सुंदर माझं घर : कल्पना आणि सूचना

Submitted by मितान on 24 February, 2011 - 08:20

आमच्या शेतावर काम करणार्‍या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्‍यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्‍या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्‍या, दुसर्‍या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्‍या नवर्‍याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्‍या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.

तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्‍याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्‍या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्‍यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्‍या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्‍या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.

कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !

पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.

दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्‍याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.

हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार !

उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला.

मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्‍याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...

निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्‍यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.

तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.

पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.
काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....

ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं.

तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर
सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणार्‍या अशा काही टिप्स इथे प्लीज शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेकिँग सोडा म्हणजे बेकिँग पावडर की खाण्याचा सोडा?
विनेगर म्हणजे Acetic acid ना?
टाइल्सवर विनेगर वापरले तर चालते का?

प्राची, बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा. टाइल्सवर विनेगर चालते. १ कप विनेगर १ गॅलन पाण्यात घालायचे. विनेगर मधे अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड असते. तेव्हा विनेगर हे डायलुट केलेले अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड समजायला हरकत नसावी.

माझ्या घरी छोटे किडे झाले आहेत. घर स्वछ आहे. आणी हे किडे पाण्याजवळ दिसतात. म्हणजे, सिंक जवळ आहेत. सिंक कोरडे ठेवते, पण रात्री, येतात. सगळे उपाय झाले. आणी, अन्नाशी काही करत नाहीत. पण मला अन्न बनवायला नको वाट्ते मग. एकदम छोटे आहेत म्हणजे, चिलटा सारखे. paste control सध्या काही कारणाने नाही करता येणार. Please उपाय आहे का काही ? इथे खुप उपयोगी माहीती मिळाळी. सगळ्या चे response वाचले. आभारी आहे हा धागा चालु केलात म्हणुन.

चैत्रा, तुम्ही जिथे रहाता तिथे हवा कशी आहे? माझ्याकडे हे चिलटांसारखे किडे उन्हाळ्यात येतात.

टबबाथ एकदम पांढरा स्वच्छ होण्यासाठी पण बेकींग सोडा, व्हिनेगर उपयोगी पडेल का? सध्या मी ते स्क्रबल बबल वापरतेय त्याने सोप स्कम जातो पण एकदम छान इफेक्ट येत नाहीये. सांगावे लागतेय आज टबबाथ घासलाय Happy

सायो,
प्रतिसादा बद्दल आभारी आहे. हो. बरोबर. उन्हाळ्यातच आले किडे इथे, पण आता हिवाळा आला तरी जायचे नाव घेत नाहीत. जिथे पाणी आणी कमी उजेड आहे, जसे सिंक च्या खाली, बाथरुम मध्ये असे दिसतात. चिलटा सारखे उडत नाहीत नशीब. एकदम छोटे असले तरी, मला किळस वाट्ते, cooking करायची. घरगुती उपाय आहे का काही? तुम्ही / तु काय केलेस ? आणी, मा.बो. वर, कोणाला अनुभव आहे का ह्या किड्यांचा? देव करो आणी कोणाला, न येवो अनुभव. Happy

स्वाती, धन्यवाद. Happy

माझ्याकडून छोटीशी टीप. गॅसशेगडी ओल्या फडक्याने पुसून घेतली की लगेच वर्तमानपत्राने पुसून घ्यायची. पाण्याचे डाग पडत नाहीत आणि शेगडी एकदम चकचकीत दिसते. Happy घरातले आरसे, खिडक्या/कपाटाच्या काचाही या पद्धतीने स्वच्छ होतात.

हा प्रश्न इथे टाकावा की नाही माहित नाही पण टाकत आहे. मी परवाच गॅसची शेगडी नवीन घेतली आहे तिला पावडर कोटिंग आहे पण त्यावर स्क्रॅचेस होतील असा माझा अंदाज आहे कुणी अशी शेगडी वापरली आहे काय?

