कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

उषा खन्नाचे अजुन एक गाणे आठवले. "झुके जो तेरे नैना, के चूडी तेरी खनकी, पायल तेरी झनकी, ये तेरी मेरी प्रीत गोरी है बालपन कि" (सोबत महेन्द्र कपूर, या गाण्यात त्यांना जास्त गायकीचा वाव नाहीये). चित्रपटाचे नाव आठवत नाही. संजीव कपूर आणि माला सिन्हा (बहुतेक)वर चित्रित आहे.

या धाग्यामधे चित्रपटात काम करणार्‍या गायक (?) कलाकारांची नावे टाकलेली चालतील काय ?
तसे असेल तर यादी अजुन वाढेल. उदा. अशोककुमार, बिगबी, श्रीदेवी, इ.

छाया गांगुली आकाशवाणी-विविधभारतीच्या सेवेत होत्या. आकाशवाणी मुंबईवर असिस्टंट स्टेशन डिरेक्टर होत्या.
संगीत सरिता या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमासाठी त्यांचं नाव निर्माती म्हणून ऐकू येतं.

रामायण वाले रामानंद-आनंद-प्रेम-मोती आणि प्रिती (हाउ रायमिंग :डोमा:) ही सगळी एकाच सागरातली रत्नं की काय ? Wink

>>रामायण वाले रामानंद-आनंद-प्रेम-मोती आणि प्रिती (हाउ रायमिंग ) ही सगळी एकाच सागरातली रत्नं की काय ?
पण बहुतेक वेग-वेगळ्या मंथनातुन निघालेली Wink

दिल मे जागे धडकन जैसे
पहला पहला पानी वैसे
ऐसा छाया दिल पे जादू

हे गाणं जिने गायलय त्या गायिकेचं नाव काय ? सूर मधल्या नायिकेनेच गायलय का ते ? नाव नाहीच आठवत.. गाणी मस्त.
आ भी जा...

नमस्ते मंडळी, आज माझ्या इथल्या सदस्यत्वाचा पहिला दिवस. एका जालिय मित्राच्या ईमेलमध्ये या धाग्याचा आवर्जून उल्लेख आला असल्याने काल रात्री श्री.प्रशांत यांचा मूळ लेख आणि त्यावर आलेल्या एकसो बढकर एक प्रतिक्रिया वाचत असताना मन प्रसन्नतेने भरून गेले. किती जबरदस्त माहिती आहे त्या सुवर्णयुगाची इथल्या मंडळीना तसेच त्याचबरोबर हिंदी गाण्यावर भरभरून वाहणारे प्रेमही प्रतिसादातून अनुभवायला मिळाले.

प्रशांत याना अभिप्रेत असलेले सर्वच विस्मृतीच्या ढगाआड गेलेले गायक/गायिका चर्चेत आल्याचे आढळले आहेतच आणि त्यांच्या गाण्यांनी आपले जीवन किती समृद्ध केले आहे याचीही मला तीव्रतेने जाणीव झाली.

या क्षणी मला वर उल्लेख झालेल्या सर्वच नावांसमवेत आठवतात (बहुधा अजून इथे उल्लेख झालेले नसावेत) ती दोन प्रमुख नावे :
१. मीना कपूर >> ज्यांचे नाव घेताच आपल्या कानाची पाळी पकडावी असे वाटणारे दिग्गज संगीतकार अनिल विश्वास यांच्या पत्नी. मीना कपूर यांचे नाव घेताच चटदिशी आठवते ते गाणे म्हणजे "कुछ और जमाना केहता है" हे 'छोटी छोटी बाते' या स्वर्गीय मोतीलाल निर्मित चित्रपटातील अनिलदा यानीच संगीतबद्ध केलेले सुरेख गीत, जे नादिरा यांच्यावर चित्रीत झाले होते. 'परदेसी' मधील 'रसिया रे मन बसिया रे' हे एक आणि "आँखे" मधील 'मोरे अटरिय पे कागा' हे आणखीन एक प्रकर्षाने आठवणारे गीत. अनिलदांच्या निधनानंतर 'अमर उत्पल' या त्यांच्या मुलांजवळ राहतात [अमर उत्पल या जोडीने बिग बी च्या 'शहेनशहा' चे संगीत दिग्दर्शन केले होते; पण पुढे तेही हिंदी चित्रपटसृष्टीतून मागे पडले.]

