सुंदर माझं घर : कल्पना आणि सूचना

Submitted by मितान on 24 February, 2011 - 08:20

आमच्या शेतावर काम करणार्‍या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्‍यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्‍या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्‍या, दुसर्‍या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्‍या नवर्‍याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्‍या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.

तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्‍याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्‍या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्‍यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्‍या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्‍या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.

कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !

पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.

दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्‍याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.

हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार !

उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला.

मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्‍याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...

निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्‍यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.

तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.

पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.
काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....

ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं.

तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर
सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणार्‍या अशा काही टिप्स इथे प्लीज शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म... पार्वतीसारखे घर मीही पाहिलेय. माझे घर अगदीच दुस-या प्रकारातले नाहीय, पण अगदी पार्वतीसारखेही नाही. म्हणजे होते काय की १५ दिवसांनी माझा मुड लागला की घर एकदम पार्वतीसारखे आणि मग त्या दिवसानंतर हळूहळू लख्खपणा ओसरायला लागतो तो थेट परत मुड लागेपर्यंत. (नशीबाने अजुन दुस-या प्रकाराइतके घाण झालेले नाहीय कधी घर ). पण एक गोष्ट आहे, जेव्हा घरात सफाई झालेली नसते तेव्हा मी आमंत्रणे द्यायचे टाळते. धुळीने भरलेले घर इतरांना अभिमानाने दाखवायला मला तरी लाज वाटते.

इथे मैत्रिणींनी टिप्स अगदी मस्त दिल्यात. ज्या मैत्रिणी नीट वेळापत्रक आखुन घर साफ ठेवतात त्यांनी त्यांचे वेळापत्रक इथे शेअर करा कृपया.

इथे घरात धुळ इतकी येते की आज सकाळी पुसलेले टेबल संध्याकाळपर्यंत धुरळते आणि तिस-या दिवशी त्यावर नाव लिहिता येते.

रैना,पोस्ट आवडली.

नीधप्,तो टॉयलेट सीटचा प्रॉब्लेम आमच्याकडे पण.
हल्ली मीच कोणी आत जाऊन आलं की लगेच मागे जाऊन सीट्,फ्लोअर स्वच्छ करते. रोज एकाच गोष्टिवरून किती रक्त आटवायच?
ते एकाच गोष्टीच्या विरूध्द प्रकरण पटलं अगदी.
मला जमत नाही म्हणून माझ्याकडे बराच पसारा आणि छोटे,छोटे अपघातही घडतात. Happy

- स्वच्छता functional असावी. unhygenic vs rabid & military attitude to 'everything in its place and a place for everything' ही दोन टोकं झाली<< अनुमोदन.

स्वच्छता आणि नीटनेटकेपणा यात फरक आहे का? की नीटनेटक आवरलेल असल म्हणजेच घर स्वच्छ आहे? घरात डेटोल ने फरश्या पुसल्या, पण पडद्यामागे वर्तमापत्र लपवुन ठेवलियेत.. ही स्वच्छता म्हणायची का?

प्रत्येकाच्या "स्वच्छतेच्या" कन्सेप्ट्स, डेफिनीशन्स ही वेगळ्या असतात. मला जे घाण वाटेल ते कदाचित दुसर्‍याला इतकं किळसवाण वाटणार नाही.

आपण जिथे मोठे झालो, अपल्या घरात आई-वडिलांनी ठेवलेली स्वच्छता, नीटनेटकेपणा आपोआप आपल्यात उतरतो.

रैना, अतिशय योग्य पोस्ट.
बेसिक हायजीन की काटकोन म्हणजे काटकोन हे ज्याचे त्याने ठरवायचे.

लाजो, हे ट्रे आणि अजूनचे ड्रॉवर्स ठेवायला जागा नाही.
लिमिटेड जागेत काहीही सोयी न बदलता काही उपाय आहे का बघतेय. मी केवळ डब्यांचे आकार आणि सिस्टीम बदलू शकते.

नी, जमल्यास तुझ्या किचन कपाटाचा फोटो टाक. मी अजुन काही सुचले तर सांगेन.. माझ्या विषयातलं आहे म्हणुन कदाचित आयडिया देऊ शकेन Happy

नी अग टपरवेअरचे डबे छोटया जागेच छान बसतात आणी लहान दिसले तरी खुप छान मावत त्यात.
http://order.tupperware.com/pls/htprod_www/tup_show_item.show_item_detai... हे असे.

