सुंदर माझं घर : कल्पना आणि सूचना

Submitted by मितान on 24 February, 2011 - 08:20

आमच्या शेतावर काम करणार्‍या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्‍यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्‍या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्‍या, दुसर्‍या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्‍या नवर्‍याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्‍या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.

तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्‍याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्‍या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्‍यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्‍या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्‍या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.

कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !

पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.

दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्‍याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.

हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार !

उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला.

मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्‍याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...

निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्‍यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.

तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.

पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.
काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....

ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं.

तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर
सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणार्‍या अशा काही टिप्स इथे प्लीज शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मितान, छान बीबी सुरु केलास!
सगळया सुचना पण चांगल्या आहेत.

अलीकडेच प्लंबिंग चे काम करायला आलेल्या माणसाने सांगितले की टॉयलेटस स्वच्छ करण्यासाठी साधे डीशवॉशिंग लिक्वीड वापरा! अति केमिकल्स्/ब्लीच असलेली उत्पादने वापरु नका त्याने ड्रेनेज सिस्टीम बिघडते. माझी तरी अजुन टोयलेट स्वच्छ करयला डिशवॉशिग लिक्वीड वापरायची हिंमत झाली नाहीये. पण ईथे कोणी जाणकार यावर प्रकाश टाकु शकतील का?

मितान,तुम्ही जे दोन किस्से लिहिलेत; मला पण असाच अनुभव आहे.स्वच्छतेच्या कल्पना या खूप वैयक्तिक असतात,आणि वरवर दिखाऊपणाने स्वच्छतेचा आव आणायचा किंवा आपण खूप पॉश आहोत असे दाखवायचे आणि यांच्या घरी गेलं की कधी एकदा बाहेर पडतोय असे वाटते.ज्या व्यक्ती स्वच्छ,व्यवस्थित असतात त्यांच्या साध्या वागण्यातूनही म्हणजे अगदी चप्पल कशी काढून ठेवतात त्यावरूनही ते जाणवते.त्यांना आव आणावा लागत नाही स्वच्छ आहोत ह्याचा.मनाची स्वच्छतासुध्दा तितकीच महत्वाची आहे.किंबहुना ती जास्त महत्वाची आहे.पण त्या नंतर नं. लागतो शारिरीक,घरच्या आणि सार्वजनिक स्वच्छतेचा.

मि अमि आणि नोरा >>
एक्झॉस्ट फॅन चिकट झाला असेल तर रॉकेल मध्ये स्पंज किंवा कापडाची चिंधी भिजवून त्याने पुसला तर दोन मिनिटात एकदम स्वच्छ होतो. Happy

शांकली,
टिपटॉप आणि पॉश घरात स्वच्छता नसतेच असं जनरल विधान मितान ला करायचं नाहीये.... म्हणजे मला वाटत नाही मितान ला असं काही म्हणायचं असेल.

मितान सारखे अनुभव मला ही आहेत.

माझं एक मत, रोजच्या कामवाल्या बाईलाच रोज बाथरुम साफ करणे आणि धूळ साफ करणे हे वरचे काम, वरचे पैसे द्यावे. आणि दर आठवड्याला कधी फ्रिज, कधी खिडक्यांच्या काचा असे आपण आठवुन काम करुन घ्यावे. अर्थात हे भारतात राहण्यार्‍या लोकांसाठीच योग्य आहे. मला इथे, बेंगलुरला तर सर्रास अश्या कामवाल्या मिळतात.

स्वयंपाक झाला कि स्वयंपाकघर स्वच्छ आणि कोरडे करुन ठेवले आणि काहीही उघडे (कपाटात, ड्रॉवर मध्येही नाही) नाही ठेवले कि अजिबात झुरळे होत नाहीत हा माझा अनुभव आहे.

स्वयंपाकघरातले डबा एकदा रिकामा झाला कि महिन्याचे सामान भरण्याआधी घासायला टाकुन माग सामान भरले कि नियमित स्वच्छ राहतो.