२. शांती माथूर >> इथल्या सदस्यांपैकी ज्याना 'बिनाका गीत माला' चे ते सोनेरी आणि भन्नाट दिवस (बुधवार रात्री ८ ते ९ रेडिओ सीलोनला कान लावून बसणारी पिढी आजही त्या जादूमय आठवणींनी मोहरून जाते) आठवत असतील तर अमीन सयानीसमवेत 'बिनाका' टूथपेस्टची गाण्यातून जाहिरात करणारी ती छोटी गायिकाही आठवत असेलच >> तीच शांती माथूर. मेहबूब यांच्या 'सन ऑफ इंडिया' मधील मा.साजिदवर चित्रित झालेले ते प्रसिद्ध गाणे 'नन्हा मुन्ना राही हूं, देश का सिपाई हूं, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद' जिच्यामुळे लोकप्रिय झाले ती शांती माथूर.

आता त्यानी सत्तरी पार केली असून त्या दुबईत आपल्या नातेवाईकांसमवेत राहतात.
www.youtube.com/watch?v=iCnvz8WEmIc या लिंकवर शांती माथूरना या वयात 'सन ऑफ इंडिया' तील ते गाणे म्हणताना पाहता येईल.

खूप आनंद झाला आहे मला इथल्या धाग्यावर अभिप्राय नोंदविताना.

अशोक

अशोक,
अप्रतिम पोस्ट... इतक्या सुंदर गाण्यांच्या गायकांच्या आठवणी करून दिल्याबद्दल धन्यवाद.
कुछ और जमाना केहता है.. माझं अत्यंत आवडतं गाणं.. Happy

अशोक, उत्तम पोस्ट. धन्यवाद Happy

"पहचान" चित्रपटातील "वो परी कहां से लावू तेरी दुल्हन किसे बनावू...." या गाण्यात मुकेश व सुमन कल्याणपूर यांच्यासोबतचा तिसरा आवाज कोणत्या गायिकेचा आहे?

रच्याकने, 'सन ऑफ इंडिया' चित्रपटाचे नाव घेताच "दिल तोडनेवाले तुझे दिल ढुंढ रहा है..." हे लता/रफीचे एक अप्रतिम ड्युएट आठवले व गुणगुणायला लागलो. Happy

पहचान" चित्रपटातील "वो परी कहां से लावू तेरी दुल्हन किसे बनावू...." या गाण्यात मुकेश व सुमन कल्याणपूर यांच्यासोबतचा तिसरा आवाज कोणत्या गायिकेचा आहे?

जिप्सी, शारदाचा आवाज ओळखता येत नाही?

जिप्सी, शारदाचा आवाज ओळखता येत नाही?>>>>>मला ९९% वाटलंच होतं Happy पण थोडा कन्फ्युज होतो. या चित्रपटातील गाण्यात सुमन कल्याणपूरचा आवाजही (मला) नेहमीपेक्षा वेगळाच वाटला.

सोबत का असर : तुझ्यावर नाही, सु.क.वर>>>>>:फिदी: खरंय, "आया न हमको प्यार जताना प्यार कभी से तुझे करते है..." या सुंदर गाण्यातही सुमन कल्यानपूरच्या आवाजावर "शारदा"च्या आवाजाची छाप जाणवते (हेमावैम). Happy

विषयांतराबद्दल क्षमस्व.

ओपीने आशाला पर्याय म्हणून दिलराज कौर, पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले यांचा आवाज वापरला असे वाचल्याचे आठवते (बहुतेक कणेकरांनी लिहिले असणार). या दोघींच्या आवाजातली हिंदी गाणी ऐकल्याचे मात्र चटकन आठवत नाही.
पुष्पा पागधरेंच्या आवाजात इतनी शक्ती हमें देना दाता हे अंकुशमधलं गाणं आहे.

कृष्णा कल्लेंच्या आवाजात 'मेरे हसरतों की दुनिया; तु मिले कहीं जो मुझको, सीनेसे लगा लु तुझको हे आहे'.सोबत रफी
प्यार करते हो यार, करके डरते हो यार, यार तुमभी कमाल करते हो
ही दोन शोधल्यावर मिळाली आणि आठवलीही.

स्वागताबद्दल आणि प्रतिसाद आवडल्याचे लिहिल्याबद्दल धन्यवाद मंडळी. हा विषयच विलक्षण असे भावूक वातावरण निर्माण करून टाकतो. दक्षिणा यानी 'कुछ और जमाना' त्यांचे अत्यंत आवडते गाणे लिहिल्याचे वाचून मला खूप आनंद झाला. ज्यानी अद्यापि ऐकले नसेल तर ते मुद्दाम ऐकावे. फार टची आवाज आहे मीना कपूर यांचा.

