाजाला साजेशी आणि न साजेशीही :प

तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके.. खूप क्यूट आहे परिंदा मधलं. मला वाटतं आरकेच्या प्रेमरोग पासूनची गाणी त्यांनीच गायलीत. आठवण्यासारखी नाहीयेत म्हणा ती.

सुरेश वाडकर भरपुर गायले हिंदित सुद्धा. गमन आणी प्रेमरोग पासुन सुरु झाले ते आता आताच्या सात खुन माफ पर्यंत. सदमा, हिना,राम तेरी गंगा मैली, उत्सव, लेकिन, लम्हे, चांदनी, रंगिला, माचिस, हुतुतु, कमीने, ओमकारा, सत्या ईत्यादि. आणखिन बर्याच पिक्चर मध्ये ते गायले. त्यांची गाणीसुद्धा खुपच श्रवणीय होती.

वाडकरांनी बरीच हिंदी गाणी गायली आहेत.
"राम तेरी गंगा मैली" मधली सगळी गाणी त्यांची होती .
ये काश्मीर है(अमिताभ+ विनोद मेहरा + राखी ), मेघा रे मेघारे
आणखीन बरीच आहेत. आता एवढीच आठवत आहेत. Happy

सुरेश वाडकर भरपुर गायले हिंदित सुद्धा. गमन आणी प्रेमरोग पासुन सुरु झाले ते आता आताच्या सात खुन माफ पर्यंत. सदमा, हिना,राम तेरी गंगा मैली, उत्सव, लेकिन, लम्हे, चांदनी, रंगिला, माचिस, हुतुतु, कमीने, ओमकारा, सत्या ईत्यादि. आणखिन बर्याच पिक्चर मध्ये ते गायले. त्यांची गाणीसुद्धा खुपच श्रवणीय होती.>>>>अगदी अगदी. सुरेश वाडकर माझ्या आवडीच्या गायकांपैकी एक. Happy

ए जिंदगी गले लगा ले (सदमा)
सांज ढले गगन तले हम कितने एकाकी (उत्सव)
सीनेमें जलन आंखोमें तूफान सा क्यो है (गमन)
सुरमयी शाम इस तरह आये (लेकिन)
शाम रंगीन हुई है तेरी आंचल कि तरह (कानून और मुजरीम)
लगी आज सावन कि फिर वो झडी है (चांदनी)
ये आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है (धनवान)
और इस दिल में क्या रखा है (इमानदार)
हमराही मेरे हमराही है मेरे संग तु तो डर क्या (दो दिलोंकि दास्तान)
चल चमेली बागमें मेवा खिलाऊंगा (क्रोधी)
आओ मिल जाये हम सुमन और सुगंध कि तरह (प्रेमगीत)
भंवरेने खिलाया फुल फुल को (प्रेमरोग)
मोहब्बत है क्या चीज (प्रेमरोग)
मेरी किस्मतमें तु नही शायद (प्रेमरोग)
मै हू प्रेमरोगी (प्रेमरोग)
मेघा रे मेघा रे (प्यासा सावन)
पतझड सावन बसंत बहार (सिंदूर)
घटा छा रही है (वारीस)
बैठ मेरे पास तुझे देखता रहू (यादों कि कसम)
मै हि मै हू (राम तेरी गंगा मैली)
मै देर करता नही (राम तेरी गंगा मैली)
हुस्न पहाडोका (राम तेरी गंगा मैली)
यारा ओ यारा (राम तेरी गंगा मैली)
राम तेरी गंगा मैली (राम तेरी गंगा मैली)

अजुनही बरीच आहेत. Happy

हरीहरन राहिला की Happy
ह्याचे सर्वात जुने गाणे (गझल:एक अजीब सानिहा मुझ पर गुझर गया यारो मै अपने साये से कल रात डर गया यारो) मी तरी गमन मध्ये ऐकले. ह्याची रहमान, विशाल सोबत ची गाणी चांगली होती. मध्ये खूप चालला पण काही वर्षापासून दिसेनासा झाला आहे.

चिमण,
उस्ताद आमिर खान साहेब आणि पंडितजी चित्रपटासाठी गायले
हा त्यांचा मोठेपणा. त्यांची नावे इथे असायला नको होती.

उषा मंगेशकर : जय संतोषी मां मधली सगळी गाणी. मुंगळा, सुलताना सुलताना, शाम रंगीन हुई है तेरे आंचल की तरह (सोबत सुरेश वाडकर), काहे तरसाए जियरा (चित्रलेखा-आशासोबत), अपलम चपलम, छत्री न खोल उद जाएगी (सोबत किशोरकुमार), सांचा नाम तेरा (ज्यूली-सोबत आशा), छोटा सा घर होगा (नौकरी-सोबत किशोर)

नया दौर मधल्या यह देश है नौजवानों का मधे रफीसोबत बलबीरचा आवाज आहे.
त्याची आणखी गाणी आहेत का?