शांकली, नी बरोबर म्हणतेय. सगळ्या टिपटॉप आणि पॉश घरात अस्वच्छता असते असे नाही म्हणायचे मला. सगळी छोटी आणि गरीब घरं स्वच्छ असतात असेही नाही म्हणायचे.
पण तुझे दुसरे मत मात्र १०० % पटले. स्वच्छतेची आवड असणार्‍या , घर नीटनेटकं आवडाणार्‍या नि त्यासाठी डोकं, वेळ नि शक्तीचा थोडा तरी भाग खर्च करतात हे नेहमी अनुभवाला येते.

नोरा, कुणाकडे गेल्यावर डोळ्यात 'टोचणारी' अस्वच्छता आपोआप थेट डोक्यात जाते. त्याला 'न्याहाळण्याची' गरज नाही पडत. आधी म्हटल्याप्रमाणे घरातल्या स्वच्छतेवरून माणसांची किंमत नाहीच करता येणार. आपण तेवढे सूज्ञ असतो. पण आपल्यासाठी जवळची असणारी माणसं जेव्हा नकळतपणे असे वागतात तेव्हा वाईट वाटते. घाण घर असणारी माझी जवळची मैत्रिण आहे. Sad
बाकी तुझा सल्ला वाचून आज अ‍ॅड असलेला पेपरचा गठ्ठा पो बॉ जवळ ५ मि वेळ देऊन तिथेच घरात फक्त कामाचे कागद घेऊन आले. ५०० ग्रॅ ऐवजी २ ग्र ! Happy Happy

डॅफोडिल्स मस्त उपाय सांगितलास. माझ्या घरातला ए फॅ साफ करायला खूप वेळ लागतो म्हणून कंटाळा केला जायचा.

वत्सला, वापरून बघ की एकदा डिशवॉशिंग लिक्विड. टॉ. क्ली. पेक्षा नक्कीच ते सौम्य असते त्यामुळे नुकसान नाही होणार.

काल एका मैत्रिणीने सांगितले की खार्‍या पाण्यामुळे वॉशिंग मशिन मध्ये क्षार साचून जे नुकसान होते ते होऊ नये म्हणून सॉफ्टनर म्हणून विनिगर वापरावे.
अजुन एक. परदेशात / स्नोफॉल होणार्‍या देशातल्या मैत्रिणिंनो, मागच्या आठवड्यात एका डच मैत्रिणीकडे गेले होते. तिचे कार्पेट अगदी नवेकोरे दिसत होते. म्हणाली, अंगणात बर्फ असला की नेऊन पालथे टाकते. आणि २-३ तासांनी आत आणते. ते ओले होत नाही. पण सगळी धुळ बर्फाला चिकटते आणि जंतू मरतात. मस्त वाटला हा उपाय.

माझा एक प्रश्न. मी किचनच्या सिंकमध्ये अन्न पडू देत नाही. फक्त भांडी घासते. तरीपण सिंकमध्ये स्पेशली हिवाळ्यात एक प्रकारचा कुबट वास येतो. ड्रेनेक्स वगेरे वापरून काहीही फरक पडत नाही. काय करू ?

मितान,
सिंक साफ केलं की, नंतर रस काढून राहिलेलं लिंबु सिंक मधे टाकून क्रशर काही सेकंद सुरु करावा, मस्त फ्रेश वास येतो.

माझा एक प्रश्न. मी किचनच्या सिंकमध्ये अन्न पडू देत नाही. फक्त भांडी घासते. तरीपण सिंकमध्ये स्पेशली हिवाळ्यात एक प्रकारचा कुबट वास येतो. ड्रेनेक्स वगेरे वापरून काहीही फरक पडत नाही. काय करू ?>>>
विकेंडला किंवा १५ दिवसांनी एकदा रात्री थोडेसे फिनाईल सिंकच्या पाईप्मध्ये टाकायचे.