वर श्री.मयेकर आणि श्री.जिप्सी यांचा 'सुमन' आणि 'शारदा' संदर्भात टिपण्या वाचल्या. सुमनताईंबद्दल तर किती लिहावे तितके कमीच म्हणावे लागेल. दुर्दैव म्हणा किंवा नियतीचे दान म्हणा, त्या 'लता'ची सावली म्हणूनच ओळखल्या गेल्या. काही प्रमाणात शंकर जयकिशननी त्याना स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली (विशेषतः दिल एक मंदिरमधील 'जुही कि कली मेरी लाडली' आणि जानवरमधील 'मेरे संग गा') अन्यथा काही तुरळक अपवाद वगळता नेहमीच त्याना युगल गीतासाठी रफी, मुकेश, मन्ना डे यांच्यासोबत निवडले गेले. 'पेहचान' मधील वरील गाणेही त्याच पठडीतील. सुमनताईंच्या व्यक्तीगत आवडीत 'बेहनाने भाईके कलाई मे' ही रेशम की डोरीमधील गाणे येते (हे सह्याद्री वाहीनीवर त्यानी स्वतःच सांगितले).

'शारदा' च्या संगीत-गायन दर्जाबद्दल लिहिण्याचे हे स्थळ नव्हे, पण एक गायिका म्हणून त्यानी ६६ ते ७० या काळात नक्कीच नाव मिळविले होते. माझी माहिती जर बरोबर असेल तर त्या शारदाच होत्या ज्यांच्यामुळे खुद्द 'फिल्मफेअर' ला 'बेस्ट सिंगर' साठी अस्तित्वात असलेली नियमावली बदलावी लागली होती. १९६६ पर्यंत 'मेल किंवा फीमेल' असेच 'बेस्ट प्लेबॅक सिंगर' ची ट्रॉफी दिली जात असे. पण 'सूरज' च्यावेळी शारदाचे 'तितली उडी' शर्यतीत होते तर त्याच चित्रपटातील 'बहारो फूल बरसाओ' हे रफींचे गाणेही. दोन्ही तितकीच लोकप्रिय झाल्याने शेवटी मॅनेजमेन्टने त्यावेळी दोघांनाही बेस्ट प्लेबॅक सिंगर्सच्या ट्रॉफीज दिल्या आणि पुढील वर्षापासून मग गायक आणि गायिका या दोघांनाही स्वतंत्र कॅटेगरीज निर्माण करण्यात आल्या.

"कुछ और जमाना केहता है" हे मोतीलाल निर्मित "छोटी छोटी बाते" या चित्रपटातील गाणे. चित्रपट अजिबात चालला नसल्याने त्यावर कुणाचे भाष्यही अपेक्षित नाही. सुदैवाने यूट्युबवर हे गाणे तुम्हास पाहावयास्/ऐकण्यास मिळेल. नादीरा आणि मोतीलाल यांच्यावरच चित्रीत झाले आहे.

लिंक >> http://www.youtube.com/watch?v=uWsRBwDFeOE

धन्स, अशोक Happy

दुर्दैव म्हणा किंवा नियतीचे दान म्हणा, त्या 'लता'ची सावली म्हणूनच ओळखल्या गेल्या.>>>>>>अगदी अगदी. Sad

ठेहरिये होश में आलु.... तो चले जाइये गा... या गाण्यात मधे मधे 'उंहुं'... आहे, तो पण सुमन कल्याणपूरांचा आवाज ना?

हो पुढे काही ओळी पण आहेत...
मुझको इकरारे मोहब्बत पे हया आती है
बात कहते हुए गर्दन मेरी झुक जाती है....

मग रफीने पण हुंहुं केलेय ...ते ऐकलं की हसू येतं.

मित आणि मयेकर > तुम्ही उल्लेख केलेले युगल गीत जे शशी कपूर आणि नंदावर चित्रीत झाले ते त्या सुरावटीमुळे छानपैकी त्यावेळी सर्वांच्या तोंडी बसले आणि मग पुढच्याच वर्षी याच दोघांना प्रमुख भूमिकेत घेऊन काढलेल्या रंगीत 'जब जब फूल खिले' या चित्रपटात कल्याणजी आनंदजी यानी रफी आणि सुमनताईंच्या आवाजात 'ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे' हे खेळकर गाणे [अगदी मोहब्बत इसको केहते है धर्तीवरच] गुंफले आणि त्यालाही तशीच प्रसिद्धी लाभली.

छानच लागला आहे सुमनताईंचा आवाज त्या दोन्ही युगल गीतात.

जगजीत कौर, सुमन कल्याणपूर आणि वाणी जयराम यांच्या पंक्तीत शारदा म्हणजे जरा अतीच झालं. राजहंसांच्या थव्यात वशिला लावून कावळ्यानं घुसावं तसं.
बापू करंदीकर

Pages