शाम बेनेगल यांच्या चित्रपटांना वनराज भाटिया यांच संगीत असायचं, आणि प्रीती सागरचं गाणं.
निशान्त : पिया बाज पियाला पिया जाए ना; मंथन : म्हारो गांव काठियवाड; भूमिका : तुम्हारे बिन जी ना लगे घर में; मंडी : शमशीर भरे ना मांग गजब.
यातली शेवटची तीन गाणी स्मिता पाटीलवर चित्रित झाली.

उषा मंगेशकर : जय संतोषी मां मधली सगळी गाणी. मुंगळा, सुलताना सुलताना, शाम रंगीन हुई है तेरे आंचल की तरह (सोबत सुरेश वाडकर), काहे तरसाए जियरा (चित्रलेखा-आशासोबत), अपलम चपलम, छत्री न खोल उद जाएगी (सोबत किशोरकुमार), सांचा नाम तेरा (ज्यूली-सोबत आशा), छोटा सा घर होगा (नौकरी-सोबत किशोर)>>>>>>

दिल देना है आज हि दे दो (मोर्चा),
ये जीना है अंगूर का दाना (खट्टा मिट्ठा-सोबत किशोर कुमार),
हम तुम दोनो साथ में भीग जाएंगे बरसात में (तराना-सोबत शैलेन्द्र)
चंदा को ढुंढने सभी तारे निकल पडे (जीने कि राह - सोबत-आशा)
मुझे प्यार का तोहफा देके (काला पत्थर -सोबत मो. रफी)
तेल मालिश, बूट पॉलिश (ज्योति बने ज्वाला-सोबत आशा)
मेरी झिलमिल झिलमिल बिंदिया (मामा भांजा-सोबत आशा)
शोला रे भोला रे (आप कि खातिर-सोबत शैलेन्द्र)
दो पल जो तेरी आंखो से पीने को मिले (बहारों के सपने - सोबत आशा)
गोरो कि ना कालो कि दुनिया है दिलवालो कि (डिस्को डान्सर - सोबत सुरेश वाडकर)
धूम मच गयी धूम (गोरा और काला - सोबत मो, रफी)
पीके हम तुम जो चले आये है इस महफिल में (गुमनाम - सोबत आशा)
मेरी मिट्टीमें मिल गयी (खानदान - सोबत आशा)
दुनियामें हम आये है तो जीना हि पडेगा (मदर इंडिया - सोबत लता, मीना मंगेशकर)
रंग जमाके जायेंगे (नसीब, सोबत किशोर, रफि, आशा)
ये उंचे महल सुहाने सब जनता का है (परवरीश - सोबत लता)
संभल जाए जरा जो हमपे खंजर आजमाते है (परवरीश - सोबत लता)
ना ना ना जाने ना दूंगी ओ रे कन्हाई (प्रियतमा - सोबत मो. रफी)
मै जो बोले हा तो हा (प्रियतमा - सोबत किशोर कुमार)
ओ मेरी मैना (प्यार किए जा - सोबत मन्ना डे)
गोकुल कि गलियोंका ग्वाला (रास्ते प्यार के - सोबत आशा)
मेरे राजा मेरे लाल (राजा और रंक - सोबत आशा)
झुन झुना झुन झुना (वापस )
जानु मेरी जान (शान - सोबत किशोर, आशा, मो. रफी)

अजुनही काही गाणी आहे. आठवली कि लिहितोच. Happy

मुबारक बेगमच्या आवाजातली आणखी गाणी : नींद उड जाए तेरी चैनसे सोनेवाले;
हम हाल-ए-दिल सुनाएंगे सुनिये के न सुनिये (देवदास?), मुझको अपने गले लगा लो ओ मेरे हमराही (सोबत रफी)

सुलक्षणा पंडीत ही अशीच एक गायिका कम अ‍ॅक्ट्रेस.
तिने बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टींग आणि सिंगिंग बर्‍यापैकी केले.. पण फार पुढे आली नाही. किंचितश्या किनर्‍या आवाजामुळे असेल.
एकूण गायलेल्या गाण्यांपैकी, बेकरार दिल तू गाये जा आणि माना तेरी नजर में....
याशिवाय कोणतीही गाणी गाजली नाहीत.
सुलक्षणाचीच बहिण विजयेता पंडीत ने ही फार काही ग्रेट केले नाही. तिने फक्त जो जिता मध्ये एकच गाणं गायल्याचं मला स्मरतंय... 'जवां हो यारो ये तुमको हुआ क्या...'