मी ही घर बर्यापईकी स्वच्छ थेवण्याचा प्रयत्न करते पण झुरळापासुन सुट़का मीळवण्यासाथी काय करावे ?
जुने बान्धकाम असल्यास असे होत नसेल ना?

शंभरावे पोस्ट!!! Happy

रोज रात्री भांडी घासुन झाल्यावर सिंकमधे पातेलंभर गरम (ऑलमोस्ट उकळतं) पाणी ओतायचं... वास, ओशटपणा अजिब्बात रहात नाही... अनुभवसिद्ध उपाय Happy

झुरळांवर मिस्टर मसल स्प्रे करा. झुरळे लगेच मरतात.

>> सिंकमधे रात्री झोपायच्या आधी रोज पातेलंभर गरम (ऑलमोस्ट उकळतं) पाणी ओतायचं... वास, ओशटपणा अजिब्बात रहात नाही... अनुभवसिद्ध उपाय >>

लाजो, पण सिंकला जो प्लॅस्टीकचा पाईप असतो तो खराब होत नाही का यामुळे?

ही पहा टॉयलेट मधे लावलेली पाटी Proud

IMG_0157.jpg

@ मी_अमि, हार्ड पीव्हीसी पाईप्स असतिल तर प्रॉब्लेम नको यायला. कारण हा उपाय आमच्या प्लंबरनेच सांगितलाय. पाणी ओतताना डायरेक्ट मधल्या ड्रेन मधे ओतण्याऐवजी सिंक मधे ओतलं तर तेव्हढे टेम्परेचर खाली येइल. तरी पण तुम्ही तुमच्या प्लंबरला विचारुन बघा. उगाच काही प्रॉब्लेम्स नकोत Happy

आमची एक दुरच्या नात्यातली आत्या होती. अत्यंत अव्यवस्थित घरासाठी प्रसिद्धच होती ती. एकदा काही कारणानिमित्त आई-बाबांना तिच्या घरी जाण्याची संधी मिळाली. घर अपेक्षेप्रमाणेच अस्ताव्यस्त होतं. तिच्या घरी गेल्यावर ती म्हणाली, बसा. बाबांनी तिला विचारलं, कुठे बसू? बसायला कुठे जागा तर दिसत नाही. तर म्हणाली, तिथला पसारा जरा सरकवून बसायचं. Proud (तसं तिला काही बोललं तर राग वै यायचा नाही म्हणे).

घरी हॉलमध्ये भिंतीवर लहान असताना शाळेत हस्तकलेला आपल्याला कागदाचं झाडं वै करायला शिकवायचे नां? तश्या हस्तकलेचे नमुने जागोजागी चिकटवले होते. बाबांनी विचारलं, हे काय? तर म्हणाली, मुलीने लहान असताना केलेली हस्तकला आहे ही (तोपर्यंत मुलगी बर्‍यापैकी मोठी झाली होती). हॉलमध्येच सायकल मधोमध टांगली होती. Uhoh बाबा म्हणाले, तुझं किचनही बघू देत. तर म्हणाली, इथे बस. आत यायची काही गरज नाहीये. तरीही बाबा आता गेले, तर ओट्यावर गादी गुंडाळी करून ठेवली होती. Biggrin

मला पॉश म्हणजे- कपडे,हेअरस्टाईल या अर्थाने म्हणायचे होते;माझी एक मैत्रीण आहे,तिच्या कडे बघून आम्हा इतर सगळ्या जणींचे मत झाले होते ते आणि आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा तिचे घर बघितले ते; मितान तुमच्या दुसर्‍या किश्शयाने मझ्या नजरेसमोर आले.अर्थात ह्या गोष्टींवर आपण आपले संबध अवलंबून नसतातच.पण स्वच्छतेच्या बाबत मात्र तडजोड नसावी असे मला वाटते.