माझ्या सा बा स्वच्छतेच्या बाबतीत खुप काटेकोर आहेत. घरात धुळीचा एक कण पण नाही. आणी स्वयंपाक झाल्यावर इथे कोणी स्वयंपाक बनवला की नाही अस वाटाव इतक स्वच्छ स्वयंपाकघर.
ओट्यावर १चमचा सुद्धा राहिलेला चालत नाही त्यांना. (आम्हाला नाही एवढ जमत):(
भांडी धुतलेल सिंक सुद्धा ओल राहीलेल चालत नाही. भांडी झाल्यावर वेगळ्या कपड्यानी पुसुन घेतात.( हे जरा अतीच होत पण काय करणार ??? Uhoh )
पण सोसायटीत दरवर्षी स्वच्छतेच्या स्पर्धा असतात, आणी गेली कित्येक वर्षे त्यांना नंबर मिळत आलाय.

खुप जण म्हणतात तुमच्या सा बा ना स्वच्छतेची आवड नाही वेड आहे. Uhoh
आणी माझी जाऊ तर म्हणते (सा बां कडे गेलो की) घर आहे का शोकेस किती चकचकीत.
मी तरी एवढ स्वच्छ ठेवलेल घर (ते सुद्धा कामाला बाई न लावता) कुठे बघितल नाही.
मी घर स्वच्छ ठेवते पण सा बां सारख कधी जमेल अस वाटत नाही.

रैनाला अनुमोदन.
घर स्वच्छ ठेवण्यासाठी आधी ते अस्वच्छ आहे ही जाणिव होणे महत्वाचे. हा थ्रेशोल्ड वेगवेगळा असू शकतो! टिनएजमधली मुले आणि त्यांच्या आया; नवरा-बायको; सासू-सून या पारंपारिक युद्धात हा थ्रेशोल्डच कारण असतो.
आजार उद्भवणार नाहीत यासाठी घर हायजीनिक असावे यात वादच नाही. पण घर हे मुळात आनंदाने राहण्यासाठी आहे फक्त स्वच्छतेसाठी राबायची जागा नव्हे हे तारतम्य पाळणे महत्वाचे.

पण घर हे मुळात आनंदाने राहण्यासाठी आहे फक्त स्वच्छतेसाठी राबायची जागा नव्हे हे तारतम्य पाळणे महत्वाचे.<<<
फारच पटले!

पुलंच वाक्य आहे ना कुठेतरी..
"दिवसभरातून पंखा जितक्या वेळा स्वतःभोवती फिरतो त्याहून जास्तवेळा हे लोक त्याच्या भोवती सफाईसाठी फिरतात."

मी ग्रॅज्युएशन करताना केलेला एक यशस्वी प्रयोग- खोलीत कोळ्यांची जाळी वाढू द्यावीत त्यामुळे डासांचा आपोआप बंदोबस्त होतो, बायॉलॉजिक कंट्रोल यू नो!!!
अर्थात त्यावेळी मी मातोश्रींच्या देखरेखीखाली नव्ह्तो त्यामुळेच हे शक्य झाले. Proud

हो आणि पाली वाढु द्यायच्या बारिक्सारिक किडे खायला,मग मांजरी पाळायच्या पालींना घाबरवायला.मग कुत्रा मांजरीला घाबरवायला आणि मग स्वतः कुत्र्यांनी केलेली घाण साफ करायची. Happy

साती, आयडीआ उत्तम आहे पण मला कुत्रा फारसा आवडत नाही आणि आता माझं लग्नही झालेय त्यामुळे जळमट साफ करावीच लागतात Proud

अबबब... किती टिप्स मिळतायत !! Happy

चिंगी, तुम्ही म्हणताय तसा बॅचलर मुलींची घरं हा एक महान विषय आहे !
मामी, अगदी मनातलं बोललीस. पसारा समजू शकतो पण बेसिक हायजिन पाहिजेच. विशेषतः घरात लहान मुलं असतिल तर अजूनच..
नी, बरोबर आहे. धुतलेले ग्लासेस सरळ ठेवावेत. अगदी पातेली, डबे, मिक्सरची भांडी पूर्ण कोरडी झाल्यावर पालथी ठेवावीत.
दिप्ती, तुझ्या टिप्स आवडल्या.
लाजो, फ्रीज सामान भरून ठेवण्यासाठी तर असतो Wink मी तर माझ्या साबांच्या फ्रीज ला कपाटच म्हणते ! एवढंच नाही. त्या माझ्याकडे आल्यापासून ४८ तासांच्या आत माझा फ्रीज पण कपाट होतो ! आणि त्या गेल्यानंतर ४८ मी तो रिकामा करत असते !!!!
टॉयलेट ही रोज किंवा किमान आठवड्यातून दोन वेळा साफ करण्याची गोष्ट आहे हे आपल्याकडे अजून समजतच नाही.
आत्ता भावाच्या लग्नासाठी आईकडे गेले होते. आठ दिवस घरात बरीच गर्दी होती. भरपूर पाणी वापरायचा लोक का आळस करतात ते कळत नाही. मी एक दिवस मोठ्याने आरडाओरडा केला. पान टॉयलेट किंवा बेसिन मध्ये थुंकले तर पाणी ओता, सगळी घाण जाईपर्यंत ओता.. दोन दिवस काही फरक पडला नाही. मग मी सगळ्यांना कळेल असं रोज आंघोळीच्या आधी तीनही टॉयलेट्स आणि बेसिन साफ करायला लागले. मग करवलीच ( त्यातही परदेशातून आलेली ! ) अशी कामं रोज करतेय हे बघुन बहुधा घाण करणारे लोक लाजले असावे!
रैना, अनुमोदन. स्वच्छतेला काटे असू नयेत. पण आरोग्यासाठी आवश्यक असणार्‍या स्वच्छतेला पर्याय नाही.
आमच्या घरी 'जिथल्या तिथे ' हे शब्द म्हणजे जोकच असायचा. म्हणजे टॉवेल सापडत नाहीये का तो जिथल्या तिथे असेल. म्हणजे काल अंगपुसल्यावर जिथे घुसडून ठेवला होता तिथे ! जिथल्या तिथे !! Proud
फार रक्त आटवलंय मी यापाई !
घर घर दिसलं पाहिजे. शोकेस किंवा हॉटेलची रूम नाही. हे मान्य. पण म्हणून किचनओटा, फ्रीज, बैठकीची जेवायची जागा, टॉयलेट अशांच्या स्वच्छतेला पर्याय नाहीच.