अरेच्चा! अजून बाबुल सुप्रियो बद्दल कोणी कसं काही बोललं नाही?
त्याची काही गाणि मला आवडतात.. सलमानला आणि तुषार कपूरला त्याचा आवाज बर्‍यापैकी फिट्ट बसतो. सध्या हा गायक बॉलिवूडातून तरी गायब आहे....
पण 'सितारों की मेहफिल में गुंजेगा तराना (कहोनाप्यार्है) जबसेदेखाहैतेरेहाथकाचाँद (मुझे कुछ केहनाहै) शिवाय, तेरा जादू चलगया, स्टाईल सारख्या सिनेमात ही त्याने गायन केले... पण गाणि काही फार गाजली नाहीत.

सुनता है मेरा खुदा, दिलो जान से प्यारा(पुकार), माया मच्छिंद्रा मुझपे जादू मत करना (हिंदुस्थानी) आणि हाय रामा ये क्या हुआ क्यू (रंगिला) इ. गाणि गाणारी स्वर्णलथा सुद्धा हिंदी मध्ये फार पुढे आली नाही, पण एका लयीत बेसूर न होता वर चढणारा आवाज ही तिची खासियत...

साधना सरगम आणि अलका याज्ञिक तशा एकाच काळातल्या गायिका पण अलका पुढे आली, साधनाला फार चान्स मिळाला नाही... हम है राही प्यार के मध्ये बंबई से गयी पुना, आणि साथिया मध्ये चुपके से लग जा गले.... सुंदर गायली...

जिप्सी... सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर कलेक्शनबद्दल धन्यवाद !

अरेच्चा! अजून बाबुल सुप्रियो बद्दल कोणी कसं काही बोललं नाही?>>> अनुमोदन.
त्याच्या आणि कुमार सानुच्या आवाजातला फरक चटकन लक्षात येतं नाही. पण कुमार सानुच्या आवाजापेक्षा बाबुल सुप्रियोचा आवाज जास्त चांगला वाटतो. त्याचं हम तुम चं शीर्षकगीत 'साँसों को साँसो में ढलने दो जरा', हंगामामधलं 'परी परी' आणि एका अल्बममधलं 'सोचता हू' ऑल टाइम फेवरेट Happy

उपकार सिनेमातल्या, आयी झूमके बसंत झूमो... मधे पण काही ओळी मुबारक बेगमच्या आवाजात आहेत ना ?
देवदास मधे, वो ना आयेंगे पलटके, उन्हे लाख हम बुलाये.. हे पण तिच्याच आवाजातले. हे आणि मधुमति मधले गाणे, फार सारखे आहे.

>>>>सुरेश वाडकर माझ्या आवडीच्या गायकांपैकी एक. स्मित<<<< अगदि अगदि, सेम हीअर जिप्सी.

आणखीन काहि...
देर ना हो जाये कहि (हिना)
हुजुर इस कदर भी ना इतराके चलिये (मासुम)
ईन ह्सीं वादियोंसे दो चार नजारें (प्यासा सावन)
प्यार के मोडपर छोडोगे जो बाहें मेरी (परिंदा)
प्यार ये जाने कॅसा (रंगिला) ई.ई. बरीच अजुन.

आणि हो, सुरमयी शाम इस तरह आये (लिबास) नाहि (लेकिन) आहे. खामोशसा अफसाना (लिबास) आहे.

मित्त सासोंको सासों मे ढलने दो... साठी अनुमोदन.. मला फार आवडतं ते गाणं.. वर लिहायला पटकन सुचलं नाही.. Happy

तर... पुन्हा सुरू...

"अम्मा देख आ देख तेरा मुंडा बिगडा जाये.. " "उसने बोला केम छे, केम छे.... "
"आजा गोरी बांगड की तेरी कमर पे चोटी लटके है...." गाणारा बाली ब्रह्मभट... आठवतोय का? "ये शहर है अमन का... यहाँ पे सब शांती शांती है.. गाणारा ही तोच..

कमल बारोट बद्दल वरती उल्लेख झाला असेल कदाचित... तरिही तिच्या आठवणींवर थोडा झाडू फिरवते.. Proud
हिचा ही आवाज तसा किनराच...
दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ, हस हुआ नुरानी चेहरा, गरजत बरसत... ही गाणि ऐकली की बर्‍याचदा तिला डुएट गाणिच जास्ती मिळाली असे वाटते...

Pages