चैत्रा, तुमचे किडे घालवायला आधी हळद व तुरटीच्या गरम पाण्याने जागा पुसून घ्यायची. मग छोटा टेबलफॅन तिथे जवळच लावून सुकु द्यायचा ओटा. मग हिंगाची पूड टाकून ठेवायचे रात्रभर. हा उपाय तीन दिवसात गायब करतो. मैत्रीणीला बराच फायदा झालाय अमेरीकेत तरी. तुम्ही अमेरीकेत थंड ठिकाणी असाल किंवा एकुणच कोंदट (हिटर मिश्र ह्युमिडिफायर) अश्या घरात जिथे प्रकाश नसेल तर असल्या किड्यांची अंडी घालणे सुरु होते. दुर्बीणीने बघाल तर काळसर-लाल तर काहि किड्यांची एकदम सफेद अशी अंडी दिसतील तिथे. चांगली मोठी दुर्बीण घ्या व बघा. Happy

कान्याकोपर्‍यात मीठ आणि कापूर घालून ठेवायचा.
जुलैमधे ज्या घरात रहायला गेलो आम्ही तिथे घर काही वर्ष बंद असल्याने किचनमधे सगळीकडे विचित्र वास होता. तेव्हा मीठ-कापूर उद्योग केला होता. वास, किडे गेले.
अर्थात घरभर गळून गळून पाणी झाल्यावर तो वास परत आला. मग आम्ही ते घरच सोडलं तो मुद्दा निराळा.

अजुन एक माहिती पाहिजे. किचन ओटा , कपाटे लाकडी आहे (तातुन शुभ्र पांढरी) त्यावार हळद, मसाले ह्याचे डाग पड्ले आहेत (माझ्याकडुन). ते कसे जातील ?

बाथटब च्या कोपर्या मधे, काळे डाग पड्तात, पाणी साचुन. तिथेही जास्त घासले तर कडा निघुन येतात. त्यामुळे कोपरे काळे आहेत.
कुणाला काही माहिती आहे का ?

आभार.

कालच व्हिनेगार आणले आहे सगळे वाचुन. आज प्रयोग करेन. मुख्य म्ह्णजे, घरमालकाला घर खुप स्वछ करुन द्यावे लागेल. इथे सोपे आणी छान उपाय सांगितले आहेत.

ध्वनी,
खुप आभारी आहे. ह्या वीकेन्ड ला करुन बघेन. छान उपाय आणी सोपा पण. मी साउथ अमेरिकेत आहे.(ऊसगाव नाही) त्या॑मुळे पहिले हिन्ग वगेरे शोधावा लागेल (मिळतो का). पण आजच शोध मोहीम चालु केली आहे. अरे बापरे.. किड्यांची अंडी!!! घाम फुट्ला वाचुन. ग्रह तारे वाली दुर्बीण आहे ध्वनी, पण आता हे वाचुन डोळ्यांपुढे तारे चमकले. गम्मत म्ह्णजे, काल माझ्या स्वप्नात मी किडे मारते आहे असे आले होते. Happy

नीधप ,
कापुरचा उग्र वास असल्यामुळे जात असतील बहुदा. पण इथली कापुराची किंमत पहाता, घर बदलणे योग्य असेल. विशेष म्ह्णजे, घर १० मजल्यावर आहे आणी, हवा उजेड भरपुर आहे. Happy
नीधप , तुम्ही कथा लिहा , किडे आम्ही मारु. Happy तुमच्या कथा आणी रंगीबेरंगी पान ची fan आहे.

मा.बो. करानो उपाया बद्द्ल आभारी आहे.

घराची स्वच्छता असा नवीन ग्रूप करून तिथे हा धागा हलवला आहे.

सगळ्या प्रतिक्रिया एकाच धाग्यावर आल्या तर नंतर शोधणे जास्त अवघड जाते म्हणून
या धाग्यावरचे प्रतिसाद बंद करतो आहोत. त्यामुळे याच ग्रूपमधे त्या त्या विषयावर नवीन धागा सुरु करणे योग्य ठरेल. तुम्हाला प्रश्न असतील तर नवीन धाग्यापेक्षाही नवीन प्रश्न तयार करणे जास्त योग्य होईल.

Pages