सुंदर माझं घर : कल्पना आणि सूचना

Submitted by मितान on 24 February, 2011 - 08:20

आमच्या शेतावर काम करणार्‍या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्‍यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्‍या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्‍या, दुसर्‍या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्‍या नवर्‍याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्‍या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.

तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्‍याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्‍या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्‍यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्‍या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्‍या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.

कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !

पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.

दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्‍याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.

हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार !

उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला.

मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्‍याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...

निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्‍यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.

तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.

पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.
काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....

ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं.

तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर
सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणार्‍या अशा काही टिप्स इथे प्लीज शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीरजा अतिस्वच्छतेमुळे इम्म्युनिटी कमी होते या पोस्टला शतशः अनुमोदन.
मी मुळात म्हणूनच बाळाच्या बाबतीतही स्वच्छतेचा अतिरेक करत नाही. आता त्याची प्रकृती त्याच्या पीडअ‍ॅट्रिशीयनच्या तेवढ्याच वयाच्या मुलीपेक्षा उत्तम आहे.
आत्तापर्यंत त्याला एखादं अँटीबायोटिकही नाही दिलेलं.
थोडीशी धूळ घरात असावी,थोडं शिळंपाक खायची सवय असावी असं मला वाटतं.
मला स्वतःला अतिरेकी अन्न स्वच्छतेच्या सवयीमुळे बाहेरचे काहीसुद्धा पचत नाही. त्या चॅटच्या फॅनक्लबमध्ये लिहिण्यासारखे माझ्याकडे काहि नाही कारण मला इतके वर्षे हॉस्टेलला राहून सुद्धा बाहेरचे,गाडीवरचे काही पचत नाही. तिथेही मी घरगुती जेवणाचा डब्बाच घेत होते. कुठलं पाणी,कुणाच्या घरचं जेवणही मला पचत नाही.

साती Happy

आणि हो धूळ घरात येऊ नये म्हणून एसी बसवून सगळं बंद करून इतर आजारांना निमंत्रण नि प्रदूषणात वाढ हे लिहायचं राह्यलंच.

नीधप ला तीनदा अनुमोदन...

ही चर्चा चांगली आहे खरी...ब-याच टीपा गावतील अशी आशा आहे...

माझ्या अंगात ऊंचीच्या पाचपट आळसच आहे. त्याचं वाईटही वाटतं...पण मला टीव्ही बघताना त्यावरची धूळ नाही दिसत...म्हणजे अक्षर लिहिण्याइतकी नसतेच पण...

आम्ही दोघेच राहतो, आलं गेलं अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखं...पण बाकी संसार रुमालाची इस्त्री केल्यासारखा स्वच्छ, नेटका ठेवायचा सोस नाही...स्वच्छतागृह मात्र स्वच्छच हवं असा अत्याग्रह आहे...नी म्हणते तसं, खूप केमिकल्स न वापरताही ते स्वच्छ ठेवता येतं. सतत केमिकल्स वापरून केवळ प्रदुषण नाही पण अॅलर्जीदेखील उद्भवू शकतात. आणि दहा लाख वेळा हात-पाय धुतल्यानं, किंवा दिसेल ते धुतल्यानं खरंच इम्युनिटी खालावू शकते.

स्वच्छतेचा अतिरेक डोक्यात जातो यात वाद नाही. शिवाय घर घरासारखं दिसलं तर काय बिघडलं, ते हॉटेल थोडीच आहे...आमच्या घरी कोणी आलं आणि घर घरासारखं दिसत असेल तर मी गोरंमोरं होत वगैरे अजिबात म्हणत नाही, की पसारा बघू नका हं.......इत्यादी इत्यादी....आमचं घर असं आहे, आवडलं तर उत्तम, नाही आवडलं त्याहून उत्तम...

लोक्स, जरा टिपा द्या की पण ...म्हणजे या सगळ्याच बोलण्याला-लिहिण्यातून काही टिपता येईल.

थोडंसं नियोजन घर स्वच्छ ठेवू शकतं.
अगदी दिवसादिवसाचं नको पण किमान आठवड्याचं नियोजन तरी असावं
हे माझं शेड्यूल. स्वच्छतेशिवाय इतर गोष्टीही यात आहेतच

पहिला आठवडा - मागच्या महिन्याचा हिशोब, जुन्या डब्ब्यांतिल उरलेल्या सामानाची विल्हेवाट, डबे घासून घेणं सगळ्या प्रकारांचे भाडे,नोकरांचे पैसे चुकवणे इ.