>> हॉलमध्येच सायकल मधोमध टांगली होती. बाबा म्हणाले, तुझं किचनही बघू देत. तर म्हणाली, इथे बस. आत यायची काही गरज नाहीये. तरीही बाबा आता गेले, तर ओट्यावर गादी गुंडाळी करून ठेवली होती. >>

गॅस बेडरुममध्ये बेडवर ठेवला असेल Happy

आगावा Lol

सिंक मध्ये वास येऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा आईसक्यूब्स आणी अर्धं किंवा अख्खं लिम्बू सिंकमध्ये टाकून ईन्सिनरेटर ऑन करायचा. सगळं क्रश झालं की छान फ्रेश वास येतो. कुबटपणा जाणवत नाही. अर्थात ज्यांच्याकडे ईन्सिनरेटरची सुविधा आहे अशा ठिकाणीच हा ऊपाय होऊ शकतो.

सिंकमधे फूड वगैरे क्रश करू शकेल असा क्रशर असतो त्याला किचन ईन्सिनरेटर असं म्हणतात. मी किचन मधे आणी फ्रीजमधे "आर्म अँड हॅमर" चा बेकिंग सोडा पॅक ठेवते नेहेमी. साधारण महिनाभराने जेव्हा रिप्लेस करते तेव्हा जुना पॅक सिंकमधे ओतायचा रात्री आणी सकाळी पाणी सोडायचं भरपूर. ह्याने पण डिओडराईझ होतं किचन सिंक.

आधी म्हटल्याप्रमाणे घरातल्या स्वच्छतेवरून माणसांची किंमत नाहीच करता येणार. >>

का नाही करता येणार? पाहुणे यायच्या आधीसुध्दा घर नीटनेटक केलं नसेल तर येणार्‍या पाहुण्यांची केवढी कदर केली जाते त्यावरून सहज करता येते किंमत.

साधारण महिनाभराने जेव्हा रिप्लेस करते तेव्हा जुना पॅक सिंकमधे ओतायचा रात्री आणी सकाळी पाणी सोडायचं भरपूर. ह्याने पण डिओडराईझ होतं किचन सिंक.>>> हि आयडिया छान आहे .. मी तो फेकून द्यायची किवा वेळ मिळाला तर सिंक माध्ये पेस्ट करून क्लीन करून घ्यायची तेवढ्यापुरते एकदम चकाचक दिसायचे
मी कुकर मध्ये लिंबू टाकते वरण भात झाली कि लिंबू आणि पाणी तिथे टाकून क्रश करून घेते छान वास राहतो..

मला एका गोष्टीत मदत हवी आहे.. किचन मध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कशा ओरगानैझ करता.. मोठे चमचे, झारा, पास्ता साठी वेगळे चमचे .. एग बिटर ,गाळणी, छोटी किसणी .apple cutter, . इतके झाले आहेत कि कुठे ठेवावे कळत नाही ..आणि सगळे लागतात म्हणजे दिवसातून १ वेळा तरी वापरले जातात..
बरं ते चमचे ठेवायला जे मिळतं ते आपले खाण्यचे चमचे ठेवण्यासाठी.. मोठे ट्रे घेवून बघितले तर त्यात हि काही मावत नाही

अजुन एक. परदेशात / स्नोफॉल होणार्‍या देशातल्या मैत्रिणिंनो, मागच्या आठवड्यात एका डच मैत्रिणीकडे गेले होते. तिचे कार्पेट अगदी नवेकोरे दिसत होते. म्हणाली, अंगणात बर्फ असला की नेऊन पालथे टाकते. आणि २-३ तासांनी आत आणते. ते ओले होत नाही. पण सगळी धुळ बर्फाला चिकटते आणि जंतू मरतात. मस्त वाटला हा उपाय. >>>>ढीगभर स्नो आहे बाहेर.. थांक्स. करून बघेल Happy

Pages