लाजो, तुझी पोस्ट आवडली.

माझे दोन आणे..
फ्रीज आठवड्यातून एकदा तरी पुसावा. तो पुसताना विनिगर किंवा लिंबाचा रस वापरला तर सगळा वास निघून जातो.
मायक्रोवेव साफ करण्यासाठी एका काचेच्या बाऊलमध्ये कपभर पाणी घ्यावे त्यात एक लिंबू पिळून सालीसह तसेच ठेवावे. ५ मिन हाय पॉवरवर मा वे चालवावा. नंतर स्वच्छ कपड्याने मावे पुसून घ्यावा. पुसताना खालचे रिंग आणि डिश पण साफ करावी.
सैपाकाच्या ओट्यावर एक दिवसा आड उकळते पाणी ओतावे. विशेषतः कोपर्‍यांमध्ये !
चिमनी असेल तर तिचे फिल्टर सहा महिन्यातून एकदा बदलावे, साफ करावे.. तळण जास्त करणारांना हे तीन महिन्यातून एकदा करावे लागेल.
बरेचदा शूरॅक दारात असते आणि घरातल्या काहींच्या शूजना खूप वास येत असतो. मोजे बदलले तरी. लेदर शूजना जास्तच. अशा शूज मध्ये एका टिश्युपेपरवर निलगिरी तेलाचे थेंब शिंपडून रात्रभर ठेवावेत. आठवड्यातून एकदा जरी हे केले तरी उत्तम.
अजुन सुचेल तसे लिहितेच.
अश्विनीमामी, स्मिता तुमच्या पोस्टींची वाट बघते. Happy

मितान, उपयुक्त टीप्स Happy

अगं या लेखाच नाव बदलता येइल का?

इथे स्वच्छतेबद्दल नुसतीच चर्चा नसुन उपयुक्त टीप्स देखिल आहेत. अत्ताच्या नावावरुन हे लक्षात येत नाहिये. बघ तुला पटत असेल तर शिर्षकात बदल कर Happy

घरातल्या सगळ्यांनाच घर नीटनेटके ठेवायची आवड असते असे नाही. बरेचदा सुचतही नसते. मी एक प्रयोग केला होता. घरातल्या प्रत्येक रूमनुसार त्या त्या रूममधली कामं प्राधान्यक्रमानुसार लिहून दारावर चिठी चिकटवून ठेवत असे. साबा, साबु यांना प्रत्यक्ष काम सांगण्याची सोयच नाही ! नवर्‍याला मनाने सुचत नाही. म्हणून हा उपाय. आणि आपणच ती कामे जमेल तेव्हा करत असे. काम झाले की लिहिलेल्या कामावर टिकमार्क. हळुहळू मी काहीच न बोलता सांगता घरातल्या इतर मंडळींकडूनही लिस्ट वर काम करून टिकमार्क यायला लागले. Happy

तुम्ही एक बघताय का की स्वच्छतेचा हा बाफ संयुक्तामधे नसूनही केवळ बायाच पोस्टी टाकतायत?

तुम्ही एक बघताय का की स्वच्छतेचा हा बाफ संयुक्तामधे नसूनही केवळ बायाच पोस्टी टाकतायत?<< Lol

स्वच्छता हा बायांचा जिव्हाळ्याचा विषय आहे Wink

मितान, मी बघते काय नाव ठवता येइल ते. बाकी कुणाला काही दुसर नाव सुचल तरी सांगा मितानला Happy

Pages