दुसरा आठवडा - नविन सामान भरणे, बँकेची कामं, सगळ्या ड्रेन्समध्ये किवी ड्रेनेक्स टाकणं

तिसरा आठवडा - घराबाहेरील व्हरांडा, कुंड्या इ.

चौथा आठवडा - घरातील क्लटर काढणं,रद्दी विकणं इ. ( हे अजून नीट जमत नाही.आम्हा दोघांनाही फालतू क्लटर जमा करणंच जास्त जमतं,म्हणून आमचं घर स्वच्छ पण अव्यवस्थित जास्त आहे) Happy

पाचवा आठवडा - हा कॅलेंडरात असला तर मज्जा करायची Happy

आठवड्यातून १ दिवस फ्रिज पुसणे हे माझ्याकडे शुक्रवारी कारण आमच्या गावात शुक्रवारी भाजी मिळत नाही त्यामुळे शुक्रवारी फ्रिज रिकामा करून शनिवारी किंवा रविवारी नव्याने भरते. आठवड्यातून एकदा बाथरूम्,किचनच्या वरची टाईल्स इ. स्वच्छ करून घेते.(म्हणजे कामवाल्या बायकांकडून)
पंधरा दिवसातून एकदा पायपुसणी धुवून घेते.
गॅसजवळचे,हात पुसायचे,भांडी पुसायचे,फरशी पुसायचे फडके दररोज धुवून घेते.
दुधाला आणि स्वैपकाला वेगळि भांडी, पक्कड आणि झाकणि आहेत.
मायक्रोवेव दररोज आतून ओल्या फडक्याने पुसून घेते आणि आठवड्यातून एकदा किंवा समिष स्वैपाकानंतर व्हिनेगरच्या पाण्याने १५ मि. ऑटो क्लिनवर ठेवून मग पुसून घेते.
माझ्याकडे कामाला बायका असल्याने हे आत्ता सगळं बाहेरचं काम सांभाळुनही जमतेच पूर्वी आम्ही दोघंच रहात असताना माझ्याकडे या वरकामांना पुरुष होता. Happy

ह्म्म्म्म.... चर्चा रंगलिये Happy

टीप्स द्या टीप्स घ्या....

आयडियाज द्या आयडियाज घ्या... Happy

वादावादी हा या बीबीचा उद्देश नव्हे... तेव्हा शक्यतो ती टाळाच Happy

मितान,

तुम्ही वर्णन केलेले 'दुसरे', म्हणजे मैत्रिणीचे घर! ते वाचून किळस आली. खरच असतात असे लोक!

नसावेत मात्र!

मितान,

तुम्ही वर्णन केलेले 'दुसरे', म्हणजे मैत्रिणीचे घर! ते वाचून किळस आली. खरच असतात असे लोक!

नसावेत मात्र!
<< माझ्या शेजारच्या काकूंचे घर नेहमीच असे असायचे . साराभाई व्हर्सेस साराभाई पहाताना नेहमी त्या काकुंची आठवण यायची.
केमिकल्स किंवा disinfectants वापरूनही घरं अस्वच्छ राहिलेली मी पाहिलेली आहेत.त्यामुळे नी ने म्हणल्याप्रमाणे भारंभार साबणं, टिशु पेपर वापरूनही घराचा उकिरडा करणारे लोकही मी पाहिलेले आहेत...
आहे त्यात अतिरेक न करता, स्वच्छ्तेचा/अस्वच्छतेचा घर नीट नेटकं ठेवता येतं...
माझ्या दोन मोठ्या जावा त्यांच्या दोन लहान म्हणजे ३ आणि २२/१ वर्षाच्या मुलांना घेऊन आल्या होत्या.
एवढी मोठी मुले असूनही दोघेही पॉटी ट्रेनड नसल्याचे पाहून प्रथम मला धक्काच बसला.
ती सगळी मंडळी गेल्यावर मी घर आवरायला घेतले आणि पाहते तर काय मुलांची शी पुसून वाईप्सचे बोळे कोप-यात टाकले होते.मला कोणताही वास फार पटकन येतो...नेहमी "तुला काय डॉबरमॅन कुत्र्याने चावले आहे की काय?" अशी थट्टा करणारा नवराही म्हणाला बरे झाले तुला वास आला नाहितर हे बोळे बाई येइपर्यंत असेच राहिले असते आणि ती बाई काम सोडून पळून गेली असती....
तात्पर्य : केवळ महागडी केमिकल्स किंवा सोकॉल्ड आधुनिक सामग्री आणून कधी घर स्वच्छ / नीटनेटक राहात नसतं ते तसं ठेवावं लागतं .:)

prady ने मांडलेल्या मुद्द्याबद्दल :

आमच्या ऑफिसात Housekeeping Service देणार्‍या कंपनीची मुलं सुट्टीच्या दिवशी ऑफिसातल्या लोकांच्या घरी जाऊन घर स्वच्छ करून द्यायची कामं स्विकारतात. ती मुलं संडास्-बाथरूमपासून सगळं घर स्वच्छ करून देतात, त्यासाठी काय सामान लागेल म्हणजे कुठल्या प्रकारचा साबण, फिनाईल, अजून काही स्वच्छतेची सोल्युशन्स वगैरे त्याची यादी देतात आणि घर नीट लख्ख करून देतात. पण ते अर्थातच जादा पैसे मिळवण्यासाठी खाजगीरीत्या स्विकारलेले काम असते. त्यामुळे इथे त्यांचा काही संदर्भ देता येता येणार नाही. पण गूगलमधे housekeeping services, home cleaning services इत्यादी सर्च केले तर कदाचित काही संदर्भ मिळतीलही.

मंजूडी, गुगलून पाहिले गं.... ज्या सर्विसेस आहेत त्या कॉर्पोरेट लेवलच्या आहेत. त्यात खासगी निवास स्वच्छ साफसफाई करण्याचे कंत्राट घेतो असे कोठेच म्हटलेले नाहीए, मी पाहिलेल्या साईट्स वर! आहेत त्या ऑफिसेस, हॉटेल्स, हॉस्पिटल्स इत्यादी स्वच्छ ठेवणार्‍या कंपन्या... नाहीतर कार्पेट क्लिनिंग/ पेस्ट कंट्रोल करणार्‍या....

आम्ही एकदा एका कार्यक्रमाला गेलो असता तिथल्या वक्त्याने विचारले सर्वात प्रदुषित जागा कुठली? लोकानी बरीच वेगवेगळी स्थळ सांगितली (पब्लिक टॉयलेट सारखी) पण तो म्हणाला "तुमचे घर" आम्ही म्हणालो ते कसे काय? आम्ही रोज फिनेल वापरुन झाडतो, पुसतो, झालच तर EasyOff Bang, Colin, Lysol सारखी इम्पोरर्टेड आधुनिक cleaning agent वापरतो. त्यानी सांगितले त्यामुळेच हे सर्व होते कारण हे सर्व biodegradable नाही आणि यातील रसायनांचा आपल्या स्किनवर, श्वसनसंस्थेवर आणि पचनसंस्थेवरही खुप विपरित परिणाम होतो. साध्या कोमट पाण्याने, लिंबाने किंवा मीठाच्या पाण्याने घर साफ करा आणि रेग्युलरली साफसफाइ करा. स्वच्छतेचा अतिरेक नको.

मी फक्त टॉयलेट बोल साठी लायसॉल वापरते. खरे तर ते ही उरलेला सोडा पॉप वापरुन स्वच्छ होतो पण सोडा पित नाही त्यामुळे लायसॉल. बाकी सर्व स्वच्छता बेकिंग सोडा, मीठ,विनेगर आणि रबिंग अल्कोहोल वापरुन होते. जोडीला मायक्रोफायबर क्लॉथ. फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर नाही. त्या ऐवजी विनेगर. टॉवेल आणि तत्सम जाड कपडे सोडता बाकी कपडे ड्रायरमधे air-only वर फिरवुन नंतर रॅकवर किंवा हँगरवर वाळवते. माझ्या डॉकने लिक्विड ऐवजी पावडर वापरायला सांगितलेय डिश आणि क्लोद वॉशर साठी. तिही रेकमेंड केलेय त्याच्या निम्मी. त्याचे म्हणणे असे न केल्यास कपड्यावर सोप रेसिड्यु रहातो. कार्पेट असलेल्या खोल्या १५ दिवसातून एकदा वॅक्युम करते. कार्पेट वर काही सांडले तर बेकिंग सोडा, मीठ, डिशेस हाताने धुवायचा लिक्वीड सोप वगैरे साफ करायला आधी वापरते. बहुतेक वेळा रिझॉल्व वापरायची वेळ येत नाही. कार्पेट व्हॅक्युम करायच्या आदल्या रात्री कार्पेटवर बेकिंगसोडा शिंपडला तर दुसरे काही डिओडरायझर लागत नाही. रुमसाठी एका बोल मधे विनेगर घेऊन त्यात ४ लवंगा आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकून मावेत गरम करायचे. हा बोल रुम मधे ठेवला की काही वेळाने रुममधे छान फ्रेश वास पसरतो. आम्हाला इथे हाऊस किपिंग साठी Heloise च्या टिप्सचा खूप उपयोग झाला. माझ्या कडे तिचे पुस्तक आहे. गुड हाऊसकिपिंग मासिकातही तिच्या टिप्स येतात. अमेरिकन घरात हवा बरीच प्रदूषित असते तेव्हा शक्य असेल तेव्हा खिडक्या उघडाव्या. आम्ही मिडवेस्टच्या उन्हाळ्यातही शक्य तो एसी ऐवजी फॅन वापरतो. अगदी ८५ फॅ च्या आसपास थर्मोस्टॅट ठेवतो एसीचा. बाकी वेळी फॅन.

टॉयलेट क्लिनिंगसाठी कोकाकोला सारखे पेय उत्कृष्ट आहे असे ईमेल आले होते मध्यंतरी. त्यानुसार कोकाकोलामध्ये वापरलेली रसायने ही टॉयलेटच्या स्वच्छतेसाठीही उपयुक्त आहेत.
http://www.wikihow.com/Clean-a-Toilet-With-Coke

अगं अरु मी तेच लिहिलय. पण सोडा पॉप पित नाही त्यामुळे लायसॉल. पार्टी नंतर मी उरलेला सोडा पॉपच वापरते. Happy

झुरळांसाठी एक साधा उपाय, एक भाग बोरिक पावडर, पाऊण भाग मैदा, पाऊण भाग साखर हे नीट एकत्र करुन, दूधाने वा पाण्याने भिजवा. याचे छोटे छोटे लाडु करुन किचनमधे ठेवा. किचनमधे कुठे भेगा असतील तर या मिश्रणाने बूजवा. झुरळे हे खाऊन, सुकुन सुकुन (झुरुन) मरतात. घरातील आपल्या लहान बाळांना मात्र संभाळा.

छोटी छोटी उपकरणे, (जसे स्कूपर, पिलर वगैरे ) वापरुन झाली कि कोरडी करुन ठेवा. त्यापैकी रोज किंवा नियमित जी लागतात, ती सर्व एका फळीला हूक्स लावून त्याला अडकवा. पण हि फळी गॅसच्या वर नको, त्यावर तेलाचा राप बसतो.

फोडणीसाठी फार तेल घेऊन ते खूप तापवू नका, त्याचाही वर चिकटा बसतो.

माझ्या एका घरात गॅसच्या मागे भिंत होती. मी तिथे वर्तमानपत्रांच्या रंगीत पुरवण्या चिकटवून ठेवायचो, जेवण करता करता वाचूनही होत. आणि खराब झाल्या कि काढूनही टाकता येत.

रोजचे जेवण करायच्या आधीही, खाली पेपर अंथरुन त्यावर भाजी निवडणे, चिरणे. चपात्याचे पिठ मळणे, लाटणे असे प्रकार केले, कि ओटा / लादी साफ करावे लागत नाही.

सिंक क्लीनर्स मिळतात. पण रात्री कपभर व्हिनीगर आणि तेवढेच पाणी गरम करुन सिंकमधे ओतले, तर अडकलेले केस वगैरे विरघळून जातात.

माझ्या एका घरात गॅसच्या मागे भिंत होती. मी तिथे वर्तमानपत्रांच्या रंगीत पुरवण्या चिकटवून ठेवायचो, जेवण करता करता वाचूनही होत. आणि खराब झाल्या कि काढूनही टाकता येत.

>>>>>> लै भारी आयडिया आणि एकदम कल्पक आणि अभिनव!!! Happy

स्वाती२ चांगल्या टिप्स आहेत. फॅब्रिक सॉफ्टनर ऐवजी विनेगर --- हे नवीनच कळ्ले . कुठल्या प्रकारचे विनेगर ठेवावे घरात?

हिरकणी, व्हाईट व्हिनेगर वापरायचे. डिशवॉशरमधे पण १ कप व्हिनेगर टाकून १ सायकल करायचे. नेहमी वापरत असाल तर महिन्यातून एकदा. छान स्वच्छ होतो.
मी निम्मे व्हिनेगर आणि निम्मे पाणी स्प्रे बॉटल मधे घालुन ठेवते. जोडीला जुन्या सॉल्ट शेकर मधे बेकिंग सोडा. किचन काउंटर, सिंक, बेसिन छान स्वच्छ होतात. मुख्य म्ह्णजे पटकन स्पॉट क्लिन करता येते. पुर्वी मी इतर क्लिनर्स वापरायची तेव्हा सगळा काउंटर रिकामा करायला लागायचा इतर कशाला ती केमिकल्स लागू नयेत म्हणुन.
ड्रेन मधे पण १/२ कप बेकिंग सोडा आणि त्यावर १/२ कप व्हिनेगर ओतते.वरुन लगेच स्टॉपर लावायचा. थोड्यावेळाने गरम पाणी ओतले की झाले.

स्वाती , मला पण केमिकल्स असलेले प्रॉडक्ट वापरायला आवडत नाही.
म्हणुन मी "मेथडचे प्रॉडक्ट" वापरते. टारगेट मध्ये मिळतात.
व्हिनेगरचे उपयोग चांगलेच आहेत. पण त्याचा वास मला जरा आवडत नाही.

छान चर्चा रंगली आहे !! माझीही यात थोडी भर !! Happy http://flylady.net/pages/begin_babysteps.asp या साईटवर खुप छान टिप्स आहेत. बर्याच वेळा कुठे सुरवात करायची ते कळत नाही. या 'फ्लायलेडी' च्या म्हणण्यानुसार सुरवात किचन सिंकपासुन करायची नंतर दिवसातुन फक्त दहा मिनीटे घर आवराच. खुप वेळ घालवायचा नसल्यामुळे बर पडतं !!!

स्वाती २ खूप छान टिप्स आता मी पण व्हिनेगर आणेल.. सहसा मी व्हिनेगर ठेवत नाही घरात .कारण ते मला कुठल्याही रेसिपीत वापरायचे नसते.. असले कि वापरल्या जाते.. पण आता एक बाटली बेसिन च्या खाली ठेवेन आणि लौंड्री रूम मध्ये ठेवेन ..
तळण करताना व्हिनेगर एका वाटीत ग्यासच्या बाजूला ठेवले तर सुवासिक मेणबत्त्या वगैरे वापराव्या लागत नाही.. स्वाती ने म्हटल्या प्रमाणे इथे हा त्रास खुप असतो.. सगळ घर बंद असतं त्यामुळे वास घालवण्यासाठी बरंच काही करावं लागतं. थान्क्स

मी उसगावात असताना किचनमधला वास गेला नाही तर आवडत्या वासाची उदबत्ती लावून ठेवायचे दारं बंद करून. तेवढ्यावर जमायचं.

लहान मुलांनी केलेला पसारा आवरण्याच्या कोणाकडे सोप्या टीप्स आहेत का?:) Happy
माझी ३ वर्षाची मुलगी अशक्य पसारा घालते. एकदम बारक्या बारक्या गोष्टी उचलायला इतकं जिवावर येतं कोणी येणार असेल तर मी सगळे खेळ टॉयबॉक्स मध्ये कोंबते Sad टॉय ऑर्गनायझर्स घ्यायलाच पाहिजे असं ठरवलंय पण ते जरा महाग वाटतं.
लहान मुलांचे कपडे ठेवण्यासाठी कपाटं कुठे चांगली मिळतील?

अंजली, माझी मुलगी पण तीन वर्षांची होईल आता. तिने केलेला पसारा आम्ही दोघी मिळून आवरतो Happy टॉय ऑर्गनायझर्स फार फार सोयीचे पडतात. तिला आता कोणत्या प्रकारची खेळणी कुठे ठेवायची याची चांगली सवय लागली आहे.
आता भारतात गेल्यावर मलाही तिच्यासाठी नवे कपाट घ्यावे लागणार आहे. शक्यतो मीच डिजाइन करून लोकल सुतारकाम करणार्‍यांकडून तयार करवून घेईन असं ठरवलंय.

स्वाती२- छान पोस्टस.
इथे भारतात फरशी पुसायला काय वापरता येईल? (लायझॉल सोडुन)

साती- नियोजनतक्ता आवडला.

Pages